Friday 30 April 2021

छद्मवैद्यक आणि पर्यायी, पारंपरिक आणि पूरक उपचार

 

    छद्मवैद्यक आणि पर्यायी, पारंपरिक आणि पूरक उपचार

डॉ. शंतनु अभ्यंकर

 

छद्मवैद्यक म्हटल्यावर माझ्या डोळ्यासमोर  प्रथम नाव येतं ते होमिओपॅथीचं. त्यामुळे इथे उदाहरणे होमिओपॅथीची घेतली आहेत. शिवाय मी होमिओपॅथीचा(ही) पदवीधर असल्याने या क्षेत्रातला माझा अभ्यास थेट होमिओपॅथीशीच निगडीत आहे.  छद्म वैद्यकीचे हे ढळढळीत उदाहरण. बाकी काही प्रमाणात शास्त्रीय, काही प्रमाणात अशास्त्रीय अशी बरीच आहेत. 

या सगळ्याला मिळून पर्यायी, पारंपरिक आणि पूरक (पपापू) उपचार पद्धती म्हटलं जातं. यांची लांबच्या लांब  यादी आहे.  जगभरच्या अनेक पारंपारिक उपचार पद्धती यात येतात.  तसंच जगभरातल्या चित्रविचित्र कल्पना असणाऱ्या लोकांनी निर्माण केलेल्या अगदी  अलीकडच्या काही ताज्या उपचारपद्धतीही या सदराखाली येतात.  

आपलीच  पॅथी आधुनिक वैद्यकीला पर्याय आहे  असा अनेक पॅथीपंथियांचा दावा असतो. याउलट या उपचारपद्धती म्हणजे शुद्ध भोंदूगिरी आहे, त्या अत्यंत अशास्त्रीय आहेत आणि उपचार होण्याऐवजी अपाय होण्याची शक्यता अधिक आहे, असा दावा  आधुनिक वैद्यकवाले तावातावाने करत असतात. पॅथी-पॅथीच्या या भांडणात, ‘तुमचंही बरोबर, यांचंही बरोबर, दोघेही आपापल्या जागी श्रेष्ठ आहेत’, असा समन्वयवादी सूर लावणारे बोके  नेहमीच समाजमान्यतेचे लोणी पळवून नेतात.    

 ज्याचं जळतं त्यालाच कळतं, त्यामुळे पेशंटना या वादावादीत काडीचा रस नसतो.  त्यांना फक्त बरं वाटण्याशी मतलब. कोणाच्या का कोंबड्याने असेना, सूर्य उगवला की झालं, अशी त्यांची भूमिका असते.  हे ठीक आहे पण इतर अनेक क्षेत्रांप्रमाणे इथेही आंधळा विश्वास घातक ठरू शकतो.

 ‘वैज्ञानिक पुराव्याची मला गरज नाही कारण विज्ञानाला न समजलेल्या अशा बऱ्याच गोष्टी आहेतच की!’ हे वाक्य चमकदार आहे खास. चमकदार आहे आणि विज्ञानाला सगळं समजलेलं नाही, हे  खरंही  आहे. तुम्हालाच काही माहीत नाही तर आम्हाला शहाणपणा शिकवणारे तुम्ही कोण?, असा उरफाटा सवालही  केला जातो. विज्ञानाला  बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत, पण आपल्याला काय काय माहित नाही, हे विज्ञानाला माहीत आहे. विज्ञानाला  बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत, म्हणून  हे काजळकोपरे   कल्पनाशक्तीने भरून काढण्याचा अधिकार विरोधी पक्षाला आपोआप प्राप्त होत नाही.  अज्ञाताच्या शोधातच विज्ञानाची प्रगती दडलेली आहे.  म्हणूनच पुरेशा पुराव्याअभावी केलेला कोणताही दावा विज्ञान नाकारतं.

मुळात आधुनिक वैद्यक आणि पपापू   यांच्या  पुराव्याच्या संकल्पनाच भिन्न भिन्न आहेत.  आधुनिक वैद्यक ज्याला पुरावा मानतं आणि पपापू  ज्याला पुरावा समजतात त्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. पुराव्याच्याही परी असतात. साराच पुरावा एका लायकीचा नसतो. अर्थात काही नवीन शोधणारा  प्रत्येकजण माझाच पुरावा पुरेसा, असा दावा करतोच. त्यामुळे कोणता आणि किती पुरावा म्हणजे पुरेसा, हे ठरवणारं शास्त्र दरवेळी लक्षात घ्यावं लागतं. यानुसार आचरण करण्याचा, पुराधिष्ठित वैद्यकी (Evidence Based Medicine) आचरणात आणण्याचा, आधुनिक वैद्यकीचा प्रयत्न आहे.

पुराव्याच्या शास्त्रानुसार वैयक्तिक अनुभव, वैयक्तिक निरीक्षणे, गोष्टीरूप पुरावा, पेशंटची खुशीपत्रे  हा सर्वात दुय्यम पुरावा. प्रयोगशाळेतील प्रयोग, प्राण्यांवरील प्रयोग हे त्याच्या वर. मग पुढे एखाद्या पेशंटला आलेला गुण, अनेक पेशंटना आलेला गुण, रोग्यांचा नियोजनबद्ध  तुलनात्मक अभ्यास (केस कंट्रोल स्टडीज स्टडी), एपिदडेमिओलॉजीकल स्टडी, यादृच्छिक बृहदांध चाचणी (रॅंडमआइज्ड डबल ब्लाइंड ट्रायल)  आणि अशा अनेक चाचण्यांच्या निष्कर्षांचे महा विश्लेषण (मेटा अॅनालिसिस)  असे चढते थर आहेत.

तळाशी आहे, गोष्टीरूप पुरावा. आऊच्या काऊला बरं वाटलं, ‘देशोदेशीचे वैद्य हकीम झाले पण गुण येईना, शेवटी....’, अशा पद्धतीचा गोष्टीरुप पुरावा. पपापू  मंडळींना असला पुरावा अति प्रिय असतो. पण एक गोष्ट म्हणजे पुरावा आणि अनेक गोष्टी म्हणजे सज्जड पुरावा हे समीकरण बरोबर नाही. कारण कथाकथन  पूर्वग्रहदूषित, सोयीचं तेवढच सांगायचं असं असू शकते.  फारतर संशोधन कोणत्या दिशेने व्हायला हवं हे सुचवण्यास अशा ष्टोर्यांचा उपयोग होऊ शकतो.

पुरावा म्हणून बरेचदा प्राण्यांतील प्रयोगांचा दाखला दिला जातो.  पण जे उंदरीत घडते ते सुंदरीत घडेल असे नाही आणि जे  वानरांत घडते ते नरांत घडेलच असं नाही. मानवी अनुभव सर्वांत  महत्वाचा.   

पण शिस्तबद्ध संशोधनाची एकूणच वानवा आहे. पपापू वाल्यांनी प्रत्यक्ष रुग्णांवर केलेले अभ्यास हे देखील अत्यंत तोकडे, दर्जाहीन आणि कोणताही पूर्वाभ्यास नसलेले असतात. या अभ्यासाच्या आधारे अचाट दावे केले जातात मात्र अचाट दाव्यांसाठी   तोडीस तोड असा अफाट पुरावा सादर केला जात नाही.

अन्न व औषध विभाग आधुनिक वैद्यकीच्या औषधांसाठी अतिशय कडक  तपासण्या, शास्त्रीय  आणि काटेकोर निकष योजतो. हे योग्यच आहे. पण  तोच विभाग  या तथाकथित पर्यायी पद्धतींसाठी अतिशय गचाळ, तोकडे आणि निरर्थक  निकष मान्य करतो. ही औषधे  बाजारात येण्यापूर्वी आधुनिक औषधशास्त्रानुसारच्या, परिणामकारकता  आणि सुरक्षितता जोखणाऱ्या, कोणत्याही तपासण्या त्यांच्यावर बंधनकारक नसतात. तपासण्या न करता बाजारात उतरता येत असेल, नफा कमावता येत असेल, तर संशोधनासाठी लागणारा प्रचंड पैसा कोण कशाला गुंतवेल?  या कारणे संशोधन मागे पडत जाते. थोडक्यात परिक्षाच न घेता पदव्या वाटल्या तर ज्या प्रतीचे पदवीधर निर्माण होतील तीच गत  या औषधांची होते आहे. अशा धोरणामुळे पपापू  वैद्यकीचा आर्थिक फायदा होत असला तरी तात्विक बैठक डळमळीत होत असते.

  शिवाय संशोधनातून विपरीत निष्कर्ष आले तर काय करायचं, ही एक  मोठीच भीती आहे. बऱ्याच पपापू  मंडळींची नकारात्मक निष्कर्ष स्वीकारायची तयारी नसते. त्यांच्या मते त्यांचे ज्ञान हे दैवी, पारंपरिक, प्राचीन, ग्रंथोद्भव, साक्षात्कारी, स्वयंप्रज्ञा, गुरु-जात, आजीबाईंच्या बटव्यातील,  वगैरे वगैरे असल्यामुळे ते आपोआपच चिकीत्सेच्या उपर असते.  त्यामुळे संशोधन करून सत्याचे लचांड मागे लावून घेण्यापेक्षा, झाकली मुठ सव्वा लाखाची हे धोरण सर्वांनाच सोयीचं असतं.  त्यामुळे लुटुपुटीचं संशोधन हे पुरावा म्हणून दाखवून, मार्केट मारलं जातं.

अशा भातुकलीतल्या संशोधनावर अनेक संशोधन निबंध उपलब्ध आहेत.  पैकी डॉ.  एडझार्ड  अर्नस्ट यांनी प्रसिद्ध केलेला १२ एप्रिल २०२१चा ताजा  निबंध येथे आधाराला घेतला आहे.

‘भारत, होमिओपॅथी, अभ्यास’;  असा शोध त्यांनी ‘मेडलाईन’वर घेतला. मेडलाईन ही  वैद्यकीय संशोधनाला वाहिलेली वेबसेवा असून निरनिराळ्या संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झालेले शोधनिबंध इथे संगतवार लावलेले आढळतात.  त्यामुळे ठराविक काळातील, ठराविक विषयातील, ठराविक लेखकांचे, असे निबंध एक गटवार शोधण्यासाठी या साइटचा चांगला उपयोग होतो.

त्यांना १०१ शोधनिबंध आढळले.  पैकी ३१  निबंधांमध्ये भारतीय संशोधकांनी आपले निष्कर्ष मांडले होते. बाकी शास्त्राच्या इतर पैलूंबद्दल होते. ह्या ३१ पैकी ३१ही निबंध हे केलेल्या उपचारांचा फायदा झाला हे सांगणारे होते! थोडक्यात शंभर टक्के निबंध सकारात्मक निष्कर्ष दर्शवणारे होते!! असं कसं असू शकेल? नकारात्मक परिणाम दिसलेच नाहीत?, का ते तपासलेच नाहीत?,  का नोंदलेच नाहीत? या सर्व प्रश्नांची भुतावळ आपल्या मानगुटीवर बसते. गंमत म्हणजे आधुनिक वैद्यकीच्या संशोधनात असा टोकाचा ‘आनंदीआनंद’ आढळत नाही.  म्हणजे आता दोनच निष्कर्ष उरतात.  एक, होमिओपॅथी अतिशय परिणामकारक असून हर परिस्थितीमध्ये आपलं काम चोख बजावत आहे किंवा हा सगळा संशोधनाचा खेळ,  पोरखेळ असून त्यात गांभीर्यपूर्वक घ्यावं असं काही नाही. ही निव्वळ धूळफेक आहे.

कुठला निष्कर्ष जास्त बरोबर ते तुम्हीच ठरवा.

अमुक एक पॅथी आधुनिक वैद्यकीला ‘पर्याय’ आहे हा दावा, तसा धाडसाचा  आहे.  आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धती म्हणजे हवेतून विभूती काढावी तशी कोणतीही जादूई चीज नाही. शरीररचनेचा सखोल अभ्यास, शरीरकार्याच्या गुंतागुंतीची जाण, आजारांबद्दल आणि आजाराला मिळणाऱ्या शारीर प्रतिसादाचे ज्ञान, जंतूशास्त्र, परोपजीवीशास्त्र; वगैरेच्या पायावर आधुनिक वैद्यकशास्त्राचे उपचार उभे आहेत. इतकच काय हे सारं रसायन-भौतिकी-जीव या मूलभूत शास्त्रांच्या संकल्पनांशी सुसंगत आहेत. पपापू च्या कित्येक कल्पना अशास्त्रीय, आणि बऱ्याचशा छद्मशास्त्रीय आहेत. उदाहरणार्थ होमिओपॅथीच्या औषधात एकही औषधी रेणू नसताना ती प्रभावी आहेत असा दावा केला जातो.  

    तेव्हा ‘पर्यायी’ वैद्यक याचा अर्थ औषधोपचारांना पर्यायी  औषधोपचार, इतका मर्यादित घेऊन चालणार नाही. पर्यायीवाले तसा तो घेतही  नाहीत. त्यांचे पर्यायी शरीररचनाशास्त्र आहे.     पर्यायी  शरीरक्रियाशास्त्र आहे. उदाहरणार्थ मानवी शरीर हे ब्लड, म्युकस, येलो बाईल   आणि ब्लॅक बाईल यांच्या संतुलनातून चालतं असा एक  प्राचीन सिद्धांत आहे.  (बाईल म्हणजे मराठीतली बाईल नव्हे हं. ही इंग्रजी बाईल; मराठीत ढोबळ अर्थ ‘पित्त’) किंवा आजार हे ‘व्हायटल फोर्स’च्या असंतुलनाने होतात अशीही शिकवण आहे.  किंवा  सोरा, सिफिलीस, सायकोसिस आणि ट्यूबरक्युलोसिस या ‘मायाझम’मुळे (रोगकारक शक्ती)  दीर्घ आजार होतात होतात म्हणे. यींग आणि यांग यांचा तोल सारे काही सांभाळतो असेही पर्यायी ‘शास्त्र’ आहे.   कानावर विवक्षित बिंदुवर  टोचताच, थेट शेंडीपासून *डीपर्यंत,   निरनिराळे अवयव नियंत्रित होतात म्हणे.      विज्ञानाला यातलं काही म्हणजे काहीही आजवर घावलेलं नाही. आधुनिक विज्ञानाने यातल्या बहुतेक संकल्पनांचा भोंगळपणा, भंपकपणा,  पोकळपणा आणि   मर्यादा केंव्हाच दाखवून दिल्या आहेत. मुख्य म्हणजे प्रत्येक पपापू  पॅथीचे स्वतंत्र आणि स्वयंभू शास्त्र आहे. सारे माणसाच्याच    आरोग्याबद्दल आणि अनारोग्याबद्दल सांगत आहेत पण एकाचा  मेळ दुसऱ्याशी नाही. हे अजबच आहे.

माणसाला पर्यायी पचन संस्था असते का? मग पर्यायी पचनशास्त्र कसं असेल? जसं ब्रिटिश भौतिकशास्त्र वेगळं, कोरियाचं रसायनशास्त्र वेगळं, काळ्यांचं बीजगणित वेगळं असं संभवत नाही; भारताचा ‘पर्यायी नकाशा’ संभवत नाही; तद्वतच धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा आधारित स्वतंत्र  शरीरविज्ञानही संभवत नाही. कल्पना करा उद्या  पाकिस्तानने E=Mcऐवजी,  E=Mc या नव्या पर्यायी ‘इस्लामी  अणूशास्त्रा’नुसार आम्ही अणुबॉम्ब बनवू असं काही  जाहीर केलं, तर त्या बॉम्बला कोणी फुंकून विचारेल का?  

खरं सांगायचं तर पर्यायी असं काही वैद्यक नसतंच.  पर्यायी वैद्यक म्हणजे ज्या औषधोपचारांची परिणामकारकता आणि सुरक्षितता पुरेशी नाही किंवा  तपासलीच  गेलेली नाही असे सगळे औषधोपचार.  यातल्या एखाद्या औषधाची परिणामकारकता लक्षात आली आणि सुरक्षिततेचीही  खात्री पटली; तर ते औषध ‘पर्यायी’ वगैरे काही राहत नाही.  मग ते वैद्यकीच्या मुख्य प्रवाहात सामील केले जाते. आर्टेमेसुर हे चिनी जडीबुटीचे औषध, मलेरियाविरुद्ध उपयुक्त ठरल्याने, नुकतेच दाखल झाले आहे. सर्पगंधा हे रक्तदाबावरचे औषध हे   आपल्याकडचे एक उदाहरण. अशी शेकडो उदाहरणे आहेत. असणारच. अहो  जगभर सगळ्यांनाच  आज्या होत्या आणि त्यांच्याकडे बटवेही होते. त्यातील औषधांचा अभ्यास करुन,  त्यातूनच उधारउसनवारी करून, आजची औषधे बनली आहेत.   त्या बटव्यातील काही औषधे उपयोगी, काही निरुपयोगी तर काही चक्क तापदायक निघणार हे तर उघड आहे.  शेवटी ‘अभ्यासोनी प्रकटावे’ हेच खरे.

त्यामुळे पर्यायी, पूरक, पारंपारिक, नैसर्गिक, हर्बल, एनर्जी, इंटिग्रेटेड, होलिस्टिक वगैरे संज्ञा वैज्ञानिक वगैरे नसून मार्केटिंगला सोयीची  म्हणून शोधलेली लेबले आहेत.     

पण मुळात इतक्या अविश्वसनीय गोष्टींवर लोकं  विश्वास ठेवतातच का, याची अनेक कारणे आहेत. माणसाचा मेंदू हा तर्कशुद्ध विचार करण्यासाठी मुळी रचलेलाच नाही. आफ्रिकेच्या सवाना प्रदेशात, भटक्या अवस्थेत निर्माण झालेला मेंदू, आधुनिक युगात वेळोवेळी आपली पुराणकालीनता दाखवून देत असतो.  प्राचीन काळी स्वतःचा आणि आसपासच्या व्यक्तींचा अनुभव हेच ज्ञान आणि हाच पुरावा होता.  अमुक फळ खाऊ नकोस ते विषारी आहे म्हटल्यावर विश्वास ठेवणे किंवा विषाची परीक्षा पाहणे, असे दोनच पर्याय होते.  तेव्हा अनुभवी मंडळींचा सल्ला शिरसावंद्य मानणे हा जगणं सुलभ करणारा संस्कार होता. झाडीत कुठे सावली हलली, तर अंधारातले अंधुक ठिपके जोडून, झटकन तिथे वाघ आहे वा नाही हा निर्णय करायला आपला मेंदू उत्क्रांत झाला आहे. जवळ जाऊन खात्री करू पहाणं म्हणजे जिवाची जोखीम. सावधपणे लांबून निघून जाणं म्हणजे, जान बची लाखों पाये.   असे झटपट निर्णय घेण्याने,  गडबडीने माहितीचे ठिपके जोडल्याने,  गफलती होऊ शकतात. वाघ नसताना तो आहे असं वाटू शकतं. पण या गफलतींची किंमत फारच किरकोळ.  तेव्हा ही झटपट विचारपद्धती उत्क्रांत होऊन, त्यातल्या गफलतींसकट, आपल्या मेंदूत कोरली गेलेली आहे.

आधुनिक जगात विचार करण्याची ही पद्धत लोढणं बनली आहे.  आजही विश्लेषणाऐवजी, गोष्टीरूप पुरावा  आपल्याला अधिक भावतो. अर्धवट पुराव्यांचे ठिपके जोडून आजही आपण नकळतपणे चित्र पूर्ण करत असतो.  आजही माणसाच्या मेंदूवर  बुद्धीपेक्षा भावनांचा अंमल सहज चढतो.

जेनी मॅककार्थी या प्रसिद्ध अमेरिकन नटीच्या मुलाला, इव्हानला, ऑटीजम आहे.  गोवराची लस दिल्यामुळेच  ऑटीजम झाला असा  तीचा दावा आहे. गोवराच्या, आणि एकूणच लसीकरणाविरुद्ध मोठी मोहीम तीने चालवली आहे. तिला यश येऊन अमेरिकेत आता गोवराने होणारे अर्भकमृत्यू वाढत चालले आहेत. पण,    ‘लसीमुळे ऑटीझम होतो याला वैज्ञानिक पुरावा नाही, लस दिल्यानंतर काही घडलं म्हणून ते लस दिल्यामुळे  घडलं असं म्हणता  येत नाही’;  असं म्हणताच जेनी डाफरली, ‘माझा इव्हान हेच माझं विज्ञान आणि इव्हान हाच माझा पुरावा!’ 

हे वाक्य काळजाला हात घालणारं असलं तरी अशास्त्रीय आहे.  या भावनावेगातून, तर्कदुष्टतेतून, झटपट निष्कर्षातून, त्यातले चकवे चुकवत बाहेर येण्याचे ज्ञान म्हणजे विज्ञान. तर्कसिद्धता शिकावी लागते. तर्कदुष्टता आपल्या मेंदूत कोरली गेली आहे. म्हणून तर इतके  सगळे लोक पपापूच्या भजनी लागलेले दिसतात.

आणि म्हणूनच तर, ‘इतके सगळे लोक वापरतात, इतक्या पिढ्या वापरतात, ते काही मूर्ख आहेत का?’, असा भ्रामक युक्तिवाद लोकांना पटतो. ‘लोकप्रीयता आणि प्राचीनत्व, हीच सिद्धता’;  हा एक लोकप्रीय तर्कदोष आहे. काळाच्या विशाल पटलावर अनेक कल्पना, अनेक युक्तिवाद, अनेक तथाकथित सत्य; ही  लोकप्रिय (नाळेला शेण  लावणे), लोकमान्य (मंत्राने सापाचे विष उतरवणे) इतकंच काय जगन्मान्यसुद्धा (रजस्वला अपवित्र असते)  होती/आहेत.  मात्र वैज्ञानिक निकषांवर घासून पाहता अशा कित्येक संकल्पना त्याज्य ठरल्या. थोडक्यात ‘जुनी’ पद्धत, लोकमान्यता, हा कोणत्याही पॅथीच्या शास्त्रीयत्वाचा पुरावा होत नाही.

तरीदेखील काही रुग्णांना पपापू पॅथीने बरे कसे वाटते, याची अनेक संभाव्य उत्तरे आहेत.

पपापू ही जुनाट आणि असाध्यआजारांवर उपकारक आहे, अशी समाजभावना आहे. आपला आजार जुनाट आणि असाध्य' असल्याचं मनोमन मान्य असल्यामुळे मुळात फार फरक पडेल, अशी अपेक्षा नसते. त्यामुळे पडेल त्या फरकाला रामबाण उपायाचा साज चढविला जातो.

कित्येक आजार मनोकायिक असतात. मानसिक समाधान लाभलं, की त्यांना उतार पडतो. होमिओ डॉक्टर औषध देण्यापूर्वी पेशंटची चांगली दोन तास हिस्टरी घेतात. बालपणापासून ते आवडीनिवडीपर्यंत आणि धंदापाण्यापासून ते बाई-बाटलीपर्यंत सगळ्याची आस्थेने आणि इत्थंभूत चौकशी केली जाते. दीड-दोन तास आपली कोणी आस्थेने विचारपूस केली, तर आपल्यालाही बरं वाटेलच की! आजाऱ्याला तर वाटेलच वाटेल.

कित्येक पपापूपॅथीय  नंबर घातलेल्या पुड्या देतात. त्या पुड्यांवर औषधाचं नाव नसतं. त्यामुळे पॅरेसिटमॉल किंवा स्टिरॉइडच्या पावडरीही दिल्या जात असण्याची शक्यता आहे.

कित्येक आजार औषध न घेताही काही दिवसांनी आपोआप बरे होतात. अनेकदा आजारात निसर्गतः चढउतार होत असतात. त्वचेचे अनेक आजार, संधिवात आणि काही प्रकारचे कॅन्सरही असे हेलकावे खात असतात. त्या त्या वेळी चालू असलेल्या उपचारांना आयतं श्रेय मिळतं.

बहुतेक वेळा पपापू डॉक्टर मुळात चालू असलेली (आधुनिक वैद्यकीची) औषधे चालू ठेवून शिवाय उपचार देतात; यामुळे यशाचे पितृत्व स्वत:कडे ठेवून अपयशाचे खापर अन्यांच्या माथी मारायची सोय होते.

आपण काही उपचार घेत आहोत या कल्पनेनेच कित्येकांना बरं वाटतं. याला प्लॅसिबो इफेक्ट असं म्हणतात. त्यामुळे औषधाची उपयुक्तता यापेक्षा सरस असल्याचे सिद्ध करावं लागतं. मात्र पपापू औषधांबाबत अन्न व औषध प्रशासनही अशा सिद्धतेची मागणी करीत नाही हे वर आलेलंच आहे. '' हे औषध '' या आजाराला उपयुक्त आहे असा दावा करायचा झाला, तर त्यासाठी निव्वळ असा उल्लेख पपापू ग्रंथात असल्याचे दाखवून द्यावे लागते. बस, एवढंच!

पपापू औषधाचा फायदा होतो का नाही हे जरा बाजूला ठेवू; पण या उपचाराचा तोटा काय होतो? होतो ना! वेळेत आणि योग्य उपचार मिळविण्याचा रुग्णाचा हक्क हिरावून घेतला जातो. छद्मोपचारांत वेळ दवडल्यामुळे मूळ आजार बळावतो, पसरतो, निदान होण्याला उशीर होतो. असे अनेक धोके संभवतात. चेहऱ्यावर पुरळ आले असे समजून नागिणीकडे दुर्लक्ष केले तर बुबुळावर फूल पडते. संडासवाटे रक्तस्राव होत असेल तर सर्व तपासणी केलीच पाहिजे. निव्वळ रात्री चादर पांघरली होती की दुलई?' यावरून औषध ठरविले तर आतड्याच्या कॅन्सरचे निदान होईपर्यंत खूप उशीर झालेला असतो. थोडक्यात, वेळ जातो, पैसा जातो. उपचार चालू असल्याचे कृतक समाधान मिळते आणि हे घातक ठरू शकते.

डॉक्टर आणि पेशंटचं नातं पारदर्शी असायला हवं. माहितीची, उपचारातील भल्याबुऱ्याची  प्रामाणिक देवाणघेवाण असायला हवी असं आधुनिक वैद्यक नीती मानते. पपापू यात कुठेच बसत नाही. भारतासारख्या गरीब देशाला तर असल्या छद्म उपचारांवर आणि कृतक संशोधनावर  वेळ आणि पैसा खर्च करणे मुळीच परवडणारे नाही.

 आता आर्सेनिक अल्बमचेच बघा ना. प्रतिबंधक होमिओ उपचार म्हणून आयुष मंत्रालयापासून सगळ्यांनी   नगारे पिटले. ठायीठायीच्या  कित्येक  नगरपित्यांनी मोफत वाटपाच्या गंगेत, पुण्यस्नान उरकले.  पण आजवर या दाव्याचा शास्त्रीय म्हणावा असा एकही अभ्यास उपलब्ध नाही आणि आता लस आल्यापासून तर  आर्सेनिक अल्बमचे नावही नाही!

तेंव्हा या साऱ्या पद्धतींबाबत साधकबाधक विचार होणे नितांत आवश्यक आहे.

 

 

प्रथम प्रसिद्धी

अंनिस  वार्तापत्र

एप्रिल २०२१

Monday 26 April 2021

कारोना लसीची पोस्ट आणि पाळी

करोना लसीची पोस्ट आणि पाळी

डॉ. शंतनु अभ्यंकर
स्त्री आरोग्य तज्ञ, वाई

पेशंट, कुटुंबियांच्या ग्रुपमधल्या तरण्याताठ्या मुलींच्या आया आणि काही परिचित स्त्रिया यांना, आज सकाळी, अचानकच माझ्याबद्दल ममत्व वाटायला लागलं.

फोन, व्हॉट्सॲप, मेसेज वगैरे मार्फत संपर्क सुरू झाला. सगळ्यांचा प्रश्न एकच; व्हाट्सअप वर आलेली ' ती ' पोस्ट खरी का खोटी? थोड्याच वेळात या पोस्टची आणि प्रश्नांची मला इतकी सवय झाली की कोणी प्रश्न विचारायच्या आतच, ' तुम्ही वाचलेली पोस्ट तद्दन मूर्खपणाची आहे ', असं मी बेलाशक सांगू लागलो. 

लवकरच अठरा वर्षाच्या पुढील व्यक्तींना लसीकरण सुरू होत आहे. पाळीच्या आधी आणि नंतर चार-पाच दिवस प्रतिकारशक्ती कमी असते. तेंव्हा अशा सर्व मुलींनी ती लस घेणे टाळावं, अशा आशयाचा अतिशय खोटा, अशास्त्रीय, सामान्यजनांना संभ्रमात टाकणारा आणि खोडसाळ मजकूर त्या पोस्टमध्ये लिहिलेला आहे. वर सर्व तरुण मुलींना हा मेसेज पाठवा अशी प्रेमळ विनंतीही आहे.

मासिक पाळीच्या चक्रामध्ये शरीरात अनेक बदल होतात हे शंभर टक्के सत्य असलं तरी या चक्रानुसार प्रतिकारशक्ती हेलकावे खाते हे शंभर टक्के असत्य आहे. तेव्हा लस बेलाशक घ्यावी. जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा घ्यावी. पाळीचा आणि लस टाळण्याचा काही संबंध नाही.

पण चीड आणणारी गोष्ट तर पुढेच आहे. अशा पद्धतीच्या पोस्टमधून स्त्रियांकडे आणि त्यांच्या शरीरधर्माकडे बघण्याचा एक चुकीचा, नकारात्मक, विकृत दृष्टिकोन वारंवार ठळक केला जातो. 

स्त्रियांच्या बाबतीत मुळातच असलेल्या नकारात्मक समाजभावनेवर स्वार होऊन कसं स्वैरपणे हुंदडायचं हे आपण या अफवेकडून शिकावं. सत्यअसत्याचा विलक्षण मिलाफ या अफवेत दिसून येतो. पाळीनुसार शरीरात बदल होतात हे सत्य, पण त्या चक्रानुसार प्रतिकारशक्ती कमी जास्त होते हे असत्य. पण सत्याची फोडणी दिल्याने अफवा अधिक झणझणीत झाली आहे. लिहिताना आव असा की, बघा मला तुमची कित्ती कित्ती काळजी, मी तुम्हाला वेळेत सावध करत आहे, सांभाळा!!! असा जन्मदात्या मायबापासारखा काळजीचा वत्सल सूर. यामुळेही विश्वास वाढतो. त्यातून ती इंग्रजीत आलेली पोस्ट. तेव्हा ती बरोबरच असणार असा अनेकांचा गैरसमज. असो. 

शिवाय तुम्हाला काही फार जगावेगळी कृती करायची नाहीये. फक्त लस घेण्याचा दिवस काही दिवस पुढेमागे करायचा आहे. इतका साधा, सोपा, निरुपद्रवी, निरागस आणि वरवर पाहता, तुमच्या हिताचाच सल्ला आहे हा. हा निर्मळ साधेपणा देखील अशा गोष्टी पटकन पटायला कारणीभूत ठरतो. पाळीच्या वेळेला लस घ्यायची झाली तर 27 सूर्यनमस्कार काढून मग घ्या; असं कोणी सांगितलं असतं तर विश्वास बसला नसता पण, ' प्रतिकारशक्ती कमी होते, तेव्हा सावध! ' हे कसं मनाला स्पर्शून जातं. 

अफवांचसुद्धा एक शास्त्र आहे आणि ते आपण लक्षात घेतलं पाहिजे.

 त्यामुळेच इतकं सगळं सांगूनही, ' चार दिवस इंजेक्शन पुढे मागे घेतल्याने असा काय फरक पडतो? तोटा तर काही नाही ना? उगाच विषाची परीक्षा कशाला? ', असा विचार करणारी मंडळी असणारच. पण माझ्या मते तोटा होतो. सारासार विवेकबुद्धी गहाण टाकून, उपलब्ध माहितीचा विवेकाने विचार न करता, कुठल्या तरी अज्ञात भीतीपोटी स्वतःची वागणूक बदलणे हा फारच मोठा तोटा आहे. मग आपल्या मेंदुला असाच विचार करायची सवय लागते. मग आपल्या लहान मुलीच्या मेंदूलाही ती लागते आणि अशा पद्धतीने बुद्धीभेद झालेली, अविचारी पिढी, पिढ्यानपिढ्या निर्माण होत राहते. अविवेकी अवैज्ञानिक विचारांचा सगळ्यात मोठा तोटा होतो तो हा. हे विष नाही, हे तर हलाहल आहे!!!

पण करोना आणि त्यामुळे झालेल्या अफवांच्या बुजबुजाटाचा एक फायदा झाला. अनेकांनी थेट विश्वास ठेवण्याऐवजी या पोस्टची विश्वासार्हता तपासून पाहिली. ही खूप समाधानाची गोष्ट आहे. वाईटातही चांगलं पहावं ते म्हणतात ते असं.

Tuesday 13 April 2021

कोणे एके काळी

 

कोणे एके काळी..

डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई

 

फार फार पूर्वीच्या गोष्टीची सुरवात, ‘कोणे एके काळी..’ ने होते. पण एचआयव्ही क्षेत्रातल्या विलक्षण प्रगतीने काही दशकापूर्वीची गोष्टही कोणे एके काळची वाटू लागली आहे.

ऐंशीच्या दशकात एचआयव्ही एखाद्या झंझावातासारखा भारतीय समाजव्यवस्थेवर कोसळला. आपण सोवळा समजत असलेला भारतीय समाज किती ओवळा आहे हे लख्ख दिसून आलं.  एचआयव्ही बाधीतांना वाळीत टाकण्यापासून सुरवात झाली. पदोपदी  भेदभावाची वागणूक, लागट  बोलणे, घृणा, निगरगट्ट आरोग्य व्यवस्थेकडून दुर्लक्ष, आरोग्याची हेळसांड अशा अनेक आघाड्यांवर रुग्णांना लढावं लागायचं. लैंगिक संबंधातून पसरणारा रोग म्हटल्यावर, त्यावर नीतीअनीतीची, पूर्व सुकृताची,  पापपुण्याची पुटे चढायला कितीसा वेळ? तशी ती चढलीच.

त्यातून अशा एखादीला  दिवस गेले तर वेगळीच प्रश्नचिन्हे  आ वासून उभी रहायची. बाळाला वारेतून, जनन-मार्गातून आणि दुधातूनही एचआयव्ही होण्याची शक्यता हा पहिला  प्रश्न. तसे झाले तर त्याच्या आजाराचे,  उपचाराचे प्रश्न आणि  पुढे ते जगले वाचले तर अल्पायुषी पालकांमुळे त्याच्या भविष्याचे प्रश्न! ह्या मुलांच्या अशा अवस्थेचे पापाचे माप कुणाच्या पदरात टाकणार?    जन्मतः एचआयव्हीची लागण झालेली तान्ही बाळं  म्हणजे एचआयव्हीचे सर्वात  निरागस बळी.

 आईकडून बाळाला लागण होते हे खरे, पण हे अर्धसत्य. आईला आजार असल्याशिवाय बाळाला तो होईलच कसा? प्रश्न रास्त आहे. पण तरी देखील ‘आईकडून बाळाला’ म्हणताना, आई विरुद्ध एक सूक्ष्म अढी दर्शवली जाते. आई गुन्हेगार आहे आणि बाप नाही,  असं काहीतरी वाटू शकतं.  मुळात आईला एचआयव्हीची लागण बहुदा बापकडूनच झालेली असते. पण  कुणाला ‘गुन्हेगार’ ठरवण्याचा अधिकार आरोग्य व्यवस्थेला  नाही.  हे सगळं लक्षात घेऊन ‘आईकडून बाळाला लागण’, हा शब्द समूह बदलला गेला. ‘पालकांकडून बालकाला लागण’ असा अधिक  निर्वीष, अधिक समन्यायी   शब्दप्रयोग आता वापरला जातो.

जागतिक आरोग्य संघटना सांगते की मुळात होऊ घातलेल्या पालकांनी  एचआयव्हीच  टाळला किंवा त्यांनी अवांच्छित  गर्भधारणा  टाळली, तरी बराच प्रश्न सुटायला मदत होते आणि नियमित औषधानी उरलेला प्रश्न मार्गी लागतो.

पण हे आता. काहीही  औषध नव्हतं तेंव्हा जवळजवळ ४०% बाळांना एचआयव्हीचा जन्मदत्त  वारसा मिळायचा, असे जगभरची आकडेवारी सांगते. आपल्याकडे हे प्रमाण २५% च्या आसपास होतं.  औषधच नव्हत. समाजात एचआयव्हीबद्दल प्रचंड  तिरस्कार होता.  अशी मुलं अत्यंत केविलवाण्या अवस्थेत जगायची. बरीचशी काही वर्षातच मरायची.  जी  जगायची त्यांचेही बरेचदा हाल व्हायचे. एक तर आई किंवा बाप किंवा दोघेही एचआयव्हीनी जर्जर असायचे किंवा  गेलेलेच  असायचे. घरचे दुरावलेले असायचे. मुले एचआयव्ही आणि तत्संबंधीत आजारानी ग्रासलेली असायची. त्यांच्याकडे बघणार कोण?  समाजाच्या दयाबुद्धीवर आयुष्य काढणं मुळातच  कितीतरी कठीण आणि अशा परिस्थितीत तर विलक्षण कठीण. मुळात अनाथपण वाईटच.  त्यात ‘एचआयव्ही अनाथपणा’ आणखी वाईट.  हा प्रश्न इतका जगड्व्याळ बनला की खास ‘एचआयव्ही अनाथाश्रम’ही निघाले होते आणि आनंदाची गोष्ट अशी की ते  आता जवळपास निमाले आहेत!  

पण हे आता. तीस पस्तीस वर्षापूर्वी, कोणी एचआयव्ही बाधित जोडपे आम्हाला मूल हवंय वगैरे चर्चा करू लागले की अंगावर काटा यायचा. शरीरसंबंध ठेवताना निरोध वापरा असा सज्जड सल्ला दिलेला असायचा. कारण कोणी एकजण  एचआयव्ही बाधित असेल तर जोडीदार बाधित होईल. अगदी दोघेही बाधित असले तरी एचआयव्हीचे नवे नवे स्ट्रेन्स दोघांतही निर्माण होत असतात आणि हे परस्परांना नवखे स्ट्रेन्स, परस्परांना बाधक ठरू शकतात. ‘नवे स्ट्रेन्स नवे गुणधर्म’, हे आता करोनामुळे सगळ्यांना माहीत आहे. 

आता ह्या ‘असल्या’ जोडप्याला मूल कसं व्हावं बरं? बिन-निरोध   संबंध ठेवले तर मूल होईलही पण एचआयव्ही इकडून तिकडे जाईल त्याचं काय? यावर उपाय म्हणून अनेक प्रकारच्या युक्त्या योजल्या जायच्या. फक्त फलनकाल बघून त्या काळांत बिन-निरोध संबंध ठेवणे. एरवी निरोध वापरणे.  वीर्यावर प्रक्रिया करुन ते थेट गर्भपिशवीत सोडणे (आययूआय). काही जोडपी तर  वीर्यदानाचा (बिन बाधित व्यक्तीचे वीर्य वापरणे) पर्यायही स्वीकारायची.   पण एचआयव्हीवर औषधे निघाली आणि हे सर्व प्रकार निकालात निघाले. आज औषधांमुळे एचआयव्ही-बाधित पण उपचाराधीन पेशंटना निरोध वापरायचीही  गरज नाही.  पण अजूनही डॉक्टर मंडळी, ‘निरोध वापरा’ असा सल्ला देतात. बहुतेक  लाजेकाजेस्तव असावा!   औषधे घ्या, विषाणूमुक्त व्हा, औषधे चालूच ठेवा आणि मग दिवस जाऊ देत, बाळ  होऊ देत, पण  पुढेही आयुष्यभर औषधे चालूच ठेवा;  अशी आधुनिक मसलत आहे.

पण हे आता. आता औषधे इतकी प्रभावी आहेत की ती झटक्यात पेशंटमधील एचआयव्ही विषाणूंची संख्याच कमी करतात. मग अर्थातच आडातच नसेल तर पोहऱ्यात कोठून येणार या न्यायाने, जोडीदाराला/बाळाला  लागण होण्याची शक्यता जवळपास मावळते. विषाणूंची संख्या तपासणीत सापडणार नाही इतकी रोडावते,  मग संसर्ग कुठून होणार?  “झाला विषाणूचा लोप; संपला संसर्गाचा कोप” (“Undetectable=Untransmissible”) हा  ह्या लढाईतील नवा एल्गार आहे.

पण हे आता. पूर्वी औषधे नव्हती.  बाळ पोटात असताना तर काहीच करता  येण्यासारखं नव्हतं. मग प्रसूती दरम्यान, जननमार्गात लागण होऊ नये म्हणून सावधगिरी बाळगली जायची. वारंवार तपासणी टाळणे, पाणमोट फुटल्यावर लवकरात लवकर डिलिव्हरी करणे, विटप छेद टाळणे. ‘विटप छेद’ म्हणजे बाळ लवकर बाहेर यावे म्हणून जननमार्गाला घेतलेला छेद. या प्रकारात प्रसूती लवकर होते मात्र आईचे रक्त बाळाच्या नाकातोंडात  जाते आणि संसर्गाची शक्यता कैक पटीनी  वाढते.  सरळ  सीझर करणे असाही एक पर्याय होता. हे सगळेच  प्रयत्न  अपुरे होते. हे समजत होतं.  पण करण्यासारखं दुसरं काही नव्हतंच. अशा पेशंटना शक्य तेवढा दिलासा अशी डॉक्टरी भूमिका होती.

पुढे औषधे आली पण  सुरवातीला औषधोपचार खूप गुंतागुंतीचे होते. तापदायक असे सहपरिणाम होते.  सरसकट औषधोपचार पुरवण्याइतका पुरवठाच नव्हता.  उपचार इतके महाग होते की  तेवढे पैसे कुणाकडेच  नव्हते, मायबापाकडेही  नाही आणि मायबाप सरकारकडेही नाही. मग गरोदरपणी त्यातल्यात्यात वाईट अवस्था असेल तर आणि ते ही  फक्त काही महीने औषधे द्यायची असं धोरण ठरलं.  हळू हळू औषधे सुधारली. अपवादात्मक परिस्थितीत, अत्यल्प काळ वापराऐवजी जागतिक आरोग्य संघटनेनी एचआयव्हीग्रस्त गरोदर स्त्रीला गरोदरपणी आणि पुढे  आयुष्यभर एचआयव्ही औषधे देण्यात यावीत असं सांगितलं. (ऑप्शन बी प्लस, सप्टेंबर २०१५).   कारण मूल उत्तम नागरिक म्हणून वाढायचं तर निव्वळ जन्म-निगडीत लागण थोपवून काय उपयोग?  त्याला आई मिळायला  हवीच की. आई मिळायची तर पुढेही औषधे चालू ठेवायला हवीत. २०१० साली जेमतेम निम्या एचआयव्हीबाधित महिलांना असे  उपचार मिळत होते आज ९०%वर स्त्रियांना अशी औषधे मिळत आहेत. आता तर  गरोदर नसलेल्या स्त्रिया आणि पुरुषही औषधांच्या छत्रछायेत आले आहेत.

एचआयव्हीग्रस्त आयांनी स्तनपान द्यावे का नाही हा प्रश्न मात्र थोडा चकवा देणारा  होता. आईच्या दुधातून एचआयव्हीचा धोका असतो. मग फक्त वरचे, म्हणजे पावडरचे  दूध देण्याचे प्रयोग झाले. हे दूध जनसामान्यांना परवडणे शक्य नाही. परिस्थितीच्या रेट्यामुळे पावडरचे दूध थोडेथोडेच देणे, पातळच देणे, त्याबरोबर  अंगावरचेही  देणे, असे भलेबुरे फाटे फुटले.  मग स्वयंसेवी संस्था मदतीला आल्या.  पावडरचे डबे फुकट देणाऱ्या योजना आल्या.  

पण पावडरच्या दुधाने एचआयव्हीची ईडा टळली तरी सगळी पीडा संपत नाही.  आईच्या दुधाने बाळाला इतर अनेकानेक आजारांपासून संरक्षण मिळत असते, ते पावडरच्या दुधातून मिळत नाही.  पावडरचे दूध देवून एचआयव्हीसारख्या गाजावाजा झालेल्या आजारापासून वाचवलेली बाळं; ‘मां  का दूध’ न मिळाल्याने  जुलाब, कुपोषण, न्यूमोनिया  अशा गरीबाघरच्या आजाराला चूपचाप  बळी पडण्याची शक्यता खूप.

पण यथावकाश  औषधे उपलब्ध झाली तसा हा ही प्रश्न मिटला. सरसकट वरचे दूध देण्याचा सल्ला अगदी अपवादात्मक परिस्थितीसाठी राखून ठेवण्यात आला. जिथे वरचे देणे संपूर्ण सुरक्षित आहे अशा वेळीच वरचे, एरवी अंगावरचेच, हा नियम. पुढे आईला योग्य उपचार सुरू असतील, तर सहा महीने तरी बाळाला निव्वळ अंगावरच पाजावं, अशी शिफारस आली (२०१६). सहा महिन्याच्या पुढे, वरचा आहार देत देत, अगदी दोन  वर्षापर्यंत अंगावर पाजलं तरी चालेल, असंही सांगण्यात आलं. हे म्हणजे इतर चार बायकांना जो सल्ला दिला  जातो तोच झाला. म्हणजे स्तनपानाच्या बाबतीतला  एचआयव्ही आणि बिगर-एचआयव्ही असा फरक औषधांमुळे संपुष्टातच आला. 

बाळाला संसर्ग झाला आहे वा नाही  हे झटपट आणि नेमकेपणानी सांगणाऱ्या तपासण्या नव्हत्या. आता महिन्या दीड महिन्याच्या बाळालाही  एचआयव्ही आहे का हे तपासता येतं;  तपासलं जातं.  सहा महिन्यांनी पुन्हा तपासलं जातं.  वर्ष दीड वर्षाचं झाल्यावर, दूध तोडल्यावरही तपासता येतं; तपासलं जातं. जर सर्व काळजी घेऊनही बाळाला लागण  झाल्याचं निदर्शनास आलं तर इतक्या तान्ह्या बाळाला औषधेही सुरू करता  येतात; केली जातात. दीड महिन्याला पॉसिटीव्ह येतात ती गर्भावस्थेतच  लागण झालेली बाळं. आधी निगेटिव्ह आणि दीड वर्षाच्या अखेरीस पॉसिटीव्ह येतात ती स्तनपानातून एचआयव्ही झालेली बाळं. ताबडतोब उपचार सुरू केले की बरंच भलं होतं त्यांचं.

एकुणात या जटिल प्रश्नांवर  प्रयत्नपूर्वक मात केली आहे आपण. ह्या आघाडीवर आपण मोठं मैदान मारलं आहे. पण अजूनही आव्हाने संपलेली नाहीत. गरोदरपणी आपोआपच बायका डॉक्टरांच्या निगराणीत रहातात. यामुळे  जन्मादरम्यान होणाऱ्या लागणीचे प्रमाण आटोक्यात आले आहे. मात्र अंगावर पाजणाऱ्या बायका काही वारंवार दवाखान्यात येत नाहीत. अशा महिला बरेचदा औषधे सोडतात आणि मग त्यांच्या बाळांना दूधातून लागण होते.  आयांना सतत औषधे घेत ठेवणं हे एक मोठंच चॅलेंज आहे. त्यामुळे तुलनेने दुधातून एचआयव्ही बाधा हा प्रकार आता  जास्त आढळतो. ज्या बाळांना एचआयव्ही होतो त्यांनाही औषधे घेत ठेवणे हे ही एक मोठ्ठे चॅलेंज आहे. यांच्या आई-बापांचे अनेक प्रश्न. एचआयव्ही, नोकरी, व्यसनं, आर्थिक ओढाताण असे अनेक. त्यात ह्या बाळाच्या औषधोपचारचा खर्च म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. जेमतेम अर्धी जनताच हे करू जाणे.

थोडक्यात एचआयव्ही विरुद्धची लढाई जारी असली तरी एक चकमक आपण जिंकलेली आहे. प्रतिबंधासाठीच्या सगळ्या अटी शर्ती पाळल्या तर लागण होण्याची शक्यता जवळपास शून्य होते. माझ्या स्वतःच्या छोट्याशा दवाखान्यात  २५ वर्षात अशी एकही केस घडलेली नाही! जागतिक आरोग्य संघटनेचे घोषवाक्यच मुळी  ‘झीरो व्हर्टीकल् ट्रान्समिशन’ (शून्य वारसा/ शून्य पिढीजात संसर्ग) असे आहे. अग्नीतून सहीसलामत पार जाण्याला अग्निदिव्य म्हणतात. हे एचआयव्हीदिव्य. औषधांच्या सहाय्यानी, गेल्या दहा वर्षात, सुमारे दीड ते दोन दशलक्ष मुलांनी, एचआयव्हीचा हा अनाहूत वारसा नाकारला आहे. हे एचआयव्हीदिव्य पार केले आहे.

आता तर हे सारं इतकं अंगवळणी पडलं आहे की उपचारांचे  हे सव्यापसव्य आता कुणाला दिव्यही वाटत नाही. कोणे एके काळी असं नव्हतं.


प्रथम प्रसिद्धी लोकमत, सखी पुरवणी, १३.०४.२०२१ 

 

Sunday 11 April 2021

Death be not proud

Death be not proud.

Dr Shantanu Abhyankar, Wai.

Just finished reading a book by Dr. Priyadarshini Kulkarni, titled ' Touching hearts, gently. ' 

It describes something that happens every day, death. Of course death is as common as birth but the two usher diametrically different emotions. 

A century ago humans realised that birth needs to be planned. Now it's dawning upon us that terminal illness and death needs to be managed, if not planned.

With increasing life expectancy, India is already facing an epidemic of geriatric patients. Most of them are debilitated, chronically sick, homebound bedbound, terminally ill and usually a financial burden for the family. Also there are those dying young, bringing immense pain and throwing up unimaginable challenges for the family. This book discusses what these people need, Palliative care.

Dr. Kulkarni is one of the pioneers of palliative care in India. Her laudable work at the Cipla cancer care centre in Pune, has received wide appreciation. 

From her extensive experience, she has chosen to narrate 29 odd stories about people on the deathbed. Her style is lucid, easy and unpretentious. The stories are not about medical miracles but about a doctor's efforts to provide compassion,care, comfort and consolation where all hope was lost. It is this that makes the book worth several readings. She describes her speciality as 'low tech', 'High touch' speciality and emphasizes that terminally ill patients are 'individuals with difficulties' and not 'deceased bodies'. 

Though the stories are personal, they are a telling commentary on the health system that we have evolved for ourselves. We boast of a robust family and social support structure but long term and terminal illness shows us so many unmet needs, so many gaps in the system. 

Long term illness is as stressful to the caregiver as it is for the patient. Dr. Kulkarni's heart goes out to the caregiver. She talks about the quality of life of the caregiver, as much as of the patient. 

Patients who are dying may want to do so many things; they may want to repent, apologize, make up, perhaps visit their workplace for one last time, make their wishes known to the family or simply cry. The near and dear one aren't always ready for this. It takes courage and psychological strength to be with someone whom you love and do things that would be for just one last time. Families need directions, help, encouragement and support in the process. A palliative care physician provides all this in a precise and professional manner.

Some may simply be blown over by the very idea of pain. All, of course, wish to have a pain-free death. Dr Kulkarni had a tough time procuring Morphine, due to some age old Indian laws. Her efforts to change the system have now made things easier.

Dignity on the deathbed is neither a priority nor is it easy. We don't even think of it as a right. Training the family in nursing care, pain medication and providing professional help when required, goes a long way. Earlier family physicians used to fulfill some of these duties but with growing specialisation, loss of the family physician system, shrinking family size, expanding urbanization, India needs plenty of old age homes, hospices and palliative care physicians. 

Dr. Kulkarni's book is an eye opener. It also shows the way. Our age old culture has almost anything and everything that we wish. There is the idea of death being a taboo, the most unwanted, the most distressful event and then there is the idea of death being most joyous of the journeys. There are references to samadhi to santhara, but then, most of us mortals, don't belong to the exalted lot who can face death as proudly as the saints. We will need palliative care and its better that we make arrangements for it before it's too late.

नास्तिकयात्रा, पुस्तक परिचय

श्री सुनील दांडेकर यांनी लिहिलेलं आणि राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेले ' नास्तिकयात्रा ' हे पुस्तक नुकतेच वाचून संपवलं.

नावाप्रमाणेच आस्तिकतेपासून सुरु झालेला प्रवास नास्तिकतेच्या शिखरापर्यंत (तुम्ही अस्तिक असाल तर इथे, गर्तेत, हा शब्द घालू शकता) कसा झाला याचा धावता आढावा या पुस्तकात आहे.

पुस्तक चक्क वारसाहक्काने प्राप्त झालेल्या बाबांच्या जनुकांना अर्पिलेले आहे. 

नास्तिकतेच्या वाटेवरचा प्रवास हा सुरुवातीलाच थोडक्यात विशद करून सांगितला आहे आणि पुढील सर्व प्रकरणात विज्ञान, तत्वज्ञान आणि त्याच्या आजूबाजूचा प्रदेश; याचं विहंगम चित्र उभं केलं आहे.  

या विश्वाचा हेतू काय?, मानवी जीवनाचा हेतू काय?, वगैरे प्रश्नातील फोलपणा, तर्कदुष्टता अथवा निव्वळ शब्दच्छल, लेखकाने दाखवून दिला आहे. अशा प्रश्नांना विविध धर्मांनी दिलेली विविध उत्तरे आणि त्या मानाने विज्ञानाने सुचवलेले सुंदर पर्याय, इथे सुलभतेने मांडले आहेत.  

शास्त्रीय विचारसरणीची प्रक्रिया आणि त्यातील निसरडे टप्पेही लेखकाने मांडले आहेत. उत्क्रांतिवाद त्याला झालेला आणि होणारा विरोध याचाही समाचार घेतला आहे. माणसाला असलेली भुताची आणि अद्भुताची ओढ; या खतावर फुलणाऱ्या अंधश्रद्धांच्या बागा, धर्माचे साईड इफेक्ट, अशा प्रश्नांचा उहापोह लेखकाने केला आहे.

हे सगळेच लिखाण म्हणजे अनेक इंग्रजी, मराठी पुस्तकांचा घेतलेला परामर्श आहे. जागोजागी सविस्तर वाचण्यासाठी लेखकानी मूळ पुस्तके सुचवली आहेत. लेखकाने मांडलेले विचार मला मान्य आहेत त्यामुळे हे पुस्तक मी सहज पार करू शकलो, मात्र हे विचार अमान्य असणाऱ्यांना, पानापानावर अडखळायला होईल. कदाचित लेखकाचं म्हणणं समजावून घ्यायला विचार, वेळ आणि डोकं खर्च करावं लागेल. फार कमी लोक संपूर्ण नास्तिक असतात. आस्तिक आणि नास्तिक या दोन टोकांमध्ये मधल्याआधल्या पायऱ्यांवर बरेच जण घोटाळत असतात. या लोकांना नास्तिकतेच्या दिशेने बोट धरून नेण्याचे काम हे पुस्तक आणि अर्थात यात सुचवलेली अन्य पुस्तके वाचून होईल असं दिसतंय.

बाकी पुस्तकाचे निर्मितीमूल्य राजहंसाच्या परंपरेला साजेशीच आहेत.
श्री. सुनील दांडेकर यांच्याकडून याच धर्तीचे आणखी सविस्तर लेखन घडो अशा शुभेच्छा.

डॉ शंतनु अभ्यंकर वाई