Tuesday, 30 March 2021

विज्ञान म्हणजे काय? अज्ञान मान्य करते ते विज्ञान लेखांक ४

 

विज्ञान म्हणजे काय?

अज्ञान मान्य करते ते विज्ञान

डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.

 

लेखांक ४

चूक शोधा, चूक  मान्य करा, चूक दुरुस्त करा आणि प्रगती साधा असं विज्ञान नावाची युक्ति आपल्याला सांगते. चूक आणि अज्ञान मान्य करणं ही ज्ञानाची पहिली पायरी आहे.

मेंडेलीफची आवर्तसारिणी  (Periodic Table) नावाचा, चौकोन चौकोन असलेला, एक मोठ्ठाच्या मोठ्ठा तक्ता, तुम्ही रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेत पहिला  असेल. तो असा दिसतो.


 साऱ्या मूलद्रव्यांची  क्रमवार आणि शिस्तशीर मांडणी या तक्त्यात  केली आहे. आज आपल्याला सारी मूलद्रव्ये माहीत आहेत. सारे चौकोन आता भरलेले आहेत.

  

पण जेंव्हा मेंडेलीफ  नावाच्या शास्त्रज्ञाने, हा तक्ता पहिल्यांदा तयार केला,  तेंव्हा (१८६९) काही मोजकीच मूलद्रव्ये ठाऊक होती.   त्याने केलेला पहिलावहिला तक्ता असा दिसत होता.

 

 यात काही चौकोन चक्क रिकामे दिसत आहेत. रिकामे चौकोन हीच तर त्याच्या यशाची गुरुकिल्ली. त्याच्या पूर्वीही अनेक जणांनी असा तक्ता करायचा  प्रयत्न केला  होता. ठाऊक होती ती सारी मूलद्रव्ये, सगळ्या  चौकोनात  भरून, शिस्तीत बसवण्याचा प्रयत्न केला होता.   पण मेंडेलीफ यशस्वी ठरला. याचे  कारण, त्याने सगळे चौकोन भरलेच  पाहिजेत, हा अट्टाहास सोडून दिला.  

प्रत्येक चौकोन म्हणजे काही विशिष्ठ गुणधर्म अशी याची रचना आहे. काही चौकोनात आपल्या गुणधर्माने  फिट्ट बसतील, अशी मूलद्रव्ये त्या काळी माहीतच नव्हती. अशा अज्ञात  मूलद्रव्यांच्या, संभाव्य जागा, त्याने रिकाम्या ठेवल्या आणि तक्ता जुळून आला.  या रिकाम्या जागा म्हणजे अज्ञान मान्य असण्याच्या खुणा. 

 

ह्याच्याही पूर्वी, जेंव्हा युरोपीय प्रवासी प्रथम दूरदेशी  जहाजे हाकू लागले तेंव्हा त्यांनी त्या किनारपट्टीचे नकाशे बनवले होते. किनारपट्टी लगतचा प्रदेश त्यांना चांगलाच माहिती होता.  पण थोडे आत गेल्यास काय आहे, हे अजिबात माहीत नव्हते. मग त्यांच्या  नकाशात किनारपट्टीच्या प्रदेशातील सर्व बारकावे असत पण आतल्या भागात भुतेखेते, चित्रविचित्र प्राणी, पक्षी, राक्षस अशी काल्पनिक चित्रे काढून ती जागा भरवलेली असे. पुढे काही शतकांनंतर काढलेल्या नकाशात मात्र अज्ञात जागा कोरी ठेवलेली आढळते. अज्ञानाचा शोध, हा माणसाला लागलेला एक मोठा शोध आहे.  प्रामाणिकपणाची ही मोठ्ठीच्या मोठी झेप म्हणायची! असा प्रामाणिकपणा आपल्याला विज्ञान नावाच्या युक्तिकडे घेऊन जातो.

जे माहीत नाही ते माहीत नाही म्हणायला विज्ञानाला शरम वाटत नाही. उदाहरणार्थ पृथ्वीवर पहिला  सजीव कसा  निर्माण झाला या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहीत नाही.  ह्या    विषयी आपल्याला नेमकं काही सांगता येत नाही. ‘पृथ्वीवर पहिला  सजीव कसा  निर्माण झाला?’,  असं विचारलंत तर तुमच्या विज्ञानाच्या शिक्षिका तुम्हाला काही  पान-गुची गोष्ट (पहा ह्या लेखमालेतील लेखांक १) सांगणार नाहीत. त्या कदाचीत म्हणतील, ‘ह्या प्रश्नाचं नेमकं उतर माहीत नाही बाई! मोठेपणी तूच शोधून काढ! ...आणि मला म्हातारीला घरी येऊन सांग!!’

पण इंटरनेटवर शोधलंत तर पहिला  जीव आला कुठून हे सांगणाऱ्या, जगभरातल्या  सात-आठ डझन कथा सहज  सापडतील. कित्येक कथांत आकाशातल्या कोणा शक्तिने हे केल्याचं सांगितलं आहे. कुठल्याशा कथेत अंड्यातून पहिला  जीव निपजला,   असं सांगितलं आहे. बॅबीलोनीयाच्या (आजचा इराक देश)  कथेत मुम्मु-टियामत आणि आपसू या आदि (म्हणजे मूळ) आईबाबांपासून जीवसृष्टी उत्पन्न झाल्याचं सांगितलं आहे. सारे जीव पृथ्वीच्या पोटातून वर आले असंही सांगणाऱ्या कथा आहेत.

पण असल्या कोणत्याच कथेत आजवर  काहीही तथ्य आढळलेलं नाही.  म्हणजे विज्ञानालाही काही सांगता  येत नाही आणि या कथांतही काही दम  नाही.

आता तुमच्या मनांत येईल की जर का विज्ञानालाही काही माहीत नाही तर मग एखादी कथा खरी मानून चालायला काय हरकत आहे?

हरकत आहे तर. हरकत अशी आहे, की एखाद्या प्रश्नाचं उत्तर एकदा सापडलं असं तुम्ही समजलात, की आपोआपच पुढील शोध थांबतो. समजा सर्व सजीव सृष्टी पृथ्वीच्या पोटातून वर आली आहे असं आपण समजून चाललो, तर प्रत्यक्षात सजीव सृष्टी कशी उत्पन्न झाली हे कशाला कोण शोधत बसेल?

दुसरा मुद्दा असा की असं एखादं खोटं आणि चुकीचं कारण आपण मान्य केलं की पुढचे सारे आडाखे, अंदाज, इतर संबंधित प्रश्नांची उत्तरेही चुकत जातात. उदाहरणार्थ एखादा आळशी  मुलगा गणितात नापास झाला आहे. त्याला  शून्य मार्क आहेत. समजा तो म्हणाला, ‘उत्तरपत्रिकेवरचा  हा लाल भोपळा जमिनीतून येऊन तिथे बसलाय’  किंवा ‘एका अंड्यातून हे शून्याचे अंडे बाहेर आलं आणि माझ्या बोकांडी बसलं.’ तर तुम्ही काय म्हणाल?

जो पर्यंत आपल्या आळशीपणामुळे, अभ्यास न केल्यामुळे, शून्य मार्क पडल्याचं तो मान्य करत नाही, शून्य मार्कांमागचं खरंखुरं  कारण शोधून काढत नाही,  तोपर्यंत त्याची प्रगती होईल का?

म्हणूनच एखाद्या प्रश्नाचं खरं उत्तर माहीत नसेल तर, माहीत नाही असं मान्य करावं. चुकीचे, खोटे कारण कधीही चिकटवू नये.  विज्ञान नावाची युक्ति आपल्याला असं  सांगत असते.   

पूर्वप्रसिद्धी किशोर मासिक एप्रिल २०२१

Wednesday, 17 March 2021

उत्तम कायदा सर्वोत्तम झाला.

 

उत्तम कायदा सर्वोत्तम झाला.

डॉ. शंतनू अभ्यंकर

गर्भपाताच्या कायद्यात काही महत्वाचे बदल झाले आहेत. त्याबद्दल सरकारचे अभिनंदन. यासाठी  प्रयत्न करणाऱ्या साऱ्या कार्यकर्त्यांचे, संघटनांचेही अभिनंदन. हा बदल किती महत्वाचा आहे हे  जनसामान्यांना सहजासहजी कळणार नाही.  पण जी स्त्री आणि कुटुंब या कायद्यातील जुनाट तरतुदींमुळे  भरडून निघाले असतील त्यांना हे  सहज उमजेल.

गर्भपाताचा आपला  कायदा एक आदर्श कायदा असून याची जगानी नोंद घ्यायला हवी. अमेरिकेत तर गर्भपाताला परवानगी निवडणुकीतील मुद्दा आहे. तिथल्या गर्भपात केंद्रांवर कट्टर धर्मवाद्यांकडून  अनेक प्राणघातक हल्ले झाले आहेत. आयर्लंड या कट्टर कॅथॉलिक देशात वेळेवर गर्भपात न केल्यामुळे एका भारतीय डॉक्टरचा मृत्यूही  ओढवला आहे. हा अगदी आंतरराष्ट्रीय मामला झाल्यावर तिथल्या सरकारनं नुकताच कायदा थोडासा(च) सैल केला आहे. कित्येक देशात गर्भपातावर  थेट बंदीच आहे, परवानगी असली तरी अटी  अगदी जाचक आहेत.  पण आपल्याला हा कायदा सुखासुखी मिळाल्याने त्याचे महत्व आपल्या लक्षातच येत नाही.    

त्या स्त्रीची अप्रतिष्ठा होऊ नये, गुप्तता राखली जावी, स्वातंत्र्याचा, स्वयंनिर्णयाचा आदर व्हावा, अशा अनेक तरतुदी आपल्या कायद्यात आहेत.   यातील नियम अत्यंत स्पष्ट आणि सुटसुटीत असून खंडप्राय  आणि विविधस्तरीय समाज असलेल्या आपल्या  देशात या कायद्यामुळे माता मृत्यूचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झाले आहे.

ह्या कायद्यानुसार स्त्रियांना निर्णयाचा संपूर्ण अधिकार आहे.  ती  निव्वळ कायद्याने सज्ञान आणि मानसिकदृष्ट्या सक्षम हवी एवढ्याच अपेक्षा आहेत. तिच्या नवऱ्याचीही संमती कायदा मागत नाही. गर्भपाताचे कारण तीने  द्यायचे आहे पण, ‘बलात्कार’, ‘सव्यंग मूल’ अशा भारदस्त कारणांबरोबरच; दिवस राहिल्याने तीला शारीरिक अथवा मानसिक त्रास आहे हेही कारण विधीग्राह्य आहे. विधवा, परित्यक्ता, विवाहबाह्य संबंधातून दिवस गेलेल्या अशा अनेक महिलांना या कायद्याने दिलासा मिळाला आहे.   निव्वळ गर्भनिरोधके ‘फेल’ गेल्यामुळे, एवढीही सबब  कायद्याला मान्य आहे. आता मुळात भारतीय जोडपी गर्भनिरोधके फार कमी वापरतात.  बहुतेकदा साधन फेल जात नाही तर  वापरायला ते जोडपे फेल जाते. ते असो. शिवाय हे  कारण डॉक्टर तरी कसे पडताळणार? थोडक्यात मागेल तिला चुटकीसरशी गर्भपात, अशी भारतीय कायद्यातील तरतूद आहे.

पण अशा मोकळ्याढाकळ्या, सैलसर रचनेमुळेच हा कायदा आदर्श ठरला आहे. जीवरक्षक ठरला आहे. एक्काहत्तर सालचा हा क्रांतिकारी कायदा, स्त्रियांना हक्काचा, सुरक्षित गर्भपाताचा  पर्याय देता झाला आणि कित्येक बायकांचे प्राण वाचले. असुरक्षित गर्भपातातून कित्येकींचा  बळी जायचा. ‘अमकीनी पोट  पाडायसाठी लाथा  मारून घेतल्या पण त्यातच ती गेली’; ‘पोट  दिसायला लागलं आणि  तमकीनी विहिर जवळ केली’; असे दुर्दैवी संदर्भ निव्वळ जुन्या साहित्यात वाचतो आपण.

वीस आठवड्यापर्यंत गर्भपात कायदेशीररित्या करता येत होता. आता ही मुदत चोवीस आठवडे केली आहे. नव्या कायद्यानुसार चोवीस आठवड्यानंतरही तसेच काही  गंभीर कारण असेल  आणि तज्ञ, अधिकृत वैद्यकीय मंडळाने तसा निर्णय घेतला तर कोणत्याही महिन्यात गर्भपात आता शक्य आहे.

मुळात कायदा झाला तेंव्हा सोनोग्राफी आणि गर्भातील व्यंगाचे निदान मुळी  अस्तित्वातच नव्हते. आता गेली काही दशके ते आहे. त्यामुळे उदरातील बाळाला कसले कसले आजार आहेत, अपंगत्व आहे, हे आता आधीच समजू शकतं. मग अशी संतती पोसणे नकोसे असू शकतं. पण हे निदान आणि गर्भपात    सारे  वीस आठवड्याच्या आतच व्हायला हवे अशी अनाठायी, जाचक,  कायदेशीर मर्यादा होती. नवे तंत्रज्ञान निर्माण झाले पण कायदा मात्र जुनाच राहिला. याचाच हा परिणाम. वीसाची मर्यादा पाळणं दरच वेळी ही शक्य होत नाही. बाळाच्या हृदयातील कित्येक आजार इतक्या लवकर ओळखताच येत नाहीत. आधीच ते उडतं पाखरू त्यात छातीच्या पिंजऱ्यात बंद. विसाच्या आत ते नीट दिसतही नाही.  कित्येक जनुकीय आजार, आतडयाचे दोष, उशीराच लक्षात येऊ शकतात. कित्येक तपासण्यांचा रिपोर्ट यायला खूप वेळ लागतो. ह्या असल्या बायकांनी मग करायचं काय? अशा साऱ्या आपदग्रस्तांना आता दिलासा मिळाला आहे. 

इतके दिवस अशा काही आजारांचे निदान त्या होऊ घातलेल्या आईबापाला सांगायचे म्हणजे अंगावर काटा यायचा. गर्भपात एवढाच उपाय आहे पण गर्भपात करता येणार नाही सबब क्षमस्व; हे  कोणत्या तोंडाने सांगणार?

अनाथ, अपंग, मतिमंद, बलात्कारीत महिलांमध्येही मोठी आफत उभी रहात असे. अशा स्त्रियांना मुळात वैद्यकीय सेवेपर्यंत  पोहोचयलाच कित्येकदा  उशीर झालेला असतो. मूल होणे, ते बाळगणे, त्याची जबाबदारी घेणे सगळेच यांना  अशक्य असते. अशा स्त्रियांची फरफट कायद्यातील नव्या बदलामुळे थांबेल.  

बाळाला गंभीर आजार आहे, कसले जीवघेणे व्यंग आहे पण ही लक्षात आलंय उशिरा म्हणजे कायद्याच्या दृष्टिनी उशिरा, वीस आठवडयानंतर. मग पेशंट तावातावानी  भांडायला उठायचे. आधी कळलं नाही का? हा पहिलं प्रश्न.  ते समजावून सांगितल्यावर, हा  असला कसला कायदा?  हा दुसरा प्रश्न. असे किती पेशंट भांडून गेले असतील.

मग अश्या पेशंटना  अनधिकृत, असुरक्षित ठिकाणी गर्भपात करणे भाग पडे. अशा परिस्थितीत असा मामला चोरीचा बने आणि हळूहळू बोंबलत उरकावा लागे. सगळ्याच बेकायदा सेवांप्रमाणे मग याचेही दर चढे रहात. पिळवणूक, शोषण आणि असुरक्षित गर्भपात वाढत जात. यातच काही बायका मरत. आपल्याकडील सुमारे 13% मातामृत्यू असुरक्षित गर्भपातामुळे होतात!!

हे लक्षात घेऊन डॉ. निखिल दातार यांनी या संदर्भात पहिली केस गुदरली. पण कोर्टाने कायद्यावर बोट ठेवत, जा कायदे मंडळाकडे असे सांगितले. पुढे एक बलात्कारितेला चक्क डोकेच नसलेला गर्भ असल्याचे निदान सातव्यात  झाले आणि कोर्टाला अपवाद करावाच लागला. मग अशा अनेक केसेस ठिकठिकाणी दाखल झाल्या आणि सरकारला प्रश्न सोडवावाच लागला. मानवी हक्क संघटनांच्या वकिलांनी ह्या केसेस निःशुल्क चालवल्या.

कायद्यातील हा बदल फार पूर्वीच व्हायला हवा होता. झालाही असता.  पण आपल्या समाजानी  गर्भपाताच्या कायद्याचा स्त्रीभ्रूणहत्येसाठी दुरुपयोग केला. चोवीस आठवड्यापर्यंतची मोकळीक दिली तर  स्त्रीभ्रूणहत्या वाढतील अशी सार्थ भीती सरकारला वाटू लागली. सरकारपक्षाने  तसं न्यायालयात सांगितलंसुद्धा.

अर्थात दुरुपयोगच करायचा  तर  तो वीस आठवड्यापर्यन्तही केला जाऊ शकतोच. आपल्या समाजाने करूनही दाखवला की. त्यामुळे गैरवापराविरुद्धची यंत्रणा सक्षम, सशक्त आणि सतर्क हवीच. तशी यंत्रणा सरकार जवळ आहेच. तीचाच प्रभावी करणे हा खरा उपाय. कायदाच अर्धवट ठेवणे हा नाही.

सरकारने सकारात्मक, अभिनंदनीय निर्णय घेतला आहे.  आता ह्या कायद्याचा सदुपयोग करून भारतीय समाजानेही आपली प्रगल्भता दाखवून द्यावी एवढीच अपेक्षा.  

 

 

Saturday, 6 March 2021

उंदरी, सशी, बेडकी आणि सुंदरी!

 

उंदरी, सशी, बेडकी आणि सुंदरी!

डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.

 

“ही कसली टेस्ट सांगितली आहे तुम्ही डॉक्टर?”

आपल्या शाळकरी पोरीला पोटात दुखतंय म्हणून  घेऊन आलेली ती प्रौढा सात्विक संतापाने विचारत होती. 

“प्रेग्नसी टेस्ट.”  मी शांतपणे उत्तर दिलं.

तिचा वाला गेला आणि तो बराच वेळ मिटेचना. शेवटी तिची पडजीभ मला वाकुल्या दाखवू लागली.  अखेर एकदाचा तो आ मिटला आणि तिच्या तोंडून शब्द फुटले,

“अहो माझ्झी मुलगी आहे तीsss, अनम्यारीड आहे, ठाऊक आहे ना तुम्हाला, पण तरीदेखील प्रेग्नेंसी टेस्ट का करायला लावल तुम्ही?  भलतच!!”

हे मला सवयीचं   आहे.  वर्षा-दोनवर्षांतून कोणीतरी अशा पद्धतीने माझ्याकडे येतंच. तरी बरं ही प्रेग्नन्सी टेस्ट नावाची तपासणी आम्ही गुपचुप उरकत असतो.  म्हणजे ‘युरीन टेस्ट करा’ एवढेच पेशंटला सांगितले जाते.  प्रेग्नेंसी टेस्ट आहे हे स्पष्टपणे सांगितले जात नाही. प्रेग्नेंसी टेस्ट करा म्हटलं तर अशी सात्विक संताप येणारी मंडळी अजिबातच तयार होणार नाहीत.  कागदावरती यूपीटी (म्हणजे  युरीन प्रेग्नेंसी टेस्ट) एवढंच लिहीलेलं असतं. या बाईंनी त्याचा अर्थ बिनचूक ओळखला होता आणि त्या संतापल्या होत्या. त्यांचा सात्विक संताप त्यांच्यापुरता  बरोबर असला, तरी एक डॉक्टर म्हणून नंतर ताप ठरू शकतो. त्यामुळे गुपचूप तपासणी उरकण्याकडे सगळ्यांचा कल असतो.  या टेस्टसाठी प्रत्येक दवाखान्याचा काही ना काही ठरलेला कोडवर्ड असतो.  माझा एक मित्र डी.ए.बी.  असं लिहितो. याचा अर्थ दिवस आहेत का बघा!

“काय गरज आहे का त्या टेस्टची?” बाई.

“दिवस राहू शकतील अशा कुठल्याही बाईला, काहीही  झालं, तरी आधी दिवस आहेत का हे तपासून बघा, असं आमच्या सरांनी आम्हाला शिकवले आहे.  आमच्या पुस्तकातही छापले आहे.  त्यामुळे मी हा नियम पाळतो.  लग्न झाले आहे/नाही, नवरा जवळ आहे/नाही,  मूल बंद व्हायचं ऑपरेशन झालंय/नाही, परित्यक्ता, घटस्फोटिता, कॉपर टी बसवलेल्या, नवऱ्याची नसबंदी झालेल्या, अशा सगळ्यांना हा नियम लागू आहे.  हा नियम पाळल्यामुळे, अनेक  अपघात आणि घातपात आम्हाला वेळोवेळी सापडतात आणि त्यानुसार उपचार करता येतात.”

आता त्या बाई जरा शांत झाल्या. टेस्ट करून घ्यायला राजी झाल्या. झटपट निदान ही किमया आहे युरीन प्रेग्नंसी टेस्टची.

पाळी चुकली की तात्काळ प्रेग्नंसी टेस्ट करुन, ती पट्टी नाचवत नाचवतच येतात पेशंट आता. पण ही आजची गोष्ट. कालपरवापर्यंत असं नव्हतं.  गरोदरपणाचं निदान वाटतं तेवढं सोपं नव्हतं. पहिल्या एखाद-दोन महिन्यांत तर नव्हतंच नव्हतं. बॉलीवूडमधील काही धन्य धन्वंतरी वगळले तर निव्वळ नाडीपरीक्षेवरून, ‘अब ये मॅा   बननेवाली है’, वगैरे निदान सांगणे अन्य कोणाला बापजन्मात जमलेले नाही. 

गरोदरपणाचं नेमकं आणि निश्चित निदान व्हायला दोन ते पाच  महीने वाट पहावी लागायची. मग डॉक्टरकडे जावं लागायचं. डॉक्टर ‘आतून’ तपासायचे. ते  त्रासदायक आणि संकोचवाणं  असायचं. डॉक्टरना तरी कुठे चटकन काही कळायचं? डॉक्टरी पुस्तकांत ‘पोट आल्याची’ कारणे दिली होती; स्थैाल्य (चरबी), वायू,  जल, मल आणि मूल (Fat, Flatus, Fluid, Faeces, Foetus)! पण भरपूर पोट  आल्याशिवाय निदान करण्यात फसगत फार.

पाळी चुकली आहे, उलट्या मळमळ होते आहे, स्तनाग्रातून दुधासारखा स्त्राव येतो आहे,  पिशवीचे तोंड गुलाबी-निळसर आहे, आकार किंचित वाढला आहे, हाताला एरवीपेक्षा जरा मऊसर लागते आहे; असल्या निरीक्षणावरून डॉक्टर अंदाज बांधायचे. ही सारी संभाव्यता सूचक लक्षणे. निश्चित निदान करणारी लक्षणे म्हणजे बाळाच्या हालचाली जाणवणे (पाचवा महिना), हृदयाचे ठोके ऐकू येणे (पाचवा महिना) आणि हो प्रत्यक्ष जन्म!!

हे सगळं वाचायला आज गंमतीशीर वाटत असेल पण पिढ्यानपिढ्या स्त्रिया आणि डॉक्टर यातून चरकातून गेलेले आहेत.

ऐंशी-नव्वदच्या दशकात भारतात घरगुती प्रेग्नंसी टेस्ट उपलब्ध झाली आणि एक मूक क्रांतीच झाली. आता अशी प्रेग्नंसी टेस्ट कोपऱ्यावरच्या मेडिकलमध्येही मिळते. खेडोपाडी ‘आशा’ आणि अंगणवाडी सेविकाही, ही सेवा पुरवत असतात. स्वमूत्राचे  चार थेंब पट्टीवर शिंपडले की मिनिटभरात तिथे एक किंवा दोन रेषा उमटतात. निव्वळ एकच  रेषा  म्हणजे प्रेग्नंसी नाहीये, दोन रेषा म्हणजे आहे आणि काहीही उमटलं  नाही म्हणजे टेस्ट नीट पार पडलेली नाही. पुन्हा करायला हवी.

गरोदरपणाचे लवकर निदान होणे हा तर सनातन प्रश्न आहे. कल्पना करा, महाकाव्यातल्या काही  नायिकांना अशी टेस्ट उपलब्ध असती तर भारताचा सांस्कृतिक इतिहास काही वेगळाच असता!   प्राचीन इजिप्शियन बायका गहू आणि बार्लीच्या बीयांवर शू करायच्या. गहू उगवले तर मुलगी, बार्ली उगवली  तर मुलगा आणि काहीच नाही उगवलं तर दिवस नाहीत, अशी समजूत होती. अशा विविध  समजुती जगभर होत्या. आता त्या ‘ऐकावे ते नवलच’ छापाच्या कथांत शोभून आहेत.

टेस्टच्या पट्टीवर रेषा उमटते  ती ‘एचसीजी’ ह्या द्रव्यामुळे.  गरोदर स्त्रीच्या लघवीत एचसीजी हे संप्रेरक भरपूर प्रमाणात आढळतं. हे जे एचसीजी आहे ना ते खरं तर बाळाचं अपत्य!! भावी वारेत (Chorion) तयार होतं ते. अगदी भरपूर. ‘आता जरा आमच्याकडे लक्ष द्या’,  असा बाळाने आईला  धाडलेला हा रासायनिक निरोप. हा कार्यभाग उरकला की एचसीजी आईच्या लघवीतून बाहेर सोडलं जातं. तेच ह्या टेस्टमध्ये तपासलं जातं. पूर्वी ह्याची उपस्थिती ओळखण्याच्या पद्धती खूप किचकट वेळखाऊ  आणि गुंतागुंतीच्या होत्या. अगदी काही दशकांपूर्वी असं करायला चक्क पशूबळी द्यावा लागायचा!!  

म्हणजे गरोदर महिलांची लघवी उंदरीणींना टोचायची आणि काही दिवसांनी त्यांच्यात  बीजनिर्मिती झाली आहे का हे उंदरीण मारून  बघायचं.  (सेलमार आस्छऐम आणि बर्नहार्ड झोनडेक, १९२७) हाच प्रयोग पुढे ‘सशीं’वरही (फ्रीडमन) यशस्वी झाला. (पाहिलंत ना ते सशाचं स्त्रीलिंगी रूप मराठीला अजूनही सापडलेलं नाही!) म्हणजे दिवस आहेत की नाहीत असा प्रश्न असेल आणि त्याचं उत्तर मिळणं जर अत्यंत आवश्यक असेल आणि ते दोन आठवडयानंतर मिळालेलं चालणार असेल; तर डॉक्टर मंडळी अशी टेस्ट करायला सांगत. यात मुख्य अडचण अशी होती की त्या त्या प्राण्यांची गच्छन्ति झाल्याशिवाय निर्णय अशक्य होता.  अर्थात प्राण्यांचे अधिकार वगैरे प्रकार तेंव्हा फारसे कुणाच्या गावीही नव्हते. ह्या उंदरी-संहाराला, ह्या   सशी–सत्राला  कित्येक वर्ष पर्याय नव्हता. पुढे बेडकीचाही वापर सुरू झाला (हॉगबेन). पण मंडूक-मेधाची गरज नव्हती.  बेडकी अंडी घालत  असल्याने, तीला जीवे मारण्याची गरज नव्हती. बेडकीचा पुनर्वापर शक्य होता. त्यामुळे  टेस्ट स्वस्त झाली.    हा मोठाच फायदा होता. अर्थातच या सर्व प्रकाराला पैसा, तंत्रज्ञ, तंत्रज्ञान, प्रयोगशाळा, मूषक/शशक/मंडूक पालनगृह  वगैरे बराच फाफट पसारा  लागायचा. भारतात अशा टेस्ट फारशा रुजल्याच नाहीत. इथला पैशाचा आणि संसाधनांचा दुष्काळ पहाता हे  सहाजिकच म्हणायचं. एका  ज्येष्ठ डॉक्टरांनी क्वचित कधीतरी मुंबईत हाफकिन इंस्टिट्यूटमध्ये अशी टेस्ट केल्याचं अंधुक स्मरतंय एवढंच  सांगितलं.

आपण डॉक्टरी तपासणीवरुन थेट युरीन तपासणीवरच उडी मारली. यातही सुरवातीला या टेस्ट फक्त दवाखान्यातच शक्य होत्या. पण लवकरच घरच्या घरी कुणालाही करता येईल असं टेस्ट-तंत्र विकसित झालं. याही  टेस्ट सुरवातीला जरा परीक्षा पहाणाऱ्याच होत्या. दहा पायऱ्या होत्या त्यात.   

दिवस आहेत ही गोष्ट लपवता तर येत नाही. आज ना उद्या ही बातमी सगळ्यांना ‘दिसतेच’. या टेस्टमुळे लवकर निदान शक्य झालं. डॉक्टरी लुडबुडीविना शक्य झालं.  गुपचुप निदान शक्य झालं. अगदी बाथरूमच्या एकांतात सारं शक्य झालं. आता ही बातमी कुणाला सांगायची, कुणाला नाही याचा निर्णयही शक्य झाला.  पुढे काय करायचं, याचं प्लॅनिंगही शक्य झालं. कारण प्रेगन्सी टेस्ट पॉसिटीव्ह येणे ही म्हटलं तर गुड न्यूज आहे आणि म्हटलं तर बॅड न्यूज. सगळं  सापेक्ष आहे. कुणाला दिवस आहेत की काय, ही उत्सुकता असते तर कुणाला भीती.  

हे लक्षात घेऊन दिवस आहेत हे वर्तमान, त्या पट्टीवर, नेमक्या कोणत्या चिन्हांनी सूचित व्हावं यावरही बराच खल झाला. सपुच्छ पुंबीज, पोटुशी बाई, हसरे बाळ, असे अनेक चित्र संकेत विचारात घेतले गेले. पण बाळाचं स्मितहास्य  कुणाला विकटहास्यही वाटू शकेल!! तेंव्हा एक किंवा दोन रेषा असा अगदी साधासा पर्याय  निवडला गेला. आपापल्या परिस्थितीनुसार प्रत्येकीनी  त्या रेषांना अर्थ द्यायचा होता. इतकंच कशाला, बायकांसाठीची टेस्ट म्हटल्यावर त्या किटवर फुलं, चकमक, गोंडे वगैरे लावण्याचाही विचार झाला पण यामुळे टेस्ट पुरेशी ‘शास्त्रीय’, ‘विश्वासार्ह’ वाटत नाही म्हणून नापास केला गेला.  

याची जाहिरात करणंही किती कौशल्याचं आहे पहा. ‘दोन थेंब पोलिओचे’ सारखं ‘दोन थेंब लघवीचे, निदान करा जीवनाचे’ वगैरे मूत्र-सूत्र किती किळसवाणं वाटेल.  त्यामुळे टेस्टच्या इतर गुणांची उजळणी जाहिरातीत केली जाते. खाजगी, खात्रीचे, गुपचुप, झटपट निदान!! पण झटपट निदानाचे फायदे अनेक. नको असेल तर गर्भपात करता येतो. हवे असेल तर  लगेच औषधे सुरू करता  येतात, काही औषधे टाळता येतात. डॉक्टरांना  काही  कॉमप्लीकेशनस् बद्दल सावध रहाता येतं.

आता ह्या बाईंच्याच लेकीचं बघा ना.

टेस्ट केली. ती पॉसिटीव्ह आली. बाईंनी आ वासला.  

मग सोनोग्राफी केली त्यात गर्भपिशवीबाहेर, नलिकेत गर्भ असल्याचं दिसलं. बाईंनी पुन्हा आ वासला.   

गर्भ नलिका फुटली  होती.  आतल्याआतच प्रचंड ब्लीडिंग होत होतं.  तातडीने ऑपरेशन करणं गरजेचं होतं.  बाईंनी आणखी आ वासला.  

गडबडीने ते ऑपरेशन पार पडलं. पाच बाटल्या रक्त द्यावं लागलं. मुलगी वाचली.  

प्रेग्नंसी टेस्ट उपलब्ध नसती तर ती मुलगी बहुदा मेलीच असती!!  

 

प्रथम प्रसिद्धी

महाराष्ट्र टाइम्स

७/३/२०२१