Friday 19 April 2019

माझा प्रवास होमिओपॅॅथी ते अॅॅलोपथी भाग ३


हा लेख आधी ' अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र वार्षिक अंक २00' आणि नंतर अनुभव एप्रिल २००९’ मध्ये प्रकाशित झाला. त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. त्यांतील काही निवडक प्रतिक्रिया इथे दिल्या आहेत. अखेरीस या साऱ्यांचा समाचार घेणारे माझे उत्तरही छापले आहे. वाचा. वाचाच. मजा येईल.

वाचकांच्या प्रतिक्रिया

अभ्यंकर यांचा ' होमिओपॅथ ते अॅलोपॅथ' हा लेख वाचनात आला. हा लेख वाचताना खूपच गोंधळलेल्या अवस्थेत लिहिलेला आहे, हे जाणवतं.
लेखात दिल्याप्रमाणे लेखकाचा गोंधळ हा त्याच्या १२वी पासूनच किंबहुना त्याही आधी सुरू झाला आहे. अन्यथा सहसा १२वी तील हुशार मुलं आपली पुढील दिशा आधीच ठरवून त्याप्रमाणे खडतर परिश्रम घेतात. एवढाही निर्णय न घेता येणं, हे मानसिक परावलंबित्वाचं लक्षण आहे. तसंच, ज्या त्वेषाने लेख लिहिला आहे त्याचा विचार करता अॅलोपॅथीमध्ये डॉ. शंतनू अभ्यंकर हे नाव गेल्या २५ वर्षांत फार गाजलंय, अशीही परिस्थिती नाही. बी. जे. मेडिकलमध्ये हे नाव यशस्वी डॉक्टरांच्या यादीमध्ये गणलं जातं, असंही नाही. म्हणूनच स्वत:बद्दल असलेल्या भ्रमामुळे ते वाट फुटेल तिकडे पळत सुटले. त्यात चुकून एकदाच त्यांना यश दिसलं आणि ओघानेच ते डॉक्टर झाले एवढंच! अन्यथा, त्यांचा शैक्षणिक प्रवास पाहता ' नाचता येईना अंगण वाकडे' या म्हणीचा प्रत्यय येतो. त्यात होमिओपॅथीचा काहीही संबंध नाही आणि होमिओपॅथीमुळे भ्रमनिरास होण्याचा संबंध नाहीच नाही. निराशा हाच त्यांचा मूळ प्रश्न असल्यामुळे ते कुठेही गेले तरीही त्यांचा भ्रमनिरास होणारच. त्यात दोष त्यांचा की होमिओपॅथीचा?
ओघानेच डॉक्टर झालेल्या एखाद्या व्यक्तीने एकंदरीतच विज्ञानाच्या क्षेत्रात स्वत:ची आजची जागा काय ते समजून न घेता एका प्रस्थापित वैद्यकशास्त्राला अवैज्ञानिक म्हणणं आणि मग त्यामुळे भ्रमनिरास झाला असं म्हणणं म्हणजे वैचारिक दिवाळखोरीच नाही काय? उद्दिष्ट न ठरवता केलेला दिशाहीन शैक्षणिक प्रवास, कोणत्याही विज्ञानशाखेचा धड नसलेला अभ्यास, आय.सी.आर.मधून केलेली हकालपट्टी, एल.सी.ई.एच. झाल्यानंतर न चाललेली जनरल प्रॅक्टिस, कुठलाही विचार नसताना प्रयत्नाशिवाय संधी चालून आली म्हणून स्वत:साठी निरुपद्रवी अशी होमिओपॅथिक प्राध्यापकाची नोकरी, होमिओपॅथिक प्रॅक्टिस करण्याच्या क्षमतेचा स्वत:मध्ये पूर्णतः अभाव, एम.बी.बी.एस.ला व एम.बी.बी.एस. झाल्यानंतर फारसं काही करता न येणं आणि एकंदरीतच आजपर्यंत कोणत्याही वैज्ञानिक क्षेत्रात, अगदी अॅलोपॅथीमध्येसुद्धा स्वतःचा असा ठसा उमटवण्यात आलेलं अपयश, या परिस्थितीतून डॉ. शंतनू अभ्यंकर यांच्या लेखाचा जन्म झाला आहे. त्यामुळे डॉ. शंतनू अभ्यंकरांचे शंकानिरसन करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे वेळ वाया घालवण होय. पण त्यामुळे सामान्य वाचकांचा झालेला गैरसमज दूर करण्यासाठीच हा लेखनप्रपंच.
होमिओपॅथी हे अनुभवावर आधारित शास्त्र (सायन्स ऑफ एक्सपीरिअन्स) आहे. ते प्रायोगिक (एक्सपरमेंटल) नाही. त्यामुळे त्याच्या मूळ ग्रंथात सतत भर पडत असली, तरीही मूळ साच्यात बदल होत नाही. तसंच होमिओपॅथी हे वेगळे शास्त्र असल्यामुळे त्यातील प्रत्येक संकल्पना आधुनिक वैद्यकशास्त्राला माहीत असेलच असे नाही. किंबहुना तसा शोध घेणं हा शुद्ध मूर्खपणा होय. तरीही डॉ. अभ्यंकरांच्या माहितीकरिता नमूद करतो. डॉ. हॅनीमन यांनी २00 वर्षांपूर्वी सांगितलेली व्हायटल फोर्सची संकल्पना आधुनिक वैद्यकशास्त्रात इक्विलिब्रियम या नावाने आता ओळखली जाते. मग १९८० साली आधुनिक वैद्यकशास्त्राला ही संकल्पना माहीत नसेल, तर तो त्यांच्या संशोधनातील अभाव की होमिओपॅथीची कमतरता?
एखादं पुस्तक दर दोन वर्षांनी पूर्णपणे बदलणं आणि त्यात दोन वर्षापूर्वीच्या आजारांच्या कारणमीमांसेच्या पूर्ण विरुद्ध कारणमीमांसा प्रसिद्ध होणं, हे प्रगतीचे लक्षण आहे की अधोगतीचं? केवळ प्रयोग म्हणून उपचार करणे योग्य की त्याला जोड देऊन, तसंच केवळ भाषा आणि शब्द बदलले म्हणून एखाद्या शास्त्राला अवैज्ञानिक म्हणणं याला अपरिपक्वता (इम्मॅच्युरिटी) नाही तर काय म्हणणार?
शरीराचा प्रत्येक अवयव एकमेकांशी संलग्नतेत काम करतो, ही वस्तुस्थिती आहे. त्यामागे असलेल्या कार्यकारणभावाला व्हायटल फोर्स असे संबोधलं जातं. प्रकृतीनुसार त्याची सर्वांगीण चिकित्साही करता येते. ती कशी करावी, हेही होमिओपॅथीत सांगितलं आहे. ते न समजण हा डॉ. अभ्यंकरांचा करंटेपणा आहे. आताच्या विज्ञानाला व्हायटल फोर्स बघता येत नाही, म्हणून तो अस्तित्वातच नाही, अशी संकल्पना असेल तर कित्येक गोष्टींचे अस्तित्व आधुनिक वैद्यकशास्त्राला नाकारावं लागेल... अगदी मनाचंसुद्धा! स्वत:च्या दवाखान्यातून निघाल्यानंतर डॉ. अभ्यंकर स्वत:च्याच घरी कसे जातात, त्या वेळी त्यांच्या मेंदूत तंतोतंत काय बदल होतात, हे कोणत्याही गृहीतकाचा (हायपोथीसीस) आधार न घेता डॉ. अभ्यंकर समजावून सांगू शकतील काय? आधुनिक वैद्यकशास्त्रात ९०% आजारांचं कारण ‘अननोन ओरिजिन’ असं लिहिलं जातं, यांचे काही स्पष्टीकरण डॉ. अभ्यंकरांच्या वैज्ञानिक दृष्टीला देता येईल का?
एखादं औषध किती पातळ (डायल्यूट) केले तरीही गणितीदृष्ट्या त्यात औषधाचा अंश कमीत कमी का होईना, असलाच पाहिजे. तो बघता न येण्याची आधुनिक वैद्यकशास्त्राची त्या काळातील अक्षमता, म्हणजे होमिओपॅथी अवैज्ञानिक असणे, हा तर्कटी विचार नाही का ? प्रगत भौतिकशास्त्रात मात्र या सर्व संकल्पनांचा पूर्ण उलगडा झाला असून त्याविषयी एक पूर्ण शास्त्रशाखा विकसित झाली आहे. त्याला नॅनो टेक्नॉलॉजी असं म्हणतात. होमिओपॅथीच्या औषध निर्माणशास्त्रातील शास्त्रोक्तता समजावून घेण्यासाठी डॉ. अभ्यंकरांना भौतिकशास्त्राचा अभ्यास करावा लागेल. अणुरेणूची संकल्पना, चक्राकार गती (सर्क्युलर मोशन) व त्यामुळे निर्माण होणारी ऊर्जा, त्या ऊर्जेशी संपर्क झाल्यानंतर अणुरेणूच्या गुणधर्मात होणारे बदल, तसंच दोन वेगळ्या पदार्थाच्या अणुरेणूचा एकमेकांशी संघर्ष (कोलायजन)झाला असता त्यांच्या गुणधर्मात होणारे बदल, या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास केला असता होमिओपॅथिक औषधं गुणकारी का होतात, हे सहज समजतं. न समजल्यास माहीतगार माणसाकडून समजावून घ्यावं, हे सामान्य बुद्धीच्या लहान मुलालाही कळेल.
होमिओपॅथिक औषधात नावालाही औषध नसतं हे डॉ. अभ्यंकर यांचं वाक्य वादाकरिता गृहीत धरलं, तर आम्ही सांगितलेल्या, निदान किरकोळ आजार असलेल्या रुग्णांचे त्रास काहीही औषध न देता ठरावीक मुदतीत डॉ. अभ्यंकर बरे करून दाखवतील का?
डॉ. अभ्यंकरांनी व्यक्त केलेल्या होमिओपॅथिक कॉलेज व रुग्णालयातील त्रुटी (त्यातील अतिशयोक्ती वगळता) या टाळल्याच पाहिजेत; पण ही त्या संस्थेची जबाबदारी आहे. एखादं रुग्णालय चुकतं, म्हणून होमिओपॅथीच अवैज्ञानिक आहे, असं विधान करणं हे सुदृढ मानसिकतेचं लक्षण नक्कीच नाही.
सरतेशेवटी, स्पेक्ट्रोफोटोमेट्री, क्रोमॅटोग्राफी, इलेक्ट्रोफोरोसिस, नॅनो टेक्नॉलॉजी, मॉलिक्युलर केमिस्ट्री, मॉलिक्युलर बायॉलॉजी, कंपनांमुळे निर्माण होणारी ऊर्जा (व्हायब्रेटरी एनर्जी) इ. विज्ञानशाखांचा परिपूर्ण आणि सखोल अभ्यास केल्यानंतर, तसंच जिथे होमिओपॅथी शिकवली जाते, अशा जगातील ८३ देशांमधील अनुभवसिद्ध होमिओपॅथिक डॉक्टरांच्या आजपर्यंतच्या अनुभवावरून होमिओपॅथी ही शास्त्रशुद्ध चिकित्सापद्धती आहे. याबद्दल काहीच शंका नाही. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनेही (डब्ल्यू.एच.ओ.) होमिओपॅथीची सकारात्मक दखल घेतली आहे. जगभरात या शास्त्राला मानाचं स्थान मिळालेलं आहे.
त्रुटी प्रत्येक शास्त्रात असतात... अगदी अॅलोपॅथीमध्येसुद्धा! त्यामुळे ते शास्त्रच अवैज्ञानिक होत नाही. पण हे समजायला परिपक्वता हवी, कर्तृत्वासह दांडगा आत्मविश्वास हवा. स्वत:चा दोष ओळखायला डॉ. अभ्यंकर, तुम्ही कमी पडलात; त्यामुळेच तुमचा भ्रमनिरास झाला. तुम्ही काहीही म्हणालात तरीही तुमचा राग होमिओपॅथिक डॉक्टरला अॅलोपॅथिक प्रॅक्टिस करण्यास कायदेशीर वैधता नसल्यामुळे तुमची झालेली कुचंबणा यामुळे आहे. तुम्ही अॅडमिशनपूर्वी साधी चौकशी न करण्याची केलेली चूक व तुमचा अकर्तृत्वहीन आत्मविश्वास यामुळे आलेल्या अपयशाचे खापर तुम्ही होमिओपॅथीवर फोडत आहात,  त्यासाठी तुम्ही आत्मपरीक्षण करावं, असं तुम्हाला वाटत नाही का? स्वत:च लिहिलेला लेख पुन्हा एकदा या दृष्टिकोनातून वाचलात तर तुम्हालाही हे
नक्कीच पटेल. होमिओपॅथीवर नसती आगपाखड करून काय मिळणार?

डॉ. शैलेश देशपांडे, डॉ. धनंजय देशमुख,  डॉ. स्वाती आसवे
सोसायटी फॉर एन्हान्समेंट अँड रीसर्च इन क्लासिकल होमिओपॅथी, पुणे.

________________________________________________________

सर्वप्रथम डॉ. शंतनू अभ्यंकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन. त्यांचं आत्मचिंतन व त्यांनी केलेली धडपड यांचं वर्णन शब्दांत करणं अवघड आहे. प्रवाहाच्या विरुद्ध पोहून यशस्वी होणं, ही लाखांत एखाद्यालाच जमणारी गोष्ट आहे. ज्या देशात शेकडो प्रकारच्या अशास्त्रीय गोष्टी चालतात, तिथे शास्त्रीय विचारांचा प्रसार होणं ही अशक्यप्राय गोष्ट आहे. उदाहरणार्थ, आयुर्वेदिक उपचार, युनानी, निसर्गोपचार, शिवांबू, चुंबक थेरपी, पिरॅमिड थेरपी, रुद्राक्ष, अॅरोमा थेरपी, मंत्र-तंत्र, जादूटोणा, ज्योतिषी, चमत्कार घडवणारे बुवा, वास्तुशास्त्र, सर्व प्रकारची कर्मकांडे करून लोकांना लुटणारे गुरुजी हे व असे असंख्य प्रकार या देशात लोकप्रिय आहेत. त्यांना समाजाचा मोठा पाठिंबा आहे. या देशात इंजिनियर माणसं आयुर्वेदाचार्य होतात व सर्व जगात लेख लिहून, टीव्हीवर, मासिकं-वृत्तपत्र यांमधून प्रचार करतात. ज्या देशात या क्षेत्रात शिकलेल्या माणसाच्या सांगण्याला किंमत नाही पण अशा अशास्त्रीय माणसांच्या सल्यांना फार महत्त्व आहे, ज्या देशात रॉकेट लाँचिंग ज्योतिषाच्या मुहूर्तानं होतं, त्या देशात शास्त्रीय ज्ञानाची हेटाळणी होणारच. अंधश्रद्धाविरोधी चळवळीचं आव्हान स्वीकारण्याची आपली कुठलीही तयारी नाही.

                                डॉ. धनंजय गोरे, पुणे


....लेखकाच्या मते 'होमिओपॅथी कॉलेजमधून मिळणारं शिक्षण सुमार दर्जाचं आहे... मान्य. कारण विनाअनुदान तत्त्वावर असं कॉलेज चालवणं ही तारेवरची कसरत असते. आता ज्यांच्या दारात सरकारी पैशांचा पाऊस पडतो, अशांना होमिओपॅथीसारख्या 'अनाथ' पॅथीचं दु:ख कसं कळणार?  परंतु ज्या 'बीजे'चे गोडवे लेखक गात आहेत,  तिथेदेखील उपयुक्त शिक्षणाची वानवाच होती, हे काही प्रमाणिक व प्रांजळ डॉक्टरांनी (माजी) आवर्जून नमूद केलं आहे. उदा.,
(अ) ' ज्या व्यवसायाकडून समाजाचे आरोग्य सांभाळले जावे अशी अपेक्षा असते, त्यांचे सर्व शिक्षण निसर्गापासून दूर, अनैसर्गिक वातावरणात, आरोग्याचा विचार न करता फक्त रोगाचा विचार करण्यात होते. ज्या तीन गोष्टी आपल्याला आनंद देतात, त्यांविषयी काहीही शिकवले जात नाही (उदा., खाणे, व्यायाम आणि लैंगिक व्यवहार) आणि ज्या गोष्टींचा आपल्याला अतोनात त्रास होतो, त्या गोष्टी शिकवून आम्हा डॉक्टरांना छू' करून सोडले जाते. साहजिकच आरोग्य कशाशी खातात, हे माहीत नसलेला डॉक्टर तुमच्यात असलेला अगर नसलेला रोग शोधत राहतो. तो तरी काय करणार?' (संदर्भ : वाट्टेल ते, पान क्र. ३२, लेखक डॉ. राजीव शारंगपाणी) डॉ. अभ्यंकर यांचं उत्तर काय?
(ब) 'दोन वर्षापूर्वी माझ्या एनर्जी स्कॅनने व अॅक्युपंक्चरच्या ज्ञानाने दिलेल्या इशा-याकडे मी पुरेशा गांभीर्याने पाहिलं नाही. बी. पी., स्ट्रेस टेस्ट, कोलेस्टेरॉल आदी 'अॅलोपॅथी'च्या तपासण्या नॉर्मल आहेत म्हणून मी माझ्या एनर्जीच्या असमतोलाकडे डोळेझाक केली. अॅलोपॅथी'च्या या तपासण्या पुरेशा विश्वासार्ह नाहीत, खुद्द 'अॅलोपॅथीच्याच पुस्तकात स्वच्छपणे नमूद केलं आहे. (संदर्भ : मुक्तपीठ, दै. सकाळ, दि. १३ एप्रिल ०९, डॉ. दीपक रोकडे) तेव्हा, बेसुमार त्रासदायक पुस्तकी शिक्षणापेक्षा सुमार दर्जाचं शिक्षण परवडलं, असं म्हणायची वेळ आली, तात्पर्य, बदल याचा अर्थ प्रगती नव्हे!
(क) 'शेवटी आपल्याला मुलगा व्हायचा की मुलगी, हे कितीही केले तरी आपल्या हाती नसतेच. त्यात नशिबाचा भाग मोठा असतो. मानवी व्यवहारांवर नियंत्रण ठेवणारी एक निश्चित शक्ती अस्तित्वात आहे, अशी माझी श्रद्धा आहे.' (अंधश्रद्धा नव्हे!) 'आपल्या शरीरात इलेक्ट्रोमॅग्नेटिक चार्ज असतो हे सर्वमान्य आहे. मृत शरीरात कोणताच चार्ज नसतो. 'स्पिरिच्युअल हीलिंग' हा जो प्रकार आहे, तो पॉझिटिव्ह लोकांना साधलेला असतो. (संदर्भ: 'शल्यकौशल्य', डॉ. बी. एन्. पुरंदरे यांची आत्मकथा, तिसरी आवृत्ती.)
(ड) 'स्वत:विषयी' नावाचं लेखक डॉ. अनिल अवचट यांचं पुस्तक, तसंच डॉ. आनंद नाडकर्णी यांचे ‘आरोग्याचा अर्थ' हे पुस्तक डॉ. अभ्यंकरांनी पुन्हा नवीन आचरटपणा करण्यापूर्वी मुळातून वाचावे ही विनंती. २५ वर्षांपूर्वीच्या परिस्थितीचा संदर्भ घेऊन आज त्याचा पंचनामा करणं, म्हणजे लहानपणी उशिरा चालायला लागलेल्या मुलाला ऑलिंपिकमध्ये धावायची सारी कवाडे कायमचीच बंद करण्यासारखं झालं. अशा प्रकारे वेगाने वाढणारा हा 'अॅलोपॅथिक मक्तेदारीचा रोग वेळीच हद्दपार केला पाहिजे.
आत्मा हरवलेल्या सर्वगुणसंपन्न अशा अॅलोपॅथीशी ' अधिकृत संबंध ' आल्यानंतर शंतनुरावांना पार्क अँड पार्क लिखित पी.एस.एम.च्या पुस्तकाचा विसर पडला असावा. तेव्हा आता तरी त्याची संपूर्ण नवीन आवृत्ती वाचावी. बहुधा वाईत ती मिळत नसावी. परंतु पुण्यात मिळते, तेव्हा, पार्कमधून तुमच्या लाडक्या डब्ल्यू.एच.ओ.ची आरोग्याची जगन्मान्य व्याख्या वाचावी. त्यात दुर्दैवाने ' स्पिरिच्युअल वेलबीइंग' चा उल्लेख आढळेल. त्याचं समर्थन कसं करणार ? कारण सदर स्पिरिच्युअल हेल्थचा उल्लेख सुमारे २०० वर्षांपूर्वी होमिओपॅथीचे जनक डॉ. हॅनीमन यांना अभिप्रेत असलेला व्हायटल फोर्स होय. परंतु डॉ. अभ्यंकरांना बहुधा या शब्दाची अॅलर्जी असावी आणि यावर केवळ होमिओपॅथीचा विचार व उपचारच लागू पडतो, हे २३ वर्षांच्या अनुभवांती सानंद नमूद करावंसं वाटतं. तर अशा या व्हायटल फोर्सचा तोल बिघडला की आपण आजारी पडतो, हे सत्य पडताळून पाहणं आता शक्य आहे. लेखकाने थोडा वेळ काढून पुण्याच्या एम.आय.टी.मध्ये जाऊन स्वत:चं ऑरा टेस्टिंग करून घ्यावं.
आपल्या लेखात लेखकाने आणीबाणीच्या काळात उपयोगी पडलेल्या संमोहनविद्या, स्वसंमोहन, स्वयंसूचनेतील सुप्त शक्ती यांचा उल्लेख अज्ञान म्हणून केला की विज्ञान म्हणून? 'ही संमोहनविद्या लेखकाच्या विस्कळीत मनाचा आधार ठरली’; मग इंद्रियगोचरतेचं काय?
ज्या आय.सी.आर.ला लेखकाने मनापासून शिव्या दिल्या, तिची स्थापना मुळातून अॅलोपॅथीच्याच डॉ. ढवळे यांनी केली, हे लेखक रागाच्या भरात विसरला. शिवाय आजही तिचे सर्वेसर्वा अॅलोपॅथीचे डॉक्टर कुमार ढवळेच आहेत. शिवाय ते मानसोपचारतज्ज्ञ आहेत. बिचारे लेखक आय.सी.आर.ने वेडं ठरवल्यानंतर दाद तरी कुणाकडे मागणार? आणि तरीही सामाजिक व व्यावसायिक ऋण म्हणून एक गोष्ट नमूद करू इच्छितो, की आय.सी.आर. सारखी खासगी संस्था कुणालाही वेडं ठरवू शकत नाही. तेव्हा, एवढं मनाला लावून घ्यायची गरज नव्हती. अॅलोपॅथीच्या नित्याच्या रिवाजाप्रमाणे 'सेकंड ओपिनियन' घ्यायची व्यावसायिक खेळी लेखक खेळायला कसा विसरला?
भारतात अॅलोपॅथी प्रॅक्टिस करायला डोकं लागत नाही, हे मी ऐकलं होतं, परंतु जी.पी. करावी हे मूळ स्वप्न असलेल्या लेखकाने ते सप्रमाण सिद्ध केलं, त्याबद्दल अभिनंदन !
शेवटी, वाईट एकाच गोष्टीचं वाटतं, की माझ्या लेखकमित्राचा होमिओपॅथ ते अलोपथी हा प्रवास समाजस्वास्थ्य घडवणारा न ठरता बिघडवणारा ठरला! (ता.क.: बी.जे.पासून जेएनयू पर्यंत कुठेही होमिओपॅथीची उपयुक्तता' सादर करायला आवडेल. आमंत्रणाची वाट पाहत आहे.)

                               डॉ. प्रदीप सेठिया, पुणे

________________________________________________________


....होमिओपॅथी प्रॅक्टिस करणाऱ्या ब-याच लोकांचा आपण रोष ओढवून घेतला असेल. मी स्वत: अॅलोपॅथीची डॉक्टर आहे व विज्ञानाची दृढविश्वासू. मी जनरल प्रॅक्टिस क्षेत्रात आहे. जरी माझा स्वत:चा होमिओपॅथीवर विश्वास अजिबात नसला, तरी लोकांना सांगताना कुठेतरी अशी एक शंका मनात असायची, की आपल्याला ते शास्त्र माहीत नाही त्यामुळे आपल्याला त्यावर बोलायचा अधिकार नाही. परंतु डॉ. अभ्यंकरांनी दोन्ही शास्त्रांचा पूर्ण अभ्यास करून मत मांडल्यावर त्यांच्या मताला नक्कीच वजन व किंमत आहे, असं मला वाटतं.
होमिओपॅथीचं औषध घेताना रुग्णाची मानसिक तयारीच असते, की या उपचाराला २-३ महिने लागणार, तेवढ्या अवधीत बरेचसे आजार नैसर्गिकरीत्या (त्या आजाराची सर्वसाधारण मुदत संपल्याने), हवा-पाणी इ. बदलल्यामुळे, रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती वाढल्यामुळे किंवा भोवतालच्या वातावरणबदलामुळे बरे होऊ शकतात. अॅलोपॅथीत एक वाक्य आहे, 'सर्दी ही औषध घेऊन ७ दिवसांत व न घेता एका आठवड्यात बरी होते. 'अर्थात होमिओपॅथीचं औषध घेताना, आपण काहीतरी औषधोपचार घेत आहोत, हे मानसिक समाधान रोग्याला मिळतं. अॅलोपॅथी औषधाने मात्र त्वरित बरं व्हायची अपेक्षा ठेवली जाते. मला जर कोणी "मी होमिओपॅथी घेऊ का?" अस विचारलं, तर मी "तुमचा विश्वास असेल तर जरूर घ्या”,  असं सांगते. शेवटी अर्ध्याहून  जास्त दुखणी ही डॉक्टरवरच्या विश्वासानेच बरी होतात, अगदी प्लॅसिबो देऊनसुद्धा!
अलीकडे बरेच लोक एक फॅशन म्हणून व अॅलोपॅथीच्या औषधाला साइड इफेक्ट्स असतात म्हणून ती घेण्याचे टाळतात. पण जर 'इफेक्ट' असेल तर साइड इफेक्ट' असणारच! पण डायल्युशनमुळे औषधाचा अंशच जर आपण घेतलेल्या डोसमध्ये नसेल, तर साइड इफेक्टचा प्रश्नच येत नाही, हे समजून घ्यायला हवं.
दुस-या अनेक पॅथीचे लोक 'आमच्याकडे सर्व रोगांवर औषध आहे व आम्ही सर्व रोग बरे करू शकतो', असे टॉल क्लेम्स करतात. अॅलोपॅथी मात्र आपल्या मर्यादा जाणते व डॉक्टरही याविषयी सांगतात. अॅलोपॅथीलाही अजून कित्येक गोष्टी (उदा. मेंदुचं कार्य) पूर्णपणे उलगडलेल्या नाहीत. कित्येक रोगांची कारणं किंवा औषधांची मोड ऑफ अॅक्शन' समजलेली नाही. परंतु शेवटी ईमर्जन्सीमध्ये अॅलोपॅथीला पर्याय नाही. होमिओपॅथी देणा-या डॉक्टरांच्या तपासणीतसुद्धा प्रचंड तफावत आढळते. काही लोक अगदी सकाळी पलंगाच्या कोणत्या बाजूने उतरलात' इथपर्यंत डीटेल्स विचारतात, तर काही रुग्णाशी एक अक्षरही न बोलता, त्याला हातही न लावता औषध देतात. असो!
 डॉ. अभ्यंकरांनी त्यांचा वैचारिक गुंता खूप चांगल्या त-हेने मांडला आहे. त्यामुळे त्याला साहित्यिक मूल्य प्राप्त होतं. त्यातून बाहेर पडण्याकरता त्यांनी जी जिद्द दाखवली, ती निश्चितच वाखाणण्याजोगी, दाद देण्याजोगी आहे.

                            डॉ. आसावरी आगाशे, पुणे




डॉ. शंतनू अभ्यंकरांचा साहित्यिक भाषेत रंगवलेला लेख वाचला. लेखात तथ्य नसलं तरीही मोठमोठ्या व्यक्तींच्या सहवासाची नावं, कुटुंबमाहात्म्य (स्वत:च्या), स्वत:च्या धडपडीची सुंदर रंगवलेली गोष्ट वाचनीय वाटते. कारण नसताना आपल्या सुंदर लेखणीद्वारे उजाड माळरानाचं प्रवासवर्णनही त्या रानाची किंमत वाढवते, तसंच काहीसं...
लेखकाने होमिओपॅथीची पदविका घेतली. या दरम्यानच्या संकुचित मानसिकतेतून आलेला अनुभव, व्यक्तिगत मतं, व्यक्तिगत गैरसमजावरून न समजलेल्या होमिओपॅथीविषयी, स्वानुभवाखाली आपलं मत मांडून हा लोकानुभवच आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेलाय, म्हणून हा पत्रप्रपंच. 'दुस-याच्या उणिवा दाखवून कुणी स्वत:ला मोठं ठरवू पाहत असेल, तर ते हास्यास्पद व केविलवाणं ठरतं', हे लेखकाचं मत या लेखासाठीच लेखकास उपयुक्त ठरतं.
प्रस्तुत लेखात 'होमिओपॅथीचा वर्तमानाशी काही संबंध नाही', असं हिणवलंय. सर्व जुनी पुस्तकं आहेत, तीच तीच वापरली जातात असं म्हटलंय. उलटपक्षी, अभ्यासक्रमात जुन्याबरोबर नवीन संशोधनाची व पुस्तकांची भर पडत आहे. १९८० चं लेखकाचं मत आजही तसंच दिसतं कारण जुन्या विचाराने लेख लिहिला गेलाय.
प्रगती व संशोधनाचं उदाहरण द्यायचे झाल्यास भारताच्याच होमिओपॅथीतज्ज्ञ डॉ. राजन शंकरचं देता येईल. जगातील ८0 देशांतील डॉक्टर्स होमिओपॅथीच्या संशोधनाविषयी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ज्ञान घेतात व ४० हून अधिक देशांतील वैद्यकीय अभ्यासक्रमात त्यांची पुस्तकं टेक्स्ट बुक' म्हणून मान्यताप्राप्त आहेत. १४ ते १५ भाषांत ही पुस्तकं भाषांतरित झाली आहेत. भारत हा देश, होमिओपॅथीच्या विकासाचा देश, म्हणून जगात संबोधला जातोय. भारतातील ५०हून अधिक डॉक्टर्स होमिओपॅथीच्या ज्ञानासाठी विविध देशांत, प्रांतांत नियमितपणे आमंत्रित केले जातात. त्यामुळे म्हणावंसं वाटतं की, जरा वेबसाईट उघडा, वाई सोडा, स्वत:च्या कोषातच राहून काहीतरी भयंकर लिहिण्यापेक्षा सत्याचा स्वीकार करा, खासगी कॉलेज, त्यांची हॉस्पिटल्स यांच्या कमजोरीचा फायदा घेऊन संकुचित नजरेने होमिओपॅथीच्या खोड्या काढण्यापेक्षा, हिणवण्यापेक्षा उघड्या डोळ्यांनी देशातील, पुण्या-मुंबईच्या डॉक्टरांना, त्यांच्या क्लिनिक-हॉस्पिटलला भेट द्या, रुग्णांचा अनुभव बघा नि मग या पॅथीवर लिहा. शक्य असल्यास आमच्या ग्रामीण भागातील दवाखान्यास थोडा वेळ देऊन कृतकृत्य केलं तरी होमिओपॅथीने काय होऊ शकतं, ते दाखवण्याचा प्रयत्न करू.
मुळात होमिओपॅथीस जन्माला घातलं तेच अॅलोपॅथीचे एम.डी. असलेल्या डॉ. हनीमान यांनी. पुढे अॅलोपॅथीचे अनेक एम.डी. डॉक्टर त्यांचे अनुयायी झाले व नंतर मुख्य संशोधक. भारतातही कोलकत्यात होमिओपॅथीचा डॉक्टर अशी कोणती औषधं देतो म्हणून रुग्ण गर्दी करत आहेत, हे बघायला गेलेले अॅलोपॅथीचे तज्ज्ञ व मेडिकल कौन्सिलर होमिओपॅथीचेच अनुयायी ठरले व नामांकित झाले. आजही अनेक अॅलोपॅथीचे तज्ज्ञ, एम.डी. डॉक्टर्स होमिओपॅथीचं महत्त्व समजतात, योग्य ठिकाणी त्याचा उपयोग करतात. काहीजण होमिओपॅथीचीच प्रॅक्टिस करतात. ते सर्व वेडे आहेत का ?
अॅलोपॅथीला कमी लेखण्याचा प्रश्नच येत नाही. अॅलोपॅथीचं स्थान कोणीही घेऊच शकत नाही. प्रत्येकाचं प्रत्येकाच्या ठिकाणी एक महत्त्व आहे. ते मानायलाच पाहिजे. पण त्याच वेळेस अॅलोपॅथीच्या उपचाराच्या कमजोरीतून डॉ. हानीमानकडून होमिओपॅथीची निर्मिती झाली, हेही विसरायला नको.
होमिओपॅथीच्या अभ्यासक्रमात अॅलोपॅथीचे दोष दाखवा व खंडन करा. परंतु होमिओपॅथीचा स्कोप व लिमिटेशन हा प्रश्न लेखकाने सोयीस्करपणे टाळलाय. चैतन्यशक्ती, औषधशास्त्र, फिलॉसॉफी इ. ची मनसोक्त टिंगलटवाळी केली आहे.
बिनऔषधवालं रसायन म्हणजे होमिओपॅथीचं औषध म्हटलंय, पण होमिओपॅथीची सर्व औषधं प्राण्यांवर नाही तर माणसांवर (निरोगी) सिद्ध केलेली आहेत, हे सांगणंही टाळलं आहे. डॉक्टर, तुम्ही होमिओपॅथिक कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये नावालाही रुग्ण नसतो असं सांगता; पण होमिओपॅथिक डॉक्टर्स व हॉस्पिटल (तेही होमिओपॅथिक) मध्ये बसायलाही जागा राहत नाही. लवकर अपॉइंटमेंट मिळू शकत नाही इतकं काम वाढत चाललंय, हेही दुर्लक्षित केलं तुम्ही. होमिओपॅथीच्या यशानं असं चरफडू नका.
थोड्या काळाकरिता सर्वांना फसवता येऊ शकतं, पण सर्वकाळ सर्वांना फसवता येत नाही, सत्य बाहेर पडतंच, हे आपणास माहीत असेलच. गेली तीनशे वर्ष हॅनीमानची होमिओपॅथी सर्व जगाला कशी फसवू शकते? रिझल्टच नसता तर लोकांनी मान्यता दिली असती का? दवाखान्यात गर्दी केली असती का? वर्षानुवर्षे एकाच डॉक्टरकडे सर्व कुटुंबं होमिओपथी उपचाराला थांबतील का? सर्व रुग्णांचं सोडा, रिझल्टच मिळाला नाही तर होमिओपॅथीचा डॉक्टर होमिओपॅथीची प्रॅक्टिस कोणत्या भरवशावर करेल, आणि तेही वर्षानुवर्षं? हे सर्व प्रश्न व त्यांची उत्तरं आपणासही माहीत आहेत. एका इन्स्टिट्यूटच्या डॉक्टरांनी व्यक्तिगत अपमान केला म्हणून सर्व होमिओपॅथीलाच शिव्या घालून आपण काय मिळवणार? उलट, आपलीच मानसिकता यातून प्रकट होते.
होमिओपॅथीच्या उणिवा दाखवून स्वत:ला मोठं करण्याच्या प्रकारातून या पॅथीविषयी लोकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा डॉक्टरांचा हा प्रकार भयंकर वाटला म्हणून हा शाब्दिक आसूड. सत्य बाजू त्यांना व लोकांनाही समजावी म्हणून हा लेखनप्रपंच.

                         डॉ. राजेंद्र श्रीमाळी, अहमदनगर

________________________________________________________

...डॉ. अभ्यंकर यांनी 'होमिओपॅथी आणि अॅलोपॅथी' या दोन्ही क्षेत्रांमधील त्यांचे शिक्षण आणि प्रॅक्टिस यासंबंधातील अनुभवांना धरून केलेल्या चिंतनावरून काही मुद्दे उपस्थित केले. त्या मुद्द्यांचं खंडन करू पाहणा-यांनी मात्र अत्यंत अवैज्ञानिक पद्धतीने अभ्यंकर यांच्यावरच टीकेची झोड उठवण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. डॉ. अभ्यंकर जर म्हणतात की होमिओपॅथिक औषधात औषधालाही औषध नसतं', तर या मुद्द्याचं खंडन करणा-यांनी 'ते औषध त्यात कसं असतं', हे आकडेवारीच्या आधारे वाचकांना दाखवून देणं अपेक्षित आहे. त्याऐवजी 'तुम्ही औषधाशिवाय रुग्ण बरा करून दाखवा', अशा प्रकारचे विधान करणं म्हणजे आपण खरोखरच अवैज्ञानिक पद्धतीने काम करत आहोत, हे स्वत:च सिद्ध करण्यासारखं आहे. प्रतिक्रियांमधली 'तुम्हाला बारावीचा अभ्यास नीट करता आला नाही...', यासारखी वाक्यं तर आपल्याला हेल्दी डिबेट'चा गंधही नसल्याचं दर्शवतात. रोग बरा करण्याचं ज्ञान होमिओपॅथीचं शिक्षण किती देतं याबाबत कोणतंही विधान माझ्यासारख्या वाचकाला करता येणार नाही, परंतु वैज्ञानिक पद्धतीने एखाद्या मुद्द्याकडे पाहण्याचे ज्ञान मात्र हे शिक्षण देत नाही, या डॉ. अभ्यंकरांच्या विधानाशी सहमत व्हावं, अशा त-हेने होमिओपॅथीची बाजू मांडणाऱ्यांनी प्रतिक्रिया लिहिल्या आहेत. जेव्हा अॅलोपॅथीच्या क्षेत्रात मतभेद, वादविवाद होतात, तेव्हा दोन्ही बाजूंनी बोलणा-या सर्व डॉक्टर्सच्या विधानांमध्ये एक वैज्ञानिक पद्धत दिसून येते. वैज्ञानिक पद्धतीने विशिष्ट संख्येच्या रुग्णांबाबतच्या अनुभवांच्या आधारे ते आपला मुद्दा मांडत असतात. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे जो निष्कर्ष निघेल तो स्वीकारायला ते सर्वजण तयार असतात. होमिओपॅथीची बाजू घेणा-या एकाही डॉक्टरने अशा प्रकारच्या वैज्ञानिक तपासणीला ही पॅथी उतरू शकेल असा विश्वास व्यक्त केलेला दिसत नाही. याउलट, 'आमच्या श्रद्धेला तुम्ही हात लावू नका', अशा प्रकारची अवैज्ञानिक भूमिका घेतलेली दिसते.

                                 गीता महाशब्दे, पुणे
________________________________________________________


डॉ. शंतनुराव अभ्यंकरांचा लेख वाचला. सुरुवातीला खूप राग आला. ज्या कॉलेजवर आपण मनापासून प्रेम केलं, ज्या 'होमिओपॅथी'ची गेली १६ वर्षे आराधना केली, त्याचे असे अर्वाच्य शब्दांत काढलेले वाभाडे हे संतापजनकच होते. पण परत एकदा मला त्या दुःखी जिवाची मनापासून कीव आली... असतात अशीही माणसं! पंचपक्वान्नांनी भरलेलं ताट समोर असताना न जेवता उपाशी राहणारी आणि खाल्लं तर न पचता जुलाब होणारी... उपासमार झाली म्हणून कळवळणारी. त्यातलाच प्रकार वाटला आणि राग पळाला... कीव आली. म्हणून मग ठरवलं, की माझाही अनुभव सांगावा. त्याच कॉलेजमधला, त्याच होमिओपॅथी'बद्दल. कारण माझी स्टोरी' पण काही प्रमाणात डॉ. शंतनुरावांना समांतर आहे.
१९८० साली मी बारावी झालो. मनापासून खूप प्रयत्न करून लक्ष्मणराव आपटे या नावाजलेल्या प्रशालेतून १२ वी झालो. डॉक्टर होण्याचंच ध्येय असल्याने पॅरामेडिकलचा अभ्यासक्रम घेतला होता. त्यात औंध चेस्ट हॉस्पिटल, ससून, बी. जे. मध्येच अॅनाटॉमी, फिजिऑलॉजी, पी. एस. एम. पॅथॉलॉजी, नर्सिंग वगैरे विषयांची लेक्चर्स होत. त्यामुळे डॉक्टर होण्याचे जोरदार बाळकडू मिळालेले होते. माझे वडील व आजोबाही डॉक्टर, गावाकडे ५० वर्षं जुना दवाखाना होता आणि तिस-या पिढीत आपण तो चालवायचा, हा निश्चय होता. पण 'केमिस्ट्री'ने घात केला. मेरिटवर एम. बी. बी. एस. ला प्रवेश मिळाला नाही. अमरावती / बेळगावला डोनेशनने प्रवेश मिळत होता. पण वडिलांचा पैसा घालवून डॉक्टर होणं नको, असा निर्णय मी घेतला. मग धोंडूमामा साठे होमिओपॅथी मेडिकलला प्रवेश घेतला. होमिओपॅथी तर होमिओपॅथी (असा अगदी शंतनुरावांसारखा विचार करून). पण त्या कॉलेजमधली साडेपाच वर्षं आणि नंतर तिथल्याच संजीवन हॉस्पिटलमध्ये सी. एम. ओ. म्हणून काम केलेली साडेपाच वर्षं हा ११ वर्षांचा काळ माझ्या जीवनातला सुवर्णकाळ' ठरला. तिथे या अकरा वर्षांत जे काही शिकलो, जे काही मिळवलं, ते मोजता येणार नाही! आज १६ वर्षांच्या प्रेक्टिसनंतरही कॉलेज आणि इंटर्नशिपचे दिवस आठवले की हळवं/स्वप्नवत वाटतं. (आणि याला सुमार दर्जाचे वैद्यकीय ठिकाण, असं शंतनुरावांचं म्हणणं जरा अतीच झालं)
संजीवनमध्ये ओ.पी.डी.ला खूप पेशन्ट्स पाहायला मिळायचे. त्यात आर.बी.कुलकर्णी सर किंवा डॉ. हब्बू,  डॉ.यू.सी.कुलकर्णी सर यांसारखे लोक आजार, निदान-उपचार समजावून सांगायला. मला अजूनही त्यांची लेक्चर्स/वाक्यं जशीच्या तशी आठवतात - २० वर्षांनंतरही.
माझ्या घरात दोन पिढ्या अॅलोपॅथी डॉक्टरांच्या होत्या. माझे आजोबा ग्रँट मेडिकल कॉलेजच्या फर्स्ट बॅचमध्ये एम.बी.बी.एस., पण ते जनरल प्रॅक्टिस करताना खूप वेळा पुस्तकं वाचून होमिओपॅथीची औषधं देत आणि म्हणत, "जुनाट आजारांवर होमिओपॅथीसारखी औषधं नाहीत!"
शिकत असताना शंतनुरावांना पडले तसेच प्रश्न मलाही पडले. पण म्हणून त्याचा तर्कट किंवा थोतांड म्हणून धिक्कार करण्याऐवजी मी खूप चर्चा-वाचन केलं. आणि पटायला लागलं, की यात नक्की तथ्य आहे. अंधश्रद्धा किंवा अवैज्ञानिक असं हे काही नाही. अॅनाटॉमिकली पाहायला गेलं तर जिवंत माणूस आणि मेलेला माणूस यांत फरक काय? त्याचं आणि याचं शरीर तर सारखं आहे, मग एक मेलेला, दुसरा जिवंत का? त्यातला फरक म्हणजे व्हायटल फोर्स, आणि मग या व्हायटल फोर्समध्ये होणारे चढउतार-बदल-इम्बॅलन्स म्हणजे आजार, आणि ते ठीक करायला व्हायटल फोर्सच्या लेव्हलवर काम करणारी औषधं, हे पटायला लागलं.
मॉडर्न मेडिसीन किंवा अॅलोपॅथीतही हेल्थची व्याख्या ' मेंटल, फिजिकल आणि स्पिरिच्युअल वेलबीइंग' अशीच आहे ना? त्यातलं स्पिरिट आणि माइंड या दोन्ही गोष्टी मोजता येतात का? कोणाला १०२ अंश सेल्सिअस डिप्रेशन आल्याचं ऐकलं आहे ? त्यामुळे मोजता न येणारी गोष्ट म्हणजे ती खोटी, असं म्हणणारे तीच चूक करत आहेत, जी पुरातन युरोपियन लोकांनी पृथ्वी गोल आहे आणि ती सूर्याभोवती फिरते, म्हणणा-या वैज्ञानिकाला जाळून केली.
तर सांगण्याचा उद्देश असा की, कॉलेजमध्ये आणि नंतर संजीवनमध्ये भरपूर शिकायला मिळालं. गावाकडे कदाचित होमिओपॅथीला वाव मिळणार नाही म्हणून पुण्यात राहून होमिओ प्रॅक्टिस सुरू केली. बरोबरीने हॉस्पिटल्समध्ये काम करण, डॉ. बापट सरांसारखे तज्ञ (अॅलोपॅथी) किंवा डॉ. हब्बू, डॉ. शिवाजीराव देशमुख (होमिओपॅथ) यांच्याकडे अनुभव मिळवणे चालू ठेवलं. दोन्ही बाजू पूर्ण अभ्यासून 'नो पॅथी इज परफेक्ट', 'नो पॅथी इज कंप्लीट' हा माझा स्वतःचा अनुभव मिळवला. कित्येक आजार फक्त होमिओपॅथीने किंवा अलोपॅथीने किंवा आयुर्वेदाने बरे नाही होत; एकमेकांची मदत लागते. प्रत्येक पार्टीला स्वत:चा स्कोप आणि लिमिटेशन किंवा स्ट्रॉग-वीक पॉइंट्स आहेत, हे मान्य करून आपला रुग्ण, त्याला बरं करणं हे प्राथमिक सर्वोच्च ध्येय... पॅथीची टिमकी बाजूला ठेवून त्या त्या वेळी रुग्णाला कशाची गरज आहे, हा विचार करून प्रॅक्टिस केली. ब-यापैकी यश मिळत गेलं. म्हणून सगळ्याच पॅथीच्या डॉक्टरमंडळींना मला कळवळून सांगावंसं वाटतं, की ही पॅथीयुद्धं थांबवा! एकमेकांवर चिखलफेक करण्यापेक्षा आपल्याकडे येणा-या रुग्णाचा फक्त विचार करू या. एखाद्या होमिओपॅथने असं म्हणायला काय हरकत आहे, की हा रुग्ण अॅलोपॅथीने/आयुर्वेदाने/सर्जरीने चांगला किंवा लवकर बरा होईल किंवा तशी वेळ असल्यास एखाद्या अॅलोपॅथनेही म्हणावं, की ह्याला आता होमिओपॅथी जास्त फायद्याची ठरेल. इंटिग्रेटेड अॅप्रोच ठेवून सगळ्या पॅथीचे डॉक्टर्स आपल्या रुग्णाला बरं करायला, एकमेकांचे स्ट्राँग पॉइंट्स (एकमेकांवर फेकण्यापेक्षा) रुग्णाच्या भल्यासाठी का नाही वापरू शकत? शेवटी डॉक्टर काही पॅथीने लहान किंवा मोठा ठरत नाही. जो आपल्या रुग्णाला लवकरात लवकर आणि कमीत कमी खर्चात पूर्णपणे बरा करतो, तो चांगला डॉक्टर, तेव्हा ही फालतू चिखलफेक न करता एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ' हेच खरं, हेच योग्य!

                              डॉ. योगेश ज. खरे, पुणे



एप्रिलच्या अंकामधील डॉ. अभ्यंकरांच्या लेखावरील प्रतिक्रिया जरा जास्तच तिखट आहेत आणि त्या बहुतांश होमिओपॅथिक डॉक्टरांनी नोंदवल्या आहेत, जे थोडंफार अपेक्षित म्हणता येईल. खरंतर, एखाद्या शाखेविषयी नीट माहिती नसताना त्यावर अधिकारवाणीने लिहिणं केव्हाही चूकच. त्यामुळे मी (आयुर्वेदिक डॉक्टर असल्याने) त्याबद्दल माझं मत देणं बरोबर नाही. तरीही काही मुद्द्यांचा उल्लेख करावासा वाटतो.
डॉ. अभ्यंकरांनी त्यांच्या लेखात वर्णन केलेला स्वत:चा शैक्षणिक प्रवास, बौद्धिक कोंडमारा हा प्रामाणिक वाटतो आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी केलेली धडपडही कौतुकास्पदच आहे. सर्वसाधारणत: ९९% विद्यार्थी १२ वी नंतर एम्.बी.बी.एस्. ला प्रवेश मिळाला नाही म्हणूनच आयुर्वेद/होमिओपॅथीकडे मार्गस्थ होतात. प्रतिक्रिया देणा-या सर्व डॉक्टरांनी याप्रकारे एम्.बी.बी.एस्.चे दरवाजे ठोठावले नव्हते काय, हाही मुद्दा विचारात घेण्याजोगा आहे. पूर्ण साडेपाच वर्षी या स्वरूपाचं शिक्षण अशा वातावरणातील कॉलेजमध्ये घेऊन त्यानंतर राष्ट्रीय स्तरावरील प्रवेशपरीक्षा देऊन एम्.बी.बी.एस्.ला  प्रवेश मिळवणं हे सामान्य बुद्धिमतेचं लक्षण खचितच नाही. माझ्या माहितीनुसार डॉ. अभ्यंकरांनी स्त्रीरोग-प्रसूती शाखेचे पदव्युत्तर शिक्षणही यशस्वीरीत्या पूर्ण केलं आहे. या पार्श्वभूमीवर कर्तृत्वहीन, मानसिक परावलंबी, करंटा इ. शेलक्या विशेषणांनी भरलेल्या प्रतिक्रिया या पूर्णतः अयोग्य वाटतात. डॉ. अभ्यंकरांनी स्वत:च्या लेखामध्ये किमान सुसंस्कृततेची पातळी कुठेही सोडलेली नाही. मग या डॉक्टरांना एवढं थयथयाट करून लिहायचं कारणच काय? मला वाटतं, या संतप्त प्रतिक्रिया होमिओपॅथीच्या उमाळ्यापेक्षा आता आपलं कसं होणार?' या भयगंडातून आलेल्या आहेत; नाहीतर वैयक्तिक दोषारोप इतक्या अश्लाघ्य भाषेत झालेच नसते.
ज्या जर्मनीमध्ये होमिओपॅथीचा उगम झाला, तिथेसुद्धा आपल्यासारखी होमिओपॅथीच पदवीशिक्षण देणारी कोणतीही महाविद्यालयं नाहीत; पण आपल्याकडे शेकडो! सर्व प्रकारच्या वैद्यकीय शिक्षणाचा राजकारण्यांनी आणि धनवंतांनी स्वत:च्या फायद्यासाठी जो धंदा सुरू केला आहे, त्याचंच हे फलित आहे. कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे गावोगावी उगवलेली ही होमिओपॅथिक (आणि आयुर्वेदिकही!) महाविद्यालयं, यामध्ये दिल्या जाणा-या शिक्षणाचा आणि शिक्षकांचा दर्जा काय, हा पीएच.डी.च्या प्रबंधाचा विषय होऊ शकेल. अजून एक गोष्ट. प्रतिक्रियांमध्ये डॉ. गोरे यांच्या पत्रातील अशास्त्रीय गोष्टींच्या यादीतील आयुर्वेदाचा उल्लेख खूप खटकला. सुरुवातीला लिहिल्याप्रमाणे मी स्वतः एम्.डी.(आयुर्वेद) होऊन गेली १५ वर्ष शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतोय. आमच्या शास्त्रातही अनेक गोष्टी सिद्ध करता येत नाहीत. त्याचा त्रास होतोच, पण अशास्त्रीय म्हणण्याइतपत मी आयुर्वेदाला कमी लेखू शकत नाही. याला कारण अर्थातच त्यात वर्णन केलेले विविध सिद्धांत, परीक्षा, लक्षणं असं बरंच काही मी आजच्या शास्त्र कसोट्यांवर तपासू शकतो. आता उडदामाजी काळे-गोरे या न्यायाने आपल्याला पटेल ते घ्यायचं आणि पुढे चालायचं, असा शिरस्ता मी ठेवला आहे. आपण ज्या काळात राहतो, त्या काळानुरूप आपल्याला वागावं आणि बदलावं देखिल लागतं. स्वशास्त्राच्या चौकटीत बसूनसुद्धा आधुनिक वैद्यकशास्त्रातील विविध चाचण्या, तपासण्या इ. चा उपयोग रोगनिदानासाठी आणि पुढे उपचारांसाठी केल्याने आपण बाटलो असं समजण्याचे कारण नाही. उलट, ते अचूक रोगनिदानासाठी आणि उपचारांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतं. औषधांचं प्रमाणीकरण, विविध शास्त्रीय तपासण्यांचे निकष इ. तून आयुर्वेदिक/होमिओपॅथिक औषधं तावूनसुलाखून बाहेर पडणं, ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. इंजिनिअरने आयुर्वेदाची तथाकथित पदवी घेऊन प्रसार करणं किंवा कुठल्यातरी बाबाने आयुर्वेदिक फार्मसी सुरू करून लोकांना भजनी लावणं, हा त्या शास्त्राचा दोष कसा म्हणणार? आपला समाज जो 'शॉर्ट मेमरी' या सदरात मोडतो, त्याचाच हा प्रताप आहे! पण लक्षात कोण घेतो?

                     डॉ. मिलींद साठे, पुणे

...अॅलोपॅथी व होमिओपॅथी दोन्हींचा अभ्यास व अनुभव गाठीशी आहे, त्याबद्दल लिहीत आहे. बडोदा येथील अलेंबिक केमिकल वर्क्स या औषधांच्या कारखान्याच्या संशोधनखात्यात ३३ वर्ष अधिकारीपदावर मी काम केलं. होमिओपॅथी ह्या उपचारपद्धतीबद्दल तरुण वयापासूनच कुतूहल होतं. म्हणून निवृत्त झाल्यावर अलेंबिकमध्ये अर्धवेळ सल्लागार म्हणून काम करत असतानाच होमिओपॅथीचा अभ्यास सुरू केला व 'इंडियन कौन्सिल ऑफ अल्टर्नेटिव्ह मेडिसीन'चा पोस्टल कोर्स पूर्ण करून डिप्लोमा, रजिस्ट्रेशन मिळवून आर.एम.पी. झालो. आता माझं वय त्र्याऐंशी आहे. शारीरिक असल्या तरी बौद्धिक अडचणी काहीही नाहीत. गेली सतरा वर्षं मी रोज काही तास होमिओपॅथ म्हणून प्रॅक्टिस करतो.
माझी शैक्षणिक पार्श्वभूमी अशी: अभ्यासात गती चांगली असल्याने मेडिकलला प्रवेश अगदी सरळच मिळत होता; परंतु औषधांबद्दल संशोधन करणं यातच रुची होती म्हणून बी.एस्सी.(केमिस्ट्री) केलं व मुंबईला नव्याने सुरू झालेल्या यू.डी.सी.टी.च्या बी.एस्सी. टेक-फार्मास्युटिकल्स'साठी प्रवेश घेतला. या दोन वर्षाच्या अवघड अभ्यासक्रमात आम्हाला जी. एस.मेडिकल कॉलेज (लोअर परळ) मध्ये अॅनॉटॉमी व फिजिऑलॉजी व फार्मकॉलॉजीही शिकवण्यात आले. त्याचा आता खूप उपयोग होतो. फायनल परीक्षेत पहिला आल्यामुळे इंग्लंडला जायला स्कॉलरशिप मिळाली व मी नॉटिंगहॅम युनिव्हर्सिटीत एम.फार्म. करण्यासाठी दाखल झालो. तेथील तीन वर्षांमध्ये मी कुतूहलापोटी 'लंडन होमिओपॅथिक हॉस्पिटलमध्ये जात असे व तेथील मंडळी माझ्या सर्व प्रश्नांची नीट उत्तरही देत असत. व्हायटल फोर्स म्हणजे काय, ह्या प्रश्नाचं उत्तर मात्र त्यांनाही देता येत नव्हतं.
इंग्लंडहून एम.फार्म. ए.आर.आय.सी. (असोशिएट ऑफ दि रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ केमिस्ट्री) होऊन परत आल्यावर, वर लिहिल्याप्रमाणे बडोदा इथे 'अलेंबिक'मध्ये काम करत असताना अॅलोपॅथिक फॉर्म्युलेशन्सबरोबरच अडुळसा, हरडे, शेवगा यांवरही काम केलं. बडोदा व मुंबई येथील बरेच अॅलोपॅथिक व होमिओपॅथिक डॉक्टर ओळखीचे होते व काही दुखण्यांवर होमिओपॅथीने उत्तम परिणाम झालेले बघत होतो. उदा., माझ्या पत्नीच्या सर्व्हायकल स्पॉन्ड्युलॉसिससाठी ट्रॅक्शन, फिजिओथेरपी आणि अर्थात त्या काळी अत्यंत प्रचलित असलेल्या नोव्हाल्जिन व रोबिनॅक्स गोळ्या हे सर्व निरुपयोगी ठरल्यावर मुंबईचे त्या वेळचे प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ.धोलकिया यांना दाखवलं. त्यांनी गोळ्या त्याच दिल्या व गळ्याचा पट्टा वापरण्यास सांगितलं, परंतु स्वत:च असंही सांगितलं, की "या दुखण्याला अॅलोपॅथीत औषध नाही, होमिओपॅथीत आहे ते घेऊन बघा." होमिओपॅथीने तिला बरं वाटलं. अशी अनेक उदाहरणं आहेत.
 या शैक्षणिक व व्यावसायिक पाश्र्वभूमीमुळे होमिओपॅथीने उपचार करताना मला खूप फायदा होतो. मात्र मी अॅलोपॅथीची औषधं देत नाही. माझ्या मते ते नीतीला धरून नाही. प्रत्येक पेशंटची केस प्रथम हाती घेताना कमीत कमी अर्धा-पाऊण तास त्याला प्रश्न विचारण्यात व त्याची उत्तरं नीट लक्षपूर्वक ऐकून लिहून ठेवण्याला फार महत्त्व आहे. होमिओपॅथीच्या शास्त्राप्रमाणे वेगवेगळ्या व्यक्तींच्या दुखण्यांची लक्षणे सारखीच वाटली. (उदा., डोकेदुखी, अर्धशिशी) तरी कारणं संपूर्णपणे वेगळी असू शकतात. आजाराचं कारण आनुवंशिक, कौटुंबिक, मानसिक, नोकरीधंद्याचे स्वरूप, आहार इ. च्या वेगळ्या पार्श्वभूमीत असू शकतं व ती लक्षात घेऊन वेगवेगळी औषधं घ्यावी लागतात. प्रत्येक व्यक्तीचा असा सर्व बाजूंनी अभ्यास करणं याला होमिओपॅथीत महत्व आहे. म्हणून मी सरसकट तयार मिळणारी होमिओपॅथीची औषधं न देता, टिंक्चर्सच्या बाटल्या व को-या गोळ्यांच्या पिशव्या व लहान बाटल्या, सर्व विकत आणून रुग्णाच्या गरजा लक्षात घेऊन वेगवेगळ्या, पण मिश्रण करता येतील अशा टिंक्चर्सचं मिश्रण गोळ्यांवर घालून स्वतः औषधं बनवतो. होमिओपॅथिक उपचारांनी चांगला परिणाम झालेल्या माझ्या पेशंट्सचं प्रमाण सुमारे ७०% असेल. मात्र मी कटाक्षाने डायबेटिस, हाय ब्लडप्रेशर इ. सारख्या आजारांवर होमिओ औषधं असूनही ती देत नाही व अॅलोपॅथीचीच औषधं त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायला सांगतो. कारण केवळ लघवी व रक्तातील साखर कमी झाल्याने डायबेटिसचा विकार बरा होत नाही. हाय ब्लडप्रेशर हे लक्षण आहे व त्याचं कारण दुसराच आजार असू शकतो, हे मला माहीत आहे. सध्यातरी होमिओपॅथीत इतकं संशोधन झालेलं नाही, की मूळ आजार बरा झाला आहे का हे समजेल.
शेवटी काही गोष्टी आवर्जून सांगू इच्छितो. एक म्हणजे होमिओपॅथी हे आजमितीस एम्पिरिकल सायन्स' आहे. यात औषधाची मात्रा नगण्य असतानाही ती का लागू पडतात, व्हायटल फोर्स म्हणजे काय, याची उत्तरं मी देऊ शकत नाही. अॅलोपॅथीच्या 'क्लिनिकल मेडिसीन', या जाडजूड ग्रंथातही कित्येक दुखण्यांबाबत कॉज इज नॉट नोन' असं लिहिलेलं आहेच ना? आणि जगात आपल्याला न दिसणा-या, स्पष्टीकरण देता न येणा-या गोष्टी आहेतच, म्हणून त्यांचे अस्तित्वच आपण नाकारू शकतो का? मग होमिओपॅथीच्या औषधांचं स्पष्टीकरण अजून सापडलेले नाही म्हणूनच केवळ ती नाकारणं योग्य आहे का? अनेक अॅलोपॅथिक औषधांसारखे, त्यांचे वाईट साईड इफेक्ट्स' तर होत नाहीतच ना? आज जगात अनेक ठिकाणी या औषधांवर संशोधन चालू आहे. कधीतरी उत्तर मिळेलही.
मी तर नाहीच, पण इतरही अनेक प्रामाणिक होमिओपॅथ्स स्टिरॉइड्स किंवा अँटिबायोटिक्स् वापरत नाहीत. काही होमिओपॅथ्स व आयुर्वेदाचार्य ही वैद्यकीय नीती पाळत नाहीत. हा अपराध त्यांचा आहे, त्या शास्त्राचा नाही. बरेच महिने स्टिरॉइड्स दिली गेल्यावर जे दुष्परिणाम होतात, तसे होमिओपॅथी घेणाऱ्यांमध्ये बघितले आहेत का?  डब्ल्यू.एच.ओ.सारख्या संस्थेनेही होमिओपॅथीचा एक वेगळी उपचारपद्धती म्हणून स्वीकार केला आहे. 'प्लासीबोव होमिओपॅथीचं औषध ही दोन रुग्णांवर एकाच वेळी वापरून हे सिद्ध केलं गेलं आहे, की होमिओपॅथीच्या गोळ्या 'प्लासीबो' नसतात. ही औषधे प्लासीबो' असती तर तान्ही मुलं, जनावरं यांना उपयोगी ठरली असती का?
 वेगवेगळी तीन हजारांहून जास्त झाडं, धातू, वाळू इ. अनेक वस्तूंपासून ही औषध बनवली जातात. औषध टिकाऊ होण्यासाठी व त्यामुळे औषधांचा परिणाम कमी होत नाही म्हणून अल्कोहोल (किंवा कधी डिस्टिल्ड वॉटरही) वापरलं जातं. अल्कोहोल इतक्या अल्प प्रमाणात रुग्णाच्या पोटात जातं, की त्याचा काहीही दुष्परिणाम होणं शक्य नाही.
पुण्याच्या टिळक रोडच्या सुरुवातीलाच स्व. वाय. व्ही. फाटक नावाचे अत्यंत हुशार, नामांकित, गायनॉकॉलॉजिस्ट यांचं हॉस्पिटल होतं, हे अनेकांना आठवत असेल. अनेक वर्ष प्रॅक्टिस केल्यावर त्यांनी हो त्यांनी हो होमिओपॅथीचा अभ्यास केला व हॉस्पिटल बंद करून ते होमिओपॅथीची प्रॅक्टिस. ते इतके उत्तम होमिओपॅथ झाले की पेशंट्सची अफाट गर्दी होत असे. पैसे मिळवण्याची हाव व गरज अजिबात नसताना होमिओपॅथीचे उपचार करून त्यांनी असंख्य लोकांना आराम मिळवून दिला, तो मुळात त्यांना ही उपचारपद्धती पटली म्हणूनच ना?
तेंव्हा कोणत्याही पॅथी' बद्दल पूर्वग्रह न बाळगता, दुराग्रह न धरता, नावं न ठेवता ‘होलिस्टिक अॅप्रोच' ठेवून कामये प्राणिमात्रानाम् आर्तिनाम् दुःखनाशनम्' अशी वृत्ती ठेवण जास्त चांगलं वाटत नाही का?

                                डॉ. जयंत नरवणे, पुणे


होमिओपॅथ ते अॅलोपॅथ' हा एक सुंदर लेख आणि त्यातला खडतर प्रवास प्रचंड आवडला. काही लोकांची मानसिकता विचित्र असते की, आपल्याला आलेले अनुभव, ज्ञान ते होणाला कळू देत नाहीत. पण लेखकाने त्याच्या साहसाचे कथन अगदी प्रामाणिकपणे मांडलं आहे. हा लेख म्हणजे वाट चुकलेल्यांना मार्गदर्शक ठरेल. चिकाटी, जिद्द, साहस हे गुण असले म्हणजे आपल्याला आपलं ध्येय गाठता येतं, हे लेखकानं दाखवून दिलेलं आहे.

                                       नंदिनी पवार

________________________________________________________

...हा लेख लिहिण्याचे प्रयोजन समजू शकलं नाही. काही लोकांच्या बाबतीत एखादा अभ्यासक्रम नाइलाजास्तव अथवा घरच्यांच्या अट्टाहासाने करावा लागतो. ती व्यक्ती तो अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर त्या अनुषंगाने नोकरी अथवा व्यवसाय करते. यातलं यश हे त्या व्यक्तीवर पूर्णतः अवलंबून आहे. डॉ. अभ्यंकरांनी होमिओपॅथीवर इतका तीव्रतेने प्रहार केलेला प्रथमच वाचत आहे. सध्या तिन्ही पॅथी आपापल्या क्षेत्रात प्रगत आहेत व अत्याधुनिक उपकरणं वापरून रोगी बरे करीत आहेत. माझ्या वाचनात आलं की, लोकमान्य टिळक स्वत: व त्यांचे कुटुंबीय होमिओपॅथी उपचार घेत असत. त्यांच्यासारख्या बुद्धिमान व्यक्तीस होमिओचे सकारात्मक अनुभव आले असतील. माझे नोकरीच्या निमित्ताने कोलकत्यास वीस वर्षं वास्तव्य होतं. नुकताच विवाहबद्ध झालो होतो. कलकत्यात होमिओचं प्राबल्य इतर ठिकाणांपेक्षा अधिक आहे. माझी मुलं लहानाची मोठी केवळ होमिओच्या औषधांनी झाली. आजार लहानसहान असतील तर गुण येत असे. जेथून पुड्या अगर गोळ्या घ्यायचो, तेथे नेहमी गर्दी असायची. पिठीसाखरेत रामबाण औषध ती व्यक्ती आलेल्या रोग्यांना द्यायची. माझ्या वडिलांना त्यांचे औषधोपचार महाराष्ट्रात परतल्यावरही चालू होते. औषधाचा गुण आल्याशिवाय एवढी गर्दी असणार नाही. होमिओपॅथीचा कोर्स व डॉ. अभ्यंकरांना आलेले अनुभव अनाकलनीय आहेत.
होमिओची औषधं स्वस्त व सामान्य गरीब रोग्यास परवडणारी आहेत. माझे चुलते पुण्याहून एम.बी.बी.एस. झाले. त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली. मूळची आध्यात्मिक वृत्ती असल्यामुळे त्यांनी आयुर्वेद/होमिओचा अभ्यास करून रोग्यांना स्वस्तातील औषधं दिली. अॅलोपॅथीची प्रॅक्टिस केली असती तर त्या काळी अमाप माया साठविली असती; पण ते जनसेवेच्या ध्येयाने प्रेरित होऊन सर्वकाही करीत होते.
सेवानिवृत्तीनंतर पुण्यात स्थायिक झाल्यावर आम्ही होमिओपॅथिक फॅमिली डॉक्टर’ निवड केली. अजूनही वेळोवेळी योग्य ते औषधोपचार घेतो. हे खरं, की आयुर्वेद/होमिओ डॉक्टर रोग्यांच्या आपत्काली अॅलोपॅथीचा आश्रय घेतात. तीन वर्षांपूर्वी माझ्या पत्नीस रात्री ८ वाजता छातीत दुखायला लागलं. आमची होमिओ डॉक्टर त्वरित घरी आली व पत्नीची अवस्था पाहून आमच्यासमोर जवळच्या हॉस्पिटलला दूरध्वनी करून तिने पेशंटला घेऊन अॅडमिट केलं. हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत होमिओच्या गोळ्या चघळावयास दिल्या. पत्नीची अँजिओग्राफी/अँजिओप्लास्टी यशस्वीरीत्या पार पडली. योग्य निदान व तत्परता आमच्या फॅमिली डॉक्टरने दाखवल्याचे श्रेय त्यांना जातं. डॉ. अभ्यंकरांना त्या वेळी होमिओ कोर्सबद्दल आलेला तिटकारा उचित नाही, असंच मी म्हणेन.
           रत्नाकर धनेश्वर, पुणे
 ________________________________________________________

...हा लेख म्हणजे होमिओपॅथीची एकही दिवस प्रॅक्टिस न केलेल्या पूर्वाश्रमीच्या होमिओपॅथने व आताच्या अॅलोपॅथने होमिओपॅथीच्या अस्तित्वाविषयी पूर्वग्रहदूषित वृत्तीने केलेलं एकांगी लिखाण आहे. कोणतीही चिकित्सापद्धती असो, नुसत्या पुस्तकी ज्ञानावर तिच्याविषयी मतप्रदर्शन न करता काही वर्ष तरी रुग्णांवरील चिकित्सेचा अनुभव घेऊन मतप्रदर्शन करणं योग्य. किंबहुना, अशा वैद्यक व्यावसायिकासच तो अधिकार आहे, असं मला वाटतं.
लेखकाचे दोन आक्षेप म्हणजे, एक- रुग्ण हा होमिओपॅथिक औषधानं बरा होत नाही, तर तो आपोआपच बरा होतो' व दुसरा- 'वर्षानुवर्षं तीच तत्त्वं ही अंतिम, अचल आहेत. त्यात नवीन संशोधन काहीही होत नाही. पहिल्या आक्षेपाबद्दल लिहायचं झालं, तर मानसिक पातळीवर आढळणारे आजार हे बऱ्याचदा प्लॅसिबो थेरपीने (औषधी द्रव्य नसलेल्या गोळ्या) बरे केले जातात. किंबहुना, अॅलोपॅथीमध्येदेखील असे प्रयोग केले जातात. परंतु होमिओपॅथिक औषधाने बरे होणारे सर्वच विकार हे प्लॅसिबो थेरपीचा परिणाम आहेत, असं म्हणणं हास्यास्पद नव्हे तर धाडसाचंदेखील आहे. कारण मुतखडा, संधिवात, अनेक जीर्ण त्वचारोग, स्त्रियांचे मासिक पाळीसंबंधीचे अनेक विकार, मूळव्याध व मुलांचे अनेक विकार हे प्लॅसिबो थेरपीने बरं होणं शक्य आहे का ? तसं शक्य असतं तर 'प्लॅसिबोपॅथी' ही अजून एक पॅथी अस्तित्वात आली असती.
 आता दुस-या आक्षेपाबद्दल थोडंसं. डॉ. सॅम्युएल हॅनिमान व त्याच्यानंतरचे इतर अनेक शास्त्रज्ञ बोरिक, केंट यांनादेखील ही तत्त्वं, नियम बदलण्याची गरज पडली नाही. कारण होमिओपॅथीची तत्त्वं व नियम अॅलोपॅथीप्रमाणे दर ५-१० वर्षांनी बदलत नाहीत. अॅलोपॅथीमध्ये रोज नवनवीन संशोधन होत असतं व पुस्तकाची संपूर्ण नवीन आवृत्ती’ प्रकाशित होत असते,  हे लेखकांचं मत जरी खरं असलं, तरी त्या नवीन आवृत्तीमध्ये हेच सांगितलेलं असतं, की ५-१० वर्षांपूर्वी आपण नवीन शोधून काढलेलं औषध आता रुग्णाला देऊ नका. आता ते कुचकामी ठरलं आहे. त्याने पेशंटचं लिव्हर खराब होतं, किडनी बाद होते. (म्हणजे गेली १० वर्ष ते घातक औषध सर्व अॅलोपॅथ्सनी बिनदिक्कत क्विंटलच्या हिशोबाने लाखो रुग्णांना खायला दिलं होतं व आता ते खराब आहे, घातक आहे, अशी उपरती संपूर्ण नवीन संशोधनाने झाली होती.) गंमत म्हणजे अमेरिका, इंग्लंड वगैरे ठिकाणी ते दहा वर्षांपूर्वीच बंद झालेलं असतं; पण अॅलोपॅथीप्रेमी मायबाप सरकार बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हितासाठी पेशंटच्या जिवाची पर्वा न करता ते भारतात खपवत आहे व आपले विज्ञाननिष्ठ, बुद्धिप्रामाण्यवादी अॅलोपॅथ्स ते रुग्णाच्या माथी (पोटीच म्हणा ना!) मारत आहेत. याचं ताजं उदाहरण म्हणजे नाइस (निमेसूलाइड) हे ताप, अंगदखी, डोकेदुखीवरील औषध १०-१२ वर्षांपूर्वीच इतर प्रगत देशांमध्ये बंद केलं आहे. परंतु आपल्या देशात ते सरसकट केमिस्टकडे उपलब्ध आहे.
प्रत्येक शास्त्राला मर्यादा आहेत व कोणतंही शास्त्र परिपूर्ण नसतं. सर्वांत महत्त्वाचा रुग्ण, नंतर पॅथी व नंतर आपण डॉक्टर, हे समीकरण ध्यानात ठेवलं व इतर पॅथींवर अकारण चिखलफेक करण्यापेक्षा रुग्णाचं हित कशात आहे हे ठरवून उपचार दिले, तर ते रुग्णाच्या व्यापक हिताच्या दृष्टीने नक्कीच योग्य ठरेल, असं मला वाटतं.

                                           डॉ. संजय सावंत, बारामती
________________________________________________________


होमिओपॅथ ते अॅलोपॅथ' असा लेख लिहिण्यास धारिष्ट्य लागतं. लेख पारदर्शक आहे त्याबद्दल अभिनंदन!
 विज्ञानातील काव्य आणि नाट्य तर लेखकाला समजलं आहेच. विज्ञानातील 'विज्ञान'ही समजल्याची चिन्हं या लेखात दिसतात. अॅलोपॅथी हा शब्द कालबाह्य झाला आहे. आजचं वैद्यकीय विज्ञान हे संशोधनाच्या पुराव्यावर आधारित वैद्यकीय विज्ञान आहे. ललित अंगाने जाणारी तुमची शैली वाचनीय आहे. तुमच्या हातून आणखी लेखन व्हावं हीच शुभेच्छा!
                    डॉ. आनंद जोशी, बोरिवली (प.) मुंबई


डॉ. हॅनिमान हे होमिओपॅथीचे जनक. त्यांनी १९ व्या शतकात अॅलोपॅथ ते होमिओपॅथ असा प्रवास केला होता. त्याच्या उलट मार्गाने केलेल्या डॉ. अभ्यंकरांच्या प्रवासाने मनात आलेले विचार मांडत आहे.
मी डॉक्टर नाही, पण आयुष्याच्या वाटचालीत मला स्वत:साठी वा कुटुंबीयांसाठी डॉक्टरांकडे जरूर जावं लागलं आहे. त्या निमित्ताने १९६७ साली होमिओपॅथीशी पहिली ओळख झाली. जून १९६७ ला गाझियाबाद इथे नोकरीला लागलो. उन्हाळा जोरावर होता. माझ्या डाव्याहातावर कोपरापासून मनगटापर्यंत खूप पुरळ उठलं. अतिशय असह्य अशी खाज सुटत होती. मी स्वतः कुठल्याच डॉक्टरांना ओळखत नव्हतो. माझ्या कारखान्यातील एक सहकारी मला डॉ. महेशचंद्रांकडे घेऊन गेला. माझ्याशी बोलता बोलता त्यांनी एका पुडीत काही गोळ्या ठेवून मला खायला सांगितल्या. बस, तेवढंच औषध. मी घरी आलो. मनात गोड गोळ्यांबद्दल शंका घेऊनच झोपलो. सकाळी उठलो तर खाज थांबलेली होती आणि पुरळ नव्हतं. त्या जागेवरून हात फिरवला तर पांढऱ्या रंगाची त्वचेची सालं गळून पडली. पुन्हा म्हणून तसा त्रास झाला नाही. डॉ. महेशचंद्र तिथले प्रसिद्ध होमिओपॅथ होते. (आता ते हयात नाहीत.) गाझियाबादमधील वास्तव्यात कधीही त्यांच्याशिवाय इतरांचं औषध घेण्याची गरज पडली नाही.
१९७९ साली दिल्लीत राहायला लागलो. माझी मुलगी सात वर्षांची होती आणि मुलगा चार वर्षांचा. थंडीत घसा सुजून ताप येऊन दोघं आजारी पडत. शेजारी डॉ. सैनिक होते - अॅलोपॅथ. त्यांच्याकडून औषधं घेत होतो. लागोपाठ दोन-तीन वर्षं हा त्रास झाल्यावर त्यांनी टॉन्सिल्सचे ऑपरेशन करून घेण्याचा सल्ला दिला. उन्हाळ्यात पुण्याला तपासणी केली तेव्हा मुलीचे ऑपरेशन झालं. मुलाच वय आठ पूर्ण नसल्याने त्याला वर्षभर थांबण्यास सांगितलं. सहज म्हणून मी डॉ. महेशचंद्राकडे गेलो, तेव्हा त्यांनी वर्षभर बायोकेमिक कॉम्बिनेशन नं. १० नियमित घेण्यास सांगितलं. मी स्वत: ते न चुकता वर्षभर दिलं. वर्षभराने पुण्यातल्या डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी टॉन्सिल्स बऱ्या झाल्याने ऑपरेशनची गरज नसल्याचं सांगितलं. आजतागायत त्याला तो त्रास झालेला नाही.
१९९५ साली पुण्यात आलो. २००२ साली पत्नीस गुडघ्याचा त्रास सुरू झाला. पुण्यात जुनी ओळख असलेले अॅलोपॅथ होते. त्यांनी गोळ्या दिल्या, पण त्रास कमी होईना. आम्हाला होमिओपॅथीचा चांगला अनुभव आलेला असल्याने तो उपचार करून बघायचं ठरवलं. व्यक्तिश: कुठल्याच होमिओपॅथला आम्ही ओळखत नव्हतो. त्यामुळे धोंडूमामा साठे कॉलेजला जोडून असलेल्या 'ओ.पी.डी.’त गेलो. आम्ही कुणालाही ओळखत नसल्याने तिथल्या तीन होमिओपॅथमधून विशिष्ट डॉक्टरांची निवड शक्य नव्हती. काउंटरवरच्या मुलीने डॉ. निखिला भागवत (एम.डी.) यांच्याकडे पाठवलं. त्यांनी औषध सुरू केलं. वेळ लागणार हे सांगितलं होतंच. एक्स-रे झाला. त्यावरून ऑस्टिओ आर्थ्रायटिस हे निदान झालं. नेहमीचं चालणं, जिना चढणं बंद करायचं नाही, काठी घ्यायची नाही, हा सल्ला दिला. तीन-चार महिने झाले, फरक नाही. जीव रडकुंडीला आला होता. मुलगी पुण्यातच असते. तिच्या आग्रहास्तव ऑर्थोपेडिक सर्जनला भेटलो. पुन्हा ऑस्टिओ आर्थ्रायटिस हेच निदान झालं. डॉक्टर म्हणाले, या आजारावर उपाय नसल्याने पेनकिलर जवळ ठेवायची आणि असह्य दुखल्यास घ्यायची.
होमिओपॅथीचं औषध बंद केलं नव्हतंच. एकानंतर एक असं दोन्ही गुडघ्यांचं दुखणं सहन करावं लागलं. त्या काळात उभं राहणंदेखील कष्टाचं वाटे; चालणं दूरच. अडीच-तीन वर्ष औषध घेतलं. एक पाय बरा झाल्यावर दुसरा दुखायला लागला होता, तेव्हा बरं होण्याची खात्री होतीच, नंतर त्रास गेला. औषध बंद झालं. अजूनपर्यंत तरी त्रास पुन्हा झालेला नाही.
वरील अनुभव हे माझे स्वत:चे आहेत. ऐकीव नाहीत. उत्तर हिंदुस्थानात होमिओपॅथला चांगला मान आहे आणि होमिओपॅथीने बरे झालेले रुग्णही खूप असतात. दिल्लीचे प्रसिद्ध होमिओपॅथ जुगल किशोर यांच्या दवाखान्यात सुशिक्षित आणि प्रतिष्ठित व्यक्तींचीही रांग लागलेली असे, ती अकारण नव्हतीच, होमिओपॅथीचे उपचार घेऊन बरं झालेल्यांची संख्या नगण्य नक्कीच नसावी. कोणत्याही पॅथीचा सगळ्याच आजारांवर उपाय असल्याचा दावा नसतो. अॅलोपॅथीत ऑस्टिओ आर्थ्रायटिसला उपाय नाही, हे जसं ऑर्थोपेडिक सर्जनने सांगितलं, तसंच होमिओपॅथीत उच्च रक्तदाबावर उपाय नसल्याने अॅलोपॅथीकडे जाण्याचा सल्ला होमिओपॅथीने दिला आहे. पॅथी कोणतीही असली तरी डॉक्टर चांगला आणि प्रामाणिक असणं जास्त महत्त्वाचं नाही का?
 होमिओपॅथी उद्याचं शास्त्र आहे, असं म्हणत असतील तर त्यात तथ्य आहे. महागड्या औषधोपचारांच्या जमान्यात गरिबांना परवडेल अशी ही एकच उपचारपद्धती दिसते. जाणकारांनी मार्गदर्शन केल्यास त्याचं स्वागत आहे.                                                                      
                               चंद्रशेखर पटवर्धन, पुणे
________________________________________________________



होमिओपॅथीबद्दल मला बरीच उत्सुकता होती; कारण माझ्या यजमानांना  होमिओपॅथीबद्दल बरीच सहानुभूती होती. त्यांनी बराच काळ त्याचा सखोल अभ्यास केला होता त्यानुसार ते काही देखू खुपू लागलं की लगेचच त्या औषधाचे सेवन करत असत. बराच काळ मीपण अनेकदा त्यांनी सांगितलं की औषध घेत असे. पण हा लेख वाचल्यावर माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. अगदी भ्रमनिरास झाला. कारण एकतर हा लेख एका अशा डॉक्टरने लिहिलेला आहे की ज्याने होमिओपॅथीचा अभ्यास करून पदवी मिळवली आहे.
आय.सी.आर.च्या परीक्षेविषयी लेखकाला जो अनुभव आला आहे, तो वाचताना मन अगदी विषण्ण होऊन गेलं. चक्क त्यांना वेडं ठरवण्यात आलं होतं. कारण त्यांनी स्पष्टपणे आपली मांडून होमिओपॅथीवरचा अविश्वास व्यक्त केला होता.
लेखकाला होमिओपॅथीचा शास्त्रग्रंथ न वाटता तो एक धर्मग्रंथच वाटतो. याउलट सर्जरी लव्ह अँड बेलीचं पुस्तक, डेव्हिडसनचे मेडिसिन वगैरे, अॅलोपॅथीची पुस्तकं दोन वर्षात संपूर्ण नवी आवृत्ती मिरवत यायची आणि लेखकाला अशा विज्ञानापासून आपण वंचित आहोत, असे जाणवायचं. होमिओ औषध कारखान्यात यंत्रांनी औषधं बनवली जातात. मग त्यांच्यात शक्ती कुठून येते? या प्रश्नाला उत्तर नाही. औषधासाठी व्हेइकल वापरावं, असं त्यांचं म्हणणं, इथिल अल्कोहोल म्हणजे चक्क दारू, व्हेइकल म्हणून ते सर्रास वापरलं जातं. दारूचा शरीरावर थेट परिणाम होतो की नाही ? या प्रश्नालाही त्यांच्याकडे उत्तर नाही. दारूचे काय परिणाम होतात हे मात्र आपणा सर्वांना माहिती आहे आणि तरीही अल्कोहोल वापरणं हे बरोबर आणि अपरिवर्तनीय आहे, असा होमिओवाल्यांचा दुराग्रह असतो. म्हणजे लेखात म्हटल्याप्रमाणे होमिओपॅथीचं जे शास्त्र शिकवल जातं, तेच मुळी भुसभुशीत व पायारहित आहे.
माझे यजमान होमिओपॅथीचे अतिशय भोक्ते होते. त्यांचा होमिओपॅथीवर अत्यंत विश्वास होता. अगदी त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या वेळीही होमिओपॅथीवरच त्यांनी विश्वास ठेवला होता. लिव्हर सिन्हॉसिसने ते गेले. खरंतर, त्यांना कसलंही व्यसन नव्हतं. दारूला तर त्यांनी कधी स्पर्शही केला नव्हता. मध्यंतरी माझ्या जावयांनी मला इंटरनेटवर लिव्हर सिन्हॉसिसवरचा लेख दाखवला. त्यात बरीच लक्षणं तंतोतंत जुळण्यासारखी होती. पण एक वाक्य त्यात असं होतं, की कुठलेही औषध वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात घेतलं गेलं तर तो माणूस प्राणालाही मुकु शकतो. ते वाचल्यावर मला वाटलं, की आयुष्यभर होमिओपॅथीवर अवाजवी विश्वास ठेवून तर माझ्या यजमानांचा अंत झाला नसेल ?
                                कुमुदिनी प्रभू, चिंचवड


.....डॉ.शंतनू अभ्यंकर यांचा भ्रमनिरास हा त्यांचा वैयक्तिक अनुभव आहे, तो सार्वत्रिक  नाही. शास्त्राची कसोटी लावूनच शास्त्राची उच्चनीचता ठरवायला हवी. अॅलोपॅथीला उच्च ठरवताना त्यांचे वर्तन होमिओवाल्यांसारखंच झालं आहे. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी वेदांना व त्यातील प्रमेयांना कठोर टीकेचे धनी व्हावं लागलं, त्यातील हा प्रकार वाटतो. आपण दुसरी बाजू प्रसिद्ध केली तर अधिक छान होईल. असो...
                                     प्रमोद तेंबे, पुणे



...हा लेख वाचकांची चांगलीच दिशाभूल करणारा आहे. लेखकाची द्विधावस्था ही अतिशय केविलवाणी वाटते. वास्तवाचं भान सुटलं व अतिशयोक्तीचा हव्यास वाढला की लेखक कसे वाहवत जातात, याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉ. शंतनू अभ्यंकर यांचा हा भयंकर लेख. वाचकांची अभिरुची लक्षात घेऊन अर्थपूर्ण असेच लेख अंकात छापण्याचं अवधान संपादकांनी बाळगावं, एवढीच वाचक या नात्याने विनंती.
                  केशव कुलकर्णी, मुरुम, जि. उस्मानाबाद


मी स्वतः मिश्र वैद्यकाचा पदवीधर आहे. मला असं वाटतं, की 'व्हायटल फोर्स' या होमिओपॅथीतील मूलभूत संकल्पनेला अभ्यंकरांचा आक्षेप आहे. ते लिहितात, 'हा फोर्स इंद्रियगोचर नाही. तो मोजता येत नाही, दिसत नाही, स्पर्शता येत नाही, ऐकू येत नाही, वास घेता येत नाही, त्याला चव नाही; मात्र तो असतो. हा फोर्स डॉ. हॅनिमान यांना कसा कळला ?' पण लेखकाचं हे वाक्य अॅलोपॅथीमधील प्रमुख शाखा मानसोपचार पद्धती व फिजिओथेरपीलाही तंतोतंत लागू पडतं.
माणसाचं मन हेही इंद्रियगोचर नाही. त्याचा वास येत नाही, त्याला स्पर्श करता येत नाही, ते दिसत नाही, मोजता येत नाही, म्हणून मग मनोरुग्णांवर उपचार करणारी औषधोपचार पद्धतीही मोडीत काढणार का? सगळे मानसोपचारतज्ज्ञ हे वेड्यांपेक्षाही वेडे असं म्हणणार का? गणितासारख्या मूलभूत शास्त्रामध्येसुद्धा उत्तर सापडत नसेल तर 'क्ष' हा अध्याहृत मानून उत्तर शोधावं लागतं, ते कोणीही वैज्ञानिक गैर मानत नाही, मग अशाच प्रकारे 'थर्ड फोर्स’ अध्याहृत मानून रोग्यांवर उपचार करणारी, अनुभवाच्या कसावर व २०० वर्षे काळाच्या काट्यावर उतरणारी उपचारपद्धती जर असेल व तीही सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यात वाईट वाटण्याचं कारण काय?
                 डॉ. विजयकुमार शिंत्रे, महाड, जि. रायगड


मी पुण्याच्या प्रयोग हॉस्पिटलमधल्या पॅथॉलॉजी या विभागाची प्रमुख, अतीव दक्षताशास्त्रतज्ञ डॉ. शिरीष प्रयाग हे माझे पती, मी 'अनुभव' मासिकातील होमिओपॅथ ते अॅलोपथ' हा लेख वाचला, तो फार फार आवडला. नुसता आशयच नाही, तर डॉ. शंतनू अभ्यंकर यांच्या लेखनशैलीचंही जिद्दीइतकंच कौतुक मला करावंसं वाटतं, होमिओपॅथी या अशास्त्रीय आणि हास्यास्पद औषधोपचार पद्धतीवर एवढं परखड लेखन कुठे वाचलं नव्हतं, डॉ. अभ्यंकरांना दोन्ही शाखांचा अनुभव असल्यामुळे या लेखनास विशेष महत्त्व आहे. या लेखास 'अनुभव' मासिकापलीकडे जाऊन आणखी प्रसिद्धी मिळाली पाहिजे, असं मला वाटतं. पण अशास्त्रीय आणि सवंग वैद्यकीय व्यवसाय करणा-या व्यक्तींना प्रसिद्धी देणारी माध्यमं या लेखनाला योग्य स्थान देतील, याची मला तरी खात्री नाही. असो.
                                डॉ. आरती प्रयाग, पुणे
________________________________________________________



'होमिओपॅथ ते अॅलोपॅथ' हा प्रचारकी लेख व त्यावर अपरिहार्यपणे येणा-या अस्वस्थ, कडवट प्रतिक्रिया वाचल्या, वाचक म्हणून मला 'अनुभव'ने आपली पानं अशी फुकट घालवू नयेत, असं वाटतं. याला कारणं चार :
१) हा लेख यापूर्वी दुस-या मासिकात प्रसिद्ध झाला आहे व त्यावर अशाच प्रतिक्रिया पण प्रसिद्धझाल्या आहेत, २) एखादा अभ्यासक्रम आपल्याला आवडला ( वा जमला ) नाही, तर तो वाईट म्हणून सांगत हिंडणं बरं नव्हे, 3) होमिओपॅथीला आज इंग्लंड, जर्मनी अशा अनेक देशांत मान्यता आहे. ती भारतीय समाजाला हानिकारक असं वाटत असलं तर लेखकाने त्याविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात जनहितयाचिका दाखल करून आपलं सांगणं पटवून द्यावं, ४) हा लेख म्हणजे ' कोलगेट टूथपेस्ट' बनवणा-यांनी ( वा विकणा-यांनी ) आपला धंदा वाढावा म्हणून 'डाबर दंतमंजन' हानिकारक असं सांगत हिंडावं, अशा प्रकारचा आहे. आपला व आपल्या बिरादरीमधील लोकांचा 'धंदा' वाढावा म्हणून प्रयत्न करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. मात्र त्यासाठी आपल्या स्पर्धकांच्या विरुद्ध लेख लिहिण्याचा व्यवसाय त्यांनी करू नये.
                          दत्तप्रसाद दाभोळकर, सातारा
________________________________________________________


डॉ. शंतनू अभ्यंकर यांचा ' होमिओपॅथ ते अॅलोपॅथ' हा एप्रिल २००९ मध्ये प्रकाशित झालेला उत्तम लेख वाचला व मे २००९ मध्ये त्यावरच्या प्रतिक्रिया वाचल्या. या संदर्भात वैद्यकीय वैज्ञानिक विचार-
१८ व्या शतकाच्या उत्तरार्धात 'अॅलोपॅथी' ही एक उपचारपद्धती होती. पुढे जसा विज्ञानाचा विकास झाला, तशी अॅलोपॅथी बंद झाली आणि आधुनिक वैद्यकीय उपचारपद्धतीने विज्ञानाची कास धरली, वैज्ञानिक विचारपद्धती अनुसरली. आधुनिक वैद्यकीय विज्ञान - 'सायन्स ऑफ मेडिसीन' या विज्ञानाच्या शाखेची सुरुवात झाली. अॅलोपॅथी हा शब्द व संकल्पना केव्हाच कालबाह्य झाली आहे. तेव्हा, एम.बी.बी.एस. व नंतरचं पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्यांनी हा शब्द कटाक्षाने टाळला पाहिजे. चुकीचे शब्द चुकीच्या संकल्पना पसरवतात.
'हॅरिसन्स टेक्स्ट बुक ऑफ मेडिसीन' ची १७ वी आवृत्ती दोन खंडांत प्रकाशित झाली आहे. या प्रमाणित पुस्तकाच्या अरेबिक, चायनीज लाँगफॉर्म, चायनीज शॉर्टफॉर्म, क्रोअॅशियन, फ्रेंच, जर्मन, ग्रीक, इटालियन, जॅपनीज, कोरियन, पोलिश, पोर्तुगीज, रोमानियम, सर्बियन, स्पॅनिश, टर्किश, व्हिएतनामीज या भाषांमध्ये आवृत्त्या निघाल्या आहेत. हा ग्रंथ जगन्मान्य आहे. यात 'कॉम्प्लिमेंटरी अँड अल्टरनेटिव मेडिसीन' असं एक प्रकरण आहे. वैद्यकीय विज्ञान या पॅथीज' ना पूरक व पर्यायी वैद्यक असं नाव देते, अभ्यासकाच्या दृष्टीने या पॅथीजकडे बघते; पण त्यांचा वैद्यकीय विज्ञानात समावेश करत नाही. होमिओपॅथिक मेडिसीनबद्दल या प्रकरणात माहिती दिली आहे. जो द्रव नॉर्मल माणसाला दिला असता जी लक्षणं निर्माण करतो, तोच द्रव अतिसूक्ष्म प्रमाणात अशीच लक्षणं झाल्यास रुग्णास दिल्यास त्याची ती लक्षणं दूर होतात, या 'डॉक्ट्रिन ऑफ सिमिलर्स'वर ही पॅथी उभारलेली आहे. एखाद्या विषारी झाडाचा स्पर्श झाल्यामुळे जर अंगावर फोड येऊन खाज येऊन रॅश येत असेल, तर अंगावर फोड येणाऱ्या, रॅश येणाऱ्या कोणत्याही रोगात हेच विष किंवा हाच द्रव ‘हायली डायल्यटेड' स्वरूपात दिला तर ती लक्षणं जातात व रोग बरा होतो असा विचार होमिओपॅथीत आहे. पण 'अॅव्हागॅड्रॉज नंबर'पेक्षा, सोप्या भाषेत, कमाल मर्यादेपेक्षा जास्त डायल्युशन, १०२३ फोल्ड इतकं डायल्युशन असलेलं औषध, जैविक प्रभाव (बायोलॉजिकल इफेक्ट्स्) कसा निर्माण करेल? या डायल्युटेड औषधी प्रभावाचं म्हणजेच कार्याचं रॅशनल मेकॅनिझम कोणतं? वैद्यकीय विज्ञानाला याचं कोणतंही उत्तर, स्पष्टीकरण सापडलं नाही, तसंच प्रयोगाने सिद्धही करता आलं नाही. म्हणून वैद्यकीय विज्ञान होमिओपॅथीला विज्ञानाची शाखा मानत नाही. आज अमेरिकेत फक्त तीन राज्यांत होमिओपॅथी प्रॅक्टिस करण्याचं लायसेन्स मिळतं. ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्समध्ये होमिओपॅथीची प्रॅक्टिस करता येते. भारतात होमिओपॅथीचा सर्वात जास्त वापर केला जातो, अशी माहिती हॅरिसन्सच्या ग्रंथात दिली आहे.
आजचं वैद्यकीय विज्ञान (सायन्स ऑफ मेडिसीन) हे संशोधनातील पुराव्यावर आधारित विज्ञान आहे (एव्हिडन्स बेस्ड मेडिसीन). प्रॅक्टिस ऑफ मेडिसीन ही या विज्ञानावर आधारित आर्ट ऑफ मेडिसीन आहे. तांत्रिक कौशल्य, वैद्यकीय विज्ञानाचे सखोल ज्ञान आणि मानवी म्हणजे रुग्णांचं आकलन, हा आर्ट ऑफ मेडिसीनचा गाभा आहे. मानवी दृष्टिकोन (ह्युमन अँगल) ढळू न देता वैद्यकीय विज्ञानाच्या भक्कम पायावर मेडिकल प्रॅक्टिस करणं ही तारेवरची कसरत असते. आधुनिक वैद्यकीय विज्ञान ही सतत विकसित होत जाणारी विज्ञानाची शाखा आहे. पूरक आणि पर्यायी वैद्यकाची कोणतीही शाखा संशोधनावर आधारित पुराव्यावर सिद्ध होईल, तेव्हा त्या शाखेला वैद्यकीय विज्ञान मान्यता देईल.
संशोधनाने सिद्ध न झालेल्या कितीतरी उपचारपद्धती रुग्ण वापरत राहणार, हे वास्तव आहे. रुग्णांच्या श्रद्धा, त्यांच्या अपेक्षा समजून घेण्याची एक संधी म्हणून वैद्यकीय विज्ञान या शाखांकडं बघतं. जसजसा वैज्ञानिक पुरावा मिळेल त्याप्रमाणे काही पॅथी कालबाह्य होतील, काहींचा स्वीकारही केला जाईल. पण जेव्हा स्वीकार होईल तेव्हा त्याला भक्कम वैज्ञानिक पुरावा असेल, त्यायोगे वैद्यकीय विज्ञानाचा विकास होईल.
                        डॉ. आनंद जोशी, बोरिवली, मुंबई


No comments:

Post a Comment