Monday 31 August 2020

पत्र मित्र सोबती नसे तो

गुलजार यांच्या वर्तमानपत्राबद्दलच्या मूळ हिंदी कवितेचे हे स्वैर मराठी भाषांतर

डॉ शंतनु अभ्यंकर, वाई


पत्र-मित्र सोबती नसे तो; 

चहा सकाळी सपक लागतो;

उजाडतेही अर्धेमुर्धे, 

डोळा अर्धा-अर्धा मिटतो.


खमंग वार्ता कुरकुरीतशी;

बुचकळ्याला चहात नाही;

नवा कायदा, नवीन फतवा; 

चघळण्यासही काही नाही.


पत्र-मित्र मम कुशीत येऊन; 

दो हाती दे जग सामावून;  

त्या पानांची फडफड फडफड;  

गरुडभरारी, दुनिया दर्शन.


असेल कोठे इथे-तिथे ते;

पदवीचे पोकळ भेंडोळे;

पण फोटोचे  पिवळे कात्रण;

जुने, फाटके, परि जपलेले. 


होत राहावी भेट रोजची;

पेपर नाही, ही तर खिडकी;

वर्तमान माझेच मला अन्;

खबरबात साऱ्या देशाची.


बिनपेपरचा उदासवाणा;

दिवस भासतो दीन, रिकामा;

बिनपेपरची उदासवाणी;

तहानलेली राही तृष्णा.


डॉ शंतनु अभ्यंकर,  वाई.



Tuesday 11 August 2020

स्तन्य अन्य आणि तारतम्य

स्तन्य, अन्य आणि तारतम्य.
डॉ. शंतनू अभ्यंकर,वाई. 
मो.नं. ९८२२०१०३४९  

आईचे दूध हे बाळासाठी अमृत असते! ‘माँ का दूध’ प्यायलेल्या मुलाचे उत्तम भरणपोषण होत असते यात शंकाच नाही.  पूर्वतयारी, शिक्षण, सकारात्मक दृष्टीकोन, वेळ, डॉक्टरी आणि सरकारी धोरण अशी सगळी गुंतवणूक केली तर त्यावर मिळणारा घसघशीत  लाभांश म्हणजे यशस्वी स्तनपान. 
स्तनपान सर्वोत्तमच. ठिकठिकाणी ‘हिरकणी कक्ष’ हवेतच.  पण त्यालाही काही सन्मान्य अपवाद आपण मान्य करायला हवेत. सर्वच्या सर्व आयांनी, सर्वच्या सर्व  बाळांना, किमान सहा महिने फक्त आणि फक्त अंगावरचेच दुध द्यायला हवे; ह्या सामान्यज्ञानाला काही अटीशर्ती लागू करण्याची वेळ आली आहे.
मुळात असा  सरसकट सल्ला देण्यात त्या आईचे मत आणि कुवत (शारीरिक आणि आर्थिक) लक्षातच घेतली जात नाही. कित्येक आयांना आर्थिक वा कौटुंबिक परिस्थितीमुळे पुन्हा नोकरी/शिक्षण सुरु ठेवणं भाग असतं. सहा महिने घरात रहाणं शक्य नसतं. आईच्या वेळेची किंमत धरली, प्रसंगी  नोकरी, सोडणं, जाणं, प्रमोशन हुकणं, न घेणं, पगारवाढीची संधी हुकणं, हे हिशोबात धरलं तर लक्षात येईल की  स्तनपान स्वस्तही नाही, फुकट तर नाहीच नाही. 
स्तनपानाच्या गुणगौरव करताना अशा मनाविरुद्ध स्तनपान न देऊ शकणाऱ्या स्त्रियांच्या मनात आपण प्रचंड अपराधगंड निर्माण करत असतो. बाळाला सुविहित आहार देणे ही जशी  आईची जबाबदारी आहे तशी बाबांची आणि  त्या कुटुंबाचीसुद्धा आहे; काही कारणांनी बाळाला स्तन्य पाजणे शक्य नसेल तर अन्य काही पाजण्यास मुभा आहे, हा संदेश ठळक करायला हवा. इतकंच काय, मूल होऊ न देणं हा जर एखादीचा वैयक्तिक निर्णय असू शकतो, तर मुलाला अंगावर न पाजणं हा देखील वैयक्तिक निर्णय असू शकतो. अशा निर्णयाला कोणतीही मूल्यपट्टी न लावणारेच धोरण असायला हवे. 
जन्मतः कमी वजन असलेली बाळे, कमी दिवसाची बाळे, एका वेळी खूप कमी दुध घेऊ शकतात. मोठ्ठा भोकाडसुद्धा पसरण्याची ताकद नसते त्यांची. नीट लुचून ओढण्याची शक्ती नसते त्यांना. त्यांना सारखं तासा दोन तासाला पाजावं लागतं. हा प्रकार तीन ते चार महिने करावा लागतो. हे खूप कष्टाचं आणि दमवणूक करणारं काम आहे. इथे स्तन्य आणि ते शक्य न झाल्यास डॉक्टरी सल्ल्याने अन्य हे पर्याय आहेत. पाजीन तर छातीशी नाहीतर उपाशी हे धोरण इथे  योग्य नाही. बाळ तृप्त असणं महत्वाचं मग त्याला पावडरचे दुध द्यावे लागले तरी बेहत्तर.
जी गोष्ट कमी वजनाच्या बाळांची तीच पैलवान साईजच्या बाळांची. त्यात आईला मधुमेह असेल तर प्रश्न आणखी बिकट होतो. अशा बाळांना सतत कडकडून भूक लागते आणि वेळेत भूक नाही भागवली तर यांची शुगर अचानक खूप कमी होते. अशा बाळांना आवश्यक तेंव्हा वरचे दुध द्यायला हवे. दुग्धचक्र सुरु होई पर्यंत तर नक्कीच द्यायला हवे.    
आणि अगदी नॉर्मल वजनाच्या बाळांनासुद्धा जन्मतः भूक तर लागते, दुधाची तर गरज असतेच मात्र ते पुरेशा प्रमाणात येत मात्र नाही; हा तर नेहमीचाच अनुभव. यावर आम्हा  डॉक्टरांचे पढीत उत्तर, ‘जेवढे येतंय तेवढं पुरतंय!!’ पुरेसं दुध येण्यासाठी वेळ लागतोच. बाळाने सतत अंगावर लुचत रहाणे हा दुध येण्यासाठीचा सर्वात स्ट्राँग स्टिमुलस आहे. पण दर दोन तासांनी बाळाला पाजा असं सांगणं सोपं आहे, करणं अवघड आहे. मुळातच थकलेली ती नवप्रसवा दिवसरात्र जागरण करून रडकुंडीला येते.  आपल्याला नीट जमत नाहीये असं वाटून अगदी निराश होते. बाळाला दुध न देता येण्यानं  न्यूनगंड वाटायला लागतो. या मानसिकतेने उलट दुध आटते. प्रौढ वयातील प्रसूती, इतर आजार, सीझर, सासर विरुद्ध माहेर अशी नि:शब्द जुगलबंदी, ‘पुन्हा मुलगीच!!!’; अशा अनेक गोष्टींनी आया आधीच कावलेल्या असतात. त्यात दुध न मिळाल्याने बाळाला काही व्हायला लागलं की प्रश्न आणखी बिकट होतात. जंगी पूर्वतयारी करुनही बऱ्याच आयांना सुरवातीला नाही येत पुरेसं दुध. यात त्यांचा काय दोष? त्यांच्या बाळांचा काय दोष?    
निव्वळ स्तनपानाच्या हट्टापायी बाळ कळत नकळत उपाशीही ठेवलं जातं. उपाशी, अतृप्त बाळाला काय काय व्हायला लागतं. कित्येकदा रडून दुध मागायचंही त्राण त्यात रहात नाही. ते मलूल होतं, कोमेजतं, त्याच्या रक्तातली साखर उतरते, सोडियम वाढते,  मग त्याला झटके येतात, मेंदूवर दीर्घकालीन दुष्परिणाम होतात. क्वचित मूल दगावतं  सुद्धा!  स्तनपानाचा अनाठायी आग्रह दुराग्रह ठरु शकतो तो असा. 
स्तनपान विरुद्ध पावडर असा हा सामना नाहीच्चे. अशा सामन्यात स्तनपानाची सरशी होणार हे जगजाहीर आहे. पण ‘पावडरचे दुध’  का (अचानक रक्तातली साखर कमी झाल्यामुळे  बाळाला) ‘शिरेवाटे ग्लुकोज’?; अशी दुविधा असेल तर पावडरचे दुध द्यायला काय हरकत आहे?  
सुरवातीच्या या अडचणींची, मातांच्या कष्टाची, जाणीव आपल्या परंपरेला आहे. ‘ओली दाई’, गाई-म्हशीचे दुध,  असे पर्याय आपल्या परंपरेत आहेत. गाई-म्हशीच्या दुधापेक्षा  पावडरचे दूध हे आईच्या दुधाशी अधिक मिळतेजुळते असते. त्यातील घटक तोलूनमापून, पारखून, निर्जंतुक करून  घातलेले असतात.  त्यामुळे आईच्या दुधानंतर याचा नंबर लागतो.   बाळाला पावडरचे दुध दिल्याने त्रास होतो तो दुध पावडरपेक्षा; पावडर-पाण्याच्या  चुकीच्या प्रमाणामुळे आणि अशुद्ध पाण्यामुळे. स्वच्छ पिण्याच्या पाण्याबाबत आपण बरीच प्रगती केली आहे तेंव्हा योग्य प्रमाणात आणि कडक स्वच्छता पाळून बनवलेलं पावडरचं दुध हा चांगला पर्याय आहे. जिथे असतील तिथे दुग्धपेढ्या हाही एक पर्याय आहे. 
दुध निर्माण होणे, पान्हा फुटणे वगैरे क्रीया नैसर्गिक जरी असल्या तरी हे चक्र सुरु व्हायला वेळ लागू शकतो आणि अशा वेळी बाळाला उपाशी ठेवणे धोक्याचे आहे. अर्थात एकदा हे चक्र सुरु झाले की हे सुष्टचक्र फिरते ठेवणे  खूप सोपे असते. एकदा हे झाले की वरचे दुध बंद करायला हवं. या बाबतीत आधीपासूनच आईचे, कुटुंबाचे शिक्षण, तयारी, शंकासमाधान हे खूप महत्वाचे ठरते. 
पावडरच्या दुधाचा अनाठायी आग्रह धरणारी, बाजारधार्जिणी, नफेखोर  धोरणे वाईटच आहेत पण आईचे दुध अमृत आहे म्हणून पावडरचं दुध म्हणजे विष नाही. प्रसंगोपात अमृततुल्य आहे असं  म्हणू आपण. प्रत्येक स्त्रीच्या आणि कुटुंबाच्या  इच्छेनुसार, शक्यतेनुसार, कुवतीनुसार आणि बाळाच्या परिस्थितिनुसार  प्रयत्नपूर्वक   स्तन्य;  डॉक्टरी सल्ल्यानेच, आपात्काली   अन्य; अशी दोन्हीची  तारतम्यानी सांगड घालण्यात साऱ्यांचेच सौख्य सामावले आहे.

Tuesday 4 August 2020

हात धुवा हात

हात धुवा हात 
डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई. 
९८२२०१०३४९ 

अंगणवाडीत गेला आहात कुठल्या? तुम्ही कशाला जाल म्हणा? तुम्ही तर मोठे. मोठे नाही तुम्ही तर बडे. पण संधी  साधून, बडपन्  बाजूला ठेऊन,  एकदा जाच. तुम्ही जाताच जरा बुजतील तिथली चिमणी पाखरं; पण काही वेळातच सगळा  संकोच गळून पडेल आणि तुमच्या आसपास बागडायला लागतील. ‘ओ, तुमच्या फोनात माजा येक सेल्फी घ्या ना!’ म्हणू गळ घालतील. मग तुम्ही सेल्फी काढायला सरसावून बसा पण अजिबात सेल्फी बिल्फी काढू नका. त्या पिल्लांना म्हणा, ‘हात धुण्याचं  गाणं म्हणून दाखवा, मग सेल्फी.’ क्षणात सारी किलबिल तऱ्हेतऱ्हेने हातावर हाता घासत,  एका सुरात गायला लागेल; 

हातात ख्येळतो पैसा; 
पाण्यात पवतो मासा  
बाळ चोखतो अंगठा 
एक घास चिउचा  
एक घास काउचा... 

हात कसे धुवावेत हे शिकवणारं हे अॅक्शन पॅक्ड गाणं मी पहिल्यांदा ऐकलं आणि डोळ्याच्या कडा पाणावल्या माझ्या.     

किती साधा संदेश. घडत्या वयात मेंदूत कोरून काढला की आयुष्य निरामय करणारा. नीट हात धुवा. साबणाने छानपैकी  हात धुवा. कोणत्याही साबणाने. स्पेशल, पीएच बॅलंस्ड, कोमलांगी  साबणाने धुवा अथवा जंतूनाशक मर्दानी साबणानी धुवा, कशानीही  धुवा, पण हात धुवा म्हणजे झालं.   

या एवढ्याश्या कृतीने कितीतरी विकृती दूर केल्या आहेत. माणसाच्या इतिहासातील, अन्न शिजवून खाण्याखालोखाल,  ही सर्वात आरोग्यदायी कृती म्हणता येईल. निव्वळ हात धुण्याने लोकांच्या जीवनात क्रांती  झाली आहे. एक निशब्द, अदृश्य क्रांती. 
सध्या करोनाच्या साथीने सगळ्यांनाच वारंवार हात धुण्यास सांगितले जात आहे पण एके काळी  डॉक्टरांनी हात धुणे हेही अत्यंत क्रांतीकारी, पाऊल ठरले होते. त्याला कसून विरोध झाला होता.

हात धुवा असं सांगणारा  होता डॉ. ईगनाज सेमेलवाईस. होता हंगेरीचा. डॉक्टर झाला  पेस्ट (बुडापेस्ट या जुळ्या शहरातील पेस्ट)  येथील कॉलेजातून आणि प्रॅक्टिस करायचा  व्हिएन्नात (ऑस्ट्रिया). तिथल्या सरकारी दवाखान्यात. अर्थात दवाखान्यात बाळंतपण, हा प्रकार तेंव्हा फारसा नव्हताच. तेंव्हा अगदी गरीब, अडल्यानडल्या बायकाच तिथे यायच्या, बाळंत व्हायच्या आणि त्यातल्या सुमारे २५% घरी न जाता देवाघरी जायच्या. विसातल्या पाच  बायका मरणार म्हणजे भयंकरच प्रकार होता. आज महाराष्ट्रात दहा हजारात पाच बाळंत-मृत्यू घडतात आणि हे प्रमाणही अजून खूप कमी करता  येण्यासारखं आहे. पण त्या काळी  ‘हे देवघरचे नेणे’ असंच वाटायचं सगळ्यांना. ईश्वरेच्छेपुढे इलाज नाही अशीच समजूत होती. बायका जायच्या त्या बहुतेक बाळंतज्वराने. म्हणजे प्रसूतिनंतर काही दिवसात फणफणून ताप चढायचा, जनन मार्गातून विशिष्ठ दर्प असलेला  पू वहायला लागायचा आणि ग्लानी  येऊन शरीर जे थंड पडायचं ते कायमचं.   

याची कारणे म्हणजे भुते, पंचमहाभूते किंवा हवेतील अदृश्य रोगकारक शक्ती अशी समजूत प्रचलित होती.  या मायावी शक्तीला नाव होतं, मायाजम. 

  पण सेमेलवाईसच्या लक्षात आलं की ह्या मरणाला एक शिस्त आहे! काही  आकारउकार आहे. इथे एका  विभागात बायका जास्त मरतात आणि दुसऱ्यात कमी. जिथे दाया सगळं उरकायच्या तिथे मृत्यू कमी होते. जिथे वैद्यकीय विद्यार्थी काम करायचे तिथे सगळे पुरुष राज्य, तिथे  मृत्यू जास्त होते.  दोन्हीत नेमकं  वेगळं काय केलं जातंय याचा त्यानी सूक्ष्म अभ्यास केला. 

हवा, पाणी, अन्न, उजेड, कपडेलत्ते, येणारेजाणारे असा बऱ्याच गोष्टींचा विचार केला त्यानी. बसून बाळंत होणे, पाठीवर झोपून होणे, कुशीवर झोपून होणे, उकिडवे बसून होणे, ह्याने काही फरक दिसतो का तेही तपासलं. दाया बायकांना  कुशीवर झोपवून बाळंत होऊ देत. मग  त्यानी सगळ्यांना कुशीवर झोपवून प्रसूती केली तर काही फरक पडतो का ते तपासलं.  शून्य फरक पडला.   मृत्यूशैय्येशी  घंटानाद करत, बायबल वाचणाऱ्या पाद्रयामुळे, बाकीच्या बायका हाय खातात, ज्वर–जर्जर होतात आणि प्राण सोडतात; अशीही थिअरी तपासली त्यानी. पण पाद्रयाला लांब उभं करून, घंटानाद बंद करूनही काही फरक पडेना. पुरुष डॉक्टरने प्रसूती केल्यामुळे लाजेने चूर होऊन बायकांना ताप चढत असावा अशीही  कल्पना लढवली त्यानी.

  अखेरीस त्याला  एक विशेष  फरक सापडला.  त्याच्या असं लक्षात आलं की  ज्या विभागात विद्यार्थ्यांचे शिक्षणही चाले तिथे हे विद्यार्थी शवविच्छेदन करत आणि एवढ्यात कोणी बाळंतीण आली  तर तिलाही सोडवत. याचा तर काही संबंध नसावा? हे दोन्ही विभाग शेजारीशेजारीच होते. शवविच्छेदन करणारे हात जेंव्हा प्रसूतीसाठी सरसावतात तेंव्हा ‘काहीतरी’ त्या बायकांना भोवत असणार. शेजारच्या वॉर्डात दाया सगळा कारभार सांभाळायच्या. तिथे शवविच्छेदन नव्हतं आणि   तिथे मृत्यूदर अत्यल्प होता.  
त्याच दरम्यान त्याच्या एका सहकारी  डॉक्टरचा मृत्यू झाला. मृत्यू झाला तो हाताची जखम चिघळल्याने. जखम झाली ती  हाताला शवविच्छेदन करता  करता कापले म्हणून. शवविच्छेदन होते एका बाळंतज्वराने गेलेल्या बाईचे. ह्या डॉक्टरला ताप थंडी, पू आणि पुवाचा तो विशिष्ठ वास अशी सारी सारी लक्षणे उद्भवली. पुरुषात बाळंत-ताप??? सेमेलवाईस  विचारात पडला. म्हणजे त्या जखमी हातात त्या मृतदेहातूनच ‘काहीतरी’ शिरलं असणार. 
मृत शरीरातील ‘काहीतरी’ इकडून तिकडे जातंय असं त्याच्या मनानी  घेतलं. मनानी घेतलं असंच म्हणायला हवं. कारण हे ‘काहीतरी’ म्हणजे काय ह्याचा  काहीही थांगपत्ता त्याला नव्हता. कुणालाच नव्हता. जंतू ठाऊक होते पण जंतुंमुळे आजार होतात वगैरे कल्पना तेंव्हा कल्पनेतही नव्हत्या. 

ह्या  ‘काहीतरी’साठी त्यानी ‘शव-कण’ (cadaverous particles)  असा शब्द वापरला. त्याचा हा अंदाज मात्र बरोब्बर होता.  हे ‘शव-कण’ इकडून तिकडे जाऊ नयेत  म्हणून त्यांनी सर्वांना प्रसूतीपूर्वी हात धुण्याचं फर्मान काढलं. हे ‘शव-कण’ नीट धुतले  जावेत  म्हणून ब्लीचींग पावडरचं पाणी वापरावं असंही सांगितलं. साबणानी हात धुतले तरी वास पूर्ण जायचा  नाही म्हणून ब्लीचींग पावडरचे पाणी बरे, अशी त्याची कल्पना.  झालं असं की यामुळे मृत्यूचं  प्रमाण झपकन खाली आलं. २५% वरुन  १%!!! मार्च आणि एप्रिल १८४८ मध्ये तर एकही रुग्णा दगावली नाही. 

व्हिएन्नाच्या डॉक्टरांपुढे त्यानी आपली निरीक्षणे मांडली (१५ मे १८५०). त्यानी सुचवलेली कारणे आणि उपाय कुणालाच  पटेनात. तो मात्र पेटलेलाच होता. पुरावे तपासण्याची मागणी,  प्रतिप्रश्न म्हणजे जणू शत्रुत्व असा त्याचा आव होता. आपली आकडेवारी, युक्तिवाद, सुसंगतपणे प्रसिद्ध करायला तो तयार नव्हता.  विरोधकांना जाहीर पत्र लिहून त्यात उपमर्द, उपहास, अपमान, चेष्टा अशी सारी आयुधं परजली  त्यानी.   ‘इतक्या सगळ्या बायका मारण्यात डॉक्टरांचाच हात आहे आणि  यक:श्चित दायांचा कारभार डॉक्टरांपेक्षा सरस आहे’; असे  कर्कश्श आरोप त्यानी केले. अर्थात हे  तर थेट फेटाळण्याकडेच कल होता साऱ्यांचा. पेशंटनी  मात्र हे समीकरण मनोमन मानलं होतं.   बोलीभाषेत ह्या तापाला ‘वैद्याचा ताप’ असंही एक नाव होतं!  

सेमेलवाईसची आकडेवारी खणखणीत असली  तरी  वरिष्ठांची खात्री पटेना. तो जे सांगत होता ते जरा जगावेगळं होतं, सहज पटण्यासारखं नव्हतं. अदृश्य शक्ती असतात इथवर ठीक होतं पण त्या स्पर्शाने, आणि ते सुद्धा उदात्त भावनेने डॉक्टरने केलेल्या दैवी स्पर्शाने, इथून तिथे संक्रमित होतात हे पचणं जरा मुश्किल होतं. ‘मायझम’ सारखा अपशकुन हात धुण्याने फिटेल हे सहज पटणारे नव्हतेच.   शिवाय हात धुण्याचे ‘कर्मकांड’,  ही काही सहज जमणारी गोष्ट नव्हती. त्यासाठी जागेवर तस्त किंवा  मोरी हवी, ब्लीचिंग पावडर हवी,   पाणी हवं. ते कुणीतरी भरायला हवं.  ते हातावर घालणारा माणूस हवा. ते अति थंड पाणी हातावर घ्यायची शिक्षा भोगायला डॉक्टर तयार हवेत.    

भरिसभर म्हणून १८४८ सालच्या काही राजकीय भानगडीतही सेमेलवाईस  पुढे होता. आता तर तो वरिष्ठांच्या मनातून पूर्णच उतरला. त्याची नोकरी गेली.  पुन्हा प्रयत्न करूनही काही जाचक अटींवर ती दिली गेली. अपमानीत  सेमेलवाईस  तडक व्हिएन्ना सोडून पेस्टला गेला. तिथेही त्यांनी आपली पद्धत अंमलात आणली आणि तिथलाही  मृत्यूदर एक टक्याहूनही कमी आला. आता त्याच्याही आयुष्याला जरा स्थैर्य आलं.  संसार चांगलाच फुलला. पाच मुलं झाली त्याला.

बऱ्याच आग्रहानंतर ‘सूतिका-ज्वराची कारणे आणि प्रतिबंध’ असा ग्रंथही लिहिला त्यानी (१८६१). पण मांडणी अगदीच अघळपघळ होती. कोणतीही शास्त्रीय शिस्त नव्हती.  त्याच्या बोलण्याप्रमाणेच लिहीण्यातही सगळी उर्मट आयुधं  होतीच. त्यामुळे  पुस्तकाच्या वाट्याला दुर्लक्ष आणि ह्याच्या वाट्याला उपेक्षा तेवढी आली. त्याचं म्हणणं फारसं कोणीच मनावर घेतलं नाही. 
खचलाच तो.  या उपेक्षेने का कशाने कुणास ठाऊक पण त्याला वेड्याच्या इस्पितळात दाखल करांवं लागलं. थोडेच  आधी त्यानी  कुठल्याशा पेशंटचं  ऑपरेशन केलं होतं.   त्याच्या हाताला कापलं होतं. ती जखम चिघळली आणि त्यातच तो गेला (१८६५). 

पुढे दोनच वर्षांनी जोसेफ लिस्टरनी कार्बोलीक अॅसिड वापरुन निर्जंतुकीकरणाचा प्रभाव सिद्ध केला (१८६७). लुई पाश्चर आणि रॉबर्ट कॉख यांनी जंतूबाधेचा सविस्तर अभ्यास मांडला आणि सेमेवाईसच्या मृत्यूनंतर  सुमारे दोन दशकांनी  ऑपरेशनपूर्वी हस्तप्रक्षालन हे कर्मकांड न रहाता नित्यकर्म झालं.  वेडा इगनाज सेमेवाईस द्रष्टा ठरला. 

आता तर त्याच्या सन्मानार्थ  गुगलने डूडल बनवले आहे. ऑस्ट्रियानी तिकीट काढले आहे. बुडापेस्ट विद्यापीठाचे नाव आता सेमेलवाईस  विद्यापीठ आहे.  आता सेमेलवाईस  हीरो आहे.  इतकी साधी गोष्ट लोकांना कशी काय बुवा  पटत नव्हती?; हा  आपल्याला बुचकळ्यात टाकणारा  प्रश्न आहे. पण खरं सांगायचं तर ही सगळी पश्चातबुद्धी म्हणायची. 
सेमेलवाईसच्या गोष्टीतून  अनेक धडे शिकण्यासारखे आहेत. तो हीरो असला तरी  इतर सगळे झीरो नव्हते, बायका मरत असताना फिडल वाजवत बसलेले निरोही नव्हते. ऑलिव्हर वेंडेल होम्स, जेम्स सिमसन प्रभृतींनी जंतुबाधेची अंधुक शंका वर्तवली होती (१८४३). पण उपलब्ध ज्ञान आणि तंत्रज्ञान पहाता गाडी शंकेपुढे सरकत नव्हती.
विरोधकांचाही विरोध आंधळा नव्हता. त्यांचेही युक्तिवाद होते आणि अहंमन्य  सेमेलवाईसला ते खोडता येत नव्हते. 
त्याला त्याच्या युक्तीमागील कार्यकारणभाव सांगता  आला नाही. पण कार्यकारणभाव कळला नाही तरी उपाय लगेच निरुपयोगी ठरत नाही. 
हात धुण्याचा शोध त्याला अंदाजपंचेच लागला. अंदाजाने, अपघातानेही शोध लागू शकतात. लागले आहेत. पण  कोणतीही शक्यता स्वीकारण्यापूर्वी  अथवा नाकारण्यापूर्वी अभ्यास आणि आकडेवारी खूप महत्वाची आहे. 
सबळ  पुरावा असूनही आपला क्रांतिकारी शोध  त्याला अंमलात आणता आला नाही. त्याला नीट जर्मन येत नव्हतं, तो ज्यू होता, तो भांडकुदळ होता, तापट होता, हेकेखोर होता,  एककल्ली होता, स्थानिक राजकारणाचा बळी होता. कारणे काहीही असोत; शोध आणि व्यवस्थेमध्ये त्याचा अंमल ही वेगवेगळी कौशल्ये आहेत हेच खरं.

आज तर हात धुण्याला अनन्यसाधारण महत्व आलं  आहे. 
अंगणवाडीत जसं हात धुवायला शिकवतात तसं सर्जरीच्या पहिल्या पोस्टिंगलाही शिकवतात. 
हात धुवून चड्डीला पुसले तर अंगणवाडीत जसं पुन्हा हात धुवायला लावतात तसं सर्जरीच्या पोस्टिंगलाही करतात. 
पद्धत तीच, 
फक्त गाणं म्हणायला लावत नाहीत एवढंच.

Monday 3 August 2020

आम्ही प्रेग्नंट आहोत!!!

आम्ही प्रेग्नंट आहोत!!!

डॉ. शंतनु अभ्यंकर

 

“डॉक्टर, आम्ही प्रेग्नंट आहोत!!!”

माझ्या हॅलोचीही वाट न बघता एक अधीर स्वर फोनवर उमटला. बोलणारी व्यक्ती, अस्तंगत राजेशाहीचे ओझे वहाताना, स्वतःला आदरार्थी बहुवचन वापरणारी, कोणी घरंदाज स्त्री नव्हती.  तो होता, पुरोगामित्वचं पाणी प्यायलेला आणि ते पुरोगामित्व  आचरणात आणायला आसुसलेला माझा  मित्र.

“अभिनंदन!, तुझं हे ‘आम्ही प्रेग्नंट आहोत’ जाम आवडलं यार मला.”

“सर, आम्ही इथे ज्या डॉक्टरना दाखवलंय, तिथे मी केसपेपरवरसुद्धा दोघांचं  नाव घालायला लावलं, रिसेप्शनिस्टला.”

“अरे व्वा, अगदी भारी केलंस हे.”

बायकांचा डॉक्टर असलो तरी पुरुषांची बरीच रूपं बघायला मिळतात मला. पण हे रुपडं नवीन होतं, मोहक होतं. किती खरी  होती त्याची भावना. मूल होणार ते दोघांना मग दोघंही प्रेग्नंट आहेत असं समजलं तर छानच की. नवऱ्याची अगदी पहिल्यापासून अशी समजून उमजून मिळालेली साथ दोघांचं नातं अधिक फुलवत नेईल, नाही का?

 पण नवऱ्याचा सहभाग सुयोग्य जरी असला तरी  स्वतःच्या शरीरावर त्या स्त्रीचाच हक्क आहे.  ती सक्षम आणि सज्ञान असेल तर अगदी  गर्भपाताचा अधिकार तिलाच. हे सर्वस्वी मान्य करूनही, सुजाण पालकत्व हा हेतु असेल तर नवऱ्याचा सहभाग हवाच.

पण सहसा असं आढळत नाही. स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असेल; तर पुरुष हा  स्खलनाच्या क्षणापुरता  पती आणि फलनाच्या क्षणापुरता पिता असतो; हे ढळढळीत जीवशास्त्रीय सत्य आहे. ह्या सत्याशी इमान  राखणारे अती. एकदा बायकोला ‘प्रेग्नंट केली’ म्हटल्यावर, आता पुढे आपण काय करायचं, हे ह्यांना उमगत नाही.

शिवाय जो ‘पीतो’ तो पिता, ह्या समजुतीशी प्रामाणिक रहाणारेही भरपूर. माझ्याकडे एक  कुटुंबनिष्ठ बिहारी बाबू  बायकोला घेऊन यायचा. दोघंच दोघं  इथे रहायचे. मजुरी करायचे. तो सतत दारू पिऊन तरर्. सतत शिव्यांचा भडिमार. पण कळा सुरू होताच, आपली ही अवस्था केल्याबद्दल, त्याच्या देवीजीने अर्वाच्य आणि अ-लिख्य भाषेत त्याला शिव्या द्यायला सुरुवात केली. माताभगिनींवरून, आईबापावरून, अंगप्रत्यंगावरून, गर्दभ-अश्वावरून शिव्या देत देत  तिनी संपूर्ण परतफेड केली. अखेर ती सुटली आणि तिचे ते शिव्याशाप ऐकण्यातून आम्ही सुटलो. मुलगा झाल्याची गोड बातमी मी देताच तो बिहारी बाबू म्हणतो कसा,  ‘कुतींया से कहना, घर आएगी तो इतना लात खायएगी की मर जाएगी!’ 

अर्थात सन्माननीय अपवाद आहेतच. मोटरसायकलवरून सुसाट आणि सैराट आलेलं जोडपं प्रेग्नंसी टेस्ट पॉसिटीव्ह आली आहे हे कळताच हेलपाटतं. माझ्या दवाखान्याची एकुलतीएक, वितभर, पायरी उतरतानासुद्धा, नवरा हात धरतो, म्हणतो ‘जपून हां’.

जपावं लागतच. एक क्षण भाळण्याचा बाकी सारे सांभाळण्याचे.  पत्नीच्याच पोटात बाळ वाढत असतं, त्यामुळे तपासण्यांपासून ते औषधपाण्यापर्यंत,  खाण्यापिण्यापासून ते डोहाळजेवणापर्यंत आणि प्रेग्नंसी-शूट पासून बेबी-शॉवरपर्यंत  बराचसा फोकस तिच्यावरच असतो. अचानक सिंहासनभ्रष्ट झाल्याबद्दल पुरुषांना थोडीथोडी असूयाही वाटत असते.

एकदा एकानी मला  विचारलं सुद्धा, ‘माझ्या नाहीत का हो काही तपासण्या?’ आईचा रक्तगट निगेटिव्ह असणे, टेस्टट्यूब बेबी, वारंवार व्यंग अथवा गर्भपात अशा अपवादात्मक परिस्थितीत नवऱ्याच्या तपासण्या करतातच. पण बापानेही नेहमी करुन  घ्याव्यात अशा तपासण्या आहेत बरं. उदाहरणार्थ एचआयव्ही. हा आजार आईला असेल तर बाळाला होऊ शकतो आणि तसा तो होऊ नये म्हणून उपचार उपलब्ध आहेत. पण वेळेत निदान झालं तर. आईची तपासणी सुरवातीला आणि शेवटी अशी दोनदा केली जाते. उगाच अधेमधे  इन्फेक्शन झालं असेल तर कळावं म्हणून.  पण आईला नव्याने  इन्फेक्शन होणार ते बाबांकडूनच की. हा आजार शरीरसंबंधातून पसरतो आणि संबंध तर (सहसा) फक्त पतीबरोबर येतात. तेंव्हा  पत्नीबरोबर पतीचीही तपासणी करणे महत्वाचे आहे. असाच हिपॅटायटिस बी म्हणून आजार आहे. त्याचीही  तपासणी दोघांनी करणं उत्तम.

थॅलेसेमिया किंवा सिकल सेल अॅनिमिया असे आनुवंशिक  आजारही उभयतां तपासणे उत्तम. कोणालाही आजार नाही हे जसं महत्वाचं तसंच   कोणा एकालाच  तो आहे हे समजणंही महत्वाचं. फक्त  पत्नीला आजार असेल तर वेगळा सल्ला, फक्त पतीला असेल तर वेगळी मसलत आणि दोघांना असेल तर आणखी वेगळी सल्लामसलत देता येते. या तपासण्या दोघांनी करणे हा जर सोन्याचा कळस असेल तर अजिबात न करणे हा मूर्खपणाचा कळस  आहे.  प्रचलित पद्धतीप्रमाणे  फक्त पत्नीने करणे हा सुवर्णमध्य नाही.  हा फारफार तर ब्रॉन्झ-मध्य म्हणता येईल!!!

इतकंच कशाला, आईबरोबर  बाबांनी स्वतःचं वजन,  शुगर आणि ब्लडप्रेशरही तपासून घ्यायला काय हरकत आहे? बाळाला सडपातळ पण  सुदृढ बाबा मिळायच्या दृष्टीने, हे कॉमन शत्रू  तपासायची एक संधी आहे इथे. नकळत कोणी शत्रू दबा धरून बसला असेल तर त्याला  नामोहरम करायची संधी आहे इथे. दिवस राहिलेत म्हटल्यावर आईच्या धूम्रपानावर आणि मद्यपानावर स्वाभाविकच बाबांची करडी नजर असणार.  तीच करडी नजर जरा स्वतःकडे वळवण्याची संधी  आहे इथे. तंबाखू, दारू, गुटखा वगैरेपासून लांब रहायच्या आणाभाका  घ्यायची आणि बाळाच्या नावाने त्या पाळायची संधी आहे इथे. एकदा ‘आम्ही प्रेग्नंट आहोत’ म्हटल्यावर हे सगळं ओघानंच आलं.     

स्वाइन फ्लूची लसही जोडीनं घेतलेली उत्तम. घरात इतर व्यक्ति असतील तर त्यांनीही त्या प्रेग्नंट बाई बरोबर  ही लस घ्यावी. सगळ्या घराचीच हर्ड इम्युनिटी वाढलेली बरी.  

सोनोग्राफी तपासणी जरी आईची असली तरी त्यावेळी बाबांची हजेरीसुद्धा एक छान अनुभव असतो. बाळाची नाळ आईशी थेट जुळलेलीच असते. बाबांची बाळाशी नाळ जुळण्यासाठी, सोनोग्राफीसारखी तपासणी नाही. सोनोग्राफीच्यावेळी बाबा हजर राहिले तर खूप एंजॉय करतील.  यात बाळ इतकं मस्त दिसतं, कुणीही हरखून जावं, प्रेमात पडावं. बाळ  मस्त मजेत पोहत असतं. हातपाय झाडत असतं, डोळे मिचकावत असतं, अंगठा चोखत  असतं; डॉक्टरांनी तपासायला खूप वेळ लावला तर चक्क लांबलचक जांभईसुद्धा  देतं बाळ. हे पाहून बापाला अगदी उचंबळून येतं. मेंदूत प्रोलॅक्टीन हॉर्मोनच्या रुपानी   पितृवात्सल्याचे उमाळे फुटायला लागतात. लाभाविण प्रीती करायला शिकवणाऱ्या, कळवळ्याच्या जातीचा मूळ जैवरासायनिक झरा हा प्रोलॅक्टीन आहे.     पण आपल्या समाजानी सोनोग्राफीचा लिंग निवडीसाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला  की पितृवात्सल्य पान्हावणारी  ही कुतूहल-खिडकी सरकारने बंद केली आहे. आता सोनोग्राफीवेळी  कोणालाही आत यायला मज्जाव आहे.

इथे जसा  मज्जाव आहे तसं प्रसूती कक्षातही मज्जाव आहे. आजकाल क्वचित कोणी नवरा अंगठ्याने जमीन उकरत उकरत, ‘डिलिव्हरीच्या वेळी  मला आत येऊ द्याल का डॉक्टर?’, असं विचारतो. मी तोंड भरून होकार देतो. ऐन वेळी तो गायब होतो किंवा अन्य नातेवाईकांसमोर त्याला त्याचं म्हणणे रेटता  येत नाही. अशी उपस्थिती खरंतर आईला खूप आधार देऊन जाईल. पण सांस्कृतिक आणि वैद्यकीय वातावरण त्याला पोषक नाही. एकूणच प्रेग्नंसी, डिलिव्हरी, हा प्रांत पुरुषांचा नाही अशीच समजूत घट्ट रुतून बसली आहे.  एखादा जावई, सासुरवाडीत येऊन, सतत बाळबाळंतिणीच्या  उशा पायथ्याशी बसून  राहीला,  तर त्याला बाजेचा पाचवा खूर, (कॉटचा पाचवा पाय) म्हणून हिणवण्याची प्रथा आहे ग्रामीण भागात. पण बाबांनी प्रसूती वेळीही  आईजवळ थांबावं  असं म्हणतात बुवा.

मानवी जन्म हा तसा रानटी आणि प्रथमदर्शनी भयावह मामला आहे. ज्यांना आपले पुरुषपण पक्वफळापरी सहजपणाने गळायला हवे असेल त्यांनी जरूर हा सोहळा अनुभवावा. एकदा चांगला, ‘अंगानं उभा न् आडवा त्याच्या रूपात गावरान  गोडवा’ असणारा शिपाईगडी,  ‘माझ्या बायकोला खूप दुखतंय तिचं तात्काळ सीझर करा.’ म्हणून माझ्या पायाला मीठी घालून ढसाढसा रडला होता. काही केल्या त्याची समजूत पटेना. त्याची ती मगरमीठी सोडवेपर्यंत त्याची पत्नी डिलीव्हर झाली सुद्धा. काही नवऱ्यांना तर या दर्शनानंतर नैराश्य आल्याचीही उदाहरणे आहेत.

 पण डिलिव्हरीला हजर राहू इच्छिणाऱ्यात ब्रम्हर्षी   गुगलाचार्यांचे शिष्य फार. ते सतत शंका विचारतात, सूचना करतात, मोबाइलवरून तिसऱ्याच कुणाला  धावते वर्णन सांगत बसतात, मांजरासारखे  सतत पायात पायात येतात, काही म्हणजे काही सुचू देत नाहीत. हद्द म्हणजे त्यांच्या अमेरिकेतल्या डॉक्टरमावशीची ताजी राय काय आहे, हे इथे  सुनावतात.  हे जसे  अतीउत्साही असतात तसे काही हतोत्साही असतात. पहिल्याच कळेला यांना अंधारी येते आणि हे बेशुद्ध पडतात. आई, बाळ आणि नवरा अशी तिघांना सांभाळण्याची कसरत डॉक्टरना करावी लागते.

शिवाय जे काही घडतंय ते योग्य का अयोग्य, नॉर्मल का अॅब्नॉर्मल हे ठरवण्याची पात्रता नवऱ्यात कशी असणार? नॉर्मल डिलीव्हरीच्या वेळी अर्धा  लीटर रक्त सहज वहातं. बाह्यांगाला इजा होणेही बरेचदा नॉर्मल असते. पण बघणाऱ्याला हे महाभयंकर वाटू शकतं. होणारी धावपळ, गडबड, गोंधळ, आरडाओरडा  हे अस्वाभाविक वाटू शकतं. त्यामुळे हलगर्जीपणाचे, निष्काळजीपणाचे नाहक आरोप होऊ शकतात.  बाळात  नंतर उद्भवणाऱ्या  कोणत्याही व्याधीचे मूळ जन्मावेळी झालेल्या आबाळीत शोधलं  जाऊ शकतं. सध्याच्या  वातावरणात हे किटाळ कोणत्या डॉक्टरला  हवे असेल? त्यामुळे डॉक्टर अशा  आगंतुकांच्या उपस्थितीबाबतीत अनुत्सुक असतात. 

प्रसवेला आदरपूर्वक वागणूक मिळावी, तिचे अधिकार, तिचे स्वत्व, तिचा खाजगीपणा जपला जावा असे राष्ट्रीय धोरण सांगते. विश्वासार्ह,  करुणाविस्तारी सोबती  असेल तर क्लेशापासून सोडवून प्रसन्नवदने  प्रसूती पार पडेल. पण ही सोबत नवऱ्यानी करावी का अन्य कोणी हा मामला अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. मुळात आई,  बाबा आणि व्यवस्था ह्याला धार्जिणी  हवीत. हॉस्पिटलची रचनाही ह्या बदलाला  स्वागतशील हवी. प्रत्येक जोडप्याची प्रायव्हसी जपली जाईल अशी सोय हवी.

पती अनेक गोष्टी करू शकतो. नुसत्या असण्याने किती तरी काम भागते.  समजावणे, मानसिक, भावनिक आधार देणे, धीर देणे, हे तर तो सहजच करू शकतो. मसाज देणे, इकडे तिकडे फिरायला मदत करणे, तिच्यावतीनी  डॉक्टरांशी बोलणे, हेही शक्य आहे. पण असं काही करायचं तर नवऱ्याची जय्यत तयारी हवी. आधीपासून पालक मार्गदर्शन वर्गांना जोडीने  उपस्थिती, नीट माहिती, अभ्यास असं सगळं हवं.  ‘आम्ही प्रेग्नंट आहोत’ ही उत्सवी घोषणा नाही. ती एक तपश्चर्या आहे. समानतेच्या समजुतीची,  वागणुकीच्या व्रतस्थतेची एक शाब्दिक खूण मात्र आहे. ही  प्रागतिक गुटी सगळ्यानाच गोड लागेल असं नाही. जगद्विख्यात बल्लावाचार्य  रॅमसे गॉर्डनने स्पष्टपणे सांगून टाकले आहे, “त्या यातना, वेदना आणि बघू नये ते बघून उगाच मी माझे सेक्सलाईफ कायमचे संपवू इच्छित नाही!”.

आई होणे हा निश्चित बिंदु आहे, पण, ‘बापाचा जन्म’ हा तसा गोलमाल मामला आहे. आईच्या अंगातून निपजलेले बाळ आईच्या अंगावर पोसले जाते. बाळ आणि बाप अशी ओळख घडायला बराच काळ  जावा लागतो.  त्यामुळे बाबांना जय्यत तयारीची गरज आहे. बरेच वडील आता अशी तयारी करतात देखील.  व्हरांड्यात येरझाऱ्या घालत बिड्या सिगरेटी फुंकण्यापासून, बाळाची नाळ अभिमानाने कापताना सेल्फी घेण्यापर्यंत आधुनिक बाबांची प्रगती झाली आहे. अॅप डाउनलोड करुन त्यावर बाळाची प्रगती मांडणारे, हौसेहौसेनी बाळाला  पहिला लंगोट घालणारे आणि बदलणारे; थोडक्यात बाळाला अंगावर पाजणे वगळता सर्व काही करणारे  बाप आहेत आता.

खरंतर या सगळ्या प्रकारात बापाचं स्थान तसं लेचंपेचं असतं. मातृत्वाची स्त्रीला खात्री असते पण पुरुषाला  पितृत्वाची खात्री   नसते.  ही खात्री असावी म्हणून तर कुटुंबसंस्था आणि स्त्रियांना मर्यादेत ठेवणाऱ्या रूढी परंपरा आल्या. ह्या बेड्या तोडायच्या  तर पितृत्व आश्वस्त करणारे नवे बंध हवेत.

‘आम्ही प्रेग्नंट आहोत’ मध्ये हा नवा रुपबंध मला दिसतो.  

 

 

 

 

 

 

 


Sunday 2 August 2020

स्तनपान हेच अमृतपान

स्तनपान, हेच अमृतपान!
डॉ. शंतनु अभ्यंकर
मटा. 3 ऑगस्ट 2020

आयांनी, बायांनी, दायांनी, डॉक्टरांनी, इतकंच काय, हिंदी सिनेमातील कित्येक हिरोंनी ‘माँ’च्या दुधाची कितीही महती गायली असली, पोवाडे गायले असले, तरी अजूनही त्या संदर्भात समाजमानसात बरेच गैरसमज घट्ट रुतून बसलेले आहेत.

यात सगळ्यात जास्त गैरसमज, हे आईच्या आहाराबद्दल आहेत. बहुतेकदा नुकत्याच बाळंत झालेल्या महिलेला अतिशय अळणी, बेचव अन्न दिलं जातं. असं बिन मीठ-मसाल्याचं जेवण तिला मुळीच जात नाही. साहजिकच त्यामुळे आहार कमी घेतला जातो. मग अशा अर्धपोटी आईला भरपूर दूध कसं बरं येणार? मग या उपासमारीचा परिणाम म्हणून दूध कमी येतं आणि भूक भागली नाही, म्हणून बाळ रडत राहातं. मात्र अशा वेळी, तूच काहीतरी ‘वावडं’ खाल्लं असशील, असा ठपका आईवरच ठेवला जातो!

वास्तविक नुकतीच आई झालेल्या स्त्रीला सकस, चौरस आणि चविष्ट आहार देणं अतिशय महत्त्वाचं आहे. नेहमीच्या आहारातील कोणताही विशिष्ट पदार्थ, अथवा पदार्थ करण्याची पद्धत बदलण्याची काहीही आवश्यकता नसते. अमुक एक पदार्थ आईने खाल्ला तर बाळ रडतं, त्याला गॅस होतो, त्याच्या पोटात दुखतं, असं एकमेकाला हिरीरिने सांगितलं जातं. मात्र यात काहीही तथ्य नाही. उलट अन्न बेचव असल्यास आई पुरेसा आहार घेत नाही, किंबरहुना घेऊ शकत नाही. गरोदरपणामध्ये लागतात त्याच्यापेक्षा अंगावर पाजायला जास्त उष्मांक लागतात. तेव्हा आईने भरपूर जेवणं महत्त्वाचं आहे... आणि बाळंत स्त्रीने बेचव अन्न खाणं, जर इतकं महत्त्वाचं वाटत असेल, तर मग त्या आईवरील प्रेमापोटी, कुटुंबातील साऱ्यांनीच तसं अन्न ग्रहण करावं!

आहारानंतर, मातेच्या आजाराबद्दलच्या आणि औषधांबद्दलच्या कल्पना येतात. सर्वसाधारणपणे वापरात असलेली बहुतेक औषधं स्तनपान काळातही दिलेली चालतात. अर्थात, संशय असेल तेव्हा याबबत डॉक्टरी सल्ला घेतलेला उत्तम!

आईला जरा सर्दी, ताप, खोकला झाला की ताबडतोब अंगावर पाजणं बंद केलं जातं. मात्र आईने अंगावर पाजूच नये असे अगदी मोजकेच आजार आहेत. अन्यथा साध्या सर्दी, ताप, खोकल्यासाठी स्तनपान बंद करण्याचं काहीच कारण नाही. बाळ आईच्या निकट असतं आणि आईला सर्दी-ताप-खोकला झाला, तर तो बाळाला सहजपणे होणारच. मात्र बाळाच्या शरीरात हे जंतू आपला प्रताप दाखवण्यापूर्वीच आईच्या शरीरातील जंतुनाशक प्रतिपिंडे दुधाद्वारे बाळाला प्राप्त होऊ शकतात. तेव्हा, बाळाचं दूध तोडणं म्हणजे जंतुना मोकळे रान देण्यासारखे आहे. स्तनात गळू जरी झाला, तरीही बाळाला पाजता येतं. अगदी करोना जरी झाला, तरी स्तनपान बंद करण्याची आवश्यकता नसते. मास्क आणि स्वच्छता हाच मंत्र स्तनदा मातेने वापरायचा आहे.

दूध लगेच फुटत नाही ही देखील एक नेहमीची तक्रार. स्तनपान ही निसर्गदत्त देणगी जरी असली, तरी नळ उघडला की पाणी सुरू, अशी ही क्रिया नसते. थोडं समुपदेशन, थोडा प्रयत्न, थोडा धीर, थोडा संयम, थोडा सकारात्मक दृष्टिकोन आणि थोडा वेळ यासाठी लागतो. स्तनपान हे एक कौशल्य आहे आणि ते शिकावं लागतं. स्तनपान जितक्या लवकर सुरू करता येईल तितकं उत्तमच, पण याचा अर्थ सुरुवातीला स्तनपान देता आलं नाही, म्हणजे आता यशस्वीरीत्या स्तनपान देताच येणार नाही असा होत नाही. प्रयत्न केल्यास निश्चितपणे स्तनपान देता येतं.

सुरुवातीच्या काही दिवसात येणारं घट्ट पिवळं दूध, हे बाळाला बाधक असतं, अशा समजुतीने ते पिळून काढून, फेकून दिलं जातं. परंतु असं करणं गैर आहे. उलट या दुधात बाळासाठी आवश्यक ती पोषक द्रव्य असतातच, पण काही अत्यावश्यक अशी संरक्षक द्रव्यंही त्यात असतात. तेव्हा हे दूध कदापिही टाकून देऊ नये. ते बाळाला जरूर द्यावं.

स्तनपान ही तिन्ही त्रिकाळ करायची क्रिया आहे. बाळाला रात्री देखील वेळोवेळी अंगावरती घेणं महत्त्वाचं आहे. यामुळेच नव्याने आई झालेल्या बाईला कुटुंबियांचा भक्कम आधार लागतो. अन्यथा तीन चार महिने हे काम करणं, शारीरिक आणि मानसिकरीत्या खूप दमवणारं असतं. दिवसरात्र अंगावर पाजणं, शी-शू काढणं एवढाच कार्यक्रम उरतो. पहिले तीन महिने तर बाळ आईकडे पाहून गोड हसत सुद्धा नाही. नंतर बाळाच्या वेळापत्रकाची जरा नीट घडी बसते. रात्री उशिरा एकदा अंगावर घेतल्यावर, मग बाळ थेट पहाटेच उठतं.

आपल्याला पुरेसं दूध येत नाहीय, अशी शंकाही विनाकारण बहुतेक स्त्रियांच्या मनामध्ये डोकावते; किंवा आणखी दूध आलं की आणखी पाजता येईल आणि आपलं बाळ गुटगुटीत, आणखी वर्धिष्णू होईल अशीही कधीकधी प्रगतिशील महत्त्वाकांक्षा असते. मात्र, आपण पाजत गेलं की बाळ वाढत गेलं असं होत नाही. वाढीची काही अंगभूत, अनुवंशिक क्षमता असते. लालन-पालन, पोषणाने ही क्षमता गाठता-वाढवता येते.

जर बाळाला दिवसातून पाच-सहा वेळा शू होत असेल, एकदा अंगावर घेतल्यावर बाळ दीड-दोन तास शांत झोपत असेल आणि बाळाचं वजन दिलेल्या तक्त्यानुसार वाढत असेल, तर बाळाला पुरेसं दूध मिळतं आहे असं समजावं. यात शीचा संबंध नाही. दिवसातून दहा वेळा ते चार दिवसांतून एकदा शी होणे, ही दोन्ही टोकं नॉर्मल आहेत. एका बाजूला घेतलं असता दुसरीकडून दूध वाहत नसेल, अथवा स्तन घट्ट लागण्याऐवजी सैलसर लागत असतील, स्तन/स्तनाग्रे दुखत नसतील, तर दूध कमी आहे असं समजलं जातं, मात्र हेही खरं नव्हे. बोंडशी हुळहुळी होणं उलट तापदायक असतं. दर वेळी स्तनाग्रं साबणाने धुण्याची आवश्यकता नसते. उलट साबणाने तिथल्या त्वचेतील तेल निघून जातं आणि स्तनाग्रं कोरडी पडतात, दुखायला लागतात. छातीही दुखत असेल, तर बर्फाने शेकणं योग्य. योग्य मापाचे, बदललेल्या आकाराला आधार होऊ शकतील, असे कपडेही आरामदायी ठरतात.

बरेचदा दूध पुरेसं येत असतं, पण पाजायची पद्धत चुकत असते. बाळाला घेतल्यावर सुरुवातीला पाणीदार दूध येतं, बाळाची तहान भागते. नंतरच्या दुधाने बाळाची भूक भागते. त्यामुळे अंगावर पाजताना एका बाजूची छाती पूर्ण रिकामी होईपर्यंत त्याच बाजूला पाजत राहणं महत्त्वाचं आहे. थोडा वेळ एका बाजूला आणि थोडावेळ दुसऱ्या बाजूला असं केल्याने बाळाची फक्त तहान भागते, भूक भागत नाही आणि मग ते थोड्याच वेळात पुन्हा रडायला लागतं.

नीट समजून-उमजून, प्रयत्नपूर्वक पाजलं की पुरेसं दूध येतंच. जुळ्या मुलांना पुरेल इतकं दूध जुळ्यांच्या आईला येतं. तिळ्यांना पुरेल इतकं दूध तिळ्यांच्या आईला येतं. सातव्या महिन्यात प्रसूत झालेल्या स्त्रीला सातव्या महिन्यातल्या बाळाच्या गरजेनुसार दूध येतं आणि स्त्री आठव्या महिन्यात प्रसूत झाली असेल, तर आठव्यातल्याच्या गरजेनुसार दुध येतं. कालांतराने बाळ जसं मोठं होतं, तसं दूधही ‘पिकत’ जातं.

प्रत्येक स्त्रीने सहा महीने तरी बाळाला फक्त अंगावरच पाजावं. अर्थातच प्रत्येकीला आणि प्रत्येक वेळी हे शक्य असेलच असं नाही. अशा परिस्थितीत डॉक्टरी सल्ल्याने, वरचं दूध (शक्यतो पावडरचं) पाजता येतं आणि हा काही अपराध नाही. कितीही मनात असलं तरी, कित्येक स्त्रियांना कामाला जावंच लागतं. 
हिरकणीची हीच तर अडचण होती. घरी बाळाला बघायला कोणी नसेल, बरोबर नेलं तरी चार लोकांत कसं पाजायचं असा संकोच असेल किंवा आणखीही काही कारण असेल... शिवरायांच्या काळातील हिरकणीला, बिचारीला रायगडाचा कडा उतरवा लागला. आज कुणा हिरकणीला असं करावं लागू नये, अशी सजग समज असावी, अशी धोरणं असायला हवीत आणि असा ध्यास तर नक्कीच घ्यायला हवा आपण!