Tuesday 31 July 2018

बाप माणूस

बाप माणूस
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

लग्नाला काही कालावधी लोटला आणि ‘गुड न्यूज’ आली नाही की मंडळी अस्वस्थ होतात. मूल होणे ही खूपच गुंतागुंतीची प्रक्रिया. इतकी, की मुले होत नाहीत त्यांना होत नाहीत ह्यात आश्चर्य नसून, ज्यांना होतात त्यांना होतात कशी हे अचंब्याचे आहे. दिवस रहाण्यात स्त्रीपुरुषांचा समान वाटा आहे. त्यामुळे बिघाडातही जवळपास समसमान वाटा आहे.
मूल रहात नाही म्हटले की दवाखान्यात तपासायला जाणे होते. मूल होणार असते दोघांना, हवे असते दोघांना. काउंटरवरची सिस्टर विचारते,
‘पेशंटचे नाव?’
मग पत्नीचे नाव हमखास सांगितले जाते. खरेतर निम्यावेळी पुरुषात दोष असतो. पण पेपरवर नाव असते बायकोचे. दाखवलेही जाते स्त्रीरोगतज्ञांना, श्री-रोग तज्ञांना नाही. सहसा तपासणीसाठी, औषधासाठी,  पहिला नंबर बायकोचा. मग बरेच आढेवेढे घेऊन, डॉक्टरनी चार चार वेळा समजावून, घरच्यांनी दबाव टाकून आला तर नवरा तपासणीला येणार. पुढे ह्याच तिकीटावर हाच खेळ पुन्हा एकदा पार पडल्यावर वीर्य तपासणीला तयार होणार.
पुरुषबीज आणि ह्या बीज निर्मितीमागचा सगळ्यात महत्वाचा प्रेरक, खरेतर संप्रेरक, म्हणजे टेस्टोस्टेरॉन, दोन्हीही तयार होतात वृषणात. (स्पष्ट शब्दात सांगायचे तर ‘गोट्यात’) हे अहर्निश चालणारे काम. सॅटरडे हाफ डे, हनुमान जयंतीला सुट्टी, असला प्रकार नाही. वय वाढले तरीही ही क्रिया चालू रहाते. त्यामुळेच इतर ‘क्रिया’ जमत असतील तर वयस्कर पुरुषही बाप बनू शकतो. स्त्रीचे तसे नाही. जन्मतः मिळालेला स्त्रीबिजांचा साठा हा वय वाढत जाते, तसा वाळत वाळत जातो आणि अंतिमतः संपतो; पाळी जाते आणि मग मातृत्व अशक्य ठरते.  पुरुषांत दिवसाला सुमारे शंभर कोटी पुंबीजे तयार होतात. एक थेंब वीर्य तयार व्हायला रक्ताचे शंभर थेंब लागतात अशी एक वदंता महाराष्ट्रातल्या शाळाशाळातून पसरलेली आहे. असे काही नसते. पुरूषबीज हा वीर्यातील एक भाग आहे फक्त. वीर्यात इतरही अनेक स्त्राव असतात. हे निर्माण होण्यासाठी कोणत्याही ‘विशेष’/‘दिव्य’ शक्तीची गरज नसते. शरीरातील लाळ, अश्रू, पित्त असे इतर पदार्थ तयार व्हायला जशी काही उर्जा लागते तशीच ती वीर्य तयार व्हायलाही लागते. शरीरातील उर्जेचे एटीपी हे चलन आहे. तेच चलन वापरून वीर्य निर्मिती होत असते.  बलदंड पुरुषात अधिक ‘पॉवरफुल’ वीर्य तयार होते असे काही नाही. वीर्यातील पुरुष बीजाच्या फलनक्षमतेचा आणि दंडातील बेटकुळीचा अर्थाअर्थी संबंध नाही.  वृषणात तयार झाल्यावर हे पुरुषबीज नलीकांच्या अत्यंत गुंतागुंतीच्या वेटोळ्यातून मार्गक्रमण करता, करता,  वीर्यात मिसळून जायला ‘तैय्यार’ होते. तैय्यार हा शब्द मुद्दामच अवतरण चिन्हांत टाकला आहे. या वेटोळ्यातील प्रवास निव्वळ प्रवास नसतो. या प्रवासात बीजाचे भरण पोषण होत असते. बालक मंदिरात जाणारा पोरगा आणि युनिव्हर्सिटीतून बाहेर पडणारा पोरगा ह्यांच्या क्षमतांत जसा फरक असतो तसाच फरक बीजातही पडतो.  हे सगळे व्हायला सुमारे तीन महिन्याचा कालावधी लागतो. म्हणजेच आज काही आजार झाला (उदाः खूप ताप आला आणि बीजांची संख्या रोडावली)  तरी त्याचा दुष्परिणाम ओसरायला तीन महिने लागणार. म्हणजेच आज काही औषध दिले (उदाः पुंबीज वाढीचे म्हणून औषध) तर त्याचा परिणाम दिसायलाही तीन महिने लागणार.
स्त्रीबीजाचे फलन व्हायचे असेल तर पुरुषबीजाला स्त्रीबीजापर्यंत पोहोचता यायला हवे. पुरूषबीज सोडले जाते योनीमार्गात. स्त्रीबीज असते स्त्रीबीजवाहक नलीकांत, फेलोपिअन ट्यूबमध्ये. इथून तिथे जाण्यासाठी पुरुषबीजाला अंगची हालचाल असते. त्याला एक वळवळती शेपूट असते. हिच्या मदतीने योनीमार्गात पडलेले पुरूषबीज पोहत पोहत स्त्रीबीजापर्यंत पोहोचते. शीर्षस्थ रसायनांच्या किल्लीने स्त्रीबीजाचे दार उघडते आणि स्त्री-पुरुष जनुकांचा संयोग होतो. फलन घडते.
दिवस रहात नाहीयेत म्हटले की वीर्य तपासले जाते. हस्तमैथुन करून वीर्याचा नमुना द्यायला फर्मावले जाते. काही मोजके अपवाद वगळता दवाखान्यातल्या सावर्जनिक संडासात त्या पुरुषाने ही क्रिया उरकावी अशी अपेक्षा असते! ते वातावरण, तिथले वास... बापरे कित्येक ठिकाणी तर वीर्य गोळा करायला म्हणून दिलेली बाटली ठेवायलाही जागा नसते. अशा बिकट परिस्थितीतही जो नरपुंगव हस्तमैथुन करून वीर्याचा नमुना आणून देतो, त्याला अनुकंपा तत्वावर ‘नॉर्मल’ रिपोर्ट द्यावा असे मला कधी कधी वाटते. खरे तर खाजगी आणि आरामदायी अशी खोली हवी, पंखा, उजेड, आरसा, पोर्नोग्राफिक साहित्य, पलंग, खास कंडोम, बाथरूम, साबण, पाणी, टिश्यूपेपर ई सामुग्री हवी. प्रसंग पडल्यास तिथे पत्नीलाही प्रवेश हवा.  त्या पुरुषाचा आब राखून आधी नीट माहिती द्यायला हवी, शंकासमाधान करायला हवे. यासाठी युट्युब वगैरेचा वापर सहज शक्य आहे. पण आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीतही पुरुषाचा आब राखला जात नाही असे दिसते, मग बायकांचे तर काय होत असेल?
वीर्य तपासणीत बऱ्याच गोष्टी कळतात आणि बऱ्याच कळतही नाहीत. या तपासणीची प्रमुख मर्यादा म्हणजे पुरुष बीजाचे कार्य, जे की स्त्रीबीजाचे फलन करणे, हेच मुळी तपासले जात नाही; तपासता येत नाही. पुरुष बीजाची संख्या हालचाल इत्यादीवरून अप्रत्यक्ष निष्कर्ष काढला जातो. पण जे काही तपासले जाते त्यातूनही बरीच माहिती मिळते.
वीर्यात पुरुषबीज संख्येने अत्यल्प असू शकतात (Oligospermia), गायब असू शकतात (Azoospermia), अॅबनॉर्मल असू शकतात (विचित्रवीर्य??), आळशी किंवा मंदगती, म्हणजे जेमतेम हालचाल करणारे (Asthenospermia) असू शकतात. काही जनुकीय आजारांत पुरुषांना वंध्यत्व येते (उदाः सिस्टीक फायब्रोसिस). खूप ताप आल्याने वा अती उष्णतेत सतत काम केल्यानेही पुरुष बीजांवर परिणाम होतो (उदाः बॉईलर समोर ई.). धूम्रपान, दारू, अती वजन हे नेहेमीचे व्हिलन आहेतच. कधी कधी या बिजांविरुद्ध काही द्रव्ये पुरुषाच्याच शरीरात तयार होतात आणि मग ह्यांच्या साऱ्याच क्षमता मंदावतात. स्त्रीच्या शरीरातही अशी द्रव्ये तयार होऊ शकतात. तेंव्हा पूर्वी एकदा कधीतरी  दिवस राहिले होते याचा अर्थ आत्ता पुरुषबीज तपासायची गरज नाही असा होत नाही. बीजतील सूक्ष्मरचनेपासून ते बायकोपर्यंत काहीही बदललेले असू शकते. बदललेल्या बायकोत, पूर्वीच्या बायकोत नसलेली, पुरुष-बीज-रोधक द्रव्ये असू शकतात. अत्यल्प पुंबीज असलेल्या अथवा अजिबात पुंबीज नसलेल्या पुरुषांत वाय क्रोमोझोम मध्ये घोटाळा असू शकतो. त्यातले काही अंश गायब असू शकतात. (Y Microdeletion). अशांना मग टेस्ट ट्यूब बेबीचा पर्याय उत्तम ठरतो.
प्रामणिकपणे सांगायचे तर पुरुषबीजांची संख्या वाढेल किंवा हालचाल खात्रीने वाढेल  असे पुराव्याने शाबित झालेले एकही औषध उपलब्ध नाही. काही अँटीऑक्सिडेंट्स आणि काही गोनॅडोट्रोपिन्स काही वेळा उपयोगी ठरू शकतात. पण अजून बरीच मजल मारायची आहे, बराच पल्ला गाठायचा आहे. पण असा दावा करणारी मात्र सुमारे दीडशे दोनशे औषधे आहेत. इतकी सारी औषधे आहेत याचाच अर्थ असा की एकही रामबाण औषध नाही. मलेरिया किंवा टीबीवर मोजकीच औषधे आहेत. कारण आहेत ती सारी परिणामकारक आहेत. इथे तसे नाही. एक ना धड भराभर चिंध्या. बिच्चारे पुरुष गतानुगतिक होऊन असली औषधे घेत असतात. अगदी वर्षानुवर्ष घेत रहातात. टेस्ट ट्यूब बेबी तंत्रासाठी येणारा एकरकमी  खर्च खिशाला परवडत नसतो. त्यातली अनिश्चितता मनाला पटत नसते. पण औषधापायी रोज थोडे थोडे करत कित्येकांनी तिप्पट पैसा घालवलेला असतो.  ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे’, अशा छापाची ही औषधे... दुसरे काय. नेमक्या ज्ञानाच्या आणि उपचारांच्या अभावामुळे पुरुषबीज विकार म्हणजे सर्व पॅथिच्या भंपकांना आणि भोंदुंना मोकळे रान आहे.
संख्या आणि प्रतवारी यथातथा असलेल्या पुरुषबीज दोषांवर चांगला उपाय म्हणजे टेस्ट ट्यूब बेबीतील इक्सी तंत्र. Intracytoplasmic Sperm Injection चे ICSI हे लघुरूप. यात एकच पुरूषबीज घेऊन एका सूक्ष्म सुईतून ते स्त्रीबीजात टोचले जाते. अगदी नाजूक पण तितकीच रोमांचकारी कृती आहे ही. यूट्यूबवर तुम्ही व्हिडीओ नक्की बघा. वीर्यात अजिबात पुरुषबीज दिसत नसेल आणि वृषणात ते असेल तर तिथून ते घेऊन इक्सी उपचार करता येतात.
असले महागडे उपचार योग्य वयात सुरु करणे महत्वाचे. स्त्रीच्या वयाचा आणि उपचारांच्या यशापयशाचा थेट संबंध आहे. पण बरेचदा हा निर्णय घ्यायला उशीर झालेला असतो. आधी डॉक्टर डॉक्टर करण्यात आणि मग देव देव करण्यात नाहक वेळ घालवलेला असतो.
रक्तदान करता येते आणि गरजूंची रक्ताची नड भागते तसेच वीर्यदानही करता येते. याच विषयवरचा ‘विकी डोनर’ नावाचा पिक्चर तुम्ही कदाचित पहिला असेल. यात पुरुष जोडीदाराचे वीर्य काही कारणाने निरुपयोगी असेल तर दात्याचे वीर्य स्त्रीच्या गर्भाशयात सोडले जाते. आधुनिक नियोगच हा. यातून निपजणारे अपत्य जीवशास्त्रीयदृष्ट्या त्या स्त्रीचे  आणि दात्याचे असणार पण समाजाच्या दृष्टीने, कायद्याने ते त्या पती-पत्नीचे समजले जाणार.

कँन्सरसारख्या आजारात कधी कधी उपचारच पुरूषबीज निर्मितीला मारक ठरतात. अशा वेळी उपचारापूर्वीच वीर्य साठवून ठेऊन ते योग्य वेळी पत्नीच्या शरीरात सोडून गर्भ धारणा होऊ शकते. सीमेवरील सैनिक अथवा बराच काळ परमुलखात गेलेले पुरुषही ही पद्धत वापरून आपल्या अनुपस्थितीत गर्भस्थापनेची संधी मिळवू शकतात.

पितृत्वाची आस असतेच असते. पण जेंव्हा सर्व उपाय थकतात तेंव्हा मूल दत्तक घेणे हा ही एक सुंदर पर्याय आहे. त्या मुलाचा जैविक जनक बनता आले नसले तरी पितृवात्सल्याचा वर्षाव करता येतोच. माणसाचा बाप माणूस बनणे हे हरखून जाण्यासारखे खरेच. कालिदासाच्या शाकुंतलातील दुष्यंत म्हणतो, ‘ज्यांचे कपडे लहान मुलांच्या पावलांनी मळतात ते पुरुष धन्य होत!’; आणि छोट्या भरताला जवळ घेताच त्याला  वात्सल्याचा रोमहर्षक अनुभव येतो. भरताच्या पावलांच्या धूळीने त्याचे कपडे मळतात तेंव्हा हा आपलाच मुलगा आहे हे त्याला तरी कुठे माहित असते?

Monday 16 July 2018

साधी अॅस्पिरीनची गोळी.


साधी अॅस्पिरीनची गोळी.
डॉ.शंतनू अभ्यंकर, वाई.

साधी अॅस्पिरीनची गोळी, पण किती बहुगुणी. तिचे कौतुक काय वर्णावे? वेद्नामुक्तीपासून ते हृदयविकार मुक्तीपर्यंत आणि वारंवार गर्भपात टाळण्यापासून ते आतड्याचा कॅन्सर टाळण्यापर्यंत ह्या गोळीची दौड. साधी अॅस्पिरीनची गोळी. आठ आण्याला मिळते. मूर्ती लहान पण कीर्ती महान.
शास्त्रीय नाव अॅसीटील सॅलीसिलीक अॅसिड. पण हे बारसं करणाऱ्या शास्त्राचा शोध अगदी अलीकडचा. हा शोध लागायच्या आधीपासून काही वनस्पतीमध्ये असलेले तापहारक, वेदनाहारक आणि सूजहारक गुणधर्म जगाला माहित होते. जाई, पावटा, वाटाणा, लवंग, काही तृणे अशा कशा कशाचा रस, काढा; ताप, सूज, ठणका यावर चांगला गुणकारी ठरायचा. युरोपात विलोच्या खोडाचं चूर्ण या साऱ्यावर अत्यंत गुणकारी म्हणून पिढ्यानपिढ्या प्रसिद्ध होतं. अगदी हिप्पोक्रेटेसनेही याचा उल्लेख केलेला आहे. दलदलीच्या प्रदेशात ताप थंडीचे आजार फार (उदाः मलेरिया).  देवाने त्याच प्रदेशात उगवणाऱ्या वनस्पतींमध्ये ताप थंडीचं औषध दडवलेलं असणार असा एक सिद्धांत होता. याला म्हणतात ‘डॉक्ट्रीन ऑफ सिग्नेचर’. विलोचं झाडही नेमकं तापाथंडीच्या प्रदेशात आढळणारं. तेंव्हा डॉक्ट्रीन ऑफ सिग्नेचरला साजेसच होतं हे.
डॉक्ट्रीन ऑफ सिग्नेचर वगैरे गैरसमज असून, विलोचे हे गुण त्यातल्या सॅलीसिलीक अॅसिडचे, हे खूप खूप नंतर (१८२९) स्पष्ट झालं. मग पुढे  १८७४ साली सॅलीसिलीक अॅसिड प्रयोगशाळेत बनवण्यात यश आलं. एकोणीसाव्या शतकात याचा शास्त्रशुद्ध शोध सुरु झाला. झालं असं की एकोणीसाव्या शतकाच्या सुरवातीला नेपोलिअनने पेरूहून होणारी सिंकोनाची आयात बंद केली. सिंकोना या झाडापासून हे औषध मुबलक आणि सहज बनत असे. पण हा मार्ग बंद झाल्यावर युरोपातील वनस्पतींवर पुन्हा संशोधन सुरु झालं. विलोचे झाड पुन्हा महत्वाचं ठरलं. विलोच्या लॅटीन नावावरूनच तर त्याच्या अर्काला, सॅलीसीन हे नाव देण्यात आलं आणि स्पायरेशिया जातीच्या (Genus) झुडपात सॅलीसिलिक अॅसिड भरपूर; म्हणून नाव अॅस्पिरीन.
हे खाताच बऱ्याच जणांना उलटया मळमळ, चक्कर असे त्रास सुरु झाले. म्हणजे आजही अॅस्पिरीनमुळे आपल्याला कधी कधी जे होतं तेच. पण ह्याचं प्रमाण अतीच होतं. बायर कंपनीचा औषधक्षेत्रातला प्रवेश याच सुमाराचा. आपल्या पदरच्या फेलिक्स हॉफमन नामे शास्त्रज्ञावर, त्यांनी हे अॅस्पिरीन सौम्य पण परिणामकारी बनवण्याची कामगिरी सोपवली. हॉफमनचे वडीलच कित्येक दिवस सांधेदुखीसाठी हे औषध घेत होते आणि त्याच्या दुष्परिणामांना तोंड देत होते. त्यामुळे हॉफमनसाठी हे निव्वळ वैज्ञानिक नाही, तर वैयक्तिक आव्हान ठरले. त्यातून आलं अॅस्पिरीनचं आजचं प्रारूप, अॅसीटील सॅलीसिलीक अॅसिड. सॅलीसिलीक अॅसिडला, अॅसीटीलचं शेपूट जोडताच त्या मर्कटाचं रुपांतर जणू दासमारुतीत झालं. ह्यामुळे होणारी अॅसिडीटी कमी झाली, ते पचायला सौम्य झालं, असं बरंच काहीबाही झालं. हे सपुच्छ अॅस्पिरीन  निर्वेधपणे पोटातून शोषले जात होते, एकदा शरीरात शिरल्यावर पुन्हा मूळ रुपात परिवर्तीत होत होते आणि आपले काम चोख करत होते. अॅस्पिरीनचा हा वेषांतराचा प्रयोग भलताच यशस्वी ठरला.
६ मार्च १८९९ ला हे औषध रीतसर रजिस्टर झालं. १९०० साली ते भुकटीच्या ऐवजी गोळीच्या रुपात उपलब्ध झालं. लवकरच ते दणकून प्रसिद्ध पावलं. चक्क लोकाश्रय मिळाला अॅस्पिरीनला. डॉक्टरी चिट्ठीशिवाय ते मिळू लागलं (१९१५). बायर कंपनीचं हे अपत्य, जगभर प्रसिद्ध पावलं, नावाजलं गेलं, खच्चून खपलं. जगाच्या पाठीवर कुठेही जा, अॅस्पिरीनची गोळी मिळणारच. असं म्हणतात की प्रवासात जर एकच कोणतीतरी गोळी बरोबर घ्यायला परवानगी असेल तर अॅस्पिरीनची न्यावी.
खपलं तरीही ते काम कसं करतं ते काही कळलं नव्हतं. ह्या द्रव्याचा उपयोग माहित होता, युरोपीयन आजीबाईंच्या बटव्यात होतच हे, पण कार्यकारणभाव ठाऊक नव्हता. पण औषध गुणकारी आणि सुरक्षित असणे महत्वाचे, कार्यकारणभाव माहित नसला तरी चालते. अॅस्पिरीनच्या परिणामाचं   हे गुह्य पुढे व्हेन, बर्गस्त्रॉम आणि सॅमुएलसन यांनी उकललं आणि १९८२ सालचं नोबेल पारितोषिक ह्या त्रिकुटाला मिळालं.
साध्या अॅस्पिरीनच्या ह्या गोळीमुळे,  प्रोस्टाग्लाँडिन नामे द्रव्य तयार होत नाहीत. आणि सबब वेदना थांबतात. शेवटी कोणतीही संवेदना किंवा वेदना आपल्याला ‘जाणवते’ ते ती मेंदूपर्यंत पोहोचते म्हणून. वेदनेची ही ‘वार्ता विघ्नाची’ देण्याचे काम, प्रोस्टाग्लाँडिन नावाची द्रव्य करत असतात. ह्या निरोप्याची निर्मितीच अॅस्पिरीनने थांबते. म्हणूनच लगेच बरे वाटते. मूळ दुखणे काही लगेच बरे होत नाही. पण ते कोणते ते शोधायला, तपासण्या करायला, विचार करायला अवधी मिळतो. ह्या प्रोस्टाग्लाँडिनचा कर्ता असतो सायक्लोऑक्सिजनेज. अॅस्पिरीन ह्या सायक्लोऑक्सिजनेजच्या मानगुटीवर बसते आणि त्याला कामच करू देत नाही. त्यामुळे प्रोस्टाग्लाँडिन निर्माणच होत नाही. अॅस्पिरीन एकदा बसले की बसले. सिंदबादच्या म्हाताऱ्यासारखे ते अजीबात खाली उतरत नाही. अॅस्पिरीनची अन्य काही भावंडेही (औषधांच्या या गटाला NSAID असं लघुनाम आहे) असंच करतात पण तात्पुरत्या काळापुरते. (उदाः आयब्यूप्रोफेन) हे आयब्यूप्रोफेन किंवा त्याआधी आलेलं अॅसिटअमायनोफेन हे अॅस्पिरीनचे बाजारातले स्पर्धक. ह्यांच्यामुळे  अॅस्पिरीनचं मार्केट खालावलं. पुढे अॅस्पिरीनचे हृदयस्नेही गुणधर्म महत्वाचे ठरले आणि अॅस्पिरीनचं पुनरुज्जीवनच झालं जणू.
ह्या गोळीचा रक्त साकळण्यावर परिणाम होतो हे सुरवातीला नीट माहित नव्हतं. हिच्यामुळे रक्त साकळण्याची क्रिया लांबते. त्यामुळे मुळात न रक्त गोठण्याचा आजार असलेल्या लोकांसाठी ही गोळी म्हणजे कर्दनकाळ. रशियाचा राजपुत्र अलेक्सेई रोमानोव्हचेच बघा ना. पठ्ठ्याला हिमोफिलिया हा आजार होता. खेळताना गुडघ्यावर आपटला की बाहेर जरी खरचटलेलंही  नसलं, तरी आतल्याआत प्रचंड रक्तस्राव ठरलेला. मग सांधा सुजणार, प्रचंड दुखणार. ह्याचा मुका मारसुद्धा कळवळायला लावणारा. जखम वगैरे झाली तर विचारूच नका. कोणतीही जखम, ही भळभळती जखम ठरणार. याला एकदा वेदनानाशक म्हणून त्यावेळेची ही जादुई गुटी देण्यात आली. पण अॅस्पिरीननी वेदना थांबते तसेच रक्तही साकळायचे थांबते. ह्याच्या अगदी जीवावर बेतायची वेळ आली. राणीच्या खास मर्जीतला फकीर, रास्पुतिन; त्याला सांगावा गेला. त्याला ना अॅस्पिरीन ठाऊक होती ना तीचे अव-गुणधर्म. त्याने त्याच्या स्टाईलने केस हातात घेतली. त्याने उलटा निरोप पाठवला, ‘सर्व औषधे बंद करा!’ केली आणि औषधे न दिल्यामुळे राजपुत्र बचावला! नकळत का होईना पण रास्पुतिनची गोळी बरोब्बर लागली. पुढे मंत्रोपचार, तंत्रोपचार असे बरेच चाळे केले त्या रास्पुतिनने. रास्पुतिन राजपरिवाराच्या गळ्यातला ताईत झाला. इतका की इतरांच्या चांगलाच डोळ्यावर आला. राजाविरुद्धच्या रागात रास्पुतिनमुळे प्रचंड भर पडली. राजघराण्याच्या ऱ्हासाला असा अप्रत्यक्षरित्या अॅस्पिरीनचा हातभार लागला आहे. पण नेमका हाच गुणधर्म लक्षात घेऊन ह्या गोळीचा वापर हृदयविकारासाठी करण्यात येतो.

या औषधाचा हा अत्यंत घातक, अनिष्ट परिणाम काही वेळा मात्र अत्यंत तारक, हवाहवासा, इष्ट परिणाम ठरतो. थोडक्यात ‘इफेक्ट’ आणि ‘साईड इफेक्ट’ या सापेक्ष कल्पना आहेत. धर ‘साईड इफेक्ट’चे शेपूट आणि धोपट अॅलोपॅथीला असं करणं फारसं शहाणपणाचं नाही.   
रक्त साकळल्यामुळे हृदयाच्या रक्त वाहिन्या बंद होतात किंवा तिथला प्रवाह मंदावतो. अॅस्पिरीन दिली की रक्त गोठत नाही त्यामुळे रक्तवाहिन्या मोकळ्या रहातात. हृदयाचा रक्तपुरवठा विना व्यत्यय चालू रहातो. हा परिणाम इतका महत्वाचा आहे की आज अॅस्पिरीन डोकेदुखीसाठी कमी आणि  हृदयस्नेही म्हणून जास्त वापरली जाते. डॉ. लॉरेन्स क्रावेन यांनी रोज अॅस्पिरीन घेतली तर हृदयविकाराचे प्रमाण घटते असे निरीक्षण नोंदवले आणि या दिशेनी संशोधन आणि वापर सुरु झाला. रक्त साकळण्याची क्रिया मंदावते, रक्त वहाते रहाते. त्यामुळे हृदयाप्रमाणेच,  मेंदूच्या, गर्भाशयाच्या अत्यंत अरुंद रक्तवाहिन्या रक्त साकळल्याने बंद होत नाहीत. त्यामुळे जसा हृदयविकार टळतो तसा पक्षाघात टळतो, गर्भाचे पोषण सुधारते...!!! अॅस्पिरीनच्या या एकाच गुणधर्माचे हे बहुविध परिणाम.  पण यातही एक मेख आहे. अॅस्पिरीन अल्प मात्रेत (७५ मिग्रॅ.) दिली तरच हा परिणाम दिसतो. वेदना थांबण्यासाठी मात्र जास्त मात्रा लागते. त्याशिवाय ती कळ बंद होत नाही. म्हणून तर या अल्पमोली, बहुगुणी, मितौषधी, लहानशा गोळीला ‘बेबी अॅस्पिरीन’ असं लाडाचं नाव आहे. अॅस्पिरीन हे एनसेड (NSAID) गटातील औषध. पण या गटातील सगळीच औषधे काही हृदयस्नेही नाहीत. काही तर चक्क काळजाला काळ आहेत. रोफेकॉक्सिब नामेकरून अॅस्पिरीनचे एक चुलत भावंड, ह्याने असा काही उच्छाद मांडला की हे शेवटी बंद करावे लागले. बॉलीवूडमधले सख्खे जुळे जर ‘बडा बनके एक इंस्पेक्टर और दुसरा डाकू’ होऊ शकतो तर समकुलीन औषधांची काय कथा.
साध्या अॅस्पिरीनच्या गोळीनं औषधाचं जग बदललं. कित्येकांना दुखःमुक्त केलं. पण ह्या साध्या अॅस्पिरीनच्या गोळीनं डॉक्टरांचंही जग बदललं. पूर्वीच्या काळी कुठे, कसं, किती, काय केल्याने, दुखतंय ह्यावर निदान अवलंबून असायचं. दुखतंय म्हटलं की शब्दशः  छपन्न प्रश्न विचारले जात. यावरच तर पुढे निदान आणि उपचाराचा डोलारा उभा रहाणार असे. वेदना कुरवाळण्याच्या वैद्यकविश्वाच्या ह्या पद्धतीवर अॅस्पिरीननी पहिला घाला घातला. गोळी घेतली की मुळी दुखणे थांबायचे. मग तपासायचे काय आणि कसे असा प्रश्न  डॉक्टरना पडू लागला. अर्थातच इतर खाणाखुणांचा शोध जारीने सुरु झाला. आजही छपन्न प्रश्न विचारा असं शिकवलं जातं पण विविध तपासण्यांमुळे यातले पंचावन्न तरी आता गैरलागू किंवा चक्क निरर्थक ठरतात.
इतके स्वस्त आणि परिणामकारक औषध निघाल्यावर पेशंटच्याही अपेक्षा वाढल्या. कोणे एके काळी वेदनाशामक औषधे नव्हती, तेंव्हा दवाखान्याला सतत रुग्णांच्या कळवळण्याचे, विव्हळण्याचे आणि कण्हण्या कुंथण्याचे पार्श्वसंगीत असायचं. आता तर प्रसूतीसुद्धा वेदनारहित होऊ शकते.
वर्तमानात अॅस्पिरीनला स्पर्धक बरेच आहेत. भविष्यातही यापेक्षा प्रभावी आणि यापेक्षा सुरक्षित औषधे निघतीलच पण इतिहासातील अॅस्पिरीनचे स्थान अढळ आहे एवढे निश्चित. 



Tuesday 10 July 2018

पी केशर अन्...

पी केशर अन्...
डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.

“डॉक्टर, केशर किती पिऊ?” जरा लाडिक प्रश्न.
“कशाला?” माझा  स्थितप्रज्ञ प्रतीप्रश्न.
“....!!” चेहऱ्यावर ‘माहित असून मलाच विचारता होय?’ असे भाव.
मी गप्प.
“नाही डॉक्!”
डॉक्? अरेच्या ही तर गुगल संप्रदायातील स्त्री, मी मनोमन ओळखतो. आजकाल हे डॉक्, डॉक् ऐकून ऐकून माझे ‘डॉक्’ फिरायची वेळ येते. पण  मनात पुढचा  काही विचार यायच्या आत अपेक्षित प्रश्न येतोच...
“डॉक्, मी खूप सर्च केलं पण एक्झॅक्ट डोस रिलायेबल सोर्सकडून नाही मिळाला. प्लीज सांगा ना, आम्हाला फेअर बेबी हवंय डॉक्!!!”
केशर प्यायले की बाळ गोरे होते म्हणे. भलतेच! असं काही नसते. आपला वर्ण  अनेक जनुकीय गुणांचा संमिश्र परिणाम. त्यासाठी एकच एक जीन (जनुक) जबाबदार नाही. हा ‘संमिश्र’ परिणाम आहे हे विशेष महत्वाचे. अन्यथा काळ्या-गोऱ्या जोडप्याला झेब्र्यासारखी चट्टेरी पट्टेरी मुले झाली असती. पण असे होत नाही. मुलांची रंगछटा आई बापाच्या वर्णाच्या, मधली कुठली तरी असते.
मुळात हवा कशाला गोरा रंग? आपला वंश, आपले भौगोलिक स्थान वगैरे लक्षात घेता फार गोरे असणे चांगले नाहीच मुळी. निसर्ग नियमानुसारच आपण सावळे आहोत. त्वचेतील मेलानिनच्या प्रमाणात त्वचा उजळ अथवा काळी दिसते. हे मेलानीन आपल्या संरक्षणाचे काम करते. सूर्यापासूनचे अतीनील किरण उष्णकटीबंधात फार तीव्र असतात. मेलानीन नसेल तर असे किरण आपल्या त्वचेला हानीकारक ठरतात. फार गोऱ्या लोकांना असे संरक्षण कमी मिळते. फार काळ उन्हाशी सामना करावा लागला तर त्यांना त्वचेचा कँसर होऊ शकतो.
मला वाटते गोऱ्या रंगाचे हे खूळ हा तसा अलीकडला प्रकार असावा. आपल्या वासाहतिक वारशाचा हा परिणाम. आपल्या प्राचीन कथांत, महाकाव्यांत, पोथ्या-पुराणात, सगळे नायक काळे आहेत; अहो एकजात सगळे देव काळे आहेत आपले! विष्णू निळा, शंकर काळा, राम सावळा, म्हणजे काळाच की; ‘सावळा गं रामचंद्र’ अशी गाणीही म्हणतो आपण... आणि कृष्णाचे तर नावच कृष्ण. हां राधा, गौरी वगैरे नायिका मात्र गोऱ्या आहेत, पण त्याही ह्या देवांच्या मानाने गोऱ्या; नाही का? अगदी युरोपिअन गोऱ्या नव्हेत; म्हणजे नसाव्यात. पण इतके असूनही गोऱ्या रंगाचे वेड काही भारतीय जनमानसातून जात नाही. ‘अंग्रेज गये लेकीन औलाद छोड गये’, म्हणतात त्यातलाच हा प्रकार. इंग्रजांची ही वैचारिक, भावनिक, मानसिक पिल्लावळ. दीडशे वर्ष ज्यांच्या राजवटीत गेली त्या गोऱ्या  सायबाचा गुण नाही पण वाण लागला. निदान रंग तरी सायबासारखा लख्ख गोरा असावा असे अजून वाटते आपल्याला. 
आता साधे पावडरचेच बघाना. पावडरचे अनेक उपयोग आहेत. चेहरा गुळगुळीत दिसतो, छान वास येतो, बारीकसारीक छिद्र, खड्डे झाकले जातात, प्रसन्न वाटते, ई. पावडर लावली तरी ती लावली आहे हे दिसू नये म्हणून मग चेहऱ्याच्या रंगाला मॅचींग पावडरी खास खर्च करून खरीदल्या जातात. पण ह्यात असतात त्या सगळ्या गोरेपणाच्याच छटा. इथली बहुसंख्य प्रजा काळी, सावळी, गहूवर्णी, निमगोरी ई. ई. असताना एकही काळीकुट्ट फेसपावडर माझ्या बघण्यात नाही. मेकअपबॉक्समध्ये असते पण जाहिरातीत नसते. म्हणजे जाहिरातीच्या झगमगत्या, आदर्शवत, ग्लॅमरस जगाला तुमचा काळा रंग नामंजूर आहे जणू. तुम्ही काळ्या-सावळ्या असलात तरी तुमचे फेस गोरेच अपेक्षित आहे त्यांना.
खरेतर रंग, किंवा एकूणच आपण दिसतो कसे हा  आपल्या व्यक्तिमत्वाचा एक अगदी छोटासा भाग. रंगाने काळीसावळी आणि  दिसायला साधारण असलेली पण विविध क्षेत्रात आपली नाममुद्रा उमटवलेली कितीतरी माणसे आपल्या आजूबाजूला असतात. ते बघायचे सोडून, आपण ‘गोरेपनकी क्रीम’च्या जाहिरातीच जर का मनाला लावून घेणार असू, तर हे असेच होणार. आपले मूल शिकलय काय, आपल्या क्षेत्रात त्याचे कर्तृत्व काय, ते किती रसिक आहे, बहुश्रुत आहे, त्याचे छंद काय, समाजात वागते कसे, बोलते कसे, एक जबाबदार नागरिक म्हणून त्याची कर्तव्ये कशी पार पाडते, ह्या सगळ्याला दिशा देणे शक्य असताना त्याच्या रंगाचा आंधळेपणाने विचार करत बसणे हा मूर्खपणाचा कळस  आहे. सौंदर्य ही शरीराची आहे तशी मनाचीही अवस्था आहे याकडे कानाडोळा करणे, या कपाळकरंटेपणाला काय म्हणावे?
उलट कोणी आपल्या बाळाच्या रंगाबद्दल काही उणेअधिक बोलले तर आपण ढाल्या आवाजात, टिपेच्या सुरात, खुलेआम वरील युक्तिवाद सुनावला पाहिजे. थोडी मोठी होताच, आपल्या मुला-मुलींच्या मनावरही  हेच बिंबवले पाहिजे. निव्वळ रंगामुळे लहानपणापासून टोमणे ऐकत आलेली, निव्वळ रंगामुळे गॅदरिंगमध्ये कधीच ‘परी’ किंवा ‘राजकुमार’ न झालेली, निव्वळ रंगामुळे इतर गुण असूनही कोणी विचारत नाही, अशी कितीतरी मुले-मुली असतात आपल्या आसपास. घरच्यांच्याच लागट बोलण्याने ह्यांच्या मनातली आत्मविश्वासाची कमळे उमलण्याआधीच कोमेजून गेलेली असतात. ह्यांना आपण शिकवायला हवे की सौदर्य ही प्रथमतः मनाची अवस्था आहे. पण मुळात आपल्याला मनोमन पटले असेल तर आपण शिकवणार ना?
खरे तर अशा प्रकारे केशर पिण्याचा आग्रह होणे किंवा तसा विचार मनात येणे हा सुद्धा एक प्रकारचा वर्णभेदच आहे. आपण, म्हणजे काळ्यांनीच, आपल्याविरुद्ध, म्हणजे काळ्यावरच केलेला हा वर्णद्वेषी अन्याय आहे. वर्णभेद फक्त गोरेच काळ्याविरुद्ध पाळतात असे नाही. निदान केशराचा डोस विचारणाऱ्यांनी तरी गोऱ्यांच्या नावाने बोटे मोडणे थांबवावे.
शेवटी एक वैधानिक इशारा देतो आणि थांबतो: केशर घातलेल्या पदार्थाचा रंग मस्त असतो, स्वाद आवडतो, वास तर अगदी स्वर्गीय येतो... जरूर केशर वापरा. पण मूल गोरे व्हावे यासाठी केशर पिऊ नये. त्याने मूल मुळीच गोरेबिरे होत नाही आणि खरोखरच जर गोरेबिरे होत  असेल, तर मग तर केशर अजिबातच पिऊ नये!!!
कारण, समजा, वादासाठी आपण मान्य करू, की केशर पिऊन बाळाचा रंग उजळतो. कल्पना करा की केशर प्यायल्याने एखाद्या कृष्णवर्णीय जोडप्याला झालेच जर गौरवर्णीय बाळ; तर लोक काय म्हणतील? बाळाच्या रंगरूपाचे श्रेय लोक काही केशराला देणार नाहीत, ते भलतीच शंका घेतील. तेंव्हा सावधान, केशराने बाळ गोरे होत नाही आणि होत असेल तर डब्बल, तीब्बल, चौब्बल सावधान!!!!
(पूर्वप्रसिद्धी मधुरिमा पुरवणी, दै.दिव्य मराठी, १०/७/२०१८)

या आणि अशाच स्त्रीआरोग्य विषयक लिखाणाचे माझे पुस्तक,
'पाळी मिळी गुपचिळी'
येऊ घातले आहे. पुण्यात ९/९/२०१८ रोजी प्रकाशन आहे.