Tuesday, 31 August 2021

विज्ञान म्हणजे काय? तर्कात दोष कोणते असू शकतात? लेखांक ९

 

विज्ञान म्हणजे काय?

तर्कात दोष कोणते असू शकतात?

डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.

लेखांक ९

 

तर्क आणि निष्कर्ष याची अत्यंत उपयुक्त सांगड घालायला, विज्ञान नावाची युक्ति आपल्याला शिकवत असते. पण जसे अपरिचित वाटा धुंडाळताना आपल्याला कधी कधी चकवे लागतात तसे ते विचार करतानासुद्धा लागतात. यांनाच वाटा  समजणे याला म्हणतात तर्कदोष. चुकीचा तर्क.  अशा कुतर्कांपासून,  चकव्यांपासून, आपण सावध असायला  हवं. यातून शिकता यायला हवं.  वैज्ञानिक पद्धत आपल्याला झटपट  विचार करून असे तर्कदोष ओळखायला मदत करते. आपल्या आणि इतरांच्या विचारातल्या चुका शोधायला मदत करते.

मित्रांशी भांडायची वेळ तर येतेच. कधी एखाद्या विषयावर शाळेत वादविवाद  स्पर्धा असते. वादविवाद स्पर्धा, म्हणजे भांडायचीच तर स्पर्धा असते. पण इथे जोरात ओरडणे, वेडावून दाखवणे वगैरेला  शून्य महत्व. विरोधी पक्षाच्या म्हणण्यातले दोष दाखवणे आणि त्यांचे विचार   मुद्देसूदपणे, खोडून काढण्याला इथे महत्व आहे. खंडन मंडन अशी भारतीय परंपराच  आहे. खंडन मंडन म्हणजे दुसऱ्याचे  मुद्दे खोडणे आणि त्याहून उत्तम, तर्कशुद्ध, असे मुद्दे मांडणे.   पण समोरच्याने जो विचार मांडला  आहे, जो तर्क रचला आहे, जो युक्तिवाद केला आहे, त्यातील त्रुटी आपल्या पटकन लक्षात यायला हव्यात. मगच  आपल्या विरोधकांवर आपण तुटून पडू शकतो. त्याच बरोबर, आपल्या म्हणण्यात, ह्याच चुका तर नाहीत ना, हे ही तपासून पाहू शकतो.

उदाहरणार्थ, ‘अ’ या  घटनेनंतर समजा  ‘ब’ ही  घटना घडली. पण  म्हणून ‘ब’ ही घटना  ‘अ’मुळे घडली असं दरवेळी म्हणता  येत नाही. खरं तर हे समजावून घेणं काही अवघड नाही. ‘कावळा बसायला आणि फांदी मोडायला एकच गाठ’ असं आपण म्हणतोच की. या म्हणीचाही  हाच अर्थ आहे. फांदी मोडणारच होती. कावळा फक्त ‘निमित्त’ ठरला, फांदी मोडण्याचे  ‘कारण’ नाही. (Post Hoc Fallacy)

वैद्यकशास्त्राचा अभ्यास करताना जर  हे लक्षात घेतलं नाही तर गोंधळून जायला  होतं. समजा एखाद्याला ‘आ’ नावाचा काही आजार झालाय  आणि त्याला  आपण ‘औ’ नावाचं काही औषध दिलं. काही काळाने त्याचा ‘आ’ हा आजार पूर्ण बरा झाला. यावरून तुम्ही काय निष्कर्ष काढाल? ‘औ’ हे औषध ‘आ’ या आजाराला उपयुक्त आहे, असाच ना? पण हे इतकं सोपं नसतं. हा आजार आपोआप बरा झालेला असू शकतो. तात्पुरता बरा झालेला असू शकतो. निव्वळ विश्रांती घेतल्याने बरा झालेला असू शकतो. इतकंच काय निव्वळ औषध घेणे या कृतीने सुद्धा  रुग्णाला आराम पडूलेला असू  शकतो. म्हणजे प्रत्यक्षात त्याला साखरेच्या गोळ्या जरी दिल्या तरी आपण औषध घेतोय या कल्पनेनी त्याला बरं वाटतं. याला म्हणतात ‘इष्टाशा परिणाम’ (Placebo Effect). आता या औषधामुळे आपल्याला  बरं वाटणार.  काही तरी इष्ट  घडणार, चांगले घडणार, या आशेने बरे वाटायला लागणे. 

त्यामुळे कोणत्याही औषधाची कामगिरी ही आपोआप बरे वाटणे, कल्पनेनी बरे वाटणे, वगैरेपेक्षा सरस आहे हे सिद्ध व्हावं लागतं. तरच ‘औ’ हे औषध ‘आ’वर गुणकारी आहे असं म्हणता येईल. अशा चाचण्या नेहमीच केल्या जातात. आजाऱ्यांच्या एका गटाला औषध आणि दुसऱ्या गटाला औषधासारखाच रंग, गंध,  आकार  असलेल्या, पण औषध नसलेल्या, गोळ्या दिल्या जातात. मग  कोणाला किती प्रमाणात फरक पडला याच्या सविस्तर नोंदी केल्या जातात. या प्रयोगाचा अभ्यास करून मगच पक्के निष्कर्ष काढले जातात. थोडक्यात, ‘औषधानंतर आजाराला उतार पडला, म्हणजे तो औषधांमुळे पडला,’  असं समजणं चूक आहे.

असंच आणखी एक उदाहरण पाहू. हिवताप, हा आजार तुम्हाला माहीत आहे. याला इंग्रजीत मलेरिया म्हणतात. मलेरिया या शब्दाचा अर्थ ‘वाईट हवा’. दलदलीच्या प्रदेशात हिवताप सर्रास असतो. इथल्या वाईट हवेमुळे तो होतो अशी समजूत होती. म्हणून  त्याला  मलेरिया हे नाव पडले. पण आता तो वाईट हवेमुळे नाही तर मलेरियाच्या जंतूंमुळे होतो हे आता आपल्याला कळले आहे. हे जंतू डासांद्वारे पसरतात, हे कळले आहे. दलदलीच्या प्रदेशात डास जास्त  असतात, हे कळले आहे.  तेंव्हा मलेरियचा संबंध हवेशी नसून डासांद्वारे पसरणाऱ्या  जंतूंशी आहे. दलदल असते तिथे मलेरिया असतो, हे जरी खरं असलं तरी तिथल्या  ‘वाईट हवेमुळे मलेरिया होतो’, हे चूक आहे. जिथे वाईट हवा तिथे मलेरिया असा  संबंध जरी जोडता येत असला, तरी तो फक्त वरवरचा आहे. वाईट हवा हे मलेरियाचे ‘कारण’ नाही.

पण आता आपल्याला मलेरियचे कारण सापडले आहे म्हणून आपण असं म्हणू शकतो. जेंव्हा कारण माहीत नव्हते तेंव्हा असे संबंध शोधत शोधत, ते जोडत जोडतच पुढचा मार्ग सापडत गेला आहे. वाईट हवा, दलदल, विशिष्ठ डास, उष्ण हवामान अशा अनेक गोष्टींचा मलेरियाशी संबंध होता. शेवटी कारण सापडले.  ते म्हणजे अॅनाफिलीस डासाच्या, मादीच्या, पोटात वाढणारा, प्लासमोडियम नावाचा, सूक्ष्म परोपजीवी! 

वाईट हवा, दलदल, विशिष्ठ डास, उष्ण हवामान यांच्याशी  निव्वळ संबंध सापडला म्हणजे कारण सापडले असे झाले नाही. संबंध वरवरचे आहेत का ‘कारण’ म्हणून आहेत हे शोधावे लागते.  विज्ञान नावाची युक्ति आपल्याला असे सांगते.  (Correlation is not necessarily causation.)

कोंबडा आरवल्यावर सूर्य उगवतो.  पण  कोंबडा आरवल्यामुळे सूर्य  उगवत नाही. कोंबडा आरवणे आणि सूर्य उगवणे यांचा संबंध फक्त वरवरचा आहे. म्हणूनच ‘म्हातारीनं कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही’, अशी म्हण रूढ झालेली असावी.

आपला कोंबडा आरवल्यावर सूर्य उगवतो असा संबंध कोणत्यातरी म्हातारीच्या लक्षात आला असेल. त्या चलाख म्हातारीनं   प्रयोग योजला असेल. कोंबडा झाकून ठेवला असेल. आता सूर्य उगवतो का नाही ते पाहू, असं ठरवलं असेल. त्या दिवशी सूर्य नेहमीसारखाच उगवलेला पहाताच हा संबंध निव्वळ वरवरचा आहे हे तिच्या लक्षात आलं असेल. मग मनात धरलेलं, ‘कोंबडा आरवल्यामुळे सूर्य उगवतो’, हे गृहीतक तिनं नापास केलं असेल.   आणि लोक हसत हसत म्हणाले असतील, ‘म्हातारीनं कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही, बरं’.

ही तर कितीतरी जुनी म्हण आहे. काही म्हणीसुद्धा आपल्याला अशा वैचारिक चकव्यांपासून सावध करण्याचं काम करत असतात.

शितावरून भाताची परीक्षा, अशीही  एक म्हण आहे. एक शीत बोटात दाबून, सगळा  भात शिजला आहे की नाही हे तपासलं जातं. आपली आई, आजी रोज हेच करत असतात. विज्ञानातही असंच केलं जातं. काही थोड्याच गोष्टी तपासून मोठ्ठा निष्कर्ष काढला जातो. पण यातही तर्कदोषापासून सावध असायला हवं.  

समजा संध्याकाळची वेळ आहे. मी एका गावात पोहोचतो आहे. गाव लहानसंच आहे. सुमारे पाचशे उंबऱ्याचं.  वेशीपाशीच मला पोरांची झुंबड दिसते. सगळी लहान मुलंच. मोठं माणूसच नाही. मग मी असा निष्कर्ष काढतो की, ‘या गावात फक्त लहान  मुले  रहातात!’ अर्थातच हा निष्कर्ष चूक आहे.

इथले  थोडेसे गावकरी पाहून, मी अख्ख्या गावाबद्दल माझं मत बनवलं आहे.  गावाबाहेर शाळा आहे. शाळा  नुकतीच सुटली होती.  म्हणून मला मुलेच मुले  दिसली. तेंव्हा जे कोण थोडे गावकरी मी पहिले,  ते सगळे शाळकरीच  निघाले. थोडक्यात शितावरून भाताची परीक्षा  करायची तर आधी ते ‘शीत’ निट निवडायला लागतं. (Representative Sample) इथे भाताबद्दल, म्हणजे गावाबद्दल माहिती घ्यायची होती. त्यासाठी मी ‘शीत’, म्हणजे थोडेसेच गावकरी, बघितले.  तेही  शाळेसमोरच्या रस्त्यावरचे. तेही शाळा सुटायच्या सुमाराचे.  त्यामुळे माझा निष्कर्ष चुकला. तर्कदोष  म्हणतात तो हाच. जर मी गावातल्या प्रत्येक  पंचविसाव्या घरी जाऊन प्रत्यक्ष जनतेची माहिती घेतली असती तर माझा गावाच्या लोकसंख्येबाबतचा  निष्कर्ष  बिनचूक ठरला असता. जर, दर दहाव्या घरी गेलो असतो, तर आणखी बिनचूक ठरला असता  आणि दर  पाचव्या घरी गेलो असतो, तर आणखीही  बिनचूक ठरला असता.

बरेचदा नको त्या माहितीमुळे आपलं लक्ष मूळ मुद्यावरुन विचलित होतं आणि आपला निष्कर्ष चुकतो (Distraction Fallacy). कोडी घालताना ही युक्ति बरेचदा वापरली जाते. उदाहरणार्थ, एका देवळाच्या कळसावर एक कोंबडा बसला आहे. त्याचे तोंड उत्तरेला आहे.  देऊळ दक्षिण गोलार्धात आहे.  पूर्वेकडून पश्चिमेकडे  जोरदार वारा वाहतो आहे. तर त्यानी घातलेलं अंडं   कुठे पडेल? उत्तर आहे; कोंबडा अंडं घालतच नाही. कोंबडी अंडं घालते! थोडक्यात तोंडाची दिशा, गोलार्ध, वारा, वगैरे माहिती म्हणजे नुसता फाफटपसारा  आहे.  थोडक्यात माहितीच्या पसाऱ्यातून उपयुक्त  तेवढी माहिती नेमकी हेरायला  आपल्याला शिकावे लागते. विज्ञान नावाची युक्ति आपल्याला हे शिकवते.

गोलमाल तर्कदोष, (Circular argument)  असाही एक प्रकार आहे बरं. एकदा माझा मित्र सांगू लागला,

‘भुते असतात.’

‘कशावरून?’ मी.  

‘कारण आमच्या गावच्या माळरानावर  एक  आहे!’ मित्र.

भुते असतात ह्याचा कोणताच पुरावा, कोणतेच कारण  इथे नाही. ‘माळरानावर भूत आहे’, हे वाक्य म्हणजे,  भुते असतात हेच पुन्हा सांगितले आहे. भुते असतात, याचा हा  काही पुरावा नाही. हा गोलमाल तर्क झाला. भुते माळरानावर असतात, पिंपळावर असतात, स्मशानात  असतात, वगैरे वाक्येही अशीच.   मूळ म्हणणे, फक्त वेगळ्या शब्दात तेवढी मांडणारी.

‘ह्या पुस्तकात लिहिलेले सगळे खरे आहे. त्यावर डोळे  झाकून विश्वास ठेवा.’

‘कशावरून?’

कारण ह्यातील प्रत्येक वाक्य सत्य आहे असं त्या पुस्तकांतच म्हटलं आहे!!’

हा झाला गोलमाल कु-तर्क. 

‘हवा दिसत नाही कारण ती अदृश्य असते’; हे वाक्यही असेच गोलमाल कुतर्काचे उदाहरण आहे. ‘दिसत नाही’ याचाच तर अर्थ ‘अदृश्य’ असा होतो ना.

विज्ञानाचे आणखी एक तत्व आहे. सगळ्यात सरळसोट, सोप्पे आणि कमीतकमी गृहितके असलेले स्पष्टीकरण सगळ्यात लागू पडते (Occams Razor). उदाहरणार्थ, काल मी मोबाइल स्कूटरच्या डिकीत विसरलो. आज डिकीतून काढून   पहातो तो मोबाइल बंद! काय बरं कारण असावे? संभाव्य कारणे तर  अनेक आहेत.

१.    चार्जींग संपले आहे.

२.    कोणीतरी बॅटरी काढून घेऊन गेले आहे.

३.    परग्रहवासी येऊन माझ्या फोनला, ‘तू बंद पड’, अशी आज्ञा  देऊन गेले.

अर्थातच, चार्जींग संपले आहे, हे सगळ्यात संभाव्य उत्तर आहे. हे सगळ्यात सोप्पे आणि कमीतकमी गृहितके असलेले उत्तर आहे.  म्हणूनच हे  सगळ्यात संभाव्य उत्तर आहे. फोन चार्जींगला लावताच तो चालू झाला तर आपला अंदाज अगदी बरोबर आहे, हे कळेलच.

कोणीतरी बॅटरी काढून घेऊन गेले असणे शक्य आहे. पण त्यासाठी कोणीतरी आलं, डिकी उघडली, फक्त फोनची बॅटरीच घेतली अन् कोणालाही न  दिसता  निघून गेलं, इतक्या सगळ्या गोष्टी गृहीत धराव्या लागतील. नेणारा  फक्त बॅटरीच  का नेईल? फोनच नेईल की.  याचेही स्पष्टीकरण हवे.

परग्रहवासी येऊन ‘हे बॅटरी, तू  डिस्चार्ज हो’, अशी आज्ञा देऊन  गेले आहेत; हे कारण तर अगदीच तकलादू. परग्रहवासी  आले, यानबीन कुणाला दिसलंच नाही, ते ही   कुणाला दिसले नाहीत, त्यांनी फक्त माझ्याच  फोनला आज्ञा दिली आणि त्यांची ती आज्ञा माझ्या फोननी पाळली.   अशा कितीतरी गोष्टी गृहीत धराव्या लागतील.   जितकी कमी गृहितके तितका अंदाज अधिक बरोबर.

आपल्या विचारांच्या पद्धतीत  आणि निष्कर्ष काढण्यात असे अनेक घोटाळे होत असतात. विचार करण्याची योग्य पद्धत शिकलो नाही, त्यातले खाचखळगे लक्षात घ्यायची सवय लावून घेतली नाही, तर दिवसातून अनेकदा फसू आपण. जाहिरातदार तर या आपल्या वैगुण्याचा भरपूर वापर करून घेतात. 

 अमुक एक क्रिकेटर वापरतो म्हणून अमुक एक टॉनिक उत्तम असणार, अमुक नटी वापरते म्हणून अमुक वॉशिंग  पावडर भारी;  असंही आपण समजतो (Ad Hominem).  खरतर क्रिकेटरला टॉनिक मधलं आणि नटीला वॉशिंग पावडर मधलं काही कळत नसतं.  त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात ते उत्तम असतात. पण म्हणून त्यांनी हातात घेऊन नाचवलेलं टॉनिक किंवा वॉशिंग पावडर घ्यायला आपण भाग पडायचं काय कारण? अशास्त्रीय विचार; दुसरं काय? (Appeal to Authority).

 अमक्यानं   लकी लॉकेट घातलं  आणि  त्याचं नशीब फळफळलं, ग्रहदशा फिरल्यामुळे तमक्याचं वाटोळं झालं;  (False Analogy) हे ही तर्कदोषच आहेत.   कधी इतर चार जणं करतात म्हणून आपण तसंच करतो. ‘कळपातल्या  मेंढरासारखं’ (Bandwagon fallacy) वागतो आपण.   मित्रांकडे असलेलाच मोबाईल हवा, मैत्रिणींनी लावलेलाच क्लास उत्तम.  तोच लावायला हवा.  असले हट्ट सुद्धा विचारशक्ती गहाण टाकल्याचे, सारासार विवेक नसल्याचीच लक्षणे आहेत.

जेंव्हा आपण विज्ञान शिकतो तेंव्हा तर्क आणि तर्कदोष  यातील भेद आपण नीट आत्मसात  केले पाहिजेत. आपले वागणेही तर्कशुद्ध आहे ना, हे सतत तपासले पाहिजे. विज्ञान म्हणजे निव्वळ गाड्या, टीव्ही, चंद्रावर स्वारी एवढंच नाही. विज्ञान नावाची युक्ती आपल्याला रोजचे  जगणेही उत्तम आणि विवेकी रीतीने जगायला   शिकवते.

प्रथम प्रसिद्धी

किशोर मासिक, सप्टेंबर २०२१