Wednesday 7 March 2018

प्रकरण १ सर्वात विचित्र कामजीवन जगणारा प्राणी


जारेड डायमंड यांच्या 'व्हाय इज सेक्स फन' या लाजवाब पुस्तकाचा सुरस मराठी भावानुवाद


प्रकरण १

सर्वात विचित्र कामजीवन जगणारा प्राणी


तुमच्या कुत्र्याला जर तुमच्या सारखीच अक्कल असती आणि जर त्याला बोलता येत असते आणि जर तुमच्या कामजीवनाबद्दल त्याला विचारले असते तर त्याचे भाष्य  ऐकून तुम्ही सर्द झाला असतात. तो श्वानउवाच साधरणपणे असा काहीतरी असता...
“ही घृणास्पद माणसे महिन्याच्या कोणत्याही दिवशी संभोग करतात! बार्बराला मनोमन माहित असते की नुकतीच पाळी येऊन गेली आहे, आपण आता माजावर नाही, आता संभोग करून दिवस रहाणार नाहीत, तरीही तिची तशी मागणी असते. जॉनरावही सतत वखवखलेला असतो, अपत्य-संभव असो वा नसो. या उप्परही तुम्हाला काही भयंकर ऐकायचे असेल तर सांगतो, बार्बराला दिवस होते तेंव्हाही दोघे एकत्र येत होते! कधी कधी बार्बराचे सासू-सासरे येतात, त्यांच्याही खोलीतून हे असले आवाज येत असतात, म्हणजे बघा! सासूबाईंची पाळी जाऊनही आता बरीच वर्ष झाली म्हणे. म्हणजे संततीचा प्रश्नच मिटला. तरीही सासुबाईंना ह्यात रस फार आणि सासरेबुवाही सदा तैय्यार. सगळे मुसळ केरात, हे ठाऊक असूनही. जॉन-बार्बरा काय किंवा जॉनचे आई-वडील काय, विचित्रच आहेत. उजळ माथ्याने, चार कुत्र्यांसमोर करावेत असे सगळे उद्योग, ह्यांच्या बाबतीत बंद दाराआड चालतात.”
                                                  



हा श्वान उवाच समजावून घ्यायचा असेल तर, आपण आधी कामाचाराबद्दलचा आपला मानवकेंद्री दृष्टीकोन सोडून द्यायला हवा. चालू जमान्यात, आपल्या आदर्शाच्या साच्यात न बसणाऱ्यांचा अनमान करणे हे कोतेपणाचे आणि पूर्वग्रहदूषित समजले जाते. कोतेपणाचे असे प्रकार ‘भेदाभेद अमंगळ’ म्हणून प्रसिद्ध आहेत; उदाः वर्णभेद, लिंगभेद, युरोपकेंद्री दृष्टीकोन अथवा शिश्नकेंद्री दृष्टीकोन. या भेदाभेदाच्या भाऊगर्दीत आता आणखी एका अमंगळ भेदाची भर प्राणीमित्रांनी घातली आहे; ‘प्रजाती’भेद (Species-ism). जगातल्या तीस कोटी अन्य प्राणीमात्रांच्या दृष्टीनी, कामव्यवहाराबद्दलच्या आदर्शाच्या आपल्या मानवी कल्पना, ह्या अगदीच विकृत, प्रजाती-वादी आणि मानवकेंद्री म्हणायला हव्यात. तसेच वनस्पती, बुरश्या आणि सूक्ष्मजंतूंच्या दृष्टीनेही आपण विकृतच ठरू. पण एवढा विशाल दृष्टीकोन परवडणारा नाही. मीही अजून माझ्या ‘प्राणीकेंद्री’पणातून पूर्ण मुक्त नाही. तेंव्हा अन्य ‘प्राणी’मात्रांशी तुलना करता करता मानवी लैंगिकता तपासणे एवढाच ह्या पुस्तकाचा पैस आहे, विस्तार आहे.
जगातल्या सस्तन प्राण्यांच्या ४३०० प्रजातींशी तुलना करता मानवी लैंगिकता कशी दिसते ते आपण सुरवातीला पाहू. बहुतेक सस्तन प्राण्यांमध्ये, जोडीने संसार आणि जोडीने पिल्लांचे संगोपन असा प्रकार नसतो. बहुतेकदा एरवी वेगवेगळे रहाणारे नर मादी निव्वळ समागमापुरते एकत्र येतात. परिणामी  पिल्लांवर पितृछत्र वगैरे नसते; पुं-बीज वगळता नराची मादीत किंवा संततीत कोणतीच गुंतवणूक नसते.



सिंह, कोल्हे, चिम्पान्झी, अनेक तृणभक्षी (hoofed mammals), अशा कळपाने रहाणाऱ्या बहुतेक सस्तन प्रजातीतही जोड्या जोड्या आढळत नाहीत. कळपातले नर आपले पिल्लू वेगळे  ओळखतात, इतर बछड्यांपेक्षा त्याची विशेष काळजी घेतात, असे काही दिसत नाही. अर्थात कोणत्या पिल्लाचा बाप कोण ह्याचा उलगडाही अभ्यासकांना अगदी अलीकडे व्हायला लागला आहे. डीएनए फिंगरप्रिंटींग तपासणीचा हा प्रताप. सर्व नियमांना असतात तसे ह्याही नियमाला काही अपवाद आहेत. बहु-नारी-गमनी झेब्रे, जनानखाना बाळगून असणारे गोरिला, एकपत्नीव्रती गिब्बन आणि सॅडलबॅक तामेरीन माकड हे पिल्लांना पितृछाया पुरवणारे अपवादात्मक पिते. पैकी तामेरीन माकडीण दोन नर ‘ठेऊन’ असते, हे विशेष.
सस्तन प्राण्यांच्या कळपात सेक्स, संभोग, ही चव्हाट्यावर, इतरांदेखत साधायची गोष्ट आहे. बार्बरी मकाक्वे माकडीण माजावर आली रे आली की टोळीतल्या प्रत्येक नराशी रत होते आणि इतर नरवरांपासून, हा प्रकार लपवण्याचा जराही प्रयत्न करत नाही. चारचौघातल्या संभोगाच्या ह्याही नियमाला चिम्पान्झी अपवाद आहेत.  चिम्पान्झी आणि त्याची चिम्पान्झीण काही दिवसासाठी कळपातून पळून जातात. पण इकडच्या स्वारीबरोबर तिकडे सगळे उरकल्यावर चिम्पान्झीणी पुन्हा टोळीतल्या इतर नरांशी खुशाल जुगतात.



बहुतेक सस्तन प्राण्यांच्या वयात आलेल्या माद्यात, पाळीच्या नेमक्या काळात, माजावर आल्याची लक्षणे स्पष्ट दिसतात. आता बीज निर्मिती झाली असून आपण फळू शकतो असे खुले आमंत्रण त्या मिरवत असतात. असे मिरवणे, अशी जाहिरातबाजी कधी दृश्य असते (उदाः बाह्यांग लालेलाल होते), कधी खास वास सोडले जातात, कधी विशिष्ठ आवाज काढले जातात तर कधी खुलेआम, पार्श्वभाग उचलून, नराला बाह्यांग नजर केले जाते. मीलनाचा हा संकेत निव्वळ फलनक्षम काळापुरताच असतो, इतर वेळी माद्या काम-निरस असतात, नरांनाही  कामाकर्षक वाटत नाहीत आणि कामातुर नरांच्या कामुक चाळ्यांना त्याही भिक घालत नाहीत. म्हणजेच निव्वळ सुखासाठी संभोग असा प्रकार नसून, फलन हाच त्याचा प्रधान हेतूने दिसतो. याही नियमाला सन्मान्य अपवाद आहेत; उदाः बोनोबो माकडे आणि डॉल्फिन मासे. यांच्यात फलनक्षमतेचा आणि शरीर संबंधाचा अर्थाअर्थी संबंध नाही.
सस्तन प्राण्यात ऋतूसमाप्तीही (मेनोपॉज, पाळी जाणे) सार्वत्रिक नाही. माणसात जननक्षम कालावधीच्या अखेरीस ऋतूसमाप्तीद्वारे जननक्षमता अगदी झटपट संपुष्टात येते. जननक्षमता संपूनही नैसर्गिक, पण वांझ आयुर्मान, बरेच असते. पण बहुतेक सस्तनप्राणी मृत्यूपर्यंत जननक्षम असतात किंवा वयानुसार त्यांची जननक्षमता ओसरते, पूर्ण संपत मात्र नाही.
..............



अन्य सस्तन प्राण्यांचे कामजीवन आणि मानवी कामजीवन यांची तुलना करता काय बरे दिसत? आपण ज्याला प्राकृत (Normal) लैंगिक वर्तन समजतो ते म्हणजे...
1.     बहुतेक मानवी समाजातील बहुतेक स्त्री-पुरुष दीर्घकालीन नात्यात गुंततात (विवाह). या नात्याला आणि त्यातील परस्परांप्रतीच्या कर्तव्यांना  सामाजिक मान्यता असते. लैंगिक निष्ठा आणि वारंवार समागम या नात्यात अनुस्यूत असतो.
2.     लैंगिक भागीदारी बरोबरच लग्नातून निपजणाऱ्या संततिची जोडीनं देखभालही केली जाते. मानवी समाजात पुरुष आणि स्त्री दोघेही ही जबाबदारी पार पाडतात.
3.     जोडीने (वा कधी कधी अंगवस्त्र बाळगून) असणारे नवरा बायको (बायका) हे (गिब्बन माकडांसारखे) आपला आपला प्रदेश राखत, इतरांना त्यात मज्जाव करत, ‘दुक्कलकोंडे’ रहात नाहीत. उलट अन्य जोडप्यांशी आर्थिक सहकार्य करत सामायिक प्रदेशात वहिवाट मिळवतात.
4.     विवाहित जोडप्यात समागम हा सहसा खाजगीत उरकला जातो. जनाची लाज राखली जाते.
5.     मानवी बीजोत्पादन छुपे असते. ते उघडपणे मिरवायची सोयच नाही. नेमके बीजोत्पादन कधी झाले याचा पत्ता ना नवऱ्याला लागतो ना स्वतः बायकोला. स्त्रीची काम-कामना ही फलनकालापुरती मर्यादित नसते. ती सार्वकालीन असते. त्यामुळे बहुतेक मानवी शरीरसंबंध हे फलनदृष्टया निष्फळ ठरतात. थोडक्यात मानवी संभोग म्हणजे रेतनाची सोय तर आहेच पण यापेक्षाही रतीसुखाची-मदनसुखाची सोय होय.




6.     चाळीशी-पन्नाशीत महिलांची पाळी जाते. जननक्षमता संपते. पुरुषांमध्ये हा प्रकार नाही. वैयक्तिकरित्या संततीप्राप्तीत काही अडचणी उद्भवू शकतात पण वयानुरूप सर्वच पुरुषांची जननक्षमता संपते असा प्रकार नसतो.
जिथे प्राकृत आहे तिथे विकृतही आहेच. सहसा जे सार्वत्रिक ते प्राकृत आणि अपवाद ते विकृत असे समजले जाते. इतर आचारांप्रमाणे कामाचारालाही हाच नियम लागू आहे. मागील दोन पानांत मी सर्वसाधारण म्हणून सांगितलेल्या नियमांना, जरी तुम्ही वाचता वाचता अपवाद शोधले असलेत, तरी सर्वसाधारण नियम म्हणूत ते ग्राह्य आहेतच. उदाः वैवाहिक निष्ठेला कायद्यानी अथवा परंपरेनी  मान्यता असलेल्या  समाजातही, विवाहपूर्व संबंध, विवाहबाह्य संबंध आणि अल्पकालीन संबंध घडतातच. ‘रात गयी, बात गयी’ असेही घडते. वाघ किंवा ओरांगउटांग हे नेहमीच एका रात्रीचे सांगाती असतात; तर  बहुतेक जनता वर्षानुवर्ष, दशकानुदशके आपापल्या जोडीदाराशी एकनिष्ठ असते. अमेरिकेत, इंग्लंडमधे आणि इटलीत, अर्धशतकभर चालू असलेल्या जनुकीय पितृत्व चाचण्यामधून, बहुसंख्य बालकांचे पितृत्व हे नवऱ्याकडे किंवा वर्षानुवर्षाच्या बॉयफ्रेंडकडेच जाते असेच दिसून आले आहे.



मानवी समाज एक पती/पत्नी व्रती आहे हे वाचूनही काहींना आश्चर्य वाटेल. बरीचशी माणसे एका वेळी एक पती/पत्नी व्रती असतात. काही देशात बहुपत्नीत्व कायदेमान्य आहे तर बहुपतित्वाची चालही काही समाजात दिसते. राज्यसंस्था विकसित होण्यापूर्वी बहुतेक ठिकाणी बहुपत्नीत्वाची चाल होती. पण आजही, अनेक बायका करणे विधिसंमत असलेल्या समाजातही, बहुतेक पुरुष एकावेळी एकच लग्न करतात. अनेक बायका करणारा आणि सांभाळणारा एखादाच तालेवार. जनानखाना म्हणताच डोळ्यापुढे येणारी अरबी किंवा भारतीय राजेरजवाड्यांची  चित्र ही अगदी अलीकडची कथा आहे. राज्यसत्तेच्या उदयाबरोबर मोजक्याच माणसांकडे अमाप संपत्ती साठली आणि हे शक्य झाले. म्हणुनच सर्वसाधारण म्हणून सांगितलेला नियम योग्यच आहे: बहुतेक समाजातील, बहुतेक माणसे, ही बहुतेक वेळी, एकाच, कायदेमान्य जोडीदाराशी, प्रदीर्घ काळ एकनिष्ठ रहातात.
लग्न हे दोघांनी मिळून मुलांचे संगोपन करण्यासाठी आहे. हे वाचूनही काहींना आश्चर्याचा धक्का बसला असेल. कारण बहुतेक मुलांचे लालन-पालन-पोषण बाबांपेक्षा आईच करते. पुढारलेल्या देशात तर आपले मूल एकटीने सांभाळणाऱ्या कुमारीमातांचे प्रमाण बरेच आहे. पण तरीही, बहुतेक मुलांना बापाकडून प्रेम, पोषण, शिक्षण, संरक्षण, निवारा आणि पैसा पुरवला जातो, हे सर्वसाधारणपणे सत्य आहेच.



प्रदीर्घ दांपत्यजीवन, जोडीने पालकत्व, खाजगीत समागम, अन्य जोड्यांच्या बरोबर सहजीवन, छुपे बीजोत्पादन, सदैव भोगक्षम नारी, सुखासाठी कामक्रीडा आणि ऋतुसामाप्ती; ही मानवी लैंगिक जीवनाची वैशिष्ठ्ये ठरतात. ही आपल्या दृष्टीने प्राकृत (नॉर्मल) आहेत. आपल्यापेक्षा भलतेच भिन्न कामाचार असलेल्या एलिफंट सील, मार्सुपिअल उंदीर किंवा ओरांगउटांगच्या  कामकथा कधी आपल्यातील वासना चाळवतात, कधी चकित करतात, तर कधी शिसारी आणतात. त्यांचे कामजीवन आपल्याला अगदी विचित्र वाटते. पण हा तर आपल्या अति प्रजातीखोर दृष्टीकोनाचा परिणाम. जगातल्या ४३०० सस्तन प्रजाती आणि त्यातील आपले सगेसोयरे म्हणावेत असे कपीकुळातील वानर (चिम्पान्झी, बोनोबो, गोरिला आणि ओरांगउटांग), ह्यांच्या दृष्टीनी विचार करता, विचित्र आपण आहोत.
हा माझा दृष्टीकोनही प्राणीसृष्टीकेंद्रितच नव्हे तर चक्क अत्यंत कोता असा सस्तन-प्राणी-केंद्रित दृष्टीकोन म्हणायला हवा. सस्तन नसलेल्या जीवांशी तुलना करता आपण जरा बरे, जरा कमी विचित्र ठरतो का? सस्तनांपेक्षा इतर प्राण्यांची लैंगिक आणि सामाजिक आयुष्ये नाना परींची आहेत. सस्तनांची बाळे सहसा आई पोसते, बाप नाही. ह्याउलट काही पक्षी, बेडूक आणि मासे प्रजातीत त्यांचा बाप हा एकल पालकत्व निभावत असतो.



खोल सुद्रातील काही मत्स्य प्रजातीत नर हा मादीला चिकटलेला जणू परोपजीवी प्राणी. काही कोळी आणि कीटक माद्या तर समागम होतानाच नरावर चक्क ताव मारतात. माणसे आणि बरेचसे इतर सस्तन प्राणी वारंवार वितात, तर साल्मन मासे, ऑक्टोपस वगैरे विणीच्या एकाच धमाक्यात बरीच प्रजा जन्माला घालतात... आणि सरळ मरण पत्करतात. काही पक्षी, बेडूक, मासे आणि कीटकांतील (काही वटवाघळे आणि काळवीटसुद्धा) नर, काही परिसर हा भोग-आश्रम म्हणून राखून असतात. आपापल्या आश्रमात अधिकाधिक कन्या याव्यात म्हणून नर श्रमत असतात. या स्पर्धक नरामधून माद्या स्वयं ‘वर’ निवडतात. बरेचदा, बऱ्याच माद्या, एकाच नरावर फिदा होतात. त्याच्याशीच रततात आणि लांब कुठेतरी जाऊन त्याच्या मदतीशिवाय पिल्लं सांभाळतात.
काही बाबतीत आपल्यासारखाच काम-कारभार असणाऱ्याही काही प्रजाती आहेत. बहुतेक युरोपीय आणि उत्तर अमेरिकेतील पक्षी किमान एका हंगामापुरती  का होईना जोडी जमवतात (काही प्रजातीत जन्मभरासाठी), जोडीने पिल्लांची काळजी घेतात. बहुतेक पक्षी हे आपापले स्वतंत्र क्षेत्र राखून असतात. पण अनेक समुद्र पक्षी आपल्यासारखेच दाटीवाटीने कॉलनीत रहातात. आपल्यात नाही पण यांच्यात बीजनिर्मिती मिरवली जाते. यांच्यात मादीची कामेच्छा आणि कामक्रीडाही बीजनिर्मितीच्या आसपासच बहरते. यांच्यात सुखासाठी संभोग नसतो आणि जोड्याजोड्यात आर्थिक सामाजिक सहकार्यही जेमतेम असते किंवा नसतेच.



बोनोबो हे ही बरेचसे आपल्यासारखेच. मादीची कामेच्छा मासिक आवर्त काळापैकी बराच काळ जागृत असते, कामक्रीडेत करमणूकचाही भाग असतो आणि कळपात थोडं आर्थिक सहकार्यही असते. पण बोनोबोत आपल्यासारख्या नरमादीच्या जोड्या जोड्या नसतात, आपल्यासारखी गुप्त बीजनिर्मिती नसते आणि पितृत्वाची जाणीव आणि जबाबदारीही नसते. यातल्या बहुतेक सगळ्याच प्रजातीत ऋतूनिवृत्तीही नसते.
........
थोडक्यात काय, अगदी सस्तन-केंद्री दृष्टीकोन सोडला तरीही ‘श्वान उवाच’ सत्यच आहे म्हणायचा, आपणच विचित्र आहोत. मोरांची आणि धूमधडाक्याने पैदास करणाऱ्या मार्सुपिअल उंदरांची वागणूक आपल्याला विचित्र आणि आश्चर्यकारक वाटते, पण हे तर प्राणीसृष्टीतल्या रीतीरिवाजांच्या मर्यादेत आहेत. आपणच सगळ्यात विचित्र आहोत. जीवशास्त्रज्ञांनी वटवाघळामध्ये (हॅमर हेडेड फ्रुट बॅट) भोग-आश्रमाची पद्धत कशी काय उत्क्रांत झाली याचे अनेक सिद्धांत मांडले आहेत. पण त्यापेक्षाही आपल्या समाजातल्या कामपरंपराची संगती लावणे हे महत्वाचे आहे. आपण इतके वेगळेच का उत्क्रांत झालो?
सस्तनातील गिब्बन इ. हे छोटे कपी, Little Apes, हे आपले लांबचे सगे. आपले जवळचे नातेवाईक म्हणजे महाकपी (Great Apes) कुळातील  माकडे. या महाकपिंशी ताडून बघता हा प्रश्न आणखी टोकदार होतो. त्यातही आफ्रिकेतले चिम्पान्झी आणि बोनोबो हे महाकपी आपले सगळ्यात जवळचे नातेवाईक.



आपल्या आणि त्यांच्या जनुकीय मालात (DNAत) फक्त १.६%चा फरक. गोरिला (२.३%चा फरक) आणि आग्नेय आशियातील ओरांगउटांग (३.६%चा फरक) हे ही तसे जवळचेच. आपल्या साऱ्यांच्या समान पूर्वजांपासून चौदा कोटी वर्षापूर्वी ओरांगउटांग ही वेगळी प्रजाती निर्माण झाली. पुढे नऊ कोटी वर्षापूर्वी जे वेगळे झाले ते गोरिला झाले आणि ‘केवळ’ सात कोटी वर्षांपुर्वी, अगदी अलीकडे, चिम्पान्झी-बोनोबो, अशी एक फांदी फुटली आणि दुसऱ्या फांदीवर मानव निपजला.
(चित्र आवश्यक)
मानवी आयुर्मानाशी तुलना करता हा केवढातरी काळ भासतो, पण उत्क्रांतीच्या कालपटावर हा निमिषमात्र. पृथ्वीवर सजीव अवतरले ते तीन अब्ज वर्षापुर्वी. अर्ध्या अब्ज (पाचशे कोटी) वर्षापूर्वी कडक-कवच-धारी, जटील-रचना-धारी, भल्यामोठ्या वैविध्यपूर्ण सजीवांचे अचानक पेवच फुटले. ह्या तुलनेत आपण आणि महा-कपी नुकतेच तर वेगळे झालो आहोत. या अल्पशा काळात आपण काही महत्वाच्या बाबतीत, थोडेसे बदललो आहोत. दोन पायावर चालणे आणि मेंदूचा आकार वाढणे, या छोटयाशा बदलांनी आपले वर्तन मात्र आरपार बदलले आहे.
ताठ चाल आणि मेंदूचा आकार या बरोबरच काम वर्तणुकीतील बदल लक्षात घेतले तर मानव आणि महाकपीतील वेगळेपणाचे  तीन निर्णायक पैलू समोर येतात. ओरांगउटांग बरेचसे एकेकटे रहातात, नर-मादी समागमापुरते एकत्र येतात आणि नर पिल्लांची काळजी वहात नाहीत. प्रत्येक गोरिला बऱ्याच गोरीलीणींचा ज़नाना सांभाळून रहातो. यातल्या गर्भार आणि स्तनदा गोरीलिणी वगळता अन्य माद्यांशी हा वारंवार जुगतो.



चिम्पान्झी आणि बोनोबो हे कळपानी रहातात, जोडपी अशी टिकत नाहीत आणि त्यांच्यात पिता-पिल्ले हे नातेही दिसत नाही. मोठा मेंदू आणि ताठ कणा यांच्या निर्णायक साथीमुळे तर आपण आज माणूस झालो आहोत- आता आपण भाषा वापरतो, पुस्तकं वाचतो, टीव्ही बघतो, आपले अन्न आपणच पिकवतो वा विकत आणतो. सर्व खंड आणि सागर व्यापून आहोत आपण. आपल्या वा अन्य प्रजातीच्या प्राण्यांना आपण पिंजऱ्यात बंदिस्त करतो आणि अन्य कित्येक झाडा-प्राण्यांचे प्रच्छन्न निर्दालन करतो. याउलट महा कपी, मूकपणे जंगलात मिळेल त्या फळे-कंद-मुळावर गुजराण करतात, उष्णकटीबंधीय जंगलांमध्ये आक्रसून रहातात, कोणा प्राण्याला पिंजऱ्यात ठेवत नाहीत आणि अन्य कोणत्याही प्रजातीला काळ ठरत नाहीत. मग आपल्या विचित्र कामजीवनाची आपल्या या वैशिठ्यपूर्ण मानवावतारात नेमकी भूमिका काय आहे?
आपण आणि महाकपीतील लैंगिक भेद हे आपल्यातील अन्य भेदांशी संबंधित आहेत काय? ताठ कणा आणि मोठया मेंदूबरोबरच (आणि कदाचित त्यामुळेच) आपण जेमतेमच केसाळ आहोत, हत्यारे वापरतो, अग्नी कह्यात ठेऊन आहोत, भाषा, कला आणि लिपी आपण निर्माण केली आहे. ह्या भेदांमुळे जर आपली लैंगिकता भिन्न असेल, तर या दोहोतील दुवे  अस्पष्ट आहेत. उदाहरणार्थ अंगावरचे केस कमी असण्यानी, सुखासाठी (संततीसाठी नाही) संभोग कसा काय शक्य झाला आहे? किंवा अग्नी कह्यात आल्यामुळे, ऋतूसमाप्ती कशी काय उत्क्रांत झाली? हे काही सहजासहजी लक्षात येत नाही.



माझी तर उलटीच मांडणी आहे; ताठ कणा आणि मोठया मेंदूमुळे अग्नी, भाषा, कला आणि लिपीच्या शोध शक्य झालाच पण सुखासाठी संभोग आणि ऋतूसमाप्तीमुळेही या शोधांना थेट बळ मिळाले. .
........
मानवी लैंगिकता समजावून घ्यायची तर आधी मानवी कामाचार हे उत्क्रांतीशास्त्रातील एक गहन गूढ आहे हे लक्षात घ्यायला हवे. चार्ल्स डार्विननी जेंव्हा ‘द ओरिजिन ऑफ स्पेसीज’ या महद्ग्रंथात, जैविक उत्क्रांतीचे घटीत मांडले, तेंव्हा सजीवांच्या शरीररचनेतील साम्य, हा एकच मोठा पुरावा त्याच्यापाशी होता. सजीवांचे अवयव ‘उत्क्रांत’ होतात, कारण पिढ्यांपिढ्या त्यात ‘बदल’ घडत रहातात, असा त्याचा निष्कर्ष होता. ह्या ‘बदल’ आणि ‘उत्क्रांती’मागची कर्तुम्अकर्तुम् शक्ती म्हणजे ‘नैसर्गिक निवड’. डार्विन समजावतो की, निसर्गतः सजीवांची शरीरे थोडी थोडी वेगळी निपजतात. यातील काही बदल हे त्या सजीवाला जगायला आणि पुनरुत्पाद्नाला सहाय्यभूत ठरतात. असे सजीव हे इतरांपेक्षा वरचढ ठरतात. मग असे विशिष्ठ शारीरिक बदल असलेल्यांची प्रजा पिढ्यांपिढ्या वाढत वाढत जाते. डार्वीननंतरच्या जीवशास्त्रज्ञांनी हाच युक्तिवाद शरीरक्रियांना (उदाः रक्त, वीर्य, स्वेद तयार होणे) आणि जैवरसायनिक क्रियांनाही (उदा: अन्नाचे उर्जेत रुपांतर होणे) लागू होतो हे दाखवून दिले. त्याही  उत्क्रांत होतात म्हणुनच कोणत्याही प्राणी वा वनस्पतीच्या शरीरक्रिया, जैवरासायनिक क्रिया या त्या त्या जीवनशैलीला, परिसराला अनुकूल असतात.
आता तर उत्क्रांतीतज्ञांनी परिस्थितीनुसार, परिसरानुसार प्राणीजगतात सामाजिक संस्थाही उत्क्रांत होतात असे साधार दाखवून दिले आहे. अगदी निकटच्या नात्यातल्या प्रजातीतही



काही प्रजाती एकांतप्रेमी असतात, काही टोळक्यानी रहातात तर काही कळपानी रहातात. अशा सामाजिक वर्तनाचा जगण्यावर, तगण्यावर आणि प्रजोत्पादनावर परिणाम होत रहातो. उदाहरणार्थ अन्न हे एके ठिकाणी मिळते का अन्नासाठी दाही दिशा फिराव्या लागतात यावर आणि भक्षकांचा हल्ला होण्याची शक्यता किती यावर, एकेकटे रहाणे वा एकत्र रहाणे, यापैकी काय तगण्याला आणि प्रजोत्पादनाला पूरक आहे हे ठरत असते.
असेच घटक लैंगिक वर्तनही ठरवतात. त्या त्या प्रजातीच्या अन्नपुरवठ्यानुसार, भक्षकांच्या भीतीनुसार आणि इतर जैविक गुणानुसार काही कामाचार हे तगण्याला आणि प्रजननाला पूरक ठरतात. एकच उदाहरण द्यायचे तर मी ‘संभोगान्त-नर-भक्षणाचे’ उदाहरण देईन. काही कीटकांच्या किंवा नाकतोड्यांच्या माद्या या संभोग संपताच किंवा काही वेळा तर संभोगादरम्यानच त्या भोगी नराला खाऊन टाकतात. वरवर पहाता उत्क्रांतीच्या नियमाविरुद्ध अशी ही वागणूक. याला नराची सक्रीय संमती असते. आधी पुढाकार नरानेच घेतलेला असतो, मग तो सुटकेचा यःकिंचितही प्रयत्न करत नाही उलट स्वतःहून डोकं, छाती पुढे काढून मादीला जणू आपलाच घास भरवतो. दरम्यान पोटाचा भाग रेतनाचे आपले जीवित्कार्य सुखेनैव पार पाडत असतो.
उत्क्रांती म्हणजे नैसर्गिक निवडीत जगण्याची धडपड असा विचार केला तर या आत्मघाती स्व-नर-भक्षणाची संगतीच लागत नाही. वास्तविक नैसगिक निवडीच्या प्रभावामुळे जनुकांचे पुढच्या पिढीत संक्रमण होते. जगलात तर ही संधी वारंवार मिळण्याची शक्यता जास्त. पण ‘अधिक जगणे’ ही निव्वळ एक चाल झाली. समजा संभोगाची संधी ही क्वचित आणि



अकल्पितपणे मिळत असेल आणि त्यातून निपजणाऱ्या पिल्लांची संख्या मादीच्या उत्तम  पोषणावर थेटपणे अवलंबून असेल तर? अत्यल्प प्रजा असणाऱ्या काही कोळी आणि नाकतोड्यांमध्ये नेमके हेच आढळते. मादी सापडणे हाच मुळी दुर्लभ योग आणि असाच  योग पुन्हा जुळून येणे दैवदुर्लभ. तेंव्हा आपली जनुके पुढे संक्रमित करण्यासाठी, याच संधीचे सोने करत, एकाच प्रयत्नात अधिकाधिक संतती, हे धोरण नरासाठी सर्वात फलदायी. मादी धष्टपुष्ट असेल तर अंडी घालताना तिला अधिक शक्ती (कॅलरी) आणि प्रथिने उपलब्ध असतील. समागम उरकताच जर नर निघून गेला तर त्याला पुन्हा दुसरी मादी सापडणे मुश्कील; म्हणजे उरलेले आयुष्य व्यर्थच म्हणायचे. तेंव्हा स्वतःचे शिरकमल अर्पण करून, आपल्याच जनुकांनी फळलेली  भरपूर अंडी  तयार व्हावीत, अशी सोय साधली जाते. शिवाय नर-शीर-कमल खाता खाता मादी इतकी तल्लीन होऊन जाते की जुगायला अगदी भरपूर वेळ मिळतो, अगदी भरपूर वीर्य पतन पावते आणि अगदी भरपूर अंडी फळवली जातात. नर नाकतोड्याचे उत्क्रांतीचे तर्कगणित बिनतोड असते. आपल्याला त्यात खोट दिसते, वावगे वाटते, कारण मानववंशाच्या अन्य गुणांमुळे असला नरभक्षी व्यवहार हा आपल्यासाठी आतबट्याचाच ठरतो. बहुतेक पुरुषांना समागमाची संधी आयुष्यात वेळोवेळी प्राप्त होते आणि चांगल्या खात्यापित्या बायकाही एका वेळी एकाच, क्वचित जुळ्या, अपत्याला जन्म देतात आणि गर्भपोषक आहार म्हणून ‘वर’-भक्षण करायचे म्हटले तरी बसल्या बैठकीला खाऊन खाऊन किती खाणार?



उत्क्रांत झालेले लैंगिक व्यवहार हे पर्यावरण आणि त्या त्या प्रजातीचे जैविक गुणावगुण  या दोन्हींवर अवलंबून आहेत, हे यातून स्पष्ट व्हावे. प्रजाती गणिक या दोन्ही गोष्टी बदलतात. त्या त्या प्रजातीतील कोळ्यांची  आणि नाकतोड्यांची  अत्यल्प लोकसंख्या, त्यामुळे क्वचित होणारी आमने सामने भेट, मादीची बकासुरी पचनशक्ती आणि सु-पोषणाने सुधारणारी बीजोत्पत्ती हे सारे संभोगान्त-नर-भक्षणाच्या उत्क्रांतीला पूरक ठरले आहे. नव्या ठिकाणी वस्तीला जाताच पर्यावरणाचे आयाम लगेच बदलतील, पण अंगभूत जैविक गुणांचा पिढीजात वारसा काही तडकाफडकी बदलत नाही. नैसर्गिक निवडीच्या प्रभावाने, अत्यंत संथपणे तो बदलतो. एखाद्या प्रजातीच्या परिसंस्थेचा, जीवनशैलीचा अभ्यास करून, अपेक्षित लैंगिक वर्तनाच्या आदर्श तऱ्हा आपण भले कागदावर उतरवू; पण प्रत्यक्षात  ताडून पहाता अपेक्षाभंगच होण्याची शक्यता जास्त. कागदावरच्या  आदर्श अपेक्षित वर्तनाऐवजी, भलतेच काही तरी उत्क्रांत झालेले आढळेल. लैंगिक वर्तनाची उत्क्रांती ही अनुवंशिक यमनियम आणि  त्या त्या प्रजातीचे उत्क्रांतीचे पूर्वटप्पे यांनी सीमीत असते.
उदाहरणार्थ बहुतेक माश्यांच्या माद्या ह्या आपली अंडी (स्त्रीबीज) पाण्यात सोडतात आणि मग नर मासे त्यावर वीर्य सोडून ती फळवतात. अंड्यांचे फलन हे मादीच्या शरीराबाहेर होते. सर्व सस्तन प्राण्यात मात्र वीर्य मादीच्या शरीरात सोडले जाते आणि बीजाचे फलन मादीच्या शरीरात होते. अपरा (वार) असणारे सस्तन प्राणी (Placentate) आणि मार्सुपिअल (पिल्लांना पिशवीत पोसणारे कांगारूसम) प्राणी हे अंडी घालत नाहीत, थेट इवल्या इवल्या पिल्लांना जन्म देतात. शरीरांतर्गत फलन आणि थेट पिल्लांना जन्म देणे, हे साध्य होण्यासाठी प्रचंड जीवशास्त्रीय आणि जनुकीय बदल घडत गेलेत. इतके की गेली कोट्यवधी वर्ष अपराप्राप्त सस्तन प्राणी आणि मार्सुपिअल याचे हेच जनुकीय भागधेय राहिले आहे.




निव्वळ पिता पालकत्व करतो अशी एकही सस्तन प्रजाती नाही. आसपास पिल्लांना सांभाळणारे बेडूक किंवा मत्स्य एकल-बाप असतानाही सस्तनात असे बाप दिसत नाहीत. अनुवंशिक यमनियमांच्या आधारेच ह्याची संगती लावता येते, हे आपण पुढे बघणारच आहोत.
आपल्या चमत्कारीक कामजीवनातून उद्भवणाऱ्या कूट प्रश्नांची आपण फेरमांडणी करू या. गेल्या सात कोटी वर्षात, आपले अगदी निकटचे नातेवाईक, चिम्पान्झींशी तुलना करता, आपली शरीररचना जेमतेम बदलली, आपली शरीरक्रिया (Physiology) काहीशी बदलली आणि आपले लैंगिक वर्तन तर आरपार बदलले. आपल्या आणि चीम्पान्झींच्या परिसंस्था आणि जीवनशैलीचे प्रतिबिंब यात पडलंय. पण हे बदल अनुवंशिक गुणवारश्याने सीमित आहेत. आपल्या चमत्कारीक कामजीवनाला, जीवनशैलीतील कोणते बदल आणि जनुक वारशातील कोणती बंधने कारणीभूत ठरली आहेत; हा तो प्रश्न आहे?

No comments:

Post a Comment