Tuesday, 4 August 2020

हात धुवा हात

हात धुवा हात 
डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई. 
९८२२०१०३४९ 

अंगणवाडीत गेला आहात कुठल्या? तुम्ही कशाला जाल म्हणा? तुम्ही तर मोठे. मोठे नाही तुम्ही तर बडे. पण संधी  साधून, बडपन्  बाजूला ठेऊन,  एकदा जाच. तुम्ही जाताच जरा बुजतील तिथली चिमणी पाखरं; पण काही वेळातच सगळा  संकोच गळून पडेल आणि तुमच्या आसपास बागडायला लागतील. ‘ओ, तुमच्या फोनात माजा येक सेल्फी घ्या ना!’ म्हणू गळ घालतील. मग तुम्ही सेल्फी काढायला सरसावून बसा पण अजिबात सेल्फी बिल्फी काढू नका. त्या पिल्लांना म्हणा, ‘हात धुण्याचं  गाणं म्हणून दाखवा, मग सेल्फी.’ क्षणात सारी किलबिल तऱ्हेतऱ्हेने हातावर हाता घासत,  एका सुरात गायला लागेल; 

हातात ख्येळतो पैसा; 
पाण्यात पवतो मासा  
बाळ चोखतो अंगठा 
एक घास चिउचा  
एक घास काउचा... 

हात कसे धुवावेत हे शिकवणारं हे अॅक्शन पॅक्ड गाणं मी पहिल्यांदा ऐकलं आणि डोळ्याच्या कडा पाणावल्या माझ्या.     

किती साधा संदेश. घडत्या वयात मेंदूत कोरून काढला की आयुष्य निरामय करणारा. नीट हात धुवा. साबणाने छानपैकी  हात धुवा. कोणत्याही साबणाने. स्पेशल, पीएच बॅलंस्ड, कोमलांगी  साबणाने धुवा अथवा जंतूनाशक मर्दानी साबणानी धुवा, कशानीही  धुवा, पण हात धुवा म्हणजे झालं.   

या एवढ्याश्या कृतीने कितीतरी विकृती दूर केल्या आहेत. माणसाच्या इतिहासातील, अन्न शिजवून खाण्याखालोखाल,  ही सर्वात आरोग्यदायी कृती म्हणता येईल. निव्वळ हात धुण्याने लोकांच्या जीवनात क्रांती  झाली आहे. एक निशब्द, अदृश्य क्रांती. 
सध्या करोनाच्या साथीने सगळ्यांनाच वारंवार हात धुण्यास सांगितले जात आहे पण एके काळी  डॉक्टरांनी हात धुणे हेही अत्यंत क्रांतीकारी, पाऊल ठरले होते. त्याला कसून विरोध झाला होता.

हात धुवा असं सांगणारा  होता डॉ. ईगनाज सेमेलवाईस. होता हंगेरीचा. डॉक्टर झाला  पेस्ट (बुडापेस्ट या जुळ्या शहरातील पेस्ट)  येथील कॉलेजातून आणि प्रॅक्टिस करायचा  व्हिएन्नात (ऑस्ट्रिया). तिथल्या सरकारी दवाखान्यात. अर्थात दवाखान्यात बाळंतपण, हा प्रकार तेंव्हा फारसा नव्हताच. तेंव्हा अगदी गरीब, अडल्यानडल्या बायकाच तिथे यायच्या, बाळंत व्हायच्या आणि त्यातल्या सुमारे २५% घरी न जाता देवाघरी जायच्या. विसातल्या पाच  बायका मरणार म्हणजे भयंकरच प्रकार होता. आज महाराष्ट्रात दहा हजारात पाच बाळंत-मृत्यू घडतात आणि हे प्रमाणही अजून खूप कमी करता  येण्यासारखं आहे. पण त्या काळी  ‘हे देवघरचे नेणे’ असंच वाटायचं सगळ्यांना. ईश्वरेच्छेपुढे इलाज नाही अशीच समजूत होती. बायका जायच्या त्या बहुतेक बाळंतज्वराने. म्हणजे प्रसूतिनंतर काही दिवसात फणफणून ताप चढायचा, जनन मार्गातून विशिष्ठ दर्प असलेला  पू वहायला लागायचा आणि ग्लानी  येऊन शरीर जे थंड पडायचं ते कायमचं.   

याची कारणे म्हणजे भुते, पंचमहाभूते किंवा हवेतील अदृश्य रोगकारक शक्ती अशी समजूत प्रचलित होती.  या मायावी शक्तीला नाव होतं, मायाजम. 

  पण सेमेलवाईसच्या लक्षात आलं की ह्या मरणाला एक शिस्त आहे! काही  आकारउकार आहे. इथे एका  विभागात बायका जास्त मरतात आणि दुसऱ्यात कमी. जिथे दाया सगळं उरकायच्या तिथे मृत्यू कमी होते. जिथे वैद्यकीय विद्यार्थी काम करायचे तिथे सगळे पुरुष राज्य, तिथे  मृत्यू जास्त होते.  दोन्हीत नेमकं  वेगळं काय केलं जातंय याचा त्यानी सूक्ष्म अभ्यास केला. 

हवा, पाणी, अन्न, उजेड, कपडेलत्ते, येणारेजाणारे असा बऱ्याच गोष्टींचा विचार केला त्यानी. बसून बाळंत होणे, पाठीवर झोपून होणे, कुशीवर झोपून होणे, उकिडवे बसून होणे, ह्याने काही फरक दिसतो का तेही तपासलं. दाया बायकांना  कुशीवर झोपवून बाळंत होऊ देत. मग  त्यानी सगळ्यांना कुशीवर झोपवून प्रसूती केली तर काही फरक पडतो का ते तपासलं.  शून्य फरक पडला.   मृत्यूशैय्येशी  घंटानाद करत, बायबल वाचणाऱ्या पाद्रयामुळे, बाकीच्या बायका हाय खातात, ज्वर–जर्जर होतात आणि प्राण सोडतात; अशीही थिअरी तपासली त्यानी. पण पाद्रयाला लांब उभं करून, घंटानाद बंद करूनही काही फरक पडेना. पुरुष डॉक्टरने प्रसूती केल्यामुळे लाजेने चूर होऊन बायकांना ताप चढत असावा अशीही  कल्पना लढवली त्यानी.

  अखेरीस त्याला  एक विशेष  फरक सापडला.  त्याच्या असं लक्षात आलं की  ज्या विभागात विद्यार्थ्यांचे शिक्षणही चाले तिथे हे विद्यार्थी शवविच्छेदन करत आणि एवढ्यात कोणी बाळंतीण आली  तर तिलाही सोडवत. याचा तर काही संबंध नसावा? हे दोन्ही विभाग शेजारीशेजारीच होते. शवविच्छेदन करणारे हात जेंव्हा प्रसूतीसाठी सरसावतात तेंव्हा ‘काहीतरी’ त्या बायकांना भोवत असणार. शेजारच्या वॉर्डात दाया सगळा कारभार सांभाळायच्या. तिथे शवविच्छेदन नव्हतं आणि   तिथे मृत्यूदर अत्यल्प होता.  
त्याच दरम्यान त्याच्या एका सहकारी  डॉक्टरचा मृत्यू झाला. मृत्यू झाला तो हाताची जखम चिघळल्याने. जखम झाली ती  हाताला शवविच्छेदन करता  करता कापले म्हणून. शवविच्छेदन होते एका बाळंतज्वराने गेलेल्या बाईचे. ह्या डॉक्टरला ताप थंडी, पू आणि पुवाचा तो विशिष्ठ वास अशी सारी सारी लक्षणे उद्भवली. पुरुषात बाळंत-ताप??? सेमेलवाईस  विचारात पडला. म्हणजे त्या जखमी हातात त्या मृतदेहातूनच ‘काहीतरी’ शिरलं असणार. 
मृत शरीरातील ‘काहीतरी’ इकडून तिकडे जातंय असं त्याच्या मनानी  घेतलं. मनानी घेतलं असंच म्हणायला हवं. कारण हे ‘काहीतरी’ म्हणजे काय ह्याचा  काहीही थांगपत्ता त्याला नव्हता. कुणालाच नव्हता. जंतू ठाऊक होते पण जंतुंमुळे आजार होतात वगैरे कल्पना तेंव्हा कल्पनेतही नव्हत्या. 

ह्या  ‘काहीतरी’साठी त्यानी ‘शव-कण’ (cadaverous particles)  असा शब्द वापरला. त्याचा हा अंदाज मात्र बरोब्बर होता.  हे ‘शव-कण’ इकडून तिकडे जाऊ नयेत  म्हणून त्यांनी सर्वांना प्रसूतीपूर्वी हात धुण्याचं फर्मान काढलं. हे ‘शव-कण’ नीट धुतले  जावेत  म्हणून ब्लीचींग पावडरचं पाणी वापरावं असंही सांगितलं. साबणानी हात धुतले तरी वास पूर्ण जायचा  नाही म्हणून ब्लीचींग पावडरचे पाणी बरे, अशी त्याची कल्पना.  झालं असं की यामुळे मृत्यूचं  प्रमाण झपकन खाली आलं. २५% वरुन  १%!!! मार्च आणि एप्रिल १८४८ मध्ये तर एकही रुग्णा दगावली नाही. 

व्हिएन्नाच्या डॉक्टरांपुढे त्यानी आपली निरीक्षणे मांडली (१५ मे १८५०). त्यानी सुचवलेली कारणे आणि उपाय कुणालाच  पटेनात. तो मात्र पेटलेलाच होता. पुरावे तपासण्याची मागणी,  प्रतिप्रश्न म्हणजे जणू शत्रुत्व असा त्याचा आव होता. आपली आकडेवारी, युक्तिवाद, सुसंगतपणे प्रसिद्ध करायला तो तयार नव्हता.  विरोधकांना जाहीर पत्र लिहून त्यात उपमर्द, उपहास, अपमान, चेष्टा अशी सारी आयुधं परजली  त्यानी.   ‘इतक्या सगळ्या बायका मारण्यात डॉक्टरांचाच हात आहे आणि  यक:श्चित दायांचा कारभार डॉक्टरांपेक्षा सरस आहे’; असे  कर्कश्श आरोप त्यानी केले. अर्थात हे  तर थेट फेटाळण्याकडेच कल होता साऱ्यांचा. पेशंटनी  मात्र हे समीकरण मनोमन मानलं होतं.   बोलीभाषेत ह्या तापाला ‘वैद्याचा ताप’ असंही एक नाव होतं!  

सेमेलवाईसची आकडेवारी खणखणीत असली  तरी  वरिष्ठांची खात्री पटेना. तो जे सांगत होता ते जरा जगावेगळं होतं, सहज पटण्यासारखं नव्हतं. अदृश्य शक्ती असतात इथवर ठीक होतं पण त्या स्पर्शाने, आणि ते सुद्धा उदात्त भावनेने डॉक्टरने केलेल्या दैवी स्पर्शाने, इथून तिथे संक्रमित होतात हे पचणं जरा मुश्किल होतं. ‘मायझम’ सारखा अपशकुन हात धुण्याने फिटेल हे सहज पटणारे नव्हतेच.   शिवाय हात धुण्याचे ‘कर्मकांड’,  ही काही सहज जमणारी गोष्ट नव्हती. त्यासाठी जागेवर तस्त किंवा  मोरी हवी, ब्लीचिंग पावडर हवी,   पाणी हवं. ते कुणीतरी भरायला हवं.  ते हातावर घालणारा माणूस हवा. ते अति थंड पाणी हातावर घ्यायची शिक्षा भोगायला डॉक्टर तयार हवेत.    

भरिसभर म्हणून १८४८ सालच्या काही राजकीय भानगडीतही सेमेलवाईस  पुढे होता. आता तर तो वरिष्ठांच्या मनातून पूर्णच उतरला. त्याची नोकरी गेली.  पुन्हा प्रयत्न करूनही काही जाचक अटींवर ती दिली गेली. अपमानीत  सेमेलवाईस  तडक व्हिएन्ना सोडून पेस्टला गेला. तिथेही त्यांनी आपली पद्धत अंमलात आणली आणि तिथलाही  मृत्यूदर एक टक्याहूनही कमी आला. आता त्याच्याही आयुष्याला जरा स्थैर्य आलं.  संसार चांगलाच फुलला. पाच मुलं झाली त्याला.

बऱ्याच आग्रहानंतर ‘सूतिका-ज्वराची कारणे आणि प्रतिबंध’ असा ग्रंथही लिहिला त्यानी (१८६१). पण मांडणी अगदीच अघळपघळ होती. कोणतीही शास्त्रीय शिस्त नव्हती.  त्याच्या बोलण्याप्रमाणेच लिहीण्यातही सगळी उर्मट आयुधं  होतीच. त्यामुळे  पुस्तकाच्या वाट्याला दुर्लक्ष आणि ह्याच्या वाट्याला उपेक्षा तेवढी आली. त्याचं म्हणणं फारसं कोणीच मनावर घेतलं नाही. 
खचलाच तो.  या उपेक्षेने का कशाने कुणास ठाऊक पण त्याला वेड्याच्या इस्पितळात दाखल करांवं लागलं. थोडेच  आधी त्यानी  कुठल्याशा पेशंटचं  ऑपरेशन केलं होतं.   त्याच्या हाताला कापलं होतं. ती जखम चिघळली आणि त्यातच तो गेला (१८६५). 

पुढे दोनच वर्षांनी जोसेफ लिस्टरनी कार्बोलीक अॅसिड वापरुन निर्जंतुकीकरणाचा प्रभाव सिद्ध केला (१८६७). लुई पाश्चर आणि रॉबर्ट कॉख यांनी जंतूबाधेचा सविस्तर अभ्यास मांडला आणि सेमेवाईसच्या मृत्यूनंतर  सुमारे दोन दशकांनी  ऑपरेशनपूर्वी हस्तप्रक्षालन हे कर्मकांड न रहाता नित्यकर्म झालं.  वेडा इगनाज सेमेवाईस द्रष्टा ठरला. 

आता तर त्याच्या सन्मानार्थ  गुगलने डूडल बनवले आहे. ऑस्ट्रियानी तिकीट काढले आहे. बुडापेस्ट विद्यापीठाचे नाव आता सेमेलवाईस  विद्यापीठ आहे.  आता सेमेलवाईस  हीरो आहे.  इतकी साधी गोष्ट लोकांना कशी काय बुवा  पटत नव्हती?; हा  आपल्याला बुचकळ्यात टाकणारा  प्रश्न आहे. पण खरं सांगायचं तर ही सगळी पश्चातबुद्धी म्हणायची. 
सेमेलवाईसच्या गोष्टीतून  अनेक धडे शिकण्यासारखे आहेत. तो हीरो असला तरी  इतर सगळे झीरो नव्हते, बायका मरत असताना फिडल वाजवत बसलेले निरोही नव्हते. ऑलिव्हर वेंडेल होम्स, जेम्स सिमसन प्रभृतींनी जंतुबाधेची अंधुक शंका वर्तवली होती (१८४३). पण उपलब्ध ज्ञान आणि तंत्रज्ञान पहाता गाडी शंकेपुढे सरकत नव्हती.
विरोधकांचाही विरोध आंधळा नव्हता. त्यांचेही युक्तिवाद होते आणि अहंमन्य  सेमेलवाईसला ते खोडता येत नव्हते. 
त्याला त्याच्या युक्तीमागील कार्यकारणभाव सांगता  आला नाही. पण कार्यकारणभाव कळला नाही तरी उपाय लगेच निरुपयोगी ठरत नाही. 
हात धुण्याचा शोध त्याला अंदाजपंचेच लागला. अंदाजाने, अपघातानेही शोध लागू शकतात. लागले आहेत. पण  कोणतीही शक्यता स्वीकारण्यापूर्वी  अथवा नाकारण्यापूर्वी अभ्यास आणि आकडेवारी खूप महत्वाची आहे. 
सबळ  पुरावा असूनही आपला क्रांतिकारी शोध  त्याला अंमलात आणता आला नाही. त्याला नीट जर्मन येत नव्हतं, तो ज्यू होता, तो भांडकुदळ होता, तापट होता, हेकेखोर होता,  एककल्ली होता, स्थानिक राजकारणाचा बळी होता. कारणे काहीही असोत; शोध आणि व्यवस्थेमध्ये त्याचा अंमल ही वेगवेगळी कौशल्ये आहेत हेच खरं.

आज तर हात धुण्याला अनन्यसाधारण महत्व आलं  आहे. 
अंगणवाडीत जसं हात धुवायला शिकवतात तसं सर्जरीच्या पहिल्या पोस्टिंगलाही शिकवतात. 
हात धुवून चड्डीला पुसले तर अंगणवाडीत जसं पुन्हा हात धुवायला लावतात तसं सर्जरीच्या पोस्टिंगलाही करतात. 
पद्धत तीच, 
फक्त गाणं म्हणायला लावत नाहीत एवढंच.

No comments:

Post a Comment