Thursday, 25 April 2019

गरोदर बाईतला कम्युनिस्ट रशिया


गरोदर बाईतला कम्युनिस्ट रशिया
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई
रशियात कट्टर कम्युनिस्ट राजवट होती. पोलादी पडदा होता. त्यामुळे काहीही कळणे मुश्कील. अशा रशियाचे  वर्णन चर्चिल सायबाने आपल्या तिरकस ब्रिटीश शैलीत करून ठेवले आहे. रशिया म्हणजे एका रहस्याच्या पोटात दडलेले, गूढात लपेटलेले, एक कोडे आहे! (It is a riddle, wrapped in a mystery, inside an enigma.) थोडक्यात रशियाबद्दल आम्हाला काहीही माहित नाही आणि काही माहित होण्याची शक्यताही नाही.
गरोदरपणी होणारा असाच एक आजार आहे. ज्याबद्दल आम्हाला काहीही माहित नाही आणि काही माहित होण्याची शक्यताही सध्या धूसर आहे. हा आजार म्हणजे रहस्याच्या पोटात दडलेले, गूढात लपेटलेले, एक कोडे आहे!  एरवी माझ्यासकट तमाम डॉक्टर, ही नाहीतर ती, अशी काहीतरी माहिती सांगायला, हिरीरीने  लिहित असतात. पण आज मी काहीही माहित नाही हे सांगायला लिहितो आहे. उद्या जर, ‘कोणता शोध लागला तर हमखास नोबेल मिळेल?’ असे विचारले,  तर ह्या रोगाच्या कारणांचा शोध लावेल त्याला/तिला तो नक्की मिळेल यावर साऱ्या डॉक्टरांचे एक मत होईल. हा आजार दहातल्या एका तरी गरोदर स्त्रीला होतो. 
याला म्हणतात पीआयएच (Pregnancy Induced Hypertension). इतरही नावे आहेत. पण आपल्या पुरते हे एकच पुरे. जगातल्या एकूण बाळंतपणांपैकी बरीच बाळंतपण भारतात होतात. पण तरीही एकाही भारतीय भाषेत अथवा पारंपारिक शास्त्रात, आयुर्वेदात, याला विशिष्ठ नावच नाही! म्हणजे आजार म्हणून याची ओळख करून घेण्यात आपण कमी पडलो. म्हणजे कसला कसलेला बहुरूपी आहे हा आजार, ते बघा. त्यामुळे माझ्यापुरता मी या आजाराला ‘बाळंतवात’ असा शब्द शोधला आहे आणि आता इथून पुढे योजला आहे.
यात पाचव्याच्या पुढे ब्लडप्रेशर वाढते आणि लघवीतून प्रथिने वाहू लागतात. (पाचव्याच्या आतच हे सगळे घडले तर त्याची कारणे भिन्न असू शकतात.) ब्लडप्रेशरला किती महत्व द्यायचे आणि प्रथिनपाताला किती, हे निकष जरा जरा बदलत असतात. बहुतेकदा हातापायावर सूजही येते. सुजेला पूर्वी महत्व होतं. आता ते तेवढं राहिले नाही. याच्याच टोकाच्या अवस्थेत त्या बाईला झटके येतात. याला म्हणतात ईक्लाम्पशिया. शब्दशः अर्थ वीज पडणे. तडीताघातासारखेच केंव्हाही,  अचानक झटके येऊ लागतात, तेंव्हा ‘बाळंतवात’ हे नाव सार्थच म्हणायचे.
बऱ्याच पेशंटला विशेष काही होत नाही. ब्लडप्रेशर वाढते, सूज येते, प्रथिनपात होत रहातो; पण हे सारं सौम्य प्रमाणात होत रहाते. पुढे डिलिव्हरी होते आणि सारे  बिघाड आपोआप विरून जातात. झाले तर पुन्हा पुढच्या बाळंतपणात होतात.
काही वेळा मात्र बराच बिघाड घडतो पण बराच बिघाड घडूनही पेशंटला काही होत नाही आणि हेच फार त्रासाचे ठरते. काहीही होत नसलेल्या पेशंटला जेंव्हा, ‘तुमचे ब्लडप्रेशर फार जास्त आहे, तुम्ही गंभीररित्या आजारी आहात, ताबडतोब अॅडमिट व्हा’, असे कोणी डॉक्टर सांगतो तेंव्हा अर्थातच पेशंटचा त्यावर विश्वास बसत नाही. पेशंट म्हणतात, ‘असं कसं वाढलं? आम्ही तर तुमच्याकडे पहिल्यापासून तपासतोय!’ मग मी सांगतो, ‘मी तपासतोय आणि व्यवस्थित तपासतोय, म्हणूनच तर ही गोष्ट लक्षात आली. नीट तपासलंच नाही तर ही गोष्ट कळणारच नाही. प्रॉब्लेम वेळीच लक्षात आल्याबद्दल अभिनंदन; माझं!!’  प्रत्येकवेळी बारकाईने तपासत राहणे एवढेच डॉक्टर करू शकतात आणि करतात. आत्ता सगळे काही ठीक आहे, असे म्हणता म्हणता गंभीर दुष्परिणाम घडवणारा असा हा बिलंदर बाळंतवात आहे.
प्रत्यक्षात ज्यावेळी पेशंटला काही व्हायला लागते तेंव्हा गोष्टी फार पुढच्या थराला गेलेल्या असतात. पायावर, शरीरावर, प्रचंड सूज, असह्य डोकेदुखी, उलट्या, दृष्टी मंदावणे, नजरेसमोर लाईट दिसणे, पोटात दुखणे,  अंगावरून रक्तस्राव, झटके येणे... असे काही होणे म्हणजे परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याच्या खुणा. परिस्थिती बिकट होण्याआधी काही पूर्वसंकेत मिळेलच असे नाही.
मुळात बाळंतवाताची लक्षणे आणि दुष्परिणाम जरी पाचव्याच्या पुढे दिसत असले तरी त्याची सुरवात होते अगदी दुसऱ्या तिसऱ्या महिन्यात. बाळाकडे भरपूर रक्त जावे म्हणून वारेकडे जाणाऱ्या आईच्या रक्तवाहिन्यातील स्नायू गरोदरपणात लोप पावतात. मग ह्या रक्तवाहिन्या मुळी आकुंचनच पावत नाहीत. त्या  अगदी लेवाळ्या होतात. त्यांचा व्यास वाढतो. रक्तप्रवाह कित्येकपट वाढतो. (वाचकांतील इंजिनीअर लोकांना माहितच असेल की नलिकेतील प्रवाह हा थेट व्या  नुसार बदलतो. Flow is directly proportional to r4) आईच्या रक्तवाहिन्यातील स्नायुलोप ही बाळाच्या वारेची किमया. वारेच्या पेशी आईच्या रक्तवाहिन्यात घुसून त्यातील स्नायू नष्ट करतात. पण आपल्यात घुसून आईच्या रक्तवाहिन्यांनी स्नायू नष्ट करू दिले तर! म्हणजे इथे जरा समजुतीनी घ्यायचा प्रश्न येतो. अशी समज आपल्या प्रतिकारशक्तीमध्ये असते. केंव्हा प्रतिकार करायचा आणि केंव्हा भिडू आत सोडायचा याचे पक्के आराखडे, ठोकताळे असतात. बहुतेक आयांची प्रतिकारशक्ती,  बहुतेक वेळी हे बिनबोभाट होऊ देते. काही वेळा मात्र हे गणित चुकते. मग स्नायू लोप पावण्याची क्रिया होतच नाही.
यामुळे अनेक घोटाळे होतात. स्नायू लोप न झाल्यामुळे या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, मग बाळाला रक्त पुरं कसं पडणार? मग ते रोडावते. जसजसा बाळाचा रक्त पुरवठा कमीकमी होतो तसतसे आपोआपच बाळ मिळतंय ते रक्त, नीट जपून वापरायला लागते. मग आहे तो प्रवाह मेंदूकडे वळवला जातो. मग बाळाच्या किडनीकडे रक्त कमी जाते. मग बाळाला शू कमी होते. शू कमी झाल्यामुळे बाळाभोवतीचे पाणी आटते. येस!! बाळाभोवतीचे पाणी म्हणजे बव्हंशी बाळाची शू असते!! हे पाणी आटले की अनेक गोच्या होतात. हातापाय नीट न हलवता आल्यामुळे सांधे आखडतात. हेच पाणी श्वसनाच्या हालचाली बरोबर फुफ्फुसात आतबाहेर होत असते. यामुळे फुफ्फुसाची वाढ होत असते. पाणी कमी असेल तर फुफ्फुसाची वाढ नीट होत नाही. पूर्वी ह्या कशाचाही पत्ता लागायचा नाही. नुसते पोट तपासून काय कळणार? आता सोनोग्राफीच्या तंत्रांनी सगळच बदलले आहे. रक्तप्रवाहाची मोजमापे घेऊन खूप काही समजते. बाळाचे नेमके वय किती? ते सुपोषित आहे का कुपोषित? निव्वळ अन्नाला मोताद आहे, का आता ऑक्सिजन कमी पडल्याने गुदमरले आहे? कलर डॉपलरमध्ये हे सगळे कळते आणि त्यानुसार निर्णय घेता येतो.
आईचे ब्लडप्रेशर का वाढते हे नेमके माहित नाही. असं म्हणतात की बाळाकडून आईकडे काही द्रव्ये जातात आणि परिणामी आईला हा त्रास जडतो. ब्लडप्रेशर वाढल्याचा परिणाम आईच्या प्रत्येक अवयवावर होतो. किडनीवर परिणाम झाला की प्रथिनपात होऊ लागतो. याने आईला अशक्तपणा, सूज वगैर मालिका सुरु होते. कधी किडनी बंद पडते. मग डायलिसीसला पर्याय उरत नाही. मेंदूच्या रक्तपुरवठ्यात गोच्या होतात. परिणामी झटके येतात किंवा दृष्टी जाते किंवा दोन्ही होते. कधी लिव्हर नीट काम करत नाही. मग तिथली विषारी रसायने साठून रहातात. कावीळ होते. रक्त साकळणे हे लिव्हरवरही अवलंबून असते. मग ती क्रिया मंदावते. कल्पना करा, जर रक्तच साकळले नाही तर प्रसूतीनंतर किती रक्तस्राव होईल? जाईल न ती बाई! नव्हे आजार तीव्र असेल तर जातेच! उत्तम काळजी घेऊनही जाते!!
नेमका कोणाला, केंव्हा, कितव्या महिन्यात त्रास सुरु होईल, हे सांगता येत नाही. ब्लडप्रेशर कोणत्याही महिन्यात वाढू शकते. झटके कोणत्याही महिन्यात येऊ शकतात. अगदी प्रसूतीवेळी किंवा प्रसूतीनंतरसुद्धा, अचानक ब्लडप्रेशर वाढून झटक्यापर्यंत गोष्टी जाऊ शकतात. ब्लडप्रेशर कधी वाढेल हे सांगता येत नाही, कुणाचे वाढेल हे सांगता येत नाही, किती वाढेल हे सांगता येत नाही. सांगता फक्त एकच गोष्ट येते...जर ब्लडप्रेशर वाढलं तर प्रसूती हाच उपाय आहे. महिना कुठलाही असो, प्रसूती होताच ब्लडप्रेशर कंट्रोल होते. विश्रांती, अळणी अन्न, प्रथिनयुक्त आहार वगैरेंचा उपयोग एकच, आपण काहीतरी करतोय हे कृतक समाधान. प्रत्यक्षात परिणाम शून्य!  तेंव्हा ‘विश्रांती घ्या’, ह्या सल्याचे पालन तारतम्याने करावे. उगाच गोठ्यात म्हैस बांधल्यासारखे पेशंटला कॉटला बांधून ठेऊ नये!
गोळ्या-औषधांचासुद्धा फारसा उपयोग होत नाही. मग डॉक्टर एवढ्या भारंभार गोळ्या का देतात? डिलिव्हरी होईपर्यंत ब्लडप्रेशर तात्पुरते, पण तात्काळ कमी करण्यासाठी देतात. दिवस भरले नसतील तर प्रसूती थोडी पुढे ढकलता यावी म्हणून देतात. अशावेळी बाळाच्या फुफ्फुसांची वाढ लवकर व्हावी म्हणून काही इंजेक्शने दिली जातात, ह्यांचा परिणाम होईपर्यंत ब्लडप्रेशर ताळ्यावर रहावे म्हणून देतात.  गोळ्यांचा उपयोग मर्यादित आहे हे जाणूनच देतात. झटके येऊ नयेत म्हणूनही इंजेक्शने असतात. या दरम्यान डॉक्टर; पेशंट आणि बाळावर सक्त नजर ठेऊन असतात. प्रत्येक वेळी डॉक्टर स्वतःलाच दोन प्रश्न विचारतात. सध्या बाळ पोटात सुरक्षित आहे, का पेटीत? (पेटीत म्हणजे इन्क्युबेटरमध्ये) आणि बाळ पोटात बाळगणे आईसाठी सुरक्षित आहे का? ‘पोटात का पेटीत?’ या प्रश्नाचे उत्तर ‘पेटीत’ असं येईल त्यादिवशी सरळ प्रसूती करण्याच्या मागे लागतात. तो दिवस कधी उगवेल हे सांगता येत नाही. कधीकधी तर परिस्थिती इतकी अस्थिर असते की हा प्रश्न रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ विचारला जातो आणि त्यानुसार उपचार ठरवले जातात. एकदा प्रसूती करायची असे ठरले की कळांची औषधे देऊन प्रयत्न करायचा का थेट सीझर हे ही ठरवले जाते.
शिवाय पोटात का पेटीत ह्या प्रश्नाचे उत्तर निव्वळ वैद्यकीय नाहीये. दिवस कमी म्हणजे किती कमी? बाळ अशक्त म्हणजे किती अशक्त? गुदमरलेले म्हणजे किती? अपुऱ्या दिवसाच्या, अशक्त, गुदमरलेल्या बाळाची काळजी घेणारी खास एनआयसीयु जवळ आहेत का? असल्यास अशा ठिकाणी बाळाला ठेवायची तयारी आहे का? बाळ अगदीच लहान असेल तर त्याच्या पुढील वाढीबद्दलची अनिश्चितता कुटुंबियांना माहित आहे ना? आणि मान्य आहे ना? कुटुंबियांची हा सगळा खर्च करायची क्षमता आणि तयारी आहे का? थोडक्यात प्रश्न वित्तीय तर आहेच पण प्रश्न वृत्तीचाही आहे. ह्या दोन्ही गोष्टी कुटुंबांगणिक भिन्न असतात. ह्या सगळ्या उत्तरांची गोळाबेरीज करून हा निर्णय कुटुंबीयांनी घ्यायचा आहे. डॉक्टरांनी नाही!! 
आता रंगीत सोनोग्राफीच्या मदतीने बाळाकडे जाणारा रक्तप्रवाह मोजता येतो. पुढे तो कमी होणार आहे हे भाकीतही आता वर्तवता येते. शिवाय आईचे रक्त तपासून काही ठोकताळे बांधता येतात. परंतु मॉन्सूनच्या अंदाजाइतकाच हा ही अंदाज  बेभरवशाचा आहे. बाळंतवात उद्भवणे भगवान भरोसे असल्यामुळे, प्रतिबंधक उपायही फारसे नाहीत. पण तुका म्हणे त्यातल्या त्यात, ह्या उक्तीला जागून आम्ही डॉक्टर असे अंदाज बांधत असतो आणि प्रसंगोपात तोंडघशी पडत असतो. तोंडघशी पडत असतो असे म्हटले कारण अंदाज आणि तो चुकणे, ह्याला पेशंटच्या भाषेत थेट निष्काळजीपणा एवढाच शब्द आहे. पण पुढे बीपी वाढणार असा काही सुगावा लागला तर अॅस्पिरीनची अल्प मात्रेतली गोळी देतात. हिपॅरीनची इंजेक्शन देतात. आधीच्या खेपेला बीपी वाढलेल्या बाया, मुळातच आधी बीपी जास्त असणाऱ्या बाया, काही ऑटोइम्यून आजार असलेल्या बाया (SLE), वयस्कर, जाड्या, जुळी/तिळी वगैरे असणाऱ्या बाया, अशा सगळ्या अतिजोखीमवाल्या! ह्यांच्यात बाळंतवाताची बाधा अधिक. औषधांमुळे बीपी वाढणे पूर्णतः टळत नाही पण निदान त्याची तीव्रता कमी रहाते. वाढायचेच झाले तर थोडे उशिरा बीपी वाढते. दरम्यान बाळ आणखी थोडे मोठे झालेले असते.
प्रसुतीनंतर आधी सांगितल्याप्रमाणे ब्लडप्रेशर आटोक्यात येते. अर्थात ते आटोक्यात आहे ना हे तपासावे लागतेच. सहा आठवड्याच्या वर जर ते वाढलेलेच राहिले, तर पुढील तपासण्या कराव्या लागतात. तीव्र बाळंतवात झाला असेल तर सुमारे ४०% बायकांना पुढच्या खेपेला पुन्हा हा त्रास जडू शकतो.
तर असा हा बाळंतवात. सगळ्यानाच वात आणणारा आजार आहे. ज्या दिवशी हे रहस्याच्या पोटात दडलेले, गूढात लपेटलेले, कोडे उलगडेल तो दिवस आरोग्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल हे निश्चित.


Wednesday, 24 April 2019

आणि ग्रंथोपजीविये

आणि ग्रंथोपजीविये...
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

डॉक्टरकी शिकायची म्हणजे भल्या थोरल्या ग्रंथांशी सामना करावा लागतो. एखाद्या किरकोळ फर्स्ट इयरच्या मुलीची अक्षरशः एकाच ग्रंथात ग्रंथतुला होईल इतके जाडजूड आणि वजनदार ग्रंथ. भारीच असतात ही पुस्तके. दोन्ही अर्थी. वजनानेही भारी आणि अभ्यासालाही भारी. शिवाय लेखकु अगदी पोहोलेले  असतात. त्यांच्या त्यांच्या विषयातले महर्षीच ते. काहींचे तर भाषेवर प्रभुत्व इतकं की भाषेचे मार्दव अनुभवण्यासाठी वाचावे ते पुस्तक. त्यातला आशय तर जबरदस्त असतोच पण अभिव्यक्तीही तितकीच सशक्त आणि खुमासदार.

आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्ट विजये, होआवे तु;
असे ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटले आहे. ग्रंथ, म्हणजे त्यांचे वाचन आणि परिशीलन, ह्यामुळेच ज्यांची उपजीविका चालते, अशा विशेष लोकांना, या लोकीच्या दृश्य अदृश्य असत् शक्तींवर विजय प्राप्त होवो, अशी प्रार्थना माऊलींनी केली आहे. मेडिकलची पुस्तके म्हणजे तर अशा असत् शक्तींवर मात करणाऱ्या ऋचाच. अशा काही ग्रंथुल्यांचे, ग्रंथांचे आणि ग्रंथोबांचे हे स्मरण.
सलामीलाच गाठ पडते ती ग्रेज अॅनॅटॉमी या बृहदग्रंथाशी. याचा मुख्य फायदा असा की हे पुस्तक घेताच, आईबापांना पोरगं अचानक लईच हुशार वाटायला लागतं. त्याच्या हातातला तो जाडजूड ग्रंथराज पहाताच त्यांचा उर भरून येतो. शिवाय हे तर फक्त एका विषयाचे पुस्तक, अशी आणखी बरीच आहेत ही भावना तर त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे करते. पण लवकरच पोराच्या असं लक्षात येतं की इतकं काही वाचायची गरज नाही. यात इतकी माहिती आहे की ती सगळीच्या सगळी ग्रहण करणे आणि लक्षात ठेवणे अशक्य आहे आणि अनावश्यकही. पुढे काही मंडळी हे पुस्तक विकून एखाद्या रविवारचा  आपला उदरनिर्वाह भागवतात. रिचर्ड गॉर्डननी आपल्या डॉक्टर अॅट लार्ज ह्या मजेशीर पुस्तकात ह्या आणि अशा ग्रंथांची किमत इतके सँडवीच आणि इतक्या बीअरच्या बाटल्या अशा भाषेत दिली आहे! पहिल्याच परीक्षेत आपटी खाल्ली की ग्रेजची नशा खाडकन उतरते. मग मदतीला धावून येते ‘चौरासिया’. हा अॅनॅटॉमीचा विद्यार्थीस्नेही ग्रंथ. सगळं काही सुलभ. नीटस चित्रे. सरळ सोपी भाषा. चौरासीयाचे आम्हावर जन्मोजन्मीचे उपकार आहेत. ग्रेज म्हणजे ब्रम्हर्षीपदाला पोहोचलेला कोपिष्ट ऋषी, तर चौरासिया म्हणजे वय चवदाशी, चतुर आणि चतुरस्त्र आश्रमकन्या. आपल्या मनात काय आहे हे जाणून आधीच त्याची उत्तरे देणारी. आपण आता एकदम भारी आहोत आपल्याला आता सगळं येतय असा विश्वास निर्माण करणारी!
एकूणच चौरासिया, दत्ता, चटर्जी, बॅनर्जी, मुखर्जी, अमुकसिंग किंवा तमुककुमार अशा उत्तर भारतीयांचे आम्हा वैद्यकविद्यार्थ्यांवर अनंत उपकार आहेत. मुळात जुलमी इंग्रजांच्या, जुलमी इंग्लिशशी ज्यांचे वाकडे आहे अशांनी तर ह्यांच्या पायाच्या अंगठ्याचे तीर्थ घ्यावे. कारण इंग्रज-अमेरिकनांच्या अगम्य इंग्लिशमधील तमाम पुस्तके यांनी आईच्या गम्य इंग्लिशमध्ये भाषांतरीत केली आहेत. हे भाषांतर इतके बेमालूम जमले आहे की आता ही पुस्तके त्याच्या मूळ कर्त्यांनी जरी वाचली तरी त्यांना ह्यातले इंग्लिश समजणार नाही!
पुस्तकांइतकेच शिक्षकही संस्मरणीय होते. एक बाई तर विशेष लक्षात राहिल्या. कोणताही टॉपिक हमखास निरस करून शिकवण्यात त्यांचा हातखंडा होता.  त्या एम्ब्रियोलॉजीसारखा, मानवी जीवाची जडणघडण शिकवणारा, विषय शिकवायच्या, पण तद्दन बोअर पद्धतीनी. मानवी रचना घडते कशी हे समजणे विशेष महत्वाचे. त्याशिवाय ती बिघडते कशी हे कसे समजणार? आधी फक्त एक पेशी, मग एकाच्या दोन, दोनाच्या चार, आठ, सोळा... ब्लास्टूला... त्या सर्वसक्षम (Totipotent) पेशी... मग ते तीन मूळ थर, एक्टोडर्म, मेसोडर्म, एंडोडर्म... त्यातून तयार होणारे सगळे अवयव... असा सगळा थरारक मामला होता. घडण्याच्या प्रवासात अवयवांचे अघटित वाटावेत असे प्रवास घडतात. उदा: किडनी तयार होणार ओटी पोटात आणि सरकणार पाठीशी, तर बीजकोश ह्याच्या उलट. वाटाण्याएवढी पिटुकली पिट्युटरी पण निम्मी मेंदूतून आणि शिम्मी टाळूतून (तोंडातला वरचा भाग) उद्भवणार.  काळीज म्हणजे एक ट्यूब असणार नुसती. मग त्याला पीळ पडणार, आवश्यक तिथे घरे पडणार, उघडझाप करणाऱ्या झडपा तयार होणार... अशा सगळ्या दिलखेचक अदा.  पण ह्या बाईंना ह्यातल्या कश्शाशी काही देणंघेणं नव्हतं. शिकवणे तर सोडाच पण विनोदसुद्धा अशा पद्धतीनी सांगणार की हसावं का रडावं हा प्रश्नही पडू नये, डायरेक्ट रडूच यावं! मग एकेदिवशी इंदरबीरसिंगकृत ‘टेक्स्ट बुक ऑफ एम्ब्रियोलॉजी’ या ग्रंथुल्याची  गाठ पडली. बस्स माणसाला आयुष्यात आणखी काय पाहिजे असं वाटलं मला. ह्या देहाची अत्यंत गुंतागुंतीची रचना हा इंदरबीर, क्रिकेटच्या कॉमेंट्रीपेक्षाही रंजक करून सांगतो. एखादी कळी उमलावी अशा अलवारपणे, ह्यात माणूस घडत आणि उलगडत जातो. खूप थकल्यावर, खूप अभ्यास करून करून वैताग आल्यावर, रात्री उशिरा हे पुस्तक घ्यावं; पुन्हा ताजेतवाने वाटायला लागेल. आजही कधीतरी हे पुस्तक हातात येतं आणि शाळेतलं बालभारती हाताशी यावं तसं मी ते सहज वाचून टाकतो. तितकीच मजा येते.
पहिल्या वाक्याला टाळ्या घेणारे आणि पुढे अजिबात न घेणारे, असे एक पुस्तक होते. फार्माकोलॉजीचे सातोस्कर-भांडारकर. लेखकांची नावे आणि विषय दोन्ही भारदस्त. विषयही अत्यंत किचकट, समजायला अवघड, पाठांतराला वावच वाव. नव्हे फक्त पाठांतरालाच वाव! पण पाहीलंच वाक्य, ‘औषधांमुळे पेशंट बरे होतात आणि कधी कधी औषधे देवूनही ते बरे होतात!!’ (Patients often get better with drugs and sometimes in spite of them.) ह्यात आणखी एक इंट्रेस्टींग धडा होता बर का. अल्कोहोलवरचा. इथे अल्कोहोल आणि सेक्स यावर टिप्पणी होती, ‘इट प्रोव्होकेथ द डिझायर बट टेकेथ अवे द परफॉरमन्स’. शेक्सपिअरच्या मॅकबेथ (अंक २, प्रवेश ३) मधला दारवान हे वाक्य उच्चारतो. मग काय, आमच्यासारख्या जिज्ञासू शिरोमणींना कोण उत्सुकता. मॅकबेथ मिळवून आम्ही रेफेरंन्स काढलाच. शिवराळ इंग्लिशमध्ये तो सांगतो, ‘वारुणी! हीने कामेच्छा वाढते पण ‘काम’गिरी ढेपाळते! हिने तीन गोष्टी होतात...नाक होते लालेलाल, झोप येते खुशाल आणि मुतायला होते वारंवार! हवस वाढते हिने पण गोची होते साली. तेंव्हा संभोगाबाबत, अति दारू म्हणजे चलाख जादुगार जणू... तुम्हाला चढवणार ते पाडण्यासाठीच. तुम्ही रसरसणार, पण रसभंग होणार सगळा. तुमचा उठणार पण टिकणार नाही... स्वप्न पहाणार तुम्ही उत्तान उपभोगाचे पण लागणार झोप आणि जाग येणार ती, मुतायला!!!’
सातोस्कर-भांडारकरचा एवढा फायदा मात्र झाला, त्यानिमित्ते मॅकबेथ पूर्ण वाचून संपलं.
आणखी एक विषय होता, पॅथॉलॉजी. ह्याची एकाच लेखकाची दोन पुस्तके होती. एकाला म्हणायचे डॅडी रॉबिन्स आणि त्याचे संक्षिप्त रूप, बेबी रॉबिन्स. पहिलं, पहिला नंबरोत्सुक अभिजनांसाठी आणि दुसरं, पासोत्सुक इतरेजनांसाठी. डॅडी रॉबिन्स बापच होतं, पण ‘अरे बापरे!’ही होतं. इतरेजन त्यापासून चार हात  लांबच रहात. हे वाचाल तर परीक्षेत न वाचाल, अशी त्याची ख्याती. अशी कुप्रसिद्धी असलेले इतरही काही अक्राळविक्राळ ग्रंथोबा होते. प्राईस म्हणून एक मेडिसिनचा ग्रंथोबा होता. रीड प्राईस  अँड फेल थ्राईस (Read Price and fail thrice) अशी म्हणच होती. ते जाऊ दे, मी काय सांगत होतो... आणखी एक विषय होता, पॅथॉलॉजी!
पॅथॉलॉजी म्हणजे बिघडलेल्या अवयवांची रडकथा. पण सगळ्या पदार्थांची चव घालवण्याचे सामर्थ्य यातल्या वर्णनात होते. एकेक आजार वर्णायला चक्क खाद्य पदार्थ वेठीस धरलेले.  सिर्होसीसमध्ये लिव्हर दिसते जायफळासारखे! आता श्रीखंडाला किंवा कॉफीला  जायफळाचा दरवळ आला की काय आठवणार तुम्हाला? एण्डोमेट्रीऑसीस मध्ये गाठी होतात आणि त्यात असतो चॉकलेटसारखा द्राव. ह्याचे नाव चॉकॉलेट सिस्ट. आता सिझलिंग ब्राउनी मिटक्या मारत खाउन दाखवा बरं!!  टीबीने  सुजलेले हृदयावरण दिसते, ब्रेडला बटर लावल्यासारखे; म्हणजे पुन्हा इराण्याकडे  ब्रेड बटर मागाल का तुम्ही? ह्या असल्या यांच्या उपमा! (बापरे, इथेही खाद्यपदार्थ आला की!) शिवाय ब्लूबेरी मफीन सारखे पुरळ, पोर्टवाईनच्या रंगाची जन्मखूण, मॅपल सिरप युरीन! पण हे अगदी काही जिभेची चव घालवून गेले नाहीत. कारण ब्लूबेरी मफीन, पोर्ट वाईन, मॅपल सिरप वगैरे आमच्या समोर कधी आलेच नव्हते. उलट पहिल्यांदा ब्लूबेरी मफीन पहिला आणि मनात आले, ‘अर्रे! हे तर डिक्टो रुबेलाचं पुरळ!!’ कॉफीत दुध जणू, असे त्वचेवरचे डाग; ह्यांना म्हणायचं कॅफे ओ ले स्पॉट्. उच्चभ्रू कॉफीशॉपमधे  दिसणारा हा रंगमेळ पहिला आणि मला मॅक्यून अल्ब्राईट आजार आठवला! अॅमिबिक अॅबसेसचा पू अगदी ओळखीचा. त्याचं वर्णन ‘अॅन्कोव्ही सॉस पस’ असंच करतात. पण आम्ही कशाला कधी अॅन्कोव्ही सॉस पाहिलाय? आम्हाला आपला पू परिचयाचा. त्यामुळे खुद्द इंग्लंडात अनेक सॉसच्या बाटल्यातून मी अॅन्कोव्ही सॉस झटक्यास ओळखला. ‘अरेच्चा हा सॉस नसून हा तर अॅमिबिक अॅबसेसचा पूच!!’ असे शब्द अनाहूतपणे बाहेर पडले. ‘मा निषाद...’ म्हणणाऱ्या आदीकवी वाल्मिकी इतकंच उत्स्फूर्त हे!
कवी वरून आठवलं, ‘जे देखे रवी ते देखे कवी’च्या धर्तीवर, ‘जे देखे रवी ते देखे पीएसएम’ असंही म्हणतात. (It includes everything under the Sun including the Sun.) पीएसएम म्हणजे प्रतिबंधक आणि सामाजिक वैद्यक. मस्त असतो विषय. पण ह्याच्या पार्क अँड पार्क लिखित पुस्तकात महत्वाच्या ओळींखाली खुणा करण्याचा प्रमाद मुळीच करू नये.  कारण आख्ख पुस्तक अंडरलाईन होऊन जातं, रिफील संपते, पण बिनमहत्वाचा भाग मुळी येतच नाही!! एखाद्या कवितेतला, किंवा ‘शोले’तल्या संवादातला जसा एकही शब्द वगळता येत नाही तस्सच गोळीबंद लिखाण आहे हे. अर्थात कवितेइतकं किंवा ‘शोले’इतकं सुखकारक मात्र नाही!!
असेच, शब्द शब्द जपुनी ठेव, असं करत वाचावं लागणारं दुसरं पुस्तक म्हणजे, सर्जरीचे लव्ह बेली. आधुनिक वैद्यकीची ही सुश्रुत संहिता. ह्यात सुश्रुताचा उल्लेख आहे बरं. पूर्वी नव्हता. आता आहे. आजच्या सर्जरीतल्या भारतीयांच्या बेफाट  कामगिरीमुळेच भारतीय वारश्याची दखल घ्यावी लागली आहे. गडी सर्जरी शिकलाय आणि त्याला लव्ह बेली माहित नाही हे शक्यच नाही. मजकूर तर वाचनीय आहेच पण तळटीपा भन्नाट. पोटात दुखतय म्हटलं की पेशंटची आणि/किंवा डॉक्टरची इच्छा असो व नसो, गुदद्वारात बोट घालून तपासणी केलीच पाहिजे असा दंडक आहे. पूर्वी ह्याला विलक्षण महत्व होतं. आता सोनोग्राफी वगैरे तपासण्यांच्या जमान्यात एकूणच शारीरिक तपासणीचं  महत्व कमी कमी होत गेलय. पण इष्ट स्थळी बोट घाला हा आपला मुद्दा ठसवण्यासाठी लव्ह बेली सांगतात, तिथे जर बोट नाही घातलंत, तर नंतर गूवात  पाय बरबटलाच म्हणून समजा. (If you don’t put your finger in it you will put your foot in it.) मतितार्थ हा, की ही एक गंभीर चूक ठरू शकते. मूळव्याधीची शस्त्रक्रिया बरोबर पार पडली आहे किंवा नाही हे कसे ओळखायचे? तर शेवटी नुसती इष्ट छिद्राकडे नजर टाकायची. तोंड जणू लवंगेचे बोंड, झाले समजा सर्व गोड; पण तोंड जर डेलियाचे फूल, झाली चूक, घडली भूल! (‘if it looks like a clover your job is over if it looks like a Dahlia its sure to be a failure!’) असल्या सुभाषितांनी आणि म्हणी वाक्प्रचारांनी हे पुस्तक मढलेले आहे. पहिलच पान, पहिलाच धडा आणि पहिलेच वाक्य, ‘स्कीन इज द बेस्ट ड्रेसिंग!’ आख्खी सर्जरी म्हणजे झालेल्या किंवा केलेल्या जखमा बऱ्या करणे.  जखमा बऱ्या करतानाचा अंतिम हेतूच स्वच्छ सांगून टाकलेला. उगाच हयगय नाही. बस्स, विषयच संपला.
पण सर्जरीच्या पुस्तकांनी शिकवलेला सगळ्यात मोठा धडा म्हणजे, हमाम में  सब नंगे है. गोऱ्या बायकांबद्दलच्या माझ्या समजुती ह्या पुस्तकांनी अमुलाग्र बदलल्या. गोरी आणि विशेषतः  बाई ही उंच, सुंदर, चिकणी, निळ्या डोळ्याची ई. ई. असतेच अशी आपली माझी समजूत होती. गावात लहानपणी इंग्लिश पिक्चर लागायचे. त्यात जेवढी दिसायची तेवढीच गोरी बाई आमच्या परिचयाची. अर्थात ह्यात बरीच दिसायची. बरीच बाई दिसायची म्हणूनच तर आम्ही जायचो. दर रविवारी इंग्लिश पिक्चरचा एकच शो असायचा. त्याची जाहिरात मात्र मस्त असायची. ‘चाळीस मदनमस्त तरुणीच्या तांड्यात ढिश्यांव ढिश्यांव करत शत्रूला यमसदनी पाठवणारा जेम्स बाँड बघा!’ त्यातील काही मदनमस्त तरुणी तर जेम्सच्या सदा गळ्यात पडलेल्या असायच्या. त्यांचे कमनीय बांधे आणि कमीतकमी कपडे आमचे वांधे करून ठेवायचे. पण सर्जरीच्या पुस्तकात पहातो तो काय; लंगड्या, थोट्या, काण्या, कुबड्या अशा सगळ्या बाया. एक ना धड. एक ना धाकट. कुणा गौरांगनेच्या थानाला कँन्सर झालाय तर कुणा मदनिकेची जखमच बरी होत नाहीये; कुणा रूपगर्वितेला जलोदर आहे तर कोणा अप्सरेचे पाय  ‘व्हेरिकोज व्हेन्स’मुळे हे एवढाल्ले सुजलेत.
गायनॅक एंडोक्रायनोलॉजीचा बृहतग्रंथ म्हणून जो मानला जातो तो म्हणजे ‘स्पिरोफ’रचित जाडजूड ठोकळा. उचलतानाच इतकी दमछाक होते, की हे लिहिले तरी कसे याचे आश्चर्य वाटावे. याची सुरवातच मोठी रोमांचक आहे. मला आठवतय आज स्पिरोफला हात घालायचा असे ठरवून एका ब्राम्हमुहूर्तावर मी उठलो होतो. स्नानादी कर्मे आटोपून, नवे कोरे स्पिरोफ हुंगले होते. पहिलाच धडा वाचायला सुरवात करतो तो काय, AAATCGGGGTTCCGAATTGGGCCATTTGGCCAAA अशी पॅराग्राफभर अक्षरमालाच नुसती. अर्थात ही अक्षरमाला जाम ओळखीची. डीएनएची ही भाषा.A,T,C,G ह्या चार अक्षरी मंत्रात साऱ्या सजीव सृष्टीच्या चलनवलनाचे गूज सामावलेले. पॅराग्राफभर हे झाल्यावर यातच अक्षरे गुंफलेली होती, SPIRROFTTCCGAATTGGGCCATTTG. आणि पुढे लेखक म्हणतो, ‘ही अक्षरमाला अर्थातच अॅब्नॉर्मल आहे. पण ही अॅब्नॉर्मल आहे हे आपण ओळखू शकतो हेच जनुकशास्त्रात आपण केलेल्या प्रगतीचे द्योतक आहे.’ हे वाचताच अंगावर सरसरून काटाच आला. जेनेटिक्सच्या प्रेमात मी होतोच. जीवा वर जीव जडलेला कोणीही सहृदय माणूस जेनेटिक्स वर लट्टू असतोच. पण ही अशी ओळख खासच. पुढे त्या पुस्तकात काय काय होतं, बाई ‘बाई’ का असते? आणि बुवा ‘बुवा’ का असतो? आणि अर्धनारीश्वर, ‘अर्धनारीश्वर’ का असतो? याची रेण्वीय स्तरावरची कारणे होती. बालपणीच ऋतूप्राप्ती, मूल होणे, न होणे, नको असणे, हवे असणे असे अनेक प्रश्न आणि त्यांची सारासार उत्तरे होती. पण मंगलाचरणाची ती पहिली ओळ काळजात घर करून राहिली ती कायमची.
अशा खाचाखोचा एन्जॉय करत पुस्तक वाचणं म्हणजे आनंदाचा ठेवाच. शिवाय आपापसात सगळ्याच लेखकांचे सख्य असतेच असे नाही. त्यामुळे तुम्हाला जरा जगाचे ज्ञान असेल, तर यातल्या कुचाळक्या आणि टोमणेही लक्षात येतात. मायोमेक्टॉमी म्हणजे गर्भपिशवीवर उगवलेली फायब्रॉईडची गाठ काढणे, पण पिशवी शाबूत ठेवणे. ही तशी कौशल्याची शल्यक्रिया. एकाच वेळी अनेक गाठी काढणे, मोठ्या-मोठ्या गाठी छोट्या-छोट्या भोकातून किंवा दुर्बिणीतून काढणे असे गिनीज बुक छाप विक्रम, डॉक्टर मंडळीसुद्धा करत असतात आणि मारे मिरवत असतात. एका अमेरिकन पुस्तकात, अशा कसरतपटू ब्रिटीश सर्जनची लेखकानी जाम टर उडवली आहे. ‘फायब्रॉईडने लदबदलेली गर्भपिशवी, इतका आटापिटा करून वाचवण्यासाठी, तसंच काही तरी शाही कारण हवं, उदाः गादीला वारस हवाय वगैरे!!’ लोकशाही जपणाऱ्या अमेरिकेची राजेशाही ब्रिटनवरची ही तिरकस टिपण्णी.
कधी कधी चक्क लेखकांची भेट होते. आपोआपच चरणस्पर्श घडतो. पीडीएट्रिक्सचे ग्रंथकार डॉ. ओ.पी.घई फायनल एम.बी.बी.एस.ला चक्क परीक्षक म्हणून आले. हा माणूस इतका जमिनीवरचा, इतका निगर्वी, की आम्हाला प्रत्येकाला शेवटचा प्रश्न त्यांनी विचारला, ‘माझ्या पुस्तकात काही बदल सुचवायचेत का तुला?’ हे म्हणजे व्यासांनी एखाद्या ष्टांम्प रायटरास, ‘काय रे, युद्धाचं वर्णन बरं जमलय ना?’ असं विचारण्यासारखं होतं. त्यांचं पुस्तक वाचूनही पढतमूर्ख म्हणण्या इतपतही पीडीएट्रिक्स मला येत नव्हतं. बदल कसले सुचवतोय! पुस्तकावर त्यांची सही मात्र घेतली. ते पुस्तक मी अजूनही बाळगून आहे.
अशा पुस्तकांशी आयुष्याचे ऋणानुबंध जुळलेले. कित्येक दशग्रंथी डॉक्टर आपली अगदी फर्स्ट ईअर पासूनची पुस्तके वर्षानुवर्ष जपून ठेवतात. ह्यातले ज्ञान लवकरच जुने होते, कुठल्याही मेडिकल विद्यार्थ्याला, कॉलेजलाही ती निरुपयोगी. पण ही समृद्ध अडगळ डॉक्टर बाळगून असतात. जाड रेक्झीनच्या  कव्हरातले, जुना परिमळ दरवळत ठेवणारे हे ग्रंथ,  त्यांची किंमत शून्यवत झाली तरी मूल्य अमूल्य असते.
इतकी मोठी, इतकी महान आणि इतकी महाग पुस्तकं. सगळीच्या सगळी घ्यायची ऐपत असते, नसते. माझी नव्हती. मग झेरॉक्स काढून घ्यायची अशीच पद्धत होती. पुस्तकेच्या पुस्तके ऑर्डरप्रमाणे झेरॉक्स काढून देणारी खास दुकानेही होती. माझ्याकडेही अशी पुस्तके होतीच. पण त्या पुस्तकांचे योग्य ते दाम न चुकवल्याची रुखरुखही होती. ग्रंथांशीच प्रतारणा करून ग्रंथोपजीवी कसे व्हावे बरे? डॉक्टरकी सुरु केल्यावर काही वर्षात त्या त्या पुस्तकांच्या नव्या कोऱ्या आवृत्या पडेल त्या किमतीला मी विकत घेतल्या. मनावरच ओझं उतरलं. ग्रंथोपजीवी, दृष्टादृष्टविजयी, अशा विशेष लोकांत आपण सामील झालोय अशी भावना दाटून आली.