Thursday, 14 June 2018

आंबा पिकतो रस गळतो...

आंबा पिकतो रस गळतो...
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई
गणेश जन्माच्या पुराणकथेला प्लास्टिक सर्जरीची जोड देणारे मा. पंतप्रधान ते माझ्या बागेतल्या आंब्यांमुळे संततीप्राप्ती होते असा दावा करणारे श्री. भिडे गुरुजींचे मित्र व्हाया सत्यपालसिंह (आमच्या पूर्वजांनी माकडाचा माणूस झाल्याचे पहिले नाही सबब डार्विन झूठ), बिप्लब देब (संजयाची दिव्यदृष्टी म्हणजेच इंटरनेट) आणि दिनेशसिंह (सीतेचा जन्म हा तर टेस्टट्यूबबेबीचा प्रयोग) असा हा मोठा रंजक प्रवास आहे.
ह्या सगळ्या समजुती मूर्खपणाच्या आहेत, यांची यथेच्छ टिंगल करण्याचे काम समाजमाध्यमांवर अहोरात्र चालू आहे. दिवस का आणि कसे जातात हे सार्वजनिक गुपित आहे. मुलगा किंवा मुलगी कसे ठरते, हे तर सरकारने एसटी स्टँण्डवर लावलेल्या फलकावरही लिहिले आहे. तेंव्हा भिडे गुरुजींच्या दावा सकृतदर्शनी किती हास्यास्पद आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
मुळात ८०% जोडप्यांना लग्नानंतर वर्षभरात दिवस रहातात. उरलेल्यातील १०% जोडप्यांना दुसऱ्या वर्षाअखेरपर्यंत दिवस रहातात. तेंव्हा कोणत्याही उपचाराची कामगिरी ह्या नैसर्गिक कामगिरीच्या तुलनेत सरस आणि चमकदार हवी. सरस आणि चमकदार म्हणजे काय याचे संख्याशास्त्रीय निकष उपलब्ध आहेत. आजची वंध्यत्वावरची औषधे या तत्वावर उत्तीर्ण ठरली म्हणूनच वापरात आहेत. उद्या आंबे ह्या परीक्षेस उतरले तर आम्ही ते वापरू. पण १५० जोडप्यांना दिवस राहिल्याची कथा हा पुरावा होऊ शकत नाही आणि पुष्कळ कथांचा मिळून आपोआप सबळ पुरावा (किंवा डाटा बेस) तयार होत नाही.
तेंव्हा आंबा- संतती संबंधाचा दावा तपासण्यासाठी अनेक कसोट्या पार पाडाव्या लागतील. पुराव्याचे देखील एक शास्त्र असते. आंबा खाऊन जोडप्यांना मुले झाली याचा अर्थ ती आंबे खाल्यामुळे झाली असा होत नाही. ‘अमुक’नंतर एखादी गोष्ट घडली म्हणजे ती ‘अमुक’मुळेच घडली असे नव्हे. पुराव्याच्या भाषेत याला ‘पोस्ट हॉक इर्गो प्रोक्तर हॉक’ गैरसमज, असे नाव आहे. आंबे खाणारी आणि न खाणारी जोडपी यांची तुलना, त्यातही विशिष्ठ बागेतले आंबे खाणारी जोडपी आणि इतरांचे आंबे खाणारी जोडपी अशी तुलना, असे किमान अभ्यास लागतील. शिवाय आंबे खाल्याने मुले होतात असे नसून आंबे खाल्याने चालू उपचारांचे यश वाढते असाही दावा करता येईल. तेंव्हा फक्त आंबे, फक्त उपचार आणि आंबे+उपचार (यात पुन्हा ते विशिष्ठ आंबे आणि इतरांचे आंबे असे उपप्रकार), असाही अभ्यास करावा लागेल.
आंबे खाणे हा पूरक उपचार जरी ठरला तरी ही अत्यंत क्रांतिकारी घटना म्हणावी लागेल. पण असे कोणी सिद्ध करणार तर नाहीच पण असा विचारही कोणी करणार नाही. महत्व पुराव्यासह सिद्धतेला नसून आंधळ्या विश्वासाला आहे. कारण तर्कबुद्धी गहाण ठेवून किती अनुयायी अतर्क्य दावा मान्य करतात यावर दावा करणार्यांचे महात्म्य ठरते.
पण असे दावे का केले जातात, का मानले जातात हे मात्र तपासायला हवे.
मूल होण्यामागे अनेक आग्रह असतात. जैविक प्रेरणेचा, उत्क्रांतीच्या स्पर्धेचा, सामाजिक संकेतांचा, असे अनेक. तेंव्हा वंध्यत्व म्हणजे ह्या सगळ्याच आघाड्यांवर अपयश. बायकांना तर हे सहन करणे अवघडच पण पुरुषांनाही काही कमी सोसावे लागत नाही. त्यामुळे वंध्यत्वावर मात करण्यासाठी प्रयत्न जबर. पण काहींच्या बाबतीत सर्व प्रयत्न थकतात.
सत्याचा स्विकार ही मोठी नादान चीज आहे. आपल्याला मूल होणार नाही किंवा ते होण्यासाठी जी उस्तवारी करावी लागेल त्यासाठीची शारीरिक, मानसिक, आर्थिक ताकद आपल्यात नाही हे जाणून अथवा अजाणता, माणूस चमत्काराच्या आणि चमत्कारिक भाकडकथांच्या मागे लागतो. स्वस्त, सोप्या, पण चमत्कृतीपूर्ण उपायांना, तोड्ग्यांना, व्रतवैकल्यांना सर्वाधिक मागणी असते. अर्थात समस्येच्या आणि समस्याग्रस्ताच्या स्तराप्रमाणे उपायातही प्रतवारी असते. झटपट समस्यापूर्तीची ही आखुडशिंगी, बहुदुधी, गाय प्रत्येकाला हवी असते. काही बुवा, बाबा, धर्मस्थळे, ही दुभती गाय पाळतात. नाम स्मरणापासून ते स्वत्व-विस्मरणापर्यंत अनेक तंत्रमंत्र विकतात आणि गबर होतात.
समस्येला थेट भिडण्यापेक्षा हे बरे. काहीतरी तरी केल्याचे समाधान. गंडे, दोरे, तंत्र, मंत्र आणि आंबे असे वृथा उपचार, असे कृतक समाधान देत असतात. पण यामुळे आधीच हतबल झालेला माणूस शारीरिक, मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या अधिक विकलांग होतो.
पण क्षणभर विचार केला तर असं लक्षात येईल की आंब्याची कथा भाकड खरीच पण विश्वरूपदर्शनाची कथाही भाकडच आहे. येशूच्या पुनरुथ्थानाच्या आणि मोहंमद पैगंबराची उडत्या घोड्यावरून स्वर्गारोहणाच्या कथाही भाकडच आहेत. पण या कथा सांगणाऱ्या पुस्तकांच्या लाखो प्रती रोज विकल्या जातात. ह्या कल्पना उराशी बाळगणारे सन्मान्य ठरतात. यातीलच काहींच्या (मोदी, सत्यपालसिंह, देब, दिनेशसिंह प्रभृती), काही दाव्यांच्या वाट्याला मात्र अशी टवाळी येते. राहुल गांधी शिवभक्त आहेत म्हणे. तेंव्हा गांगवतरण, हलाहल प्राशन आणि समोरची प्रत्येक चीज भस्मीभूत करणारा तृतीय नेत्र ह्या शिवलीला त्यांना मान्य असणारच. यावर फार खोलात विचार करणे अडचणीचे ठरू शकते. आपापल्या प्रिय पुराणपुरुषांच्या आणि महापुरुषांच्या कथा आपल्याला कधी भाकड वाटत नाहीत. आपापला देव आणि धर्म प्रत्येकाला प्यारा असतो. हिंदू माणूस अल्ला मानत नाही आणि मुसलमानांची खात्री असते की ‘येशूचा बाप’ असा कोणी आभाळात नाहीच. थोडक्यात स्वतःचा एक देव सोडल्यास इतर सर्वच देवांबाबत आपण ‘नास्तिक’ असतो.
पुराव्याचे शास्त्र निट न समजावून घेतल्याचे हे दुष्परिणाम. हेच असे नाही तर चुटकीसरशी डायबेटीस, दमा, कँन्सर, ब्लडप्रेशर, मतिमंदत्व, ई. नष्ट करणारे उपाय; हा हा म्हणता वजनाचा डोलारा उतरवून शरीर सुघटीत करणाऱ्या गोळ्या; चार वेळा चोळताच नवयौवनाची ग्यारंटी देणारी मलमे आणि होमिओपॅथीची औषधे खपतात; ते सारे यामुळेच. या आंब्याची पाळेमुळे अशी खोलवर रुजलेली आहेत. आता मॉन्सून आला आहे, आंबा आता उतरणार, मोसम संपणार, पण रसनिष्पत्ती सुरूच रहाणार असे दिसतेय.

Tuesday, 12 June 2018

सारखे ओटीपोटात दुखतेय


सारखं ओटीपोटात दुखतय
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.
ज्या तक्रारीमुळे पेशंट इतकेच डॉक्टरही वैतागतात अशी एक तक्रार म्हणजे, ‘सारखं ओटीपोटात दुखतंय.’ कितीही शोधा, कधीकधी काहीही थांग लागत नाही.
ही तक्रार तर कॉमनली आढळणारी. दहातल्या एक-दोन पेशंट तरी या तक्रारीसाठी येतात. असे पेशंट अनेक अवस्थांमध्ये आढळतात.
·       बहुतेकदा बरेच दिवस अंगावर काढलेले असते.
·       योग्य डॉक्टरला दाखवलेलेच नसते.
·       दाखवले असले तरी औषधे आणि तपासण्यांची यादी पाहूनच पेशंटने तो नाद सोडलेला असतो.
·       ‘इतपत दुखणारच’, अशी स्वतःची समजूत काढलेली असते.
·       ‘कुणाचाच काही फरक पडत नाही’, म्हणून दुखणे सोसायचे ठरवलेले असते.
·       योग्य औषधोपचार परवडत नाहीत म्हणून मग ‘त्यातल्यात्यात परवडणारे’, पण अर्थात निरुपयोगी, कृतक, उपचार चालू ठेवून पैसे वाया घालवलेले असतात. हे उपचार निव्वळ ‘उपचारच’ ठरतात.
·       ‘सगळेच रिपोर्ट नॉर्मल येतात’ ही खंत उरात बाळगून डॉक्टरला दूषणे देणे चालू असते.
व्याख्याच करायची झाली तर सहा महिन्यापेक्षा जास्त काळ ओटीपोटात दुखतय अशी तक्रार असेल तर त्याल क्रॉनिक पेल्व्हिक पेन असे म्हणतात. मग हे दुखणे सततचे असो वा अधून मधून.

बहुतेकदा एकचएक कारण नसते. शारीरिक कारणे असतात पण बरेचदा मानसिक कारणेही असतात; इतकेच काय सामाजिक, कौटुंबिक कारणेही असतात. मनातल्या, समाजातल्या आणि कुटुंबातल्या संघर्षाची, ओढाताणीची, वेदना अशी ओटीपोटात दाटून येते... आणि त्यामुळेच तपासणीत नेमके काही सापडत नाही.
एंडोमेट्रीओसीस, अॅडीनोमायोसीस, कटी भागातील अवयवांना सूज, मुत्राशयाला सुजेसारखी बाधा (Interstitial Cystitis), अंग बाहेर येणे, आधीच्या ऑपरेशनमुळे आतील अवयव एकमेकाला चीकटणे,   कमरेतील स्नायू, नसा (Nerves), हाडे, अस्थीबंध (Ligaments) यांचे आजार, आतड्याचे आजार (Irritable Bowel Syndrome), लैंगिक अतृप्ती, अत्याचार ही झाली शारीरिक कारणांची जंत्री.
वेदनेच्या वर्णनात जितका नेमकेपणा अधिक तितके निदान सोपे, सुकर. त्यामुळे स-विस्तार बोलणे अत्यावश्यक. पेशंटने आणि डॉक्टरनेही. त्रास वाढतो कधी? कोणत्या पोझिशनमध्ये दुखते? कोणत्या पोझिशनमध्ये बरे वाटते? बरे कशाकशानी वाटते? केंव्हा? किती? आजवर कोणकोणती औषधे घेऊन निरुपयोगी ठरली आहेत? शरीरसंबंध, शी-शू, पाळी, जेवणखाण, उपास यांनी काय फरक पडतो? अशी प्रत्येक मिती महत्वाची.
अशा दुखण्याची डायरी ठेवणे हा एक उत्तम मार्ग आहे. कसे, कधी, किती, केंव्हा, कुठे दुखते, हे नोंदवायचे. आहार, विहार, निद्रा, मैथुन आणि मनस्वास्थ्य हेही महत्वाचे. अशी सगळी नोंद ठेवायची. सहजासहजी लक्षात न आलेले कित्येक लागेबांधे या डायरीतून लक्षात येतात.
कटीभागातल्या प्रत्येक अवयवांच्या आजारामुळे अशी काही तक्रार उद्भवू शकते. एकूणच अशा पेशंटमध्ये, या भागाला कटीभाग म्हणण्यापेक्षा ‘कटकटी’भाग म्हणणेच संयुक्तिक! एकूणच कारण स्त्रीजननसंस्थेशीच संबंधित असेल असे नाही.  प्रसंगी अन्य तज्ञांच्या सहाय्याने कारणाचा शोध सुरु होतो. शारीरिक तपासणी, सोनोग्राफी, काही रक्त लघवीच्या तपासण्या हे नित्याचे. एमआरआय, लॅपारोस्कोपी, हे कधी कधी लागणारे तपास.
प्रत्येक तपासणीत काही तरी शोध लागतोच किंवा लागलाच पाहिजे असे नाही. तीस ते पन्नास टक्के वेळा काहीही सापडत नाही. काहीच शोध लागला नाही असे झाले की पेशंट वैतागतात, अगदी हिरमोड होतो काहींचा. भरोशाच्या तपासणीला...! तपासणी नॉर्मल आली याचा अर्थ ती अनावश्यक होती किंवा पैसे काढण्यासाठी केली गेली होती, असा यांचा पक्का ग्रह झालेला असतो. पण एका दृष्टीने अमुक अमुक तपासणीत सापडणारे डझनभर आजार नाहीत, हे निदान तरी पक्के झाले हे लक्षात घेतले पाहिजे. तपासणीत काहीही न सापडणे हे ही महत्वाचे असते. अशा केसेस मध्ये तर खासच. काहीही दुर्घर आजार नाही ही माहितीही आश्वस्त करणारी असते.
जर काही कारण सापडले तर त्यानुसार उपचार करता येतात. इरिटेबल बॉवेल असेल तर औषधांबरोबरच आहारात बदल उपयुक्त ठरतात, जंतू असतील तर तशी औषधयोजना करता येते. पाळीशी संबंधित वेदनेसाठी गर्भनिरोधक गोळ्या दिल्या जातात किंवा ‘मिरेना’ नावाचा कॉपरटी सदृष औषधी नग गर्भाशयात बसवला जातो. कधी कधी तपासण्या करण्यापेक्षा उपचार करून पहाणे, हीच परीक्षा योजली जाते. म्हणजे टीबीच्या औषधाने उतार पडला तर आजार टीबीचा होता; असे काही तरी. आधीच्या ऑपरेशनमुळे आतडी चिकटली असतील, तर दुर्बिणीतून शस्त्रक्रिया करून सोडवता येतात. पण किरकोळ चिकटाचिकटी असेल तर विशेष फरक पडत नाही. अजेय सूज किंवा गर्भाशय विकार असेल तर कधी पिशवी काढावी लागते.
तक्रारी गांभीर्यपूर्वक ऐकून घेणे, प्रत्येक तपासणीची तळमळीने, खुलासेवार चर्चा करणे आणि सहानुभूती, हीच औषधे काही वेळा जालीम ठरतात. होमिओपॅथी व तत्सम उपचारपद्धती उपयोगी ठरतात, ते त्यांच्या या सद्गुणामुळे.  
कशानेच फरक पडत नसेल तर  आजकाल खास वेदनातज्ञांचा सल्ला घेता येतो. निव्वळ वेदनेवर वार करणारे हे तज्ञ. कशानेच वेदना थांबत नसेल, तर योग्य त्या नसा निकामी करून, पेशंटला वेदनामुक्त करता येते.
किंचितकाळ खूप दुखणे सहन करणे एक वेळ सोपे म्हणता येईल पण रोजच किंचित, किंचित वेदना ही असह्य ठरते. भावनिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक सर्वच आघाड्यांवर ताण येतो. नैराश्य ग्रासते, झोप उडते. डॉक्टर आणि नातेवाईकही, ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशा भूमिकेत जातात.
म्हणूनच अशा क्रॉनिक आजारांसाठी पेशंटचे स्व-मदत गट खूप सहाय्यकारी ठरतात. वेदनेच्या या भवसागरात आपण एकटे नाही ही जाणीव उभारी देणारी ठरते. आजाराचा स्वीकार आणि जगण्याला आधार सापडतो. कोरडी सह-अनुभूती नाही तर रसरशीत  स्व-अनुभूती घेतलेली मंडळी इथे आपापले अनुभव मांडत असतात. आपल्याला गवसलेला मार्ग इतरांना दाखवत असतात. पण आपल्याकडे असे गट क्वचित आढळतात. नेटवर  नेटाने शोधूनही मला या आजारग्रस्तांचे  असे गट भारतात आढळले नाहीत. पेशंट आणि डॉक्टरनी आता यासाठी पुढाकार घ्यायला हवा.