Showing posts with label कुटुंब नियोजन. Show all posts
Showing posts with label कुटुंब नियोजन. Show all posts

Tuesday, 14 November 2017

कठीण समय येता कोण कामास येतो?

                 
कठीण समय येता कोण कामास येतो?
डॉ. शंतनू अभ्यंकर


ऐनवेळी कुणाचे फाटले वा निसटले; 
ऐनवेळी कुणाचे सरले वा विसरले
नकळत-कळत जेंव्हा भोग-संभोग होतो, 
कठीण समय येता कोण कामास येतो?

मुळात गर्भ निरोधक साधने वापरायचीच नाहीत. वापरली तर नीट सर्व समजून घेऊन वापरायची नाहीत असा आपला खाक्या.
 गोळ्यांनी म्हणे वजन वाढते, खायला विसरतात, म्हणून नको! कॉपर टी ची भीती वाटते म्हणून नको!! इंजेक्शननी पाळी अनियमित येते म्हणून नको!!! असा हा नन्नाचा पाढा. कितीही समजावून सांगितलं तरी गैरसमजाची जळमटं काही हटत नाहीत.
‘आता’ मुले नकोतचवाली जोडपी सरळ ऑपरेशन करून घेतात. पण ‘आत्ता’ नको (नंतर हवं)वाली मंडळी नन्नाचा पाढा म्हणत बरेचदा निरोध वा काल-निर्णय पद्धत अवलंबतात किंवा काहीच गर्भनिरोधक वापरत नाहीत. मग घोटाळे होत राहतात.
कधी ‘निरोध’ नसतो, कधी असतो पण वापरला जात नाही, कधी निसटतो, फाटतो... मग नको असताना दिवस राहण्याची भीती वाटू लागते! कधी अचानक इकडून येणं होतं, मागणी होते. कधी ‘काल-निर्णय’चा निर्णय चुकतो. कधी ‘नकळत सारे घडले’ या शिवाय अन्य काहीही सबब नसते. नको असताना दिवस रहाण्याची भीती वाटू लागते!! कधी कुण्या अभागीनिवर जोर जबरदस्ती होते; तिला यातून दिवस तर गेले नसतील ना ही कुशंका डोकावते!! मोठा कठीण समय येऊन ठेपतो.
अशा परिस्थितीत गर्भधारणा टाळता येईल अशा पद्धती आता उपलब्ध आहेत. कठीण समय येता आपात्कालीन गर्भ निरोधक साधने उपयोगी पडतात.
गोळी किंवा तांबी अशा स्वरुपात ही साधने उपलब्ध आहेत.
जर गर्भ संभवाची भीती असेल तर अशा संबधानंतर शक्यतो बारा तासाच्या आत ही गोळी (LEVONORGESTREL 1.5mg) घ्यायची असते. याला ना डॉक्टरी सल्ल्याची गरज ना कोणत्याही वैद्यकीय तपासणीची! जेवढ्या लवकर गोळी घेतली जाईल तेवढं उत्तम. अन्य कोणतीही औषधे चालू असतील वा अन्य आजार असेल तरीही ही गोळी घ्यायला हरकत नाही. अतिशय सुरक्षित अशी ही गोळी आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळू शकते.
जर गोळी घेतल्यानंतर २ तासात उलटी वगैरे झाली तर मात्र उलटी होऊ नये, असं औषध घेऊन मग पुन्हा ही गोळी घ्यावी.
दिवस राहणार नाहीत, अशी ऐंशी टक्के खात्री आपण बाळगू शकतो. मात्र ८०%च्या भरोश्यावर रहाण्यात अर्थ नाही. अपेशी २०%त आपण आहोत का, हे जाणून घेणं महत्वाचे आहे. कारण गोळीमुळेही पाळी थोडी पुढे जाते आणि दिवस राहिले तर जातेच जाते. तेव्हा पुढच्या पाळीला आठवड्याभरापेक्षा जास्त ‘उशीर’ झाला तर दिवस गेले आहेत का ते तपासून घेणे इष्ट.
आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. संबधानंतर १२ तासात गोळी घेतली गेली तर उत्तमच. मात्र उशिरात उशीरा ही गोळी ७२ तासापर्यंत घेता येते. मात्र जेवढ्या लवकर घ्याल तितकी परिणामकारकता अधिक.
शिवाय गोळी घेतल्यानंतर पुढे नेहमीची गर्भ निरोधक साधने वापरायलाच हवीत. गर्भसंभव थांबवण्याची गोळीची क्षमता ही गोळी घेण्याआधीच्या ७२ तासातल्या संबधाला लागू पडते. गोळी घेतल्यानंतर जर संबंध व्हायचा झाला तर त्यापासून होणारी गर्भधारणा ही गोळी रोखू शकत नाही. एकाच महिन्यात वारंवार ही गोळी वापरणे चुकीचे आहे. त्यामुळे पाळी पुढे जाते आणि गर्भसंभव होण्याचीही शक्यता रहाते.
गोळीचेही प्रकार उपलब्ध आहेत. १ गोळी घेण्यापासून ५० गोळ्या घेण्यापर्यंतचे डोस आहेत. नेहमीच्या गर्भ निरोधक गोळ्याही या कमी वापरता येतात. पण माहिती सुटसुटीत असावी म्हणून केवळ एकाच पद्धतीची गोळी सांगितली आहे. सर्व माहिती LEVONORGESTREL 1.5mg या गोळीसाठी दिलेली आहे.
गोळी ऐवजी संबधानंतरच्या ५ दिवसांत तांबी बसवली तरीही गर्भ धारणा टाळता येते.
त्यातूनही जर दिवस गेलेच तर गर्भपाताच्याही गोळ्या मिळतात, त्या डॉक्टरी सल्ल्याने घ्याव्यात.
वरील सर्व प्रकार आपात्कालीन स्थितीत वापरायचे आहेत. एरवी नाही. या पद्धती ‘फेल जाण्याची’ शक्यता बरीच आहे (२०%). नियमित वापरायच्या पद्धतीत (गोळ्या/तांबी/इंजेक्शन) मध्ये हे प्रमाण १% पेक्षा कमी आहे. तेव्हा या आपत्कालीन गोळ्या नियमित वापरणे चुकीचे आहे. 
एस.टी.च्या मागच्या खिडकीतून एरवीही ये जा करता येते. पण आपण दारानेच ये जा करतो. मागची खिडकी ‘अपघाताचे वेळीच’ वापरायची असते. तसंच काहीसं हे आहे!

-डॉ.शंतनू अभ्यंकर

Tuesday, 6 June 2017

गुण गाईन आवडी.

गुण गाईन आवडी.
डॉ.शंतनू अभ्यंकर
वाई. मो. क्र. ९८२२०१०३४९
१९६० साली अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्यांच्या वापराला मान्यता मिळाली. आज उणीपुरी ५७ वर्ष या गोळ्या उपलब्ध आहेत. त्यांच्या फायद्या तोट्याबद्दल घमासान चर्चा झडल्या आहेत. पण गर्भनिरोधक साधनांचा सजग वापर आपल्याकडे अभावानेच आढळतो. बरेचदा ‘फॅमिली प्लॅनिंग’ म्हणजे ऑपरेशन, आणि तेही फक्त बायकांचंच असा घट्ट गैरसमज रुतून बसलेला दिसतो. प्रत्येक बाईनी ऑपरेशनच करायला पाहिजे असं काही नाही. गोळ्या किंवा कॉपर टी असे पर्यायही वर्षानुवर्ष निर्धोकपणे वापरता येतात. पण लक्षात कोण घेतो?
ह्या गोळीचे गुण काय वर्णावे. नीट वापरली तर ही जवळपास शंभरटक्के वेळा आपलं काम चोख करते. या गोळीमुळे आणि एकूणच गर्भनिरोधकांमुळे स्त्रीला शिक्षण, व्यवसाय यात पुढे जाण्याची संधी मिळते. ‘रांधा, वाढा, उष्टी काढा’, ‘पोरांचे लेंढार’ हे शब्दप्रयोगही आता हळूहळू इतिहास जमा होऊ लागलेत याच श्रेय ह्या गोळीला देखील आहे. स्त्रीला घराबाहेर पडण्याचं स्वातंत्र्य ह्या गोळीनीही दिलंय, निव्वळ समाज सेवकांनी नाही.
पण ‘गोळ्या घ्या’ म्हटलं की नवरोजींचा (सोबत असलेच तर) हटकून प्रश्न येतो, ‘पण डॉक्टर याचे काही साईड इफेक्ट तर नाहीत ना?’
काही वेळापूर्वी हाच लेकाचा चौकातल्या टपरीपाशी पान तंबाखू लावत बसलेला असतो. त्याआधी त्याची पानवाल्याशी तंबाखूच्या साईड इफेक्ट बद्दल चर्चा झडलेली असते का? अजिबात नाही. पण बायकोबद्दल हे नवरोजी फारच सावध असतात. असो, ‘गोळ्यांचे काही साईड इफेक्ट तर नाहीत ना?’ या प्रश्नाचं सविस्तर उत्तर बघू या.
गोळ्यांचे, इतर कुठल्याही औषधाचे असतात, तसे साईड इफेक्ट असतातच असतात. अजिबात साईडइफेक्ट नसणाऱ्या औषधाला मुळात इफेक्टच नसतो असं बेलाशक समजावं. त्यामुळे साईड इफेक्ट नसतात असं सांगणं म्हणजे अप्रामाणिकपणा तरी आहे किंवा अज्ञान तरी. पण हे झालं कायदेशीर उत्तर. हे साईड इफेक्ट किती प्रमाणात आढळतात? कोणते असतात? त्यातले सुसह्य कोणते असह्य कोणते असा सगळा साधक बाधक विचार करायला हवा. शिवाय गोळ्या किंवा इतर कोणतेही गर्भनिरोधक न वापरल्याचेही साईड इफेक्ट असतातच की! अशा वेळी नको असताना दिवस जातात. मग ते मूल पदरी तरी पडतं किंवा गर्भपात करावा लागतो. त्यातही धोके असतात. तेंव्हा गोळ्या घेतल्याच्या साईड इफेक्टची तुलना गोळ्या न घेतल्याच्या साईड इफेक्टशी करावी हे उत्तम.
त्यातल्या त्यात आढळणारे साईड इफेक्ट म्हणजे मळमळ, डोकेदुखी, एखादी पाळी चुकणं, स्तन हुळहुळे होणं. बहुतेकदा ह्या तक्रारी सुरवातीच्या काही महिन्यातच आपोआप ओसरतात. यामुळे कोणताही विशेष धोका संभवत नाही. त्रासदायक साईड इफेक्ट कुठले तेही बघुया. क्वचित या गोळ्यांनी खूपच नैराश्य येतं. पस्तीशी पुढच्या  आणि बिडी-सिगरेट फुंकणाऱ्या बायांनी ह्या गोळ्या घेतल्या तर रक्तात गुठळी होऊन काहीनाकाही त्रास होऊ शकतो. (अर्धांगवायू, पायावर सूज डी.व्ही.टी.) पण अशा वागणाऱ्या ललना आपल्याकडे फारशा नाहीत.
शिवाय साईड इफेक्ट म्हणजे तो वाईटच असला पाहिजे असं काही नाही. या गोळ्याचंच उदाहरण पाहू जाता यांचे फायदेशीर साईड इफेक्ट भरपूर आहेत. यामुळे निव्वळ गर्भनिरोधक म्हणूनच नाही तर इतरही अनेक आजारांसाठी या गोळ्या वापरल्या जातात.
अतिशय कमी अंगावरून जातं, हा एक साईड इफेक्टच आहे, अर्थात हवाहवासा. अंगावरून कमी गेल्यामुळे त्या बाईचा त्रास वाचतो, अॅनिमिया होण्याचं प्रमाण कमी होतं. या गोळ्यांमुळे पाळीच्या आधी होणारा त्रासही होत नाही. नाहीतर कित्येक बायकांना पाळीच्या आधी स्तनात दुखणे, कंबर दुखणे पासून ते मूड ऑफ होणे असे अनेक त्रास होतात. गोळीमुळे पाळीच्या वेळेला दुखतही नाही. ही गोळी चालू असेल तर एक्टोपिक प्रेग्नन्सी  रहात नाही (गर्भपिशवीच्या बाहेर गर्भ रहाणे). स्त्री बीज ग्रंथीमध्ये उद्भवणाऱ्या पाण्याच्या गाठी होत नाहीत (सिम्पल ओव्हेरियन सिस्ट), गर्भपिशवीच्या तोंडचा स्त्राव अतिघट्ट होतो त्यामुळे आत जंतूंना मज्जाव होतो, कटी भागातल्या अवयवांची इन्फेक्शन टळतात (पेल्व्हिक इनफ्लेमेटरी डिसीज). स्तनाचे अनेक साधेसे आजारही (बेनाईन ब्रेस्ट डिसीज) ह्या गोळीनी टळतात. ह्या गोळ्यांनी कोणत्याही प्रकारचा कॅन्सर होत नाही. उलट गर्भाच्या अस्तराचा आणि स्त्रीबीज ग्रंथीचा कॅन्सर होण्याची शक्यता या गोळ्यांमुळे कमी होते. अत्याधुनिक प्रकारच्या (लो-डोस किंवा अल्ट्रा लो-डोस पिल्स) गोळ्यांमुळे वजन वाढत नाही. (आणि वजन वाढणं हा काही जणींसाठी हवाहवासा साईड इफेक्ट असू शकतो) गोळ्या घेतल्याचा आणि ग्रीवेचा (सर्व्हीक्स) किंवा स्तनाचा कॅन्सर होण्याचा थेट संबंध नाही. यावर अधिक संशोधन चालू आहे. थोडक्यात साईड इफेक्ट असले तरी फायद्याचेच जास्त आहेत.
या गोळ्यांपायी पुढे मुलं होणार नाहीत अशीही एक समजूत आहे. ही ही  खोटी आहे. ह्या गोळ्या तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत. त्यांचा परिणाम त्या त्या महिन्यापुरता होतो. गोळ्या बंद केल्या की पुन्हा लगेच सुद्धा संतती राहू शकते.
काही वर्ष गोळ्या नियमित घेतल्या की मधेच बरेच पेशंट गोळ्या बंद करून टाकतात. मधे ‘विश्रांती’! असं काही करण्याची गरज नसते. वार्षिक आरोग्य तपासणी करत करत तुम्ही या गोळ्या अगदी म्हातारं होईपर्यंतही निर्धोकपणे घेऊ शकता.
गोळ्या चुकल्या, चुकून दिवस गेले आणि गोळ्या तशाच घेतल्या गेल्या तरीही हरकत नाही. दिवस असताना जरी ह्या गोळ्या घेतल्या गेल्या तरीही गर्भामध्ये कोणतीही विकृती उद्भवत नाही. जर त्या जोडप्याला ते मूल ठेवायचं असेल तर निर्धास्तपणे ठेवता येतं.
नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी तर ही पद्धत उत्तम म्हटली पाहिजे. अतिशय खात्रीशीर, निर्धोक अशी ही पद्धत आहे. ऐन संभोगावेळी वापरण्याच्या निरोध वगैरेसारख्या पद्धती नवविवाहितांना बरेचदा अडचणीच्या वाटतात. मधूनच ‘टायम प्लीज’ करून निरोध चढवायचा म्हणजे (काम)रंगाचा बेरंग. त्यापेक्षा गोळ्या बऱ्या. शिवाय निरोधचा वापर, हा नाही म्हटलं तरी नवऱ्याच्या मर्जीवर, राजीखुशीवर अवलंबून असतो. गोळ्यांचा वापर हा स्त्रीच्या अखत्यारीतला असतो.
अशा गोळ्या-विरोधकांचे साईड इफेक्ट पाठोपाठ, आणखी दोन परवलीचे शब्द असतात, ‘हॉर्मोन’ आणि ‘स्टिरॉईड’. (बिन हॉर्मोनच्याही गोळ्या निघाल्या आहेत, पण त्याबद्दल नंतर कधीतरी) ह्या गोळ्या हॉर्मोन्सच्या असतात आणि त्यात स्टिरॉईड ह्या प्रकारचे हॉर्मोन असतात हे ठीकच आहे. पण एवढ्या कारणानी त्या बाद ठरवणं हे ठीक नाही. स्टिरॉईडस आणि हॉर्मोन्स ही शरीराला अत्यावश्यक द्रव्ये आहेत. ही आहेत म्हणून आपण आहोत. ही आहेत म्हणून स्त्री-पुरुष असा लिंगभेद आहे. त्यामुळे सरसकट ‘हॉर्मोन-स्टिरॉईड’ ह्यांना धर की धोपट हे धोरण योग्य नाही.
सारासार विचार करता या गोळ्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे; किंवा या गोळ्यांमुळे अनेकांना नेत्रदीपक ‘काम’गिरी साधली आहे!
म्हणुनच गोळ्या म्हटलं की माझ्या मनात अभंग उमटतो...

हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा
गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व गोळी
न लगे नस-बंधना, गोळी-संग देई सदा
गोळी  म्हणे गर्भवासी,  घालू ना कधी तुम्हासी

पूर्व प्रसिद्धी दिव्य मराठी ६/६/२०१७

Monday, 1 May 2017

एन.एस.व्ही.कीर्तन

एन.एस.व्ही. कीर्तन
डॉ. शंतनू अभ्यंकर

एन.एस.व्ही. म्हणजे नॉन स्काल्पेल व्हॅसेक्टॉमी, पुरुषांची बिनटाका शस्त्रक्रिया. स्त्रियांच्या शस्त्रक्रियेशी तुलना करता ही कितीतरी चांगली आहे. पण अजिबातच लोकप्रिय नाही. उलट जरा बदनामच आहे.
कीर्तन हे लोकशिक्षणाचं पूर्वापार माध्यम. एनएसव्हीची माहिती देणारं आणि महती गाणारं हे कीर्तन; मी केलं, मजा आली, मलाही आणि श्रोत्यांनाही. तुम्हीही करून पहा.  
यातील काळ्या टायपातील भाग हा गद्य आहे, लाल टायपातील गायचा आहे आणि हिरव्या टायपातील भाग हा पद्यमय गद्यात, थोडा ताला सुरात म्हणायचा आहे. काही अभंग, आर्या, गाणी यांच्यातल्या शब्दांची मोडतोड करून ते इथे वापरले आहेत; कीर्तनाचा ‘कीर्तन’पणा शाबूत रहावा म्हणून. तेवढा गुन्हा पोटात घालावा ही नम्र विनंती.

(पेटी, तबला, टाळ, चिपळ्या असा मेळ जमला आहे. पेटी तबल्याच्या एखाद्या झोकदार सुरावटीनंतर भजन सुरु होते. सर्व श्रोत्यांना भजनात सहभागी करून घेतले जाते.)

राम, राम, राम, राम, सीताराम सीताराम
राम, राम, राम, राम, सीताराम सीताराम
बोला पुंडलिक वरदा, हाsssरी विठ्ठल
श्री ज्ञानदेsssव तुकाsssराम, पंढरीनाथ महाराज की जय

नाही गायनाचा गळा, नाही अभिनयाच्या कळा,
परी उभा कीर्तना, अभ्यंकरांचा शंतनू
(ह्या चरणात योग्य तो बदल करून बुवा आपलं नाव उघड करतात)
तेंव्हा मंडळी हे असं आहे, आम्हाला ना गाता येतं ना अभिनय करता येतो, पण...
‘परी उभा कीर्तना, अभ्यंकरांचा शंतनू’
अहो कीर्तन करणं म्हणजे महाकर्मकठीण काम. एक वेळ चित्र काढणं सोपं, रंगाचे चारदोन फटकारे इकडून तिकडे ओढले की काम झालं, एक वेळ नृत्य करणं सोप, तबल्याच्या ठेक्यावर जरा हात, पाय,  मान, कंबर हलवली की काम झालं.
नाटक करणंही सोप आहे बरं, अहो दुसऱ्यांनी लिहिलेली वाक्य घडाघडा पाठ म्हणून दाखवली की काम झालं.
आणि चित्रपट काढणं तर सर्वात सोपं...
तिथे कपडे सांभाळायला वेगळा माणूस आहे, तोंड रंगवायला वेगळा माणूस आहे, गाणारा भलताच आहे, फोटो काढणारा आणखी वेगळा आहे, तुमच्याऐवजी साहसे साकारणारा वेगळा आहे, दिग्दर्शक आहे, कला दिग्दर्शक आहे, संगीत दिग्दर्शक आहे, नृत्य दिग्दर्शक आहे, इतकच काय मारामारीसाठीही वेगळा दिग्दर्शक आहे.
पण किर्तनाच तसं नाही. अहो कीर्तन करायचं म्हणजे
वाणी शुद्ध हवी, विचार उत्तम हवेत, शब्दोच्चार स्पष्ट हवेत, भाषा ओघवती हवी आणि वक्तृत्व अमोघ हवं, अवांतर वाचन हवं आणि पाठांतर दांडगं हवं. तुम्हाला गाता यायला हवं, तुम्हाला बजावता यायला हवं (चिपळ्या वाजवून दाखवतो) थोड नृत्यही आलं तरी चालेल.(बुवा नाचुनही दाखवतात)
नामदेवानी म्हटलेलंच आहे,
‘नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी
सर्व सांडुनी माघारी, वाटे विठ्ठल रखुमाई,  
परेहून परते घर, तेथे राहू निरंतर’
पण आम्ही तर सुरवातीलाच सांगून टाकलंय...
नाही गायनाचा गळा, नाही अभिनयाच्या कळा,
परी उभा कीर्तना, अभ्यंकरांचा शंतनू
मग आता तुम्ही असं विचाराल मंडळी, की हे भलतं धाडस आम्ही केलंच कसं? याचं कारण आजच्या आख्यानाचा विषय. अहो मोरोपंतांनी म्हटलेलं आहे....
‘सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो
कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो.’
पण आम्ही म्हणतो,
एनएस व्ही सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो
कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा आवडो
तुम्ही म्हणाल, ही एनएसव्ही काय भानगड आहे? आणि ‘विषय सर्वथा नावडो’चा आम्ही ‘आवडो’ कसा काय केला? कोणत्या अधिकारात केला? मायबाप हो, एवढा अपराध पोटात घालावा. हे आम्ही का केलं ते सविस्तरपणे उत्तररंगात सांगणारच आहे पण उत्तररंगात चंचूप्रवेश करण्यापूर्वी, विषयप्रवेश करण्यापूर्वी, पूर्वरंगाची अखेर नामस्मरणाने व्हायला हवी, अहो परंपराच आहे तशी.
तेंव्हा म्हणा...
राम, राम, राम, राम, सीताराम सीताराम
राम, राम, राम, राम, सीताराम सीताराम   
बोला पुंडलिक वरदा, हारी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय
(बुवा हार घालून घेतात, बुक्का लावला जातो, तबक फिरवलं जातं)
खरंतर उत्तररंगात परंपरा मोडण्याबद्दल मी बरंच काही सांगणार आहे. तेंव्हा नामस्मरणापेक्षा थोड्या वेगळ्याच ढंगात उत्तररंगाचे सुरवात करुया... म्हणा...
(बुवा राम राम सीताराम सुरु करतात आणि मधूनच पुढील ओळी गातात)
नको नको नको नको ट्युबेक्टॉमी नको नको
(पुन्हा राम राम सीताराम... अगदी पुंडलिक वरदा पर्यंत होतं आणि पुन्हा)
नको नको नको नको ट्युबेक्टॉमी नको नको
ट्युबेक्टॉमी म्हणजे बायकांचे नसबंदीचे ऑपरेशन. जसं मघाशी मी  सांगितलं की एनएसव्ही हे पुरुषांचे तसे हे बायकांचे. तर माझं म्हणण असं की....
नको नको नको नको ट्युबेक्टॉमी नको नको

(... आणि आता पुंडलिक वरदाच्या चालीत...)
बोला... एनएसव्ही ऑपरेशsssन  कराsssरे मित्रांनो
साधे-सोपेsss आराsssमात
बिनटाका शस्त्रक्रिया की जय
पुरुषनसबंदी की जय.
आलं का लक्षात मित्रांनो, आज आख्यान लावलंय ते पुरुष नसबंदीचं...आणि या आख्यानासाठी कथा निवडली आहे भारतमातेची.
फारफार वर्षापासून, नव्हे शतकानुशतकापासून भारतमाता नामेकरून एक मोठी देवता या भूतलावर वास करून आहे. कशी आहे ही?
(वंदे मातरम् गाऊन त्यातील वर्णन विषद करून सांगतात.)
मोठी जगन्मान्य देवता आहे ही. अहो हजारो वर्षाच्या हिच्या इतिहासात हजारो दैत्यांनी हिच्यावर घाला घातला पण ही बधली नाही. उलट यातल्या बऱ्याचश्या हल्लेखोरांना हिनी आपलसं केलं. इक्बालनी म्हणूनच ठेवलंय,
कुछ बात है के हस्ती, मिटती नहीं हमारी
सदियों रहा है दुश्मन, दौर-ए-जमाँ हमारा
सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्तां हमारा
तर अशी ही भारतमाता, हिच्यावर एकदा लोकसंख्यासूर नावाच्या राक्षसानी जोरदार हल्ला केला. आधी व्हायचं काय की भरपूर संतती जन्मायची आणि त्यातली  भरपूर मरायची.  पण पुढे पुढे अन्न पाणी सुधारलं, साथी कमी झाल्या, आणि माणसं चांगली म्हातारी होईपर्यंत जगू लागली. पण इथेच अडचण आली. या लोकसंख्यासुराची भूक भयंकर, इतक्या सगळ्या प्रजेच्या पोटाला काय घालायचं हा प्रश्न पडला, इतक्या सगळ्यांनी खायचं काय, ल्यायचं काय, इतक्या सगळ्या हातांना काम काय, इतक्या सगळ्या डोक्यांना शिक्षण कस द्यायचं, एक ना अनेक प्रश्न... हा लोकसंख्यासूर आता भारतमातेचेच लचके तोडायला लागला... कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ म्हणतात ना ते हे असं.
भारतमातेच्या पोटी, लेकरे कोटी कोटी.... अशी अवस्था झाली आणि
समर्थांनी म्हटलेलंच आहे,
लेकुरे उदंड झाली, ते तो लक्ष्मी निघोनी गेली;
बापुडी भिकेस लागली, काही खाया मिळेना.
लेकुरे खेळती धाकुटी, येके रांगती येके पोटी,
ऐसी घरभरी झाली दाटी, कन्यापुत्रांची.
पण भारतमाता हरली नाही, ती डरली नाही, ती लढायला सिद्ध झाली. रघुनाथ धोंडो कर्वे, म्हणजे आपल्या भारतरत्न धोंडो केशव कर्व्यांचे चिरंजीव बरं, हे तिचं लेकरू, तिच्या मदतीला धावलं. इतरही अनेक होते. (काही नावे घालायला हवीत) मग भारतमातेची लेकरं, लोकसंख्या नियंत्रणाच्या मागे लागली. पण तिथेही तऱ्हेतऱ्हेच्या लोकांचे तऱ्हेतऱ्हेचे सल्ले...
संत म्हणाले संयम पाळा,
महंत म्हणाले मोजके दिवस टाळा
सज्जन म्हणाले बाहेरच गाळा,
धर्ममार्तंड म्हणाले, चूप, अहो बोलता काय, तुमच्या जिभेला काही हाड?
जाउ दे, हा विषयच टाळा
सामान्यजन सगळ्यात हुशार, ते म्हणाले,
तुमचं ठरलं की सांगा तोवर, आमचा चालूदे कामुक चाळा
मग डॉक्टर आले, संशोधक आले, समाजसेवक आले, मायबाप सरकारही मदतीला धावले...
कुणी म्हणाले निरोध वापरा, कुणी म्हणाले तांबी बसवा, कुणी म्हणाले गोळ्या खा किंवा इंजेक्शने घ्या, आणि कुणी म्हणाले
आधी प्रपंच करावा नेटका,
व्हावी इप्सित संतती बरंका
पण मग साधता आकडा नेमका
मार्ग आप्रेशनचा धरावा
 पण हे करायचं कुणी??
यातला निरोध वापरायचा... बाप्यांनी
पण...
तांबी??? बायांनी वापरायची
गोळ्या??? बायांनी खायच्या
इंजेक्शने??? बायांना टोचायची...
आणि आप्रेशने???... तीही बायांचीच करायची.
का म्हणून?  सांगा ना, का म्हणून??? अहो निसर्गानी मूल होऊ द्यायची जबाबदारी स्त्रियांवर टाकलेलीच आहे, त्यात आपण काही बदल करू शकत नाही मग मूल न होण्याची तरी जबाबदारी पुरुषांनी घ्यायला नको का?
विश्व रागे झाले वन्ही, पुरुष सुखे व्हावे पाणी
शब्द शस्त्र झाले क्लेश, पुरुषी मानावा उपदेश
या पुरुषप्रधान संस्कृतीनी बायकांवर फार फार अत्याचार केले आहेत, काही कळत, काही नकळत, बायकांसाठी हे विश्व जणू वणवा झालं आहे...
विश्व रागे झाले वन्ही,
मग अशा वेळी पतींनी काय केल पाहिजे?
विश्व रागे झाले वन्ही, पती सुखे व्हावे पाणी
या वणव्यात पतीनी पाणी व्हायचं आहे. मूलं न होऊ द्यायची जबाबदारी स्वतःवर घ्यायची आहे. लोक म्हणतील, आलाय मोठा बायकोवर प्रेम करणारा! पाडगावकरांना भेटला होता असा एक माणूस, म्हणाला,
“आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही,
पाच मुलं झाली तरी प्रेमबीम कधीसुद्धा केलं नाही
आमचं काही आडलं का? प्रेमाशिवाय नडलं का?”
तेंव्हा पाडगावकर त्याला एवढंच म्हणाले,      
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
पण तुमचं आणि आमचं अगदी सेम नसतं!
तेंव्हा कुणीही काहीही म्हणू द्या, जर तुमचं तुमच्या बायकोवर खर्रखुर्र प्रेम असेल तर लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा, उलटून बोलू नका, उलट लोकांचे हे शब्द, हे शस्त्र झालेले शब्द, हे बोल ही संधी माना, त्यातून बोध घ्या,
विश्व रागे झाले वन्ही, पती सुखे व्हावे पाणी
शब्द शस्त्र झाले क्लेश, पती मानावा उपदेश
...आणि हे निव्वळ भावनिक आवाहन नाही बरं... मी म्हणतो त्याला वैद्यकनीतीचा, वैद्यकरीतीचा, वैद्यकशास्त्राचा आणि वैद्यकविवेकाचा भरभक्कम आधार आहे.
पुरुषांचं हे ऑपरेशन सोपं आहे... बायकांचं ऑपरेशन, महाकर्मकठीण... बायकांचं एकूणच सगळं अवघडच असतं म्हणा... पुरुषांच्या या ऑप्रेशनमध्ये आता बिनटाक्याची पद्धत आली आहे. नॉनस्काल्पेल व्हॅसेक्टॉमी म्हणजेच एन.एस.व्ही. म्हणतात त्याला.
म्हणूनच तर मी म्हणालो,

नको नको नको नको ट्युबेक्टॉमी नको नको
(... आणि आता पुंडलिक वरदा च्या चालीत...)
बोला... एनएसव्ही ऑपरेशsssन  कराsss रे मित्रांनो
साधे सोपेsss आराsssमात
बिनटाका शस्त्रक्रिया की जय
पुरुषनसबंदी की जय.

 एन.एस.व्ही वरच्यावर करता येतं, ‘ये बाहर की बात है...’ बायकांच्या ऑपरेशनसाठी पोट उघडावं लागतं, ‘ये अंदरकी बात है...’ यामुळे पोटात इन्फेक्शन; आतडी, मूत्राशय वगैरेला इजा असे धोके टळतात. स्त्री नसबंदीच्या प्रत्येक केसमध्ये  ती स्त्री, हे दोन्ही धोके पत्करत असते. बायकांचं अगदी बिनटाक्याचं ऑपरेशनही, पुरुष नसबंदीपेक्षा कितीतरीपट गुंतागुंतीचं आणि धोक्याचं आहे. पण लक्षात कोण घेतो? संसाराच्या रामरगाड्यात वैतागलेल्या बायकोचा विचार कोण करतो? तेंव्हा माझं सांगणं एवढंच आहे की...

अनुदिन अनुतापे तापल्या बायका ह्या
परमदिनदयाळा निरसी मोह माया  
अचपळ मन तूझे नावरे आवरीता
एन.एस.व्ही.त शीण नाही धाव रे धाव आता
एन.एस.व्हीत शीण नाही, एन.एस.व्ही बाबतच्या शंकाकुशंकांनी अचपळ झालेलं तुझं मन आवर आणि एन.एस.व्ही सेंटरकडे धाव. बायकोला ऑपरेशन करून घ्यायला, ट्युबेक्टॉमी करून घ्यायला भाग पाडू नकोस, ती करते म्हणाली तर तू नको म्हण...

नको नको नको नको ट्युबेक्टॉमी नको नको
(... आणि आता पुंडलिक वरदा च्या चालीत...)
बोला... एनएसव्ही ऑपरेशsssन  कराsss रे मित्रांनो
साधे सोपेsss आराsssमात
बिनटाका शस्त्रक्रिया की जय
पुरुषनसबंदी की जय.

तर अशी ही बहुगुणी एन.एस.व्ही....  लिंगाच्या थोडं खाली अर्ध्या सेंटीमीटर छेदातून करता येते. अहो हा छेद घ्यायला पातं, म्हणजे ब्लेडसुद्धा लागत नाही. इतका छोटा छेद की हा बंद करायला टाका घ्यायला लागत नाही. थेंबभरसुद्धा रक्त वहात नाही आणि कोणतीही खूण रहात नाही.
बुंद ना गिरा एक लहू का, कछु ना रही निसानी
नाsss लागी, ‘नस’पे कटार
सगळी भूल द्यायची गरज नसते... जागेवर भूल देऊन काम भागतं, हे फारच महत्वाचं आहे. भूलीत नाही म्हटलं तरी धोके फार.
शिवाय हे झटपट किती...तपासणीपासून ते ऑपरेशनपर्यंत सारा मामला, दोन एक तासाची बात. पण तरीही हे कोणी करून घ्यायला पुढे येत नाही. पेशंट विचारत नाहीत, डॉक्टर बोलत नाहीत... अहो एखादा नरशार्दुल, एखादा नरपुंगव, एखादा नरसिंह, एखादा नरोत्तम झालाच तयार तर त्याची  बायको, त्याची  स्त्री, सखी, सचिव, भार्या, सौभाग्यवती, ती सती-सावित्री, पतिव्रता, म्हणते, ‘नको बाई माझंच करा, आमच्या ह्यांना फार काम असतं.’
कारण काय तर...
ह्यांनी म्हणे अशक्तपणा येतो...
कष्ट करता येत नाहीत...
सेक्स पॉवर कमी होते...
या ऑपरेशनमुळे पौरुषाला बाधा येते, तो कष्ट करू शकत नाही, तो माणूस एकदम कंडम बनतो, कंडोम नाही हं, कं ड म. दोन्हीत फरक आहे.... असे अनेक गैरसमज आहेत.
पण असं ज्या लोकांना वाटतं, त्याबद्दल निव्वळ त्यांना मूर्ख म्हणून आपली जबाबदारी संपत नाही. त्यांच्या या गैरसमजामागे त्यांचाही काही युक्तिवाद असतो. तो समजावून घेणं आणि दुरुस्त करणं महत्वाचं आहे. पारंपारिकरीत्या आपल्याकडे पुरुषत्वाचा संबंध शक्तीशी आणि स्त्रीत्वाचा सहनशक्तीशी जोडला आहे.

शारीरिक कष्ट करणं, मूल होणं आणि संभोगसूख देता-घेता येणं या वास्तविक तीन स्वतंत्र क्रिया आहेत आणि एकमेकांशी फारशा संबंधित नाहीत!!!!
शारीरिक कष्टासाठी शरीर सुदृढ हवं पण पुरुष बीजाची किंवा लिंगाला ताठरता येण्याची अजिबातच आवश्यकता नाही.
 मुलं होण्यासाठी पुरुष बीज तयार होणं आणि शरीरसंबंध जमणं हे आवश्यक आहे, पण यासाठी तुम्ही बॉडी-बिल्डर असायची गरज नाही. अहो इथेच पहा ना, इथले बरेचसे पुरुष बॉडी-बिल्डर नाहीत आणि बऱ्याचशा पुरुषांना मुलंही आहेत. उलट अगदी धडधाकट असलेल्या, सैन्यात अधिकारीपदी असलेल्या, बॉडीबिल्डींग किंवा इतर खेळात चॅम्पियन असलेल्या व्यक्तींनाही मूल होण्यात अडचण असू शकते. पुरुष बीज निर्माण करणारी यंत्रणा आणि शारीरिक शक्ती यांचा थेट संबंध नसतो.
आणि कामसुखासाठी? लिंगाला ताठरता येण्यासाठी? पुरूषबीज तयार होण्याची गरज नाही. शरीरसंपदाही यथा तथा असली तरी चालते. उलट कामसौख्यासाठी, दांपत्यसुखासाठी मन सदासतेज असावं लागतं. कुस्तीत प्रतिस्पर्ध्याला आस्मान दाखवणारे गडी, पलंगावर सखीला चांदसितारे दाखवतीलंच असं नाही. कारण पलंग म्हणजे आखाडा नाही. कामसौख्य हे शारीरिक शक्तीचं प्रदर्शन नाही.
म्हणूनच नसबंदी केल्यामुळे पुरुषांची शारीरिक शक्ती, कामेच्छा, कामशक्ती  संपतबिंपत नाही. संभोगसूख, वीर्यपतन वगैरे जैसे थे रहातं. वीर्य हे पुरूषबीज आणि इतर अनेक स्त्रावांचं मिश्रण असतं. ऑपरेशननंतर त्यात पुरूषबीज मिसळत नाही एवढंच.  वीर्यातले बाकी घटक तयार होतच असतात. लैगिक भावना, लिंगाला होणाऱ्या संवेदना वगैरे कशावरच या ऑपरेशनचा दुष्परिणाम होत नाही.
म्हणून म्हणतो...
मन घायल पर तन पे छायी मिठी टीस सुहानी...
ना लागी ‘नस’पे कटार
उलट नको असलेल्या गर्भारपणाची भीती दूर झाल्यामुळे आता सुखेनैव संभोगसुखाचा अनुभव घेता आणि देता येतो.
मन घायल पर तन पे छायी मिठी टीस सुहानी...
नाsss लागी ‘नस’पे कटार
मोरोपंतांच्या काव्यात ढवळाढवळ करण्याची धिटाई मी का केली ते आता तुमच्या लक्षात आलं असेल.
एनएस व्ही सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो
कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा आवडो
तेंव्हा म्हणा...
नको नको नको नको ट्युबेक्टॉमी नको नको
(... आणि आता पुंडलिक वरदा च्या चालीत...)
बोला... एनएसव्ही ऑपरेशsssन  कराsss रे मित्रांनो
साधे सोपेsss आराsssमात
बिनटाका शस्त्रक्रिया की जय
पुरुषनसबंदी की जय.

पुनरुत्पादनाच्या प्रत्येक पायरीचा आपल्या समाजानी उत्सव केला आहे. पाळी आली की नहाण विधी आहे, लग्न ठरलं की साखरपुडा आहे. लग्न म्हणजे तर दोन्ही घरचा अगदी प्रतिष्ठेचा प्रश्न, ती चमक-दमक, तो माहोल, व्वा, भाई वा! पुढे पहिल्या रात्रीसाठी खास चिडवाचीडवी आहे, धार्मिक विधीही आहे. दिवस राहिल्यावर डोहाळे जेवण आहे, बागेतलं आहे, झोपाळ्यावरचं आहे, अगदी चंद्रावरचं सुद्धा आहे. मूल झाल्यावर पेढे-बर्फीचं उत्साही वाटप आहे आणि ध्वनीक्षेपकांची भिंत उभारून गाव दणाणून टाकणारं बारसं सुद्धा आहे. पण पुनरुत्पादनाची  क्षमता संपवणं, म्हणजे नसबंदी करून घेण्याचा काही उत्सव अजून निघाला नाहीये. तेंव्हा ज्यादिवशी, ‘नुकतच आमच्या मोठ्या दिरांचं एनएसव्हीच ऑपरेशन झालं; उद्या पूजेला या बरंका अशी नसबंदी नारायणाची निमंत्रण येतील तो सुदिन.’
बोला...
नको नको नको नको ट्युबेक्टॉमी नको नको
(... आणि आता पुंडलिक वरदा च्या चालीत...)
बोला... एनएसव्ही ऑपरेशsssन  कराsss रे मित्रांनो
साधे सोपेsss आराsssमात
बिनटाका शस्त्रक्रिया की जय
पुरुषनसबंदी की जय.