Wednesday, 12 October 2016

प्रकरण ७ इंद्रधनुष्याचे रहस्य

प्रकरण ७
इंद्रधनुष्याचे रहस्य
रिचर्ड डॉकिन्स यांच्या ‘मॅजिक ऑफ रिअॅलीटी’तील ‘व्हॉट इज अ रेनबॉ?’
या लेखाचा मराठी भावानुवाद.
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई. मो.क्र. ९८२२० १०३४९




पाच ते सहा हजार वर्षापूर्वीच्या, ग्रीक आणि ज्यू संस्कृतींपेक्षाही ही प्राचीन अशा, सुमेरियन (सध्याचा इराक) संस्कृतीत, गील्गामेषची कथा  सांगणारं महाकाव्य आहे. सम्राट गील्गामेष हा कथा नायक सिंदबादसारखा सफरी  करतो आणि ह्या दरम्यान त्याला हरतऱ्हेचे अनुभव येतात. चित्र विचित्र माणसं भेटतात. अशीच एक म्हातारी भेटते त्याला. उत्नापाष्टीम तीचं नाव. अगदी जख्खड म्हातारी. ती त्याला त्याचीच कथा ऐकवते. त्याला मोठं आश्चर्य वाटतं.
फार फार वर्षापूर्वी माणसांनी इतका दंगा आणि गोंधळ केला की त्या आवाजानी देवाची झोप मोडली. मग देवाधिदेव एन्लीलनी सुचवलं की हे जग आता एका मोठ्या पुरात नष्ट व्हायला हवं. त्याशिवाय आपल्या झोपेचं काही खरं नाही. पण जलदेव ईआनी उत्नापाष्टीमला आधीच सावध केलं. घराचेच लाकूडवासे वापरून त्यानी एक प्रचंड बोट बनवली. एवढी मोठी की सृष्टीतले सर्व सजीव त्यात जोड्याजोड्यांनी स्थानापन्न झाले. हे होते न होते तवर प्रलयंकारी पाउस सुरु झालाच. सतत सहा दिवस सहा रात्री, अखंडपणे पाउस कोसळत राहिला. बोटीवरचे जीव वगळता सारं काही बुडून गेलं. सातव्या दिवशी वारा पडला, पाऊस निवळला, पाणी शांत झालं.
उत्नापाष्टीमनी बोटीतून एक कबुतर बाहेर सोडलं. पण कुठे जमीन न दिसल्यामुळे ते तसंच परत आलं. मग त्यानी एका स्वॉलोला सोडलं तीही परत आली. मग त्यानी एक डोमकावळा सोडला. तो मात्र परत आला नाही. उत्नापाष्टीमनं ओळखलं, कुठेतरी जमीन दिसायला लागलेली दिसतेय.
शेवटी पाण्यातून डोकावणाऱ्या एका शिखराला बोट लागली. ईशटर देवानी इंद्रधनु उभारलं. पुन्हा प्रलय करणार नाही असं देवांच्या वतीनं वचन दिलं त्यानी. त्याची खुण म्हणजे हे इंद्रधनुष्य.
ही गोष्ट तर ओळखीची आहे. विशेषतः ख्रिस्ती, इस्लामी वा ज्यू पुराणकथा माहित आहेत, त्यांनी तर ही गोष्ट उत्नापाष्टीमच्या ऐवजी, नोहाच्या नावानी ऐकलेली असेल. सुमेरियन कथेत अनेक देवांचे उल्लेख येतात. ज्यू कथेत मात्र एकच देव हे सगळं करतो. थोडक्यात ज्यू कथा ही मूळच्या सुमेरियन कथेचीच बदललेली आवृत्ती आहे. लोककथाच ती पसरत जाताजाता पराचा कावळा आणि कावळ्याचं कबुतर व्हायला किती वेळ लागणार? एकच कथा अनेकानेक प्रदेशात सांगितली जात असल्याचं आपल्याला दिसतं. तपशिलात थोडेफार बदल असतात इतकंच. इथेही दोन्ही कथांचा शेवट हा इंद्रधनुष्यानी होतो.
गील्गामेषच्या महाकाव्यात आणि जेनेसिसमधे इंद्रधनुला अहम् स्थान आहे. जेनेसिसमध्ये तर हे देवाचेच धनुष्य असल्याचं स्पष्ट म्हटलं आहे. नोहा आणि त्याच्या वारस पुत्रपौत्रादिकांना हे साक्षात देवानी दिलेलं वचन आहे.
नोहाच्या गोष्टीत माणसाची विकारी वागणूक ही देवाच्या रोषाचं कारण ठरली. उत्नापाष्टीमच्या गोष्टीतला देव मात्र बराच शीघ्रकोपी दिसतो. निव्वळ झोपमोड झाली म्हणून त्यानी चक्क प्रलय घडवून आणला. पण ही गडबडया, बडबड्या आणि गोंधळया माणसांची गोष्ट इतरत्रही आहे बरं. कुठे? दूरवर कालीफोर्निया जवळच्या  सांताक्रुझ बेटावरच्या च्युमाष लोकात!
ह्यांच्या मानण्याप्रमाणे या बेटावरच त्यांची निर्मिती झाली. नाव अर्थात सांताक्रुझ नव्हतं. हे नाव नंतरचं. स्पनिशांनी दिलेलं. भूदेवता हुताशनी जादूच्या बियांपासून माणूस घडवला. भूदेवता हुताश, ही आकाशसर्पाची पत्नी. आकाशसर्प म्हणजे आपली ‘आकाशगंगा’ हो. त्यांच्यात ही सर्परूपी आणि पुल्लिंगी आहे. माणूस तर हुताशनी घडवला, पण लवकरच ह्या माणसांची प्रजा वाढली, आवाज वाढला आणि एकूणच मनुष्यजात ही एक डोकेदुखीच झाली हुताशला. ह्यांच्या गोंधळानी तिला निद्रानाश जडला. पण सुमेरिअन किंवा ज्यु देवतांपेक्षा ही जरा दयाळू होती. सगळ्यांना मारण्यापेक्षा तिनी काहींची रवानगी (सध्याच्या) अमेरिकेच्या किनारी केली, एका मोsssठ्ठया पुलावरून.... बरोब्बर ओळखलंत. हा पूल म्हणजेच आपलं इंद्रधनु.
ही सप्तरंगी कमान देवाचे धनुष्य म्हणून जशी येते, तशी ती पूल म्हणूनही विविध लोककथात येते. नॉर्स लोकांच्यामते देवांनी धरेवर उतरायचा मार्ग म्हणजे हा इंद्रधनूचा पूल, तर पर्शिया, आफ्रिका, मलेशिया आणि  ऑस्ट्रेलियाकरांच्या मते, इंद्रधनु म्हणजे पाऊस प्यायला फणा काढून उठलेला महाकाय सर्प.
कुठून, कधी, कशा सुरू झाल्या ह्या कथा, कुणास ठाऊक. कुठे का सांगेना, कधी का सांगेना, कुणी का सांगेना, कोणाला का सांगेना; पण आश्चर्य याचं वाटतं की ह्या आजही शब्दशः खऱ्या समजून उराशी कवटाळणारी लोकं आहेत.
मग इंद्रधनुष्य म्हणजे खरचंच आहे तरी काय?

इंद्रधनूचे जादुई सत्य
     लहानपणी एक नाटक बघितलं होतं मी, ‘इंद्रधनुच्या तळाशी’. सप्तरंगी प्रकाशात न्हावून निघालेल्या रंगमंचावर ती मुलं बागडत होती. शेवटी चमचमता पोशाखात, झळाळता मुकुट घालून खुद्द सेंट जॉर्ज अवतरतो आणि त्यांच्या आनंदाला पारावार रहात नाही. पण मी भारावून गेलो ते त्यातील इंद्रधनुष्याच्या दृष्यानी. चक्क इंद्रधनुष्याच्या रंगात निथळून जाण्यात काय मजा असेल या कल्पनेनी माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले.
खरंच, रहाता येईल का इंद्रधनुच्या टोकाशी उभं? त्या नाटककाराला अशी कल्पना सुचली त्यात नवल ते काय. अगदी शेताभातात उतरलेलं टोक दिसत असतं आपल्याला. दुसरं टोक असतं प्लीक्द्च्याच टेकाडावर. असं वाटतं हे इथे तर आहे, जरा पुढे गेलं की आलंच. सप्तरंगात न्हाउन निघण्याचं स्वप्न अगदी काही पावलांवर आहे. सगळ्या कथा-कवितातलं इंद्रधनू म्हणजे एका निश्चित स्थानी असलेली, निश्चित अशी वस्तू.
तसं नाहीये. कितीही जोरात पळालात, कितीही वेळ पळालात तरी इंद्रधनुच्या टोकाशी तुम्ही पोहोचु शकत नाही. तुम्ही जितकं पुढे जाल, तितकं तेही पुढे जात राहील. शेवटी हवेत अंतर्धान पावेल. पण खरोखर पुढे पुढे पळायला इंद्रधनुष्य म्हणजे काही विशिष्ठ वस्तू नाही. तो एक आभास आहे. दृष्टीभ्रम आहे. मृगजळाशी जसं आपण कधीच पोहोचू शकत नाही तसं हे. पण हा भ्रम आणि त्याचा निरास खूपच उद्बोधक आहे. त्या रंगीबेरंगी दुनियेच्या परिचयाचा क्षण  विलक्षण न्यारा आहे. इतका की या विश्वाची सुरुवात कशी झाली, हेही इंद्रधनुच्या रंगाभ्यासानी लक्षात येतं. कसं ते पुढे पहाणार आहोत आपण.

प्रकाश म्हणजे काय
     आधी वर्णपट (Spectrum) म्हणजे काय ते पाहू. साडेतीनशे वर्षापूर्वी (आपल्याकडे तेंव्हा शिवशाही अस्ताला जात होती) न्यूटननी असं पाहिलं की पांढरा रंग म्हणजे सप्तरंगांचं मिश्रण आहे. (या सप्तरंगांसारखं न्युटनचं कर्तृत्वही सप्तरंगी आहे. वर्णपटाबरोबरच त्यानी इतर अनेक शोध लावले, कल्पना मांडल्या. ग्रहभ्रमणाबद्दल त्याचं योगदान आपण एका प्रकरणामध्ये पाहिलं आहे.) पांढरा प्रकाश म्हणजे भौतिकशास्त्राच्या दृष्टीनी सर्व रंगाचं मिश्रण.
     हे कसं शोधलं त्यानी? एका अंधाऱ्या खोलीत सूर्यप्रकाशाची एक तिरीप येईल अशी रचना केली त्यानी. ह्या प्रकाशाच्या वाटेत लोलक (प्रिझम, काचेचा त्रिकोनी तुकडा) ठेवताच त्यातून बाहेर पडणारा प्रकाश सप्तरंगात विखुरलेला गेला. आत जाताना शुभ्र असलेली ज्योत्स्ना बाहेर येताना इंद्रधनू जणू. शुभ्र ज्योत्स्ना पुलकित न्यूटन अशी अवस्था. का?
     काचेत शिरताच प्रकाशकिरण वाकतात, ह्याची ही किमया. कोणत्याही पारदर्शक पदार्थातून आरपार जाताना, अगदी पाण्यातूनही जाताना प्रकाशकिरण वाकतात. त्यांचे अपवर्तन होते. अपवर्तनामुळे पाण्यात बुडालेला वल्ह्याचा भाग वाकलेला भासतो. ग्लासातल्या चमच्याचा पाण्याखालचा भाग वाकडा भासतो. पाण्यामुळे होणारे प्रकाशाचे अपवर्तन हेच इंद्रधनुष्याचे रहस्य आहे. पण निरनिराळ्या रंगाचे प्रकाशाचे तरंग कमी-अधिक वाकतात. लाल सगळ्यात कमी वाकतो, तर जांभळा सर्वात जास्त. त्यामुळे लोलकातून बाहेर पडताना लाल एका दिशेला, तर जांभळा थोडा वेगळ्या दिशेला बाहेर पडतो. मधे पिवळा, हिरवा, अशा छटा दिसतात. ‘तानापिहिनिपाजा’ (तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा) हे रंगांच्या क्रमाचं लघुरूप तुम्हाला माहीतंच असेल.
     लोलकातून रंग निघतात हे दर्शवण्यात न्युटनची महत्ता नाही. हे तर आधीही कितीतरी जणांनी पाहीलं होतं. पण लोकांचा असा समज होता की लोलक काही तरी चमत्कार करून, प्रकाशला रंग लावून, बाहेर सोडतो.  न्यूटननी वेगळंच मांडलं. तो म्हणाला प्रकाशात अनेक रंग असतातच, लोलक फक्त ते वेगळे वेगळे करतो.  ह्याला पुरावा म्हणून त्यानी काही प्रयोग केले. आधीप्रमाणे त्यानी प्रकाशाचं इंद्रधनू उमटवलं. आता त्यातल्या फक्त लाल पट्ट्यासमोर, आणखी एक लोलक सरकवला. यातून बाहेर येणारा उजेड वाकला, पण त्याचा रंग नाही बदलला. त्यातून पुन्हा लालेलाल रंगच बाहेर पडला.
     आणखीही एक प्रयोग केला त्यानी. हा निर्वाणीचा प्रयोग, म्हणजे या प्रयोगानी सिद्धता पूर्ण होते. यात त्यानी उमटलेल्या इंद्रधनूपुढे आणखी एक लोलक ठेवला. सातही रंग आता दुसऱ्या लोलकात शिरत होते. पण दुसऱ्या लोलकातून बाहेर पडताना आता, इंद्रधनूची शोभा मिटून फक्त पांढरा प्रकाश बाहेर पडत होता. अर्थात एवढ्यावर थांबेल तो न्यूटन कसला? आता बाहेर पडणाऱ्या पांढऱ्याशुभ्र किरणशलाकेच्या मार्गात त्यानी तिसरा लोलक ठेवला. आता पुन्हा एकदा यातून इंद्रधनुचे रंग लेऊन प्रकाश बाहेर पडला.

थेंब पावसाचे, लोलक कसे साचे?
     लोलक बिलक सगळं ठीक आहे, पण इंद्रधनुष्य दिसतं तेंव्हा काय आभाळात महाकाय लोलक असतो का? नसतो, पण क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे, असा खेळ असतो. पावसाचे थेंब काही लोलकाकार असतात का? अगदी डिक्टो लोलकाकार नसतात हे मान्य आहे, पण थोडे-थोडे लोलकासारखेच असतात. त्रिकोणीसरच असतो की थेंब. पत्येक थेंब जवळ जवळ लोलकासारखंच काम करतो. थेंबाची प्रकाशकिरणाकडील बाजू वक्र असते. म्हणजे लोलकासारखी तीरकीच असते. विरुद्धबाजूतून प्रकाशकिरण आरपार जात नाहीत. विरुद्धबाजू एखाद्या आरशासारखी कार्य करते. प्रकाशकिरण थेंबाच्या आतल्या बाजूवरुन परावर्तीत होतात.
     इंद्रधनुष्य दिसतं ते सूर्याकडे पाठ करून उभं राहिल्यावरच. थेंब म्हणजे पाण्याचे छोटे छोटे बॉलच असतात. समजा रिमझिम पाऊस पडतो आहे, त्या पावसाच्या झिरझिरीत पडद्यात पाण्याचे कोट्यावधी तुषार आहेत. एका बाजूनी या छोट्या छोट्या थेंबात प्रकाश प्रवेशतो आहे, वाकतो आहे, त्याचे अपवर्तन होते आहे; आणि दुसऱ्याबाजूनी तो बाहेर पडायच्या ऐवजी परावर्तीत होत आहे. थेंबाची मागची बाजू ही आरशासारखा परिणाम दाखवते. मागच्या बाजूवरुन प्रकाश परावर्तीत होतो, आपल्याकडे वळतो आणि आपल्या डोळ्यात पोहोचतो. आपल्याला दिसतं, ‘नभि उमटे इंद्रधनु, इंद्राचे चाप जणू.’
     आणखी थोडं स्पष्ट करतो. तुमच्या पाठी सूर्य आहे आणि त्यातून येणारा एक किरण तुमच्या समोरच्या असंख्य थेंबांपैकी ‘अ’ या थेंबाला भिडला. हा किरण थेंबात शिरला. अपवर्तनाच्या नियमानुसार तो वाकला. त्यातील रंग निरनिराळ्या कोनात झुकले. लाल जरा कमी झुकला. जांभळा जरा जास्त. आता हा रंगीबेरंगी प्रकाश याच थेंबाच्या मागच्या बाजुपर्यंत पोहोचतो. इथून मात्र बाहेर पडण्याऐवजी त्या थेंबाच्या अंर्तभागावरून तो परावर्तीत होतो. तो अंतर्भाग चक्क आरशासारखं काम करतो. पुन्हा एकदा प्रकाश थेंबाच्या पुढच्या बाजूला पोहोचतो, आणि इथून बाहेर पडतो. पुन्हा एकदा उजेड वाकतो, रंग आणखी पसरतात, आपल्याला मनोहारी दृश्य दिसायला लागतं. त्या ‘अ’ ह्या थेंबातून येणारा संपूर्ण वर्णपट आपल्याला दिसत नाही. समजा त्यातून येणारे हिरवेच किरण आपल्याला दिसत आहेत, तर आपल्यापेक्षा बुटक्या माणसाला त्यातून येणारे लाल किरण दिसत असतील. ऊंच माणसाला ह्याच थेंबातून बाहेर झेपावणारे जांभळे किरण दिसतील.
     एकाच थेंबातून निघणारे रंग हे इतके विखुरलेले असतात की संपूर्ण सप्तरंग आपल्याला दिसूच शकत नाहीत. पण इंद्रधनुष्यात तर आपल्याला सगळेच रंग दिसतात, हे कसं? कारण सोप्प आहे. आता पर्यंत आपण ‘अ’, ह्या विवक्षित थेंबाबद्दल बोलत होतो. त्याच्या वर आणि खाली कोट्यवधी थेंब आहेत, त्यातून कोट्यवधी किरण बाहेर पडत आहेत आणि कुणातून एक तर कुणा तून दुसरा असे अनेक रंग आपल्या डोळ्यात एकाच वेळी पोहोचत आहेत. समजा ह्या ‘अ’च्या खाली ‘ब’ हा थेंब आहे. या ‘ब’तून निघणारा लाल प्रकाश तुमच्या पोटावर पडत असेल. तो तुम्हाला दिसणार नाही. पण यातून निघणारा जांभळा प्रकाश मात्र तुमच्या डोळ्यात पडेल. ह्या ‘ब’तला जांभळा उजेड तुम्हाला दिसेल. श्रावणधारा रिमझिम झरतातच आहेत. विविध उंचीवर, विविध थेंब आहेत, त्यातून विविध रंगांचा प्रकाश बाहेर पडतोच आहे. त्या त्या थेंबाच्या आणि तुमच्या ठिकाणानुसार तुमच्या डोळ्यात कोणता रंग पडतो हे ठरतं आहे. एकुणात सात रंग तुम्हाला दिसणार आहेत. तुम्ही मोहरून जाणार आहात.
     खरंतर प्रत्येक इंद्रधनुष्य संपूर्ण वर्तुळाकार दिसायला पाहिजे पण जमीन आड येते. चंद्राला किंवा सूर्याला खळं पडलं असं आपण म्हणतो तेंव्हा हा सप्तरंगी गोल आपल्याला दिसत असतो. बागेत पाणी घालताना देखील, कधी कधी त्या फवाऱ्यात इंद्रधनुचे गोल चमकून जातात.
     आपल्याला दिसलेलं इंद्रधनू क्षणाक्षणाला बदलत असतं. आत्ताचा थेंब क्षणभरात आणखी खाली आलेला असतो.  ज्या ‘अ’ ह्या थेंबातून हिरवा प्रकाश येत होता, त्यातला जांभळा प्रकाश आता आपल्याला दृगोचर होतो. त्या खालचा ‘ब’ हा ही असा थोडा खाली आला आहे. त्यातील कुठलाच किरण आता आपल्याला  दिसत नाही. पण आता आपल्या पायाशी उभ्या असलेल्या कुत्र्याला मात्र दिसेल. पण ‘अ’च्या जागी आता एक नवा थेंब असेल तो ‘अ’ ची जागा घेईल... आणि असं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक थेंबाचं होत राहील. थेंब खाली खाली पडत असतात पण इंद्रधनू पडत नाही, ते स्थिर भासते ते याच कारणानी.


नेमकी तरंग लांबी
          तानापिहिनिपाजा ह्या क्रमाबद्दल आता बघू या. हे रंग वेगवेगळ्या कोनात का झुकतात?
          प्रकाशाच्या ‘लाटा’ असतात, तरंग असतात. रंगानुसार ह्या लाटांची लांबी (लाटेच्या एका उंचवट्यापासून पुढच्या उंचवट्यापर्यंतचे अंतर) वेगळी वेगळी असते. लाल रंगाची तरंगलांबी सगळ्यात जास्त असते तर जांभळ्याची सगळ्यात कमी. प्रकाश म्हणजे विद्युतचुंबकीय लहरी. (म्हणजे काय हे समजावून सांगण्यात इथे फार वेळ जाईल. ते राहूदे. मलाही ते नीट समजलं नाहीये.) आवाजाच्या लहरींसारख्याच प्रकाशलहरीही कमी अधिक लांबीच्या असतात. वरच्या पट्टीतला आवाज हा कमी तरंगलांबीचा असतो. खालच्या पट्टीतला, खर्जातला, आवाज हा जास्त तरंगलांबीचा असतो. ‘तानापिहिनिपाजा’ ही वर्णपटाची रंगभाषा, ‘सारेगमपधनिसां’ च्या स्वरभाषेशी जवळीक सांगणारी आहे. या भाषेची, लांब तरंगलांबीचा (तांबडा) षड्ज, मग (नारंगी)ऋषभ, (पिवळा) गंधार, (हिरवा) मध्यम, (निळा) पंचम, (पारवा) धैवत आणि शेवटी सर्वात कमी तरंगलांबीचा (जांभळा) निषाद; अशीही ओळख करून देता येईल.
          शिवाय आपल्याला अजिबात ऐकू न येणाऱ्या उंचचउंच  पट्टीतले आवाज असतात. त्यांना म्हणतात ‘अल्ट्रासाउंड’. वटवाघळांना हे ऐकू येतात. त्यांचे प्रतिध्वनीही त्यांना ऐकू येतात. या आवाजाच्या ‘उजेडातच’ त्यांना ‘दिसतं’. त्यांचा मार्ग सापडतो. आपल्याला ऐकू न येणारे असे खालच्या पट्टीतले आवाजही असतात. यांना म्हणतात इन्फ्रासाउंड. हत्ती, देवमासे यांच्या भाषेत असले आवाज फार. त्यांची भाषा त्यामुळे फक्त त्यांनाच ऐकू येते. ढोल किंवा नगाऱ्याच्या ध्वनितही हे गुप्तध्वनी असतात. खोल खर्जातले हे आवाज आपल्याला ऐकू येत नाहीत, हे नाद ‘अंगाला जाणवतात’. हा अनुभव तुम्ही घेतला असेल. थोडक्यात जगातल्या प्रचंड कोलाहलापैकी अल्ट्रासाउंडच्या (वटवाघळांच्या) खालचे आणि इन्फ्रासाउंडच्या (हत्तींच्या) वरचे, एवढेच ध्वनी आपल्याला ऐकू येतात. बाकी शब्द बापुडे केवळ वारा! 
          उजेडाचीही हीच गत. वटवाघळांच्या अल्ट्रासाऊंड चीत्कारांसारखा अल्ट्राव्हायोलेट प्रकाश असतो. जांभळ्यापेक्षाही कमी तरंगलांबी असलेला प्रकाश असतो. अतिनील प्रकाश. पण तो आपल्याला दिसत नाही. ही आपल्या इंद्रियांची मर्यादा. हा किड्यांना दिसतो. कित्येक फुलांच्या पाकळ्यांवर, आपल्याला अदृष्य अशा या अतिनील रंगाच्या रेघा असतात. फुलातील मकरंद नेमका कुठे आहे हे दर्शवणाऱ्या ह्या खुणा. त्या ज्यांच्यासाठी आहेत त्यांना, म्हणजे किड्यांना, बरोब्बर दिसतात.  खास अल्ट्रा-व्हायोलेट कॅमेरा वापरून आपण ह्या खुणा पाहू शकतो. हे कॅमेरे, आपल्याला दिसतील अशा रंगात, त्या खुणा दाखवतात. भाषांतरित किंवा  रंगांतरित करतात जणू. जाईजुईच्या फुलं छान पांढरीशुभ्र दिसतात आपल्याला, पण अल्ट्राव्हायोलेट कॅमेऱ्यानी फोटो काढला की त्यावरचं पट्टेरी डिझाईन अगदी स्पष्ट दिसतं.
          आणखीही कमीकमी तरंगलांबीची किरणं असतात. ही किड्यांनाही दिसत नाहीत. हाड मोडल्यावर काढतात तो ‘एक्स रे’, कॅन्सरवर उपचारासाठी वापरतात ते ‘गॅमा रे’ वगैरे नावं तुम्ही ऐकली असतील. हे असे अती-अतिनील, अती अती कमी लांबीचे किरण.
          दुसरीकडे आपल्याला दिसणारा लाल रंग हा किड्यांना अ-दृश्य असतो. आपला लाल हा मधमाशांचा ‘इन्फ्रारेड’. लाल रंगापेक्षाही लांब तरंगलांबी असणारे, खर्जातले, रंग आहेत. हे किरण आपल्यालाही दिसत नाहीत पण त्यांची उष्णता जाणवते. सापांना तर हे किरण अगदी उपयुक्त ठरतात. त्यांनाही हे दिसत नसले तरी उष्णतेच्या रूपात जाणवतात. गरमागरम उंदीर ते त्याच्या उष्णतेवरून शोधतात. भक्ष्यापासून येणारे हे किरण त्यांना बरोब्बर शिकार साधून देतात. ह्याहीपुढे आपल्याला भेटतात मायक्रोवेव्ह. आपल्या किचनमधले आपले साथी, आणि त्यापुढे रेडीओलहरी.
          आपल्याला दिसणारे, जाणवणारे रंग म्हणजे गामा किरणांपासून रेडीओलहरींपर्यंत पसरलेल्या एका मोठ्ठ्या वर्णपटाचा अगदी छोटासा तुकडा आहे. बाकी बराचसा भाग आपल्या डोळ्यांना अदृष्य आहे.
          सूर्याच्या प्रकाशात, ताऱ्यांच्या प्रकाशात, ह्या प्रचंड मोठया वर्णपटातील सगळे वर्ण असतात. खोल खोल खर्जातल्या रेडीओतरंगांपासून उंच उंच, टिपेच्या, गॅमातरंगांपर्यंत. पण हे सर्व रंग आपल्याला दिसत नाहीत. एखाद्या तुरुंगाच्या खिडकीच्या टीचभर फटीतून जग बघावं तसे आपण. आपल्याला ह्या विस्तीर्ण वर्णपटाचा फक्त एक छोटासा भाग दिसतो. पण चिंता कशाला? आपल्या दृष्टिआडची सृष्टी बघायला माणसानी आपली बुद्धिमता आणि विज्ञान वापरून कितीतरी यंत्र बनवली आहेत.
          रेडीओ खगोलतज्ञ रेडीओलहरींच्या कॅमेऱ्यानी, म्हणजे रेडीओ टेलिस्कोपनी फोटो घेतात. एरवीचा कॅमेरा निव्वळ दृश्य किरण दाखवतो. पण हे खास रेडीओ टेलिस्कोप, रेडीओ किरणांनी चितारलेली प्रतिमा दाखवतात. असेच एक्स रे टेलीस्कोपही आहेत. वर्णपटाच दुसरं टोक इथे अभ्यासलं जातं. ह्या अभ्यासातून ताऱ्यांनी, विश्वानी घातलेले उखाणे सुटतात. जगाच्या बंदिशालेच्या फटीतूनच आपण बघू शकत असलो तरी आता विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या झेपेमुळे आपल्या नजरेआडच्या, पण वास्तव जगाचं विस्मयकारी दर्शन घडतं आपल्याला.हे दर्शन जादुई सत्याची प्रचिती देणारं आहे.
          दिसणाऱ्या इंद्रधनुष्यात सातच रंग असले तरी विज्ञानानी त्यात आणखी किती रंग भरलेत बघा. लांबलांबच्या ताऱ्यांचा प्रकाश आपल्यापर्यंत येतो. त्यातील रंगांचाही अभ्यास करता येतो. त्या ताऱ्याचं अंतरंग कसं आहे, तो किती वयाचा आहे, हे उलगडतं त्यातून. एकदा इंद्रधनुष्याचा उलगडा झाला की त्याच्या साक्षीनं विश्वाचं वयंही जोखता येतं. विश्वजन्माचं रहस्य शोधता येतं. विश्वास बसत नाही ना? हे सारं पहाणार आहोत पुढच्या प्रकरणात.  



    


No comments:

Post a Comment