गुण गाईन आवडी.
डॉ.शंतनू अभ्यंकर
वाई. मो. क्र. ९८२२०१०३४९
१९६० साली अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्यांच्या वापराला मान्यता मिळाली. आज
उणीपुरी ५७ वर्ष या गोळ्या उपलब्ध आहेत. त्यांच्या फायद्या तोट्याबद्दल घमासान
चर्चा झडल्या आहेत. पण गर्भनिरोधक साधनांचा सजग वापर आपल्याकडे अभावानेच आढळतो.
बरेचदा ‘फॅमिली प्लॅनिंग’ म्हणजे ऑपरेशन, आणि तेही फक्त बायकांचंच असा घट्ट गैरसमज
रुतून बसलेला दिसतो. प्रत्येक बाईनी ऑपरेशनच करायला पाहिजे असं काही नाही. गोळ्या
किंवा कॉपर टी असे पर्यायही वर्षानुवर्ष निर्धोकपणे वापरता येतात. पण लक्षात कोण
घेतो?
ह्या गोळीचे गुण काय वर्णावे. नीट वापरली तर ही जवळपास शंभरटक्के वेळा आपलं
काम चोख करते. या गोळीमुळे आणि एकूणच गर्भनिरोधकांमुळे स्त्रीला शिक्षण, व्यवसाय यात
पुढे जाण्याची संधी मिळते. ‘रांधा, वाढा, उष्टी काढा’, ‘पोरांचे लेंढार’ हे
शब्दप्रयोगही आता हळूहळू इतिहास जमा होऊ लागलेत याच श्रेय ह्या गोळीला देखील आहे.
स्त्रीला घराबाहेर पडण्याचं स्वातंत्र्य ह्या गोळीनीही दिलंय, निव्वळ समाज
सेवकांनी नाही.
पण ‘गोळ्या घ्या’ म्हटलं की नवरोजींचा (सोबत असलेच तर) हटकून प्रश्न येतो, ‘पण
डॉक्टर याचे काही साईड इफेक्ट तर नाहीत ना?’
काही वेळापूर्वी हाच लेकाचा चौकातल्या टपरीपाशी पान तंबाखू लावत बसलेला असतो.
त्याआधी त्याची पानवाल्याशी तंबाखूच्या साईड इफेक्ट बद्दल चर्चा झडलेली असते का?
अजिबात नाही. पण बायकोबद्दल हे नवरोजी फारच सावध असतात. असो, ‘गोळ्यांचे काही साईड
इफेक्ट तर नाहीत ना?’ या प्रश्नाचं सविस्तर उत्तर बघू या.
गोळ्यांचे, इतर कुठल्याही औषधाचे असतात, तसे साईड इफेक्ट असतातच असतात. अजिबात
साईडइफेक्ट नसणाऱ्या औषधाला मुळात इफेक्टच नसतो असं बेलाशक समजावं. त्यामुळे साईड इफेक्ट
नसतात असं सांगणं म्हणजे अप्रामाणिकपणा तरी आहे किंवा अज्ञान तरी. पण हे झालं
कायदेशीर उत्तर. हे साईड इफेक्ट किती प्रमाणात आढळतात? कोणते असतात? त्यातले
सुसह्य कोणते असह्य कोणते असा सगळा साधक बाधक विचार करायला हवा. शिवाय गोळ्या किंवा
इतर कोणतेही गर्भनिरोधक न वापरल्याचेही साईड इफेक्ट असतातच की! अशा वेळी नको
असताना दिवस जातात. मग ते मूल पदरी तरी पडतं किंवा गर्भपात करावा लागतो. त्यातही
धोके असतात. तेंव्हा गोळ्या घेतल्याच्या साईड इफेक्टची तुलना गोळ्या न घेतल्याच्या
साईड इफेक्टशी करावी हे उत्तम.
त्यातल्या त्यात आढळणारे साईड इफेक्ट म्हणजे मळमळ, डोकेदुखी, एखादी पाळी
चुकणं, स्तन हुळहुळे होणं. बहुतेकदा ह्या तक्रारी सुरवातीच्या काही महिन्यातच
आपोआप ओसरतात. यामुळे कोणताही विशेष धोका संभवत नाही. त्रासदायक साईड इफेक्ट कुठले
तेही बघुया. क्वचित या गोळ्यांनी खूपच नैराश्य येतं. पस्तीशी पुढच्या आणि बिडी-सिगरेट फुंकणाऱ्या बायांनी ह्या
गोळ्या घेतल्या तर रक्तात गुठळी होऊन काहीनाकाही त्रास होऊ शकतो. (अर्धांगवायू,
पायावर सूज डी.व्ही.टी.) पण अशा वागणाऱ्या ललना आपल्याकडे फारशा नाहीत.
शिवाय साईड इफेक्ट म्हणजे तो वाईटच असला पाहिजे असं काही नाही. या गोळ्याचंच उदाहरण
पाहू जाता यांचे फायदेशीर साईड इफेक्ट भरपूर आहेत. यामुळे निव्वळ गर्भनिरोधक
म्हणूनच नाही तर इतरही अनेक आजारांसाठी या गोळ्या वापरल्या जातात.
अतिशय कमी अंगावरून जातं, हा एक साईड इफेक्टच आहे, अर्थात हवाहवासा. अंगावरून
कमी गेल्यामुळे त्या बाईचा त्रास वाचतो, अॅनिमिया होण्याचं प्रमाण कमी होतं. या
गोळ्यांमुळे पाळीच्या आधी होणारा त्रासही होत नाही. नाहीतर कित्येक बायकांना
पाळीच्या आधी स्तनात दुखणे, कंबर दुखणे पासून ते मूड ऑफ होणे असे अनेक त्रास
होतात. गोळीमुळे पाळीच्या वेळेला दुखतही नाही. ही गोळी चालू असेल तर एक्टोपिक
प्रेग्नन्सी रहात नाही (गर्भपिशवीच्या
बाहेर गर्भ रहाणे). स्त्री बीज ग्रंथीमध्ये उद्भवणाऱ्या पाण्याच्या गाठी होत नाहीत
(सिम्पल ओव्हेरियन सिस्ट), गर्भपिशवीच्या तोंडचा स्त्राव अतिघट्ट होतो त्यामुळे आत
जंतूंना मज्जाव होतो, कटी भागातल्या अवयवांची इन्फेक्शन टळतात (पेल्व्हिक
इनफ्लेमेटरी डिसीज). स्तनाचे अनेक साधेसे आजारही (बेनाईन ब्रेस्ट डिसीज) ह्या
गोळीनी टळतात. ह्या गोळ्यांनी कोणत्याही प्रकारचा कॅन्सर होत नाही. उलट गर्भाच्या
अस्तराचा आणि स्त्रीबीज ग्रंथीचा कॅन्सर होण्याची शक्यता या गोळ्यांमुळे कमी होते.
अत्याधुनिक प्रकारच्या (लो-डोस किंवा अल्ट्रा लो-डोस पिल्स) गोळ्यांमुळे वजन वाढत
नाही. (आणि वजन वाढणं हा काही जणींसाठी हवाहवासा साईड इफेक्ट असू शकतो) गोळ्या
घेतल्याचा आणि ग्रीवेचा (सर्व्हीक्स) किंवा स्तनाचा कॅन्सर होण्याचा थेट संबंध
नाही. यावर अधिक संशोधन चालू आहे. थोडक्यात साईड इफेक्ट असले तरी फायद्याचेच जास्त
आहेत.
या गोळ्यांपायी पुढे मुलं होणार नाहीत अशीही एक समजूत आहे. ही ही खोटी आहे. ह्या गोळ्या तात्पुरत्या स्वरूपाच्या
आहेत. त्यांचा परिणाम त्या त्या महिन्यापुरता होतो. गोळ्या बंद केल्या की पुन्हा
लगेच सुद्धा संतती राहू शकते.
काही वर्ष गोळ्या नियमित घेतल्या की मधेच बरेच पेशंट गोळ्या बंद करून टाकतात.
मधे ‘विश्रांती’! असं काही करण्याची गरज नसते. वार्षिक आरोग्य तपासणी करत करत
तुम्ही या गोळ्या अगदी म्हातारं होईपर्यंतही निर्धोकपणे घेऊ शकता.
गोळ्या चुकल्या, चुकून दिवस गेले आणि गोळ्या तशाच घेतल्या गेल्या तरीही हरकत
नाही. दिवस असताना जरी ह्या गोळ्या घेतल्या गेल्या तरीही गर्भामध्ये कोणतीही
विकृती उद्भवत नाही. जर त्या जोडप्याला ते मूल ठेवायचं असेल तर निर्धास्तपणे ठेवता
येतं.
नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी तर ही पद्धत उत्तम म्हटली पाहिजे. अतिशय
खात्रीशीर, निर्धोक अशी ही पद्धत आहे. ऐन संभोगावेळी वापरण्याच्या निरोध
वगैरेसारख्या पद्धती नवविवाहितांना बरेचदा अडचणीच्या वाटतात. मधूनच ‘टायम प्लीज’
करून निरोध चढवायचा म्हणजे (काम)रंगाचा बेरंग. त्यापेक्षा गोळ्या बऱ्या. शिवाय निरोधचा
वापर, हा नाही म्हटलं तरी नवऱ्याच्या मर्जीवर, राजीखुशीवर अवलंबून असतो. गोळ्यांचा
वापर हा स्त्रीच्या अखत्यारीतला असतो.
अशा गोळ्या-विरोधकांचे साईड इफेक्ट पाठोपाठ, आणखी दोन परवलीचे शब्द असतात, ‘हॉर्मोन’ आणि
‘स्टिरॉईड’. (बिन हॉर्मोनच्याही गोळ्या निघाल्या आहेत, पण त्याबद्दल नंतर कधीतरी)
ह्या गोळ्या हॉर्मोन्सच्या असतात आणि त्यात स्टिरॉईड ह्या प्रकारचे हॉर्मोन असतात
हे ठीकच आहे. पण एवढ्या कारणानी त्या बाद ठरवणं हे ठीक नाही. स्टिरॉईडस आणि हॉर्मोन्स
ही शरीराला अत्यावश्यक द्रव्ये आहेत. ही आहेत म्हणून आपण आहोत. ही आहेत म्हणून स्त्री-पुरुष
असा लिंगभेद आहे. त्यामुळे सरसकट ‘हॉर्मोन-स्टिरॉईड’ ह्यांना धर की धोपट हे धोरण
योग्य नाही.
सारासार विचार करता या गोळ्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे; किंवा या
गोळ्यांमुळे अनेकांना नेत्रदीपक ‘काम’गिरी साधली आहे!
म्हणुनच गोळ्या म्हटलं की माझ्या मनात अभंग उमटतो...
हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा
गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व गोळी
न लगे नस-बंधना, गोळी-संग देई सदा
गोळी म्हणे गर्भवासी, घालू ना कधी तुम्हासी
पूर्व प्रसिद्धी दिव्य मराठी ६/६/२०१७
No comments:
Post a Comment