Tuesday 13 November 2018

एन्डोमेट्रीऑसीस


एन्डोमेट्रीऑसीस
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई, जि. सातारा.


ज्यापुढे भले भले हात टेकतात अशा दुर्घर आजारांपैकी एक म्हणजे एन्डोमेट्रीऑसीस. गर्भपिशवीच्या अस्तराच्या पेशी  भलत्याच ठिकाणी उगवून येतात. बहुतेकदा ओटीपोटाच्या पोकळीत, गर्भाशयाच्या आसपास, बीजग्रंथींच्या नजीक, फॅलोपिअन नलिकांजवळ यांचे ‘तण’ दिसते. ‘तण’ अशासाठी म्हटले की भलत्याजागी उगवल्यामुळे ह्या पेशी भलत्याच उपद्रवी ठरतात. भलत्या जागी, भलत्या पेशी म्हणजे कॅन्सर हा झाला एरवीचा ठोकताळा. पण एन्डोमेट्रीऑसीस म्हणजे कॅन्सर नाही.
सुमारे पाच टक्के महिलांत हा प्रकार आढळतो. एकाच घरात जास्त दिसतो. म्हणजे पेशंटच्या आईला/बहिणीला असू शकतो. ह्याचा त्रास होतो तो पंधरा ते पंचेचाळीशी दरम्यान. पाळी येण्यापूर्वी हा होण्याचा प्रश्न नाही आणि पाळी गेल्यावर हा आजार शांत होतो. बराच काळ टिकणारा आणि हळूहळू वाढतच जाणारा असा हा आजार आहे. वेदना आणि वंध्यत्व हे ह्याचे परिणाम.

उद्भव
काय कारणानी हा आजार होतो हे आपल्याला नेमके माहित नाहीये. पण असे म्हणतात की पाळीच्या वेळी थोडेसे रक्त नलिकांद्वारे उलटे वहाते आणि ओटीपोटात सांडते. ह्यातल्या काही पेशी तिथेच घर करतात. तिथेच वाढतात. ह्या मुळात गर्भपिशवीच्या अस्तराच्या पेशी, त्यामुळे स्त्री हॉर्मोन्सचे सांगावे त्या मुकाट्याने ऐकतात. पाळीच्या वेळी जसा अस्तरातून रक्तस्राव होतो, तसा ह्या पेशीसमुच्चयातुनही होतो. अर्थात रक्त वाहून जायला वाटच नसल्याने ते तिथल्या तिथेच रहाते. त्याची बारीकशी गाठ बनते. आधी पुटकुळी एवढी गाठ येते, मग वाढत जाते. जोंधळ्या एवढी होते.  असे दर महिन्याला होत राहिले की ही गाठ वाढते. चांगली क्रिकेट बॉल एवढीसुद्धा होते. ह्या गाठीत बरेच दिवस आत साठलेले रक्त असते, त्यामुळे ते चॉकलेटी रंगाचे बनते. ह्याला म्हणतातच चॉकलेट सिस्ट. ही गाठ चांगलीच दुखते. गाठीचा आकार लहान असूनही वेदना तीव्र असू शकते आणि कधी कधी मोठ्या गाठीही फारशा दुखत नाहीत. गाठी भोवती सूज येते, आजूबाजूचे अवयव तिथे येऊन चिकटतात. यात कधी बीजग्रंथी असतात, कधी नलिका असतात, कधी कधी आतडीसुद्धा असतात. कधी ह्या गाठी संडासच्या पिशवीच्या आणि योनीमार्गाच्या मधल्या भागात वाढतात. आतड्यांवर वाढतात. विविध अवयव ह्यात सापडतात म्हणूच तर विविध प्रकारच्या तक्रारी उद्भवतात.
कधी गर्भपिशवीतले रक्त बाहेर पडण्याऐवजी गर्भपिशवीतच खोल खोल बुडी मारते. अस्तराच्या पेशी आता गर्भाशयाच्या स्नायूत शिरतात. मग इथे बारीक बारीक गाठी निर्माण होतात. त्याच तिकीटावर तोच खेळ इथेही सुरु होतो. ह्याला खास नाव आहे, अॅडीनोमायोसीस.

तक्रारी
सुरवातीला काहीच तक्रार उद्भवत नाही. पण ही तर वादळापूर्वीची शांतता. मग पाळीच्या वेळी दुखते. चार दिवस आधीच दुखायला सुरवात होते. पाळीनंतर सहसा थांबते. पुढे पुढे  पाळी येऊन गेली तरी कळ येतच रहाते. वेदना अशी की ती स्त्री अगदी वैतागून जाते, कळ इतकी की रोजचे जिणे असह्य व्हावे. कधी संबंधाच्या वेळी इतके दुखते की समागम अशक्य ठरतो. लघवी, संडास असे सारेच वेदनादायी ठरते. कधी पाळी अनियमित होते, कधी जास्त जायला लागते.
दिवस रहायला खूप वेळ लागतो. नलिका, बीजग्रंथी असे सारे एकमेकात लपेटले गेलेले असते. बीज वहनाचे काम नलिका करूच शकत नाहीत. कधी कधी नलिका बंद होऊन जातात. कधी तिथे आतडी येऊन चिकटतात. गर्भपिशवीचे अस्तरही  निट वाढत नाही. अशा अनेक कारणाने दिवस रहाण्यात अडचणी येतात.

निदान
निदान करणे अवघडच असते. शारीरिक तपासणीत स्पर्शाला जाणवेल असे काही फार क्वचित आढळते. खूप दुखतय म्हणजे मोठ्ठी गाठ आणि सौम्य दुखतय म्हणजे लहान गाठ असाही काही प्रकार दिसत नाही. शिवाय आतड्याच्या इतर काही आजारातही हीच लक्षणे दिसतात, कटी भागात सूज आली तरी हीच लक्षणे दिसतात. त्यामुळे शारीरिक तपासणीपेक्षाही जास्त भिस्त ही अन्य तपासण्यांवर असते. सोनोग्राफी ही टेस्ट सोपी आणि स्वस्त. अतीच झाले असेल तर एमआरआय लागतो. मोठी गाठ असेल तर एवढ्यात दिसते. पण उत्तम टेस्ट म्हणजे लॅपरोस्कोपी (दुर्बिणीतून तपासणी). ह्यामुळे निदान तर पक्के होतेच पण उपचारही करता येतात. लॅपरोस्कोपीत पोटात सोडलेल्या छोट्याशा कॅमेऱ्यामुळे आतले सगळे दृश्य पडद्यावर मोठ्ठे दिसते. छोट्याछोट्या गाठीही स्पष्ट दिसतात. बारीक असतात त्या तिथल्या तिथे ‘लाईट’ने (कॉटरी) जाळून टाकता येतात. चॉकोलेट सिस्ट फोडून त्यातले द्रावण शोषून स्वच्छ करता येते. तिथेही आतून डाग देता येतात. आवश्यक तिथे एखादा तुकडा तपासणीला घेता येतो. जी काही चिकटाचिकटी झालेली असेल ती सोडवता येते. विशेषतः वंध्यत्व हा जर प्रश्न असेल तर नुसत्या औषधांनी तो सुटत नाही. ऑपरेशनची चांगली मदत होते.

उपचार
वेदनाशमन महत्वाचे. सुरवातीला गोळ्यांनी बराच फरक पडतो.
मूल नको असेल तर, पाळी येणारच नाही अशी औषधे ही पुढची पायरी. पाळीबंद म्हणजे रक्तस्राव बंद, म्हणजे वेदना बंद. पाळी येणार नाही अशा बेताने, सातत्याने गर्भनिरोधक गोळ्या घेणे हा सर्वात स्वस्त पर्याय. इतरही गोळ्या, इंजेक्शने वगैरे आहेत. पाळी न येऊ देणे हा उपचार आहे. मग हे साध्य होण्यासाठी साधन काहीही वापरा. म्हणजे गोळ्या घेऊन, इंजेक्शने घेऊन हा परिणाम साधता येतो.
ज्यांना मूल हवय त्यांना गर्भावस्था हा तर उत्तम उपचार. दिवस राहिले की पाळी बंद झाल्यामुळे हा आजार थंडावतो. वाढलेले तण, गाठी, आक्रसतात. पुढे पुन्हा पाळी सुरु झाली की पुन्हा आजाराला सुरवात होते. पण मधे बरेच दिवस सुखाचे जातात.
‘अॅडीनोमायोसीस’साठी एलएनजी आययुएस नावाची कॉपरटी सदृष ‘गोळी’ मिळते. ही थेट गर्भाशयात बसवता येते. याने रक्तस्राव कमी होतो आणि कधी कधी पाळीही बंद होते. फक्त प्रोजेस्टेरॉन असलेली गर्भनिरोधक साधनेही उपयुक्त ठरतात. (गोळ्या इंजेक्शने, इ.)
मुलेबाळे झाली असतील किंवा आता नको असतील तर गंभीर आजारामध्ये पिशवी, स्त्रीबीजग्रंथी आणि नलिका काढणे हे ऑपरेशन केले जाते. एन्डोमेट्रीऑसीसचे समूळ उच्चाटन केले जाते. आजूबाजूचे अवयव जर चिकटलेले असतील तर त्या त्या तज्ञांना देखील यात सहभागी करावे लागते; उदाः आतड्याचे किंवा मूत्र मार्गाचे सर्जन.

गैरसमज
पाळीच्या वेळी पोटात दुखणे हे इतके स्वाभाविक समजले जाते की बरेचदा त्याकडे फारश्या गांभीर्याने पहिले जात नाही. अगदी लहान वयात तर हा प्रकार म्हणजे एन्डोमेट्रीऑसीस असेल अशी शंकाही फारशी घेतली जात नाही. अती दुखतय म्हणजे ती मुलगीच नाजूक आहे असा समज करून घेतला जातो. लॅपरोस्कोपी ही निदानाची खात्रीशीर पद्धत पण बरेचदा लहान वयात हे आई वडिलांना नको  वाटते. या भानगडीत तक्रार आणि निदान, यात सात वर्षाचे अंतर पडते असे एक अभ्यास सांगतो.
एन्डोमेट्रीऑसीस आणि नैराश्य यांचेही जवळचे नाते आहे. कोणी समदु:खी भेटली की तिच्याशी बोलून बरे वाटते. आहे त्या परिस्थितीचा धीराने स्वीकार सुलभ होतो. आता इंटरनेटच्या जमान्यात हे सहज शक्य आहे. पेशंटचे  आता स्व-मदत गट असतात. अशाच एका आंतरराष्ट्रीय मदतगटाची  ही लिंक.
भारतातही यांची शाखा आहे. दुर्दैवाने नेटवरची बहुतेक सगळी माहिती आणि मदत इंग्रजीत आहे पण असो, हे ही नसे थोडके.

Sunday 11 November 2018

अमेरिकेतील अंनिसच्या अधिवेशनात

अमेरिकेतील अंनिसच्या अधिवेशनात!!!
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

सिपोला नामे करून एका इटालियन गणितज्ञाचा, ‘द बेसिक लॉज ऑफ ह्युमन स्टुपिडीटी’ असा गाजलेला निबंध आहे. यात मूर्खांची पाच लक्षणे सांगितली आहेत आणि पहिलेच लक्षण असे की, वाटते त्यापेक्षा मूर्खांची संख्या नेहमीच जास्त भरते. दुसरे असे की मूर्खपणाचे वाटप वंश, वर्ण, लिंग, देशकालपरिस्थिती निरपेक्ष असते. विद्वत्ता ही कुण्या एका जातीची मक्तेदारी नाही हे वाक्य आपल्याला कोणीतरी तावातावाने सुनावलेलं असतं. ते आपल्याला पटलेलंही असतं. पण मूर्खपणाही कोणाची मक्तेदारी नाही ही भावना थोरच. खूप खूप सुखावणारी.
हे सुख मला प्राप्त झालं ते अमेरिकेत. तिथल्या अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वार्षिक अधिवेशनातील भाषणे ऐकून. अर्थात तिथे अशा समितीला अंधश्रद्धा निर्मुलन समिती असं न म्हणता ‘कमिटी फॉर स्केप्टीकल इन्क्वायरी’ असं म्हणतात. पण एकूण बाज तोच. परामानसिक आणि छद्मवैद्यानिक दाव्यांचा यथायोग्य शास्त्रीय मागोवा घेणे हे ह्या संस्थेचे काम. त्यासाठी अनेक तज्ञ इथे काम करतात. असं काम करणाऱ्या लोकांचं जाळंच या संस्थेनी तयार केलं आहे. असे दावे तत्परतेने खोडून काढावे लागतात. अशी तयारीची टीम इथे आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर समविचारी संघटनांशी समन्वयाचं कामही संस्थेमार्फत चालतं. या साऱ्यात ‘स्केप्टीकल इन्क्वायरी’ हे मासिक महत्वाची भूमिका बजावतं.
ह्या असल्या जगावेगळ्या, भलत्यासलत्या अधिवेशनाला मी जातोय याची कुणकुण लागताच मित्रमंडळी चपापली. म्हणाली, ‘कमाल आहे. तिथेही ‘हे’ आहे? म्हणजे अंधश्रद्धा वगैरे? आम्हाला वाटत होतं की आम्हीच तेवढे यडबंबू!!’ तेंव्हा गुड न्यूज ही की असं काही नाही. जगात इतर आणि इतरत्रही यडबंबू आहेत. भूतप्रेत, मृतात्मे, प्लँन्चेट, परग्रहवासी, ज्योतिष या बरोबरच छद्मआरोग्यविज्ञान ही एकेक मोठी डोकेदुखी आहे तिथे. मुलांना लसीकरण करणे म्हणजे त्यांना ऑटीसमच्या खाईत लोटणे होय अशी मानणारी मंडळी तिथे आहेत. योनीमार्गात अंडाकृती दगड बाळगलात तर तुमचे ऋतुप्राप्तीपासून ते ऋतूनिवृत्तीपर्यंतचे सगळे आजार दूर होतील असं सांगणारे आहेत. बिगफूट किंवा यती असा कोणी प्रचंड मोठा, मानवसदृष प्राणी बर्फाळ प्रदेशात वास करून आहे असं मानणारे आहेत. वर्ल्ड ट्रेड सेंटरवरचा हल्ला हा मुळात हल्ला नव्हताच तो एक मोठा बनाव आहे असं सांगणारे आहेत... शिवाय हे सगळं अतिप्रगत अशा अमेरिकेत आहे. तेंव्हा ह्याचा प्रचार, प्रसार आणि मांडणीही अगदी गुळगुळीत, चकचकीत, तुम्ही सहज फशी पडाल अशी आहे. ह्याला विज्ञानाचा मुलामा आहे. संशोधनाची झिलई आहे. त्यामुळे ह्याचा प्रतिवाद आणखी अवघड आहे. ह्या परिषदेतील व्याख्यानातून या संबंधीचे अनुभव लोकांनी मांडले.
माझ्यासाठी मुख्य आकर्षण होतं, डॉ. रिचर्ड डॉकिन्स यांना प्रत्यक्ष भेटणे. (https://shantanuabhyankar.blogspot.com/2016/10/blog-post_22.html या लिंकवर निरीश्वरवादाचा अधुनिक उद्गाता रिचर्ड डॉकिंन्स हा माझा परिचयपर लेख उपलब्ध आहे) गेल्या गेल्याच ते भेटले. ‘सेल्फिश जीन’, ‘द गॉड डील्यूजन’, ‘ब्लाइंड वॉचमेकर’ ही त्यांची काही गाजलेली पुस्तके. त्यांच्या ‘द मॅजिक ऑफ रीअलीटी’चं भाषांतर मी केलंय हे सांगताच त्यांनी सखोल माहिती घेतली. भाषांतराबाबत सूचना केल्या. इंग्लीशेतर भाषांत असलेल्या  शब्द दारिद्य्रावर चर्चा झाली. विशेषतः शास्त्रीय पारिभाषिक शब्दांची चणचण ही समस्या अन्य भाषातील अनेक भाषांतरकारांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवली होती.
एक शैलीदार लेखक, मर्मज्ञ रसिक, शास्त्रज्ञ, लोकशिक्षक, अभिमानी नास्तिक आणि टोकदार विनोदबुद्धी असणाऱ्या डॉकिन्सशी गप्पा मस्त रंगल्या. त्यांचा सारा भर लोकशिक्षणावर होता. विज्ञान सामान्य जनांपर्यंत पोहोचवणे, प्रत्येक सामाजिक, राजकीय घटनेत काही भूमिका घेणे, त्यांना आवश्यक वाटते. आवश्यकच नाही तर विज्ञानवादी विचार करणाऱ्या प्रत्येकाचे ते कर्तव्य आहे असं ते मानतात. ट्रम्पना खुलेआम विरोध, ब्रेक्झीटला विरोध, गे चळवळीला साथ अशी अनेक मते ते हिरीरीने मांडतात. भारतात उत्क्रांतीच्या शिक्षणाला, गर्भपाताला, गर्भनिरोधक साधनांना विरोध होत नाही का? हा त्यांचा प्रश्न. जवळपास नाही आणि असलाच तर असा विरोध अत्यंत क्षीण आहे, हे माझे उत्तर ऐकताच ते सुखावतात. आमच्या पंतप्रधानापासून ते अनेक फुडारर्यांची अशास्त्रीय विधाने कुचेष्टेचा विषय ठरली हे मी त्यांना आवर्जून सांगतो. नास्तिक विचारलाही हिंदू धर्मात स्थान आहे का? हा त्यांचा पुढचा प्रश्न. ‘हो आहे. भारतात खंडन-मंडनाची प्राचीन परंपरा आहे, मात्र सध्या आम्ही फक्त त्याचा अभिमान बाळगतो, आचरणात आणतोच असं नाही’, असं सांगताच ते म्हणाले, ‘आमच्याकडेही तीच गत आहे!’ सौदीनी धर्मद्रोही म्हणून शिक्षा ठोठावलेला लेखक रैफ बडावी आणि इतरही देशोदेशीच्या तथाकथित धर्मद्रोह्यांबद्दल ते बोलू लागतात. भारतात राजसत्तेनं कोणाला धर्मद्रोही घोषित केलं नसलं तरी चार विचारवंतांचे खून आणि त्यातून माजवली गेलेली अप्रत्यक्ष दहशत ही तर आणखी भयावह असल्याचे मत ते मांडतात. बोलण्याच्या ओघात भारताला भेट देण्याची त्यांची इच्छाही त्यांनी बोलून दाखवली. एका ऋजू, विद्वान व्यक्तिमत्वाचा सहवास पुढे दोन दिवस घडत राहिला.
  हे अधिवेशन भरलं होतं लास व्हेगस मध्ये. तेच ते; जुगाराचा अड्डा, पापाचे आगर, लक्ष्मीपुत्रांची (आणि कन्यांचीही) बजबजपुरी, षड्रिपूंचे माहेरघर; जे की लास व्हेगस! तेंव्हा इये लक्ष्मीच्या दारी सरस्वतीसाधकांचा मेळा भरला होता. गेली काही वर्षे हे वार्षिक अधिवेशन इथे भरवले जाते. मोठमोठी अधिवेशने भरवण्यासाठी इथे पंचतारांकित सुविधा उपलब्ध आहेत. तेंव्हा अशी अनेक अधिवेशने तिथे होत असतात. सुमारे दोन हजार मंडळी ह्याला हजर होती. पूर्ण वेळ. स्वतःच्या पैशाने. हारतुरे, आगत स्वागत, दीपप्रज्वलन यापासून मुक्त अशी ही परिषद. स्टेजवर, मध्यावर, एकच पोडीयम, ना टेबल, ना खुर्ची, ना तांब्याभांडे! वक्ते येत होते आपापली मांडणी दिलखुलासपणे करत होते आणि पायउतार होत होते. औपचारिक ओळख वगैरे कटाप. तुमची मांडणी हीच तुमची ओळख. जी काही जुजबी ओळख करून दिली जात होती तीही गमतीशीर होती. ‘सर्व वक्त्यांना काही अत्यंत गंभीर आणि मनतळाचा शोध घेणारे प्रश्न आम्ही आधीच विचारले आहेत, त्यांची उत्तरे हीच त्यांची ओळख’, असं आधीच बजावण्यात आलं. पण विचारलेले प्रश्न अत्यंत फुटकळ होते आणि त्यांची उत्तरेही तितकीच मजेदार होती. त्यामुळे प्रत्येक वक्त्याची ओळख म्हणजे झकास खेळ होता. बीचवर ताणून द्यायला आवडेल की शेकोटीशी हादडायला? तुमची सर्वात अवघड गोची कधी झाली होती? ब्रश आधी ओला करता का पेस्ट लावल्यावर? मृत्यूची तारीख कळली तर आवडेल का मरण्याची तऱ्हा? अशा थिल्लर प्रश्नांना तशीच थिल्लर उत्तरे येत होती, वातावरण सैलावत होतं. बाकी भाषणानंतर चर्चा, आभार, अभिनंदन वगैरे बाहेर, चहा-कॉफिच्या घुटक्या बरोबर. पण तिथली कॉफी महान कडू होती आणि चहा य पांचट, पण ते असो.
सुरवात झाली ती कार्यशाळांनी. जो निकेल यांची शंकास्पद दाव्यांचा शोध कसा घ्यावा या विषयीच्या कार्यशाळेला मी हजर राहिलो. भुताचे फोटो ही कॅमेरऱ्याची करामत असते हे त्यांनी सप्रमाण दाखवून दिले. बऱ्याच फोटोत आपोआप अवतरणारे ‘स्वर्गाचे दार’ हा पोलेरोईड प्रकारच्या कॅमेऱ्यामुळेचा प्रकाश भास असतो, हे ही सांगितले. इंग्लंडमधील एका महिलेचा मृतदेह तिच्या घरातच अर्धवट जळलेल्या अवस्थेत सापडला होता. तिचे अर्धे अधिक शरीर जळले असले तरी आसपासच्या वस्तूंनी पेट घेतला नव्हता. सबब शरीरांतर्गत उष्णतेमुळे तिचा मृत्यू झाल्याचा अचाट दावा करण्यात येत होता. (Spontaneous human combustion) पण अपघात स्थळाच्या फोटो वरून निकेल यांनी सारे काही उलगडून दाखवले. कुठल्या कुठल्या तळया-सरोवरात लांबच लांब ड्रॅगन सारखे प्राणी असल्याचे दावेही वेळोवेळी केले जातात. इंग्लंडमधील लोक नेस हे याचे प्रसिद्ध उदाहरण. अशा कोणत्याही प्राण्याच्या अस्तित्वाचा ठोस पुरावा शून्य पण भय विस्मय आणि भाकडकथा पसरवण्यासाठी हे खूप सोयीचे. अनेक प्राणी हे पोहताना एकामागोमाग पोहतात, त्यामुळे पहाणाऱ्याला एकच एक मोठा प्राणी पोहतोय असं वाटू शकत. ऑटर, बीव्हर आणि काही हरणे अशी पोहतात. तरंगणारे ओंडके बदकं अशा मुळेही असं भासू शकतं. थोडक्यात काय सर्व शक्यतांची पडताळणी महत्वाची.
सुरवातीलाच काही तर्कदोष त्यांनी दाखवून दिले. एखाद्या अज्ञात गोष्टीचा अर्थ लावताना हे तर्क आपल्याला बाधक ठरतात. सर्व मांजरे सस्तन आहेत, फिफी ही मांजर आहे सबब फिफी सस्तन आहे; ही तर्कशुद्ध मांडणी झाली पण विधानांचा क्रम बदलला तर घोटाळे झालेच म्हणून समजा. सर्व मांजरे सस्तन आहेत, फिफीही सस्तन आहे सबब फिफी मांजर आहे! इथे घोटाळा आहे. फिफी ही कुत्री किंवा हरिणी ई. असू शकेल. अ ही घटना ब नंतर झाली म्हणून ती ब मुळेच झाली असं म्हणता येत नाही. हा ही एक महत्वाचा तर्क दोष. याला ‘पोस्ट हॉक इर्गो प्रोप्टर हॉक’, असं म्हणतात. पण एवढं अवघड कशाला, कावळा बसायला आणि फांदी मोडायला एकच गाठ, या म्हणीत हेच तर सुचवलं आहे! अज्ञान दोष असाही एक दोष आहे. ज्याअर्थी भूतबंगल्यातले आवाज का येतात ते आपल्याला कळलेले नाही, त्याअर्थी ते तर हडळीचे पैंजणच!! शिवाय मूळ मुद्याला बगल देऊन वैयक्तिक हल्ला करणे असाही प्रकार आहे. www.skepticsguide.comया संकेतस्थळावर टॉप ट्वेन्टी तर्कदोषांची यादीच आहे.
याचवेळी विलियम लंडन यांनी संख्याशास्त्रावर एक कार्यशाळा घेतली. अमुक आजारावर तमुक औषध लागू आहे हे सिद्ध करण्यासाठी संख्याशास्त्र कसे वापरले जाते याचा परिचय त्यांनी करून दिला. संख्याशास्त्रीय माहितीत छापलय काय यापेक्षा छुपवलय काय हे ही कसं महत्वाचं ठरतं हे त्यांनी सोदाहरण दाखवून दिलं.
ऍडम कोनोव्हर हा प्रसिद्ध विनोदवीर. दैनंदिन जीवनातल्या यडच्यापपणावर टवाळी करत तुटून पडणारा. ‘ऍडम रुइन्स एव्हरीथिंग’ (ऍडमपुढे नाद नाय!) हा त्याचा टीव्ही शो अत्यंत गाजलेला. सायंकाळच्या सत्रात ह्याने आपल्या खास शैलीत चक्क विज्ञान आणि वैज्ञानिकतेच्याच झकास फिरक्या घेतल्या. ह्या कार्यक्रमाचं नावच मुळी  ‘ऍडम रुइन्स स्केप्टीसिझम’ असं होतं.
एकूणच वैज्ञानिक विचाराचीही वैज्ञानिक चिकित्सा वेळोवेळी केली गेली. विज्ञान आणि छद्मविज्ञान यातील सीमारेषा पुसट आहेच. ही ठरवायची कशी याबद्दल उहापोह झाला. विज्ञानाची तत्वे इतिहास, तत्वज्ञान अशा मानव्य विषयांना तंतोतंत लागू होतात का? वैज्ञानिक विचारांचा अतिरेक ‘विज्ञानाचा इझम’ (Scientism) असा काही वैचारिक चकवा आहे का? विज्ञानाचे नेत्रदीपक यश हेच विज्ञान विचाराला माजोर्डेपणाकडे नेत नाही ना? अशा प्रश्नांची सखोल चर्चा झाली. काळाच्या ओघात ज्योतिषशास्त्राची जागा ज्योतीर्विद्येने घेतली, मंत्रोपचाराची जागा वैद्यकीने व्यापली, अल्केमिच्या जागी केमिस्ट्री आली; तसेच आजच्या गूढविद्यांची जागा उद्या विज्ञान घेईलच घेईल. आजच नीतीशास्त्राला नीती-मानसशास्त्र अधिक समजावून घेत आहे. ज्ञानशास्त्राला (Epistemology) जाणीवशास्त्र (Cognitive Science) कह्यात घेत आहे. तर पराभौतिकीला ब्रम्हांडविज्ञान (Cosmology).
जिम अल्कॉक या मानसतज्ञानी विश्वास आणि प्रोपोगंडा/प्रचार याची मानसशास्त्रीय बाजू उलगडून दाखवली. एखादी गोष्ट असत्य असल्याचं नंतर जरी सिद्ध झालं तरी आपलं मन मूळ समजुतीला सहजा सहजी तिलांजली देत नाही. मिळणारी प्रत्येक माहिती आपण पारखून घेऊ शकत नाही, तेंव्हा विश्वास हा घटक असतोच. म्हणून माहितीचा स्त्रोत किती खात्रीचा हे तपासणे आवश्यक असते. मात्र सध्याच्या माहिती युगात हे स्त्रोतच इतके प्रचंड वाढले आहेत की हे ही अशक्य व्हावं. पण ह्याच परिस्थितीचा फायदा उठवून स्त्रोतांच्या विश्वासार्हतेला तडा जाईल असं मुद्दाम केलं जातय. अशातुनच प्रोपोगांडा जन्माला येतो.
टिमोथी कोलफिल्ड यांनी सिनेस्टार, खेळाडू इत्यादींची मते सामान्यांना चटकन मान्य होतात, मग ह्यांना जाहिरातीसाठी घेऊन अत्यंत अशास्त्रीय, अनावश्यक आणि बाजारू चीजा, चुटकी सरशी सारं काही छापाची जीवनशैली आपल्या माथी मारली जाते; याचे विश्लेषण केले. Yvette D’Entremont अशा अशक्य उच्चाराच्या नाववाल्या बाईंनी फेक न्यूज कशी जाणावी हे सांगितलं. कार्ल झिमर हे त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकाबद्दल (शी हॅज हर मदर्स लाफ) बोलले. अनुवांशशास्त्र हे वेळोवेळी वांशिक आणि वर्ण वर्चस्व सिद्ध करायला कसं वापरलं गेलं याचा रोचक आढावा त्यांनी मांडला. जनुकांइतकीच आसपासची परिस्थिती आपल्याला घडवत असते हे त्यांनी उदाहरणासहित मांडले.
डॉ. जेन गुंटर ह्या एक स्त्री रोग तज्ञ बाई. ग्वेनेथ पालट्रो या प्रसिद्ध नटीने स्वतःची औषधकंपनी काढली. अगदी औषधकंपनी असं नाही म्हणता येणार, पण स्वतःची ‘लाईफ स्टाईल प्रॉडक्ट’ विकणारी कंपनी काढली आणि विकायला ठेवली योनीमार्गात बाळगण्याची जेडची (एक प्रकारचा दगड) अंडी!!! ही म्हणे प्राचीनं चीनी उपचार पद्धती. तिथल्या राण्या आणि अंगवस्त्रे ही योनीत बाळगत असत, त्यामुळे त्या सुडौल रहात! त्यांचे होर्मोन सुधारत!! सेक्स लाइफ सुधारे!!! शक्ती वाढे!!!!...कारण योनी हा म्हणे स्त्रीच्या चातुर्याचा, शक्तीचा , बुद्धीचा स्त्रोत आहे...!!!!! पालट्रो बाईंनी असे अनेक गुणधर्म या अंड्यांना चिकटवले होते. ही अंडी हातोहात खपू लागली. डॉ. जेननं या विरुद्ध ब्लॉग लिहिला. हे तथाकथित चीनी औषध खुद्द चीन मध्येही औषधाला सुद्धा सापडत नाही हे दाखवून दिलं. हे जेडाश्म घालून फिरल्याने म्हणे योनीच्या स्नायूंना व्यायाम होतो. डॉ जेनचा युक्तिवाद असा की व्यायाम होतो हे बरोबर पण दंडात बेटकुळी निघावी म्हणून तुम्ही दिवसभर हातात डम्बेल घेऊन फिरता काय? असले सच्छिद्र दगड योनीमार्गात बाळगल्याने उलट इन्फेक्शनची शक्यता वाढते हे त्यांनी सांगितलं आणि कंपनीचा खोटेपणा उघडा पाडला.
डॉ. पॉल ऑफिट हे अमेरिकेतील एक मान्यवर बालरोग तज्ञ, लसीकरणाचे तज्ञ. गोवराची लस देऊ नये हा प्रचार तिथे इतका टोकाला पोहोचला आहे की आता पुन्हा गोवराच्या साथी तिथे मुलांचे बळी घेत आहेत. तिथल्या लसीकरण विरोधी लोकांशी दोन हात करताना कसे नाकी नऊ येतात हे त्यांनी सोदाहरण दाखवून दिले. आता लसीकरणाच्या बाजूने एक मोठी जन शिक्षण मोहीम तिथे चालू आहे.  या मोहिमेतले आपले अनुभव त्यांनी कथन केले. वृत्तपत्रे संतुलित माहिती देण्याच्या भानगडीत चुकीची माहितीही हिरीरीने देतात. एकच बाजू बरोबर असताना दुसऱ्या बाजूलाही तितकेच महत्व देणे म्हणजे संतुलित वार्तांकन नव्हे. पण हे त्यांना कोण सांगणार? हा खरतर वृत्तपत्र संहितेचा भंग आहे. टीव्हीवरच्या चर्चामध्येही साधक चर्चेपेक्षा बाधक चर्चेत टीव्हीवाल्यांना रस असतो. टीआरपी त्यावर ठरतो. अशा चर्चेत एक पिडीत व्यक्ती, वाक्यावाक्याला डोळे पुसणाऱ्या बायकांचा हुकमी ऑडीयन्स आणि कोणी एक व्हिलन लागतो. मग तो व्हिलन कधी लसीकरण करा असं सांगणारा भला डॉक्टरही असू शकतो. तेंव्हा ‘सावधपणे माध्यमें तुच्छ केले’ असं धोरण हवं, असं त्यांनी आग्रहानी सांगितलं. माध्यमांना सामोरे जाताना स्वतःची कशी गोची झाली, विविध अँकरलोकांनी आपला कसा मामा बनवला आणि यातूनच आपण तेल लावलेले, कसलेले,  माध्यमपटू कसे झालो हे त्यांनी बहारदारपणे सांगितलं. विज्ञानाच्या बाजूनं बुलंदपणे उभं राहून भांडलेच पाहिजे. प्रत्येक आक्षेपाला तिथल्या तिथे सडेतोड उत्तर दिलेच पाहिजे. शास्त्रज्ञांची ही विशेष जबाबदारी आहे.
डॉ. ऑफिट याचं भाषण चक्क जेवणाच्या वेळी होतं. जेवताना सुद्धा मेले शांतपणे जेवू देत नव्हते. अर्धा तास झाला की कोपऱ्यातल्या स्टेजवरून चक्क व्याख्यान सुरु व्हायचं. अन्नकणाबरोबर ज्ञानकण वेचायला सुरवात. शनिवारी दुपारी खाशांची पंगत वेगळी होती. रिचर्ड डॉकिंस, स्टीफन फ्राय आणि जेम्स रँण्डी यांच्या पंगतीला बसायचं असेल तर वेगळे पैसे भरायचे होते. ते मला परवडण्यासारखे नव्हते तेंव्हा मी त्या वाटेला गेलो नाही. सुरवातीच्या चर्चेतील माझ्या बुद्धिवैभवाने दिपून डॉकिन्स साहेब आपणहून मला त्यांच्या पंगतीला चकटफू बोलावतील असं वाटलं होतं, पण तसं काही झालं नाही!
बर्था व्हाज्क्वेज या अमेरिकेतील जीवशास्त्र शिकवणाऱ्या शालेय शिक्षकांसाठी उत्क्रांती विषयक कार्यशाळा घेतात. उत्क्रांतीची संकल्पना कशी शिकवावी हे ह्या बाई शिकवतात. तिथे उत्क्रांतीला विरोध ही एक धार्मिक चळवळ आहे. अशांना राजकीय वरदहस्त आहे. तेंव्हा यांचे काम किती अवघड आहे आणि त्या मानाने या बाबतीत तरी भारतात आपण किती सुखी आहोत बघा. सत्यपालसिंहांचे एकच विधान त्यांना किती अडचणीचे ठरले.
अॅबी हाफर ह्या बाईंचे भाषणही अप्रतिम झाले. स्त्री आणि पुरुष असा द्विलिंगी भाव आपल्या मनात दाटून असतो. तीच जगाची रीत अशी आपली समज असते. ‘अधले मधले’ हे कुचेष्टेचे धनी, तेवढीच त्याची लायकी, असंही वाटत असतं. पण मुळात जीवशास्त्राचा नीट विचार केला, तर दोनच लिंग असतात हे असत्य आहे. ती दोन भिन्न जीवांमध्ये असतात हेही असत्य आहे. काही काळ नर आणि मग नारी रूप  घेणारे प्राणी आहेत, ह्या उलटही आहेत, एवढेच काय दोनच्या जागी सप्तलिंगी प्राणीही या भूतलावर आहेत; असे एकच्या एक शॉक त्या देत होत्या आणि लिंगभाव हा जणू मोठा पिसारा आहे हे आवर्जून सांगत होत्या. मानवात ह्या पिसाऱ्यात एका टोकाला नर आणि दुसऱ्या टोकाला मादी आहे पण अधेमधेही बरेच काही आहे. माणसं उंच असतात आणि बुटकीही असतात म्हणून अधलेमधले आपण बाद ठरवत नाही तद्वतच लिंगभावातही मधली स्थिती आपण स्वीकारायला हवी. ती ही तितकीच नैसर्गिक आहे, असा एकूण आशय. पुढारलेल्या अमेरिकेतही समलिंगी विद्वेष आहेच. होमोफोबिया असा शब्दही आहे. बाईंचे भाषण या साऱ्याला उद्देशून होतं. आपल्याकडे ३७७ कलम नुकतच रद्द झालं, झालं म्हणजे न्यायालयाने केलं. पण यातून समाजात समलिंगीविषयीचा रोष, भीती, फाजील कुतूहल आणि भेदभाव संपुष्टात आलेला नाही. कायद्याने यांना निव्वळ सरकारपासून संरक्षण दिलं आहे! कायदा ही एक पायरी फक्त. आता पोलिसी ससेमिरा संपेल पण समाजापासूनचा जाच काही कायद्याने संपणार नाही. तो मनं घासून पुसून लख्ख होतील तेव्हाच संपेल.
पण या सर्वात उन्नत करणारा अनुभव होता तो स्टीफन पिंकर यांना ऐकण्याचा. मानवी समाजाची उत्तरोत्तर प्रगती होत असून, विज्ञान, विवेक, मानवता, स्वातंत्र्य, समता, ही प्रबोधन युगातून आकारास आलेली मूल्ये आज कळीची ठरली आहेत. आयुष्य, आरोग्य, श्रीमंती, सुरक्षितता, शांतता, ज्ञान आणि जगण्यातील आनंद हे पश्चीमेतच नाही तर जगभर वर्धिष्णू होत आहेत. संपत्तीचे वाटप आजही विषम आहे आणि अजूनही कितीतरी काळ तसंच राहील पण आजचे संपत्तीचे वाटप हे पूर्वीपेक्षा अधिक समन्यायी आहे. ह्याचे एक कारण म्हणजे लोकसंख्या भूमितीय श्रेणीत वाढते तर संपत्ती गणितीय श्रेणीत हा माल्थसचा प्रसिद्ध सिद्धांत आज गैरलागू आहे! आज लोकसंख्या गणितीय श्रेणीने तर संपत्ती भूमितीय श्रेणीत वाढताना दिसते. युद्ध, रोगराई, उपासमार हे त्रि-‘काळ’ आता आटोक्यात आले आहेत. मानवजातीची शहाणीव वाढते आहे... असा भलताच वाटावा इतका आशावादी सूर यांनी लावला. पण या सुराला संवादी अशी आकडेवारीही सादर केली. पुराव्यावाचून एकही विधान केलं नाही. परिस्थिती उमेदीची, उत्साहाचीच नाही तर उत्सवाची आहे असं त्यांनी सांगितलं. हे काही कोणा जगन्नियंत्याच्या इच्छेने घडत नसून विज्ञान, विवेक आणि मानवतावादाची फलश्रुती आहे. ‘एनलाईटनमेंट नाऊ’ हे त्याचं पुस्तक जिज्ञासूंनी जरूर वाचावं. तुम्हाला आवडलं तर तुमचं आणि बिल गेट्सचं एकमत झालंय म्हणायचं, कारण बिल गेट्सलाही हे निखालस आवडलेलं पुस्तक आहे.
या परिषदेतील आणखी एक स्टार उपस्थिती म्हणजे जेम्स रँण्डी. हे या क्षेत्रातील पितामह. आता खोल गेलेले निळे, भेदक डोळे, कृश शरीरयष्टी, पांढरी भरदार दाढी आणि हातात मानवी कवटीच्या आकाराची मूठ असलेली काठी अशी खाशी वेशभूषा. जादूचे प्रयोग करता करता हा माणूस अतींद्रिय आणि परामानसिक शक्तींच्या दाव्यांचा शोध घेऊ लागला. अशा दाव्यांचे फोलपण सिद्ध करणारे अनेक कार्यक्रम त्यांनी केले. अनेक खटले लढवले. हार प्रहार दोन्ही झेलले. आज नव्वदीच्या घरात असलेला हा भला गृहस्थ चाकाच्या खुर्चीत बसून पूर्ण वेळ हजर होता. आतड्याच्या कँन्सरवर सध्या उपचार सुरु आहेत, केमो झालेली आहे, नुकताच  पक्षाघाताचा सौम्य झटका येऊन गेला आहे, पण उत्साह दुर्दम्य आहे. त्यांच्या सोबत काम करणाऱ्यांनी त्यांच्या सहवासातील आठवणी जागवल्या. पुढच्या वर्षी मी पुन्हा येईन आणि अधिक जोमानं सहभागी होईन असं सांगत खुद्द रँण्डींनी सर्वांचे आभार मानले.
रँण्डीं म्हटलं की पोपोफची आठवण ठरलेली. पीटर पोपोफ हा मंत्रशक्तीने रोग बरा करणारा पाद्री. गर्दीतल्या अनोळखी माणसाचा रोग कोणता, हे तो ओळखायचा, मंत्रशक्तीने तो तत्काळ बराही करायचा, लोकांना चाट पडायचा, येशू चरणी दाखल व्हायला लावायचा. अर्थात यात त्याचा अर्थ-वाटाही होताच. जेम्स रँण्डींनी मग एका कार्यक्रमात ह्याच्याकडून एका स्त्रीवेषधारी पुरुषाला गर्भाशयाच्या कँन्सरपासून मुक्ती देववली!! पोपोफची पत्नीच प्रेक्षकातल्या ‘बकऱ्या’ची खबर सूक्ष्म रेडीओद्वारे त्याला पोहोचवते असा गौप्यस्फोट रँण्डीनी पुराव्यानिशी केला. पोपोफला आपला गोरखधंदा बंद करून दिवाळं जाहीर करण्याची वेळ आली. पोपोफ भंगला पण संपला नाही. काही वर्षांनी त्यांनी ‘जादुई तीर्थ’ विकायला आणलं. पण अर्थात त्यात आता पहिली जादू उरली नव्हती.
युरि जेलर या परामानसतज्ञाने पश्चिमेत एके काळी उच्छाद मांडला होता. केवळ नजरेने चमचे वाकवण्याचा त्याचा खेळ चांगलाच गाजत होता. आपल्याकडे अतींद्रिय शक्ती असून त्यामुळेच हे शक्य होतं असा त्याचा दावा. भारतातही या युरी जेलरच्या बातम्यांनी तेंव्हाच्या ‘गहजब पत्रांची’ पानेच्या पाने भरत असत. या युरी जेलरला आव्हान दिले ते जेम्स रँण्डीनी. जे जे युरी जेलर करतो ते ते मी जाहीरपणे करून दाखवतो. हे सारे हातचलाखीचे खेळ आहेत, असं सांगत त्यांनी जेलरला आव्हान दिले. ते अर्थात त्याने कधीच स्वीकारले नाही. पण या भानगडीत दोघांनाही अमाप प्रसिद्धी मिळाली. जेलरच्या एका टीव्ही शोच्या वेळी रँण्डीच्याच सूचनेनुसार त्याला त्याची स्वतःची कोणतीही साधनसामुग्री घेऊ दिली नाही, ना कोणा सहायकाला सोबत घेऊ दिलं. आणि मग काय त्याची अतींद्रिय शक्ती कामच करेनाशी झाली. पार जाहीर छी थू व्हायची वेळ आली पण जहांबाज जेलर एवढ्याने नमला नाही. त्याच म्हणणं असं की कितीही झालं तरी अतींद्रिय शक्तीच ती, ती कधी वश असणार कधी नसणार, आपल्या इच्छेवर थोडंच काही आहे! नेमक्या वेळी मला काहीच करता आलं नाही याचाच अर्थ मी हातचलाखी करत नाही असा होतो. मी तर अस्सल अतिमानवी शक्तीवाला! आता बोला!!
जेम्स रँण्डी यांनी पुढे चमत्काराची भांडाफोड करण्याला जणू वाहून घेतलं. जो कोणी अतींद्रिय शक्तीचा दावा सिद्ध करेल त्याला एक कोटी डॉलरचं त्याचं बक्षीस अजूनही कोणी जिंकलेलं नाही. द अमेझिंग रँण्डी या नावाने त्यांनी वार्षिक अधिवेशने भरवायला सुरवात केली. शास्त्रज्ञ, जादुगार, नास्तिक अशा साऱ्या शंकेखोरांना इथे आमंत्रण होतं. वय आणि आजार पणा मुळे आता हे अधिवेशन त्यांनी ह्या कमिटीकडे सोपवलं आहे. दरवर्षी लास व्हेगसला हे अधिवेशन भरतं.
माझं भाषण होतं शेवटच्या दिवशी, शेवटच्या सत्रात. एकूण तीस पैकी अंतिमतः सहा  जणांची या सत्रासाठी निवड झाली होती. यात ब्राझीलमधे खुलेआम विकल्या जाणाऱ्या सर्व-कॅन्सर निर्दालक औषधाबद्दल नतालिया पास्टरनाक यांचा एक पेपर होता. एखाद्या गोष्टीला पेटंट मिळणे म्हणजे त्याला शास्त्रीय वैधता प्राप्त झाली असं नव्हे असं दाखवून देणारा आणि पेटंट  कायद्याचा वेध घेणारा रिक मॅक्लीड यांचा पेपर होता. स्टीफन हप यांनी पौगंडावस्थेतील समस्यांचा वेध घेतला. वाचन आणि संवाद हाच या वयातील मुलांपर्यंत पोहोचायचा सेतू आहे असं त्यांनी बजावलं. रॉब पाल्मर यांनी विकिपीडिया वरील थातूरमातुर गोष्टींशी सामना कसा करावा हे मांडलं, तर डेन्मार्कच्या एका जोडगळीनी मुळात मुलखावेगळ्या गोष्टींवर शहाणीसुरती माणसं विश्वासच का ठेवतात याचा शोध मांडला.
अंनिसच्या जादूटोणा विरोधी कायद्यासाठीच्या लढ्याची माहिती देण्याची संधी मला मिळाली. अंनिसची पार्श्वभूमी, कायद्याची गरज, त्यासाठीचा प्रदीर्घ लढा, डॉ. दाभोळकरांची हत्या आणि त्यानंतरच आलेला कायदा अशी मांडणी मी केली. डॉक्टरांच्या हत्येचा उल्लेख सगळ्यांनाच सुन्न करून गेला. कायदा झाल्यानंतरचे त्याचे  यश आणि अंनिसची पुढील वाटचाल याबद्दलही बोललो. पुढील वर्षी होणाऱ्या त्रीदशवार्षिक संमेलनासाठी सगळ्या उपस्थितांना मी निमंत्रण दिले आणि माझे भाषण संपवले. भाषणानंतर अनेकांनी या विषयात उत्सुकता दाखवली. अशा कायद्याची अमेरिकेलाही गरज आहे असं म्हणताच टाळ्यांचा गजर झालाच होता. कायद्याच्या बारा कलमांपैकी बरीचशी कलमे अमेरिकेतही तंतोतंत लागू करावीत अशीच आहेत, असं अनेकांचं म्हणणं होतं.
चार दिवसाची ही परिषद. या क्षेत्रातील दिग्गज मंडळींशी थेट संवाद साधण्याची, एका आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर अंनिसतर्फे बोलायची संधी मिळाली हे आनंदाचे आहे. श्री. अविनाश पाटील, डॉ. हमीद दाभोळकर, श्री. सुदेश घोडेराव, प.रा. आर्डे सर, राहुल थोरात आणि प्रशांत पोतदार यांनी केलेली मदत सार्थकी लागली.