माझा प्रवास
डॉ. शंतनू
अभ्यंकर
तिरीमिरीत मी
जिना उतरू लागलो. हा दणका जबरदस्त होता. अंधारा जिना मी भेलकांडत
उतरलो. रस्त्यावर आलो. अपमानाच्या झिणझिण्या आत डोक्यापर्यंत गेल्या होत्या. भान हरवून तंद्रीत मी चालत राहिलो. आप्पा बळवंत चौकात आलो. खिशात पाहिलं, जेमतेम वाईच्या तिकीटाएवढे
पैसे होते. तरातरा चालत मी स्वारगेटला पोचलो. तिथे पोहोचेपर्यंत मला सणकून ताप भरला. वाईला जाणा-या पहिल्याच एस्टीमध्ये मी बसलो. सारे अंग जळजळीत तापल्याचे
माझे मलाच जाणवत होते. खिडकीबाहेर बघत मी लोखंडी सळ्यांभोवती मुठी आवळल्या. त्या थंडगार स्पर्शाने जरा बरे वाटत होते. कंडक्टरची डबल बेल, दार खाडकन बंद झाल्याचा आवाज, खटका टाकल्याचा
आवाज, क्रमाने कानावर पडले. एस्टीच्या
स्टार्टरबरोबर डिझेलच्या धुराचा काळा वास नाकात भरला
आणि प्रवाशांना ढुश्या देत बस मार्गस्थ झाली. खिडकीतनं भरारा वारा अंगाला झोंबू लागला. बाहेरचे दृश्य सिनेमाप्रमाणे सतत बदलत होते आणि माझं मन झाल्या
प्रकाराचा धांडोळा घेत होते.
८0 साल होतं ते. मी बारावीला होतो, चुणचुणीत होतो. कर्तृत्व फारसं नसलं, तरी आत्मविश्वास
दांडगा होता. झाकीतच मी अभ्यास केल्यासारखा केला. कष्ट कमी पडले. कष्ट कमी पडले म्हणून मार्क कमी पडले आणि मार्क कमी पडले म्हणून अस्मादिक होमिओपॅथी
कॉलेजला ‘डॉ' व्हायला दाखल झालो.
अन्य पर्याय
नव्हतेच असे नाही, पण कधी
विचारातच घेतले नव्हते. डोनेशन भरून कर्नाटकात एम.बी.बी.एस.ला अॅडमिशन मिळत होती, पण तो मार्ग परवडण्यासारखा नव्हता आणि
(म्हणूनच की काय) थोडासा तत्त्वात बसणाराही नव्हता. घरी वडील डॉक्टर होते हॉस्पिटल
होतं. जी.एफ.ए.एम. (आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यक असा मिश्र अभ्यासक्रम) असूनही
स्वतः बरीचशी ऑपरेशन्स करत. वाईसारख्या तालुक्याच्या ठिकाणी खाजगी ब्लड बँक ते
धडाडीने चालवीत होते. तेव्हा ओघानंच डॉक्टर होणं हा सर्वात सुरक्षित करिअर ऑप्शन
होता पण एम.बी.बी.एस.चा प्रवेश हुकला. मग अगदी अखेरचा पर्याय म्हणून नाइलाजाने मी
होमिओपॅथिक डॉक्टर व्हायला निघालो. एकदा हा ‘डॉ' चा टिळा भाळी लागला, की निदान मला जनरल प्रक्टिसचे (जी.पी.) आणि हॉस्पिटल
चालवण्याचे रान मोकळे होणार होते. वैद्यकविश्वात मागील दाराने का होईना, प्रवेश मिळणार
होता. अशा विचारात मी एकटाच होतो, असे नाही. या
कॉलेजातले सगळेच एम.बी.बी.एस.च्या आळंदीला निघालेले होते आणि पोचले होते
होमिओपॅथीच्या आळंदीला. त्यामुळे संधी हुकल्याची एक विषण्ण भावना सार्वजनिक मन
व्यापून होती.
या कॉलेजमधून
मिळणारे शिक्षण सुमार दर्जाचे आहे, याची अंधूक जाणीव होती. ह्या शिक्षणातून चांगला होमिऑपॅथीचा डॉक्टरसुद्धा घडत
नव्हता, तर अॅलोपॅथीची औषधे वापरणारा कसबी जी.पी.
कुठला तयार व्हायला? पण यावर उतारा
होता. शिक्षण घेता घेता आणि मग नंतरही कोणत्याही मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करायचे, अनुभव घ्यायचा. कोणा बड्या डॉक्टरच्या हाताखाली
अॅलोपॅथीच्या औषधोपचारांची जुजबी माहिती घ्यायची आणि ह्या भांडवलावर स्वत:चा दवाखाना
थाटायचा. माझ्यासाठी तर दवाखानाही थाटलेलाच होता.
पण कॉलेजच्या पहिल्या दिवसापासूनच मला होमिओपॅथीचे चटके बसू लागले आणि हळूहळू
या चटक्यांनी चांगले धगधगत्या, अक्राळविक्राळ ज्वाळांचे रूप धारण केले. माझे मन होरपळून
जाऊ लागले. माझ्या विज्ञानवादी विचारांच्या तारा इथल्या विज्ञानविसंगत वातावरणाशी विसंवादी
सूर छेडू लागल्या.
इथे वैद्यकीची
आधुनिक पुस्तके तोंडी लावण्यापुरती शिकवली जात. त्यांची सखोल समज अभ्यासक्रमात
अपेक्षित नव्हती. होमिओ औषधे देण्यासाठी त्याची गरजही नव्हती. माझ्यासाठी कायमच्या
दुरावलेल्या आधुनिक वैद्यकीची ही झलक मला विस्मयचकित करून जायची. हे आधुनिक
ज्ञानाचे चाटण माझी वैद्यकविज्ञानाची भूक पेटवून जायचं. विज्ञान आणि होमिओपॅथी
यांच्यातील विरोधाभास अधिक गहिरा करून जायचं.
सर शिकवायचे, ‘व्हायटल
फोर्स’ ही एक मूलभूत
नव्हे तर होमिओपॅथीला प्राणभूत अशी संकल्पना आहे. (आधुनिक वैद्यकशास्त्राने ही
संकल्पना केव्हाच मोडीत काढली आहे. आज सर्वमान्य अशा शरीरक्रियाविज्ञानाच्या
पुस्तकात या फोर्सचा उल्लेखही नाही.) हा फोर्स म्हणे आपल्या शरीरात सर्वत्र असतो.
त्याचा तोल सांभाळलेला असेल तर शरीराचे गाडे सुरळीत चालते. या फोर्सचा तोल बिघडला, की आपण आजारी पडतो... आणि हा फोर्स नष्ट झाला
की आपण मरतो... ! हा फोर्स असल्याचे होमिओपॅथीचे प्रवर्तक डॉ. सॅम्युअल हानिमान
यांचे ठाम प्रतिपादन आहे. मात्र हा फोर्स इंद्रियगोचर नाही!! तो मोजता येत नाही, दिसत नाही, स्पर्शता येत नाही, ऐकू येत नाही, त्याला वास येत नाही, त्याची चव
लागत नाही... मात्र तो असतो!!! हे ऐकून मी दचकलो. मी उभे राहून विचारले, 'सर, जर हा फोर्स इंद्रियगोचर नाही, तर डॉ. हानिमानना तरी हा फोर्स असल्याचे कसे कळले?' आता दचकायची पाळी सरांची होती. त्यांना
दरदरून घाम फुटला. असला नतद्रष्ट सवाल त्यांना आजवर कुणी केला नव्हता.
तेवढ्यापुरते त्यांनी काहीतरी थातूरमातूर उत्तर दिले आणि तास संपला. लगेचच माझ्या
मित्रांनी मला घेरलं आणि समज दिली. त्यांचे म्हणणे असे होते की, 'या कॉलेजमधून शिक्षण घेऊन लवकरात लवकर बाहेर
पडणे एवढेच महत्त्वाचे; कोणत्याही
शिक्षकांशी वैर म्हणजे परीक्षेतील अपयशाला आमंत्रण. तेव्हा मुकाट बस.'
बारीकसारीक गोष्टींचाही त्रास व्हायचा मला. होमिओपॅथीचे जे प्रमाणग्रंथ होते, त्यांच्या पहिल्या पानावर पुनर्मुद्रणाच्या
तारखा ओळीने छापलेल्या असायच्या. म्हणजे दशकानुदशके, नव्हे शतकानुशतके तोच मजकूर! नव्या शोधांचा, नव्या
ज्ञानाचा, नव्या तंत्रज्ञानाचा स्पर्शही ह्या मजकुराला
विटाळ ठरत होता. शास्त्रग्रंथ कसले? धर्मग्रंथच ते! याउलट, सर्जरीचे लव्ह
अँड बेलीचं पुस्तक, डेव्हिडसनचे मेडिसीन वगैरे अॅलोपॅथीची पुस्तके, दोन वर्षांत ‘संपूर्ण नवी आवृत्ती' म्हणून मिरवीत यायची. विस्तारलेल्या ज्ञानकिरणांची प्रभा त्यांच्या
पानापानांवर फाकलेली असायची. याची ओढ वाटायची, पण नुसते वाचून बरेचसे समजायचे नाही. मात्र अत्यंत सर्जनात्मक, नित्यनूतन अशा विज्ञानापासून आपण वंचित आहोत, असे जाणवायचे. अॅलोपॅथीमध्ये कोणत्याही
आजाराचा विचार हा अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने मुद्देसूदपणे आणि भरभक्कम पुराव्यानिशीच
सादर केला जातो. डॉ.पी.एम. गांधी म्हणून एक सर आम्हाला मेडिसीन शिकवायला होते.
त्यांनी एकदा टायफॉईडवर इतके विलक्षण सुंदर लेक्चर घेतले की, त्यांचा शब्द अन् शब्द माझ्या मनात घर करून
बसला. असे वाटते, की आज २७
वर्षांनतरही मी ते लेक्चर घडाघडा अथ:पासून इति:पर्यंत म्हणून दाखवीन, टायफॉईडचे जंतुशास्त्र, कारणे, प्रसार, प्रकार, लक्षणे, निदान, तपासण्या वगैरे पाय-या पार पाडत पाडत सर कळसाला
पोचले. सर तन्मयतेने शिकवत होते, आम्ही जिवाचा
कान करून ऐकत होतो. ‘टायफॉईडचे
उपचार' असं सरांनी फळ्यावर लिहिले; एकदा वर्गाकडे एक
(भेदक की तुच्छ) कटाक्ष टाकला; किंचितसे (मिस्कीलपणे की कुत्सित) हसले आणि म्हणाले;
‘होमिओपॅथीत शिकवतील त्याप्रमाणे!' माझा रसभंग झाला. एखादी रसिली मैफल उत्कर्ष
गाठत परमोच्च बिंदूशी पोचता पोचता उधळून जावी, असे काहीसे झाले. मग हे प्रत्येक वेळी होऊ लागले. सर्जरी असो की मेडिसीन, गायनॅकॉलॉजी असो की आणखी काही, दरवेळी हाच अनुभव. शिक्षकांचे काही चुकत
नव्हते. जो भाग मुळी अभ्यासक्रमातच नाही, तो त्यांनी शिकवणे अपेक्षित नव्हते; आणि ‘उपचार' या नावाखाली होमिओपॅथीत जे शिकवले जात होते, ते मला पटणे शक्य नव्हते.
होमिओपॅथीचे
औषधशास्त्र म्हणजे साऱ्या आधुनिक विज्ञानशाखांच्या मूलभूत संकल्पनांची शुद्ध
कुचेष्टा! डॉ. हानिमान यांचे तर्कट असे, की इंद्रियगोचर नसणा-या अशा या बिघडलेल्या व्हायटल फोर्सला ताळ्यावर आणायला
इंद्रियगोचर नसलेली अशीच औषधयोजना हवी. मग इंद्रियगोचर असलेली औषधे, इंद्रियगोचर नसलेली बनविण्यासाठी त्यांनी एक
नामी शक्कल काढली. औषधात अधिकाधिक पाणी/अल्कोहोल घालणे ही ती युक्ती म्हणे! म्हणजे
९ भाग पाण्यात १ भाग औषध घालायचे आणि चांगले हलवायचे, मग त्यातला एक भाग आणखी ९ भाग पाण्यात
मिसळायचा. मग यातला एक भाग आणखी ९ भाग पाण्यात मिसळायचा... अशा पद्धतीने औषधाचे
प्रमाण कमी कमी होत जाते. पण हानिमान यांच्या मते याने औषधाचे प्रमाण जरी कमी झाले, तरी औषध मात्र अधिकाधिक जहाल होत जाते!! हे
म्हणजे रंगात पाणी घातल्यावर तो अधिक गडद होतो असे म्हणण्यासारखे आहे! प्राथमिक
विज्ञान असे सांगते की, ठराविक
प्रमाणापेक्षा जास्त वेळा ही क्रिया क्रिया केली की निर्माण होणा-या द्रावणात मूळ
औषधाचा एकही अणू/ रेणू शिल्लक असणार नाही. थोडक्यात, होमिओपॅथीच्या औषधात औषधालाही औषध नसते. याहून मोठा आचरटपणा म्हणजे हे
बिनऔषधवाले रसायन बनवण्याचे चक्क विधी होते, कर्मकांडे होती. ठरावीक पद्धतीने हातफिरवून तो ठरावीक पद्धतीने आपटल्याने त्या
औषधातील 'शक्ती' जागृत होते म्हणे, यातल्या कुठल्याही
क्रियेसाठी 'असेच का?' या प्रश्नाचे उत्तर ‘ग्रंथात
सांगितलंय म्हणून' असं होतं. अशा
पद्धतीने विधिवत बनवलेली औषधेच गुणकारी असतात, असे शिकवले जायचे; मात्र होमिओ औषधकारखान्यात
तर यंत्रांनी औषधे बनवली जातात. मग त्यांच्यात 'शक्ती' कुठून येते? या प्रश्नाला उत्तर नव्हते.
औषधांसाठी 'व्हेहीकल' वापरावे असे
सांगितले होते. म्हणजे औषध ज्यात विरघळवून बनवायचे असे द्रावण. या द्रावणाला
स्वत:चे असे काही औषधी गुणधर्म असता कामा नयेत, त्याचे शरीरावर काही थेट परिणाम होऊ नयेत; थोडक्यात, ते ‘इनर्ट’ असावे; असे या व्हेहीकलचे निकषही शिकवले जायचे. गंमत म्हणजे इथील अल्कोहोल, म्हणजे चक्क दारू, व्हेहीकल म्हणून सर्रास वापरली जाते! आता दारूचा
शरीरावर काही थेट परिणाम होत नाही, असा यांचा दावा आहे की काय? पण याही
प्रश्नाला उत्तर नव्हते. निकषही बरोबर आहेत, अपरिवर्तनीय आहेत आणि अल्कोहोल वापरणेही बरोबर आणि अपरिवर्तनीय आहे, असा दुराग्रह होता.
मी सांगितलेली
तत्त्वे अंतिम, अचल, अपरिवर्तनीय आहेत असे डॉ. हानिमानने म्हणूनच ठेवलेले आहे. अशा पद्धतीने ग्रंथप्रामाण्याचा, शब्दप्रामाण्याचा आग्रह धरणारी विद्याशाखा
विज्ञान म्हणून कशी काय मिरवू शकते? हे सारे मला भीषण वाटायचे.
आपल्याला वर्गात जे शास्त्र म्हणून शिकवले जातेय तेच मुळी असे भुसभुशीत आणि पायारहित
आहे, हे हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागले. पण मी
विशेष काही करू शकत नव्हतो. एकदा कॉलेजला प्रवेश घेतलाय म्हटल्यावर तिथून बाहेर
पडणे तर क्रमप्राप्त होते. तसे ते सोपेही होते. शिवाय कितीही झाले तरी मी पडलो
विद्यार्थी, अजून आपल्याला या क्षेत्रातलं बरंच काही
शिकायचंय, आपल्याला असणा-या शंका आपल्या मतिपलीकडच्या
असतील, पुढेमागे यांचा खुलासा होऊ शकेल, अशीही आशा होती. शिकवणाच्या मंडळींतही नेटाने
आणि प्रामाणिकपणे होमिओपॅथीची प्रॅक्टिस करणारी मंडळी होती. त्यांच्या तडाखेबंद
प्रॅक्टिसच्या, जादुई रोगमुक्तीच्या दंतकथाही प्रसृत होत्या.
(आमच्या एका प्राध्यापकांनी फियाट गाडी घेतली त्याचं केवढं कौतुक वाटलं होतं
आम्हाला!) सश्रद्धपणे त्यांनी वर्गात शिकवलेलं मी अश्रद्धपणे घोकायचो, परीक्षेत
ओकायचो आणि पास व्हायचो.
पण कितीही
नाही म्हटलं तरी होमिओपॅथीचे वैचारिक खुजेपण ठायी ठायी प्रत्ययाला यायचे. प्रत्येक
व्यक्ती काय किंवा विचार काय, त्यांच्या
अंगभूत गुणांमुळे उच्चनीच ठरत असतात. दुसऱ्याच्या उणीवा दाखवून जर कोणी स्वतःला
मोठे ठरवू पाहत असेल, तर ते
हास्यास्पद आणि केविलवाणे ठरेल. होमिओपथी कॉलेजमध्ये मात्र अॅलोपॅथीला शिव्या घालणे, अॅलोपॅथीची निंदानालस्ती करणे हा कित्येक तासिकांसाठीचा अधिकृत असा पूर्णवेळ
कार्यक्रम असायचा. यात अॅलोपॅथीच्या असलेल्या आणि नसलेल्या दोषांची सखोल चर्चा
केली जायची. होमिओपॅथीची मुक्तकंठाने भलावण केली जायची. होमिओपॅथी शिकून अॅलोपॅथी प्रॅक्टिस
करणाऱ्यांना काय दूषण द्यावे याची माहिती दिली जायची. त्यांना मोन्ग्रिअल (Mongreal)
म्हणजे कुलुंगी कुत्रा म्हणावे अशी अधिकृत शिफारस आहे. Mongreal Sect यावर परीक्षेत टीपा लिहा असा प्रश्न यायचा!
हे सारे शिकवणाऱ्यातही असं करणारी मंडळी होती, हे विशेष. 'अॅलोपॅथिक
विचारधारेचे दोष दाखवा, खंडन करा व त्या तुलनेत होमिओपॅथीचे श्रेष्ठत्व सिद्ध करा', असा मुळी १८ मार्काचा प्रश्नच असायचा. एवढे
करूनही बाहेर पडणारे बहुसंख्य डॉक्टर अॅलोपॅथीचीच प्रॅक्टिस करत असत. अजूनही करतात!
याउलट, अॅलोपॅथीच्या पुस्तकात होमिओपॅथीचा
उल्लेखसुद्धा नसायचा. अॅलोपॅथीच्या अमक्या अमक्या आजारावरील उपचारांचे श्रेष्ठत्व
दाखवून द्या वगैरे बात नाही. तिथे सगळा रोकडा कारभार, तिथे कारण आणि परिणाम यांचे नातं जोडणारे
संख्याशास्त्रीय निकष तयार होते. ‘परंतू रोकडे काही मूळ सामर्थ्य दाखवी', असं समर्थांनी चक्क भवानीआईला आवाहन केलेलं
आहे. पण होमिओपॅथीचे रोकडे सामर्थ्य ५ वर्षांत शोधूनही सापडले नाही. कॉलेजशेजारी
होमिओपॅथिक म्हणून जे रुग्णालय होत ते शब्दश: निरोगी होतं. चुकून एखादा रोगी थंडी, ताप, जुलाब वगैरेसाठी अॅडमिट झालाच, तर त्याला होमिओपॅथीची औषधे मोठ्या उत्साहाने सुरू करण्यात येत. बरा झाला (अर्थातच
आपोआप) तर ठीकच, पण नाही बरा
झाला तर मग अॅलोपॅथिक शिक्षकांना ती केस दाखविण्यात येई आणि त्यानुसार उपचार सुरू
होत. त्या पेशंटचं जे काही बरंवाईट व्हायचं ते होई; पण हा रुग्ण, हा त्याचा
आजार, हे होमिओ उपचार आणि हा खडखडीत बरा झालेला
रुग्ण, असा प्रकार कधी दिसलाच नाही.
ह्या पेशंट दाखवादाखवीतसुद्धा खाचाखोचा होत्या.
‘सदरहू रोग्याला अॅलोपॅथीचे उपचार सुचवा', अशी विनंती करणे होमिओंना कमीपणाचे वाटे. त्यामुळे ‘आजाराविषयी आपल्या मतप्रदर्शनार्थ रुग्ण
पाठवीत आहे' ('for your
kind opinion'), अशी सावध
चिट्ठी जायची. अॅलोपॅथीवालेही कमी नव्हते. ती मंडळी मग निव्वळ आजाराच्या स्वरूपाबद्दल मत
व्यक्त करायची आणि उपचारांबद्दल अवाक्षर काढायची नाहीत. होमिओ दवाखान्यात होमिओ
उपचारच हवेत नाही का? मग पुन्हा चिट्ठी जायची. 'आपल्या मतासाठी आणि उपचारासाठी रुग्ण पाठवीत आहे. ('for your kind opinion &
treatment'.) मग हे
अॅलोपॅथीवाले गालातल्या गालात हसत काय ते उपचार सुचवायचे. असा उंदरामांजराचा खेळ
सतत चालू असायचा. अर्थात उंदीर कोण आणि मांजर कोण, याबाबत उभयपक्षी मतभिन्नता होती.
एकदा कॉलेजमध्ये व्हॉलीबॉलचा सामना होता, अचानक एक मुलगा धाडकन कोसळला, त्याला प्रचंड धाप लागली आणि तो चक्क
काळानिळा पडायला लागला. त्याला तात्काळ शेजारच्या होमिओपॅथिक दवाखान्यात दाखल
करण्यात आले. आमचे प्राचार्य हजर होईतो त्याला अर्धवट बसलेल्या स्थितीत आम्ही
ठेवला, ऑक्सिजन लावला. सरांनी गडबडीने येऊन त्याला
तपासलं आणि कसल्याशा होमिओ औषधाचे चार चार थेंब दर तासाने पाजायला सांगून सर निघून
गेले. त्या मुलाला कसलासा हृदयविकार होता आणि खेळतानाच्या अतिश्रमाने अचानक हा
त्रास बळावला होता.
दुस-या दिवशी सकाळी मी कॉलेजमधे गेलो, तो वातावरणात आनंद भरून राहिला होता.
रात्रभराच्या होमिओ औषधाने तो मुलगा खडखडीत बरा झाला होता आणि ही बातमी जो तो एक दुस-याला
सांगत होता. पाच वर्षांत ज्या दवाखान्यात अर्धा पेशंटसुद्धा बरा झालेला दिसला नाही, तिथे हा ऊर्ध्व लागलेला हृदयविकाराचा रुग्ण,
एका रात्रीत पुन्हा टवटवीत झालेला पाहून एकच जल्लोष चालू होता. प्रत्येकाला जणू
हरवलेलं काहीतरी अचानक गवसलं होतं. मला आनंद झाला; अभिमानही वाटला. इथे काहीतरी आहे हे जाणून घ्यायला आपण तोकडे पडलो आहोत, असं वाटायला लागलं.
दुपारी आमचे
एक अॅलोपॅथिक शिक्षक डॉ. नानिवडेकर यांच्याबरोबर चहा पिता पिता हा विषय निघालाच.
सर त्या वेळी हॉस्पिटलचे अधीक्षक म्हणूनही काम पाहत होते. त्यांना सारीच कथा माहीत
होती. कॉलेजमधला विजयोन्मादही त्यांनी पाहिला होता. हसत हसत ते फक्त एवढंच म्हणाले, 'शंतनू, ह्या पेशंटला बरं वाटलं ते होमिओ औषधांनी नाही! त्याला बरं वाटलं ते त्याला
बसल्या स्थितीत ठेवून विश्रांती दिल्यामुळे!! अतिश्रमाने बळावलेला सौम्य हृदयविकार
हा विश्रांतीने आटोक्यात येतोच येतो. तेव्हा मात्रा लागू पडली ती विश्रांतीची; औषधाचा काहीही संबंध नाही!!!' सरांचे शब्द ऐकले आणि आजूबाजूच्या उत्सवाचा
पोकळपणा, बेगडीपणा झळाळून उठला. मी तिथून काढता पाय
घेतला. वैद्यकशास्त्राचं एक अत्यंत महत्वाचं तत्व त्यांनी उलगडून दाखवलं होतं.
एखाद्या औषधानंतर आराम वाटला ह्याचा अर्थ तो त्या औषधामुळे वाटला असे होत नाही. या
यशाला इतर काही घटक कारणीभूत आहेत का हे काळजीपूर्वक तपासावे लागते.
आपण निवडलेलं
क्षेत्र कमअस्सल आहे, हे असं पदोपदी
जाणवत राहायचं, पण मार्गच दिसत नव्हता. मग मी आहे ते मनापासून
आवडवून घ्यायचा प्रयत्न करायचो, एके ठिकाणी
असं वाचलं, की 'if the rape is inevitable why not lie , and enjoy it?' ( जर बलात्कार अटळच असेल तर पडल्या पडल्या
किमान संभोगाचा आनंद लुटायला काय हरकत आहे?) विलक्षण आनंदाचे अनेक क्षण होते. नाटक, लिखाण, कविता, वक्तृत्व, दंगामस्ती, निवडणुका वगैरे कॉलेजजीवनातले
फुलपाखरी रंग सोबतीला होतेच की! वेळोवेळी यात यशही मिळत होतं. पण 'आहे मनोहर तरी गमते उदास' अशीच अवस्था प्राप्त व्हायची, बारावीतलं अपयश आणि होमिओपॅथीशी जुळलेली
जन्मगाठ याची खंत मनात हवेतल्या धुरासारखी संथपणे तरळत असायची. या धुराला कसला
सुगंध नव्हता. मनाच्या गाभा-यात पुटं फक्त चढायची.
होमिओपॅथीचे
जनक डॉ. सॅम्युअल हानिमान यांचा उल्लेख नेहमी 'आवर मास्टर डॉ. हानिमान' असा केला जायचा. हाही दैवतीकरणाचा प्रकार
होता. वादासाठी डॉ. हानिमननी होमिओपॅथीचा शोध लावून मानवजातीवर अनंत उपकार केले
आहेत हे मान्य केलं तरी त्यांचा उल्लेख 'आवर मास्टर' असा करणं गैरवैज्ञानिक आहे. जंतुशास्त्राचा जनक रॉबर्ट कॉख, जनुकशास्त्राचा जनक ग्रेगोर मेंडेल, निर्जंतुकीकरणाचा जनक डॉ.जोसेफ लिस्टर यांचेही
मानवजातीवर काही कमी उपकार नाहीत; पण म्हणून जंतुशास्त्राच्या, जनुकशास्त्राच्या वा शल्यविज्ञानाच्या
पुस्तकात यांच्या नावामागे कुणी मास्टरचे बिरुद लावत नाही. व्यक्तीशरण विज्ञान हे
विज्ञान असूच शकत नाही. उलट कॉख, मेंडेल आणि
लिस्टर यांच्या सिद्धांतांचा वापर करून ही प्रत्येक शास्त्रशाखा रोज नवी उंची गाठत
आहे. ‘इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊन ना नाचा, करा पदस्थल त्याचे आणिक चढून त्यावर भविष्य वाचा', असं विंदांनी म्हटले आहेच. हानिमनचा वेळोवेळी 'आवर मास्टर' असा उल्लेख हा वैज्ञानिक विचारपद्धतीशी
घेतलेली फारकतच अधोरेखित करत होता. या मास्टरचे कॉलेजमधले झापडबंद अनुयायी आपली
तत्त्वे ज्ञात विज्ञानाशी विसंगत असली, तरी बरोबरच आहेत असं सांगत होते. ते म्हणे त्यांना बरोबर शाबीत करणारे नवीन
विज्ञान उदयाला येण्याची वाट बघत होते. त्यांच्या मते 'Homeopathy is the science of the future! (होमिओपॅथी हे उद्याचं शास्त्र आहे) हे म्हणजे
वर्तमानाचा होमिओपॅथीशी काही संबंध नाही, हे मान्य केल्यासारखेच होते.
होमिओ महाविद्यालयातील घुसमट थांबता थांबेना.
मग काही वेळ मी त्याग-त्याग खेळायला लागलो. डावे, उजवे, मध्यम वगैरे अनेक संघटनांचे अनेक पूर्णवेळ
कार्यकर्ते माझ्या परिचयाचे होते. माझ्या अप-या, अपु-या आणि भविष्यविहीन शिक्षणावर ‘पूर्णवेळ कार्यकर्ता' हा उपाय मला
बरा वाटू लागला. कार्यकर्ता होण्यासाठी आवश्यक तो बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक खंबीरपणा माझ्यात होता की
नाही माहीत नाही (बहुधा नव्हताच). पण एकदा कार्यकर्ता झालो की शिक्षणाच्या पंगुत्वासह मी जणू
कर्तृत्वाचा गिरी लंघून जाणार होतो. त्यात भरीस भर म्हणजे विलक्षण त्यागाची
प्रभावळ माझ्या टाळूमागे जन्मभर चिकटणार होती. माझा हा विचार आमच्या पॅथॉलॉजीच्या
प्राध्यापकांना मी जरा तोऱ्यातच बोलून दाखवला. स्वत: अतिशय विद्वान आणि
कर्तृत्ववान असणारे हे सर अतिशय मृदुभाषी होते. त्यांना माझ्या बोलण्याचा सूर
मुळीच आवडला नाही. प्रयत्नपूर्वक संयम राखत ते फक्त एवढंच म्हणाले, 'शंतनू, त्याग करण्यासाठी मुळात स्वत:कडे काहीतरी असावं लागतं!' हा बाण माझ्या जिव्हारी लागला. आपकमाई काही नसताना
आणि असण्याची शक्यता धूसर असताना मी हौतात्म्य मिळवू पाहत होतो. अहिंसा हे शक्तिमानांनी
राबवायचे धोरण आहे; भेकडांनी
नाही. भेकडांची अहिंसा म्हणजे सोयीस्कर पळवाट. तसंच काहीसं हे होतं. कर्तृत्वाचे पंख नाहीत
म्हणून धुळीत खितपत रहायचं आणि मग मी त्याग केला' म्हणून हाकाटी पिटून गगनाला गवसणी घालणा-या गरुडांना हिणवायचं! सरांच्या एका वाक्याने
उठवलेलं काहूर बरीच वर्षे मनात घोंगावत राहिलं.
पास झालो आणि उघड्यावर पडलो. होमिओपॅथी मला
फारसे पटत नव्हते; थातूरमातूर अनुभव
घेऊन लायकी, ज्ञान, पात्रता, कौशल्य आणि कायदेशीर मान्यता यांतील काहीच
नसताना अॅलोपॅथिक औषधे वापरून जी.पी. करणेही मला नको वाटत होते. कॉलेजच्या ५
वर्षांनंतर डॉक्टर असूनही ना मला औषध देता येत होते ना मी पदवीधर होतो. आमचा कोर्स
होता LCEH. परीक्षेनंतर दिल्ली बोडचे सर्टिफिकेट मिळे.
या कोर्सला इंटर्नशिपची तरतूद नव्हती. परीक्षा पास झालात की झालात तुम्ही डॉक्टर!
अर्धकच्चं शिक्षण आणि अनुभव तर नाहीच, या कोर्सला डिग्री म्हणूनही मान्यता नव्हती. डॉक्टर होऊनही आपण पदवीधर नाही, ही खंत मनात रुतून बसली होती. बी.एस्सी.
होमसायन्स झालेल्या माझ्या आतेबहिणीला पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबद्दल काही
टपाल आले. त्या वेळी मी नेमका तिच्या घरी होतो. आपण या पत्रास पात्र नाही, ही जाणीव मला व्याकूळ करून गेली.
मी पदवीधर नसल्यामुळे लॉ, जर्नालिझम, प्रशासन वगैरे अन्य पदव्युत्तर अभ्यासक्रम मला बंद होते. डॉक्टरकी सोडून एकदम
भलतीच लाइन धरणे म्हणजे उरलासुरला आब, आत्मसन्मान विसर्जित करण्यासारखे होते, सपशेल पराभव मान्य करण्यासारखेच होते. मी डॉक्टर झालो होतो आणि माझ्या
योग्यतेबद्दल सगळ्यात विपरीत मत माझेच होते. समाजाला नातेवाइकांना माझे कौतुकच
होते. माझ्यावर काय प्रसंग गुदरलाय, हे घरी सांगायची चोरी होती. बारावीत कष्ट कमी पडल्यामुळे मार्क कमी पडले होते
आणि याला मी जबाबदार होतो. मीच हा प्रसंग स्वत:वर ओढवून घेतला होता. आपलेच दात आणि
आपलेच ओठ यातलाच प्रकार, सांगणार कुणाला? यावर माझ्या परीनं मी जालीम उपाय शोधला.
मात्र उपाय जालीम ठरला तो या समस्येसाठी नाही, तर समस्याग्रस्तासाठी, म्हणजे
माझ्यासाठीच.
समस्येवर उपाय म्हणून मी होमिओपॅथीच्या
गांभीर्यपूर्वक मागे लागायचे ठरवले. होमिओपॅथी तर होमिओपॅथी, या क्षेत्रात तरी शिखर गाठून दाखवायचे, अशी ईर्षा जागवली. होमिओपॅथीबद्दल मनात शंका
होती. माझ्या शंकांचे निरसन होईल, कुठेतरी
कुणीतरी गुरू भेटेल, मार्ग दिसेल, होमिओपॅथीतील शास्त्रतत्त्वांचा साक्षात्कार
होईल, अशी आशा होती. त्यावेळी डॉ. ढवळे यांनी
स्थापन केलेल्या आय.सी.आर. (Institute of Clinical Research) या संस्थेचा होमिओ क्षेत्रात बराच बोलबाला आणि दबदबा होता. मीही या संस्थेची कार्यपद्धती
बघितली. सगळी पद्धत तंत्रशुद्ध होती. आधुनिक संकल्पनांचा थोडासा गंध होता, म्हटलं चला, होमिओपॅथीचं त्यातल्या त्यात शास्त्रीय शिक्षण मिळतंय तर घेऊ, मी मोठ्या उत्साहाने आणि आत्मविश्वासाने
प्रवेश अर्ज भरला. प्रवेशपरीक्षा दोन दिवस चालली. होमिओपॅथीबद्दल मी साशंक असलो, तरी अभ्यास चांगला होता. (अभ्यास सखोल
असल्यामुळेच शंका उगवत होत्या.) पण या परीक्षेत जेमतेम १०% प्रश्नच होमिओपॅथीबद्दल
होते. ९०% प्रश्न फक्त मनोविश्लेषणात्मक होते. एखादा प्रसंग, परिस्थितीचे चित्र देऊन त्यावर भाष्य करण्यास
सांगितले होते. शिवाय अनंत चित्रविचित्र वेडेवाकडे प्रश्न होते. कुटुंबाची सखोल माहिती विचारली होती. अगदी तुमचा आतोबा
काय करतो?, इथपर्यंत प्रश्न होते. दोन्ही दिवस चिकाटीने बसून मी ते बाड सोडविले.
निकालाला १५ दिवस होते. निकालाच्या दिवशी आश्वस्त पण बावरलेला मी ‘आयसीआर’च्या चालकांसमोर बसलो. ते म्हणत होते, ‘तुम्हाला आम्ही प्रवेश देऊ शकत नाही!
तुमच्यात आम्हाला वेडेपणाची झाक दिसते आहे!! तुम्ही डॉक्टर व्हायला नालायक आहात!!!
हे क्षेत्र सोडून तुम्ही सिनेमा, नाटक वगैरेत
जमतंय का बघा...’ मी सुन्नपणे
ऐकत होतो. असं काही होईल, हे माझ्या
ध्यानीमनीही नव्हते. जडशीळ झालेले अंग उचलत मी मोठ्या कष्टाने उभा राहिलो आणि जायला लागलो. इतक्यात ते पुढे
म्हणाले '... असं जाऊ नका. आम्ही तुमच्यावर उपचार करू शकतो; बाहेर पेपर काढा आणि बसा. तुम्ही होमिओ
डॉक्टर असल्यामुळे पन्नास रुपये कन्सेशन आहे.' मी अवाक् झालो. माझा होमिओपॅथीवरचा अविश्वास माझ्या उत्तरात कुठे ना कुठेतरी
डोकावला असणार, त्यांच्या मनोविश्लेषणात्मक प्रश्नांना मी
माझ्या विज्ञानवादी शैलीतच उत्तरे दिली होती. पण त्याचे परिणाम असे होतील, असे मला वाटले नव्हते. माझे विचार बागी आहेत
हे लक्षात येताच त्यांनी मला ठार वेडा ठरवून टाकले होते. भिन्न धर्मियांना 'काफर' ठरवणाच्या, भिन्न पंथीयांना बहिष्कृत करणाऱ्या, वर्णानुसार व्यक्तीचा वकूब जोखणाच्या धर्मांध
विचारधारेचेच हे एक रूप होते. तुम्ही आमच्याशी सहमत नसाल तर वेडे आहात, असा खाक्या. तिरीमिरीत मी उठलो आणि जिना उतरू
लागलो.
............................................................क्रमशः
सर, खूप छान लेख
ReplyDeleteThe most honest article I have ever seen !
ReplyDeleteTruth is always appealing..Great article . Straightforward
ReplyDeleteपुढील भागाची सूचना , दुवा( लिंक) येथेच हवी होती.
ReplyDeleteपुढील भाग कधी प्रसिद्ध झाला/होणार आहे? उत्कंठा लागलीय म्हणून विचारतोय. - विजय पाध्ये, v.wordsmith@gmail.com (98220 31963)
ReplyDelete