Saturday 19 August 2023

वेस

ही वाईतली वेस

फोटो काढलाय मित्रवर्य डॉ. प्रशांत रसाळ यानी, बाकी कवित्व माझे ☺️


त्या वेशीच्या अवतीभवती
गजबजलेले गाव

जीर्ण वेशीवर मुळी धरोनी
पिंपळ करतो घाव 

त्या वेशीवर भगवा झेंडा 
फडके पण डौलाने 

वाई वैभव जुने सांगतो, 
फडकत नव वाऱ्याने

Friday 18 August 2023

प्रिय बाबांना

काही दिवसापूर्वी मला हे निनावी पत्र मिळालं.
लिहिणारी मुलगी माझी वाचक, फॉलोअर, फॅन वगैरे आहे म्हणे. 
घरी पाठवलेल्या पत्राची प्रत तिने मला पाठवली.
वाचून मी विचारात पडलो.
यावर लेखही लिहिणार होतो.
पण पत्रातली तळमळ लेखात उतरेना.
म्हणून हे मूळ पत्र. 



प्रिय बाबांना,
सा. न. वि. वि.
मी तुम्हाला सावध करायला आणि दादूला वाचवायला हे पत्र लिहिते आहे. घरातला कोणीतरी डॉक्टर असावा ही तुमची इच्छा, तिची झाली महत्त्वाकांक्षा; मग तुम्ही ती माझ्यावर लादलीत! खरं तर आपण कोणावर काही लादतोय हे त्यावेळी तुम्हालाही कळलं नव्हतं आणि मलाही. त्यामुळे तुम्हाला माफ. आणि खरं सांगायचं तर माझं विशेष असं नुकसान सुद्धा झालं नाही, निदान अजून तरी नाही. माझं भलं झालंय असं वाटून आता तुम्हाला पुन्हा लालसा होते आहे.
पण आता दादाच्या वेळी ही चूक पुन्हा करू नका. मला घातलेत तसे पर्यायी वैद्यकीच्या कुठल्याही कॉलेजला त्याला घालू नका. त्याला मार्क कमी आहेत, त्याला चांगल्या प्रस्थापित वैद्यकीच्या कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळणार नाही. पुन्हा प्रयत्न करायचा असेल तर करू देत. नसेल करायचा तर वैद्यकीचा नाद सोडून अन्य पर्याय निवडू दे, पण या वाटेला, चुकून सुद्धा त्याला या वाटेला, पाठवू नका. तुमच्या वेळची गोष्ट वेगळी होती. डॉक्टर, इंजिनियर सोडून पुष्कळ पर्याय आहेत आता.
आपला करियर ऑप्शन चुकला हे इथले बहुसंख्य सिनीयर विद्यार्थी मान्य करतात, अर्थात खाजगीत. पर्यायी वैद्यकीचा पर्याय किती चांगला आहे, हे आमच्या कॉलेजच्या प्राचार्यानीच, तुम्हाला अगदी घरी येऊन पटवून दिलं आहे, हे मला माहीत आहे. त्यांना विद्यार्थी गटवावे लागतात! त्यांना टार्गेट गाठायचे आहे, बाबा. त्यांना दादूच्या रूपाने आणखी एक सीट हवी आहे. या सगळ्या मागचे इकॉनॉमिक्स समजावून घ्यायला पाहिजे. माझी तर आता इंटर्नशिप संपत आली. पण बाहेर पडलेल्या सिनीयर्सची अवस्था मी बघते. अत्यंत वाईट परिस्थिती आहे. सरकारी नोकरीत संधी अगदी तुरळक. दुय्यम नोकरी किंवा जेमतेम प्रॅक्टिस असे दोनच पर्याय उरतात शेवटी. निव्वळ ‘पर्यायी’ प्रॅक्टिसवर भरवसा नाहीच ठेवता येत. 99.99% लोकांना अॅलोपॅथीची कास तर धरावीच लागते. अगा जे शिकलेची नाही, त्याची प्रॅक्टिस करिसी काही, अशी अवस्था होतेच होते. तुटपुंजे ज्ञान आणि कायद्याची भीती, यातून वाट काढत प्रॅक्टिस अशी किती चालणार? आजकाल पेशंटही अती चौकस झाले आहेत. जी ती गोष्ट गुगल करतात, वेडेवाकडे प्रश्न विचारतात, शब्दात पकडतात, उक्ती आणि कृतीतून थोडे थोडे अपमान सुद्धा करतात. मला नाही वाटत, हे सारं दादूने जन्मभर सोसावं.
डिग्रीनंतर इथे फारसे काही शिकायचीही संधी नाही. शिकायचे काय तर तीच कुचकामी विद्या. डिग्रीचे पोकळ भेंडोळे ठेवायला, पदव्युत्तर पदवीचे एक आणखी एक मोठ्ठे पोकळ नळकांडे. नावापुढे मारे एमडी गायनॅक लिहितील पण पर्यायींना वैद्यकीय गर्भपात किंवा सोनोग्राफीची परवानगी नाही. सध्या सोनोग्राफीशिवाय या क्षेत्रात पानही हलत नाही. कशी प्रॅक्टिस करणार? काही जणांना सर्जरी वगैरे शिकायला मिळते पण त्या बरोबर आधुनिक औषधे वापरण्याला लाल-पिवळा कंदील. कोणती वापरू शकतो, कोणती नाही, सगळाच धूसर कारभार. फट म्हणता निष्काळजीपणाचा आरोप होण्याच्या जमान्यात आहोत आपण. किती टेंशन येईल दादूला, अशी सतत टांगती तलवार घेऊन प्रॅक्टिस करायची तर. बरं, परदेशी जाईल म्हटलं तरी या डिग्र्यांना तिथे किंमत शून्य.
एरवीसुद्धा सतत दुय्यम वागणूक मिळते बाबा. समाजच काय पण सरकारही सतत पाणउतारा करते; म्हणून सारखे अर्ज, विनंत्या, मोर्चे चालू असतात इथे. पर्यायी आणि प्रस्थापित समतुल्य नाहीत, सबब सारखे पगार वगैरेची अपेक्षा नको, असं तर सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. तुम्ही नाही, पण काहींच्या घरचेसुद्धा धड बोलत नाहीत. या साऱ्यांचं तरी काय चुकलं म्हणा? म्हणायचं चल तुला पायलट करतो आणि शिकवायचं कागदी विमान उडवायला; अशातलं शिक्षण आहे हे. दादूला हे पटायचं नाही. दादू हुशार आहे. चार दोन मार्कांनी हुकली अॅडमिशन म्हणून काय झालं. किती वाचन आहे त्याचं. बोलतो कसला भारी. क्विझ किती सहज जिंकतो. त्याची बौद्धिक उपासमार होईल या वातावरणात. न्यूनगंड निर्माण होईल त्याला. इथे हास्यास्पद, कालबाह्य सिद्धांत शिकावे लागतात. इथे कोणत्याच औषधाची परिणामकारकता आणि सुरक्षितता आकडेवारीने सिद्ध नाही. राजा विवस्त्र असतानाही त्याच्या भरजरी कपड्यांची तारीफ करावी लागते इथे. तो बिचारा प्रामाणिक आहे. त्याला नको इथे.
मला सांगा, पर्यायी वैद्यक भारी आहे, श्रेष्ठ आहे, प्रस्थापित वैद्यकीला जर ‘पर्याय’ आहे तर या पर्यायी वैद्यक संस्था, संघटनांना ब्रिज कोर्सची मागणी का करावी लागते? हे विचित्र नाही वाटत तुम्हाला? शिवाय हा पूल ‘पर्यायी’पासून प्रस्थापित विद्येकडे हवा आहे. मग हा पूल एकेरी वाहतुकीचा का? उलट दिशेने, या दिव्य विद्यांकडे कोणीच का फिरकत नाही? तशी मागणी कोणीच का करत नाही? आणि जर का या पर्यायी विद्या त्यांचे ठेकेदार सांगतात तशा स्वयंभू आहेत, यच्चयावत व्याधी सहज दूर करणाऱ्या आहेत, प्राचीन आणि म्हणून स्वयंसिद्ध आहेत; तर मग एका दिव्य पद्धतीकडून दुसऱ्या दिव्य पद्धतीकडे जाणारे ब्रिज कोर्स का नसावेत? अशी मागणी का होत नाही? कारण स्पष्ट आहे बाबा, कारण हे सगळे पर्यायी एकाच माळेचे मणी आहेत. तितकेच अवैज्ञानिक आणि पोकळ; तितकेच छद्म आणि भोंगळ. मग नागड्या घरी उघडं जाऊन काय फायदा? म्हणून सगळ्यांना ब्रिज कोर्स हवाय तो आधुनिक वैद्यकीच्या दिशेने जाणारा.
बाबा, इथल्या शरीर रचनेच्या, शरीर कार्याच्या कल्पनाच काल्पनिक आहेत. त्याला ना आगा ना पिछा, ना शेंडा ना बुडखा, ना व्याख्या ना काही, मग या संकल्पनांवर उभारलेला व्याधी-शास्त्राचा आणि उपचार-शास्त्राचा डोलारा हा हवेतला मनोरा ठरतो. हे असलं शास्त्र, आरोग्यविज्ञान म्हणून आमच्या माथी मारलं जात आहे. इथे येणारी सारी मुलं-मुली परिस्थितीशरण आहेत. तडजोड केलेली आहेत. मनानं खचलेली आहेत. दुय्यम, तिय्यम किंवा अखेरचा पर्याय म्हणून नाईलाजाने इथे वळली आहेत. काही आई बाबांची इच्छा म्हणून आणि प्रस्थापित वैद्यक कॉलेजची फी परवडत नाही म्हणून, इथे आहेत. आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलेलंच असतं, बाबा, फक्त चार लोकांत तसं उघडपणे बोलणं त्यांना कधीच शक्य होणार नाही. आमच्या शास्त्रात काही दम नाही असं उघडपणे सांगणार तो स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणार, नाही का? दादुला ह्या मृगजळामागे नका तांगडू.
आणि मला तुम्ही इथे का घातलं हे का मला ओळखता येत नाही? एक तर मी मुलगी. नावामागे डॉ.चा टिळा लागला की माझ्यापेक्षा अधिक शिकलेला डॉक्टर, नवरा म्हणून मिळण्याची हमी. हा तुमचा साधा सरळ हिशोब आणि जातीतली मिळाली, शिवाय ती डॉक्टर, हा नवऱ्याचा साधा सरळ हिशोब. हे सगळं तुम्हाला दिसत होतं म्हणून मी इथे. माझ्या वर्गात 90 टक्के मुली आहेत. त्या देखील याच कारणाने येतात. मुलगे बिचारे इथे कोपऱ्यात बसतात आणि अंध:कारमय भविष्याची चिंता करतात. काही ना काही तरी जोडधंदे केल्याशिवाय भागत नाही त्यांचं. खरच सांगते, त्यांना लग्नासाठी स्थळ मिळणेसुद्धा अवघड जातं.
आपण वाट चुकलो हे माझ्या लक्षात आलं आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करून, मनोमनी आपली पात्रता निव्वळ बारावी पास एवढी आहे हे जाणून अन्य पर्याय मी शोधणार आहे. जर्नालिजम, एमपीएससी, युपीएससी, असं काहीही. मीच का, इथे आलेले आम्ही सर्वच विद्यार्थी फसवले गेलेलो आहोत. आम्ही अभ्यासक्रम-ग्रस्त आहोत. तसं कोणी म्हणत नसलं, तरी ब्रिज कोर्स हा तर सरळसरळ पुनर्वसनाचा प्रयत्न आहे. आलो होतो विज्ञान शिकायला पण कुडमुडे डॉक्टर होऊन आम्ही बाहेर पडणार आहोत. चार लोकांत सांगायची देखील चोरी असणार आहे. आयुष्यभर तोंड दाबून बुक्क्यांचा मार. दादू मानी आहे, संवेदनशील आहे, तर्कनिष्ठ आणि विज्ञान-प्रेमी आहे. हे असले जिणं दादूच्या वाट्याला यायला नकोय मला. म्हणून सांगते मी बाबा, त्याला या वाटेला ढकलू नका.
बाकी पर्यायी पद्धती खऱ्या-खोट्या-छद्म वगैरे काहीही ठरू दे, आज तरी व्यवसाय म्हणून पर्यायीचा पर्याय टाळणे योग्य एवढेच माझे सांगणे.
तुमची ताई
आणि
त्या दादूची ताईटली