Friday, 19 April 2019

माझा प्रवास होमिओपॅॅथी ते अॅॅलोपॅॅॅॅथी भाग ४


वरील सर्व मतमतांतरे लक्षात घेऊन त्या सर्वांतील दखलपात्र मतांना माझे हे उत्तर....

आदरणीय संपादक,
महाअनुभव पुणे, यांस

सप्रेम नमस्कार,
माझ्या लेखाबद्दलच्या प्रतिक्रिया वाचल्या, त्यांवर काही खुलासेवजा मजकूर पाठवीत आहे.
सर्वप्रथम 'अनुभव'सारख्या वाचकसमृद्ध मासिकाने या लेखाला जागा देऊन हा विषय ऐरणीवर आणल्याबद्दल धन्यवाद! यापूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रात हा लेख प्रसिद्ध झाला होता. मात्र कमी आणि समविचारी वाचकवर्ग असल्यामुळे तो सर्वदूर पोचला नव्हता.
नमनाला ब-याच पत्रलेखकांनी माझ्या शैक्षणिक, बौद्धिक, मानसिक आणि व्यावसायिक पात्रतेबद्दल शंका व्यक्त केल्या आहेत (डॉ. शैलेश देशपांडे ते डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर व्हाया सेठिया, श्रीमाळी, खरे, कुलकर्णी). माझ्या विचारांचा प्रतिवाद त्यात नाही. सबब त्याची नोंद इथे घेत नाही. पण पत्रातील भाषा, आवेश आणि (ब-याचदा गैरहजर) तकलादू युक्तिवाद पाहता एक गोष्ट स्पष्ट आहे, की होमिओपॅथी ही वैज्ञानिक पॅथी नसून एक पंथ आहे. आमच्या पंथाच्या श्रद्धेला हात घालण्याचा तुम्हाला अधिकार नाही, असाच सूर दिसतो. मी एम.बी.बी.एस.च काय पण प्रवेशपरीक्षाही अनुत्तीर्ण झालो असं गृहीत धरलं, तरी मी उभे केलेले डझनभर प्रश्न गैरलागू कसे?
होमिओ कॉलेजमधून बाहेर पडणारे बहुसंख्य डॉक्टर अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करतात. मिळालेल्या शिक्षणातून उदरनिर्वाहाची सोय होत नाही, अशा निष्कर्षाप्रत ही मुले-मुली का बरं येतात? 'तुम्हीच व्हा होमिओ डॉक्टर' छापाची पुस्तके वाचून तैयार झालेले होमिओ डॉक्टर होमिओपॅथीचा यशस्वी वापर केल्याचा दावा करतात (डॉ. जयंत नरवणे यांचे पत्र) आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे (म.आ.वि.वि.)चे पदवीधर मात्र अॅलोपॅथीची कास धरतात, हा विरोधाभास नाही का?
शिकता शिकता मला जे होमिओपॅथीचे आकलन झाले, तेच मी लेखात मांडले आहे. डॉ. हानिमाननी लिहिलेला ऑरगॅनॉन' हा होमिओपॅथीचा धर्मग्रंथच आहे. थर्मोमिटरचाही शोध लागला नव्हता अशा काळात लिहिलेला हा वैद्यकीय तत्त्वग्रंथ. त्यातील भाषा आणि संकल्पना जशाच्या तशा स्वीकारणं हे अवैज्ञानिक आहे. या ग्रंथात हानिमन यांनी तत्कालीन उपचारपद्धतीवर जहाल भाषेत कोरडे ओढले आहेत. अॅलोपॅथी हा शब्दही डॉ. हानिमन यांचीच देन आहे. आधुनिक वैद्यकीला चिकटलेलं हे बिरुद त्यांनी दूषण म्हणून वापरलं होतं. त्या वेळची उपचारपद्धती होतीच तशी. रुग्णांना मारझोड करणे, तीव्र मात्रेत रेचके (Laxative) किंवा वमनके (Emetic) देणे जळवा लावणे, रक्तस्राव घडवणे वगैरे प्रकार सर्रास चालत, याविरुद्ध डॉ. हानिमन यांनी दंड थोपटले. प्रस्थापित पद्धतींना पर्याय म्हणून त्यांनी होमिओपथीचा पर्याय मांडला. तत्कालीन वैद्यकीवरची त्यांची टीका जरी योग्य असली, तरी त्यांनी सुचविलेला पर्याय मात्र अयोग्य निघाला. पुढे नित्यनूतन विज्ञानाच्या पावलावर पाऊल ठेवून अॅलोपॅथी विकसित होत गेली, बदलत गेली आणि कूपमंडूक वृत्तीची होमिओपॅथी मात्र जैसे थे राहिली. 'होमिओपॅथी एक संपूर्ण आणि अपरिवर्तन तत्त्वावर आधारित विचार आणि आचार असलेली पंथी आहे',  असं डॉ.हानिमननी स्वत:च म्हटलं आहे (पहा-ऑरगॅनॉन ऑफ मेडिसीनची प्रस्तावना). अॅलोपॅथी इतकी बदलली, की डॉ. हानिमानची जहरी टीका आता सर्वस्वी गैरलागू ठरू लागली. आज हनिमनकालीन अॅलोपॅथी अस्तित्वात नसून आधुनिक वैद्यकशास्त्राला अॅलोपॅथी म्हटलं जातं.
होमिओपॅथीमध्ये संशोधन होत असल्याचे डॉ. राजेंद्र श्रीमाळी म्हणतात. पण या संशोधनातून जे पुरावे पुढे आले आहेत, त्या बाबतीत मात्र मूग गिळून बसतात. मी हे लक्षात आणून देऊ इच्छितो, की संशोधनातसुद्धा उच्चनीच अशी प्रतवारी असते. जो पुरावा सादर केला जातो, त्याच्याही पातळ्या असतात (levels of evidence). होमिओपॅथीत काय दर्जाचे संशोधन चालतं, याची खालील दोन उदाहरणे बोलकी आहेत. आयजिंग राँग वगैरेंनी लॅन्सेट मध्ये (Lancet 2005; 366:726-32) प्रसिद्ध केलेल्या संशोधनात होमिओपॅथीचे दृश्य परिणाम हे प्लॅसिबो परिणामच असल्याचा नि:संदिग्ध निष्कर्ष काढण्यात आला आहे. होमिओ औषधांचे हितकारक परिणाम दर्शविणा-या तब्बल ११० अभ्यासांच्या पाहण्यांचा चिकित्सक अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. वाय ने जोन वगैरेंनी (BMC Comp &Alt Med.2001) तर १९४५ ते १९९५ अशा अर्धशतकातील सर्व होमिओ संशोधन निबंधांचा कीस पाडला. तेहतीस निकषांच्या आधारे त्यांची छाननी केली. निष्कर्ष काय, तर होमिओ संशोधन अजून बाल्यावस्थेत आहे.’
व्हायटल फोर्स म्हणजे काय हे सांगता सांगता सा-यांचीच भंबेरी उडालेली दिसते. व्हायटल फोर्स म्हणजे इक्कीलीब्रीअम असे डॉ. देशपांडे,डॉ. देशमुख व डॉ. आसवे (दे.दे.आ.) म्हणतात. डॉ. खरे यांनी मृत आणि जिवंत यांच्यातील फरक म्हणजे व्हायटल फोर्स असे सांगितले आहे. डॉ. सेठीयांनी तर थेट जागतिक आरोग्य संघटनेच्या आरोग्याच्या व्याख्येची खोटी साक्ष काढली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या व्याख्येत Spiritual Health असा शब्दच नाही. निव्वळ शारीरिक, मानसिक व सामाजिक आरोग्याचा उल्लेख आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या संकेतस्थळावर जाऊन डॉ. सेठिया याची खात्री करून घेऊ शकतात. या व्याख्येवरील चर्चेत मात्र Spiritual Health ची चर्चा काही ठिकाणी आढळते (पहा Text Book of Preventive and Social Medicine, Park & Park). मात्र यात ना व्हायटल फोर्सचा उल्लेख आहे ना होमिओपॅथीचा. व्हायटल फोर्ससारख्या कल्पना सर्व जगभर प्रचलित होत्या व आहेत. प्राण, आत्मा, स्पिरिट, चैतन्य, ब्रेथ ऑफ लाइफ वगैरेप्रमाणेच ही कल्पना आहे. देव जसा असल्याचा किंवा नसल्याचा पुरावा देता येत नाही, तसंच ह्याही संकल्पनांचं आहे. मुळात Vital Force आहे वा नाही, हा न संपणारा वाद घालण्यापेक्षा Vital Force सारख्या संकल्पना आज उपयोगी आहेत का नाहीत, हा कळीचा मुद्दा आहे.
मी म्हटल्याप्रमाणे आजच्या शरीरक्रिया विज्ञानातून व्हायटल फोर्सची कल्पना केव्हाच हद्दपार झालेली आहे आणि त्यामुळे काहीही अडलेले नाही. उलट, आजाराची कारणे ही रोगकारक घटक (उदा: जंतू), रुग्ण आणि त्याचे पर्यावरण (Agent, Host, Environment ) या त्रयीमध्ये दडलेली असतात, असेच आधुनिक वैद्यकी मानते. व्हायटल फोर्सच्या कल्पनेने आपल्या आरोग्याच्या आणि अनारोग्याच्या आकलनामध्ये काहीच प्रगती होत नाही. आजाराची कारणे मानवाच्या भौतिक परिवलयात शोधली, तर त्यांच्या निराकरणाच्या दिशेने प्रवास सुरू होतो.
इतकं करून हा फोर्स असल्याचं हानिमानला कसं कळलं ? हा प्रश्न राहतोच. व्हायटल फोर्स बिघडल्यानं आपण आजारी पडतो हे एम.आय.टी. मध्ये ऑरॉटेस्टिंग करून पडताळून पाहता येते, असं डॉ. सेठियांचे म्हणणे आहे. मन:पूर्वक अभिनंदन! (मात्र अन्य होमिओपंथीय या मूलगामी शोधाबद्दल संपूर्ण अनभिज्ञ दिसतात.) आजवर मानवी संवेदनांच्या पलीकडल्या फोर्सला आपण मानवी परीक्षेच्या पिंज-यात जेरबंद केलं, हे चांगलं आहे. मात्र शास्त्रीय निकषांवर आपला दावा सिद्ध करण्याची जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे. डॉ. सेठियांनी आता अजिबात हात आखडता घेऊ नये. संपूर्ण वैद्यक विश्वाने श्वास रोखून धरला आहे. पण केलाच जर डॉ. सेठियांनी त्यांचा दावा सिद्ध, तर प्रचंड गोची होईल. होमिओपॅथीच्या पोथ्या बदलाव्या लागतील! त्यात व्हायटल फोर्सच्या गुणधर्माबद्दल पूर्ण विरुद्ध गोष्टी छापाव्या लागतील!! आणि हे तर अधोगतीचे लक्षण आहे असं दे.दे.आ. या त्रयीचे म्हणणे आहे!!!
आधुनिक वैद्यकी अनेक रोगांबद्दल आणि औषधांबद्दल अनभिज्ञ आहे आणि तसं अधिकृतपणे मान्य केलंय, हे डॉ. जयंत नरवणे यांनी दाखवले आहे. विज्ञान विनम्र असतं. सारं सापडल्याचा आमचा दावा नाही. जे माहीत नाही, ते माहीत नाही म्हणण्यात काहीच कमीपणा नाही. उलट प्रामाणिकपणा आहे. अज्ञान मान्य केल्याशिवाय शोध सुरू होत नाही. नवे ज्ञान, नवे विचार, नवे तंत्र आत्मसात करून सातत्याने आत्मपरीक्षण करणे हा तर विज्ञानाचा आत्मा आहे. सोनोग्राफीचा शोध लागला आणि गर्भशास्त्रात क्रांती झाली. अल्सरसाठी रोगजंतूही कारणीभूत असतात असा शोध लागला आणि उपचारांमध्ये प्रतिजैविकांचा वापर सुरू झाला. उजेड वळवता येतो (Fiber Optics) म्हटल्यावर एंडोस्कोपीचे दालन उघडलं गेलं. नव्या व्याख्या निदानतंत्र आणि उपचारपद्धती विकसित झाल्या. हे सारे बदल पुस्तकात प्रतिबिंबित व्हायला नकोत?
मन आणि संमोहनपद्धती इंद्रियगोचर नाही. सबब सारे मनोविकारतज्ञ वेडे आहेत का, असाही प्रश्न पुढे करण्यात आला आहे. (संदर्भ- डॉ. प्रदीप सेठिया, द.द.आ. वगैरेंची पत्रे) आपण हे लक्षात घ्यायला हवं, की जसं पोटाच्या एका कार्यभागाला आपण पचन ही संज्ञा दिली आहे तसंच मेंदूच्या काही कार्यसमुच्चयाला मन म्हटलं जातं. यातील विचारांच्या आणि विकारांच्या गुंतागुंतीच्या रासायनिक क्रिया विज्ञानाला ज्ञात आहेत. संमोहनामुळे आणि मानसोपचारामुळे त्यात कोणते रासायनिक बदल घडतात, हे ही ज्ञात आहे. आधुनिक मानसोपचार हे विज्ञानाच्या कसोटीवर तपासूनच स्वीकारले जातात. तेव्हा होमिओपॅथी म्हणजे निव्वळ मनाची समजूत असली, तरी आधुनिक मानसोपचार म्हणजे अंधश्रद्धा नव्हे.
डॉ.दे.दे.आ.यांनी 'औषध कितीही डायल्यूट केले तरी त्यात गणिती दृष्ट्या औषधाचा कमीत कमी अंश असलाच पाहिजे', असं म्हटलं आहे. हे चूक आहे. "12 C" व पुढील डायल्यूशनमध्ये औषधालाही औषध नसते. (पहा Two faces of homeopathy by Anthony Campbell, Page 129. आणि शालेय रसायनशास्त्राच्या पुस्तकातील अॅव्हॉगॅड्रोचे तत्व.) वरील अशास्त्रीय विधान कमी म्हणून की काय, डॉ.दे.दे.आ.या त्रयीने ग्राफी, लॉजी, मेट्री वगैरेंनी शेवट होणारे डझनभर आंग्लभाषिक शब्द वापरून होमिओपॅथिक औषधे गुणकारी कशी, हे समजल्याचा दावा केला आहे. नॅनो टेक्नोलॉजीलाही अस्तित्वात नसलेल्या पदार्थांचे गुणधर्म अभिप्रेत नाहीत. नॅनो टेक्नोलॉजीच्या अभ्यासातून, होमिओच्या अभ्यासातूनही न उकललेलं गूढ कस काय उकलतं? अॅव्हॉगॅड्रोचे तत्वही न उमजलेल्यांनी क्वांटम् फिजिक्स, स्टॅटीक एनर्जी वगैरे शब्दांचे बुडबुडे पाठोपाठ सोडून वैज्ञानिकता सिद्ध होत नाही. हा संपूर्ण परिच्छेद म्हणजे विज्ञानावगुंठित भाषेत सादर केल्या जाणा-या छद्मविज्ञानाचे ढळढळीत उदाहरण आहे. नुसत्या विज्ञानशाखांच्या नामस्मरणाने छद्मविज्ञानाचे पाप धुऊन निघत नाही. आजच्याच नॅनो टेक्नोलॉजीचा दाखला देता देता होमिओपॅथीची चिकित्सा करायला आजचं विज्ञान अपुरे आहे असं ही त्रयी म्हणते, हे अजबच म्हणायचं! यांचे ज्ञात विज्ञानाशी विसंगत निष्कर्ष यांनी अगोदरच ठरविले आहेत. आता त्यांच्या पुष्ट्यर्थ विज्ञान शोधायचे आहे. अशी ही उरफाटी तऱ्हा आहे.
होमिओपॅथीची विचारधारा ही विज्ञानविरोधी आहे हे दाखवण्यासाठी मी आणखीही काही दाखले दिले होते. पण त्यांचे अजिबात खंडन करण्यात आलेले नाही. 'होमिओपॅथीची तत्त्वे अंतिम आणि अपरिवर्तनीय आहेत', हे त्यांना मान्य असून योग्यच आहे, असं त्यांचं मत दिसतं. होमिओपॅथीचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी अॅलोपॅथीची निंदा करणे त्यांना मान्य दिसते. तो त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग आहे. त्यामुळेच माझ्या लेखाचा प्रतिवाद करण्यासाठी लिहिलेलं निम्मं पत्र डॉ. सेठिया अॅलोपॅथीची नालस्ती करण्यासाठी खर्ची घालतात. डॉ. हानिमनचा उल्लेख 'अवर मास्टर' असा करणं हेही त्यांना मान्य असणार, असा उल्लेख हा झापडबंद अनुनयाला, बौद्धिक पांगळेपणाला आणि व्यक्तिशरणतेला प्रोत्साहन देणारा आहे. हे अवैज्ञानिकच आहे. होमिओ औषधे विधिपूर्वक बनविली तरंच त्यात शक्ती येते' याबद्दलही होमिओतज्ञांचं काहीच म्हणणे दिसत नाही. औषधे हलविल्याने शक्ती जागृत होते, तर उत्पादकापासून पेशंटपर्यंत पोचेपर्यंत त्या औषधांनी प्रवासात कितीतरी गचके खाल्लेले असतात त्याचे काय? डॉ. हानिमानना मात्र या प्रश्नाची जाणीव होती. कोटाच्या खिशात औषधे ठेवून फिरू नये; हालचालींनी ती अधिकाधिक जहाल होतील, असा इशारा त्यांनी दिला आहे!! औषधांसाठीचे अल्कोहोलही औषधे बनविताना हलविले जातेच की! औषधांचे गुणधर्म वर्धिष्णू होत असताना अल्कोहोलचे मात्र जैसे थे राहतात, हा दैवदुर्विलासच म्हणायचा.
अॅलोपॅथी ते होमिओपॅथी असा प्रवास करणा-या डॉक्टरांची उदाहरणे काहींनी दिली आहेत. प्रश्न कोठून कोठे कितीजण गेले हा नसून, संख्याबळाचा नसून, वैचारिक प्रवासाचा आहे. होमिओपॅथीमागील शास्त्रतत्त्वाचे त्यांचे आकलन त्यांनी प्रसिद्ध करावे. याचा प्रतिवाद अथवा स्वीकार करता येईल. पुरेसा विश्वासार्ह पुरावा दाखवला, तर मी माझे मत बदलायला केव्हाही बदलायला तयार आहे.
होमिओपॅथीला समाजमान्यता कशी? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. कुठे आहे समाजमान्यता? म.आ.वि.वि. सामायिक प्रवेश परीक्षेद्वारे वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश दिले जातात. यात इतक्या वर्षांत होमिओपॅथीला प्रथमपसंती देणारे विद्यार्थी किती, याची आकडेवारी जाहीर होईल का? जागतिक आरोग्य संघटनेने होमिओपॅथीला पर्यायी उपचार पद्धती' या सदरात टाकलं आहे. का?  वेळोवेळी होमिओ डॉक्टरांच्या संघटना आम्हाला अॅलोपॅथी औषधे वापरण्याची परवानगी द्या, असा सूर आळवतात. का?
'एवढी गर्दी कशी?' असाही प्रश्न अनेकजण उपस्थित करतात. पुन्हा एकदा गर्दी, लोकमान्यता, हा कोणत्याही पॅथीच्या शास्त्रीयत्वाचा पुरावा होत नाही. उलट, मोजक्याच होमिओ डॉक्टरांची प्रॅक्टिस धो-धो चालते, बाकीचे अॅलोपॅथीची औषधे वापरावी लागतात, यातच मेख आहे. होमिओपॅथी उपयुक्त असेल तर बहुसंख्य होमिओंची प्रॅक्टिस सरासरी दरम्यान चालायला हवी. तरीदेखील काही रुग्णांना होमिओपॅथीने बरे कसे वाटते, याची अनेक संभाव्य उत्तरे आहेत.
होमिओपॅथी ही जुनाट आणि असाध्य’ आजारांवर उपकारक आहे, अशी समाजभावना आहे. आपला आजार ‘जुनाट आणि असाध्य' असल्याचं मनोमन मान्य असल्यामुळे मुळात फार फरक पडेल, अशी अपेक्षा नसते. त्यामुळे पडेल त्या फरकाला रामबाण उपायाचा साज चढविला जातो.
कित्येक आजार मनोकायिक असतात. मानसिक समाधान लाभलं, की त्यांना उतार पडतो. होमिओ डॉक्टर औषध देण्यापूर्वी पेशंटची चांगली दोन तास हिस्टरी घेतात. बालपणापासून ते आवडीनिवडीपर्यंत आणि धंदापाण्यापासून ते बाई-बाटलीपर्यंत सगळ्याची आस्थेने आणि इत्थंभूत चौकशी केली जाते. दीड-दोन तास आपली कोणी आस्थेने विचारपूस केली, तर आपल्यालाही बरं वाटेलच की! आजाऱ्याला तर वाटेलच वाटेल.
कित्येक होमिओपॅथ नंबर घातलेल्या पुड्या देतात. त्या पुड्यांवर औषधाचं नाव नसतं. त्यामुळे पॅरेसिटमॉल किंवा स्टिरॉइडच्या पावडरीही दिल्या जात असण्याची शक्यता आहे. (पहा डॉ. जयंत नरवणे यांचे पत्र)
कित्येक आजार औषध न घेताही काही दिवसांनी आपोआप बरे होतात. अनेकदा आजारात निसर्गतः चढउतार होत असतात. त्वचेचे अनेक आजार, संधिवात आणि काही प्रकारचे कॅन्सरही असे हेलकावे खात असतात. त्या त्या वेळी चालू असलेल्या उपचारांना आयतं श्रेय मिळतं.
बहुतेक वेळा होमिओ डॉक्टर मुळात चालू असलेली (अॅलोपॅथीची) औषधे चालू ठेवून शिवाय वर होमिओ उपचार देतात; यामुळे यशाचे पितृत्व स्वत:कडे ठेवून अपयशाचे खापर अन्यांच्या माथी मारायची सोय होते.
आपण काही उपचार घेत आहोत या कल्पनेनेच कित्येकांना बरं वाटतं. याला प्लॅसिबो इफेक्ट असं म्हणतात. त्यामुळे औषधाची उपयुक्तता यापेक्षा सरस असल्याचे सिद्ध करावं लागतं. मात्र होमिओ औषधांबाबत अन्न व औषध प्रशासनही अशा सिद्धतेची मागणी करीत नाही! '' हे होमिओ औषध '' या आजाराला उपयुक्त आहे असा दावा करायचा झाला, तर त्यासाठी निव्वळ असा उल्लेख होमिओ ग्रंथात असल्याचे दाखवून द्यावे लागते. बस, एवढंच!
आणि होमिओपंथीयांचे दावे ऐकले तर झीट यायचीच वेळ येते. रेबिज ह्या शंभरटक्के मृत्युदायी आजारावर उपचार असल्याचा दावा यांच्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकात आहे. 'Heart Affection', 'Brain Softening' अशा नामांकित आजारांसाठी औषधे आहेत. एका पुस्तकात 'पाळीच्या तक्रारी' या मथळ्याखाली पहिलाच धडा अंगावरून पांढरे जाणे याबद्दल आहे. (पहा Gynecologic & Obstetric Therapeutics लेखक डॉ. श्रीकांत कुलकर्णी.) आता अंगावरून पांढरे जाणे हा पाळीचा त्रास’ नाही, हे यांना कोणी व कसे शिकवावे? होमिओपंथीयांच्या एका पोथीत शास्त्रकारांनी 'गर्भनिरोधक साधने वापरणाच्या जोडप्याचे जुनाट आजार कधीच बरे होऊ शकणार नाहीत', असा शाप दिला आहे. (पहा Lectures on Homeopathic Philosophy by Dr Kent)! ही असली ओंगळ भाषा वाचली की हसावं की रडावं, तेच कळत नाही. असलं काही वाचलं की आमच्या नाजूक वैज्ञानिक भावनांना धक्का लागतो त्याचे काय? पण लक्षात कोण घेतो?
 होमिओ औषधे निरोगी माणसांवर सिद्ध केली जातात', असे सुनावत डॉ.श्रीमाळी यांनी सिद्धतेचा मोठा बाऊ केला आहे. वाचकांना वाटेल ‘सिद्ध’ म्हणजे औषधांनी रोग बरे होतात हे सिद्ध केले. खरेतर शास्त्रीय दृष्ट्या भोंगळ भाषेचं हे ताजं टवटवीत उदाहरण आहे. औषधांची परिणामकारकता ही निरोगी लोकांवर कशी काय सिद्ध' करणार बुवा? असा एक सामान्य प्रश्न तुमच्या मनात आला असेल. शिवाय निरोगी व्यक्तींवर औषध ‘सिद्ध’ करणा-या या महान शास्त्राची महती वाचून तुम्ही हसता हसता गडाबडा लोळलाही असाल. पण कृपया गैरसमज नसावा. सिद्ध' म्हणजे काय केले जाते, हे मी सांगतो. एखादे औषध (उदा., मीठ) निरोगी माणसाला खाऊ घालतात. मग त्यांना काय काय वाटते, काय काय होते हे नोंदवून ठेवतात. अति मीठ खाल्ल्याने होणा-या त्रासाचे वर्णन लोक आपापल्या मगदुराप्रमाणे करतात. कोणी म्हणतात डोकं भणभणतंय, कोणी म्हणतात फणफणतय, कोणी म्हणेल घसा सुकला, कोणी म्हणेल जीभ आत ओढली जातेय. सगळ्यांना वाटणाऱ्या सगळ्या गोष्टी सविस्तर नोंदविल्या जातात. बस्! याला म्हणतात 'निरोगी माणसांवर औषधे सिद्ध करणे. 'To prove a drug’चं औषध सिद्ध करणे' हे सोयीस्कर आणि भोंगळ भाषांतर, मूळ इंग्रजी 'पूव्ह'चा त्या संदर्भातला अर्थ 'अभ्यासणे' असा होतो; 'सिद्ध करणे’ असा नाही. अशाप्रकारे अनेक लोकांना उद्भवणाच्या अनेक भावनांची निव्वळ जंत्री प्रत्येक औषधासाठी तयार केलेली असते. यालाच म्हणतात Materia Medica. यात खरं किती, खोटं किती, किती जणांना किती प्रमाणात एखादं लक्षण आढळलं, उद्भवणाऱ्या लक्षणांचे संख्याशास्त्रीय विश्लेषण वगैरे अभिप्रेत नाही. निव्वळ यादी केली जाते. पुढे एखाद्या रुग्णाला (कोणत्याही कारणाने) मीठ खाल्ल्यासारख्या तक्रारी आढळल्या (उदा., जीभ आत ओढल्यासारखे वाटले), की होमिओ संस्कारित मीठ ओषध म्हणून दिले जाते. औषधे ‘प्रुव्ह’ करण्यात त्यांच्या परिणामकारकतेचा अभ्यास होमिओपॅथीला अजिबातच अभिप्रेत नाही!!
होमिओपॅथीच्या पुष्ट्यर्थ अनेकांनी गोष्टीरूप पुरावा सादर केला आहे. देशोदेशीचे वैद्य, हकीम झाले आणि अखेरीस होमिओ गोळीच लागू पडल्याचे अनुभव/स्वानुभव या मंडळींनी कळविले आहेत. 'क्ष' हे औषध घेतल्यावर '' हा आजार पळाला; याचा अर्थ तो 'क्ष' मुळे बरा झाला असं आधुनिक विज्ञान मानत नाही. 'क्ष' हा आजार इतर अनेक कारणांनी नाहीसा झालेला असू शकतो. उदा: नैसर्गिकरीत्या, प्लॅसिबो परिणाम, तात्पुरता उतार, विश्रांती वगैरे (मूळ लेखातील हृदयविकाराचे उदाहरण आठवा.) त्यामुळे अन्य लोकांना 'क्ष' या आजारासाठी '' हे औषध देण्यापूर्वी त्याचा फायदा नि:संदिग्धपणे दाखवता यायला हवा, असा अभ्यास अनेक वेळा, अनेक ठिकाणी, अनेक व्यक्तींनी, अनेक तऱ्हांनी करायला हवा. दुर्दैवाने एकाही होमिओ औषधाचा असा परिणाम सिद्ध होऊ शकलेला नाही.
श्री. रत्नाकर धनेश्वर वगैरेंनी म्हटल्याप्रमाणे होमिओपॅथी स्वस्त आहे हे खरंच, मात्र ती परिणामशून्य आहे. भारतासारख्या गरीब देशापुढील जटिल आरोग्यसमस्या कोणत्याही पॅथीने सोडविल्या, तरी ते चांगलंच आहे. उदा: बालमृत्यू ही मोठी गंभीर समस्या आहे. सार्वत्रिक लसीकरणाद्वारे संसर्गजन्य आजार टाळणे हा एक उपाय भारत सरकारने योजिला आहे. देशभरातील मुलांना इंजेक्शने, पोलिओ डोस वगैरे देण्यात भलताच खर्च होतो. होमिओपॅथीकडे या सर्व आजारांवर त्यांच्या भाषेत, ‘प्रतिकारशक्ती खोलवर मुळातूनच जागृत करणाऱ्या’ गोळ्या उपलब्ध आहेत. निदान तसा त्यांचा दावा आहे (पहा A Tretise on Organon of Medicine खंड ३, पान ९८, लेखक डॉ. अशोककुमार दास, असोसिएट प्रोफेसर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी, कोलकत्ता). मग हा दावा होमिओपंथीय पुराव्यासह सिद्ध करतील का? तसे झाले तर मी माझी मते बदलण्यास तयार आहे. माझ्या मतपरिवर्तनापेक्षाही भारतमातेची कोट्यवधी अर्धपोटी,  अर्धनग्न बालके त्यांच्या सोप्या,  स्वस्त प्रतिबंधक उपाययोजनांसाठी आसुसलेली आहेत. त्यांच्या आई-बापांचे आशीर्वाद त्यांना मिळतील. भारतरत्न, मॅगसेसे, नोबेल पारितोषिकही मिळेल. खोटी फक्त दावा खरा करण्याची आहे. तेवढे फक्त करा, अन्यथा नागरिकांच्या आरोग्याची कुचेष्टा थांबवा.
होमिओ औषधाचा फायदा होतो का नाही हे जरा बाजूला ठेवू; पण या उपचाराचा तोटा काय होतो ? होतो ना! वेळेत आणि योग्य उपचार मिळविण्याचा रुग्णाचा हक्क हिरावून घेतला जातो. होमिओ उपचारांत वेळ दवडल्यामुळे मूळ आजार बळावतो, पसरतो, निदान होण्याला उशीर होतो. असे अनेक धोके संभवतात. चेहऱ्यावर पुरळ आले असे समजून नागिणीकडे दुर्लक्ष केले तर बुबुळावर फूल पडते. संडासवाटे रक्तस्राव होत असेल तर सर्व तपासणी केलीच पाहिजे. निव्वळ रात्री चादर पांघरली होती की दुलई?' यावरून औषध ठरविले तर आतड्याच्या कॅन्सरचे निदान होईपर्यंत खूप उशीर झालेला असतो. थोडक्यात, वेळ जातो, पैसा जातो. उपचार चालू असल्याचे कृतक समाधान मिळते आणि हे घातक ठरू शकते. होमिओ दृष्टिकोनाचे अन्यही तोटे आहेत. होमिओ उपचार हे लक्षणलक्ष्यी आहेत. म्हणजे लक्षणे दिसल्यावरच उपचार होऊ शकतात. आधुनिक तपासण्यांमुळे अनेक आजार लक्षणे दिसण्यापूर्वी काही दशके आधी ओळखता येतात आणि टाळता येतात (उदा: गर्भपिशवीचा कॅन्सर). अशा प्रतिबंधक उपायांपासून होमिओ वारकरी वंचित राहतात. डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या मते धंदेवाईक आणि प्रचारी अशा या लेखातून वाचकांना एवढी जाणीव झाली, तरी आनंदच आहे.
 मी निरुपद्रवी, निरुपयोगी शास्त्र शिकवलं हे खरंच; पण मी खाल्ल्या मिठाला जागलो नाही हे मात्र झूठ आहे. जी मतं मला पटत नव्हती, ती शिकविताना त्यांचं त्यांचं उत्तरदायित्व त्या त्या होमिओतज्ञाच्या पदरात टाकून मी मोकळा झालो. नाहीतरी मराठी वा इतिहास शिकवणा-यांना सुद्धा त्यातील सर्व मतमतांतरे पटत असतात, असं थोडंच आहे!
शिवाय खाल्ल्या वैचारिक मिठाला मी जागलोच की! म्हणूनच विज्ञानाच्या निकषांवर घासून पाहताच जेव्हा होमिओपॅथीचे पितळ उघडे पडलं, तेव्हा मी बी.एस्ससी. करण्याचा निर्णय घेतला. अॅलोपॅथीशी पाट लागला तो अपघाताने, नंतर, होमिओपॅथीशी काडीमोड मी आधीच घेतला होता.
होमिओपॅथीला आज भरभक्कम संस्थात्मक पाठिंबा आहे. रीतसर कॉलेज, पदवी, नोंदणी वगैरे प्रकार आहेत. सरकारमान्यताही आहे. पण एवढी होमिओ कॉलेजेस निघाली, याची कारणे सामाजिक आणि आर्थिक आहेत. कॉलेज काढणं हा किफायतशीर धंदा आहे. या कॉलेजमध्ये ८० टक्के मुलीच प्रवेश घेतात. आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत चरितार्थासाठी स्त्रियांचा दुय्यम सहभाग असला तरी चालतो. अशा शिक्षणातून तेवढं साधतं. पुरुषांचा मात्र मुख्य वाटा असावा लागतो. त्यामुळे मुलं शक्यतो अन्य मार्ग चोखाळतात. कॉलेज काढणारेही कोणी होमिओप्रेमी नाहीत की फुले-आगरकर नाहीत. पैशाचा हंगाम संपला, की ही ज्ञानछत्रं, भूछत्रांसारखी आपोआप मिटतील.
होमिओपॅथीतील ढळढळीत त्रुटी होमिओ विद्यार्थ्यांना कळत नाही, असं थोडंच आहे? मेडिकलची अॅडमिशन काही मार्कानी हुकलेली ही मुलं मूर्ख नक्कीच नसतात. मनापासून वाईट वाटतं ते या मुला-मुलींचे, आयुष्याची सोनेरी पाच वर्षे इथं काढल्यावर ज्या वेळी आपली ज्ञानाची ओंजळ रितीच आहे ही जाणीव होते, त्या वेळी ही मुलं सैरभैर होतात. सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा खगोलशास्त्र शिकायला जावं आणि वास्तुशास्त्र किंवा ज्योतिषशास्त्र पदरात पडावं, असा हा प्रकार! काळीज चिरत जाणारा हा अनुभव प्रत्येक होमिओ विद्यार्थ्याला येत असतो. यांतील बरेचजण मग मारून मुटकून अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करतात. आपण करतो ते अपरिपूर्ण व बेकायदेशीर आहे, ही जाणीव त्यांना आयुष्यभर कुरतडत राहते. उरलेली, एकाच हाताच्या  बोटावर मोजता येतील, अशी मंडळी झुकानेवाला बनून दुनियेला झुकवायला होमिओ दवाखाने काढतात.
डॉ. सेठिया म्हणतात, भारतात अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करायला फारसं डोकं लागत नाही. हे अगदी रास्तच आहे. होमिओ प्रॅक्टिस करायला निश्चितच जास्त डोकं चालवावं लागतं. कारण औषधं काहीच करत नाहीत.
खरंतर होमिओपॅथीची निष्पक्ष चौकशी होईल, अशी समिती नेमायला हवी. आपल्या केसेस पुराव्यानिशी दाखविणारे होमिओ डॉक्टर अशा स्वतंत्र समितीपुढे आपापले पुरावे सादर करू शकतात. वैज्ञानिक मापदंड वापरून अशी समिती मग पुरावा आहे का आणि असल्यास तो किती सबळ आहे, हे सांगू शकेल.
मूळ लेख निव्वळ माझा मानसिक आणि भावनिक प्रवास सांगण्यासाठी होता. होमिओपॅथीबद्दल युक्तिवाद लेखापेक्षा आणि या उत्तरापेक्षाही अधिक विस्तृत आहे. मात्र यापुढील मुद्दे तांत्रिक परिभाषेतच मांडता येतील. त्यामुळे असे मुद्दे इथे वगळले आहेत अन्यथा लिखाण सामान्य वाचकांना दुर्बोध झाले असते.
एकूणच होमिओपॅथीच्या वैज्ञानिक चिकित्सेची नितांत आवश्यकता आहे, एवढं नक्की.


No comments:

Post a Comment