Monday 27 July 2020

खारट, अगदी अश्रूं इतकंच खारट..!

खारट, अगदी अश्रूं इतकंच खारट..!

डॉ. शंतनू अभ्यंकर

 

विरह  वेदनेनी व्याकूळ  होऊन कित्येक हिन्दी, उर्दू शायरांनी ‘आंसू पी पी के’ जीव जगवला आहे.  पण नेमक्या  ह्या अश्रूंइतक्याच खारट   पाण्यानी कित्येकांचे प्राण वाचवले आहेत आणि कित्येक आयाबायांच्या डोळ्यातील पाणी  थोपवले आहे.  ह्या पाण्याचं नाव जलसंजीवनी.

 

**************************************

 

कॉलरा आपल्या आसपास नाही आता. जवळपास संपल्यातच जमा आहे तो. म्हणजे अगदी निर्मूलन वगैरे नाहीये झालेलं त्याचं. पण त्याचं नसणं हे जगातल्या बहुसंख्यजणांच्या अंगवळणी पडलंय. दूरदेशी गेलेल्या नातेवाईकाला हळूहळू आपण बेदखल करावं तसं. पण कोणे  एके काळी कॉलरा हा काळ म्हणून उभा होता. वर्षानुवर्षे  खेड्यापाड्यात, लंडन-न्यूयॉर्कमध्ये किंवा आषाढी-कार्तिकीला पंढरपूरला भक्तजनांसह  कॉलऱ्याची वारीही ठरलेली. भूवैकुंठीचे अनेक भक्तजन थेट वैकुंठी  धाडायचं काम कॉलरा करत असे. पालखीबरोबर साथ येत असे, पसरत असे आणि ओसरत असे. माणसं सगळी निरवानीरव करूनच  तीर्थयात्रेला निघायची ते काही उगीच नाही.

कॉलराच्या साथीत सहजी  बळी जायचा  तो लहानग्यांचा. जबरदस्त जुलाब असतील तर निम्मी पोरं कोमेजून  दगावतात.  पण स्तनपानाचा आग्रह, लसीकरण, पोषक आहार वगैरेमुळे लहानगे अधिक टवटवीत झाले आणि ओ.आर.एस्.मुळे कॉलराचे कंबरडेच मोडले. हे ओ.आर.एस्. म्हणजे ओरल रीहायड्रेशन सोल्यूशन. उत्तम मराठी प्रतिशब्द आहे, जलसंजीवनी. साखर, मीठ घातलेलं हे संजीवक तीर्थ किती खारट असावं लागतं? तर अगदी अश्रूं इतकं खारट!

कॉलऱ्यात जुलाब होतात. पण कॉलऱ्यातच नाही तर एकूणच जुलाबावर, अत्यंत गुणकारी ठरलेली ही युक्ती  आहे. ‘जुलाबावर गुणकारी, साखर मीठ पाणी’ किंवा ‘जुलाब होता बाळराजा, साखर मीठ पाणी पाजा’ अशी घोषवाक्य तुम्ही सरकारी इमारतींवर येताजाता, नाईलाजाने, वाचली असतील.  इतक्या किरकोळ युक्तीचा हा साधासोपा आग्रह म्हणजे वृथा फुगवलेला फुगा आहे असंही तुम्हाला वाटून गेलं असेल. पण आजवर काही कोटी जीव या युक्तीने वाचले आहेत. ही इतकी सोपी युक्ती आपल्या किंवा अन्य कुणाच्या बापजादयांच्या लक्षात कशी आली नाही हे एक कोडंच आहे. पण नाही लक्षात आली खरी. मंडळी याच्यासारखी अन्य काही द्रावणे वापरत होती पण ह्या तीर्थाची ताकद  काही औरच.  अगदी अलीकडे म्हणजे साठ-सत्तरच्या दशकात ह्या मंतरलेल्या पाण्याचा शोध लागला.

तत्पूर्वी(१९५३), कोलकात्यात, डॉ. हेमेंद्रनाथ चटर्जींनी   कॉलरात तोंडावाटे साखर, मीठ आणि पाणी  देऊन जुलाब  आटोक्यात आणले होते. १८६ पेशंटपैकी, पैकीच्यापैकी बरेही  झाले. ‘लॅन्सेट’ या भारदस्त ब्रिटिश संशोधनपत्रात त्यांनी आपले निष्कर्ष  प्रसिद्धही केले. पण ह्या अभ्यासात तोंडावाटे औषध न दिलेल्यांचे, म्हणजे सलाईनवाल्यांचे, (म्हणजे कंट्रोल ग्रुप) काय झाले,  याचा उल्लेख नव्हता आणि  आतबाहेर पाणी किती गेलं किती आलं, वगैरे  सविस्तर अभ्यास नव्हता. त्यामुळे हा  अभ्यास कमअस्सल  ठरला. ह्या पाण्यात त्यांनी काही वनस्पतीही घातल्या होत्या, त्यामुळे नेमका गुण कशाचा  हाही  प्रश्न होता. एका नुकत्याच स्वातंत्र्यप्राप्त वसाहतीतील, काळ्याबेंद्रया माणसाची ही कल्पना कोणीच फारशी  गांभीर्याने घेतली  नाही. आपल्याकडे सलाईन असताना असल्या गावठी, मागास उपायांची कशाला पत्रास ठेवा असाच विचार त्यांनी केला असणार. बगदादमध्ये, १९६६साली, अन्य संशोधनाशी अगदीच अपरिचित असलेल्या, डॉ. क्वाईस अल अक्वातींनी  साखर, मीठ, पाण्याची युक्ती, स्वयंस्फूर्तीने,  यशस्वीपणे वापरली. पण हाही गडी, ‘नाही चिरा, नाही पणती’ असाच राहिला. असे अनेक असतील, अनाम हुतात्मे काही युद्धांतच असतात असे नाही. संशोधनातही असतात.

तर जल संजीवनीच्या शोधाचे हे रामायण. किंवा ह्या शोधाचे हे महाभारतच म्हणा ना; कारण हया कथेत सुष्ट आणि दुष्ट अशी दुही नाहीये.  माणसाच्या माणूसपणाचे अनेक पैलू दडले आहेत. महाभारतासारखीच ही कथाही स्वार्थाची, परमार्थाची आणि सर्वार्थाची आहे. काळे-गोरे, पूर्व-पश्चिम असे भेद दर्शवणारी आहे. उच्च तंत्रज्ञान, त्यावरची मक्तेदारी आणि पारंपरिक शहाणपण याचं द्वंद्व दाखवणारी आहे.

हे सगळं संशोधन झालं ढाक्यात आणि कोलकात्यात, अमेरिकी संशोधन संस्थांच्या छत्राखाली. यापूर्वी उपचारात महत्वाचं स्थान होतं ते ग्लुकोज-सलाईनला. ह्याचा  प्रभावी वापर सुरू झाला तो 1920 च्या आसपास. हा उपचार कल्पनेबाहेर यशस्वी ठरत होता. ह्यात काय आणि किती शरीरात जातंय याची नेमकी गणती शक्य होती. हा मोठाच फायदा होता. ग्लुकोज म्हणजे एक प्रकारची साखरच आणि ‘सलाईन’चा तर  अर्थच मुळी खारट  पाणी. म्हणजे शिरेवाटे दिले जायचे तेही साखर, मीठ पाणीच होते.  मग सलाईनवर बरेच संशोधन होऊ लागलं. वेगळवेगळ्या  तऱ्हेचं सलाईन, थोडं हे असलेलं, थोडं ते असलेलं; थोडं अमुक नसलेलं, थोडं तमुक नसलेलं. पण शेवटी सलाईन ते सलाईन, ते शरीरात शिरवण्यासाठी सुई, नळी आणि बाटली एवढं किमान हवं. हे सगळं निर्जंतुक हवं. खाट, इस्पितळ, डॉक्टर आणि नर्सबाई  असेल तर उत्तमच.  एकेका पेशंटला डझनभर   सलाईनच्या  बाटल्या लागायच्या. शंभर वर्षापूर्वीचा  काळ डोळ्यापुढे आणा म्हणजे हे काय दिव्य होतं हे लक्षात येईल. ज्यांना खरी गरज, ज्यांच्या घरीदारी कॉलराची महामारी, अशा तिसऱ्या जगातल्या, खेड्यांपाड्यातल्या, निर्वासित छावणीतल्या, झोपडपट्टीतल्या पेशंटपर्यन्त हा उपचार पोहोचवणे अशक्यच होते. त्यांनी आपलं सुकून मरून जायचं. सुरकुतलेली त्वचा, डोळे खोल, जिभेला शोष, लघवी बंद, धाप लागलेली, नाडी जेमतेम, हातापायात वांब, अशी अगदी मरणप्राय स्थिति  काही तासात ओढवणार  आणि लवकरच मृत्यूनेच यातून सुटका होणार. 

तेंव्हा सलाईनपेक्षा  तोंडावाटे काही औषध देणे खूपच सोयीचं  आणि सोपं  ठरणार होतं. पण जुलाब झाल्यावर पोटाला ‘विश्रांती’ हवी अशीही एक कल्पना डॉक्टर-मानसात चांगली घट्ट रुतून बसली होती. त्यामुळे उपास, लंघन महत्वाचं होतं.  सहाजिकच होतं ते. आतडेच जर आजारी आहे तर त्याला विश्रांती द्यायची  का पचनाचं काम? आजारी अवयवाला कामाला जुंपणे अयोग्यच नाही का? पोटात काहीही दिलं की बरेचदा जुलाब वाढायचेच.  मुळात कॉलराच्या पेशंटला सुरवातीला जबरदस्त उलट्या होत असतात. अशा पेशंटला काही दिलं तर उलट्या वाढायच्या. शोष नष्ट होईल इतकं सारं पाणी पेशंट  पिऊ शकेल अशी कल्पनाही कोणी केली नव्हती.  तेंव्हा उपास  हा तर्कशुद्ध उपाय होता आणि तोंडावाटे उपचार तर्कदुष्ट.

जुलाबात आतड्याला सूज येते. ज्या अस्तरातून (श्लेष्मल त्वचा, Mucosa), एरवी पाणी आणि जीवनावश्यक अन्नघटक शोषून घेतले जातात तिथे आता गंगा उलटी वहायला लागते. पाणी आणि क्षार बाहेर, म्हणजे आतडयाच्या पोकळीत, ओतले जातात. तोंडावाटे काही दिलं तर उलटी तरी होते किंवा जुलाब आणखीनच वाढतात किंवा दोन्ही होते. पुढे जुलाब होतात तेंव्हा पोटात नेमकी काय गडबड होते, जुलाबावाटे जे बाहेर पडतं त्यात असतं तरी कायकाय, यावर संशोधन झालं (डॅनियल डॅरो, १९४९)  आणि उपचार अधिक शास्त्रशुद्ध झाले. जुलाबावाटे होणारा सोडियम, पोटॅशियम आणि ग्लुकोजचा पात, हाच  घात ठरतो. मग सलाईनमधून हे सगळं देण्याचा प्रयत्न सुरू झाला.  जे गळतंय तेच भरून काढायला हवं हे तर उघड होतं. जेवढं बाहेर पडतंय, जे बाहेर पडतंय, ते तेवढयाच  प्रमाणात भरून निघायला हवं. कमी नाही आणि जास्त नाही. ह्या माहितीचा उपयोग सलाईन यथायोग्य करण्यासाठी झाला. हे संशोधन झालं पहिल्या जगात. तिसऱ्या जगातले सलाईनलाही मोताद पेशंट त्यांच्या नजरेसमोर नव्हतेच. जे आपण शिरेवाटे देतोय तेच तोंडावाटेही देऊन पहायला हवं हे लक्षात यायला  बराच काळ लागला.

कॉलऱ्याचे स्वल्पविरामासारखे दिसणारे जंतू (व्हीब्रियो कॉलरा) आतडयाच्या पृष्ठभागावर घर करतात.  तिथून काही जहरीली रसायनं सोडतात. परिणामी शरीरातील पाणी आणि क्षार बदाबदा आतडयाच्या पोकळीत उतरतात आणि जुलाब होतात. आतडयातून पाणी झरते पण त्याच वेळी पाणी शोषून घ्यायची क्रियासुद्धा चालू असते. ह्या क्रियांचे संतुलन ढळलेले असते. साखर, मीठ आणि पाणी असा समसमा संयोग जुळून येताच बाहेर जाणाऱ्या पाण्यापेक्षा आत शिरणारे पाणी वाढते. शुष्कता कमी होते. पण हे सगळं घडायचं तर साखर, मीठ आणि पाणी योग्य प्रमाणातच  असावं लागतं.

साखर, मीठ पाण्याचे नेमके माप माहीत नसल्यामुळे असली सरबते बनवण्याचे सुरवातीचे प्रयत्न, प्रयत्नांच्याच पातळीवर राहिले. फार फार तर लंघन आणि पूर्णाहार ह्याच्या मधली पायरी म्हणून त्यांचा उपयोग केला जाई. सलाईनला पर्याय म्हणून, जवळपास  परिपूर्ण उपचार म्हणून,  ह्यांचा विचार शक्य नव्हता.

आतडयात ग्लुकोज  शोषले जाते ते सोडियमचे  बोट धरून (रिक्लीस, क्वास्टेल आणि क्रेन). ग्लुकोज साथीला असेल तर तिप्पट सोडियम शोषले जाते.  नुसतेच ग्लुकोज दिले किंवा  नुसतेच सोडियम (म्हणजे सोडियम क्लोराईड, मीठ) दिले किंवा नुसतेच पाणी दिले तर ते तितकेसे उपयोगी ठरु शकत नाही. ग्लुकोज आणि सोडियम ही जोडगळी पक्की असते. सुरवातीला असं वाटत होतं की जुलाबात ही जोडगळी फुटते. ‘सोडियम पंप’ अशी काही यंत्रणा आतडयाच्या अंतःत्वचेत असते. हा पंप जुलाबात निकामी होतो अशी प्रचलित समजूत होती. पुढे संशोधनाने ही समजूत मिथ्या ठरली. तीव्र जुलाबातही साखर-मीठाची जोडी आणि त्यांची आतडयातून शरीरात  आवक शाबूत असते असे दिसून आले (फिशर आणि पार्सन). म्हणजे जलसंजीवनीत ग्लुकोज असते ते भुकेसाठी नाही, तर  सोडियम आत शिरावे म्हणून.

पण हे सगळं संशोधन प्रत्यक्षात वापरलं गेलं ते १९६०साली फिलिपाईन्समधल्या साथीत. पण हे अजाणता झालं.   इथे डॉ.  फिलिप्सनी पेशंटना साखर, मीठ, पाणी दिलं पण त्यांना वरील संशोधनाची कल्पना नव्हती. असती तर साखर आणि  मीठ त्यांनी आवश्यकतेपेक्षा तिप्पट प्रमाणात घातलंच नसतं. सुरवातीच्या मोजक्या पेशंटमध्ये त्यांना अगदी  नाट्यमय परिणाम दिसला पण लवकरच ह्या प्रयत्नांचा शोकांत शेवट झाला. चुकीच्या साखर-मीठाच्या प्रमाणामुळे काही लोकं दगावली सुद्धा. जुलाबासाठी तोंडावाटे उपचारांवर  संशोधन,  हा प्रकार जरा मागेच पडला मग. सगळेच जरा दबकून पावले टाकू लागले. पण ग्लुकोज आणि पाणी जुलाबातही आतडयातून शोषले जातच असते असा प्रत्यक्ष पडताळा मात्र यातून प्राप्त झाला.  

हे अपयश पाहून सचार, हिर्शहॉर्न  आणि फिलिप्स या ढाक्याच्या  केंद्रातील  शास्त्रज्ञात अनेक वाद झडले. इतक्यात प्रयोग करावेत का नाहीत इथपासून  मतभेद होते.  पण प्रतिवर्षीप्रमाणे  साथ आली (१९६६) आणि सलाईनचा तुटवडा निर्माण झाला. आता पर्यायच नव्हता. गरज हीच शोधाची जननी ठरली.  मग बिचकत बिचकत सुरवातीला आठच पेशंटवर प्रयोग केले गेले. तोंडावाटे ग्लुकोज आणि पाणी दिलं  तर जुलाब कमी होतात, नुसतेच पाणी दिलं तर नाही हे अखेर सिद्ध झालं. पण हे संशोधन प्रत्यक्षात पेशंटपर्यन्त पोहोचवणे हे अत्यंत आव्हानात्मक होतं. मुळात ग्लुकोज आणि पाणी  दिलं  गेलं होतं ते नाकातून पोटात नळी घालून. कारण नेमकं किती द्रावण  आत गेलं हे काटेकोरपणे मोजायचे होते. नळीवाटे दिले गेले तितके ग्लुकोज आणि पाणी, कोणी आजारी माणूस आपण होऊन   पिऊ शकेल का?, हीच पहिली शंका होती. ह्या बरोबर धोका नको म्हणून सलाईनही चालू होतंच. म्हणजे नेमका कशाचा आणि  किती फायदा झाला हेही गुलदस्त्यात होतं. १९६७ साली कोलकात्यातील जॉन हॉपकीन्स सेंटरने असेच प्रयोग केले आणि आपले निष्कर्ष प्रसिद्ध केले. कोलकातावाल्यांनी उपचारात बरेच बदल केले होते. त्यांनी जुलाबाच्या प्रमाणात, मोजून मापून साखर-मीठ पाणी दिले होते.  प्रमाण बदलून बदलून सर्वोत्तम प्रमाण शोधले होते. त्यांचे  काही पेशंट तर फक्त साखर, मीठ, पाण्यावर बिनासलाईनचे  तगले  होते. जर हे खरोखरच आवाक्यात आलं तर एक मोठाच प्रश्न मिटणार होता. इतक्यात बांगलादेशात (तत्कालीन पूर्व पाकिस्तान), चितगाओला पुनः कॉलऱ्याची साथ आली. तासाला लीटरभर या वेगाने तिथल्या पेशंटला साखर, मीठ, पाणी नळीतून देण्यात आलं पण अपयशच पदरी आलं. ह्या अभ्यासाचे निष्कर्ष तपासताना ठराविक प्रमाणात पाणी देण्याऐवजी जुलाबाच्या प्रमाणात ते दिलं  गेलं तर अधिक फायदा होईल हे लक्षात आलं. खेडूत, अशिक्षित लोकांना नेमकं  पाणी किती द्यावं  हे समजणार नाही, सबब सब घोडे बार टक्के या न्यायाने आधीचा प्रयोग रचला गेला  होता. आता ही त्रुटि दूर करायचं  ठरलं. ढाक्यात आणि मतलब बझारला साथ आली. तिथे  अत्यंत अत्यवस्थ पेशंटना सलाईन आणि प्यायला  जलसंजीवनी; असा प्रयोग सुरू झाला.  काय आश्चर्य; सलाईनची  गरजच मुळी ८०%नी कमी झाली. (डेव्हिड नलिन, रिचर्ड कॅश.)

यश टप्यात आलं आणि ढाक्का विरुद्ध कोलकाता असा सामना सुरू झाला. एकमेकांचे सहकारी आता  स्पर्धक झाले.   आधी यशाची आणि अपयशाची माहिती मुक्तपणे दिली घेतली जात होती आता जरा हातचे राखून व्यवहार व्हायला लागले. कोलकात्यात साथ यायची पावसाळ्यात आणि ढाक्यात हिवाळ्यात. यामुळेही अभ्यास पुढेमागे व्हायचे. उंदरा-मांजराचा हा खेळ.

पण इतक्यात परिस्थितीने वेगळेच वळण घेतले.  बांगलादेशात स्वातंत्र्ययुद्ध सुरू झालं. पाकिस्तानची शकले झाली. बांगलादेशचा जन्म झाला. ह्या संजीवन तीर्थाची जी गंगोत्री, ती  ढाक्याची कॉलरा रिसर्च लॅबोरेटरीच  अडचणीत आली. पण भारतात संशोधन आणि वापर होत राहिला. निर्वासितांच्या छावण्या म्हणजे कॉलराचे माहेरघर. अशा बजबजपुरीत, साधनांचा आणि संसाधनांचा दुष्काळ असताना कोलकात्यात डॉ. दिलीप महालनोबिस यांनी जलसंजीवनी वापरुन कित्येक प्राण वाचवले. इथे लक्ष ठेवायला पुरेसे डॉक्टर नव्हते, त्यामुळे इथे थेट पेशंटच्या  घरातलेच सगळं बघत होते. नाकात नळीबिळी भानगड शक्यच नव्हती. जलसंजीवनी थेट प्यायची होती.  अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देखील जलसंजीवनी संजीवक ठरत होती. म्हणूनच युनिसेफ, जागतिक आरोग्य संघटना वगैरेचं तिकडे लक्ष गेलं. डेटा जमा होत राहिला, जगभर मान्यता आणि मानमरातब वाढत राहिला. पुढे कॉलरात तसेच इतर जुलाबातही; थोरांत आणि पोरांतही; जलसंजीवनी प्राणदायी असल्याचं दिसून आलं. अमेरिकेतल्या ‘अपाशे इंडियन्स’ (अमेरिकेतील मूळनिवासी टोळी) मध्येही ट्रायल झाली. हिर्शहॉर्ननीच हा प्रयोग केला. तिथे अर्थात कॉलरा नव्हता पण इतर प्रकारचे जुलाब होतेच.  झकासच परिणाम दिसले.

किती द्यायचं हा प्रश्नही निकालात निघाला. उत्तर आलं, जितकं पेशंटला प्यावंसं  वाटेल तितकं. सलाईन अति दिलं तर पेशंट मरु शकतो. त्यामुळे सलाईनला देखभाल फार. जलसंजीवनी कोणी  अति पिऊच शकत नाही. अगदी एक  महिन्याच्या बाळालाही ही उपजत जाण  असते.   जलसंजीवनी जणू स्वयं-नियंत्रित. हा तर निसर्गाचा नीर-क्षार-विवेक. आता हेच बघा ना; काही वेळा फक्त पाण्याचे जुलाब होतात. क्षार बाहेर पडत नाहीत. अशा वेळी पेशंटला तहान  लागते ती फक्त  पाण्याची. खारे पाणी पेशंटला नकोसे वाटते. अशावेळी मीठाचा आग्रह न धरता पेशंटची पाण्याची मागणी तेवढी पुरवली पाहिजे.  

सत्तरच्या दशकात जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफने तिसऱ्या जगात मोठ्याप्रमाणावर जलसंजीवनीचा सांगावा  दिला. दोन ग्लास पाण्याला (५०० मिली), मूठभर साखर आणि तीन बोटांची चिमूट मीठ.  असा अगदी    घरगुती फॉर्म्युला; एखाद्या केसांची चांदी झालेल्या आजीनं  सांगावा तसा. अभावितपणे एक शांततापूर्ण क्रांतीच झाली जणू.

जगानी डोक्यावर घेऊनही अमेरिकेत या उपचारांकडे जरा अनादरानेच पहिलं जातं. सगळा  भर सलाईनवर असतो. त्यात आर्थिक हितसंबंध आहेतच पण इतक्या साध्याभोळ्या उपचारांबद्दलचा अहंमन्य  आकसही आहे. एकूण आव असा, की ही तर  कुठल्यातरी दरिद्री देशातल्या, दरिद्री जनतेसाठी, शोधून काढलेली, जडीबुटीची, घरगुती पद्धत. कदाचित मागास अपाशे इंडियन पोरांना याची गरज असेलही पण  अत्याधुनिक पंचतारांकित हॉस्पिटलातल्या भारी भारी अमेरिकेन पेशंटना याची काय  गरज?

जलसंजीवनी हा उपचार आहे. शुद्ध पाणीपुरवठा, स्वच्छता, शौचालय ही आरोग्याची गुरुकिल्ली खरीच पण ही किल्ली बनवायला वेळ लागतो. तंवर ज्यांना जुलाब होतील त्यांना उपचार द्यावेच लागतात. म्हणूनच  मग   जलसंजीवनीच्या मंतरलेल्या पाण्याने, कोपलेल्या पोटाची उदकशांत  साधली जाते.

 

 

 


 

 

 

 

 

 

 


Monday 6 July 2020

माहितीच्या व्हायरसचा उद्रेक

माहितीच्या व्हायरसचा उद्रेक

डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.

 

करोनाची साथ आली आहे आणि त्याबरोबर आणखी एक साथ आली आहे. ती आहे माहितीच्या व्हायरसची. माहितीच्या व्हायरसचा हा उद्रेक, कधी कधी करोनापेक्षाही तापदायक ठरतो आहे.  

बरीचशी माहिती उपयुक्त असते, विधायक असते, पण काही बाबी या नुसत्याच निरुपयोगी नाही तर प्रसंगी घातक देखील असतात.  खरी माहिती, खोटी माहिती, कधीकधी मुद्दामहून खरी म्हणून पुढे केलेली खोटी माहिती, अशी सगळी सरमिसळ समाज माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असते.  हे पाहून, वाचून नेमकं खरं काय आणि खोटं काय असा प्रश्न आपल्याला पडतो. ही माहिती तुमच्या पर्यंत पाठवणारे तुमचेच  मित्र असतात; कधी कधी तर डॉक्टर किंवा अन्य उच्चशिक्षित मंडळी असतात; प्रत्येक वेळी, प्रत्येक माणूस, प्रत्येक माहिती तपासूनच पुढे पाठवतो असं नाही; त्यामुळे सर्वांकडूनच गफलती होण्याची शक्यता असते. बरेचदा सत्य अगदी बेमालूमपणे असत्याशी एकजीव केलेलं असतं. मग सत्य असत्याशी मन ग्वाही करणं   भल्याभल्यांना जमत नाही, तिथे तुम्हाआम्हां  सामान्यांची काय कथा.

महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत तात्काळ पोहोचवून,  समाजाचं भलं करावं असाच बहुतेकदा हेतू असतो; पाठवणारा सद्हेतूने, निरागसपणेच पाठवत असतो. पण त्याच्या नकळत तो स्वतः लटक्या माहितीची शिकार झालेला असतो. आपण गडबडीने फॉरवर्ड केलेली माहिती चुकीची आहे, हे लक्षात येताच त्याची भलतीच गोची होते. त्याचा हेतू  चांगलाच असतो, पण परिणाम अनिष्ट.  

त्यामुळे योग्य माहिती कुठली  आणि अयोग्य कुठली  याचा नीरक्षीरविवेक करण्यासाठी उपयुक्त अशा काही सूचना मी इथे मांडणार आहे.

पहिली सूचना अशी की पुढ्यात माहिती येताच तात्काळ ती पुढे पाठवू नका.  विशेषतः ‘ही माहिती तात्काळ, लगेच,  ताबडतोब शेअर करा’,  अशा प्रकारचा आग्रह असेल; ‘यापूर्वी कधीच न पाहिलेली गोष्ट पहा’, अशी भलावण असेल,  तर मग ही शेअर करण्याच्या लायकीची  आहे का हे दहा-दहा वेळा  तपासून पाहायला पाहिजे हे नक्की समजा. त्याच बरोबर भीती, करुणा, घृणा, बीभत्स, भयानक   अशा इंटेन्स भावनांना आवाहन करणाऱ्या पोस्ट या निश्चितच तपासून घ्यायला हव्यात.

अधिकृत बातम्या आणि बाता यामध्ये एक महत्त्वाचा फरक आहे.  बातम्या या वस्तुस्थिती निदर्शक असतात आणि बाता या नेहमीच काहीतरी जगावेगळं सांगायचा; स्वप्न, आशा, दिलासा  विकण्याचा प्रयत्न करत असतात. समाजमध्यमांच्या या बाजारात अनेक प्रकारचा माल विक्रीला आहे. पण  सर्वात जास्त खपतंय  ते भय! ....आणि या आडून, या भयावरती अभय म्हणून अनेक उपाय.

या उपायांबाबत अगदी ठाम विधाने, अक्सीर इलाज, शर्तीली  दवा, असाध्य रोगांवर रामबाण उपाय असले वाक्प्रचार हे धोक्याचे इशारे आहेत.   एखाद्या उपचाराने, औषधाने; शंभर टक्के यशाची खात्री कोणी देत असेल, अजिबात दुष्परिणाम नाहीत असं कोणी सांगत असेल,  तर तो/ती बनेल आहे अशी शंका नी:शंकपणे घ्यावी.  

ज्या अर्थी तुम्हाला ती माहिती वाचताच  तात्काळ पुढे पाठवण्याची उबळ येते आहे, त्या अर्थी त्यामध्ये मेंदूत खवखवेल असंच तरी काही असेल; सामान्य तर्कापेक्षा काहीतरी अतर्क्य असं विधान केलेलं असेल,   जे चालू आहे त्याच्या बरोब्बर विरुद्ध असं काहीतरी लिहिलं असेल; त्यामुळे पुढे पाठवण्याची  उबळ किंचित काळ  दाबून धरा.  असं म्हणतात की रागाने काही बोलायचं झालं तर मनातल्या मनात दहा आकडे मोजावेत  आणि मग बोलावं;  किंवा कोणाला शिव्या देणारं पत्र लिहायचं झालं तर ते लिहून ठेवून द्यावं,  दोन दिवसांनी पुन्हा वाचावं आणि मग पाठवावं.  हाच नियम सोशल मीडियातल्या  माहितीला  लागू आहे.

थांबून,  शक्य झाल्यास या माहितीचा मूळ स्रोत शोधून काढावा.  बऱ्याचदा कोणा  शास्त्रज्ञांच्या नावाने, डॉक्टरांच्या नावाने माहिती फिरत असते.  पण त्या व्यक्तीचे नाव, हुद्दा, ती काम करते त्या संस्थेचे नाव, पत्ता, असं सगळं त्या पोस्टमध्ये नसेल तर ती पोस्ट शंकास्पद मानावी.  अशी काही माहिती असेल तर त्या सुतावरून त्या संस्थेचा स्वर्ग गाठवा आणि ही माहिती त्या संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा त्या व्यक्तीच्या वैयक्तिक पेजवर आहे का हे तपासून घ्यावे.  अधिकृतरित्या अशी माहिती याठिकाणी उपलब्ध असेल तर निदान ती ती व्यक्ती, ती ती  संस्था,  त्या माहितीला जबाबदार आहे एवढं आपल्याला समजतं.

त्या माहितीच्या तुकड्यात जे रंजक, अतिरंजक, अतिरंजित किंवा धक्कादायक विधान आहे; तेही आपल्याला स्वतंत्रपणे तपासून पाहता येईल.  गुगल अथवा इतर सर्च इंजिन्सच्या मदतीने हीच माहिती अन्य कोणी, अन्यत्र कुठे दिली आहे का, हे सहज तपासता येतं. काही फॅक्टचेकिंग साइट्स असतात; खरंखोटं तपासून मांडणं हेच यांचं काम;  त्यांच्या मदतीने ही माहिती तपासून घेता येईल.

जरा विचार केला तर लक्षात येईल की अधिकृत सूत्रांची भाषा ही नेहमीच  संतुलित आणि संयत असते.  बाता मारणाऱ्याची भाषा भडक तर असतेच पण त्यात बरेचदा व्याकरणाच्या आणि शुद्धलेखनाच्याही  चुका असतात.

अर्थात यात मी कुठलीच जगावेगळी गोष्ट सांगत नाहीये कारण जगावेगळ्या व्यक्तींनी करण्यासाठीची ही कृतीच नाही.  ही तर तुम्हांआम्हां  सामान्यजनांनी करायची कृती आहे.  फक्त जगावेगळ्या माहितीबाबत ती आहे.

अर्थात  इतकं सगळं करूनही  गोच्या  होऊ शकतातच; पण निदान त्याचे प्रमाण आणि तीव्रता आपण कमी करू शकतो. करोनाच्या साथीने कावलेल्या, वैतागलेल्या, लोकांच्या वैतागात आपण भर तरी  घालणार नाही.  एवढं साधलं  तरी पुरेसं  आहे. सरकारचे अधिकृत संकेतस्थळ, जागतिक आरोग्य संघटना, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, इंडियन मेडिकल असोसिएशन अशा संस्थांची अधिकृत संकेतस्थळे  यावर जाऊन तुम्ही शहानिशा करू शकता. आणि यातलं काहीच नाही साधलं तरी एक नियम तुम्ही स्वतः पुरता पाळलाच पाहिजे;

जर शंका असेल तर माहिती  पुढे पाठवूच नका.

आकाशवाणी, पुणे.  ७/७/२०२०  (भाषण).