Monday 26 March 2018

प्रकरण ६ कमी पिकवा पण उत्तम पिकवा ऋतूसमाप्तीची उत्क्रांती


प्रकरण ६
कमी पिकवा पण उत्तम पिकवा
ऋतूसमाप्तीची उत्क्रांती

जारेड डायमंड यांच्या, 'व्हाय सेक्स इज फन?'  या भन्नाट पुस्तकाचा भन्नाट भावानुवाद.


बहुतेक जंगली प्राणी मरेपर्यंत जननक्षम असतात, निदान अगदी उतार वय होईपर्यंत तरी असतातच असतात. पुरुषांचे तसेच आहे. काही पुरुषांची जनन क्षमता वाढत्या वयात अनेक कारणाने कमी होते, काहींची संपते, पण अमुक वयानंतर जननक्षमता संपणारच असा काही सर्वांसाठी नियम नसतो. अनेक वयस्कर पुरुषांना , अगदी चौऱ्याण्णवाव्या वर्षीही मुले झाल्याचा  खात्रीशीर पुरावा आहे.
स्त्रियांत मात्र चाळीशीनंतर जनन क्षमता अचानक मंदावते आणि पुढे दशकभरात ती  पूर्ण संपतेच. अगदी चोपन्न-पंचावन्नाव्या वर्षीही पाळी येत राहिल्याची उदाहरणे आहेत, पण पन्नाशीच्या पुढे मूल राहिल्याची घटना विरळा. आता आधुनिक तंत्रज्ञानाने संप्रेरके आणि कृत्रिम फलनाच्या सहाय्याने हे शक्य झाले आहे. अमेरिकेतील हुट्टेराईट समाजातील लोकं खाऊन पिऊन सुखी आणि कट्टर धार्मिक असतात. ह्यांचा गर्भनिरोधक साधनांना कडवा विरोध. ह्यांच्या बायकांना जैविकदृष्टया शक्य त्या काळात शक्य तेवढी मुले होतात. दोन मुलातील सरासरी अंतर असते दोन वर्षे आणि प्रत्येक बाईला सरासरी मुले होतात अकरा. एकोणपन्नाशीनंतर ह्याही बायका वांझ होतात.



सर्वसामान्यांच्या दृष्टीने पाळी जाणे, ऋतूसमाप्ती, हा आयुष्याचा एक अविभाज्य भाग, काहीसा तापदायक, काहीसा हुरहूर लावणारा. पण उत्क्रांतीतज्ञांच्या दृष्टीने मानवातील  ऋतूसमाप्ती हा प्राणी जगतातील एक अपवाद, एक बुचकळ्यात टाकणारी विसंगती. आपलीच जनुके वाहणारी अधिकाधिक संतती साध्य होऊ देतील, अशीच जनुके निसर्गतः निवडली जातात. अशीच संतती जगते, वाचते आणि वाढते. नैसर्गिक निवडीचे हे गाभ्याचे तत्व. मग एखाद्या प्रजातीतील प्रत्येक मादीची प्रजनन क्षमता संपवणारी जनुके, नैसर्गिक निवडीत टिकलीच कशी? सर्व जैविक गुणधर्मात काही जनुकीय उणे-अधिक असते. म्हणजे ऋतूसमाप्ती जरी सर्वच स्त्रियांत असली तरी ऋतूसमाप्तीचे नेमके वय कमी-अधिक असते. भले मनुष्यमात्रात एकदा ऋतूसमाप्ती उत्क्रांत झालीही असेल, पण मग हळू हळू हे वय लांबत जाऊन, हा प्रकार बंदच का नाही पडला? कारण पाळी टिकून राहील अशा महिलांना अधिक संतती होणार, मग त्यांचीही पाळी टिकून राहणार, मग त्यांनाही अधिक संतती होणार..... !
उत्क्रांतीतज्ञांसाठी स्त्रियांतील ऋतूसमाप्ती हे सर्वात गाढ गूढ आहेच, पण  मानवी लैंगिकतेत  ऋतूसमाप्ती हा सर्वात महत्वाचा घटक आहे. मोठा मेंदू आणि ताठ कणा (उत्क्रांतीच्या सर्व पुस्तकात ह्यावर भर असतोच); आपली  गुप्त बीजधारणा आणि निव्वळ सुखासाठी संभोग (पुस्तकात ह्यावर फारसा भर नसतो); या बरोबरच स्त्रीचे होणारे प्रजनन-हनन हाही खास मानवी गुणधर्म. माणसाला कपिंपेक्षा गुणात्मकदृष्टया निराळा, खास माणूस बनवणारा, गुणधर्म.
......


अनेक जीवशास्त्रज्ञ माझ्या ह्या विधानाशी अडखळतील. म्हणतील ऋतूसमाप्तीत न उलगडलेले असे काहीच नाही सबब पुढे चर्चाच नको. त्यांचे आक्षेप साधरण तीन प्रकारचे असतात.
पहिला आक्षेप असा की, ऋतूसमाप्ती हा केवळ वाढत्या मानवी आयुर्मानाचा परिणाम आहे. मागील शतकातील सार्वजनिक आरोग्याची धोरणे वाढत्या आयुर्मानासाठी कारणीभूत आहेत.  दहा हजार वर्षापूर्वीचा  शेतीचा शोधही यासाठी कारणीभूत आहे. उत्क्रांतीच्या ओघात, गेल्या चाळीस हजार वर्षात, माणसाने आत्मसात केलेली जगण्याची आणि तगण्याची कौशल्येही ह्याला कारणीभूत आहेत. ह्या मतानुसार कोट्यवधी वर्षाच्या उत्क्रांती दरम्यान, ‘पाळी गेलेली बाई’ असा काही प्रकारच नव्हता. कारण चाळीशीच्यावर कुणी बाई (वा पुरुष) फारसे जगतच नसत. अर्थातच चाळीशीनंतर ‘काम’काजच नसल्याने स्त्री प्रजनन यंत्रणा चाळीशीतच आपले कार्य आटोपते घेत असे. तसा संदेश (Programmed) जनुकांमध्येच अनुस्यूत झाला. आयुर्मान वाढले ते अगदी अलीकडे. इतके अलीकडे, की वाढत्या आयुर्मानानुसार बदलायला स्त्री प्रजनन संस्थेला अवधीच मिळालेला नाही.
ह्यातली त्रुटी अशी, की पुरुषांची प्रजनन संस्था आणि स्त्री-पुरुषांच्या इतरही सर्व जैविक क्रिया ह्या चाळीशीनंतर कित्येकांत कित्येक दशके कार्यरत रहातात; हे तथ्य इथे दुर्लक्षिले गेले आहे. म्हणजे या इतर सर्व कार्यांनी आपल्या वाढलेल्या आयुर्मानाशी जुळवून घेतले असे गृहीत धरावे लागेल. मग केवळ स्त्री प्रजनन संस्थाच मागे का हे कोडे राहतेच.


पूर्वी पाळी जायच्या वयापर्यंत फारशा स्त्रिया जगतच नसत ह्याचा पुरावा म्हणजे प्राचीन सांगाडयाच्या अभ्यासातून काढलेले त्या व्यक्तीचे मृत्यूसमयीचे वय. हे अंदाज सिद्ध न झालेल्या, काही अशक्य गृहीतकांवर बेतलेले आहेत. उदाः मिळालेला सांगाडा हा त्या काळातल्या तमाम जनतेचा प्रातिनिधिक नमुना आहे किंवा आपण काढतो ते वय अगदी बिनचूक आहे. त्यातही दहा वर्षाच्या मुलीचा सांगाडा आणि पंचविशीतल्या मुलीचा सांगाडा वेगळा ओळखता येतो यात शंकाच नाही. पण चाळीस आणि पंचावन्न वर्षाच्या व्यक्तींचे प्राचीन सांगाडे वेगवेगळे ओळखता येतात याचा पडताळा कोणी दिलेला नाही. प्राचीन आणि अर्वाचीन  सांगाड्यांची तुलनाही अशक्य आहे. आजची आपली जीवनशैली, आहार आणि आजार पूर्वीपेक्षा इतके वेगळे आहेत, की आपली हाडे ही आपल्या पूर्वजांच्या हाडांपेक्षा भिन्न वेगाने बदलतात.
  दुसरा आक्षेप असा की ऋतूनिवृत्ती ही प्राचीनच आहे, पण खास माणसातच आहे असे नाही. बऱ्याच नव्हे तर बहुतेक प्राण्यांची जननक्षमता वाढत्या वयाबरोबर ओसरते. काही सस्तन प्राणी आणि पक्षी वार्धक्यात वांझ झाल्याचे, अनेक प्रजातीत दिसते. प्रयोगशाळांत किंवा प्राणीसंग्रहालयात  राखलेल्या ऱ्हीसस मकाक्वे माकडीणी आणि उंदरीणींचे आयुर्मान त्यांच्या उघड्यावरच्या प्रजेपेक्षा बरेच जास्त असते. उत्तम अन्नपाणी, उत्तमोत्तम औषधपाणी आणि शत्रू नाही कोणी, अशा सुरक्षित वातावरणात आयुर्मान वाढतेच. वय वाढले की जनन क्षमता संपते. त्यामुळे काहींचा आक्षेप असा की हा प्रकार अन्य प्राण्यांत दिसतो तसाच मानव माद्यात दिसतो. कारण काहीही का असेना, इतर प्रजातीतही हे असेच असेल, तर माणसांत काही खास आहे आणि त्याचे काही वेगळे कारण शोधायला हवे असे काही नाही.


पण सुतावरून स्वर्ग गाठण्याची काही गरज नाही. प्राण्यांतही ऋतूसमाप्ती असते असे म्हणायला एखाद्या वयस्कर वांझ मादीचे उदाहरण पुरेसे नाही. पिंजाराबंद प्राण्यांतील प्रौढत्व  कृत्रिम असते. तेंव्हा त्यांच्यातली ऋतूसमाप्तीचे दाखले, ऋतूसमाप्ती सजीव विश्वातील नित्याची रीत आहे, असे दाखवण्यास अपुरे आहेत. ह्यासाठी मुक्त प्राणी-प्रजेतील बऱ्याचशा प्रौढ माद्या वयपरत्वे वांझ होतात आणि पुढे आयुष्याचा बराच काळ असा अ-जननक्षम अवस्थेत घालवतात असे सिद्ध व्हायला हवे.
माणूस नावाचा प्राणी हा निकष पूर्ण करतो पण इतर एखाद दुसऱ्याच प्रजातीत हा प्रकार दिसतो. अशी एक प्रजाती आहे ऑस्ट्रेलियन पिशवीधारी उंदरांची. ह्यातील माद्यांत नव्हे तर  नरांत ‘ऋतूनिवृत्ती’ दिसते. ऑगस्टच्या सुमारास त्यांना जनन-हताशा येते (ते वांझ होतात) आणि पुढे `काही आठवड्यात ते मरतात. प्रजेत उरतात त्या फक्त गर्भार माद्या. ह्या उंदीरमामांचे एकदा जनन-हनन झाल्यावर हे फारच अल्पकाळ जगतात. तेंव्हा हे उंदीर म्हणजे काही खरीखुरी ‘ऋतूनिवृत्ती’ नव्हे. हे तर धमाकेदार पुनरुत्पादनाचे (Semelparity, Bigbang reproduction) उत्तम उदाहरण. आयुष्यात एकदाच सर्व शक्तीनिशी पुनरुत्पादन, की पुढे लवकरच वंध्यत्व आणि मृत्यू. सालमन माशांत आणि सेंच्युरी वृक्षातही हे असे असते. प्राण्यांतील


ऋतूसमाप्तीचे चांगले उदाहरण म्हणजे, पायलट व्हेल मासे. ह्यांच्या माद्यातील बीजग्रंथी तपासल्या तर असे दिसते, की मच्छीमारांनी मारलेल्या एक चतुर्थांश माद्या, ऋतूनिवृत्त असतात. तिशी-चाळीशीच्या दरम्यान त्यांना ऋतूसमाप्ती होते आणि त्या पुढे सरासरी चौदा वर्षे जगतात. काही तर साठीही गाठतात.
ऋतूसमाप्तीच्या बाबतीत माणूस काही एकमेवाद्वितीय नाही. निदान एका तरी व्हेल प्रजातीत ऋतूसमाप्ती दिसते. व्हेलच्या इतर प्रजातीत आणि अन्य प्राण्यांतही अजून शोध घ्यायला हवा. अन्य दीर्घायुषी सस्तन प्रजातीत, वयस्कर पण जननक्षम प्रौढा सर्रास आढळतात. ह्या बाबतीत चिंपांझी, गोरिला, बबून आणि हत्तींचा सखोल अभ्यास झाला आहे. ह्या आणि इतर बहुतेक प्रजातीत ऋतूसमाप्ती हा प्रकार नसतो. उदाहरणार्थ पन्नाशीची हत्तीण ही वयस्करच म्हणायची, कारण पाच टक्के हत्तीच हे वय गाठतात. हिची प्रजनन क्षमता, तरण्याताठ्या हत्तीणीच्या निम्याने कमी असते,  पण असते; संपलेली नसते.
थोडक्यात स्त्रीयांत पाळी जाणे हा प्रकार, इतर  चार प्राण्यांपेक्षा पुरेसा आगळा आहे. माणसातील ह्या गुणाच्या उत्क्रांतीचा शोध घेतलाच पाहिजे. हा काही आपल्याला पायलट व्हेलकडून आलेला वारसा नाही. त्यांचे आणि आपले समान पूर्वज पन्नास कोटी वर्षापूर्वीच विभक्त झाले. शक्यता अशी आहे की सात कोटी वर्षापूर्वी आपले आणि चिंपांझी-गोरीलाचे पूर्वज वेगळे झाले, त्यानंतर हा प्रकार उत्क्रांत झाला असावा; कारण माणसात ऋतूसमाप्ती असते आणि चिंपांझी-गोरीलात नसते (नेहमी तरी नसते).


तिसरा आणि शेवटचा आक्षेप म्हणजे, ऋतूसमाप्ती प्राचीन आहे पण क्वचित उद्भवणारा प्रकार आहे. ह्या टीकाकारांचे म्हणणे असे की आता उत्तर शोधायची गरजच नाही, ऋतूसमाप्तीचे कोडे सुटल्यात जमा आहे. स्त्रीच्या शरीरात जन्मतः बीजांचा काही साठा असतो. ह्यात वयपरत्वे फक्त घट होत जाते, नव्याने बीजनिर्मिती होत नाही. आहे त्यातील दरमहा  एक बीज पिकते आणि फलनासाठी उपलब्ध होते. इतर अनेक तशीच वाळून जातात (Atresia). पन्नाशीपर्यंत बराचसा बीज-साठा संपून जातो. उरला सुरला माल आता अर्धशतकभर जुना असतो. इतकी मोजकी बीजे उरतात, की पिट्युटरी ग्रंथींच्या स्त्रावांना ते प्रतीसादही देत नाहीत (पिट्युटरी स्र्तावांमुळे बीज पिकायला लागते)  की पिट्युटरीला साद ही देत नाहीत (आम्ही पिकतोय असा संदेश बीजांकडून आला की पिट्युटरीचे स्त्राव वाढतात). परिणामी पाळी जाते.
पण ह्या आक्षेपालाही  एक आक्षेप आहे. तो चुकीचा नाहीये पण अपुरा आहे. बीज संपून जाणे हा ऋतूसमाप्तीचे तात्कालिक कारण आहेच, पण मग मुळात चाळीशीतच संपू लागतील इतकी कमी बीजसंख्या का उत्क्रांत झाली? दुप्पट साठा का उत्क्रांत झाला नाही? किंवा ही बीजे दुप्पट काळ टिकतील, अशी का उत्क्रांत झाली नाहीत? हत्तीणीत, बलीन व्हेल मादीत आणि अलबॅट्रॉस पक्षीणीत बीजे चांगली साठीपर्यंत टिकतात. कासवीत तर आणखी कितीतरी दीर्घ काळ टिकतात. मग माणसाच्या माद्यांनीच असे काय घोडे मारलय?


हा तिसरा आक्षेप अपुरा आहे कारण ‘तात्कालिक कारण’ आणि ‘अंतिम कारण’ याची इथे गफलत झालेली आहे. (तात्कालिक कारण म्हणजे ज्याच्या लगेचच्या परिणामांमुळे एखादी गोष्ट घडते. अंतिम कारण म्हणजे लांबचलांब कार्यकारण साखळीचे अखेरचे टोक. उदाहरणार्थ बायकोची भानगड लक्षात आल्यामुळे नवरोबा तिला सोडून देतात हे तात्कालिक कारण झाले, पण नवऱ्याची असंवेदनशीलता आणि दोघांचे कोणत्याच आवडीनिवडी न जुळणे, ह्यामुळे ती बाई परपुरुषाकडे आकृष्ट झाली असेल, हे झाले अंतिम कारण.) शरीरक्रिया-शास्त्रज्ञ आणि रेण्वीय जीवशास्त्रज्ञ ह्या सापळ्यात नेहमी सापडतात. पण जीवशास्त्र, इतिहास आणि मानवी वर्तनाचा अन्वय लावण्यासाठी ह्या दोन कारणातील भेद लक्षात घेणे जरूरीचे आहे. शरीरक्रिया-शास्त्र आणि रेण्वीय जीवशास्त्र हे निव्वळ तात्कालिक कारणे दाखवून देऊ शकतात. औत्क्रांतिक जीवशास्त्र मात्र अंतिम कारण स्पष्ट करते. एक साधेसेच उदाहरण म्हणजे विषारी बेडूक. हे विषारी असतात याचे तात्कालिक कारण म्हणजे त्यांच्या शरीरात  बाट्राकॉटॉक्सीन हे जहाल विष स्रवत असते. रेण्वीय जीवशास्त्राने शोधलेले या विषाचे नेमके नाव हा खरेतर अप्रस्तुत भाग. हेच का, कोणतेही जहर चालले असते. पण ह्या इवल्याशा, असहाय्य जीवात असे काही संरक्षणाचे साधन उत्क्रांत झाले नसते, तर तो सहजच कुणाचे सावज झाला असता; या साधनाशिवाय तो जगूच शकला नसता, हे झाले अंतिम कारण.


आपण ह्या पुस्तकात वारंवार पहिले आहे की मानवी लैंगिकतेबाबतचे गहन प्रश्न हे औत्क्रांतिक प्रश्न आहेत, अंतिम कारणाबाबत आहेत, तात्कालिक स्पष्टीकरणाबद्दल नाहीत. मैथुन मौजेचे होते कारण बायकांना छुपी बीज धारणा होते आणि त्या सतत कामासक्त असतात. पण हा जगावेगळा कामाचार मुळात उत्क्रांतच का झाला?  पुरुषांना दुग्धग्रंथी असूनही ह्या  क्षमतेचा वापर का उत्क्रांत झाला नाही? हेच ऋतूसमाप्तीबाबतही; पन्नाशी पर्यंत स्त्रीतील बीजे संपुष्टात येतात हे तर अगदी वरवरचे कारण झाले. स्वतःचेच ‘जनन-हरण’ करणारी अशी शरीरयंत्रणा  उत्क्रांत कशी झाली, हे समजावून घेणे हे खरे आव्हान आहे.
.....
स्त्रीजननेंद्रीयांचे वार्धक्य हे एकूणच इतर अवयवांच्या वार्धक्यासोबतच तपासले पाहिजे. आपले डोळे, मूत्रपिंडे (किडनी), हृद्य असे सर्वच अवयव म्हातारे होतात. चार पावसाळे झाले की अवयव जराजर्जर व्हावेत हे काही सर्वच प्राण्यांचे अटळ भागधेय नाही. निदान इतक्या वेगाने निकामी व्हावेत हे तर नाहीच नाही. कासवे, शिंपले यांचे अवयव तर आपल्या पेक्षा कितीतरी जास्त वर्ष बिनबोभाट काम करतात.


शरीरशास्त्राचे अभ्यासक वार्धक्यासाठी एकचएक सर्वसमावेशक कार्यकारणभाव शोधत आहेत. गेल्या काही दशकात चलती आहे, प्रतिकारशक्तीशी निगडीत कारणांची. शिवाय फ्री रॅडीकल, संप्रेरके आणि पेशी विभाजनाच्या दिशेनेही विचार जारी आहे. प्रत्यक्षात मात्र एकदा चाळीशी उलटली की, निव्वळ प्रतिकारशक्ती किंवा फ्री रॅडीकल विरुद्धची यंत्रणाच नाही, तर  हळूहळू सगळेच अवयव मंदावतात, हा सर्वांचाच अनुभव आहे. जरी जगातल्या सहा अब्ज लोकांपेक्षा माझे आयुष्य निवांत आहे आणि मला औषधोपचारही उत्तम मिळतात, तरी मलाही आता साठीत वार्धक्याने गाठले आहेच. ऐकायला थोडे कमी येते. जवळचे दिसत नाही. नाक  आणि जीभ पूर्वीइतकी तेज नाही. एक किडनी बाद आहे. दात झिजले आहेत. हात आखडले आहेत. कुठे लागले-बिगले तर पूर्वीपेक्षा जखमा भरून यायला वेळ खूप लागतो. सारखेच पोटऱ्या दुखायला लागल्यामुळे आता पळणे मी सोडून दिले आहे. नुकतेच कोपराला लागले होते त्यातून मी बऱ्याच काळाने बरा झालो आणि आता बोटाला दुखापत झाली आहे. पुढच्यांना लागलेल्या अनेक ठेचा आता माझ्याही वाट्याला येणार आहेत यात शंकाच नाही. हृदयविकार, बंद रक्तवाहीन्या, लघवीच्या, प्रोस्टेटच्या, गुडघ्याच्या तक्रारी, विस्मरण, कँन्सर...! वार्ध्यक्य म्हणजे अशी सगळी पडझड आहे.
ह्या कंटाळवाण्या वार्धक्यामागचे मूळ कारण समजावून घ्यायचे तर माणसाने निर्मिलेल्या वस्तूंशी तुलना करून पहाता येईल. यंत्राप्रमाणे माणसाच्या शरीराचीही कालांतराने झीज होते. कधी कधी अचनक काही बिघाड होतो. हे होऊ नये म्हणून मशीनची सातत्याने देखभाल करावी लागते. नैसर्गिक निवडीमुळे शरीराची देखभाल आणि दुरुस्ती आपल्या नकळत चालू राहील हे बघितले जाते.


यंत्रांची आणि शरीराची देखभाल दोन प्रकारे होत असते. बिघडलेला भाग दुरुस्त करणे हा एक प्रकार. उदाः गाडीचे पंक्चर काढणे किंवा खूपच खराब असतील तर टायर  किंवा ब्रेक वगैरे बदलणे. आपले शरीरही अशाच प्रकारे बिघाड झाला, की तातडीचे उपाय योजत असते. कुठे कापले तर ती जखम भरून येते हा तर नेहेमीचा अनुभव. पण आपल्या नकळत, अगदी रेण्वीय स्तरावरही, डी.एन.ए.ची दुरुस्ती चालू असते. अनंत हस्ते काम करणारा देखभाल विभाग कायमच कार्यरत असतो.  टायर जसा नवीन बसवता येतो तसेच लिव्हर, किडनी आतडी वगैरेंचा काही भाग नव्याने घडू शकतो (Regeneration). ह्या नवनिर्मितीच्या कामी आपल्यापेक्षा इतर अनेक प्राणी तरबेज आहेत. तारामासा, खेकडे, समुद्र काकडी किंवा पालीत अनुक्रमे हात, पाय, आतडी किंवा शेपूट पुन्हा उगवते. आपणास ही सिद्धी प्राप्त असती तर!
देखभालीचा दुसरा प्रकार म्हणजे, काही मोठा बिघाड व्हायची वाट न बघता सतत आणि आपोआप होणारी बारीक सारीक झीजेची,  मोडतोडीची डागडुजी. उदाः ठरल्या वेळी आपण गाडीचे ऑईल, स्पार्कप्लग, फॅनबेल्ट आणि बॉल बेअरिंग बदलुन टाकतो. तसेच आपल्याला, केस नवीन उगवतात, दर काही दिवसाने आतड्याचे अस्तर बदलेले असते आणि लाल पेशींचे आयुष्य  काही महिने असते, त्यानंतर नव्या लाल पेशी आधीच्यांची जागा घेतात. दात मात्र आयुष्यात एकदाच बदलले जातात. एवढेच काय आपल्या शरीरातील प्रथीनांचा प्रत्येक रेणू हा अदृश्यपणे बदलला जात असतो.


गाडीची देखभाल किती निगुतीने केली आहे, किती खर्च केला आहे, यावर ती किती काळ धावणार हे ठरते. असेच काहीसे आपल्या शरीराबाबतही आहे. नियमित व्यायाम, नियमित वैद्यकीय तपासणी हा जाणीवपूर्वक पार पडलेला भागच नाही तर अदृश्य डागडुजीही महत्वाची. त्वचा काय, किडनी काय किंवा प्रथिने काय, नव्याने घडवायला खूपच जैव-निर्मिक उर्जा लागते (Bio Synthetic Energy). प्राणी प्रजातींनी अशा देखभालीत केलेल्या गुंतवणुकीत खूप तफावत आहे. म्हणूनच त्यांच्या जराजर्जर होण्याच्या वेगातही फरक आहे. अगदी शतकोत्तर जगणारी कासवे आहेत. प्रयोगशाळेतल्या पिंजऱ्यातले उंदीर खाऊनपिऊन सुखी असतात, ना शिकार होण्याचा धोका, ना काही. जनावरांपेक्षाच नाही, तर बहुसंख्य माणसांपेक्षाही त्यांना उत्तम औषधोपचार मिळतात. म्हातारे, गलितगात्र होऊन होऊन ते तिसऱ्या वर्षाच्या आत मरतात. माणसात आणि आपले जवळचे नातेवाईक, कपींतही सर्वांना  वार्धक्य वेगवेगळ्या वेळी गाठते.  सुपोषित, डॉक्टरच्या नजरेखालचे, प्राणीसंग्रहालयातल्या सुरक्षित पिंजऱ्यातले कपी, कशीबशी  साठी  गाठतात. मात्र अमेरिकन गोरे ह्या कपींपेक्षा धोक्याचे आयुष्य जगतात, औषधोपचारही कमी मिळतात, पण पुरुष जगतात अठ्याहत्तर वर्षे आणि बायका त्र्याऐंशी वर्षे.  एपच्या शरीरापेक्षा आपले शरीर कार्यक्षम का? आणि मूषकाशी तुलना करता कासवे कूर्मगतीने म्हातारी  का होतात?


बिघडलेला प्रत्येक अवयव आपण दुरुस्त करत किंवा बदलत सुटलो तर वार्धक्यावर मात करून चिरंजीव होऊ आपण. गुडघे दुखले की खेकड्यांसारखे नवे पाय बनवायचे. वेळोवेळी  ‘हृदय परिवर्तन’ करायचे, ह्त्तींसारखे, आयुष्यात पाच वेळा तरी नवे दात उगवतील असे बघायचे. काही प्राणी, काही भाग तंदुरुस्त ठेवण्यात बरेच लक्ष घालतात, पण कोणीच सर्व अवयवांकडे एकसाथ लक्ष दिलेले नाही आणि वार्धक्य कुणाला चुकलेले नाही.
पुन्हा एकदा गाड्यांच्या उदाहरणाने मुद्दा स्पष्ट व्हावा; देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च हा कळीचा मुद्दा. बहुतेकांकडे पैसे मर्यादित असतात, ते काटकसरीने वापरावे लागतात. जो पर्यंत गाडी दुरुस्त करून करून वापरत राहण्यात आर्थिक शहाणपणा आहे तोवरच आपण त्यात पैसा ओततो. दुरुस्तीचेच बील अवाच्यासव्वा यायला लागले की ती गाडी बाद करून आपण नवी गाडी घेतो. तद्वतच आपल्या जनुकांसमोर शरीर दुरुस्त करत रहाणे किंवा जनुके नव्या शरीरात संक्रमित करणे (मुले होणे) असे दोन पर्याय असतात. गाड्यांच्या किंवा शरीराच्या दुरुस्तीसाठी क्षमता वापरली,  तर नवी गाडी घ्यायला किंवा प्रजननासाठी विशेष काही उरत नाही. त्यामुळे उंदरांसारखे  दुरुस्तीचे सस्त्यात भागत असेल आणि आयुष्य लहानखुरे असेल, तर भारंभार पिल्ले होतात. नाही तर आपण, दुरुस्तीही महागडी आणि आयुष्ये लांबलचक. प्रजननाच्या दृष्टीने आपण उंदरांच्या पासंगालाही पुरणार नाही. दोन वर्षाच्या वितभर आयुष्यात, उंदरी दर दोन महीन्याला विते आणि दरवेळी  तिला पाच पिल्ले होतात.


म्हणजेच नैसर्गिक निवडीतून पुनर्घटन (देखभाल/दुरुस्ती) आणि पुनरुत्पादन यांच्यात तोल साधला जातो, अधिकाधिक जनुके पुढे संक्रमित होतील असे संतुलन साधले जाते. हा संतुलन-बिंदू निरनिराळ्या प्रजातीत निरनिराळा असतो. काहींत दुरुस्तीच्या नावाने आनंदच असतो, त्यामुळे अशा अल्पायुषी प्राण्यात, गात्रे गलित होण्याआधीच, भराभ्भर, भारंभार पिल्ले निर्मिली जातात आणि देह ठेवला जातो. आपल्यासारख्या इतर प्रजाती देखभालीवर दाबून खर्च करतात, शतकभर जगतात आणि या काळात सुमारे डझनभर मुले ‘पिकवू’ शकतात (उदाः हुट्टेराईट बायका). रक्तपिपासू सम्राट मौले सारख्याला हजारभर पोरे होऊ शकतात. पण पोरे पिकवण्याचे  तुमचे (आणि मौलेचेही) कर्तृत्व उंदरांपुढे खूपच खुजे आहे.
.....
‘अपघात आणि अपमृत्यूची जोखीम किती?’, ह्यावर दुरुस्तीतील जैविक गुंतवणुक ठरत असते. हा एक महत्वाचा औत्क्रांतिक निर्देशक आहे. जीवन अगदी निर्विघ्न असतानाचे आयुर्मानही, दुरुस्तीतील जैविक गुंतवणुकीवर ठरत असते. तुम्ही तेहरानमधे टॅक्सी ड्रायव्हर असाल तर महिन्यात एखादा अपघात ठरलेला. मग उगीच पोचे काढायला कशाला पैसे खर्च करा. त्यापेक्षा पैसे साठवून लवकरच नवी टॅक्सी घेतलेली परवडली. असेच सजीवांचे देखील आहे. ज्यांच्या आयुष्यात जिवावरची जोखीम जास्त असे प्राणी देखभाल दुरुस्तीवर खर्च करत बसत नाहीत. पिंजराबंद सुरक्षित वातावरणातही ते लवकर म्हातारे होतात आणि लवकरच जगाचा निरोप घेतात. उघड्यावर उंदरांना शत्रू फार तेंव्हा ‘डागडुजीत कमीतकमी गुंतवणूक करावी’,  हेच यांचे औत्क्रांतिक फर्मान (Evolutionarily Programmed). ‘लवकरच जराजर्जर होऊन डोळे मिटावेत’ हे त्यातील पुढचे कलम. ह्याच आकाराचे पिंजाराबंद पक्षी मात्र दीर्घायुषी असतात, कारण एरवी ते भुर्रकन उडून आपला बचाव करू शकतात. इतर सरपटणाऱ्या प्राण्यांपेक्षा, टणक कवचाचे संरक्षण असलेली कासवे कूर्मगतीने झिजत जातात आणि त्याच आकाराच्या सस्तन प्राण्यांपेक्षा काटेरी संरक्षण असलेले साळिंदर सावकाश म्हातारे होते.


हे नियम आपल्याला आणि आपल्या कपीबांधवांनाही लागू आहेत. प्राचीन माणूस जमिनीवर रहायला लागला. अणकुचीदार काठ्या आणि विस्तव एवढीच त्याची संरक्षण सामुग्री. कपिंसारखे झाडावरून पडण्याचा किंवा तिथेच कुणाचे भक्ष्य होण्याचा धोका आता टळला. ह्यामुळे ‘काळ’ थोडा आळसावला, आयुष्य थोडे लांबले. अन्न, औषधे आणि ऐषोआराम आयते मिळणाऱ्या पिंजराबंद कपिंपेक्षा आपण दशकभर तरी जास्त जगतो. सात कोटी वर्षापूर्वी आपली आणि कपिंची फारकत झाली. आपण झाडावरून खाली आलो, आपले पाय जमिनीवर ठरले. हाती लाठ्याकाठ्या, दगडधोंडे आले आणि अग्नी आला. गेल्या सात कोटी वर्षांच्या उत्क्रांती-ओघात आपल्याला शरीर-दुरुस्ती उत्तमप्रकारे अवगत झाली आणि वार्धक्य आणखी संथावले, आपण कपिंपेक्षा जास्त जगू लागलो.
हाच नियम वार्धक्यातील पडझडीला लागू आहे. वय वाढले की एकेक अवयव दगा देऊ लागतात हा तर सार्वत्रिक अनुभव. कटूसत्य हे, की खर्च आणि कार्यक्षमतेचा निसर्गाचा ताळेबंद चोख असतो. सारेच अवयव एकसाथ साथ सोडतील ह्यालाच म्हणायचे उत्तम डिझाईन. बाकी अवयव कोमेजत असताना एखादाच अवयव टवटवीत राखणे हा शक्तीचा अपव्यय आहे. बाकीच्यांची साथ नसेल तर हा एकच कार्यकुशल अवयव आयुष्यभर पुरून उरला, तरी उपयोग काय? तेवढी उर्जा प्रजोत्पाद्नासाठी देता आली तर त्यात अधिक फायदा आहे.
हेच तत्व मानवनिर्मित यंत्रांनाही लागू आहे. स्वस्त आणि मस्त गाड्या बनवणाऱ्या हेन्री फोर्डची एक गोष्ट सांगतात. एके दिवशी त्याने आपल्या काही कर्मचाऱ्यांना भंगाराच्या गोदामात जाऊन तिथल्या फोर्ड कंपनीच्याच ‘मॉडेल टी’ गाड्यांचे उरलेसुरले पार्टस तपासायला सांगितले. परत येऊन मोठ्या नाराजीने ते सांगू लागले की, शिल्लक साऱ्याच भागांची खूप झीज झाली होती, पण त्यातल्या त्यात  किंगपीन मात्र अगदी नव्यासारखी टिकली होती, एवढाच काय तो दिलासा. पण उत्तम घडलेल्या या किंगपिनबद्दल अभिमान वाटण्याऐवजी फोर्ड हळहळला आणि इथून पुढे उगीचच अति-टिकावू, मजबूत पिन्स बनवण्याऐवजी साध्याशा, स्वस्त पिन्स बनवण्याचे त्यानी आदेश दिले.
नैसर्गिक निवडीतून उत्क्रांत झालेले आपल्या शरीराच्या डिझाईनला फोर्डचे हे तत्व तंतोतंत लागू आहे. फक्त एक अपवाद, माणसाचे सर्वच अवयव जवळपास एकसमयावच्छेदे बाद होतात. पुरुषांच्या जनन संस्थेलाही हे तत्व लागू आहे. इथे अचानक बंद होणे नाही. पण हळूहळू कटकटी वाढत जातात. व्यक्तीगणिक कमीअधिक प्रमाणात प्रोस्टेट वाढते, पुंबीजाची संख्या घटते. हेच तत्व प्राण्यांनाही लागू आहे. जंगलात पकडलेल्या प्राण्यांत वार्धक्याच्या खुणा आढळत नाहीत, कारण ‘जरा’ यायच्या आत ‘मरणा’ने गाठलेले असते. शरीर थोडे जरी थकले तरी अपघातात किंवा भक्षकाकरवी मरण ठरलेले. प्रयोगशाळेतल्या किंवा प्राणीसंग्रहालयातल्या पिंजऱ्यात मात्र आपल्यासारखेच प्राणीही कणाकणाने  म्हातारे होतात, सगळे अवयव निकामी होत जातात.


हे अशुभवर्तमान नर-मादी दोघांच्याही जननेंद्रियांना लागू आहे. ऱ्हीसस मकाक्वेच्या माद्यांची बीजे तिशीत संपतात. वयस्कर सशांत फलन होणे दुरापास्त असते. वयस्क हॅमस्टर, उंदीर आणि सशांची, बरीच बीजे सदोष असतात. म्हाताऱ्या हॅमस्टर आणि म्हाताऱ्या सशांत फलित बीजे चांगली रुजत नाहीत. हॅमस्टर, उंदीर आणि सशांची गर्भाशये थकतात, त्यांना वारंवार गर्भपात होतात. माद्यांची जननसंस्था म्हणजे जणू साऱ्या शरीराचे एक छोटेखानी दर्शन. जे जे बिघाड होऊ शकतात ते ते इथे होतात, व्यक्तीगणिक वेळ थोडी पुढे मागे एवढेच.
ह्या फोर्डच्या किंगपिन तत्वाला ढळढळीत अपवाद म्हणजे स्त्रियांतील ऋतूनिवृत्ती. साऱ्या स्त्रियांत, थोड्याच काळात, मृत्युच्या कित्येक दशके आधीच पाळी जाते. अगदी भटक्या समाजातल्या बायकाही पाळी-पल्याड बऱ्याच जगतात. कारण तसे किरकोळ, बीजसाठा संपून जाणे. बीजे वाळण्याचा वेग मंदावे असा एखादा जनुकीय बदल पुरला असता. शरीरशास्त्राच्या दृष्टीने ऋतूनिवृत्ती अटळ नाही. औत्क्रांतिकदृष्ट्याही ती अटळ नाही. मात्र नैसर्गिक निवडीत महिलांत जनन हनन उत्क्रांत झाले आहे. पुरुषांत मात्र नाही. गेल्या काही कोटी वर्षांदरम्यान कधीतरी महिलांच्यात तशी आज्ञावली निसर्गतः कोरली गेली आहे. अर्ध्यावर डाव आला असतानाची ही निवृत्ती आश्चर्यकारक आहे कारण इतर अवयवांना असे झटपट वार्ध्यक्य येत नाही. म्हातारपण येते ते उशिरा, चोरपावलांनी.


……
जितकी अधिक संतती तितके तुम्ही उत्क्रांतीच्या स्पर्धेत पुढे. असे असताना प्रजनन क्षमतातेलाच पूर्णविराम देणाऱ्या ऋतूनिवृत्तीच्या ह्या उरफाट्या धोरणाने, स्त्रीच्या पदरात  अधिक मुले कशी पडतील? ऋतूनिवृत्तीच्या उत्क्रांतीबद्दलच्या कोणताही सिद्धांताने ही  गोष्टी स्पष्ट व्हायला हवी. असे दिसते, की वय वाढेल तसे नव्याने मुलेबाळे होऊ देण्यापेक्षा, आहेत त्याच मुलांकडे लक्ष दिले, होणाऱ्या नातवंडाकडे लक्ष दिले, नातेवाईक सांभाळले तर स्त्रीला  अधिक जनुकीय वारसदार  लाभतात.
ह्यामागील उत्क्रांतीवाचक तर्क अनेक क्रूर तथ्यांवर आधारलेला आहे. पहिले म्हणजे  माणसाचे बाळ, इतर कोणत्याही पशुपेक्षा दीर्घकाळ  पालकावलंबी  असते. चिंपांझीचे बाळ अंगावरचे बंद होता होता आपले आपण अन्न शोधून खाऊ लागते. आपला हात जगन्नाथ. (चिंपांझी ‘हत्यारे’ वापरतात. वारुळात काड्या घालून त्याला चिकटलेल्या मुंग्या खातात किंवा बिया दगडाने फोडून खातात. प्रत्यक्षात चिंपांझीच्या आहारात ह्याचे महत्व अगदी जेमतेम. ह्यात शास्त्रज्ञांनाच रस फार.) बाळ चिंपांझीही लवकरच आपल्या हाताने अन्न मिळवून, खाऊ लागतात. भटकी-शिकारी माणसे मात्र अन्न मिळवतात ते खणायला काठ्या, जाळी, भाले आणि टोपल्या अशी हत्यारे वापरून. बरीचशी अन्न-प्रक्रियाही ह्त्यारांनेच होते (मळणे, कुटणे, चिरणे, इ.) आणि मग अन्न विस्तवावर शिजवले जाते. भक्ष्यकांपासून आपण स्वतःचे रक्षण करतो ते इतर प्राण्यांसारखे दात आणि बळकट स्नायू


वापरून नाही, तर पुन्हा एकदा हत्यारे वापरून. ही हत्यारे करणे तर  बालबुद्धीच्या पलीकडलेच, ही पेलणेही बालशक्ती बाहेरचे. हत्यारे बनवणे आणि वापरणे हे मुले निव्वळ अनुकरणातून शिकत नाहीत. हे भाषेतून शिकवले जाते आणि भाषा यायला मूल किमान दहा वर्षाचे तरी व्हावे लागते.
त्यामुळे बहुतेक मानवी समाजात मूल हाताशी यायला, स्वतंत्रपणे व्यवहार करायला ते निदान तेरा ते वीस वर्षाचे तरी व्हावे लागते. तोपर्यंत ते आई-बापावरच अवलंबून असते. विशेषतः आया ही जबाबदारी पार पडत असल्याने ते आईवर अधिक अवलंबून असते. आई-बाप अन्नपाणी पुरवतात, हत्यारे बनवायला शिकवतात, संरक्षण देतात आणि टोळीत सन्मानाचे स्थानही मिळवून देतात. एखाद्या मुलाने लहानपणीच आई किंवा बाप गमावला तर पूर्वीच्या समाजात त्या मुलाच्या जीवन मरणाचाच प्रश्न उभा ठाकायचा. पालकाने पुर्नविवाह जरी केला तरी, जनुकीय झुंजीत, सावत्रपालकाचे जनुकीय हितसंबंध भिन्नच असणार. अशा परिस्थितीत अनाथ आणि निराधार मुले तर जगण्याची सुतराम शक्यता नाही.
तेंव्हा भरपूर मुलेबाळे असलेली भटक्या-शिकारी समाजातली बाई, जर शेंडेफळ वयात येईपर्यंत जगली नाही, तर तिची तिच्या मुलांतली काही जनुकीय गुंतवणूक वाया जाणार, हे निश्चित. स्त्रीच्या ऋतूसमाप्ती मागचे हे विक्राळ सत्य आणखी एक गोष्ट लक्षात घेतल्यास अक्राळविक्राळ होऊन सामोरे येते. प्रत्येक बाळंतपण म्हणजे बाईचा पुनर्जन्मच. म्हणजेच, प्रत्येक


बाळंतपण म्हणजे आधीच्या मुलांना मातृवियोगाचा धोका. इतर प्राणी प्रजातीत हा धोका अगदी किरकोळ असतो. उदाहरणार्थ ४०१ गर्भवती ऱ्हीसस मकाक्वे माकडीणीपैकी केवळ एकीलाच बाळंतपणात जीव गमवावा लागला. माणसांत मात्र हे प्रमाण प्रचंड होते आणि उतार वयात तर भलतेच जास्त होते. विसाव्या शतकातील श्रीमंत पाश्चिमात्य समाजातही चाळीशीनंतर बाळंतपणात जीव जाण्याची शक्यता विशीतल्या बाईच्या सात पट आहे. प्रत्येक बाळ म्हणजे बाळंतपणात जीव जाण्याचा धोका तर आहेच पण स्तनपानामुळे गळून गेल्याने, मुलाचे करता करता थकल्याने आणि खाणारी तोंडे वाढल्यामुळे अधिकच्या श्रमानेही  जीवाचे काही बरे वाईट होऊ शकते.
उतारवयात झालेली मुले जास्त जगतही नाहीत आणि फारशी बाळसेदारही नसतात हे आणखी एक भयाण वास्तव. ह्या वयात गर्भपात, उपजत मृत्यू, कुपोषित अर्भक आणि जनुकीय आजार हे फार. डाऊन् सिंड्रोम हा एक जनुकीय जन्मजात आजार, मतिमंदत्वाचा एक प्रकार. आईचे वय जितके जास्त तितकी ह्याची शक्यता बळावते. तिशीच्या आत दोन हजारात एखाद्या बाळाला हा आजार दिसतो. आईचे  वय पस्तीस ते एकोणचाळीसच्या दरम्यान असेल, तर दर तीनशे बाळात एक मूल असे निपजते. त्रेचाळीस वय असेल तर दर पन्नास मुलांत एक आणि पुढे तर दर दहात एक मूल असे होते.
तेंव्हा जसे  बाईचे वय वाढते तसे तिला अधिक मुलांचे करावे लागते, अधिक काळ करावे लागते; म्हणजे दर बाळंतपणात ही आपली अधिकाधिक गुंतवणूक पणाला लावत असते. वय वाढले की दर गर्भारपणात हिलाही जीवाची जोखीम आणि गर्भालाही मृत्यूची, विकृतीची जोखीम.


एकुणात वयस्कर मातेला, जोखमीच्या मानानी हाती विशेष काही लागत नाही. मानवीतील ऋतूनिवृत्तीला हे ही घटक कारणीभूत असतील. यातील विरोधाभास असा की ऋतूनिवृत्तीमुळे मानवीला मुले कदाचित कमी होतील, पण होतील त्यातील अधिकाधिक हाती येतील. होतील कमी पण मिळतील जास्त! पुरुष बाळंतपणात मरत नाहीत, संभोगामुळे क्वचितच मरतात आणि आयांसारखे मुलांचे करता करता झिजून जात नाहीत, ह्या तीन कठोर सत्यांमुळे पुरुषांत नैसर्गिक निवडीद्वारे जनन-निवृत्ती उत्क्रांत झालेली नाही.
समजा एखादी म्हातारी पाळी न जाता गर्भार राहिली आणि बाळंतपणात किंवा मुलांचे करता करता मेली तर तिची मुले एवढेच तिचे तिचे नुकसान नाहीये. कारण या वयापर्यंत तिला नातवंडेही झाली असणार आणि नातवंडे ही देखील काही प्रमाणात तिची गुंतवणूक आहेच. मुलांना आई मिळणे हे जितके महत्वाचे तितकेच नातवंडांना आजी मिळणेही महत्वाचे.
पाळी गेलेल्या प्रौढेच्या ह्या विस्तारित भूमिकेचा शोध ख्रिस्तीन हॉकेसने घेतला आहे. ह्याच त्या ख्रिस्तीन हॉकेस, ज्यांच्या संशोधनाच्या आधारे आपण ‘पुरुष काय कामाचे?’चे उत्तर पाचव्या प्रकरणात बघितले. टांझानियातील हाझ्दांच्या विविध वयाच्या बायकाना दिवसभराच्या  जंगलफेरीतून काय काय गवसते याचा अभ्यास हॉकेस आणि सहकाऱ्यांनी केला. कंदमुळे, मध आणि फळे गोळा करण्यासाठी  सर्वाधिक वेळ द्यायच्या त्या म्हाताऱ्या बायका. ह्या कष्टाळू हाझ्दा आज्या


दिवसभरात सात सात तास हिंडायच्या. त्यांच्यातील नवपरिणिता जेमतेम तीन तास तर लेकुरवाळ्या जेमतेम साडेचार तास हे काम करायच्या.  अपेक्षेप्रमाणे, वयाने  आणि अनुभवाने वरचढ असल्याने  मुलींपेक्षा बायका जास्त अन्न गोळा करायच्या. पण बायकांइतकेच अन्न आज्याही जमवायच्या. त्यांना वेळ भरपूर आणि कार्यक्षमता बायकांइतकीच. स्वतःला लागायचे थोडेथोडकेच, पोरेही मोठी झालेली, तरीही त्या बरेच काही गोळा करून आणायच्या. 
त्या हझ्दा म्हाताऱ्या हे ज्यादाचे अन्न घरी मुला-नातवंडात वाटत असत, असे निरीक्षण हॉकेस आणि सहकाऱ्यांनी नोंदवले आहे. अन्नाचे हाडामांसाच्या माणसात रुपांतर करायचे तर स्वतः गर्भ पोसण्यापेक्षा मुले नातवंडे पोसलेली बरी. हे अन्नदान कितीतरी अधिक लाभदायी. मुळात वयाप्रमाणे म्हातारीची जनन क्षमता घटणार, पण त्याचवेळी तिच्या पोटच्या तरण्याबांड मुलांची  आणि तरण्याताठ्या मुलींची जननक्षमता टिपेला पोहोचलेली असणार. सहाजिकच जुन्या जमान्यातल्या या


म्हाताऱ्यांचा उतार वयातला प्रजननातला  सहभाग काही फक्त अन्नदानापुरता मर्यादित नाही. नातवंडे सांभाळायचे काम तर आजीचेच, त्यामुळे तरुणांना मोकळीक, सबब आजीमुळे तरुणांना आजीचाच जनुक-अंश घेऊन येणारी अधिक मुले पिकवायची संधी. शिवाय आजीच्या सामजिक स्थानाचा फायदा जसा मुलांना तसा नातवंडाना देखील.
समजा आपण देव किंवा डार्विन आहोत आणि म्हाताऱ्या बायकांची जनन क्षमता ठेवायची का काढायची, असे ठरवायचे झाले तर याच्या फायद्या तोट्याचा हिशोब मांडावा लागेल. एका रकान्यात फायदे आणि दुसऱ्यात तोटे. पाळी गेल्यामुळे न झालेली संतती’ हा तोटा. प्रसूतीदरम्यानचे आणि उतार वयात पोरवड्याचे करता करतानाचे  मरण टळले हा फायदा. स्वतःच्या मुलांचे आणि नातवंडांचे केल्याने ती जगतात वाचतात. फायद्याचे प्रमाण हे अनेक बारकाव्यावर अवलंबून आहे. बाळंतपणात मृत्यूची शक्यता किती? वयानुरूप ही जोखीम किती वाढते? मुलेबाळे आणि बालसंगोपनाचा भार  नसताना, त्या त्या वयात मृत्यूचे प्रमाण किती? पाळी जाण्यापूर्वी जनन क्षमता किती वेगाने घटते? पाळी गेली नाही तर वाढत्या वयात जननक्षमता किती प्रमाणात टिकेल? प्रत्येक समाजात हे घटक भिन्न भिन्न असतील आणि त्यांचा नेमका अंदाज घेणे सोपे नाही. आतापर्यंत दोन घटकांची मी चर्चा केली, नातवंडातील गुंतवणूक आणि मुलांमधली थेट गुंतवणूक सांभाळणे. पाळी गेली की हे करायला वेळ मिळतो, पण पाळी गेली की पुढे स्वतःला मुलेही होत नाहीत. मुले-नातवंडे संभाळण्यातल्या फायद्याने, संतती संभव थांबण्यातला तोटा भरून निघतो का? मानववंशशास्त्रज्ञांच्या मते हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे.
.....


ऋतूसमाप्तीचा आणखी एक सद्गुण आहे. इथे फारसे कुणी लक्ष घातलेले नाही. हा म्हणजे, चार पावसाळे जास्त पाहिलेल्या मंडळींना निरक्षर समाजात, संपूर्ण टोळीत असलेले विलक्षण महत्व. मानवाच्या उत्पत्ती पासून ते इ.पू.३३०० च्या सुमारास मेसोपोटेमियात लिपीचा शोध लागेपर्यंत, सारा समाज असाच तर होता. जेनेटिक्सचे ग्रंथ सांगतात की वृद्धापकाळी शरीराला हानिकारक ठरतील अशी जनुके आपल्यात असतात. ही नैसर्गिक निवडीच्या चाळणीतून सुटतात. कारण सरळ आहे. नैसर्गिक निवड ही पुनरुत्पादनाच्या संदर्भात होत असते आणि वृद्धापकाळी पुनरुत्पादन क्षमता थंडावलेली असते. माझ्या मते माणूस आणि अन्य प्राण्यांतील एक महत्वाचा भेद इथे दुर्लक्षिला जातो आहे. ब्रम्हचारी साधू सोडला तर कोणीही मानवप्राणी कधीच पुनरुत्पादन क्षमता गमावून बसत नाही! पुनरुत्पादन म्हणजे स्वतःची जनुके असणाऱ्या पुढच्या पिढीला, पुनरुत्पादनासाठी सहाय्य आणि संरक्षण असाही अर्थ होतो. पाळी गेलेल्या बायका असे सहाय्य आणि संरक्षण पुरवत असतात. उद्या एखादी ओरांग उटांगीण पाळी जाईपर्यंत जगलीच, तर तिनी मात्र पुनरुत्पादनाची क्षमता गमावली आहे असे मी बेलाशक म्हणीन. कारण लेकुरवाळी ओरांग उटांगीण वगळता सारे ओरांग उटांग एकेकटे रहातात. तेंव्हा तिनी पुढच्या पिढीला सहाय्यभूत होण्याचा प्रश्नच नाही.


आधुनिक साक्षर समाजात अती वयस्कर माणसे निरुपयोगी ठरत जातात. वृद्धांची अशी अडगळ होणे हा त्यांच्यापुढे आणि अन्य समाजापुढे मोठाच प्रश्न आहे.   आज आपल्याला बरीचशी माहिती मिळते ती लिखाण, रेडीओ आणि टीव्हीतून. कोणे एके काळी माणसे नुसती  वृद्धच नाही तर ज्ञानवृद्ध आणि अनुभवसमृद्ध असायची हे आपल्या कल्पनेतसुद्धा येत नाही.
आता हेच पहा ना, मी पक्षी-परिसरशास्त्राचा अभ्यास आरंभला आहे.  न्यू गिनी आणि नजीकची वायव्वेची बेटे मी पालथी घातली आहेत. इथल्या निरक्षर, निव्वळ दगडाची हत्यारे वापरणाऱ्या, कंद-मुळे आणि शिकारीवर गुजराण करणाऱ्या लोकांत मी राहतो. पशु-पक्ष्यांची, झाडांची त्यांच्या भाषेतली नावे आणि या बद्दलची त्यांना ठाऊक असलेली माहिती मी त्यांना सतत विचारत असतो. ह्यांच्याकडे ज्ञानाचा प्रचंड मोठा खजिना आहे. हजारो पशुपक्ष्यांची, झाडावेलींची  नावे, त्यांचा परिसर, सवयी आणि उपयोग त्यांना तोंडपाठ! हे सारे भलतेच महत्वाचे कारण झाडा-प्राण्यांपासूनच अन्न मिळणार, घर बांधायलामान मिळणार, औषधे मिळणार.
कोणत्याही दुर्मिळ पक्ष्याची माहिती हवी असो, एखादा म्हाताराच ती  खात्रीने  सांगणार, हे मी वारंवार अनुभवले आहे. शेवटी त्यांनाही निरुत्तर करणारा प्रश्न आला की ते म्हणणार,


‘त्या अमक्या म्हाताऱ्याला/म्हातारीला विचारा’. मग कुठल्याश्या झोपडीत ती व्यक्ती असणार, दृष्टी अधू, तोंडाचे बोळके, धड चालताही येत नाही आणि कुटल्याशिवाय काही खाता येत नाही. पण ही व्यक्ती म्हणजे त्यांचा ज्ञानकोश. लिखाणाचा पत्ता नसल्यामुळे स्थानिक परिस्थितीबद्दल म्हाताऱ्याला इतर कुणाहीपेक्षा अधिक माहिती. जुन्या घटनांचे स्मरण त्यालाच. दुर्मिळ पक्ष्यांचे नाव आणि वर्णनही बिनचूक.
त्याच्या ज्ञानसंचयावर साऱ्या टोळीच्या अस्तित्वाची भिस्त. मी १९७६ साली सोलोमन द्वीपसमुहातील रेनेल बेटांवर गेलो होतो. प्रशांत महासागरातील वायव्वेकडील वादळवेड्या समुद्रातील ही बेटे. पक्षी कोणत्या बिया, फळे खातात असे विचारताच तिथल्या स्थानिकांनी डझनभर वनस्पतींची त्यांच्या भाषेतली नावे सांगितली. प्रत्येक झाडाची फळे कोणत्या पाखरांना, कोणत्या वटवाघळांना पसंत ते सांगितले आणि आपण ती फळे खाणे योग्य आहे का हेही सांगीतले. ह्या फलाहाराचे तीन प्रकार होते; अजिबात खात नाहीत अशी फळे, नेहमी खातात अशी फळे आणि उपासमार झाली तरच खावीत अशी फळे. उपासमार म्हणजे हंगीकेंगीच्या वेळी झाली तशी. हंगीकेंगी हा प्रकार मला अनोळखी होता. पुढे खुलासा झाला की हे  १९१०च्या सुमारास झालेल्या सर्वात भीषण वादळाचे स्थानिक भाषेतील नाव होते. ह्या वादळाने संपूर्ण जंगल


झोपवले, बागा उद्ध्वस्त केल्या आणि साऱ्यांची उपासमार केली. लोकांना मिळतील त्या जंगली फळांवर गुजराण करावी लागली. कोणती फळे, विषारी कोणती बिनविषारी आणि कोणाचे विष काय केल्याने निष्प्रभ होते हे ज्ञान आता उपयोगी आले.
माझ्या तरुण रेनेली गाईडना मी याबद्दल खोदून खोदून विचारताच ते मला एका झोपडीत घेऊन गेले.  तिथल्या अंधाराला डोळे सरावल्यानंतर कोपऱ्यातली, अशक्त, जागचे हलताही न येणारी  म्हातारी मला दिसली. ती म्हातारी म्हणजे ते वादळ अनुभवलेली  शेवटची व्यक्ती. पुन्हा बागेत काही उगवेपर्यंत जंगलातले काय खावे काय नाही, हे तिनी प्रत्यक्ष पाहिलेले. ती सांगत होती, हंगीकेंगीच्या वेळी ती खूप लहान होती. अजून लग्नाचीही नव्हती. मी रेनेलला १९७६ला गेलो होतो. वादळ धडकले होते सहासष्ठ वर्षापूर्वी, १९१०च्या सुमारास.  म्हणजे आजी ऐंशी वर्षाची तरी असावी. त्या वादळानंतर ती वाचली, ते अशाच कोणा वृद्धाला पूर्वीच्या वादळातल्या तगून रहाण्याच्या क्लृप्त्या ठाऊक होत्या म्हणून. आता वादळ झालेच तर ह्या जमातीचे जिणे सर्वस्वी तिच्या स्मृतींवर अवलंबून होते आणि स्मरण अगदी तल्लख होते तिचे.
अशा किती कथा म्हणून सांगाव्यात. भटकत आणि शिकार करत जगायचे म्हणजे, ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’. सगळ्यांचाच जीव जाईल अशा आपत्ती किंवा लढाया मधून मधून घडणार. छोट्या टोळ्यांत सगळेच सगेसोयरे. पिकल्या केसांचा पोक्त सल्ला निव्वळ मुला-नातवंडानाच जगायला मदत करतो असे नाही तर त्या पिकल्या पानाचा जनुक-अंश वहाणाऱ्या  इतरही शकडो लोकांना त्याची मदत होते.




हंगीकेंगीसारख्या संकटाच्या आणि संकटमोचनाच्या आठवणी बाळगणारी बुजुर्ग माणसे ज्या समाजात असतील तो समाज टिकण्याची शक्यता अधिक. अशी माणसे नसतील तो समाज संपण्याची शक्यता अधिक. पुरुषांना ना बाळंतपण, ना स्तनपान, ना त्यातले धोके आणि ना त्यात पिळवटून निघणे. त्यामुळे त्यांना जनन हनन हा प्रकार नाही. त्यांना धोके नाहीत, सबब  जनन हननामुळे मिळणारे संरक्षण उत्क्रांत झालेले नाही. ज्या म्हाताऱ्या बायका जननक्षम राहायच्या त्या बाळंतपण आणि बालसंगोपनात खपायच्या. अर्थातच त्यांचा वंश उत्क्रांतीच्या स्पर्धेतून हळूहळू बाहेर फेकला जायचा. अशी ज्ञानवृद्ध म्हातारी मेली की हंगीकेंगी सारख्या संकटात त्या टोळीचा निभाव लागायचा नाही. मग सारी टोळीच संपायची. वंशखंडच व्हायचा. झपाट्याने प्रतिकूल होत जाणाऱ्या परिस्थितीत, जास्तीच्या एखाद दोन मुलांसाठी ही भलतीच जनुकीय किंमत झाली. म्हातारीच्या अनुभवाचे, स्मृतींचे संचित हे समाजाला महत्वाचे होते. यामुळेही ऋतूनिवृत्ती उत्क्रांत झाली असे मला वाटते.
.......


आपल्या जनुकीय सग्यासोयऱ्यांसोबत गटागटाने रहाणारा मनुष्य, एवढा एकच प्राणी नाही. पिढ्यापिढ्यांचे संचित (निव्वळ जनुकीय भाषेत नाही तर) संस्कृतिचिंन्हांतून (भाषा, लिपी, इ.) संक्रमित केले जाते आणि म्हणून मानवजात टिकून आहे. पण असे करणाराही माणूस एकटा नाही. व्हेल मासे अतिशय बुद्धिमान असतात आणि त्यांच्यात गुंतागुंतीची समाजरचना असते, काही सांस्कृतिक परंपरा देखील असतात, हे आपल्या आत्ताआत्ता लक्षात येऊ लागले आहे. हम्पबॅक व्हेलची गाणी हे ह्याचे उत्तम उदाहरण. ‘ऋतूनिवृत्ती’ असणारे पायलट व्हेल हे असेच दुसरे उदाहरण. माणसाच्या भटक्या टोळ्यांप्रमाणेच पायलट व्हेलही टोळ्यांनी रहातात. एका टोळीत पन्नास ते अडीचशे व्हेल असतात. टोळीतले सगळे व्हेल एकमेकाचे सगेसोयरेच असतात असे जनुकीय तपासण्यात आढळले आहे. आपली टोळी सोडून दुसऱ्या टोळीत कोणी जात नाही. टोळीतल्या बऱ्याच माद्या ‘पाळी गेलेल्या’ असतात. पायलट व्हेलमधील प्रसूती बायकांइतकी जीव-जोखमीची नसेलही, पण उतारवयातील  बाळंतपण आणि बालसंगोपन जीवावरच उठत असेल आणि म्हणून पायलट व्हेल मध्ये ऋतूनिवृत्ती उत्क्रांत झाली असेल.
नैसर्गिक अवस्थेत नेमक्या किती टक्के माद्याचे जनन हनन होते हे आपल्याला ठाऊक नसलेल्या अनेक सामाजिक प्राणी प्रजाती आहेत. यात चिंपांझी आहेत, बोनोबो आहेत, आफ्रिकी आणि आशियाई हत्ती आहेत, किलर व्हेल आहेत. ह्यातल्या बहुतेक प्रजातीतील इतके प्राणी माणसाच्या हावरटपणाला


बळी पडत आहेत, की ऋतूनिवृत्ती नावाचा काही प्रकार घडतो की नाही हेही शोधण्याची संधी आपण गमावून बसलो आहोत. सध्या किलर व्हेल वर अभ्यास नेटाने जारी आहे. किलर व्हेल आणि इतर महाकाय सामाजिक प्राण्यांचे सामाजिक व्यवहार साधारण आपल्या सारखेच आहेत. त्यामुळे उद्या ह्या प्रजातीतही ऋतूनिवृत्तीच्या फेऱ्यामुळे, ‘कमी पिकवा पण उत्तम पिकवा’ असे काही उत्क्रांत झालेले आढळले तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही.