Tuesday, 20 June 2017

माझं बाळ नॉर्मल आहे का हो डॉक्टर?

माझं बाळ नॉर्मल आहे का हो डॉक्टर?
डॉ. शंतनू  अभ्यंकर, वाई,
मो. क्र. ९८२२० १०३४९

सोनोग्राफी करताना हा प्रश्न नेहमीचाच. अगदी स्वभाविक. निरागसपणे विचारलेला. पण डॉक्टरची महा-गोची करणारा. कारण ‘नॉर्मल’ म्हणायचं कशाला हा एक यक्षप्रश्नच आहे. पेशंटच्या मनातला नॉर्मलचा अर्थ आणि डॉक्टरच्या भाषेतला नॉर्मलचा अर्थ यांचा अर्थाअर्थी काहीही संबंध नसतो!! डॉक्टरच्या भाषेत नॉर्मल याचा अर्थ त्या त्या तपासणीच्या मर्यादेत जेवढं समजतं, तेवढंच नॉर्मल आहे असा होतो. पेशंटच्या मनातला अर्थ मात्र, ‘आत्ता तर तर सगळं काही ठणठणीत आहेच, पण या पुढेही हे असंच असणार आहे!’ असा काही तरी असतो. जीवनात ही घडी अशीच राहू दे, छाप हा अर्थ पुढे अनेक अनर्थांना जन्म देतो.
लोकांना असं वाटतं की सोनोग्राफीत सगळं सगळं दिसतं. असं काही नसतं. अनेक गोष्टी सोनोग्राफीत दिसत नाहीत.
सुरवातीला सगळेच अवयव अति-बारीक असतात त्यामुळे काहीच दिसत नाही. मग बाळाचं हृदय लुकलुकताना दिसतं. जीव रुजतोय याची ही पहिलीवाहिली आश्वासक खुण. मग मेंदू, लघवीची पिशवी असं काय काय दिसायला लागतं. कारण इथे ‘पाणी’ असतं. ज्या अवयवात ‘पाणी’ भरलेलं असतं अशा जागा आधी दिसतात. मेंदूत पाण्यानी भरलेली पोकळी असते, मूत्राशयात लघवी असते, म्हणून हे अवयव सहज दिसतात. इतरही अवयव असतात पण ते दिसत नाहीत. अवतीभोवती पाणी असलेलं बाळही छान दिसतं. सोनोग्राफी म्हणजे प्रतिध्वनींनी बनलेली प्रतिमा. अन्य प्रतिध्वनींच्या ‘पार्श्वकल्लोळा’वर ज्या भागाचा  प्रतिध्वनी उठून दिसतो तो तो भाग आपल्याला दिसतो. बाळ पाण्यात तरंगत असतं. पाण्याच्या प्रतिध्वनीच्या पार्श्वकल्लोळावर बाळाचे प्रतिध्वनी अगदी उठून दिसतात. बाळाची बाह्यरेषा अगदी छान दिसते. कित्येक डॉक्टरांच्या फायलींवर अशी चित्र आज विराजमान आहेत. पण बाळाच्या आतले अवयव हे बहुतेकदा एकाच तऱ्हेचे प्रतिध्वनी देतात. त्यामुळे आतले अवयव दिसणं अवघड. त्यातही वर उल्लेखल्या प्रमाणे मेंदू, मूत्राशय वगैरे सहज दिसतात.
बाळाच्या भोवती पाणी असेल तर बाळाचा सोनोग्राफीय अभ्यास सोपा. नसेल तर फार फार अवघड. आईचं वजन जास्त असेल, पोटावर चरबी खूप असेल, पहिला सीझरचा वगैरे काही व्रण असेल, जुळं, तीळं असेल, मशीन अत्याधुनिक नसेल, तर सोनोग्राफीत अडचणी फार. शिवाय सगळं सगळं बघायला वेळही बराच लागतो. सोनोग्राफीतलं दिसणं न दिसणं हे असं अनेक घटकांवर अवलंबून आहे. बहुतेकदा त्या त्या अवयवाची रचना दिसते, पण त्या त्या अवयवाचं कार्य समजत नाही. सोनोग्राफीत फुफ्फुस आहे हे दिसेल पण बाळाला श्वास घेता येईल का? ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची अदलाबदल होईल का? ते नाही दिसणार. मेंदू दिसतो, पण अक्कल नाही दिसत. डोळे दिसतात, पण नजर नाही दिसत. आतडी दिसतात, पण पचन होईल का हे सांगता येत नाही. फुफ्फुस, आतडी अशा अवयवांना पोटात काहीच काम नसतं. आईकडूनच या अवयवांची कामं होत असतात. लिव्हर, किडनी इत्यादी काम करतात, पण पूर्ण क्षमतेने नाही. त्यांच्याही कार्याची पूर्णांशाने पारख, ही जन्मल्यानंतरच होते. जन्मजात हृदयविकार हा देखील असाच एक त्रासदायक प्रकार. याचं निदान बरेचदा पाचव्या महिन्याच्या पुढेच शक्य होतं. छातीच्या पिंजऱ्यातला हा पक्षी, तो ही सतत फडफडणारा... याची नीटस तपासणी व्हावी कशी? इथं उडत्या पाखराची पिसं मोजणारेच हवेत. बाळांचं वजन हाही असाच गुंतागुंतीचा मामला. बाळाची वाढीची अंगभूत क्षमता आणि उपलब्ध पोषण याचं मिश्रण म्हणजे बाळांचं वजन. ते पुरेसं भरेल वा नाही हे आधी कसं सांगणार? पण वजन कमी आहे असं सांगितलं की हमखास विचारणा होते, ‘आधी कळलं नाही का?’
प्रसूतीपूर्व सोनोग्राफीच्या अशा अनेकानेक मर्यादा आहेत.
प्रत्येक तपासणीच्या मर्यादा प्रत्येक पेशंटला समजावून सांगणं शक्यच नसतं, आवश्यक मात्र असतं. हे समजावून सांगायचं तर शरीरशास्त्राचं काही किमान ज्ञान आधी अपेक्षित असेल, मग पुढे येईल ती अतिशय क्लिष्ट भाषा, किचकट जर-तरनी मढलेली विधानं आणि धोक्याची अनेक वळणं. परिपूर्णपणे ही माहिती द्यायची तर दोन तीन पानांचा ऐवज होईल, तो अति पातळ कागदावर, अति छोट्या टायपात छापावा लागेल. मग कर्जाच्या किंवा इंटरनेटच्या फॉर्मवर जसा ‘आय अॅग्री’ असा एक चौकोन असतो तसा चौकोन छापून त्याच्या खाली सही घ्यावी लागेल. अर्थात हे असं केलं, की कोणी ते वाचायच्या फंदात पडणार नाही. निव्वळ उपचार म्हणून सही केली जाईल, आपण बँकेच्या, इंन्स्यूरन्सच्या, जागेच्या खरेदी-विक्रीच्या, फॉर्मवर करतो तशी. म्हणजे पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. डॉक्टरबद्दलचा वाढता अविश्वास आणि ‘आधी कळलं नाही का?’ हा नवा आजार लक्षात घेता लवकरच असे फॉर्म पावलोपावली भरून घेतले जातील असं दिसतं.
नीट विचार केला तर लक्षात येईल की, ‘बाळ नॉर्मल आहे का?’ हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे; ‘सांगता येत नाही!’ बाळ हा एक सतत विकसित होत जाणारा, वाढणारा, नवेनवे गुण निर्माण होणारा जीव आहे. ज्या स्थितीत आपण ते तपासतो त्याबद्दल आज काहीतरी सांगता येईल पण उद्या काय घडेल, याची भविष्यवाणी नाही करता येणार. उदाहरणार्थ बाळ पोटात असताना भोवतालचं पाणी पितं. ते पाणी त्याच्या पोटातून पुढे पुढे सरकतं, आतड्यात पोहोचतं. ह्या पाण्यामुळे आतड्याची वाढ होते. पुढे हा पाण्याचा, त्यातील पेशींचा लगदा आणखी पुढे सरकतो. मोठ्या आतड्याची वाढ होते. बाळाची आतडी ही अशा पद्धतीनी तयार होतात. हे सर्व व्हायला अगदी नववा महिना उजाडतो. बाळाची आतडी, त्यांची हालचाल असं सगळं सुरवातीला दिसलं तरीही पुढे तो लगदा पोहोचेल का त्यांची वाढ होईल का? याबद्दल आपण सुरवातीलाच काहीही सांगू शकत नाही.
त्यामुळे बाळ नॉर्मल आहे का नाही, हे सांगता येत नाही. हा प्रश्नच चुकीचा आहे. चुकीचा प्रश्न विचारला की उत्तरही निरुपयोगी मिळणार. आपण आता प्रश्न बदलून विचारू आणि उत्तर मिळतंय का ते बघू. ‘माझ्या बाळामधे दोष असण्याची अवाजवी शक्यता आहे का?’, हा प्रश्न शहाण्यासारखा आहे.
ह्यात बाळात दोष असण्याची ‘वाजवी’ शक्यता गृहीत धरली आहे. हे महत्वाचं आहे. आपण काहीही कृती केली तरी काही तरी गोची होण्याची शक्यता असतेच. घरातून बाहेर पडताना पाय घसरून पडण्याची शक्यता आहे का?, असा प्रश्न विचारला तर उत्तर होकारार्थीच येतं. कारण अशी शक्यता शून्य कधीच असू शकत नाही. नवजन्माचंही असंच आहे. सुमारे २% बाळांना गंभीर व्याधी (उदाः हृदयविकार) आणि २% बाळांना किरकोळ स्वरूपाच्या जन्मजात व्याधी (एखादं बोटं जादा असणं) असतात. सोनोग्राफीत बाळ ‘नॉर्मल’ आहे असं सांगितलं जातं तेंव्हा त्याचा अर्थ, ‘बाळात दोष असण्याची अवाजवी शक्यता नाही’ एवढाच असतो. वाजवी शक्यता ही गृहीतच आहे.
वरील विवेचन सोनोग्राफी संदर्भात असलं तरी सर्व तपासण्या उपचार-प्रणालींना ते लागू आहे. प्रत्येकाच्या मर्यादा आहेत, त्या समजावून घेणं इष्टं आहे पण अवघड आहे. ‘आधी कळलं नाही का?’ ही भूमिका सोपी आहे आणि सोयीस्कर आहे. एकूणच तनमनाचा थांग कधीच गाठता येणार नाही हे मान्य करतानाच वैद्यकशास्त्राचा प्रयत्न धोका कमी करण्याचा असतो, तो शून्य कधीच होऊ शकत नाही.
“ज्ञानमार्गी ही बुद्धी सदा राहो, शल्यकर्मी कौशल्य प्राप्त होवो
थांग नाही तन-मनाच्या तळाचा, थिटे सारे पण यत्न सदा राहो.”
हे वैद्यक विश्वाचं प्रेरणागीत आहे.

पूर्वप्रसिद्धी दिव्य मराठी २०/०६/२०१७. या आणि अशाच इतर लिखाणासाठी माझा ब्लॉग जरूर वाचा <shantanuabhyankar.blogspot.in>


Tuesday, 6 June 2017

गुण गाईन आवडी.

गुण गाईन आवडी.
डॉ.शंतनू अभ्यंकर
वाई. मो. क्र. ९८२२०१०३४९
१९६० साली अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्यांच्या वापराला मान्यता मिळाली. आज उणीपुरी ५७ वर्ष या गोळ्या उपलब्ध आहेत. त्यांच्या फायद्या तोट्याबद्दल घमासान चर्चा झडल्या आहेत. पण गर्भनिरोधक साधनांचा सजग वापर आपल्याकडे अभावानेच आढळतो. बरेचदा ‘फॅमिली प्लॅनिंग’ म्हणजे ऑपरेशन, आणि तेही फक्त बायकांचंच असा घट्ट गैरसमज रुतून बसलेला दिसतो. प्रत्येक बाईनी ऑपरेशनच करायला पाहिजे असं काही नाही. गोळ्या किंवा कॉपर टी असे पर्यायही वर्षानुवर्ष निर्धोकपणे वापरता येतात. पण लक्षात कोण घेतो?
ह्या गोळीचे गुण काय वर्णावे. नीट वापरली तर ही जवळपास शंभरटक्के वेळा आपलं काम चोख करते. या गोळीमुळे आणि एकूणच गर्भनिरोधकांमुळे स्त्रीला शिक्षण, व्यवसाय यात पुढे जाण्याची संधी मिळते. ‘रांधा, वाढा, उष्टी काढा’, ‘पोरांचे लेंढार’ हे शब्दप्रयोगही आता हळूहळू इतिहास जमा होऊ लागलेत याच श्रेय ह्या गोळीला देखील आहे. स्त्रीला घराबाहेर पडण्याचं स्वातंत्र्य ह्या गोळीनीही दिलंय, निव्वळ समाज सेवकांनी नाही.
पण ‘गोळ्या घ्या’ म्हटलं की नवरोजींचा (सोबत असलेच तर) हटकून प्रश्न येतो, ‘पण डॉक्टर याचे काही साईड इफेक्ट तर नाहीत ना?’
काही वेळापूर्वी हाच लेकाचा चौकातल्या टपरीपाशी पान तंबाखू लावत बसलेला असतो. त्याआधी त्याची पानवाल्याशी तंबाखूच्या साईड इफेक्ट बद्दल चर्चा झडलेली असते का? अजिबात नाही. पण बायकोबद्दल हे नवरोजी फारच सावध असतात. असो, ‘गोळ्यांचे काही साईड इफेक्ट तर नाहीत ना?’ या प्रश्नाचं सविस्तर उत्तर बघू या.
गोळ्यांचे, इतर कुठल्याही औषधाचे असतात, तसे साईड इफेक्ट असतातच असतात. अजिबात साईडइफेक्ट नसणाऱ्या औषधाला मुळात इफेक्टच नसतो असं बेलाशक समजावं. त्यामुळे साईड इफेक्ट नसतात असं सांगणं म्हणजे अप्रामाणिकपणा तरी आहे किंवा अज्ञान तरी. पण हे झालं कायदेशीर उत्तर. हे साईड इफेक्ट किती प्रमाणात आढळतात? कोणते असतात? त्यातले सुसह्य कोणते असह्य कोणते असा सगळा साधक बाधक विचार करायला हवा. शिवाय गोळ्या किंवा इतर कोणतेही गर्भनिरोधक न वापरल्याचेही साईड इफेक्ट असतातच की! अशा वेळी नको असताना दिवस जातात. मग ते मूल पदरी तरी पडतं किंवा गर्भपात करावा लागतो. त्यातही धोके असतात. तेंव्हा गोळ्या घेतल्याच्या साईड इफेक्टची तुलना गोळ्या न घेतल्याच्या साईड इफेक्टशी करावी हे उत्तम.
त्यातल्या त्यात आढळणारे साईड इफेक्ट म्हणजे मळमळ, डोकेदुखी, एखादी पाळी चुकणं, स्तन हुळहुळे होणं. बहुतेकदा ह्या तक्रारी सुरवातीच्या काही महिन्यातच आपोआप ओसरतात. यामुळे कोणताही विशेष धोका संभवत नाही. त्रासदायक साईड इफेक्ट कुठले तेही बघुया. क्वचित या गोळ्यांनी खूपच नैराश्य येतं. पस्तीशी पुढच्या  आणि बिडी-सिगरेट फुंकणाऱ्या बायांनी ह्या गोळ्या घेतल्या तर रक्तात गुठळी होऊन काहीनाकाही त्रास होऊ शकतो. (अर्धांगवायू, पायावर सूज डी.व्ही.टी.) पण अशा वागणाऱ्या ललना आपल्याकडे फारशा नाहीत.
शिवाय साईड इफेक्ट म्हणजे तो वाईटच असला पाहिजे असं काही नाही. या गोळ्याचंच उदाहरण पाहू जाता यांचे फायदेशीर साईड इफेक्ट भरपूर आहेत. यामुळे निव्वळ गर्भनिरोधक म्हणूनच नाही तर इतरही अनेक आजारांसाठी या गोळ्या वापरल्या जातात.
अतिशय कमी अंगावरून जातं, हा एक साईड इफेक्टच आहे, अर्थात हवाहवासा. अंगावरून कमी गेल्यामुळे त्या बाईचा त्रास वाचतो, अॅनिमिया होण्याचं प्रमाण कमी होतं. या गोळ्यांमुळे पाळीच्या आधी होणारा त्रासही होत नाही. नाहीतर कित्येक बायकांना पाळीच्या आधी स्तनात दुखणे, कंबर दुखणे पासून ते मूड ऑफ होणे असे अनेक त्रास होतात. गोळीमुळे पाळीच्या वेळेला दुखतही नाही. ही गोळी चालू असेल तर एक्टोपिक प्रेग्नन्सी  रहात नाही (गर्भपिशवीच्या बाहेर गर्भ रहाणे). स्त्री बीज ग्रंथीमध्ये उद्भवणाऱ्या पाण्याच्या गाठी होत नाहीत (सिम्पल ओव्हेरियन सिस्ट), गर्भपिशवीच्या तोंडचा स्त्राव अतिघट्ट होतो त्यामुळे आत जंतूंना मज्जाव होतो, कटी भागातल्या अवयवांची इन्फेक्शन टळतात (पेल्व्हिक इनफ्लेमेटरी डिसीज). स्तनाचे अनेक साधेसे आजारही (बेनाईन ब्रेस्ट डिसीज) ह्या गोळीनी टळतात. ह्या गोळ्यांनी कोणत्याही प्रकारचा कॅन्सर होत नाही. उलट गर्भाच्या अस्तराचा आणि स्त्रीबीज ग्रंथीचा कॅन्सर होण्याची शक्यता या गोळ्यांमुळे कमी होते. अत्याधुनिक प्रकारच्या (लो-डोस किंवा अल्ट्रा लो-डोस पिल्स) गोळ्यांमुळे वजन वाढत नाही. (आणि वजन वाढणं हा काही जणींसाठी हवाहवासा साईड इफेक्ट असू शकतो) गोळ्या घेतल्याचा आणि ग्रीवेचा (सर्व्हीक्स) किंवा स्तनाचा कॅन्सर होण्याचा थेट संबंध नाही. यावर अधिक संशोधन चालू आहे. थोडक्यात साईड इफेक्ट असले तरी फायद्याचेच जास्त आहेत.
या गोळ्यांपायी पुढे मुलं होणार नाहीत अशीही एक समजूत आहे. ही ही  खोटी आहे. ह्या गोळ्या तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत. त्यांचा परिणाम त्या त्या महिन्यापुरता होतो. गोळ्या बंद केल्या की पुन्हा लगेच सुद्धा संतती राहू शकते.
काही वर्ष गोळ्या नियमित घेतल्या की मधेच बरेच पेशंट गोळ्या बंद करून टाकतात. मधे ‘विश्रांती’! असं काही करण्याची गरज नसते. वार्षिक आरोग्य तपासणी करत करत तुम्ही या गोळ्या अगदी म्हातारं होईपर्यंतही निर्धोकपणे घेऊ शकता.
गोळ्या चुकल्या, चुकून दिवस गेले आणि गोळ्या तशाच घेतल्या गेल्या तरीही हरकत नाही. दिवस असताना जरी ह्या गोळ्या घेतल्या गेल्या तरीही गर्भामध्ये कोणतीही विकृती उद्भवत नाही. जर त्या जोडप्याला ते मूल ठेवायचं असेल तर निर्धास्तपणे ठेवता येतं.
नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी तर ही पद्धत उत्तम म्हटली पाहिजे. अतिशय खात्रीशीर, निर्धोक अशी ही पद्धत आहे. ऐन संभोगावेळी वापरण्याच्या निरोध वगैरेसारख्या पद्धती नवविवाहितांना बरेचदा अडचणीच्या वाटतात. मधूनच ‘टायम प्लीज’ करून निरोध चढवायचा म्हणजे (काम)रंगाचा बेरंग. त्यापेक्षा गोळ्या बऱ्या. शिवाय निरोधचा वापर, हा नाही म्हटलं तरी नवऱ्याच्या मर्जीवर, राजीखुशीवर अवलंबून असतो. गोळ्यांचा वापर हा स्त्रीच्या अखत्यारीतला असतो.
अशा गोळ्या-विरोधकांचे साईड इफेक्ट पाठोपाठ, आणखी दोन परवलीचे शब्द असतात, ‘हॉर्मोन’ आणि ‘स्टिरॉईड’. (बिन हॉर्मोनच्याही गोळ्या निघाल्या आहेत, पण त्याबद्दल नंतर कधीतरी) ह्या गोळ्या हॉर्मोन्सच्या असतात आणि त्यात स्टिरॉईड ह्या प्रकारचे हॉर्मोन असतात हे ठीकच आहे. पण एवढ्या कारणानी त्या बाद ठरवणं हे ठीक नाही. स्टिरॉईडस आणि हॉर्मोन्स ही शरीराला अत्यावश्यक द्रव्ये आहेत. ही आहेत म्हणून आपण आहोत. ही आहेत म्हणून स्त्री-पुरुष असा लिंगभेद आहे. त्यामुळे सरसकट ‘हॉर्मोन-स्टिरॉईड’ ह्यांना धर की धोपट हे धोरण योग्य नाही.
सारासार विचार करता या गोळ्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे; किंवा या गोळ्यांमुळे अनेकांना नेत्रदीपक ‘काम’गिरी साधली आहे!
म्हणुनच गोळ्या म्हटलं की माझ्या मनात अभंग उमटतो...

हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा
गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व गोळी
न लगे नस-बंधना, गोळी-संग देई सदा
गोळी  म्हणे गर्भवासी,  घालू ना कधी तुम्हासी

पूर्व प्रसिद्धी दिव्य मराठी ६/६/२०१७

जावे पुस्तकांच्या गावा

जावे पुस्तकांच्या गावा
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.
मो. क्र. ९८२२० १०३४९
पाचगणीजवळ भिलारला, म्हणजे माझ्याजवळच पुस्तकांचं गाव होतंय हे वाचून मला खूप आनंद झाला. मुळात मी पुस्तकातला किडा. त्यातून अशा प्रकारे जवळच पुस्तकांचा साठा मिळाल्यावर काय विचारता.
पण जावून करणार काय? एखादं पुस्तक वाचायला कधी अख्खा दिवस लागेल तर कधी दोन चार दिवस, तर कधी जास्त. तेवढे दिवस निवांत तिथे रहायला हवं. मग मात्र मजा आहे. कधी झोपाळ्यावर झुलत, तर कधी खुर्चीत डुलत; कधी चिवड्याचे बोकाणे भरत, तर कधी गुलाबी थंडीत कॉफीचे वाफाळते घुटके घेत; असं आपण वाचू शकतो. मग हे सगळं करायला आसपास पुस्तकाचं गाव कशाला हवं? ज्याला वाचायचंय तो एकदा पुस्तकात शिरला की आसपास गावंच काय वेगळं विश्वच उभं रहातं की.
पण तरीही मला वाटतं गाव हवंच. कारण पुस्तकांचं गाव हे एक संस्कार देतं. सुट्टीमधे मज्जा करताना, शॉपिंग, खाणेपिणे, आईस्क्रीम, स्ट्रॉबेरी अशी चैन करताना हे पुस्तकांचं गाव पर्यटकांना भेटतं. मग, ‘बघू तरी काय आहे’ अशी उत्सुकता चाळवली जाते. सहज म्हणून चाळताचाळता किती प्रकारची पुस्तकं असू शकतात ते समजतं. वाचन, हा ही मौजेचा भाग आहे हे समजतं. शिवाय अशा निसर्गरम्य ठिकाणी वाचन आणि निसर्ग-वाचन जोडीनं घडतं. त्यामुळे कल्पना चमकदार आणि लाजवाब आहे.
कधीतरी आधी वाचलेली पुस्तकं इथे अचानक हातात येतील, त्यांची पाने चाळताचाळता, स्मृतींची पानेही चाळली जातील. काहींना मोठ्यांनी वाचायला आवडतं, तीही हौस इथे मोकळेपणी भागवता येईल. चार पावलं इकडे तिकडे गेलं की ‘होल वावर इज आवर’! त्यामुळे कोणी शिरा ताणताणून  ऐतिहासिक नाटकातील लंबीचौडी स्वगतं म्हणताना दिसला तर आश्चर्य वाटू नये.
एखादं ग्रंथालय पालथं घालणं आणि पुस्तकांचा गाव पालथा घालणं यात फरक आहे. ग्रंथालय म्हणजे सारं शिस्तशीर, शांत शांत. आय.सी.यू.त जाउन पुस्तकांना भेटल्यासारखं. इथे म्हणजे घरी जाऊन मित्राला कडकडून भेटल्यासारखं आहे. शिवाय सोबतीला चहा पोहे वगैरे, वगैरे, वगैरे... (बाकीचे ‘वगैरे’ ज्याने त्याने आपापल्या कल्पनाशक्तीने भरून काढावेत.) अर्थात पैसे देऊन हं! पंचवीस घरं/ हॉटेलं इथे पुस्तकांनी सजलेली आहेत. त्यांची अंगणं-भिंती साहित्य विषयक चित्रांनी नटलेली आहेत. आपण खाऊ शकता, पिऊ शकता, राहू शकता, वाचू शकता.
इथे येतात बरेचसे अमराठी. गुजराथी जास्त. मुंबईवाले. यांना अन्नाची भूक भारी. ‘ओरे जीग्नेसभाय आईस्क्रीम जोवानु’;  हे हरघडी कानावर पडत असतं. या खालोखाल पुण्यातील, सातारा, सांगली, कोल्हापूर येथील कुटुंबवत्सल माणसं, आया, आज्या, आजोबे, पोरंसोरं असा लवाजमा घेऊन किंवा काही तरी ‘प्रसंग’ साजरा करायला येणारे मित्र/कुटुंबांचे थवे. शिवाय शाळांच्या ट्रीप हाही एक मोठा वर्ग. शाळांच्या ट्रीप इथे नक्कीच येतील. कोणताही सरकारी फतवा नसताना येतील. इथून स्फूर्ती घेऊन काही मुलं तरी आपापल्या शाळेतल्या ग्रंथालयाचा सजग उपयोग शिकतील, करतील; अशी खात्री वाटते.
पण एक अडचण अशी की, इथे आहेत ती फक्त मराठी पुस्तकं. अर्थातच शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फतचा हा उपक्रम आहे. मराठीला उत्तेजन देण्यासाठीच आहे. स्तुत्य आहेच आहे. पण येणारे बरेचसे पुस्तकं बाहेरूनच बघतात. पिंजऱ्यातला वाघ किंवा साप किंवा माकड बघावं तसं. बाल चमूची या पुस्तकांशी दोस्ती शक्यच नाही. एक तर बहुतेक इंग्लिश मिडीयमवाले, म्हणजे मराठीची टोटल बोंब! उरलेले सेमी-इंग्लिश म्हणजे मराठी आणि इंग्रजी दोन्हीची टोटल बोंब किंवा बेटर स्टिल, बोंबाबोंब!! आणि मग त्यातूनही उरलेले मराठी माध्यमवाले!!! ह्या मुलांना मात्र इथे अंतरीच्या ओळखीचं, अभ्यासक्रमातल्या ओळखीचं, असं बरंच काही गवसेल. ही भाषेची अडचण लक्षात घेऊन आता, अन्य भाषिक पुस्तके, देशभरातील अकादमी पुरस्कार प्राप्त पुस्तके इथे येणार असा सांगावा आहे.
सध्या मात्र शालेय ट्रीप वगैरे अशा झुंडीने येणाऱ्या वाचकांची वेगळी अशी सोय नाही. पुस्तकांच्या प्रत्येक घरात इतकी पोरं कशी मावणार? पण अशी सोय होऊ घातली आहे म्हणे. पावसाळयात येणाऱ्यांसाठीही काही खास सोय लागणार आहे. गावांनी दिलेल्या चार एकर जागेत या सुविधा उभ्या रहातील असं दिसतं.
पुस्तकं इथे विक्रीसाठी नाहीत. ही मोठीच गोची आहे. खरंतर एखादं मनात भरलेलं पुस्तक विकत घेण्याची सोय असती तर बरं झालं असतं. सरकारी योजनेत हे नसलं तरी इथली माणसं हुन्नरी आहेत. त्यांनी स्ट्रॉबेरी पिकवून, जिथे पिकते तिथेच ती विकूनही दाखवली आहे. त्यांना जे विकतं तेच कसं पिकवायचं याची उत्तम जाण आहे. लवकरच इथे पर्यटकांच्या मागणीनुसार, इंग्रजी बुकेही येतील, विक्रीही सुरु होईल, हे निश्चित. दुर्मिळ पुस्तकं हाती लागणं ही पुस्तकवेड्यांसाठी पर्वणीच. तो योग सध्यातरी पुण्या-मुंबईच्या फुटपाथवर जुळून येण्याचा योग जास्त. पण इथे पुस्तकांच्या गावी, भिलारमधेही कोणी विचक्षण विक्रेता निपजेल, रद्दीतही काही मौक्तिके असतात हे त्याला उमजेल आणि अनवट पुस्तकांची आणि वाचनवेड्यांशी अवचित गाठ पडेल अशी आशा बाळगायला हरकत नाही.
हर घरी विभागवार पुस्तके आहेत. म्हणजे एखाद्या घरी कादंबरी तर फक्त कादंबरी आढळेल. एखाद्या घरी इतिहास तर इतिहास. त्यामुळे इतिहास चाळून झाल्यावर नाटकाची भूक चाळवली गेली तर ‘नाटक-घर’ शोधत जावं लागतं. खरतर सर्वच ठिकाणी विविध पुस्तकं असूनही चालेल.
 ‘हे ऑन द वे’, हे इंग्लंडातील गाव हे ह्या उपक्रमाचं स्फूर्तीस्थान. ठायीठायी  पुस्तकांची दुकानं, (इंग्लंडला म्हणतातच मुळी ‘नेशन ऑफ शॉपकीपर्स’), तिथे आरामात पुस्तकं पहात (ती विकतही घेणारे) पर्यटक, वेळोवेळी भरणाऱ्या पुस्तकजत्रा/यात्रा, साहित्यिक समारंभ, प्रकाशन समारंभ, ‘लेखक आपल्या भेटीला’ असे कार्यक्रम; असा सदोदित शाई-कागदाचा उत्सव तिथे भरलेला असतो. असंच काहीसं इथे व्हावं हे तो सरकारची आणि माननीय मंत्रीमहोदय विनोद तावडेजींची इच्छा. पण प्रकाशन सभागृह, काव्यकट्टा, कथाकथनासाठी वगैरे खुला रंगमंच, भाषण वगैरेसाठी मुक्त व्यासपीठ असं  इथे अजूनही काही नाही. हे सगळं बनवू घातलंय असं ह्या उपक्रमाचे कर्तेधर्ते, विश्वकोशातील अधिकारी, श्री. जगतानंद भटकर यांचं म्हणणं. इथे मराठी साहित्य संमेलन भरवलं तर त्या निमित्त ह्या साऱ्या सोयी झटपट होऊन जातील असं सुचवावस वाटतं.
शेवटी ज्यांना वाचायचं असतं ते वाचतच असतात आणि ज्यांना वाचायचं नसतं ते असल्या उपक्रमांना बधत नाहीत. प्रश्न मधल्याअधल्यांचा आहे. या मिषानी अशी माळरानावरची मंडळी पुस्तकांच्या ‘निबिड कांतार जठरी’ शिरतील असं वाटतं.

पूर्वप्रसिद्धी:-  महा अनुभव जून २०१७