Wednesday, 28 September 2016

होस्टेलचे दिवस

होस्टेलचे दिवस
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई, पिन ४१२ ८०३.
मो. क्र. ९८२२० १०३४९


आपल्यापेक्षा चार पावसाळे जास्त पाहिलेला माणूस हा आपोआपच हुशार समजला जातो. खरं तर हे विचित्र आहे. ज्ञानप्राप्तीचा कोणताही प्रयत्न न करता निव्वळ चार वेळा मॉन्सून अंगावर बरसला म्हणून आपोआप शहाणपण प्राप्त होत असेल असं वाटत नाही. कारण  डोकं आणि डोळे उघडे नसतील तर पालथ्या घड्यावर पाणी असंच व्हायचं. शिवाय दर पाच सहा वर्षानी एखाददोन वर्ष अवर्षणाची. ही जमेस धरायची का नाही हेही स्पष्ट नाही.
चार पावसाळ्यांचं काही खरं दिसत नाही पण चार होस्टेल ज्यांनी जास्त पाहिली असतील त्यांना मात्र ज्ञानी समजायला प्रत्यवाय नाही. मानवी जीवनव्यवहाराचा अर्क हा होस्टेल मधे राहून आपल्या अंगात अगदी मुरून जातो. इसापनीतीतले सगळे प्राणी इथे वास्तव्याला असतात आणि पंचतंत्राची पाचही तंत्र आत्मसात केल्याशिवाय, इथे जगणे अशक्य. बीगल जहाजातून प्रवास, मग सापडलेल्या प्राण्यांवर संशोधन वगैरे  थापा, डार्विननी आपली पत वाढवी म्हणून ठोकलेल्या आहेत. ‘सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट’ हे लक्षात यायला एवढं सव्यापसव्य करण्याची काहीएक गरज नव्हती. चार दिवस होस्टेल मधे काढले की हे तत्व आपोआप उमजतं. शाळा कॉलेजमधे असताना डार्विनलाही पोरांनी छळला असेल, त्यातूनच त्याला उत्क्रांतीचा सिद्धांत सुचला असेल, पण चार लोकात हे असं कसं सांगणार? म्हणून मग पुढचं सगळं. अंदर की बात ही आहे!
आयुष्यात मला अगदी भरपूर होस्टेल घडलं आहे. अगदी बॉर्न जरी नाही, तरी  ब्रॉट अप इन होस्टेल, असं म्हणायला हरकत नाही. आधी शाळेचं होस्टेल, मग ज्युनिअर कॉलेजचं होस्टेल, मग मेडिकल कॉलेजचं होस्टेल, मग हॉस्पिटलमधले क्वाटर्स असं करत करत मी जेव्हा पास होऊन घरी पोहोचलो तेंव्हा मी घरच्या पेक्षा जास्त वर्ष घराबाहेर काढली होती. बारा होस्टेलचं पाणी पिऊन आता मी चांगला तैय्यार झालो. होस्टेलच्या अन्नावरच मी वाढलो, चांगला एरंड म्हणावा असा वाढलो. कोणी इक्षुदंड म्हणावं अशी अपेक्षा न करता वाढलो.
शाळेचं होस्टेल हे शेवटी शाळेचं होस्टेल. त्यात दंगा थोडा शिस्त फार. ज्युनिअर कॉलेजचं होस्टेलही तसलंच. इथे दंगामस्ती थोडीफार आणि शिस्त फार थोडी. पण मेडिकल कॉलेजचं होस्टेल म्हणजे मर्मबंधातली ठेव. मुळात कॉलेजला प्रवेश मिळाल्यानं छात्या तट्ट् फुगलेल्या असायच्या, (मुलांच्या सुद्धा) त्यांना टाचणी लावायचं काम ह्या इथे व्हायचं. सारे समान आहेत पण सिनिअर अधिक समान आहेत असा इथला व्यवहार.  
होस्टेल होतं मोठं ऐसपैस. सरकारीच मामला तो. त्यातून हुशार आणि भावी डॉक्टरांसाठीचा मामला. ‘ए’ ते ‘ई’ असे पाच ब्लॉक होते. ह्यांची ह्यांची खास वैशिष्ठ्य होती. डी ब्लॉक सगळ्यात जुना दगडी, दुमजली, सुबक, बैठी इमारत. समोर बाग, कुंपणापलीकडे चहा नाष्टाच्या गाड्या वगैरे. पण इमारत इतकी लांबलचक की एका टोकाला असलेल्या संडास बाथरूमला जायला सायकल वापरणारी मंडळी होती. ‘ई’ ब्लॉक सगळ्यात रोमांचक. ह्याच्या मागून गर्ल्स होस्टेलला जायचा मार्ग, दुतर्फा सतत गच्च फुललेला गुलमोहोर. म्हणजे गुलमोहोर उन्हाळ्यातच फुलायचा पण विद्यार्थ्यांच्या मनस्थितीप्रमाणे ज्याला त्याला तो वेळोवेळी फुललेला दिसायचा. ‘ए’ आणि ‘बी’ ब्लॉक मधे मेस आणि टीव्ही. ‘सी’ ब्लॉक सगळ्यात भारदस्त. हा एक्झामगोइंग मुलांचा ब्लॉक. टाचणी पडली तरी आवाज येईल अशी शांतता असायची इथे. बाहेरून जाताना कुणी जरा जरी आवाज केला तरी सी ब्लॉक मधून एक ‘शुsssक!’ पुरेसं होतं. इतर ब्लॉक मधली मुलं, कसायाकडे नेल्या जाणाऱ्या बोकडाकडे इतर बोकडांनी बघावं, तशी इथल्या रहिवाशांकडे पहायची. अपार करुणा डोळ्यात दाटलेली असायची. लवकरच आपल्यावरही हीच पाळी येणार आहे याची विषण्ण करणारी जाणीव असायची. ज्युनिअर मुलं लंच टाईमला  वेळात वेळ काढून प्रत्येक रूममधे जावून हवं नको विचारायची. तशी प्रथाच होती. स्टेशनरी पासून बनियन चड्डी पर्यंत जे मागू ते इथे रूमपोच पुरवलं जायचं. धीर दिला जायचा. एक मोठं कुटुंबच तयार व्हायचं.
कॉलेजमधे आम्ही तीघं रूम पार्टनर. पप्या, चिक्या आणि मी. मी वगळता बाकी दोघं होस्टेल या प्रकाराला नवखे. त्यांनी आल्याआल्याच एक भयंकर मोठी भूल केली. दूधाचं रतीब लावलं. आपली पोरं धष्टपुष्ट व्हावीत असं त्यांच्या आईबापांना वाटत होतं. त्यांनी त्यांच्या मते बेस्ट उपाय त्यांना  सुचवला होता. आज्ञाधारकपणे त्यांनी तो अंमलात आणला होता. पण घी देखा लेकीन बडगा नही देखा अशी अवस्था. ते रसरसत्या इलेक्ट्रिकच्या शेगडीवर ठेवलेलं पातेलं, ते दूध उतू जाणं, त्याचा तो खोलीभरून वर कॉरीडॉरभर उरलेला वास. ते काळं ठिक्कर पडलेलं पातेलं. मग ती शेगडी शॉर्ट होणार. मग चिमटा, चमचा, पेन ह्याच्या सहाय्यानी ती शेगडी दुरुस्त होणार, मग पुन्हा लावताच लाल व्हायच्या आतच ती कॉइल पुन्हा तुटणार आणि ही दोघं खजील होणार... हे सर्व भविष्य मला लख्ख दिसत होतं. शिवाय ते दुध उरणार, त्यावर गिळगिळीत साय धरणार. शिवाय संन्याश्याच्या लंगोटीसारखं, दुध म्हटलं की साखर, बोर्नव्हीटा, चहा पावडर, कॉफी पावडर, गाळणं, चिमटा, चमचा, घासणी, व्हीम बार... अब्बब्ब्ब... सगळा संसारच मांडवा लागणार... पुढे पुढे ते दुध नासणार मग त्यात हे साखर घालून खवा म्हणून खाणार किंवा नासलेलं दुध टांगून त्याचा चक्का बिक्का सुद्धा बांधतील अशी मला भीती वाटायला लागली.
शिवाय हे रतीब दोघांत लावलेलं. एकानी चहाची तयारी करायची आणि एकानी चहा, अशी श्रमविभागणी होती. त्यामुळे इकडे दूध उकळलं आणि गाळणं जरी जागेवर नसेल तरी चहा करणारा हा तयारी करणाऱ्याला बोलवायला समोर ग्राउंडवर जायचा! ह्या भानगडीत दुधाला चांगला खरपूस वास लागायचा. कितीही काटेकोर श्रमविभागणी केली तरी काही श्रम शिल्लक रहायचे. किंवा ऐनवेळी नवीनच श्रम निर्माण व्हायचे. त्यामुळे करवडलेली भांडी घासणे, नेमका चहाच्या वेळी टपकल्याने चहात पडलेल्या  मित्राचा कप विसळणे, उतु गेलेले पुसणे, नासलेले कचऱ्यात टाकणे, अशा अनेक जबाबदाऱ्या ह्या ग्रे एरीयात होत्या. ह्याची धास्ती फार.  माझ्या अपेक्षेप्रमाणेच महिनाभरातच या दुधावरून दोघांची चांगलीच जुंपली. लोण्याच्या गोळ्यावरून दोन बोक्यांचं झालं नसेल असं त्यांचं कडाक्याचं भांडण झालं आणि दुध आमच्या खोलीतून हद्दपार झालं ते कायमचंच.
होस्टेल म्हटलं की पहिला विषय डोक्यात येतो, जेवण. चांगली मेस काही मला एकदाही सापडली नाही. इतका बेचव स्वयंपाक इतक्या सातत्यानी करता येणं हेही एक कौशल्यंच आहे की. चुकुनही, एकाही पदार्थाला चव येऊ नये, अंगचा काही स्वाद असेल तर तो नष्ट व्हावा आणि चोथा याच सदरात बसणारा पदार्थ रोज तयार व्हावा यालाही काहीतरी तरी कष्ट पडत असतीलच की. ह्याबद्दल मोनालिसा सत्काराला पात्र आहे. कोण मोनालिसा? तुम्हाला माहित नाही? मोनालिसा हे जेनेटिक नाव आहे. मेस चालवणाऱ्या कोणत्याही बाईला मोनालिसा हेच नाव सार्थ आहे आणि पुरुषांना स्फिंक्स. जगात आणि विशेषतः मेसमधे काहीही होऊ दे, मोनालिसासारखेच ह्या बायकांच्या चेहऱ्यावरचे गूढ हास्य कधी लोपत नाही आणि नर-सिंह स्फिंक्स पुरूषांची दगडी भिवई जरा सुद्धा ढळत नाही.
आमच्या होस्टेललाही एक मोनालिसा होती. म्हणजे तीचं नाव मोनालिसा नव्हतं, तीचं नाव बानूबाई, हिच्याही चेहऱ्यावर गूढ स्मित होतं. तुम्ही काहींही बोला स्मितहास्य फिक्स. पोळ्या करपल्या आहेत सांगा, कच्च्या आहेत सांगा, भाजी संपली कशी विचारा, किंवा ‘केळ्याच्या कोशिंबिरीत हिरव्या मिरच्या कोणाच्या तीर्थरूपांनी तरी घातल्या होत्या का?’ असा सवाल करा; उत्तर एकच; स्मितहास्य! एकदा भर आंब्याच्या सीझनमधे रविवारी स्वीटडिश म्हणून आमरस असणार असल्याची पाटी हिनी लावली. खरंतर उगीच आशा लावू नाही म्हणतात, पाप लागतं. पण हिनी लावली बुवा पाटी. दुसऱ्या दिवशी वखवखलेले आम्ही इष्टमित्रांसह वेळेआधीच मेसमधे दाखल. पण आमरस म्हणून वाटीत चक्क आंब्याच्या वासाचा, पिवळ्या रंगाचा, फ्रुटीसदृश, पातळ, पांचट द्राव पडला. भडका उडाला होस्टेलमधे. पण मोनालिसा शांत होती. काsssही बोलली नाही. फक्त स्मितहास्य. भाज्या तर कुठून शोधून आणायची देव (सुद्धा न) जाणे. त्या लगद्याचं डी.एन.ए. अनॅलिसीस करायला एकदा एकजण घेऊन गेला होता म्हणतात. कॉलेजमधे डी.एन.ए. अनॅलिसीसचं मशीन नवीनंच आलं होतं. पण ह्या पहिल्याच धक्यानी ते मशीन जे बिघडलं ते आजतागायत मोडलेलंच आहे.
मेसच्या अन्नाला तोंड देणं ही मोठीच परीक्षा त्यामुळे कोणाच्याही घरून डबा येणं म्हणजे तर पर्वणीच. घरून डबा घेऊन कोण येतो यावर दबा धरूनच असायची मंडळी. अशा  मित्राला गुळाला मुंगळे चिकटावेत त्या वेगानी मित्रसंपदा लाभत असे. खाऊ संपताच हे मुंगळेही त्याच वेगानी गायब होत असत. एकदा मित्राला रिक्षातून उतरवून घेतला, पण त्याचा खाऊचा डबा रिक्षातच राहिला. मोठ्या हिकमतीनी त्या रिक्षाचा पाठलाग करून तो डबा हस्तगत केला. त्या रिक्षावाल्याला आधी वाटलं की दागिन्यांचा डबा वगैरे आहे की काय. पण तो होता फोडणीच्या पोळीचा डबा. रिक्षावाल्याला होस्टेल घडलं नसल्यामुळे तो आमच्याकडे बावळटासारखं पहात होता. म्हणजे आम्ही बावळट आहोत असं समजून. आम्हीही त्याच्याकडे तो किती बावळट आहे, अशा नजरेनी पाहून घेतलं आणि तिथून काढता पाय घातला. डबा दागिन्यांचा असता तर काही तरी बक्षिसी तरी मिळाली असती. ती हुकल्याची खुदाई खिन्नता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
होस्टेलच्या कदान्नाला ज्यांनी तोंड दिलं त्यांना घरच्या अन्नाची गोडी वेगळी सांगायला नको. घरची कडबाकुट्टी सुद्धा अमृतातेही पैजा जिंके, अशी लागते मग. ज्या बायकांना स्वयंपाक जमत नाही अशांनी आपापल्या नवऱ्यांना काही दिवस होस्टेलमधे घालावं. नवरोबा घरी परत येताच सुगरण सर्टिफिकेट ग्यारेन्टीशीर मिळेल. तोच पोळी भाजीचा घास आता ते मिटक्या मारत खातील.
कॉलेजचंच होस्टेल ते, व्यसने किम् दरिद्रता, अशी इथे परिस्थिती. कसं कुणास ठाऊक; घरचे संस्कार म्हणा, आधीच्या होस्टेलचे संस्कार म्हणा किंवा संगतीचा परिणाम म्हणा, पण त्या मार्गाला कधी प्रशस्त वाटलंच नाही.  पण एकदा होळीचा दिवस होता. होस्टेल हे सुपीक कल्पनांचं माहेरघर. कुणाच्यातरी डोक्यातून आयडिया निघाली, भांग घेतली पाहिजे. या क्षेत्रातलं अनुभवी कोणीच नाही. मग अपोलो टॉकीजच्या पानवाल्याकडे भांग मिळते अशी गुप्त वार्ता आली. दोन जण मोटरसायकलवर भांगेसाठी रवाना झाले आणि जिलबी आणायला दोन जणं गेली. अर्थात भांगेच्या मोहिमेवर मावळे रवाना झाल्याचं अन्य मावळ्यांना कळायला वेळ लागला नाही. बघताबघता रूमवर पाचाचे पंधराजण झाले. ती बहुचर्चित गोळी आली सुद्धा. हा एक तीळ आम्ही पंधरा जणांत वाटून खाल्ला. अर्थातच काही फरक पडला नाही. काही म्हणजे काहीही झालं नाही. ना हलकं हलकं वाटलं, ना डोकं जड झालं, ना रडू आलं ना हसू. आमचंच हसं होण्याची मात्र वेळ आली. बहुधा वाट्याला आलेला भांगेचा डोस अगदीच कमी होता. शेवटी भांग खाल्ल्यावर नेमकं काय होतं हे आमच्यातल्या काही बहाद्दरांनी चक्क टॉक्सीकॉलॉजीचं पुस्तक काढून नीट वाचून घेतलं. मग मात्र त्यांना ताबडतोब भांग चढली आणि पुस्तकातल्यासारखं सगळं त्यांना व्हायला लागलं.
आयुष्यात अनेक होस्टेल घडली पण सर्वांच्यात समान अशी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे संडासबाथरूमची रचना. हे एका टोकाला असतात. अनेक असतात. तुटकी दारं, गळके नळ, फुटक्या फरशा, तिरकी बेसिन्स असा सगळा मामला. दोन संडासामध्ये भींती असतात त्या पूर्ण छताला कधीच टेकलेल्या नसतात. ह्यामुळे वायूविजनास मदत तर होतेच शिवाय एकाच ट्यूबचा उजेड सर्व संडासात पोहोचतो आणि कोणी वाजवी पेक्षा जास्त वेळ संडासाराधना करायला लागल्यास वरून गार पाणी फेकायची नामी सोय होते.
शिवाय आतली चित्रकला हाही एका स्वतंत्र निबंधाचा विषय आहे. आतल्या अभिव्यक्तीला विषय आणि आशय पुरवणारी फिरती वाचनालयं ही देखील सर्व होस्टेलमध्ये असतातच असतात. त्यांच्यातील रद्दीतून निवडून निवडून आणलेले डेबोनेर, प्लेबॉय, हैदोस आणि तत्सम मासिकांचे दुर्मिळ अंक आणि अमूल्य असा  ग्रंथसंग्रह, त्यांचं प्राणपणानं केलेलं जतन, संवर्धन, संशोधन, अभ्यास, पुनर्विलोकन हे कौतुकास पात्र आहे. तरुण मुलांनी स्वयंस्फुर्तीनी चालवलेली ही वाचनालयं. मुलांचा व्यासंग आणि त्यास लाभलेला उदार लोकाश्रय हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. अभ्यासाला असलेला ग्रेज अॅनॅटॉमीचा रुक्ष आणि राक्षसी ग्रंथ एकाबाजूला आणि  तीच अॅनॅटॉमी सुंदर करून दाखवणारा फिरत्या ग्रंथालयातला एखादा दुर्मिळ अंक एकाबाजूला. कुठे श्यामभट्टाची तट्टाणी आणि कुठे इंद्राचा ऐरावत, असा प्रकार. ह्याच्या आठवणीनी अजूनही रोमांच उभे रहातात. एखाद्या क्रांतीची तयारी असावी अशा थाटात गुप्तपणे इथे देवघेव चालते. उघड्यावर हे अंक ठेऊन चालत नाहीत. त्यांना लगेच पाय फुटतात. ठेवताना ते सहसा गादीखाली ठेवावे लागतात.
काहींचे पालक फार भोचक असतात. रूमवर आल्यावर ते सहज म्हणून गादी उचलून बघतात. त्यांच्या तारुण्याची भूतं त्यांना तिथून वेडावून दाखवतात. मग हे खवळतात. ‘आम्ही रक्ताचं पाणी करून तुला लहानाचा मोठा केला...’ वगैरे लेक्चरबाजी सुरु होते. कॉटखालील मासिक, हा लहानाचं मोठं होण्याचाच अपरिहार्य परिणाम आहे हे मात्र लक्षात घेतलं जात नाही. यावर उपाय म्हणून रूमपार्टनरच्या गादीखाली मासिकं ठेवावीत, तर तोही नेमका हाच उपाय योजतो. त्यामुळे आपल्या गादीखाली मासिक येतंच. एकुणात योजना बारगळते. पण मित्राच्या गादीखाली डोकावल्याचा  फायदा असा होतो की आपले गेल्या आठवडयात हरवलेले सॉक्स तिथे सापडतात.
अशा अनेक वस्तू होस्टेलवर हरवतात आणि सापडतात. पूर्ण केलेली जर्नल सहसा परीक्षेच्या आदल्या दिवशी हरवतात. परफ्युम, आफ्टरशेव्ह, डीओ हे पार्टनरच्या कपाटात सापडतात. रूमची किल्ली आणि तीचं हरवणं हाही एक भलताच मनोरंजक प्रकार असतो. आधी सर्व पार्टनरकडे स्वतःची किल्ली असते. मग एकाची आणि पाठोपाठच दुसऱ्याची हरवते. मग शिल्लक किल्ली दाराच्या चौकटीवर, जिन्याच्या सापटीत अशी विशिष्ठ ठिकाणी ठेवण्यात येते. हळूहळू हे गुपित सगळ्यांना कळतं. पण तोपर्यंत एकूणच कुलूप ह्या प्रकाराबद्दल मनात उदासभाव निर्माण झालेला असतो. ‘तुम क्या लाये थे जो साथ लेकर जाओगे...?’ वगैरे गीतासार इथे प्रत्यक्ष प्रत्ययातून आपोआप आचरणात येतं. शिवाय झटका मारताच उघडणारी, लाथ घालताच उघडणारी, स्पर्श करताच उघडणारी, अशी विविध कुलुपं होस्टेलवर उपलब्ध असतात. ‘खुल जा सिमसिम’ म्हणताच माझ्या रूमचं कुलूप निघतं असंही एक मित्र सांगायचा.
कुलुपाला लागलेल्या चीठ्ठ्याही खास असायच्या. ‘सामानासकट येऊन गेलो. बराच वेळ बाहेर तिष्ठत उभा होतो.’ अशी चिठ्ठी ठेऊन माझा मित्र गेला. यावर पुढे तीन दिवस आम्ही हसत होतो. अर्थाचा अनर्थ करण्यात होस्टेल पटाईत असतं. अशाच एका दुर्मिळ मित्राला, ‘तुला भेटायच्या इच्छेचं आता महत्वाकांक्षेत रुपांतर झालं आहे.’ अशी चिठ्ठी मीही ठेऊन आलो होतो. एक मित्र डबा रूमबाहेर ठेवायचं विसरायचा. शेवटी डबेवालीकडचे डबे संपले. तिनी चिठ्ठी ठेवली, ‘आज जर डबे बाहेर ठेवले नाहीत  तर उद्या पातेल्यातून जेवण आणून ठेवावं लागेल.’
‘पॅरासाईट्स’ ही इथली खास जमात. ‘पॅरासाईट्स’ म्हणजे परोपजीवी, दुसऱ्याच्या जीवावर जगणारे. पण होस्टेलमधले हे ‘पॅरासाईट्स’ असे शोषक नसायचे. होस्टेलमधली पोरं आणि ‘पॅरासाईट्स’ याचं गाढ मैत्र जुळलेलं असायचं. बरेचदा अन्न, वस्त्र, मुलींबाबत सल्ला, मोटरसायकल वगैरे हे ‘पॅरासाईट्स’च पुरवायचे. ही मंडळी होस्टेलची अधिकृत रहिवासी नसायची पण होस्टेलमधे पडीक असायची. ह्यात गावातच रहाणारी, पण गावात घर असल्यामुळे आपल्याला होस्टेलची ‘ऐष’ नाही असं वाटणारी मुलं असायची. मग रात्रभर गप्पा मारण्याच्या थ्रिलसाठी, एकत्र रहायच्या थ्रिलसाठी, घरी मिनत्या करून ती वस्तीला येत. त्यांना एकाच रात्रीत होस्टेल लाइफचं पुरेसं थ्रिल मिळायची व्यवस्था केली जात असे. जेमतेम बारा तासाच्या थ्रिलनंतर ही मंडळी पुन्हा घराच्या आश्रयाला जात. होस्टेलला रहाणं हे सोप नाही, येऱ्या गबाळ्याचे काम नोहे, हे त्यांना लगेच उमजत असे. काहींना ह्या थ्रिलची चटकच लागे. घरच्यापेक्षा इथेच बरे, अशा भावनेनी ही मग होस्टेलवरच मुक्कामी असत. काही सिनिअर असत. काही (सांगता न येणाऱ्या) कारणांनी यांना होस्टेल मिळत नसे. मग मित्र प्रेमापोटी यांना उदार आश्रय दिला जात असे.
खरेखुरे ‘पॅरासाईट्स’ही होतेच की होस्टेलला. डास, पिसवा, उवा आणि ढेकुण! ढेकणांच्या तर अनंत आठवणी आहेत. ह्या सहचराशिवाय होस्टेल अशी कल्पनाच करता येत नाही. कॉटच्या फटीतून, गादीच्या शिवणीतून, टेबल खुर्चीच्या सापटीसापटीतून ह्यांची प्रजा राज्य करत होती. उगाच डोळ्याला डोळा लागून आमच्या अभ्यासाचा बोऱ्या वाजू नये याची हे काळजी वहात होते. मती क्लांत होऊन जर्रा पुस्तकावर डोकं टेकवून झोपायचीही सोय नसायची कारण यांची प्रजा पुस्तकाच्या बायडींगमधेही लपलेली. तिथून येऊन आपले डोळे खाड्कन उघडणारच. स्वतः रात्र रात्र जागून वर आम्हाला निद्रानाश जडावा यासाठी घोर तपच आरंभलं होतं त्या ढेकणांनी. जीन पँण्ट भेदून मांडीला चावा घेण्याची क्षमता होती, यांच्या कणखर जबड्यांमधे. त्यामुळे खुर्चीत बसताना आधी खाली पेपर ठेवायचा आणि त्यावर बसायचं. कसं कुणास ठाउक पण  जीन पँण्ट भेदणारे हे मत्कुण पेपरमधून मात्र आरपार चावू शकायचे नाहीत. कागदाचा इतका चांगला उपयोग लहानपणानंतर आत्ताच करायला मिळाला. ढेकूण रक्त पितात, बस्स एवढंच, त्यांच्यापासून आपल्याला (किंवा आपल्यापासून त्यांना) कोणताही आजार होत नाही. होत असता तर त्याच आजारानी तेंव्हाच मेलो असतो आम्ही. होस्टेलची गादी ही काही दिवसानंतर  आपोआप गुबगुबीत लागायला लागली की ओळखावं, गादीखाली हमखास ढेकणाची आणखी एक गादी तयार झाली आहे. चिन्यांच्यापेक्षा अधिक वेगानी यांची प्रजा वाढते.
ढेकणांविरुद्ध युद्धासाठी रविवार राखीव असायचा. मग अनेक उपचार केले जायचे. एकेक ढेकुण चुनचुनके मारणे हा पहिला उपाय. ढेकुण मारला की एक विशिष्ठ वास येतो. तो वास आजही नाकात आहे. होस्टेल म्हटलं की आजही नाकात दरवळतो. हा वास आला की अन्य ढेकणांना संकटाची पूर्वसूचना मिळते म्हणे. ते मग आणखी खोल सांदीफटीत शिरतात. मग कॉट उन्हात ठेवायची, उकळत्या पाण्यानी धुवायची, कॉटला कागद गुंडाळून कॉट जाळायची. पण ढेकुण जमात महा चिवट. ‘नैन् छींदन्ती शस्त्राणि नैन् दहती पावकः’ हा त्यांचा बाणा. हे सगळं करून वर  तऱ्हेतऱ्हेचे फवारे मारा, पावडरी लावा, मलमं फासा, खडूनी लक्ष्मणरेषा आखा,  हे आपले जिथल्या तिथे. ह्या सगळ्याला पुरून उरत ढेकुण. उलट ढेकूण वॉर लढून अगदी थकायला व्हायचं. त्या रात्री गाढ, शांत झोप लागायची. आम्ही घोर निद्रेत असतां, ढेकुण आपले चरायला मोकळे सुटायचे.
पण परीक्षा जवळ आली की ढेकूणही आमची एकाग्रता भेदू शकत नसत. दर दीड वर्षानी परीक्षा. त्यामुळे आमच्यासारखे दीडशहाणे वर्षभर निव्वळ ट्रीप, ट्रेक, नाटकं, लायनी मारणे वगैरे जीवनावश्यक गोष्टींकडे लक्ष पुरवायचे. शेवटचे सहा महिने, दिवसरात्र खुर्चीला चिकटून, ढुंगणावरी फोडू येईपर्यंत अभ्यास. खऱ्या अभ्यासकाला ढेकणांची काय तमा? पण ह्या भानगडीत नापास होण्याची चित्तथरारक भीती सदैव सावलीसारखी बरोबर असायची. पप्याचं तसं नाही. तो आमच्यातला, त्यातल्या त्यात, गुड बॉय. त्याला रोज अंघोळ करणे, पैशाची गरज नसतानाही घरी खुशालीचे पत्र टाकणे, रात्री नऊलाच झोपणे अशाही काही विचित्र सवयी होत्या. तो बिचारा वह्यांना कव्हर बिव्हर घालायचा, सुवाच्य अक्षरात त्यावर नावं घालायचा, जर्नल वेळेवर कम्प्लीट करायचा, रोज वेळेवर ठराविक अभ्यास करायचा. पण नियमित अभ्यासामुळे त्याच्या आत्मविश्वासाचा वेलू गगनावरी वगैरे चढायचा असं मात्र समजू नका. इतकं करूनही परीक्षेच्या आधी हा धाय मोकलून रडायचा. अच्चा बच्चाच्या गोष्टीतल्यासारखे मग आम्ही दोघं त्याची समजूत घालायचो. आमचा बहुमूल्य वेळ वाया घालवून घातलेली ही समजूत किती अनाठायी होती हे रिझल्ट लागताच  सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट होत असे. कारण बहुतेकदा धोधो रडलेला पप्या चांगला धोधो मार्कानी पास आणि आम्ही समजूत घालणारे दोघं काठावर पास असा रिझल्ट  असायचा. पप्याला  आता मनातल्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटायच्या आणि आम्ही दुखःसागरात गटांगळ्या खात असायचो. अर्थात एकट्यानीच चांगले मार्क मिळवण्याच्या त्याच्या ह्या खोडीबद्दल त्यानी आमचा एकदोनवेळा मारही खाल्ला आहे.
आता होस्टेल सुटूनही वीस पंचवीस वर्ष झाली. पप्या, चिक्या आणि मी वेळोवेळी भेटत असतो. आमच्या ‘पॅरासाईट्स’ मित्रांनाही या गेटटूगेदरला आमंत्रण असतंच असतं. होस्टेलमधल्या सुखदुखांची उजळणी होते. जुनी भांडणही उकरून काढली जातात. पण काय होतं कुणास ठाऊक. ह्या उकराउकरीतूनही फक्त आठवणींचा सुगंध तेवढा दरवळत रहातो.

येता जाता आजही होस्टेल खुणावतं, पण आत गेलं की सगळच अनोळखी आणि परकं परकं वाटायला लागतं. कोणे एके काळी दिवसाचे चोवीसही तास इथे काढलेले होते, ह्याच इमारतीनी आपल्याला आश्रय दिला, खाऊ-पिऊची सोय केली, इच्छा असेल तरच न्हाऊ-माखू घातलं, कॉलेजची फुलपाखरी वर्षं इथेच तर बागडण्यात गेली. असं सगळं वाटलं तरीही ते धागे पुन्हा जुळत नाहीत. आता आपण वाढलेलो असतो, मोठे झालेलो असतो, कोणीतरी कर्तृत्ववान वगैरे झालेलो असतो. पण होस्टेलला त्याचं मुळीच कौतुक नसतं. ती इमारत आता माझ्याकडे ढुंकून सुद्धा बघत नाही. उलट फर्रsss फर्रsss आवाज करत येणाऱ्या मोबाइक्स, त्यावरची मोठ्या मोठ्या आवाजात  बोलणारी, एकमेकाला मनसोक्त शिव्या घालत हाका मारणारी मुलं, त्यांच्या बरोबरच्या फटाकड्या पोरी, अशा सगळ्या रंगीबेरंगी जत्रेकडे होस्टेल मोठया कौतुकानी बघत असतं. मायेने या पोरांना कुशीत घेत असतं. लाडिकपणे त्यांची चौकशी करत  असतं. मग मी तिथे थांबतच नाही. सावत्र आईनी झिडकारलेल्या मुलासारखा गपगुमान घरी येतो. होस्टेल आता माझं राहीलेलं नसतं आणि मीही होस्टेलचा राहिलेलो नसतो.