Monday, 25 October 2021

विज्ञान म्हणजे काय? मला शास्त्रज्ञ व्हायचे आहे लेखांक १२

 

विज्ञान म्हणजे काय?

मला शास्त्रज्ञ व्हायचे आहे  

डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.

लेखांक १२

 

विज्ञान, विवेक, मानवता आणि उदारमतवाद  ही प्रगतीची चाके आहेत प्रगतीच्या ह्या चाकांना आपण वंगण घातलं पाहिजे. यासाठी काळजीपूर्वक आपले पूर्वग्रह कसे टाळायचे, चिकित्सकपणे विचार कसा  करायचा हे शिकणं अत्यंत महत्वाचं. विज्ञान नावाची युक्ति आपल्याला नेमकं हेच शिकवते.

शास्त्रज्ञ मंडळी नेमके हेच तर करत असतात. पण याबरोबर शास्त्रज्ञ होण्यासाठी  इतरही अनेक गुण अंगी बाणवावे लागतील. उत्तम खेळाडू होण्यासाठी अनेक गुणांचा समुच्चय असावा लागतो. उत्तम वादक, उत्तम नेता, उत्तम अभिनेता, उत्तम लेखक होण्यासाठी सुद्धा काही खास गुण असावे लागतात. तसेच शास्त्रज्ञ होण्यासाठी देखील काही गुण अंगी असावे लागतात.

बुद्धिमत्ता तर लागतेच पण त्याही पेक्षा एकाच प्रश्नाकडे विविध बाजूने बघण्याची क्षमता लागते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या अंगी कुतूहल हवं. हे असंच का? ते तसंच का? हे तसं का नाही? आणि ते असं का नाही?; असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले पाहिजेत.

वैज्ञानिक होण्यासाठी पराकोटीची एकाग्रता, स्मरणशक्ती  आणि एखाद्या विषयाचा मागोवा घेण्यासाठी नादिष्टपणा असावा लागतो. अंगी प्रचंड चिकाटी असावी लागते. अक्षरशः आयुष्य वेचलं तरी त्या प्रश्नाचा मागोवा संपत नाही. काही गोष्टी स्पष्ट होतात तर काही नवीन प्रश्न लक्षात येतात. खरा शास्त्रज्ञ नव्या माहीतीने सुखावतो आणि नव्या प्रश्नाच्या आव्हानाने आणखी सुखावतो.  

लाइट बल्बचा शोध लावणारा थॉमस  एडिसन याला लाइट बल्ब मध्ये कोणती तार वापरावी असा प्रश्न होता. अनेक पदार्थ वापरूनही त्याला मनाजोगे गुणधर्म असलेली तार सापडेना. त्याला कोणीतरी विचारलं,  ‘या अपयशानी तुम्हाला खचून जायला होत नाही का?’

तो उत्तरला, ‘छे! हे अपयश कुठाय? इतक्या सगळ्या पदार्थांच्या तारा निरुपयोगी आहेत, हा निष्कर्ष काही कमी महत्वाचा नाही. निरुपयोगी तारा कुठल्या हे मला समजले हे यशच आहे की!!’

पण विज्ञानात लखलखीत यश क्वचित मिळतं. जगणं उलथंपालथं  करणारे शोध रोज थोडेच लागतात?   तेंव्हा अपयश पचवण्याचीही ताकद अंगी बाणवली पाहिजे. 

शाळेत जरी आपण जीव-भौतिक-रसायन-गणित असे वेगवेगळे विषय शिकत असलो आणि त्या त्या विषयाच्या पेपरमध्ये त्या त्या विषयाचे प्रश्न सोडवत असलो, तरी प्रत्यक्षात या  साऱ्यांचा एकमेकांशी घनिष्ट संबंध असतो. वैज्ञानिक हा एकापेक्षा अधिक विषयात तरबेज असावा लागतो. तुम्हीच पहा ना, रसायनशास्त्राच्या मदतीशिवाय कोव्हिडवर  लस   निर्माण होणे शक्य नव्हते. गणिताच्या वापराविना या साथीच्या प्रसाराचा अभ्यास करणे अशक्य होते आणि व्यवस्थापनशास्त्राशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण करणे शक्य नव्हते.

वैज्ञानिकांना अनेक विषयात गती असते आणि  त्यांना प्रतिभेचा स्पर्श झालेला असतो. अमूर्त कल्पना ते  लीलया समजावून घेऊ शकतात. सामान्य माणसे पायरी पायरीने विचार करत बसतात तर शास्त्रज्ञ चार-पाच पायऱ्या गाळून थेट उत्तराशी पोहोचलेले असतात.

बरेचदा आपला प्रश्न, संशोधनाचा विषय, गणिती  भाषेत  मांडावा  लागतो. त्यामुळे तुम्हाला गणित आवडो वा न  आवडो, शास्त्रज्ञ व्हायचं झालं; मग ते कुठल्याही विषयातील असो; गणिताशी गट्टी असावीच लागते. बऱ्याचशा मुलांना शाळेत असताना गणित समजत नाही आणि  आवडतही नाही. पण इंटरनेटच्या मदतीने या दोन्ही गोष्टींवर तुम्ही मात करू शकता. गणित छान समजावून सांगणाऱ्या  कितीतरी साइट्स आहेत. तुमच्या शंकांना उत्तर देणारे कितीतरी ऑनलाइन गुरु आहेत.

आपल्याला एखादी गोष्ट समजली आहे का, हे तपासण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तीच गोष्ट दुसऱ्या कोणाला तरी समजावून सांगणे. हे जमलं, तर आपल्याला ती गोष्ट समजली आहे असं खुशाल समजावं. उत्तम शास्त्रज्ञ हे उत्तम शिक्षकही असतात.  सोप्या पद्धतीने, समोरच्याला समजेल अशा भाषेत, समजावून सांगण्यासाठी आधी आपले आकलन उत्तम असावं लागतं. इतकंच काय भाषेवर चांगलं प्रभुत्व असावं लागतं.

शेवटी तुम्ही वैज्ञानिक व्हा अथवा राजकीय नेते  व्हा, आपलं म्हणणं दुसऱ्याला पटवून द्यायला यावच लागतं. तरच तुम्ही पुढे जाल. यासाठी भाषाही चांगली आली पाहिजे.  विज्ञान आणि गणित आलं की झालं. भाषा नाही आली तरी चालेल असं काहीतरी आपल्याला वाटत असतं. विज्ञान आणि गणित म्हणजे अवघड, त्यामानानी भाषा म्हणजे सोप्पं असंही आपल्याला वाटत असतं. पण हा फार मोठा गैरसमज आहे. गणित आणि विज्ञानात धो धो  मार्क पडणाऱ्या स्कॉलर मुलांना भाषा विषयात एवढे मार्क क्वचित मिळतात.   याचा अर्थ भाषा विषयही अवघड आहेच. कित्येक वैज्ञानिक, कित्येक डॉक्टर भाषाप्रभू असतात. ते त्यांच्या विषयावर सामान्य लोकांना कळेल अशा भाषेत लिहितातच पण  उत्तमोत्तम ललित लेखनही करतात.  तेव्हा भाषेचाही सराव पाहिजेच.

एकूणच शास्त्रज्ञ व्हायचं तर मनाला, बुद्धीला  तसं वळवावं लागतं, जाणीवपूर्वक शिकवावं लागतं. उत्क्रांतीच्या दरम्यान आपलं शरीर बदलत गेलंय हे तुम्हाला माहीत आहे. मोठा मेंदू, दोन पायावर चालणे, बोटांची चिमूट करता येईल असा अंगठा, अशी मानवी शरीराची वैशिष्ठ्ये तुम्हाला माहीत आहेत. शरीराबरोबर आपला मेंदूसुद्धा उत्क्रांत झाला आहे. आपली विचार करण्याची पद्धत देखील काही गुणदोष घेऊन उत्क्रांत झाली आहे. विचार करण्याची आपली उपजत पद्धत चिकित्सक विचार करायला सोयीची नाही.

उत्क्रांती म्हणजे सतत उन्नतीकडे, भल्याकडे प्रवास; असं नाहीये. उत्क्रांत होताना आता तोट्याचे ठरणारे संचितही आपण पिढ्यानपिढ्या  वागवत असतो. आता हेच बघा हां. आपले जवळचे नातेवाईक आपल्याला सर्वात प्रिय असतात.  मग सगे, मग सोयरे, मग सखे, मग टोळीतले इतर अशी उतरती भाजणी असते. याच भावनेमुळे आपले धर्मबांधव, आपल्या वंशाचे, आपल्या रंगाचे आपल्याला जास्त प्रिय असतात आणि याच भावनेमुळे ‘इतर’ सर्व आपल्याला अप्रिय असतात.  त्यांना समजावून घेणं, त्यांना सहानुभूती दाखवणं अवघड जातं आपल्याला. हा आपपरभाव आपल्या मेंदूत आहेच. ही उत्क्रांतीची देन आहे.

आपल्या विचार करण्याच्या सवयीत, उत्क्रांतीने पेरलेल्या अशा इतर अनेक अडचणी आहेत.  

स्वतःच्या ज्ञानेंद्रियांवर आपला गाढा विश्वास असतो. पण विज्ञान सांगतं तू स्वतःवरही विश्वास ठेऊ नकोस. भले सूर्य पृथ्वीभोवती फिरत आहे हे तुला रोज दिसत असेल पण प्रत्यक्ष तसं नाही.

टोळीतल्या वरिष्ठांवर आणि बलिष्ठांवर विसंबून रहा अशी मेंदूची उपजत शिकवण आहे; पण जिथे तिथे शंका घे, असं विज्ञान आपल्याला सांगतं.

दोन गोष्टी पाठोपाठ घडल्या तर पहिली मुळे दुसरी घडली असा निर्णय आपला मेंदू देतो. पण प्रत्यक्षात तसं असेलच असं नाही, असं विज्ञान आपल्याला शिकवतं. ‘म्हातारीनं कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही’; ही गोष्ट आपण नवव्या लेखांकात  पाहिलीच आहे.

जिथे तिथे परिचित आकार शोधायला आपला मेंदू शिकला आहे. असंबद्ध ठिपके जोडून आपल्या मनात जे वसते ते आपल्याला दिसायला लागते.  मग आपल्याला ढगात राक्षस दिसतात, चंद्रावर ससा दिसतो, बटाट्यावर आपली उपास्य देवता उमटलेली भासते आणि झाडोऱ्यात वाघोबा दिसायला लागतो. प्रत्यक्षातल्या   अंधुक आकारात आपला मेंदू कल्पनाशक्तीचे रंग भरतो आणि झटपट निष्कर्ष काढतो. विज्ञान शिकायचं, वैज्ञानिक व्हायचं तर मेंदूची ही खोड जिरवावी लागते. झटपट निष्कर्ष काढण्यापेक्षा प्रत्येक गोष्ट तोलूनमापून मग निष्कर्ष काढायला शिकावं लागतं.

आपल्या मेंदूत आणखी एक गैरविचार घट्ट कोरला गेलेला आहे. निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीला आपल्यासारखाच मेंदू असतो आणि  निसर्गातील शक्ती आपल्यासारखाच  विचार करतात असं आपल्याला वाटत असतं. नैसर्गिक घटना घडण्यामागे निसर्गाचा काही हेतु असतो, असं आपल्याला वाटत असतं.   आपण जसे हेतुतः काही करतो; हल्ला करतो, बदला  घेतो, मदत करतो; तसेच नैसर्गिक शक्तींचेही असते, असं आपल्याला भासतं. अशीच आपल्या मेंदूतील आदिम भावना आहे. पावसाची देवता कोपल्यामुळे पूर येतात किंवा दुष्काळ पडतात. समृद्धीची देवता प्रसन्न झाली की आबादीआबाद होते; हे आपल्याला सहज पटतं. अगदी ठाम, खात्रीशीर  निष्कर्ष म्हणूनच आपण याकडे बघतो. पण ही आपणच आपली केलेली फसगत आहे. 

ही सगळी उपजत शिकवण प्रयत्नपूर्वक खोडून चिकित्सक विचार करण्याची पद्धत मेंदूला   शिकवावी लागते. तेंव्हाच तुम्ही शास्त्रज्ञ होऊ शकता. या सृष्टीच्या विस्मयाचा विलक्षण आनंद उपभोगू शकता. आपल्याला हा विस्मय जाणवतोय ही तर आणखी विस्मयकारी घटना!! हा तर चढत्या भाजणीचा विस्मय. या विस्मयाचा निरतिशय आनंद तुम्हाला लाभो अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो.

 

पूर्वप्रसिद्धी

किशोर

दिवाळी अंक

ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१

 

विज्ञान म्हणजे काय? विज्ञान शाप नव्हे वरदानच! लेखांक ११

 

विज्ञान म्हणजे काय?

विज्ञान शाप नव्हे वरदानच!

डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.

लेखांक ११  

 

विज्ञान नेहमी  नव्या कल्पना आणि नव्या ज्ञानाचे स्वागत करते. पण दरवेळी हे ज्ञान तपासून घेतले जाते. ही युक्ति वापरुन आपले जग आपण काहीच्याकाही बदलले आहे.  पण तरीही  विज्ञान शाप की वरदान?’ असा विषय, निबंध स्पर्धेत किंवा वादविवाद स्पर्धेत, हटकून दिलेला असतो आणि विज्ञानाच्या बाजूने बोलणारी मुलेमुली उगीचच दबकून, हातचं राखून बोलतात. ‘शाप’वाला पक्ष विज्ञानावर आक्रमकपणे  वाट्टेल ते आरोप करत असतो आणि बिच्चारे  विज्ञानवादी ते मुकट सहन करत असतात. ही लेखमाला वाचून तुम्ही विज्ञानाची बाजू हिरीरीने मांडाल अशी मला खात्री वाटते.

आज विज्ञान सर्वव्यापी आहे. अन्न, वस्त्र, निवारा; आहार, विहार, आरोग्य; आचार, विचार, संचार; अशा साऱ्या क्षेत्रात विज्ञान नावाची युक्ति वापरुन मानवाने भरघोस प्रगती केली आहे. विज्ञानाची एकही देन न वापरता जगायची कल्पनाही आता अशक्य आहे.

विज्ञान नावाच्या युक्तीचा शोध लागला तो चारशे ते पाचशे वर्षापूर्वी. गेल्या पाचशे वर्षात जगाची लोकसंख्या दसपट वाढली आहे. मात्र आज भुकबळी किंवा कुपोषणग्रस्त जनता फारशी आढळत नाही. धरणे, कालवे, ठिबक सिंचन, अधिक उत्पन्न देणारी बियाणे ही सारी विज्ञानाची देन आहे. याशिवाय इतक्या साऱ्या लोकांच्या पोटाला ही वसुंधरा पुरी पडलीच नसती.

 आज जितकी माणसं उपासमारीने मरतात त्यापेक्षा जास्त माणसं अति-पोषणाने मरतात. अति-पोषणाने म्हणजे वजन जास्त  असल्याने होणारे हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह, वगैरे विकारांनी जास्त माणसं मरतात.

यावर हुशार विरोधक असाही मुद्दा मांडतील की अतिपोषण हा विज्ञानाने दिलेला शाप आहे! हा तर अत्यंत हास्यास्पद आरोप आहे. विज्ञानाने अन्न निर्माण केलेल आहे.  ते तारतम्य राखून खायची जबाबदारी ज्याची त्याची आहे. शिवाय किती म्हणजे अति? वयोमानानुसार आहार कोणता असावा? वगैरेची कोष्टके विज्ञानानेच तयार केली आहेत. 

जी गोष्ट अन्नाची तीच गोष्ट वस्त्र, निवारा, आरोग्य अशी सगळीकडे लागू होते.

आरोग्याचेच पहा ना; १९४७ साली आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा भारतीय माणसाचे सरासरी आयुर्मान सुमारे ३५ वर्षं होतं! आज ते ७० वर्ष आहे. हे तर विज्ञानानीच साध्य झाले आहे. देवीचा आणि पोलिओचा  रोग आता भारतात सापडत नाही. भारतातल्या प्रत्येक बालकाला दहा निरनिराळ्या आजारांवरील लसी सध्या दिल्या जातात. करोनाची साथ येऊन वर्ष व्हायच्या आत, त्यावरील लस उपलब्ध झाली. हे सारं, विज्ञान न वापरता, कल्पनेत तरी शक्य  होतं काय?

तुमच्या आजी-आजोबांना विचारा म्हणजे घरीदारी किती कष्टमय जीवन होतं ते तुमच्या लक्षात येईल. चूल-पोतेरे, लाकडं फोडणे, पाणी ओढणे, दळण-कांडण,  अशी सगळी कामं करावी लागायची. शेती असो की कोंबडी पालन, विहीर खणणे असो की घर बांधणे; व्यापार  असो की प्रवास; सगळ्याच गोष्टी अतिशय खडतर होत्या. विज्ञान नावाची युक्ति वापरुन यातील प्रत्येक गोष्ट आज सुकर झाली आहे.

नुसतीच सुकर आणि सुलभ नाही तर कित्येकपट सुरक्षित झाली आहे. वादळ, पूर, भूकंप वगैरे नैसर्गिक आपत्तीत होणारी जीवित हानी शे-पाचशे वर्षापेक्षा आज नक्कीच कमी आहे. आज आपल्याला वादळ-वाऱ्याची पूर्व सूचना मिळते, आपण काळजी घेतो. कित्येकांचे प्राण वाचतात. कित्येकपट  वित्त हानी टळते. हे सारं विज्ञानानेच तर शक्य झालं आहे.

आज  उत्पादनाचा वेग आणि दर्जा  वाढला आहे. कपडे, चपला अशा गरजेच्या वस्तू आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्या आहेत. एकंदर समृद्धी वाढली आहे. याचे अनेक सुपरिणाम आपल्या आसपास दिसत आहेत. साक्षरता वाढली आहे. शाळेत न जाणारी मुले आता तर क्वचित दिसतात.  बालमजूरी कमी झाली आहे.

फक्त श्रीमंतांना परवडणारी वाचन, नाटक, गाणे, बजावणे वगैरे चैन आता सामान्यांच्या आवाक्यात आली आहे. खरंतर करमणूक या प्रकाराकडे आता चैन म्हणून कोणी पहात नाही. करमणूक ही आता आवश्यक गोष्ट मानली जाते.   टीव्ही, रेडियो, मोबाइल, इंटरनेट, कॉम्प्युटर हे सारे माहिती, करमणूक, व्यवसाय, शिक्षण अशा अनेक गोष्टींसाठी अत्यावश्यक ठरले आहे. माणसाच्या कष्टाचे तास आज कमी झाले आहेत. रिकामा वेळ अधिक मिळतो आहे. ह्या वेळचा उपयोग माणसं छंद, प्रवास, खेळ, साहस अशा अनेकांगांनी   सत्कारणी लावत आहेत.

जग जवळ आल्यामुळे विविध विचार, आहार, धर्म, संस्कृती, क्रीडा  वगैरेंची माहिती होते. आपले विश्व आणि विचारविश्व विस्तारते. विज्ञानाशिवाय हे कसं शक्य झालं असतं बरं?

सामाजिक क्षेत्रात देखील विज्ञानानी बरीच उलथापालथ केली आहे. स्त्रीपुरुष समान आहेत, वंशभेद,  वर्णभेद, जातीभेद वगैरे काल्पनिक असून  या साऱ्याला वैज्ञानिक आधार नाही; असा ठाम पुरावा विज्ञानाने दिला आहे. शुद्ध वंश, शुद्ध जात, शुद्ध कूळ वगैरे बकवास आहे असा स्पष्ट निर्वाळा विज्ञानाने दिला  आहे.  सर्व माणसे समान आहेत असे निव्वळ  भावनिक आवाहन करणे  आणि सर्व माणसे समान आहेत असे शास्त्रीय प्रतिपादन करणे  यात जमीन आस्मानाचा  फरक आहे.

विज्ञान शाप का आहे, याची ठरलेली यादी आहे. औद्योगीकरणाने वाढलेले प्रदूषण, अणुयुद्धाचा धोका, पर्यावरणाचा ऱ्हास हे त्यातले प्रमुख मुद्दे. पण जरा विचार केला तर हे सारे निकाली निघतात. या साऱ्या समस्यांचं  उत्तर पुन्हा एकदा विज्ञानातच  दडलेलं आहे.

प्रदूषण वगैरेने  पर्यावरणाला असलेला जागतिक तापमान वाढीचा धोका खराच आहे, मात्र यावर उपायही विज्ञानेच निघू शकतो. तेल किंवा कोळसा वापरण्याऐवजी अणुउर्जेचा वापर करणे, वातावरणातील कार्बन शोषला जाईल असे उपाय योजणे, पर्यावरणस्नेही जीवनशैली  हे उपाय विज्ञानानेच तर सुचवले आहेत.

येणारे जग कृत्रिम बुद्धिमततेचं जग असेल. माणसापेक्षा कैकपट चलाख यंत्र आणि यंत्रमानव हे माणसाच्या जगावर    कब्जा करतील आणि मनुष्य आणि त्याची संस्कृती ह्या ग्रहावरून कायमची नष्ट होईल, अशी कल्पना कित्येक विज्ञान कथांतून मांडलेली असते. विज्ञानाचा भस्मासूर स्वतःलाच संपवून टाकेल का?  असे घडणे अशक्य नसले तरी तशी  शक्यता खूपच कमी आहे.  कृत्रिम बुद्धीमत्तेचा विकास करताना सावधगिरी बाळगलीच पाहिजे पण त्याचबरोबर नाही तो धोका फुगवून त्याच्या मागे लागण्यात काय अर्थ आहे? मनुष्य जातीला ताबडतोब कोणता  धोका असेल तर तो अणुयुद्धाचा. अण्वस्त्रे नष्ट करण्याचा कार्यक्रम आज जगभर सुरू आहे. हा अधिक जोमाने सुरू राहीला पाहिजे. मुळात युद्ध टाळण्यासाठीही जगभर आणि यशस्वी प्रयत्न चालू आहेत. पूर्वीपेक्षा आता युद्ध कमी झाली आहेत. इतकी की आज युद्धात शहीद होणाऱ्या सैनिकांपेक्षा आत्महत्या जास्त प्रमाणात होतात!

अण्वस्त्रे विज्ञानाच्या मदती शिवाय शक्य नव्हती हे खरेच पण लढाईचा शोध काही विज्ञानाने लावलेला नाही. निव्वळ शस्त्रास्त्रे आहेत म्हणून काही कोणी लढाईला  सुरवात करत नाही. लढाया होतात त्या सत्तेसाठी, पैशासाठी, प्रतिष्ठेसाठी. टोळीयुद्ध सुद्धा यासाठीच व्हायची आणि जागतिक महायुद्ध सुद्धा यासाठीच झाली. पूर्वी लोकं एकमेकाला दगडगोट्यानी हाणायची. पुढे धनुष्य-बाण, ढाल-तलवार मग बंदुका-तोफा  आणि आता अण्वस्त्रे; अशी लढाईच्या साधनात प्रगती झालेली दिसते. विज्ञानाने अधिकाधिक घातक शस्त्र बनवली हे खरेच आहे  पण मुळात लढाईची कारणे आजही तीच आहेत. ही कारणे काही विज्ञानानी निर्माण केलेली नाहीत. ती  माणसाच्या, समाजाच्या विचार करण्यातून; कशाला किती महत्व द्यायचं यातून आलेली आहेत.

म्हणूनच विज्ञानाबरोबर विवेक हवा. माणुसकी हवी. निरनिराळे, अगदी विरोधी विचारही आदरपूर्वक  समजावून घ्यायची तयारी हवी (उदारमतवाद).   इतकी सगळी प्रगती झाली ती विज्ञानाच्या बळावर.  पण त्याचबरोबर ह्या प्रगतीला दिशा दिली ती विवेकी विचार पद्धतीने, उदारमतवादाने  आणि मानवतावादाने. ह्याच अर्थ आता इथून पुढे सारे काही आलबेल होईल असे नाही. विज्ञान, विवेक, मानवता आणि उदारमतवाद  ही प्रगतीची चाके आहेत. माणसाच्या प्रगतीचा आलेख काही सतत चढता राहील असे नाही. तो सतत थोडा  वर थोडा खाली असा  होतच रहाणार. पण एकुणात प्रगती होत रहायची असेल तर प्रगतीच्या ह्या चाकांना आपण वंगण घातलं पाहिजे. यासाठी काळजीपूर्वक आपले पूर्वग्रह कसे टाळायचे, चिकित्सकपणे विचार कसा  करायचा हे शिकणं अत्यंत महत्वाचं. विज्ञान नावाची युक्ति आपल्याला नेमकं हेच शिकवते. ते  शिकायला हवं.

 

पूर्वप्रसिद्धी

किशोर

दिवाळी अंक

ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१

 

 

 

 

 

 

 

विज्ञान म्हणजे काय? तेची छद्मविज्ञान ओळखावे; लेखांक १०

 

विज्ञान म्हणजे काय?

तेची छद्मविज्ञान ओळखावे

डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.

लेखांक १०  

 

विज्ञान नावाची युक्ति आपल्याला रोजचे  जगणेही उत्तम आणि विवेकी रीतीने जगायला   शिकवते. म्हणूनच ही युक्ति आपण नीट शिकून घेतली पाहिजे. कारण विज्ञान हा आज परवलीचा शब्द आहे. म्हणूनच या शब्दाचा गैरवापरही सर्रास सुरू असतो.

विज्ञान जे सांगते ते सत्य, असा विश्वास लोकांना वाटत असतो. त्यामुळे आपण जे सांगतो, जे दावे करतो, जी औषधे विकतो, ती ‘वैज्ञानिक’ आहेत असं सांगण्याची अहमहमिका (चढाओढ) लागलेली दिसते. इतकंच कशाला, तुमचा  साबण, तुमची टुथपेस्ट, तुमची उशी, तुमचा एसी, तुमचा  फ्रीज असं सगळंच कसं ‘अत्याधुनिक’, ‘वैज्ञानिक’ आहे; विज्ञानाच्या कसोटीवर उतरलेले आहे; असं सांगण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जाहिरातबाजी केली जाते.

निरनिराळ्या ग्रहांचे भाग्यवर्धक खडे, ताईत,  भुतेखेते, परग्रहवासी,  पुनर्जन्म, हे ही सारं अत्यंत वैज्ञानिक असल्याचं अनेक जणं अनेक माध्यमातून पटवायचा प्रयत्न करत असतात.

या लोकांची बोली फसवी असते. विज्ञानाच्या नावावर अनेक अवैज्ञानिक, असत्य, चुकीच्या कल्पना अशी मंडळी मांडत असतात. या साऱ्याला म्हणतात छद्मविज्ञान.  छद्म म्हणजे खोटे, कपटी किंवा फसवे. (एखादा ‘छद्मी’ हसतो, असं वर्णन तुम्ही वाचलं असेल.)  तसंच हे खोटे, कपटी किंवा फसवे विज्ञान.

विज्ञान नावाच्या युक्तीबद्दल आपण शिकलो. आता छद्मविज्ञान कसे असते तेही बघू या.

इथे  कथा, सांगोवांगीच्या गोष्टी पुरावा म्हणून छातीठोकपणे ठोकून दिलेल्या असतात. भयकथा, गूढकथा, चमत्कार कथा हाच पुरावा असं मानलं जातं. अमक्या ठिकाणी भूत असल्याचं तमक्या ठिकाणी छापून आलंय, म्हणून ते खरंच आहे; असं सांगणारी मंडळी छद्मविज्ञान सांगत असतात.

आमचे औषध वापरुन अमक्याला गुण आला, अशी प्रशंसेची पत्रे हाच पुरावा असं मानलं जातं. हा उतावीळपणा झाला. वास्तविक एखाद्याला गुण आला ही चांगलीच गोष्ट आहे पण असा गुण हा त्याच औषधामुळे(च) आला हे तपासून घेणं अत्यंत गरजेचे आहे. छद्मविज्ञानात बरेचदा असा सुतावरुन  स्वर्ग गाठण्याचा प्रकार दिसतो.  म्हणजे पुरावा जेमतेम, लेचापेचा, तकलादू, मात्र त्यापासून काढलेले निष्कर्ष अगदी बढवून चढवून सांगितले जातात.

विज्ञानाच्या विविध क्षेत्रात विलक्षण सुसंगती असते. भौतिकशास्त्राच्या नियमात बसत नाही पण रसायनाच्या नियमात बसतं. किंवा रसायनाच्या नियमात बसत नाही पण जीवशास्त्राच्या नियमात बसतं; असं परस्पर विसंगत विज्ञानात काही असत नाही.  छद्मविज्ञानात अशी सुसंगती आढळत नाही.  

छद्मवैज्ञानिकांची भाषा अगदी खास असते. आपण विज्ञान सांगत असल्याचा आभास निर्माण करणारी असते. एनर्जी, नॅनो टेक्नॉलॉजी, क्वांटम एनर्जी, वगैरे शब्द ही मंडळी जिभेवर खेळवत असतात. मात्र या मागच्या वैज्ञानिक संकल्पना वेड्यावाकड्या  मोडून, वाकवून वापरल्या गेलेल्या असतात.

  कोणत्याही मशीनला किंवा मानवी पंचेंद्रियांना कळणार नाही असे गूढ फोर्स, एनर्जी, वेव्ह्, शक्ती, किरणे, असं काय काय असतं आणि त्याद्वारे हे परिणाम दिसून येतात असंही सांगितलं जातं. अशा न तपासता येणाऱ्या, न मोजता येणाऱ्या गोष्टींवर यांच्या युक्तिवादाचा डोलारा उभारलेला असतो. पण कोणत्याच मानवी इंद्रियांना किंवा मशीनला न जाणवणाऱ्या, न ओळखता  येणाऱ्या ह्या शक्ती; ह्या शक्तींचा शोध लावणाऱ्या मंडळींना तरी कशा ओळखता आल्या? ह्या प्रश्नाचे उत्तर कोणीच देऊ शकत नाही. साक्षात्कार, गुरुमहात्म्य, प्राचीन ग्रंथात लिहिलेले काही अशी उत्तरे येतात.

या कल्पना अवैज्ञानिक आहेत असं सिद्ध करूनही यांचे दावेदार ही सिद्धता मानत नाहीत. आम्ही मुळातच विज्ञान, पुरावा वगैरेच्या वरचढ आहोत, तुमच्या तपासणीच्या पद्धती आम्हाला मान्य नाहीत, अशी त्यांची मांडणी असते.  ‘जिथे विज्ञान संपतं तिथे हे सारे ज्ञान सुरू होते’, असे एक चमकदार वाक्य ही मंडळी फेकत असतात. पण खरंतर जिथे विज्ञान संपतं तिथे अज्ञान सुरू होतं.  

विज्ञानाला न कळणारी किंवा  निसर्गनियमाविरुद्ध घडणारी कोणतीही गोष्ट अशा मंडळींना अनैसर्गिक शक्ती असल्याचा ठोस पुरावा वाटते.

मात्र विज्ञान नावाची युक्ति आपल्याला वेगळंच सांगते.

विज्ञान नावाची युक्ति आपल्याला वेगळंच शिकवते.

विज्ञान असं मानतं की विज्ञानाला न कळणारी किंवा निसर्गनियमाविरुद्ध एखादी गोष्ट घडली तर ती संशोधनाची  मोठी संधी  आहे. असं का घडलं, कसं घडलं, हे शोधून काढायची संधी  आहे. आपण शोधलेले नियम सुधारायची संधी  आहे. गरज पडली तर ‘नवीन विज्ञान’ शोधून काढायची संधी  आहे.

वर्षभरापूर्वी करोनाची साथ आली. ही साथ, पृथ्वीवर पाप वाढल्यामुळे आली, असं समजून जर आपण स्वस्थ बसलो असतो, तर ह्या विषाणूचा शोध आपल्याला लागला असता  का? हा भुताटकीचा प्रकार मानून आपण स्वस्थ बसलो असतो तर  त्यावर लस निघाली असती का?

कोणत्याही अतर्क्य गोष्टीला गूढ, अतीनैसर्गिक (निसर्गाच्या नियमापार काहीतरी), पराभौतिक (भौतिक शास्त्राला समजणारच  नाही असे)   कारण जोडलं की आपण त्यामागील कार्यकारणभाव शोधण्याची संधी  वाया दवडत असतो. आज तर आम्हाला हे कळत नाहीच पण यापुढेही ह्याचा  उलगडा होण्याची सुतराम  शक्यता नाही अशी शरणागती पत्करत असतो.  

याचा अर्थ जे जे आपल्याला पटत  नाही किंवा आपल्या आकलनाबाहेरचं आहे ते ते बोगस आहे असा मात्र नाही हं. भुतेखेते नसतात असं म्हणतानाच ती असल्याचे कोणते पुरावे असायला  हवेत हे ही सांगता आलं पाहिजे. असे पुरावे जर दाखवले तर आपण भुतावर विश्वास ठेवू असा मनाचा मोकळेपणाही पाहिजे. विज्ञान नेहमी  नव्या कल्पना आणि नव्या ज्ञानाचे स्वागत करते. पण दरवेळी हे ज्ञान तपासून घेतले जाते.

पूर्वप्रसिद्धी

किशोर

दिवाळी अंक

ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१

Monday, 4 October 2021

प्रदर

 

प्रदर

डॉ. शंतनू अभ्यंकर

 

प्रदर याचा अर्थ अंगावरून पांढरे जाणे. काही  पेशंटच्या भाषेत व्हाईट ब्लीडिंग’!

पांढरे जाणे ही तर कितीतरी कॉमन तक्रार. इतकी कॉमन की पेशंटला विचारलं,

‘अंगावरून पांढरे जाते आहे का?’

तर कधी कधी  उत्तर येतं, ‘नॉर्मल जातंय!’

पण असं उत्तर आलं की मला फायनल ईयरच्या अभ्यासाची आठवण होते. एमडीची परीक्षा जवळ आली होती.  अभ्यासाची धामधूम सुरू होती.  आणि अशातच एके दिवशी माझ्यावर केस प्रेसेंटेशनची  वेळ आली. केस प्रेझेंटेशन म्हणजे, एखाद्या पेशंटची सगळी माहिती, तपासणी, असं सगळं सरांच्या समोर मांडायचं  आणि विचारतील त्या प्रश्नांची उत्तर द्यायची. ही परीक्षेची रंगीत तालीम.  

जी पेशंट सरांनी तपासायला सांगितली त्या बाईंना विशेष काही म्हणजे काहीच होत नव्हतं. अंगावरून पांढरं जातंय, ‘नॉर्मल जातंय’, एवढीच त्यांची तक्रार होती. तपासणीतही अब्नॉर्मल म्हणावं असं काहीही आढळलं नाही. अर्थात विशेष काहीच आजार नसलेली पेशंट एमडीच्या तयारीसाठी कोण कशाला तपासायला सांगेल? असाच विचार माझ्या मनात थैमान घालू लागला आणि आपल्या लक्षात न आलेला काहीतरी दोष असणारच असं समजून, मी  अनेकदा, अगदी सखोल, तपासणी केली. पण व्यर्थ. खरोखरच विशेष काहीही आढळलं नाही.    

मी परीक्षेला सज्ज झालो. अपेक्षेप्रमाणे आमचं गाडं  अंगावरून पांढरे जातंय  या पहिल्याच वळणावर अडकलं. सरांनी मला अंगावरून पांढरे जाण्याची कारणं वगैरे विचारायला सुरुवात केली. मी धडाधड  सांगितली. त्यातलं या पेशंटला  कोणतं लागू आहे ते विचारलं. मी कोणतंही नाही असं सांगितलं. मग सरांनी पुढील तपासण्या कोणत्या ते विचारलं. मी सांगितलं अमुक तपासणी. सर म्हणाले ती नॉर्मल आली तर? मी सांगितलं तमुक तपासणी. सर म्हणाले ती नॉर्मल आली तर? हा अमुकतमुकचा   खेळ काही वेळ चालला.  मग तपासण्या वगैरेवर सखोल चर्चा झाली. पण सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत असं सर सांगत राहिले.  सुमारे अर्धा तास हा प्रकार सुरू होता. विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला येत होती. पण सगळंच नॉर्मल म्हटल्यावर,  आता ‘पेशंटला  सांगणार काय आणि औषध काय देणार?’ ह्या प्रश्नाचं उत्तर मात्र येत नव्हतं.

मी अगदी वरमलो. मला दरदरून घाम फुटला. सरांनी पुन्हा तोच प्रश्न केला. शेवटी जीवाचा धडा करून मी उत्तर दिलंच; ‘तुम्हाला काहीही होत नाहीये. हा प्रकार नॉर्मल आहे. तुम्हाला औषधाची गरज नाही, असं सांगीन!!!’

सरांच्या चेहऱ्यावर एक प्रसन्न हास्य उमटलं. मग हे बोलायला इतका का रे वेळ लावलास?’

‘सर, अमुक आजार आहे, असं  सांगणं सोपं आहे; पण तुम्हाला काहीही आजार नाही हे सांगणं अवघड.’

‘छान! हे तर ब्रम्हवाक्य समजायला हरकत नाही. झालास तू एमडी!!’ प्रसन्न होत्साते सरांनी आशीर्वाद दिला.

अंगावरून पांढरं जातंय आणि नॉर्मल जातंय, म्हणजे तक्रार करावी असे नाही. हे खरंच आहे. नॉर्मली सुद्धा अंगावरून जात असतं. निसर्गत: योनीमार्ग किंचित ओलसर राखला जातो. ह्या स्त्रावाबरोबर तिथल्या मृत पेशी बाहेर पडतात. पाळीच्या चक्रानुसार हा स्त्राव किंचित बदललतो.

पाळीच्या अलीकडे पलीकडे एखाद दोन दिवस पांढरट स्त्राव जातो. हे नॉर्मल आहे.  दोन पाळ्यांच्या मधल्या दिवशी, साधारण स्त्रीबीज  निर्मितीच्या आसपास, पाण्यासारखा पातळ स्त्राव जातो किंवा थेंबभर लाल जातं. हे नॉर्मल आहे.  गरोदरपणी तिथला रक्त पुरवठा वाढल्याने एकुणात स्त्राव वाढतो आणि ओलेपणा जाणवतो.  हे नॉर्मल आहे. ह्याला काहीही उपचार लागत नाही. करून काही उपयोगही नाही. शरीराचे ‘नॉर्मल टेंपरेचर’ कमी करण्यासाठी औषधोपचार  घेणे हास्यास्पद आहे. तसंच हे.   साधारण स्त्रावाबरोबर  वेदना, कंबरदुखी,  खाज, दुर्गंधी, पुरळ  अथवा जळजळ असं काही नसेल तर ‘नॉर्मल जातंय’ असं समजायला  हरकत नाही. पण सोबत वरील काही तक्रारी असतील  तर तपास आणि उपचार लागू शकतात.

हे जे ‘नॉर्मल’ जातं ना, ते म्हणजे निसर्गत: आसरा दिलेले ‘आरोग्य-जंतू’ (Commensals) तिथे सुखेनैव  वास करून आहेत याचं निदर्शक आहे. नॉर्मली आपल्या अंगप्रत्यंगावर कोट्यवधी जंतू वास करून असतात. कातडी, आतडी, तोंड, डोळे, मूत्रमार्ग, योनीमार्ग अशी सगळीकडे त्यांची वस्ती असते.  हे आरोग्य-जंतू! रोगजंतू, रोग निर्माण करतात. आरोग्य-जंतू, आरोग्य राखतात. उदाहरणार्थ आतडयात हे काही जीवनसत्वे निर्माण करतात. अन्यत्र हे आहेत, ठाण मांडून बसून आहेत, म्हणून रोगजंतू तिथे राहू शकत नाहीत! हे तर परोपकार-जीवी (Commensals). उगीच परोपजीवी (Parasites/बांडगूळ) म्हणून त्यांना हिणवणे बरे नाही आणि स्वच्छतेच्या नादानी त्यांचा नायनाट करणेही बरे नाही. योनीमार्ग, साबणाने,  आतून धुवून काढण्याची गरज नसते. रोज झकास आंघोळ करणे एवढी स्वच्छता पुरते.

पण आजकाल काही बायकांना अतिस्वच्छतेची बाधा होते. दोन  थेंब साबणात भांडी स्वच्छ आणि निर्जंतुक.  चार थेंब साबणात कपडे स्वच्छ आणि जंतूरहित. आठ थेंब साबणात फरशी स्वच्छ आणि किटाणूमुक्त.   जाहिरातीतला संडाससुद्धा चकचकीत, निर्जंतुक, आssणि किटाणूमुक्त, आssणि जंतूरहित झालेला पाहून ह्या प्रभावित होतात.  मग त्या हात धुवून शरीरशुद्धीच्या मागे लागतात. मग     चेहऱ्याचा, हाताचा, पायाचा, अंगाचा असे वेगवेगळे खास साबण घेतात. इथे मळापेक्षा परिमळाला महत्व असतं. अशात योनीशुद्धीसाठी खास साबणाचा शोध लागतो. पण यातल्या काही प्रकारांनी तिथल्या आरोग्य-जंतूंची वस्ती उद्ध्वस्त होते आणि मग नको ते जंतू (गार्डेनेल्ला व्हजायनॅलीस) वस्तीला येतात. याला म्हणतात बॅक्टेरियल व्हजायनॉसिस. मग पांढरा, पातळ, धुरकट, हिरव्या रंगाचा स्त्राव जातो.  लघवीला जळजळ, खाज, अंबुस वास अशा तक्रारी सुरू होतात. यासाठी  पाच ते सात दिवस औषधे घ्यावी लागतात. हा वसा पूर्ण करावा.  घेतला वसा टाकला तर वारंवार त्रास ठरलेला. शरीरसंबंधही काही काळ टाळावेत. म्हणजे शरीरसंबंधातून पुन्हा पुन्हा लागण होणार नाही.

कधीकधी इतर काही कारणे अॅंटीबयोटिक्स दिली जातात आणि ती योनिमार्गातील परोपकार-जीवींचाही खातमा  करतात. कधी स्टीरॉईडस दिली जातात. प्रतिकारशक्ती रोडावते. मग रोगजंतू आपला डाव साधतात. कधी कधी अन्य कारणानी  इथे रोगजंतू प्रविष्ट होतात.

अन्य रोगजंतूंमध्ये गुप्तरोग, ट्रायकोमोनस, बुरशी हे कॉमन.  लघवीचे इन्फेक्शन, गर्भमुखाला इजा/सूज, कुपोषण, अॅनिमिया, डायबेटीस,   अस्वच्छता हे पूरक घटक.

ट्रायकोमोनास हा एक सूक्ष्मजीव  (Protozoa) आहे. हा ठाण मांडून बसला तर पांढरा, पिवळा, फेसाळ स्त्राव जातो, किंचित वास येतो, खाज सुटते, लघविला जळजळ होते, सारखी लागते. हा आजारही जोडीदाराकडून येऊ शकतो. तेंव्हा गरजेप्रमाणे कंडोम वापरलेला बरा. पांढरे जाण्यात कॅंडीडा  ही बुरशी कुप्रसिद्ध आहे. यामुळे खाज येते  आणि दह्यासारखे पांढरे जाते.

प्रदर होऊ नये किंवा वारंवार उद्भवू नये म्हणून नीट काळजी घेतली पाहिजे. शी-शू झाल्यावर, बाह्यांग पुसून घेताना, नेहमी पुढून पाठीमागे असे पुसावे. शीच्या जागेकडून शूच्या जागेकडे पुसल्यास, शीच्या जागेचे जंतू, वाटेत, योनीमार्गात ढकलले जाऊ शकतात.  दिवसा  सुती अंतर्वस्त्र वापरावीत आणि रात्री वापरूच नयेत. खेळ, पार्टी, वगैरे वेळी वापरायचे अतिघट्ट कपडे तेवढ्या पुरतेच  वापरावेत. यांनीही इन्फेक्शनचा  त्रास वाढतो. आजकाल अनेक प्रकारचे कंडोम मिळतात. रस-रंग-गंध-स्पर्श अशी सारी सुखे त्यात सामावलेली असतात. पण ह्यातल्या काहींतील काही घटकांची अॅलर्जी म्हणूनही पांढरे जाऊ शकते. तेंव्हा (कोहिनूरचा) हा पैलूही  लक्षात घ्यायला हवा.

पूर्वी बायका, ‘इकडून’ येणं झालं किंवा  ‘स्वारीचं’ म्हणजे कसं अगदी वेंधळंच असायचं; असं नवऱ्याचं नाव न घेता  बोलायच्या. याचं, He came from this side किंवा The horse rider is absentminded; हे  भाषांतर जसं हास्यास्पद आहे तसंच आजाराबद्दल आहे. भाषांतर नीट जमलं पाहिजे. भाषांतरात गफलत झाली की गहजब होणारच.

आपल्याकडे लैंगिक स्त्रावांना ‘धातू’ असं नाव प्रचलित आहे. धातू मौलिक असून जपावे लागतात असं समजलं जातं. धातू  वाहून जाण्याने अशक्तपणा, अंगदुखी, चक्कर, ‘कसंतरी होणे’ असे   अनेक दोष होतात, अशीही समजूत आहे. तेंव्हा ‘कसंतरी होणे’ छाप तक्रारी उद्भवल्या तर बायका त्याचा संबंध ‘धातू जाण्याशी’ जोडतात आणि नॉर्मल स्त्रावही मग तक्रारीचं स्वरूप घेतात. लोकमानसातील शरीरशास्त्रानुसार एक थेंब धातू तयार होण्यासाठी शंभर थेंब रक्त लागतं. अशी जर समजूत असेल तर असं होणारच. विविध शारीरिक तक्रारींसाठी ‘धातू जातोय’ हे एकच कारण चिकटवणारे, त्यापायी  कुढणारे आणि लिंग वैदूंच्या जाहिरातींना बळी पडणारे, पुरुषही आहेतच.

तेंव्हा प्रदर म्हणजे बरेचदा  अन्य त्रासाची अन्योक्ती. लेकी बोले सुने लागे, असा प्रकार.  माझ्याकडे लक्ष द्या, मला भावनिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक, लैंगिक,  वैवाहिक त्रास होतोय, तो मला सांगता येत नाही, सबब प्रदर ही तक्रार! म्हणजे आता  निदान डॉक्टरकडे जाता येईल, कुणाबरोबर तरी बोलता  येईल, कदाचित डॉक्टर  मनीची व्यथा ओळखून घेईल.. अशी आशा, अपेक्षा म्हणजे प्रदर. हे त्या तक्रारीचं योग्य भाषांतर.   अ-वैद्यकीय त्रास  सांगायची ही पेशंटची शारीर भाषा आहे. डॉक्टरांना  ही अवगत असावी लागते.

असला प्रकार फक्त भारतात आढळतो असं नाही. कुचंबणेचा शारीर भाषेत  उद्गार होणे हर एक देशी दिसते. त्या त्या संस्कृतीनुरूप आजाराची लक्षणेही ठरलेली असतात.  लोककथा असतात तशा ह्या ‘लोकव्यथा’. शरीररचना आणि कार्य यांच्या बद्दलच्या  लोकांतील समजुतींमुळे उद्भवणाऱ्य व्यथा. आपल्याकडे तेल, तूप, अंडी, मांस वगैरे ‘उष्ण पदार्थ’ खाल्ल्याने शरीरातील ‘हीट वाढते’ आणि परिणामी पांढरे जाते असाही प्रवाद आहे.

इराणी बायकांच्या कुचंबणेचा उद्गार छातीत दुखणे, धडधड होणे अशा हृदय-विकारांनी होतो म्हणे.  दक्षिण अमेरिकेत नर्व्हीओस नावाचा असाच एक अ-वैद्यकीय आजार आहे. चक्कर चिंता आणि धाप अशी लक्षणे आढळतात म्हणे. चिनी बायकां-पुरुषांत मुंग्या येणे, अशक्तपणा, चक्कर हे त्रास-त्रिकुट संस्कृतीसंमत आहे.

प्रदर या तक्रारीला असे सांस्कृतिक, सामाजिक, कौटुंबिक पदर आहेत. अर्थात प्रत्येक दुखण्याला असतात ते. दुखणं, हे काही निव्वळ शारीरिक दुखणं असेल असं नाही.

म्हणूनच पांढरे जातंय, असं सांगणाऱ्या बहुतेक बायकांना, तपासणीत शून्य भोपळा त्रास आढळतो. म्हणूनच  कॅंडीडा, ट्रायकोमोनास, गार्डेनेल्ला अशा भारदस्त नावाचे जंतू नावालाही आढळत नाहीत, पण तक्रार मात्र सर्रास प्रदर! ही काय भानगड आहे? ही भानगड नसून ही भाषांतरातील गल्लत  आहे. भाषांतरात गल्लत झाली की गहजब होणारच. म्हणूनच ‘तुम्हाला काहीही होत नाहीये. हा प्रकार नॉर्मल आहे. तुम्हाला औषधाची गरज नाही’, असं सांगायला अधिक धैर्य लागतं. हे ब्रम्हवाक्य आहे असं सर म्हणाले ते काही उगीच नाही.

पूर्वप्रसिद्धी

लोकमत

सखी पुरवणी

5/10/2021