Friday 30 October 2015

गर्भस्य कथा रम्या

गर्भस्य कथा रम्या
डॉ. शंतनू अभ्यंकर, मोबाईल ९८२२० १०३४९
      “काय करा हे मी तुम्हांला सांगितलं, तसं आता काय करू नका हेही सांगतो” या वाक्याशी येईपर्यंत माझ्या आवाजाला एक विशिष्ठ धार चढलेली असते. थोडी दमदाटी, थोडी समजूत, थोडं आर्जव असा मिश्र खमाज लागतो. माझ्या उजव्या हाताची तर्जनी जोरजोरात नाचवत उपस्थित नजरांना नजर देत मी म्हणतो, ‘काय वाट्टेल ते झालं तरी गावठी, झाडपाल्याचं औषध करू नका. कोणी सांगेल काडी घालून खाली करून देते, कोणी पोट चोळून खाली करून देते म्हणतील; पण कृपा करून यातलं काही करू नका.” माझा आवाज आणखी चढतो, भेदक होतो. डोळे वटारले जातात आणि मी म्हणतो... “असं केलंत तर तुमच्या मुलीचे प्राण जातील! ती मरेल!”
      समोरचे पालक दचकतात, पण मनातल्या मनात. परिस्थितीनं त्यांना पार हतबल केलेले असतं. या वाक्यानंही न दचाकण्याइतके ते निबर झालेले असतात. करणार काय? लेकीला लग्नापूर्वीच चांगले पाचच्या वर महिने गेलेले असतात! पाचव्यानंतर गर्भपात करणं बेकायदेशीर आहे. सबब “तुम्ही मुलीला ती प्रसूत होईपर्यंत महिलाश्रमात ठेवा आणि प्रसुती झाल्यावर मूल अनाथाश्रमाला देऊन तुम्ही मुलीला घरी आणा.” मी पोटतिडकीने सांगत असतो. हा मार्ग सनदशीर आणि मुलीच्या दृष्टीने सर्वात सुरक्षित आहे हे मला पटत असतं, पण त्यांना जाम पटत नाही. मी तऱ्हेतऱ्हेने माझा मुद्दा मांडत असतो आणि ते मख्ख बसलेले असतात. “तुम्हीच कायतरी करा, मुलीला मोकळी करा!” एवढंच त्यांचं पालुपद. मीही माझा हेका सोडत नाही, कारण माझ्या डोळ्यासमोर सोनाली जाधव तरळत असते.
      सोनाली जाधव. तरणीताठी, उफाड्याची, देखणी, सतत विनाकारण हसणारी, जगात चिंता आहे हे गावीच नसणारी. दोन घट्ट वेण्या, छाती जरा जास्त पुढे काढून चालण्याची ढब, शाळेच्या युनिफॉर्ममध्येच मधल्या सुट्टीत, रणरणत्या उन्हात, धापा टाकत माझ्या केबिनमध्ये घुसली होती ती.  म्हणाली, “डॉक्टर मला दिवस गेलेत! खाली करायचंय, काय घ्याल?” तिचा बिनधास्तपणा पाहून मी आश्चर्यचकित झालो.
      “नाव काय तुझं?” चेहऱ्यावर काही न दाखवता मी विचारलं.
      “सोनाली जाधव.”
      “कितवीला आहेस?”
      “सहावीत. पण दोनदा फ्येल झाल्येय!” तिनं गडबडीनं खुलासा करत ती ‘मोठी’ असल्याचं स्पष्ट केलं.
      “आई-वडील?”
      “शेतात आहेत.”
      “बरोबर नाही आले ते?”
      “बरोबर कोणी नाही.”
      “किती महिने गेलेत?”
      “असतील दीड न्हाईतर दोन.. मागच्या आठवड्यात लय उलट्या झाल्या.”
      “तू आई-वडिलांना घेऊन येशील?”
      “दोघांना?”
      असं वाटावं, की कुणा एकाला ही आणू शकणार आहे.
      “कोणीही एक आलं तरी चालेल?”
      “पण घरी हे कसं सांगणार?”
      “सांगावंच लागेल. कायद्यानं तुम्ही सज्ञान नाही. १८ वर्षांखालील असल्याने अॅबॉर्शन करायला कायदेशीर पालकांची, म्हणजे आईवडीलांची सही लागते.”
      “लांबचा मामा चालेल?”
      म्हणजे हिचा मित्र हाच लांबचा मामा. मला मामा बनवायला बघते काय?
      “नाही, आई किंवा वडील पाहिजेत.”
      “बघा नं जमतंय का डॉक्टर...” आता आवाजात अजीजी.
      मी “नाही जमत” असं तुटक उत्तर देऊन टेबलावरची बेल खण् खण् वाजवतो. माझ्या बेलचा आणि देहबोलीचा तिच्यावर काहीच परिणाम होत नाही.
      “तुम्हीच हे करू शकता डॉक्टर... प्लीऽऽज..”
      “तुम्ही आईवडिलांना घेऊन या, मगच मी तुम्हाला तपासतो आणि सांगतो.”
      दार उघडतं, सिस्टर आत ओघळतात आणि उघड्या दारातून बाहेरच्या गर्दीचा कोलाहलही. मग मी अस्वस्थ होतो. बाहेरच्या नजरा डॉक्टरभेटीसाठी नंबर लागण्याची वाट बघत असतात, पण हिला मात्र त्या नजरा तिच्याकडेच संशयाने बघताहेत असं वाटतं. पण क्षणभरात ती लगेच सावरते, ताठ होते आणि निश्चयाने ताडताड निघून जाते.
      पेशंटची रीघ सुरु होते ती अगदी पाच वाजेपर्यंत. कुणाला असलेलं नकोय तर कुणाला हवं असताना राहात नाहीये; कुणाला पांढऱ्याचा त्रास तर कुणाला लालचा. पहिल्यापासून नवव्यापर्यंत महिने, तक्रारी, सोनोग्राफ्या, तपासण्या, पेशंटनी घेतलेल्या माझ्या उलटतपासण्या.. वेळ कसा गेला हे समजलंच नाही.. मध्येच एक डिलिव्हरी, एक क्युरेटींग... ५ वाजता मी राउंड घेऊन जिना उतरू लागलो तर जिन्याच्या अंधारातून सोनाली जाधव अचानक पुढ्यात उगवली....
      “डॉक्टर, प्लीज, बघा ना.” तिची आर्जवं. जिन्याच्या दुसऱ्या टोकाला दोन धट्टीकट्टी जवान पोरं उभी होती. त्यांची नजर भलतीकडे, पण लक्ष आमच्याकडे लागलं आहे हे मी क्षणात ताडलं. हेच ‘ते’ असावेत. “आई-वडिलांपैकी कोणालाही घेऊन ये; नाही तर तुझं वय १८ पेक्षा जास्त असल्याचा पुरावा तरी घेऊन ये.” मी निक्षून सांगितलं आणि तिच्या प्रतिक्रियेची वाट न बघता माझी वाट गडबडीने चालू लागलो.
      कामाच्या रामरगाड्यात मला ह्या घटनेचा विसरही पडला. अशा चौकश्या नित्याच्याच. विशेषतः नव्यानं प्रक्टिसमध्ये जम बसावणाऱ्याकडे. अशा डॉक्टरला प्रॅक्टीस हवी असते आणि अशा पेशंटला सस्त्यातली, झटपट, गुपचूप आणि लवचिक सेवा. ‘सटवाईला नाही नवरा आणि म्हसोबाला नाही बायको’ यातला प्रकार. मीही त्यावेळी म्हसोबा असल्याने अशा सटवाया नेहमीच्याच. अशा विवाहपूर्व गर्भार राहिलेल्या मुलींना ‘कुंती’ म्हणण्याचा प्रघात आम्ही कॉलेजमध्ये असल्यापासून आहे. थोडी गंमत, थोडी कुचेष्टा आणि आगंतुक कानसेनांपासून गुप्तता पाळण्याचा प्रयत्न, अशा साऱ्या छटा या कुंती नावामध्ये होत्या.
      एके दिवशी दुपारी मोबाईल ओळखीची धून गाऊ लागला. माझा मित्र डॉ. सागर याचा फोन होता.
      “बोल सागर.”
      “एक कुंती आहे, septic abortion आहे, gasping आहे. ये लगेच.”
      मी तडकाफडकी निघालो. कुंती आणि gasping म्हणजे भलताच गंभीर मामला होता. कायदेशीररीत्या गर्भपात करायचा तर तसा परवाना लागतो. डॉ. सागर हा गायनॉकॉलॉजिस्ट नव्हता; होता सर्जन. त्याच्याकडे असा परवाना नव्हता. गावाकडच्या प्रथेनुसार तो येईल त्या पेशंटवर (येतील ते) उपचार करायचा. अपेंडिक्स, हर्निया वगैरेची ऑपरेशन्स लीलया करायचा. तसाच गर्भपात, गर्भपिशवी काढणे वगैरेही करायचा. अति उत्साहाच्या भरात त्याच्या हातून काहीना काही गोच्या होत राहायच्या. मग समव्यावसायिक मित्रांना बोलावून सारं निस्तरणं ह्यात त्याचा हातखंडा होता. मुळात अशी कुंती त्यानं स्वीकारायला नको होती. (आमच्यासारखा तज्ज्ञ गायनॉकॉलॉजिस्टनी मग काय करायचं?) आता अॅबॉर्शन होऊन वर इन्फेक्शन झालंय, म्हणजे ह्याच्या हातूनच काहीतरी झालं असणार. निर्जंतुकीकरण करताना निष्काळजीपणा झाला असणार.
      ह्याच्या दवाखान्यात इतकी गर्दी, की निष्काळजीपणा स्वाभाविकच म्हणायचा. (आणि त्या गर्दीबद्दलची माझी असूयाही तितकीच स्वाभाविक.) आता पोलीसी खटलं मागे लागणार. बेकायदा गर्भपात आणि त्यातून मृत्यू म्हणजे पोलिसांची चंगळच. ह्या झेंगटातून सुटण्यासाठीच सागरने माझा धावा केला होता.
      इतका सगळा विचार होईपर्यंत मी सागरच्या दवाखान्यात पोहोचलो देखील. तिथे नेहमीचीच गर्दी, गडबड, गोंधळ वगैरे...! हा पठ्ठ्याही त्याच्या केबिनमध्येच पेशंट तपासत असल्याचं बाहेरच्या सिस्टरनी सांगितलं.
      मी त्याच्या केबिनमध्ये शिरताच तपासत्या पेशंटमधून डोकं वर काढून तो मला म्हणाला, “सुटुपॅक!”
      एखादा रुग्ण दगावला असं सांगणारा हा कॉलेजमधला सांकेतिक शब्द. ‘सुटुपॅक’ हे शस्त्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या एका धाग्याचे नाव आहे. ‘सुटला’ म्हणण्याची ही वैद्यकीय तऱ्हा.
      “काय?” स्वतःच्या दवाखान्यात स्वतःच्या पेशंटचा असा अपमृत्यू झाल्यानंतरही हा हिमनगासारखा शांत कसा?
      “अरे, आणली तेव्हा pulseless आणि gasping होती. तुला फोन केला आणि arrest मध्ये गेली ती गेलीच. Beyond salvageच होती रे ती!”
      पुढ्यातला पेशंट हे सारं माझ्या इतकंच कान देऊन ऐकतोय, हे लक्षात येताच तो सावरला. पेशंटला आणि नातेवाईकांना बाहेर जायला सांगून मला तो झाली घटना सांगू लागला.
      “झेड.पी.च्या शाळेतील मुलगी आहे. Thirty two weeksची तरी pregnancy असेल.”
      “अरे, पण मग तू कशाला abort करायला गेलास?”
      “मी कशाला काय करतोय? कुठेतरी quack कडे जाऊन vagina त काड्या घालून आलेत.”
      “काय?”
      “सगळा vagina puss नी भरलाय, जाम वास मारतोय. आतून तपासलं तर काड्या हाताला लागतायेत!”
      “बापरे! पोलिसांना inform केलंस?”
      “नाही रे, कशाला?”
      “वेडा का काय? Septic abortion आणि death is a serious matter.”
      “पाच महिन्यांपूर्वी गेली होती म्हणे तुझ्याकडे...?”
      “आं!! सोनाली जाधव का नाव तिचं?”
      “अंहं. वनिता चंदने!”
      “तीच ती असेल, तर नाव खोटं सांगितलं तिने मला. कसल्या तयारीच्या असतात या पोरी.”
      “तुझ्याकडे तू सांगितलंस आईवडिलांची सही पाहिजे.”
      “मग बरोबरच आहे, minor आहे ती, कायद्यानं सज्ञान नाही.”
      “तुझं बरोबरच आहे. पण ही घरी सांगायला घाबरली आणि मग अशा कुठेतरी जाऊन काड्या घालून घेतल्या!!”
      “तीच ती असणार. अशी एक केस आईवडिलांना घेऊन यायला सांगून परत पाठविली होती मी. तिच्याबरोबर २ बॉयफ्रेंड होते..”
      धाडकन् दार उघडून दोन पोरं आत आली.
      सागरला म्हणाली, “नेऊ का बॉडी?” आणि मला पाहताच जागच्या जागी थिजून उभी राहिली.
      तीच ती दोघं ‘सोनाली जाधव’बरोबर माझ्या दवाखान्यात आलेली. मुर्दाड चेहऱ्यांनी ती दोघं उभी होती.
      सागरनं त्यांना बाहेर थांबायला सांगून वर दटावलं. दार बंद होता होता तो मला म्हणाला.. “बाहेर कोपऱ्यात उभे होते ते तिचे आईवडील.”
      ती मुलं आता येता येता उघडमिट करणाऱ्या दारातून मला त्यांचं ओझरतं दर्शन झालं होतं, पण त्यांचे चेहरे माझ्या मनावर तप्तमुद्राच उमटवून गेले. निर्विकारपणाचे बुरखे पांघरलेले ते चेहरे. पण त्या बुरख्याच्या आरपार आतलं सगळंच दिसत होतं. साऱ्या दुनियेची विषण्णता, पराभव, शरम, राग, हतबलता यांचा उसळता डोंब दाटला होता त्यांच्या चेहऱ्यावर. एकेक भावनेची एकेक लाट बाकीच्यांना मागं सारत चेहऱ्यावर उमटण्यासाठी उसळत होती. त्यांच्या बाकी शरीरात जीवच नव्हता जणू. भिंतीवर ठोकलेल्या बिनदोऱ्याच्या कठपुतळी बाहुल्यासारखी ती दोघं जिन्याखालच्या कोपऱ्यात भिंतीला लोंबत टेकली होती. त्यांच्या दोऱ्या नियतीने कापल्या होत्या जणू. पोटच्या गोळ्याचा असा अंत त्यांनी स्वप्नातही कल्पिला नव्हता. एका उमलत्या जीवाचा करुण अंत पाहून माझ्या पोटात कालवाकालव होत होती. उगीचच नजर डॉ. सागरच्या बंद दरवाज्याकडे वळत होती. त्या दरवाज्यावरती चिकटवलेली शुभ्रवस्त्रांवृता नर्स माझ्याकडे डोळे वटारून पाहत, तोंडावर बोट ठेवून सांगत होती, ‘शांतता राखा’.
      पुन्हा एकदा दार उघडलं आणि दोन पोलीस आत आले. पुढे काय रामायण घडणार ह्याची कल्पना असल्याने मी तिथून निघालो. माझ्या दवाखान्यात माझी वाट बघणारी गर्दी मला दिसत होती.
      संध्याकाळी उशिरा दवाखान्यात सगळी झाकपाक झाल्यावर शिरस्त्याप्रमाणे आम्ही मित्र कॉफीच्या अड्ड्यावर जमलो. डॉ. सागरने मग ‘सोनाली जाधव’ च्या कथेतल्या रिकाम्या जागा भरल्या.
      दोन महिन्यांची गरोदर असताना ती माझ्याकडे आली होती पण ती वयाने लहान (कायद्याने अज्ञान) असल्यामुळे मी तिला आईवडिलांना घेऊन यायला सांगितलं. कायदाही मोठा विचित्र होता. कोणतीही स्त्री १६ वर्षानंतर शरीरसंबंधास अनुमती देऊ शकते. पण जर गर्भधारणा झाली, तर गर्भपात करून घेण्याचा कायदेशीर अधिकार तिला नाही. तो १८ वर्षांनंतर प्राप्त होतो. तत्पूर्वी गर्भपातासाठी तिचे कायदेशीर पालकच संमती देऊ शकतात.
      या साऱ्या कायदेबाजीत मला अजिबात अडकायचं नव्हतं. सबब कायद्यावर बोट ठेवून मी मोकळा झालो. पण या विधी-लिखीतात ‘सोनाली जाधव’ मात्र अडकत गेली.
      मी कटर मारल्यावर सोनाली आणि दोन जवान पोरांनी हरप्रयत्ने गर्भपात करायचा प्रयत्न केला. कुठे पपई खा, कुठल्या बिया चघळ, कसला काढा पी, अगदी पोटावर लाथा घालण्यापर्यंत सर्व प्रकार केले. पण ढिम्म फरक पडेना. दरम्यान वैद्यकीय उपचार, संमती आणि पैसा याचा काही मेळ बसेना. दिसामासांनी सोनालीच्या पोटातला गर्भ मात्र वाढत होता. मध्यंतरी घरदार सोडून ती तिघंही २-३ दिवस भिरीभिरी फिरत राहिली. आत्महत्येशिवाय त्यांना पर्याय दिसेना. हायवेवरच्या कुठल्याशा हॉटेलमध्ये तिघंही विष पिऊन जीव देणार होते. त्या हॉटेल मालकाला त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे त्यांनी त्यांना घरी पिटाळलं. इतकं सगळं होईपर्यंत घरच्यांना कुणकुण लागलीच होती. तिला कोंडून ठेवणं, मारझोड करणं वगैरे रीतसर झाल्यावर हिच्या आईनीच तिला त्या मुलांच्या मदतीने डोंगरावरच्या दरेवाडीतल्या बाईकडे नेऊन ‘औषध’ घेऊन दिलं. त्यातून उद्भवलेलं आजारपण अब्रूपायी आठवडाभर घरातच अंगावर काढलं. शेवटी जेव्हा ती मरणपंथाला लागली, तेव्हा आईवडिलांचा जीव राहीना. तिला दवाखान्यात आणली, तो ती गेलीच.
      पुढे पोलीस पंचनामा, पोस्टमॉर्टेम वगैरेंमुळे जी गोष्ट ह्या कानाची त्या कानाला कळू द्यायची नव्हती, ती जगजाहीर झाली. आईवडिलांनी, त्या दोन मुलांनी वगैरे सगळ्यांनीच या सगळ्या प्रकरणी कानावर हात ठेवले. तिला गर्भ राहिल्याचं, तो पाडल्याचं वगैरे त्यांना माहित नसल्याचं त्यांनी सांगितलं. आई-वडिलांनी बॉडी ताब्यात मिळताच तिला थंडपणे अग्नी दिला. कोरड्या मनाने आणि कोरड्या डोळ्यांनी. त्यांच्या लेखी लेकीचा अंत हे एक दुःस्वप्न होतं. घाटावरून घरी जाताच ते संपणार होतं.

      दोन दिवसांनी पेपरमध्ये त्या दोन मुलांनी स्मशानातच गळफास लावून आत्महत्या केल्याची सनसनाटी बातमी छापून आली. मृत व्यक्तींच्या खिशात अथवा घरी चिठ्ठीचपाटी न सापडल्यानं आत्महत्येचं कारण पोलिसांना कळू शकलं नव्हतं.

Thursday 15 October 2015

कटिंग



हजाम
डॉ.शंतनू अभ्यंकर, वाई (जि. सातारा), पिन ४१२८०३.   मो.क्र. ९८२२० १०३४९

हजाम हा काही लक्षात रहाण्यासारखा किंवा ठेवावा असा प्राणी नाही. खरं तर हे आम्हां डॉक्टरांचे पूर्वसुरी. ‘रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स’सुद्धा पूर्वी ‘रॉयल कॉलेज ऑफ बार्बर सर्जन्स’ होतं. पण आमच्या ‘फॅमिली डॉक्टरनी सांगितलंय’ची सर,  ‘आमच्या फॅमिली न्हाव्यानी सांगितलंय’ला नाही. तुंबड्या लावणे, जळवा लावणे, गळू कापणे वगैरे कामं ह्यांची. यातूनच आधुनिक शल्यशास्त्राचा उदय झाला म्हणे. शिवाय रिकामपणी भिंतीला तुंबड्या लावणे, राजाचे कान गाढवाचे असल्याचे झाडाच्या खड्ड्यात सांगणे आणि मधून मधून एखाद्याची बिनपाण्याने करणे हीही अनुषंगिक कामे आहेत.
मलाही बरेच न्हावी घडले. अगदी खुंटावरच्या बलभीमपासून ते पंचतारांकित हबीब पर्यंत. बहुतेक अगदीच अनइंटरेस्टींग होते. त्यांनी डोई  उरकताच माझ्या गळयाभोवतीचं कापड झटकलं, तेंव्हाच त्यातल्या केसाबरोबर हे ही विस्मृतीत गेले.  पण तरी काही माणसं लक्षात रहातात; ती त्यांच्या स्वभावामुळे. ती मला भेटली, ती न्हावी रुपात एवढंच. ती पेट्रोलपंपावर असती तरी लक्षात राहिली असती आणि आगबंबावर असती तरी लक्षात राहिली असती.
पण ह्या सगळ्या न्हाव्यात प्रथम स्मरणाचा मान, माझ्या आयुष्यातल्या  पहिल्या न्हाव्याला, खंडू न्हाव्याला.
दर पंधरा दिवसांनी हा घरी यायचा आणि सगळ्यांची भादरून मोठया दिमाखात निघून जायचा. तो अगदी काळा कुळकुळीत होता. इतरांचं कटिंग करता करता त्याला स्वतःच्या कटिंग-दाढीला वेळच मिळत नसावा. डोई आणि चेहराच नव्हे तर त्याच्या सर्वांगावर पोमेरीअन कुत्र्यासारखे  चांगले केसच केस उगवले होते; आणि हे सगळे केस एकजात पांढरे होते.   पण स्वताःच्या केसालाही धक्का न लावणारा हा इसम माझ्या चिमुकल्या काळजाचा मात्र थरकाप उडवायचा.
खंडूकडून माझी डोई करून घेणं हा एक मोठा कार्यक्रमच असायचा.  तो आला की मी धुमचकाट पळायचो. थोडावेळ पकडापकडीचा खेळ चालायचा. ह्याचंच रुपांतर कधी कधी लपाछपीत व्हायचं. शेवटी एकदाचा मी घरच्यांच्या तावडीत सापडायचोच. मग मी  भोकाड-अस्त्राचा वापर करायचो. हे अस्त्र घरच्यांपुढे अगदीच निष्प्रभ होतं. त्यांच्यावर काही परिणाम व्हायचा नाही.  सगळे मिळून धरून बांधून  मला त्याच्या पुढे बसवायचे.  मी आणखी जोरात रडायचो. पण खंडू जणूकाही बासरी वाजते आहे अशा तन्मयतेने हात चालवायचा. डाव्या हाताच्या खरखरीत पंज्यात माझं डोकं गच्चंम धरून उजव्या हातानं तो त्याचं ‘मिशिन’, मानेवर, कानामागे, भोवऱ्यात, कपाळावर असं संधी मिळेल तसं चालवायचा. या असल्या कटिंग नंतर माझ्यापेक्षा बुजगावणंसुद्धा देखणं दिसत असणार.
अर्थात माझ्याइतकं हिंस्र गिऱ्हाईक खंडूला अजिबात आवडायचं नाही. त्याचं आवडतं गिऱ्हाईक म्हणजे शेजारचे भाऊराव. ह्यांची सहनशक्ती दांडगी होती. डोई खंडूच्या हाती देऊन हे अगदी स्वस्थ बसत. केस, कल्ले, दाढी, मिशा, काखेतले केस, कानातले केस, नाकातले केस, हाताची नखं, पायाची नखं, मान मोडणे, पाठ मोडणे, कान मोडणे, डोळ्यात फुंकर घालणे आणि मूळव्याधीला औषध लावणे; इतकी सगळी कामं ते बसल्या बैठकीला करून घेत. तिकडे खंडूला जॉब सॅटीसफॅक्शन होतं. त्या मानानी मी, म्हणजे अगदीच श्वापद. मी न रडता नुसता बसलो तरी खंडूला कृतकृत्य वाटायचं.
कधी कधी फारच रंगात आला तर खंडू गोष्ट सांगायचा. म्हणायचा, ‘डाक्तरसायेब, भ्वॉकाड बंद करा बघू!’ ही त्याची खास भाषा होती. माझे वडील डॉक्टर, त्या मुळे तो मला त्या वयातही डॉक्टर म्हणायचा. आजोबा वकील, त्यामुळे वडलांना तो धाकलं वकील सायेब म्हणायचा.
‘डाक्तरसायेब, भ्वॉकाड बंद करा बघू!’ खंडू.
‘भॉsss...आय...आय...आय...’ मी.
‘डागदर सायब, ऐका की जरा, गपा...’ खंडू.
त्याची गोष्टही ठरलेली असे. पुंड्या नावाचा एक मुलगा वाडगाभरून खीर हवी म्हणून हट्ट करतो. शेवटी घरातली बाकी सगळी मंडळी पुंड्याला माळ्यावर ठेऊन जत्रेला जातात. तिकडे ती जिलबी खातात, साखरेची चित्र खातात, चक्रात बसतात आणि इकडे पुंड्या  मात्र माळ्यावर रडत बसतो. गोष्टीच्या शेवटी पुंड्याला विंचू चावतो आणि तो माळ्यावर तळमळत असतानाच घरची मंडळी परततात आणि त्याला डॉक्टर कडे घेऊन जातात. तिथे त्याला वृश्चिकदंशावर उतारा म्हणून इंजेक्शनदंश झाला, की आटोपली गोष्ट. विंचू आणि इंजेक्शन या गोष्टी फ्लेक्सिबल होत्या. मी खंडूला त्या दिवशी किती त्रास दिलाय ह्यावर विंचवाचं वागणं अवलंबून असे.
या गोष्टीवरून मी काहीतरी धडा घ्यावा असं खंडूला वाटत असावं. पण माझे आईवडील जिलबी आणि साखरेची चित्र खाण्याची मुळीच शक्यता नव्हती. उघड्यावरचे पदार्थ खाऊ नयेत असं त्यानीच मला सांगितलं होतं. शिवाय चक्रात बसायची मला जाम भीती वाटत असल्यामुळे चक्रवाली जत्रा मला मुळीच आवडायची नाही.
कटिंग झाली की अंघोळ. अंघोळीच्या वेळी खंडूनी कुठे कुठे शस्त्र चालवलेलं आहे ते बरोब्बर कळायचं. कारण कढत पाण्यात सगळ्या जखमा चुरचुरायच्या. गरम पाणी, चुरचुरणाऱ्या जखमा, बंबाचा धूर आणि साबण यातून एकदाचा बाहेर पडलो की मला पुनर्जन्म झाल्यासारखं वाटायचं.
पुढे खंडू गेला पण जगातल्या कुठल्याही न्हाव्यासमोर धिटाईनं उभं रहायचं धैर्य देऊन गेला. आता बाजारातल्या बाळू न्हाव्याच्या दुकानात माझी रवानगी होऊ लागली. बाळू न्हावी अगदी मिरासदारांच्या गोष्टीतल्या न्हाव्यासारखा होता. एक नंबरचा गपिष्ट. सर्व पोरांचा दोस्त. सर्व पोरं त्याला येता जाता ‘बाळ्या, काळ्या, उंदीर चाळ्या’ म्हणून चिडवायची.
बाळूचं दुकान म्हणजे मोठा मझा होता. अगदी छोटंसं बसकं दुकान, रस्त्यावरून दोन पायऱ्या उतरून, बुटक्या चौकटीतून आत जायचं. आत सारवलेली ‘जिमीन’, रंगाचे पोपडे उडालेल्या भिंती, वर बाभळीचे वासे, पेट्रोमॅक्सच्या धुरानं पार काळेबेंद्रे झालेले. भिंती वरच्या दोन आरश्यांसमोर दोन डुगडुगणाऱ्या खुर्च्या, एका कोपऱ्यात दुकानाच्या फळ्या काढून बांधलेल्या आणि दुसऱ्या कोपऱ्यात वस्तऱ्याला धार लावायचा चामडी पट्टा. शिवाय खुंटीला टपली मारली की चालू आणि पुन्हा मारली की गप्प होणारा एक रेडीओ, भारतमातेचं एक कॅलेंडर, वाळका हार-उदबत्ती-धुराची पुटं वगैरे सहित दत्ताची तसबीर  आणि ‘संत सेना महाराज नाभिक समाजोन्नती समाजाचं’ दरपत्रक. एका खुर्चीखाली सिंहासन! सिहासन म्हणजे पोरांना बसायला एक छोटी, गोल, ऊंच, बाकरवडीच्या आकाराची गादी. लहान मुलाचं कटिंग करताना ही खुर्चीत ठेऊन त्यावर पोराला बसवलं जाई. दुकानाच्या आत बाहेर दोन बाकडी. पण बाळूच्या दुकानात कधीही जा, बाकडेफुल्ल गर्दी ठरलेली. याचं मुख्य कारण म्हणजे बाळूचा विलक्षण बोलका स्वभाव. समोरच्याला तो हा हा म्हणता गुंगवून टाकायचा. लहान मुलांना तर खासच. खंडूची ती पुंड्याची गोष्ट, बाळूच्या कथाकथनासमोर काहीच नाही.
दरवर्षी तुफान पाऊस झाला की नदीला पूर ठरलेला. नागपंचमीला नदीकाठच्या वाळवंटातल्या दगडी नागोबाला  पाण्याचा वेढा पडायचा. पाण्यातूनच पूजेला जावं लागायचं. पुलाच्या कमानीला पाणी टेकायचं. अशी ओढ असायची पाण्याला की भले भले पोहायला घाबरायचे. अशाच एका दिवशी पुलावरून आपण कशी उडी ठोकली याची कथा बाळूनं आम्हाला अगदी रंगवून रंगवून सांगितली होती. तो तुफान बरसणारा पाऊस, रोरांवणारं पाणी, बघ्यांची हीsss गर्दी. अशातच पुलाच्या कठड्यावरून बाळूनं बेधडक उडी ठोकली आणि सपसप, सपसप हात पाय मारत तो पलीकडे पोचला देखील! वाट काढताना त्याचं शरीर अगदी देवमाशासारखं लवलवत होत म्हणे. एवढंच नाही तर पलीकडे पोचताच भर पुरात तो पुन्हा निघाला आणि पुन्हा या बाजूला आला!! हे सारं ऐकूनंच आमचा बाल-कलेजा खलास  झाला. पुरात उलटया दिशेनी पोहणारा हा नरपुंगव  आपलं कटिंग करतोय हे आपले केवढं भाग्य,  या कल्पनेनं, अगदी भरून आलं. इतक्यात बाळूला पुरतं ओळखून असणारं एक गिऱ्हाईक मला म्हणालं, ‘अरे पुलावरून त्यांनी उडी ठोकली हे खरं, पलीकडे पोचून परतला हे ही खरं; पण कठड्यावरून त्यानी उडी मारली ती पाण्यात का रस्त्यावर ते विचार की!’
छान, म्हणजे हा देवमासा, भर पावसात, फक्त रस्ता क्रॉस करून परत आला होता तर!
ह्याच बाळू न्हाव्यानं एकदा, मला दोन भोवरे असल्यामुळे माझी दोन लग्नं होणार असं जाहीर केलं. शाळेत मुलांनी चिडवून चिडवून अगदी भंडावून सोडलं. एकानं तर दोन भोवरे विरुद्ध दिशांना असल्यामुळे दोन्ही बायकांशी माझं भांडण होणार असंही भाकीत वर्तवलं.
बाळू केस अगदी बारीक कापत असे. तश्या सक्त सूचनाच होत्या बाळूला, माझ्या घरून. माझे केस ताठ, राठ वगैरे असल्यामुळे डोक्यावर अगदी सरळ उभे रहात. संत मंडळींच्या मागून जसे प्रकाशाचे किरण येताना दाखवतात, तशी माझ्या डोक्यातून  ही केसांची किरणं उगवत असत. त्यामुळे काही मित्र मला काटेसाळू म्हणायचे. त्यातून ते दोन भोवरे, त्यामुळे मला भुईचक्कर असंही एक नाव मिळालं होतं. काहींनी माझे केस जास्त कडक आहेत का मोरी घासायचा ब्रश, या वर आपापसात पैजा लावल्या.
मी मात्र या सगळ्या प्रकाराने अगदी वैतागून जायचो. केस बसावेत म्हणून मग मी सुचतील ते प्रयत्न केले. घट्ट टोपी घालून झोपलो, चप्प भांग पाडून उन्हात उभा राहिलो, खूप प्रकार प्रकारची तेलं लावली, एकदा तर कच्च्या अंडयानं अंघोळ केली! पण व्यर्थ! कोणीतरी सांगितलं केस पूर्ण कापा, पुन्हा पहिल्यापासून वाढवा. मग चकोट केला . मित्रांच्या टपला सहन केल्या. पण केसांनी आपला स्वाभिमान सोडला नाही. मोडेन पण वाकणार नाही हा त्यांचा बाणा. उभे केस बसावेत म्हणून मी जीवाचं रान केलं आणि आज पोरं चांगले बसलेले केस उभे करण्याच्या खटाटोपात  असलेली दिसतात. त्यासाठीची क्रीमं, तेलं, जेलं, मेणं सर्रास वापरली जातात. मी तेव्हा काळाच्या कितीतरी पुढे होतो तर! माझ्या केसांशी उभा दावा मांडूनही केस बसायचं नाव घेईनात. शेवटी वैतागून मी केस वाढवायचे ठरवले. स्वतःचेच वजन न पेलल्यामुळे केस माना टाकू लागले. मी मनातल्या मनात जाम सुखावलो. केसांना आता मी पुरतं नमवलं होतं. पण हे सूखही फार काळ टिकलं नाही. एकदा भर वर्गात आमच्या हिंदीच्या सरांनी खड्या आवाजात सवाल केला, ‘क्यूं बे, बालहत्या कब होगी?’
मी गोंधळलोच. पण थोड्याच वेळात प्रश्नाचा रोख ओळखून म्हणालो, ‘उद्या सर.’
घरी येऊन आईला सांगितलं, ‘केस उभे राहू नयेत म्हणून मुद्दाम वाढवलेत अशी चिठ्ठी दे.’
आई म्हणते कशी, ‘काही नको, कापूनच ये उद्या, नाहीतरी बालोद्यानात मित्र खेळायला यायला लागलेच आहेत.’
नाईलाजानं दुसऱ्या दिवशी मी आपला बाळूच्या दुकानी सिंहासनावर हजर.
जरा वेळ बसलं की बाळूच्या दुकानात एक एक पात्र एन्ट्री टाकून जायचं. नेने नावाचा एक अर्धवट माणूस यायचा आणि मान वर करून पाणी, नाकानी पिऊन दाखवायचा. त्याच्या टाळ्याला भलं मोठ भोक होतं. त्यानी जांभई दिली की ते भोक दिसायचं सुद्धा, अगदी आत लोंबणाऱ्या शेंबडासकट! ते बघायला आम्ही शर्थ करत असू. ज्याला दिसेल तो मुलगा इतरांना अगदी रसभरीत वर्णन ऐकवायचा. टाळ्याला भोक असल्यामुळे त्याचे उच्चार समजणं महाकठीण. एकदा दुकानात आलेल्या कुण्या पाहुण्याबरोबर तो काहीतरी हुज्जत घालत होता. पण काही वेळाने नेने तावातावानं  काय बोलतोय याचा पाहुण्याला जाम पत्ता लागेना. पावणा म्हणतो कसा, ‘अहो, मराठीत बोला मराठीत!”
‘अओ अअं काअ कअंताय? मंआटीतच बोअतोए, मंआटीतच बोअतोए!!’ नेने.
पाहुण्याचा आणि नेन्याचा हा संवाद ऐकून आम्ही खो खो हसत सुटलो.

भिकी म्हणून एक भाजीवाली यायची. अत्यंत किडकिडीत, पिंजारलेले पांढरे केस आणि मशेरी लावून काळे झालेले दात.  बाळूच्या दुकानाच्या दारातच पथारी टाकायची. मग बाळूची आणि तिची चांगलीच जुंपायची. शेवटी ती थोडी बाजूला सरकायची, पण सरकता सरकता अशा काही शिव्या द्यायची की त्याचं नाव ते. शिव्या देताना तिच्या जिभेवर सरस्वती नाचायची. (भाषेमध्ये शिव्याही येत असल्यामुळे ती वाग्विलासिनी याही कलेची अधिष्टात्री असणारच.)  शिव्या देण्याचा तिचा पर्फोर्मन्स प्रेक्षणीय, श्रवणीय आणी प्रसंगोपात अनुकरणीय असाच होता. तो तीनही  सप्तकात लीलया फिरणारा आवाज, ते नादमय यमक आणि अनुप्रास, ‘भ’चे ते भयाकारी उच्चारण, ते वटारलेले ताबडे लाल डोळे, ते हातवारे, बोटांच्या अत्यंत सूचक हालचाली... तिच्या शिव्यांमध्ये मंत्रसामर्थ्य होतं जणू. समोरच्यावर इष्ट परिणाम लगेच दिसत असे. हा अनुभव मी स्वतः घेतला आहे. पुढील आयुष्यात  माझा किडलेला दात काढण्यासाठी ज्या वेळी मला जबरदस्तीने डेंटीस्टच्या खुर्चीत डांबण्यात आलं तेव्हा मीही भिकी-प्रकोप-अस्त्राचा वापर केला. माझी रसवंती ऐकून त्या डेंटीस्टनं जो आ वासला, तो अजून मिटला नाही म्हणतात.
ही भिकी चांगली लिहायवाचायची. मटक्याचा आकडा लावायची. मंडईतल्या हमालांना व्याजाने पैसे द्यायची आणि आपल्या जिभेच्या जोरावर वसूलही करायची. रोज विकत घेऊन पेपर वाचायची. तिच्या त्या पेपर वाचनाला पोरं हसली की कर्कश्श, किरट्या आवाजात  म्हणायची, हसू नको एsss ****च्या, ‘ज’ आणि ‘झ’ मधला फरक कळतो मला! बरीच वर्ष मी यावर बारकाईनं विचार करतोय; मराठी भाषा एका मर्मभेदी सत्य सांगणाऱ्या वाक्प्रचाराला मुकली असंच मला वाटतं!!  
रोज सकाळी हरणाबाईची सून यायची बाळूकडे. छकड्यात घालून आणलेलं, विकलांग हरणाबाईचं मुटकुळं कोपऱ्यावर उतरवून ती दुकानात यायची. दिवसभर हरणाबाई फुलं, हार, गजरे  विकत बसायची. फूल ना फुलाची पाकळी खपत असेल. कधी कधी तर, ना फूल ना फुलाची पाकळी. पण ‘घरच्या कोपऱ्यात बसण्यापरीस हिथं बसलं तर चार पैशे तरी मिळतील’; असा सुनेचा हिशेब होता. बाळूचं आणि हरणाबाईच्या सूनेचं ‘आहे’ असं मोठी लोकं बोलायची. हे जे काही ‘आहे’ ते म्हणजे नेमकं काय आहे ते मला काही समजायचं नाही. पण हरणीची सून लांबून दिसली की बाळू अंतर्बाह्य बदलायचा. त्याचा हात संथावायचा. नजर तिच्यावर खिळलेली. गप्पा बंद. दुकानात अचानक एक अवघडलेली शांतता पसरायची. कुणी पेपरात डोकं घालायचा, कुणी रस्त्यावर जाऊन उगीचंच विरुद्ध बाजूला नजर लावून बघायचा. दातकोरणी, कानकोरणी कुरकुरू लागायची. झपतालात पावलं टाकत ती यायची, बाकाखाली ठेवलेली हरिणीची फुलांची टोपली घ्यायची आणि हरिणीला दुकान लावून द्यायला त्याच तालात ती कोपऱ्यावर नाहीशी व्हायची. गोरी, घारी, हनुवटीवर  गोंदण आणि कपाळी लालभडक चिरी  मिरवणारी ती, जातांना बाळूला; ‘हाय मी मळ्यात’ किंवा ‘हाय मी घरात’; यातला काहीतरी निरोप पुटपुटायची. पण ‘मळ्यात’ म्हणजे ‘घरात’ आणि ‘घरात’ म्हणजे ‘मळ्यात’ हे सगळ्या गावाला ठाऊक होतं.
कपाळावर भलंथोरलं टेंगुळ असलेला गज्या ही दुकानात यायचा. म्हणजे तो यायचा नाही. लोकंच त्याला बोलवायची. आपला कार्यभाग आटोपेपर्यंत ही फुकटची करमणूक छान होती.
‘काय गज्या झालं का जेवण?’
‘होsss परवाच!’ गज्याचं भरघोस उत्तर.
गज्याचं जेवण हे असंच चार दोन दिवसांनी एकदा या पद्धतीनं चालायचं. कारण पंचक्रोशीत कुठेही काहीही कार्य असू दे, जिथे जेवणावळ तिथे गज्या हजर. लाचार, भुकेल्या  चेहऱ्यानं अगदी पहिली पंगत बसायच्या आधीच हा दारात उभा रहायचा. कधी काही बोलायचा नाही, मागायचा नाही. लोकं त्याच्याकडे सराईत पणे दुर्लक्ष करायची. हा तितक्याच सराईतपणे त्यांच्या दुर्लक्षाकडे दुर्लक्ष करायचा. येता जाता मुलं चिडवायची, ‘गज्या रे गज्या, काय तुझी मजा; टेंगुळ वाजवतंय बेंडबाजा!’ हा मात्र अन्नावर वासना ठेऊन दारात मख्खासारखा उभा. यजमानही दोन तीन वेळा दारी येऊन त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवून आत नाहीसे व्हायचे. पण गज्या ढिम्म जागचा हलायचा नाही. ऊन रणरणायला लागायचं. सावल्या पायाखाली गोळा व्हायच्या. पण तश्श्या फुफाट्यात गज्या दाराशी उभाच असायचा. अगदी शेवटची पंगत बसायला लागली की गज्या हळूच जावून पानावर बसायचा. आता या आगंतुक पाहुण्याला पानावरून उठवणार कोण? मनातल्या मनात चरफडत, पानापुढे आदळआपट करत  गज्याला वाढलं जायचं. क्वचित कुणी मायेनं वाढायचं देखील, पण क्वचितच. तोही हुं म्हणून आकंठ जेवून घ्यायचा. उद्याची शाश्वती काय सांगावी? तोरणाचं असो मरणाचं असो, गज्याचं पान ठरलेलं. जाताना उगाच पत्रावळी उचल, खरकटं गोळा कर असं केल्यासारखं करून गज्या धूम ठोकायचा. वर बाळूच्या दुकानात आला की गज्याची अन्न टिपण्णी सुरु.  ‘त्या सुलाबाईची पोरगी... चंद्रा, गेली न्हाय का ती यष्टी खाली सापडून...तीचं बरं का, म्हणजे तिच्या वेळेला सुलाबाईचं मी डोहाळजेवण जेवलोय!’ गज्याला डोहाळजेवणही वर्ज्य नव्हतंच. ‘पुढे चंद्रीचं बारसं जेवलो, लग्न जेवलो, तीचं डोहाळजेवण जेवलो, तिच्या मुलीचं बारसं जेवलो आन चंद्री गेली तर तीचा तेराव्वाबी जेवलो!’
मारवाड्याचं, छगन म्हणून एक छंदी फंदी पोरगं यायचं आणि दुकानातल्याच सिने मासिकातले धर्मेंद्रचे फोटो दाखवून तश्शी स्टाईल कर म्हणायचं. बाळू जमेल तेवढं करायचा आणि म्हणायचा, ‘हं झालं’. पोरगं खुर्चीतनं उठायला लागलं की म्हणायचा ‘थांब. थांब. जरा पुन्हा बस.’ मग बाळू बराच वेळ त्याचा चेहरा निरखून बघायचा. एकदा थेट, एकदा आरशात. त्याची मान एकदा इकडे करून, एकदा तिकडे करून; खाली, वर...मग स्वतःची मान तितक्याच प्रकारे फिरवून हे निरीक्षण चालायचं. डोळे बारीक केलेले, जीभ दातात घट्ट धरलेली, श्वास रोखलेला; मधूनच मासिकातला रेफरन्सच्या फोटोचा अभ्यास, मधूनच छगनच्या केश कलापाकडे दृष्टीक्षेप ...  बाळू इतक्या तल्लीनतेनं हे करायचा, की असं वाटायचं; छगनचा धर्मेंद्रच काय, मनात आणलं तर बाळू धर्मेंद्रचाही छगन करेल! मग दुकानातली इतर गिऱ्हाईकं  छगनच्या या जावळात सामील व्हायची. ‘बाळू, इकडून थोडा कट मार रे’, ‘तिकडून उचलून मागे घे बरं केस’; अशा सूचना चालू व्हायच्या. बऱ्याच वेळा, बऱ्याच वेळ, बऱ्याच ठिकाणच्या झुल्फांची काट-छाट केल्यावर आणि त्या पोराला दोन तीनदा खुर्चीवर चढ-उतर केल्यावर मगच बाळूचं समाधान व्हायचं. हे झालं की छगनची विशेष न आलेली दाढी करण्याचा कार्यक्रम व्हायचा. आलेली दाढी करणे हा या ह्जामतीचा उद्देश नसून, दाढी आलेली आहे हे भासवणे हाच प्रमुख उद्देश होता. त्यामुळे दाढीची लवलवही भादरायची छगनला भारी हौस. छगन हे ‘भारी’ गिऱ्हाईक. बाकीच्या गिऱ्हाईकांसाठी दाढीचा  गोदरेजचा गोल साबण असायचा. पण छगनशेटसाठी महागाईचा, सुवासिक, ट्यूबमधला, खास साबण. मग सर्व चेहऱ्यावर ब्रश घुमवत घुमवत साबण फासला जायचा. त्या ठिपकाभर साबणाचा तोंडभर फेस होताना पहाण्यात आम्ही दंग व्हायचो. ते फेसाळतं तोंड आरशात निरखताना छगन अगदी तृप्त दिसायचा. छगनशेटची हजामत वस्तऱ्यानी नाही तर ब्लेडनं व्हायची. वस्तऱ्याच्या दाढीपेक्षा ब्लेडच्या दाढीचे दर चढे होते. मग बाळू ब्लेडच्या छोट्याश्या पाकिटातून नवं पान काढणार, ते निम्मं तोडणार, मग वस्तऱ्याच्या खाचेत ते सरकवणार. फेसाच्या ढगातून वस्तऱ्याचे लयदार फटकारे एखाद्या चित्रकाराच्या तल्लीनतेनं ओढले जायचे. मधूनच छगनची चेहरे-पट्टी आणि मधूनच फेसाच्या लाटा अशी शोभा दिसायला लागायची. उजव्या हातानी वस्तरा ओढला की त्यावरचा फेस बाळू डाव्या अंगठ्याखालच्या उंचवट्यावर पुसायचा. टप्प्याटप्प्यानं श्मश्रू पूर्ण झाली की पुन्हा एकदा फेस, पुन्हा एकदा पाट काढणे, पुन्हा एकदा गुळगुळीत चेहरा! असं चांगलं तीन डाव तरी करणार. छगन आता चिकणाचोपडा दिसायला लागायचा.  मग छगनच्या चेहऱ्यावर पाण्याचा फवारा मारून, तुरटी फिरवली जायची.  ठिकठिकाणी अफगाण स्नोचे ठिपके लावले जायचे. मग ते पसरत पसरत सगळीकडे फासले जायचे. यावर पावडरचा थर, मग अत्तराचं बोट. छगनचा तर कायाकल्प व्हायचा जणू. अखेरीस मानेभोवतीचे कापड काढून मानेवर पावडरचा शेवटचा पफ फिरवून छगनला पायउतार होण्याची विनंती व्हायची. आरशात बघत मान उडवून, झुल्फ विस्कटून, पुन्हा मानेच्या झटक्यासरशी पूर्ववत करत छगन कंगवा ताब्यात घ्यायचा. आधी मोठया दातांनी, मग बारीक दातांनी अशी कंगव्याची करामत चालायची. अखेर मनासारखा भांग पडला की खुंटीवरचा सॅटीनचा डगला चढवून, सोन्याची चेन त्याच्या बाहेर ओढून, शीळ घालत स्वारी बराच वेळ  आरशात बघत रहायची.  छगन इतका खूष, की बाळूच्या हातावर थेट वीस रुपायची नोट टेकवून छगन चंटगिरी करायला बाहेर. वीस ही रक्कम एरवीच्या दरापेक्षा निदान तिप्पट होती.
छगनचा जाडगुला बाप याच्या एकदम उलट. केस कापुन झाले की हा महाकाय  अगदी वक्रतुंड करून बाळूला निम्मेच पैसे द्यायचा. वर म्हणणार, ‘तीण रुप्याच्च काम सांगिटलं, एक रुप्प्याच्च केलंस, पण राहू दे, हा घे दीड रुपिया. तूsss, तिन्नी मुलगेsss, ने दोन मुल्लीsss, तुझी बायडी, घरच्ये शगळे,  चैन करा... हॅ... हॅ... हॅ’
शिवाय जर्रा डोकावणारी गिऱ्हाईकं हा ही एक घटक होता. हे येणार, आरशात बघून भांग पाडणार; मिशा दाढी, मेंदी, कलप यातील जे लागू असेल त्याचं निरीक्षण करणार आणि बाळूला म्हणणार, ‘जरा एवढं-एवढं कर रे बाळू.’
मग मिशीला कट मारण्याच्या मिषानं बाळूच्या गप्पा सुरु. बाळूच्या दुकानातल्या संवादांनी मला वैश्विक भान आलं!
‘हळदीला भाव काय आला?’... मिशा कट!
‘परवीनबाबीला येड लागलं आहे...’ दाढी शेपमध्ये!
‘मंज्याचा मुलगा सुटलावता; त्यो परत आत गेला का?... गेला?... आता या बारीला का म्हनून गेला?...’ कल्ले वर!
‘आवा जाये पंढरपुरा, येशी पासून येई घरा’ असं तुकारामबोवानी म्हण्लेल्च ह्येsss ए... ए... ए...  आक्च्ची!!’... नाकातले केस कलम!
‘येरवड्याहून कोन कधी बरं होऊन येतंय व्ह्य!’... कलपाचा एकच फटकारा फक्त!
‘पाकीस्तानचं आता काही खरं नाही.’... फक्त भांग!
‘च्या मायला त्या जेम्स बॉन्डच्या; दिसंल ती बाई पटवतंय...’ तंबाकू-चुनाडबी अदलाबदल.
अशा पद्धतीने बोल बोल म्हणता दोस्त बनणारा बाळू जगन्मित्र होता, साधा होता, छोटयाशा आयुष्याकडून त्याच्या छोट्याशाच अपेक्षा होत्या. त्याचं एक आमटीभात मंडळ होतं. दर अष्टमीला ही मंडळी हरिहरेश्वराच्या बखळीत चूल पेटवून आमटी भात जेवायची. फक्त आमटी भात. या आमटीसाठी भाजलेलं खोबरं, कांदा असं काय काय घालून  बाळू खास मसाला बनवायचा. खरपूस भात आणि मसालेदार आमटी असं आकंठ जेवून मंडळी सुस्तावली की बाळू हेमामालीनीला फोन करायचा.
हेमामालीनीला फोन, हा या अड्ड्यातला सगळ्यांचा आवडता कार्यक्रम होता. हवेतल्या हवेत कानाला फोन लावल्यासारखं करून बाळू सुरु व्हायचा; ‘...हा...हेल्लो..कोन? हेमा का? काय झाली का भांडी घासून?...’ इथून सुरुवात व्हायची. पुढे बाळूच्या किंवा अड्ड्यातल्या कुणाच्याही कौटुंबिक प्रश्नांना हेमा उत्तरं द्यायची... स्वतःची गाऱ्हाणी ती बाळूला सांगायची... धर्म्याचं घराकडे लक्षच नाही पासून सवतीची मुलं कशी त्रास देतात इथपर्यंत......यावर बाळू गंभीर पणे तोडगे सांगायचा...यात तीन एकादश्या कर पासून धर्मेंद्रच्या करगोट्याला बिब्बा टोचून बांध इथपर्यंत काहीही असायचं. खट्याळपणा, चावटपणा, आचरटपणा, अघोचरपणा अशी ठेसनं घेत घेत गाडी अश्लीलपणावर यायची...मंडळी लोटपोट हसून हसून लोळायला लागायची. ‘हिक्डं आलीस की ये गं दुकानात, पण आदी कार्ड टाक हा, चांगलं झ्याकपाक करून ठेव्तो दुकान!’ या आवातणावर फोन संपायचा.
पण हेमा कधीच न आल्यामुळे बाळूवर दुकान झ्याकपाक करण्याचा प्रसंग आलाच नाही. आयुष्यात त्यानी कधी दुकान रंगवलं नाही की फर्निचर बदललं नाही. गिऱ्हाईक यायचं ते बाळूशी गप्पा मारायला; आपापसात हास्यविनोद करायला. त्याच्या हस्ते डोई भादरून घेत घेत आम्ही लहानाचे मोठे झालो, कुणाचे काळ्याचे पांढरे झाले, कुणाचे होत्याचे नव्हते झाले. बाळूचे तर काळ्याचे पांढरे व्हायच्या आतच, पूर्णपणे होत्याचे नव्हते झाले होते. चिवट बाळू चांगला लांबलचक जगला. जावळही बाळू हस्ते आणि डोक्यावरचं छत्र हरपल्यावर चकोटही बाळूहस्ते असे कित्येक होते.  लांब स्थायिक झालेला  कोणी गाववाला परत आला की त्याची आल्यावर बाळूकडे चक्कर ठरलेली. कोण गेलं, कोणाला लॉटरी लागली, कोणाच्या कोर्टातल्या केसचं काय झालं हे सगळे अपडेट्स बाळू देत जायचा. बाळू हाच आमचा फेसबुकही होता, ट्वीटर होता आणि व्हॉट्सअॅपही.
देश फिरून, विदेश फिरून; फिरून मी गावी गेलो की मी देखील बाळूकडे जातो. बाळूची रवानगी आता दुकानाबाहेर झाली आहे. तिथेच पथारी टाकून तो बसतो. तो आता थकलाय. माझ्या सारखी जुनी गिऱ्हाईकं तेवढी करतो. नव्या फ्याशनी त्याला येत नाहीत म्हणतो. बाकी त्याचा मुलगाच बघतो दुकान. दुकानही वेडंविद्रं राहीलं नाही. आता तिथे नवीन इमारत आहे, नवीन झ्याकपाक दुकान आहे, एसी ची घरघर आणि टीव्हीची अखंड वटवट आहे. पण गिर्हाईक तोंड मिटून बसतं, मोबाईलमद्ध्ये माना घालून स्वतःशीच हसतं. मी गेलो की बाळू खुलतो. त्याच्या धोकटीतली शस्त्र परजत त्याच्या जिभेचा  पट्टा चालू होतो.
‘कोण गाव आलं म्हणायचं?’
‘पेरू!’
‘ह्ये गाव हाये व्ह्य?’
‘असा देश आहे.’
‘काय असतं तिथे?’
मग मी ‘काय असत तिथे’ ते सांगत रहातो. बाळूचे डोळे लकाकतात. तो म्हणतो ‘कुठले कुठले देश असतात जगाच्या पाठीवर; ती तरी गेली होती का नाही तिथे कुणाला ठाव’
‘कोण ती?’
‘आप्ली हेमामालीनी! आता विचारतोच फोन करून!’
बाळू खळखळून हसतो आणि रंगतदार गप्पांना उत येत जातो.