Monday, 25 October 2021

विज्ञान म्हणजे काय? विज्ञान शाप नव्हे वरदानच! लेखांक ११

 

विज्ञान म्हणजे काय?

विज्ञान शाप नव्हे वरदानच!

डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.

लेखांक ११  

 

विज्ञान नेहमी  नव्या कल्पना आणि नव्या ज्ञानाचे स्वागत करते. पण दरवेळी हे ज्ञान तपासून घेतले जाते. ही युक्ति वापरुन आपले जग आपण काहीच्याकाही बदलले आहे.  पण तरीही  विज्ञान शाप की वरदान?’ असा विषय, निबंध स्पर्धेत किंवा वादविवाद स्पर्धेत, हटकून दिलेला असतो आणि विज्ञानाच्या बाजूने बोलणारी मुलेमुली उगीचच दबकून, हातचं राखून बोलतात. ‘शाप’वाला पक्ष विज्ञानावर आक्रमकपणे  वाट्टेल ते आरोप करत असतो आणि बिच्चारे  विज्ञानवादी ते मुकट सहन करत असतात. ही लेखमाला वाचून तुम्ही विज्ञानाची बाजू हिरीरीने मांडाल अशी मला खात्री वाटते.

आज विज्ञान सर्वव्यापी आहे. अन्न, वस्त्र, निवारा; आहार, विहार, आरोग्य; आचार, विचार, संचार; अशा साऱ्या क्षेत्रात विज्ञान नावाची युक्ति वापरुन मानवाने भरघोस प्रगती केली आहे. विज्ञानाची एकही देन न वापरता जगायची कल्पनाही आता अशक्य आहे.

विज्ञान नावाच्या युक्तीचा शोध लागला तो चारशे ते पाचशे वर्षापूर्वी. गेल्या पाचशे वर्षात जगाची लोकसंख्या दसपट वाढली आहे. मात्र आज भुकबळी किंवा कुपोषणग्रस्त जनता फारशी आढळत नाही. धरणे, कालवे, ठिबक सिंचन, अधिक उत्पन्न देणारी बियाणे ही सारी विज्ञानाची देन आहे. याशिवाय इतक्या साऱ्या लोकांच्या पोटाला ही वसुंधरा पुरी पडलीच नसती.

 आज जितकी माणसं उपासमारीने मरतात त्यापेक्षा जास्त माणसं अति-पोषणाने मरतात. अति-पोषणाने म्हणजे वजन जास्त  असल्याने होणारे हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह, वगैरे विकारांनी जास्त माणसं मरतात.

यावर हुशार विरोधक असाही मुद्दा मांडतील की अतिपोषण हा विज्ञानाने दिलेला शाप आहे! हा तर अत्यंत हास्यास्पद आरोप आहे. विज्ञानाने अन्न निर्माण केलेल आहे.  ते तारतम्य राखून खायची जबाबदारी ज्याची त्याची आहे. शिवाय किती म्हणजे अति? वयोमानानुसार आहार कोणता असावा? वगैरेची कोष्टके विज्ञानानेच तयार केली आहेत. 

जी गोष्ट अन्नाची तीच गोष्ट वस्त्र, निवारा, आरोग्य अशी सगळीकडे लागू होते.

आरोग्याचेच पहा ना; १९४७ साली आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा भारतीय माणसाचे सरासरी आयुर्मान सुमारे ३५ वर्षं होतं! आज ते ७० वर्ष आहे. हे तर विज्ञानानीच साध्य झाले आहे. देवीचा आणि पोलिओचा  रोग आता भारतात सापडत नाही. भारतातल्या प्रत्येक बालकाला दहा निरनिराळ्या आजारांवरील लसी सध्या दिल्या जातात. करोनाची साथ येऊन वर्ष व्हायच्या आत, त्यावरील लस उपलब्ध झाली. हे सारं, विज्ञान न वापरता, कल्पनेत तरी शक्य  होतं काय?

तुमच्या आजी-आजोबांना विचारा म्हणजे घरीदारी किती कष्टमय जीवन होतं ते तुमच्या लक्षात येईल. चूल-पोतेरे, लाकडं फोडणे, पाणी ओढणे, दळण-कांडण,  अशी सगळी कामं करावी लागायची. शेती असो की कोंबडी पालन, विहीर खणणे असो की घर बांधणे; व्यापार  असो की प्रवास; सगळ्याच गोष्टी अतिशय खडतर होत्या. विज्ञान नावाची युक्ति वापरुन यातील प्रत्येक गोष्ट आज सुकर झाली आहे.

नुसतीच सुकर आणि सुलभ नाही तर कित्येकपट सुरक्षित झाली आहे. वादळ, पूर, भूकंप वगैरे नैसर्गिक आपत्तीत होणारी जीवित हानी शे-पाचशे वर्षापेक्षा आज नक्कीच कमी आहे. आज आपल्याला वादळ-वाऱ्याची पूर्व सूचना मिळते, आपण काळजी घेतो. कित्येकांचे प्राण वाचतात. कित्येकपट  वित्त हानी टळते. हे सारं विज्ञानानेच तर शक्य झालं आहे.

आज  उत्पादनाचा वेग आणि दर्जा  वाढला आहे. कपडे, चपला अशा गरजेच्या वस्तू आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्या आहेत. एकंदर समृद्धी वाढली आहे. याचे अनेक सुपरिणाम आपल्या आसपास दिसत आहेत. साक्षरता वाढली आहे. शाळेत न जाणारी मुले आता तर क्वचित दिसतात.  बालमजूरी कमी झाली आहे.

फक्त श्रीमंतांना परवडणारी वाचन, नाटक, गाणे, बजावणे वगैरे चैन आता सामान्यांच्या आवाक्यात आली आहे. खरंतर करमणूक या प्रकाराकडे आता चैन म्हणून कोणी पहात नाही. करमणूक ही आता आवश्यक गोष्ट मानली जाते.   टीव्ही, रेडियो, मोबाइल, इंटरनेट, कॉम्प्युटर हे सारे माहिती, करमणूक, व्यवसाय, शिक्षण अशा अनेक गोष्टींसाठी अत्यावश्यक ठरले आहे. माणसाच्या कष्टाचे तास आज कमी झाले आहेत. रिकामा वेळ अधिक मिळतो आहे. ह्या वेळचा उपयोग माणसं छंद, प्रवास, खेळ, साहस अशा अनेकांगांनी   सत्कारणी लावत आहेत.

जग जवळ आल्यामुळे विविध विचार, आहार, धर्म, संस्कृती, क्रीडा  वगैरेंची माहिती होते. आपले विश्व आणि विचारविश्व विस्तारते. विज्ञानाशिवाय हे कसं शक्य झालं असतं बरं?

सामाजिक क्षेत्रात देखील विज्ञानानी बरीच उलथापालथ केली आहे. स्त्रीपुरुष समान आहेत, वंशभेद,  वर्णभेद, जातीभेद वगैरे काल्पनिक असून  या साऱ्याला वैज्ञानिक आधार नाही; असा ठाम पुरावा विज्ञानाने दिला आहे. शुद्ध वंश, शुद्ध जात, शुद्ध कूळ वगैरे बकवास आहे असा स्पष्ट निर्वाळा विज्ञानाने दिला  आहे.  सर्व माणसे समान आहेत असे निव्वळ  भावनिक आवाहन करणे  आणि सर्व माणसे समान आहेत असे शास्त्रीय प्रतिपादन करणे  यात जमीन आस्मानाचा  फरक आहे.

विज्ञान शाप का आहे, याची ठरलेली यादी आहे. औद्योगीकरणाने वाढलेले प्रदूषण, अणुयुद्धाचा धोका, पर्यावरणाचा ऱ्हास हे त्यातले प्रमुख मुद्दे. पण जरा विचार केला तर हे सारे निकाली निघतात. या साऱ्या समस्यांचं  उत्तर पुन्हा एकदा विज्ञानातच  दडलेलं आहे.

प्रदूषण वगैरेने  पर्यावरणाला असलेला जागतिक तापमान वाढीचा धोका खराच आहे, मात्र यावर उपायही विज्ञानेच निघू शकतो. तेल किंवा कोळसा वापरण्याऐवजी अणुउर्जेचा वापर करणे, वातावरणातील कार्बन शोषला जाईल असे उपाय योजणे, पर्यावरणस्नेही जीवनशैली  हे उपाय विज्ञानानेच तर सुचवले आहेत.

येणारे जग कृत्रिम बुद्धिमततेचं जग असेल. माणसापेक्षा कैकपट चलाख यंत्र आणि यंत्रमानव हे माणसाच्या जगावर    कब्जा करतील आणि मनुष्य आणि त्याची संस्कृती ह्या ग्रहावरून कायमची नष्ट होईल, अशी कल्पना कित्येक विज्ञान कथांतून मांडलेली असते. विज्ञानाचा भस्मासूर स्वतःलाच संपवून टाकेल का?  असे घडणे अशक्य नसले तरी तशी  शक्यता खूपच कमी आहे.  कृत्रिम बुद्धीमत्तेचा विकास करताना सावधगिरी बाळगलीच पाहिजे पण त्याचबरोबर नाही तो धोका फुगवून त्याच्या मागे लागण्यात काय अर्थ आहे? मनुष्य जातीला ताबडतोब कोणता  धोका असेल तर तो अणुयुद्धाचा. अण्वस्त्रे नष्ट करण्याचा कार्यक्रम आज जगभर सुरू आहे. हा अधिक जोमाने सुरू राहीला पाहिजे. मुळात युद्ध टाळण्यासाठीही जगभर आणि यशस्वी प्रयत्न चालू आहेत. पूर्वीपेक्षा आता युद्ध कमी झाली आहेत. इतकी की आज युद्धात शहीद होणाऱ्या सैनिकांपेक्षा आत्महत्या जास्त प्रमाणात होतात!

अण्वस्त्रे विज्ञानाच्या मदती शिवाय शक्य नव्हती हे खरेच पण लढाईचा शोध काही विज्ञानाने लावलेला नाही. निव्वळ शस्त्रास्त्रे आहेत म्हणून काही कोणी लढाईला  सुरवात करत नाही. लढाया होतात त्या सत्तेसाठी, पैशासाठी, प्रतिष्ठेसाठी. टोळीयुद्ध सुद्धा यासाठीच व्हायची आणि जागतिक महायुद्ध सुद्धा यासाठीच झाली. पूर्वी लोकं एकमेकाला दगडगोट्यानी हाणायची. पुढे धनुष्य-बाण, ढाल-तलवार मग बंदुका-तोफा  आणि आता अण्वस्त्रे; अशी लढाईच्या साधनात प्रगती झालेली दिसते. विज्ञानाने अधिकाधिक घातक शस्त्र बनवली हे खरेच आहे  पण मुळात लढाईची कारणे आजही तीच आहेत. ही कारणे काही विज्ञानानी निर्माण केलेली नाहीत. ती  माणसाच्या, समाजाच्या विचार करण्यातून; कशाला किती महत्व द्यायचं यातून आलेली आहेत.

म्हणूनच विज्ञानाबरोबर विवेक हवा. माणुसकी हवी. निरनिराळे, अगदी विरोधी विचारही आदरपूर्वक  समजावून घ्यायची तयारी हवी (उदारमतवाद).   इतकी सगळी प्रगती झाली ती विज्ञानाच्या बळावर.  पण त्याचबरोबर ह्या प्रगतीला दिशा दिली ती विवेकी विचार पद्धतीने, उदारमतवादाने  आणि मानवतावादाने. ह्याच अर्थ आता इथून पुढे सारे काही आलबेल होईल असे नाही. विज्ञान, विवेक, मानवता आणि उदारमतवाद  ही प्रगतीची चाके आहेत. माणसाच्या प्रगतीचा आलेख काही सतत चढता राहील असे नाही. तो सतत थोडा  वर थोडा खाली असा  होतच रहाणार. पण एकुणात प्रगती होत रहायची असेल तर प्रगतीच्या ह्या चाकांना आपण वंगण घातलं पाहिजे. यासाठी काळजीपूर्वक आपले पूर्वग्रह कसे टाळायचे, चिकित्सकपणे विचार कसा  करायचा हे शिकणं अत्यंत महत्वाचं. विज्ञान नावाची युक्ति आपल्याला नेमकं हेच शिकवते. ते  शिकायला हवं.

 

पूर्वप्रसिद्धी

किशोर

दिवाळी अंक

ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment