Tuesday 12 June 2018

सारखे ओटीपोटात दुखतेय


सारखं ओटीपोटात दुखतय
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.
ज्या तक्रारीमुळे पेशंट इतकेच डॉक्टरही वैतागतात अशी एक तक्रार म्हणजे, ‘सारखं ओटीपोटात दुखतंय.’ कितीही शोधा, कधीकधी काहीही थांग लागत नाही.
ही तक्रार तर कॉमनली आढळणारी. दहातल्या एक-दोन पेशंट तरी या तक्रारीसाठी येतात. असे पेशंट अनेक अवस्थांमध्ये आढळतात.
·       बहुतेकदा बरेच दिवस अंगावर काढलेले असते.
·       योग्य डॉक्टरला दाखवलेलेच नसते.
·       दाखवले असले तरी औषधे आणि तपासण्यांची यादी पाहूनच पेशंटने तो नाद सोडलेला असतो.
·       ‘इतपत दुखणारच’, अशी स्वतःची समजूत काढलेली असते.
·       ‘कुणाचाच काही फरक पडत नाही’, म्हणून दुखणे सोसायचे ठरवलेले असते.
·       योग्य औषधोपचार परवडत नाहीत म्हणून मग ‘त्यातल्यात्यात परवडणारे’, पण अर्थात निरुपयोगी, कृतक, उपचार चालू ठेवून पैसे वाया घालवलेले असतात. हे उपचार निव्वळ ‘उपचारच’ ठरतात.
·       ‘सगळेच रिपोर्ट नॉर्मल येतात’ ही खंत उरात बाळगून डॉक्टरला दूषणे देणे चालू असते.
व्याख्याच करायची झाली तर सहा महिन्यापेक्षा जास्त काळ ओटीपोटात दुखतय अशी तक्रार असेल तर त्याल क्रॉनिक पेल्व्हिक पेन असे म्हणतात. मग हे दुखणे सततचे असो वा अधून मधून.

बहुतेकदा एकचएक कारण नसते. शारीरिक कारणे असतात पण बरेचदा मानसिक कारणेही असतात; इतकेच काय सामाजिक, कौटुंबिक कारणेही असतात. मनातल्या, समाजातल्या आणि कुटुंबातल्या संघर्षाची, ओढाताणीची, वेदना अशी ओटीपोटात दाटून येते... आणि त्यामुळेच तपासणीत नेमके काही सापडत नाही.
एंडोमेट्रीओसीस, अॅडीनोमायोसीस, कटी भागातील अवयवांना सूज, मुत्राशयाला सुजेसारखी बाधा (Interstitial Cystitis), अंग बाहेर येणे, आधीच्या ऑपरेशनमुळे आतील अवयव एकमेकाला चीकटणे,   कमरेतील स्नायू, नसा (Nerves), हाडे, अस्थीबंध (Ligaments) यांचे आजार, आतड्याचे आजार (Irritable Bowel Syndrome), लैंगिक अतृप्ती, अत्याचार ही झाली शारीरिक कारणांची जंत्री.
वेदनेच्या वर्णनात जितका नेमकेपणा अधिक तितके निदान सोपे, सुकर. त्यामुळे स-विस्तार बोलणे अत्यावश्यक. पेशंटने आणि डॉक्टरनेही. त्रास वाढतो कधी? कोणत्या पोझिशनमध्ये दुखते? कोणत्या पोझिशनमध्ये बरे वाटते? बरे कशाकशानी वाटते? केंव्हा? किती? आजवर कोणकोणती औषधे घेऊन निरुपयोगी ठरली आहेत? शरीरसंबंध, शी-शू, पाळी, जेवणखाण, उपास यांनी काय फरक पडतो? अशी प्रत्येक मिती महत्वाची.
अशा दुखण्याची डायरी ठेवणे हा एक उत्तम मार्ग आहे. कसे, कधी, किती, केंव्हा, कुठे दुखते, हे नोंदवायचे. आहार, विहार, निद्रा, मैथुन आणि मनस्वास्थ्य हेही महत्वाचे. अशी सगळी नोंद ठेवायची. सहजासहजी लक्षात न आलेले कित्येक लागेबांधे या डायरीतून लक्षात येतात.
कटीभागातल्या प्रत्येक अवयवांच्या आजारामुळे अशी काही तक्रार उद्भवू शकते. एकूणच अशा पेशंटमध्ये, या भागाला कटीभाग म्हणण्यापेक्षा ‘कटकटी’भाग म्हणणेच संयुक्तिक! एकूणच कारण स्त्रीजननसंस्थेशीच संबंधित असेल असे नाही.  प्रसंगी अन्य तज्ञांच्या सहाय्याने कारणाचा शोध सुरु होतो. शारीरिक तपासणी, सोनोग्राफी, काही रक्त लघवीच्या तपासण्या हे नित्याचे. एमआरआय, लॅपारोस्कोपी, हे कधी कधी लागणारे तपास.
प्रत्येक तपासणीत काही तरी शोध लागतोच किंवा लागलाच पाहिजे असे नाही. तीस ते पन्नास टक्के वेळा काहीही सापडत नाही. काहीच शोध लागला नाही असे झाले की पेशंट वैतागतात, अगदी हिरमोड होतो काहींचा. भरोशाच्या तपासणीला...! तपासणी नॉर्मल आली याचा अर्थ ती अनावश्यक होती किंवा पैसे काढण्यासाठी केली गेली होती, असा यांचा पक्का ग्रह झालेला असतो. पण एका दृष्टीने अमुक अमुक तपासणीत सापडणारे डझनभर आजार नाहीत, हे निदान तरी पक्के झाले हे लक्षात घेतले पाहिजे. तपासणीत काहीही न सापडणे हे ही महत्वाचे असते. अशा केसेस मध्ये तर खासच. काहीही दुर्घर आजार नाही ही माहितीही आश्वस्त करणारी असते.
जर काही कारण सापडले तर त्यानुसार उपचार करता येतात. इरिटेबल बॉवेल असेल तर औषधांबरोबरच आहारात बदल उपयुक्त ठरतात, जंतू असतील तर तशी औषधयोजना करता येते. पाळीशी संबंधित वेदनेसाठी गर्भनिरोधक गोळ्या दिल्या जातात किंवा ‘मिरेना’ नावाचा कॉपरटी सदृष औषधी नग गर्भाशयात बसवला जातो. कधी कधी तपासण्या करण्यापेक्षा उपचार करून पहाणे, हीच परीक्षा योजली जाते. म्हणजे टीबीच्या औषधाने उतार पडला तर आजार टीबीचा होता; असे काही तरी. आधीच्या ऑपरेशनमुळे आतडी चिकटली असतील, तर दुर्बिणीतून शस्त्रक्रिया करून सोडवता येतात. पण किरकोळ चिकटाचिकटी असेल तर विशेष फरक पडत नाही. अजेय सूज किंवा गर्भाशय विकार असेल तर कधी पिशवी काढावी लागते.
तक्रारी गांभीर्यपूर्वक ऐकून घेणे, प्रत्येक तपासणीची तळमळीने, खुलासेवार चर्चा करणे आणि सहानुभूती, हीच औषधे काही वेळा जालीम ठरतात. होमिओपॅथी व तत्सम उपचारपद्धती उपयोगी ठरतात, ते त्यांच्या या सद्गुणामुळे.  
कशानेच फरक पडत नसेल तर  आजकाल खास वेदनातज्ञांचा सल्ला घेता येतो. निव्वळ वेदनेवर वार करणारे हे तज्ञ. कशानेच वेदना थांबत नसेल, तर योग्य त्या नसा निकामी करून, पेशंटला वेदनामुक्त करता येते.
किंचितकाळ खूप दुखणे सहन करणे एक वेळ सोपे म्हणता येईल पण रोजच किंचित, किंचित वेदना ही असह्य ठरते. भावनिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक सर्वच आघाड्यांवर ताण येतो. नैराश्य ग्रासते, झोप उडते. डॉक्टर आणि नातेवाईकही, ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशा भूमिकेत जातात.
म्हणूनच अशा क्रॉनिक आजारांसाठी पेशंटचे स्व-मदत गट खूप सहाय्यकारी ठरतात. वेदनेच्या या भवसागरात आपण एकटे नाही ही जाणीव उभारी देणारी ठरते. आजाराचा स्वीकार आणि जगण्याला आधार सापडतो. कोरडी सह-अनुभूती नाही तर रसरशीत  स्व-अनुभूती घेतलेली मंडळी इथे आपापले अनुभव मांडत असतात. आपल्याला गवसलेला मार्ग इतरांना दाखवत असतात. पण आपल्याकडे असे गट क्वचित आढळतात. नेटवर  नेटाने शोधूनही मला या आजारग्रस्तांचे  असे गट भारतात आढळले नाहीत. पेशंट आणि डॉक्टरनी आता यासाठी पुढाकार घ्यायला हवा.

No comments:

Post a Comment