नावाप्रमाणेच आस्तिकतेपासून सुरु झालेला प्रवास नास्तिकतेच्या शिखरापर्यंत (तुम्ही अस्तिक असाल तर इथे, गर्तेत, हा शब्द घालू शकता) कसा झाला याचा धावता आढावा या पुस्तकात आहे.
पुस्तक चक्क वारसाहक्काने प्राप्त झालेल्या बाबांच्या जनुकांना अर्पिलेले आहे.
नास्तिकतेच्या वाटेवरचा प्रवास हा सुरुवातीलाच थोडक्यात विशद करून सांगितला आहे आणि पुढील सर्व प्रकरणात विज्ञान, तत्वज्ञान आणि त्याच्या आजूबाजूचा प्रदेश; याचं विहंगम चित्र उभं केलं आहे.
या विश्वाचा हेतू काय?, मानवी जीवनाचा हेतू काय?, वगैरे प्रश्नातील फोलपणा, तर्कदुष्टता अथवा निव्वळ शब्दच्छल, लेखकाने दाखवून दिला आहे. अशा प्रश्नांना विविध धर्मांनी दिलेली विविध उत्तरे आणि त्या मानाने विज्ञानाने सुचवलेले सुंदर पर्याय, इथे सुलभतेने मांडले आहेत.
शास्त्रीय विचारसरणीची प्रक्रिया आणि त्यातील निसरडे टप्पेही लेखकाने मांडले आहेत. उत्क्रांतिवाद त्याला झालेला आणि होणारा विरोध याचाही समाचार घेतला आहे. माणसाला असलेली भुताची आणि अद्भुताची ओढ; या खतावर फुलणाऱ्या अंधश्रद्धांच्या बागा, धर्माचे साईड इफेक्ट, अशा प्रश्नांचा उहापोह लेखकाने केला आहे.
हे सगळेच लिखाण म्हणजे अनेक इंग्रजी, मराठी पुस्तकांचा घेतलेला परामर्श आहे. जागोजागी सविस्तर वाचण्यासाठी लेखकानी मूळ पुस्तके सुचवली आहेत. लेखकाने मांडलेले विचार मला मान्य आहेत त्यामुळे हे पुस्तक मी सहज पार करू शकलो, मात्र हे विचार अमान्य असणाऱ्यांना, पानापानावर अडखळायला होईल. कदाचित लेखकाचं म्हणणं समजावून घ्यायला विचार, वेळ आणि डोकं खर्च करावं लागेल. फार कमी लोक संपूर्ण नास्तिक असतात. आस्तिक आणि नास्तिक या दोन टोकांमध्ये मधल्याआधल्या पायऱ्यांवर बरेच जण घोटाळत असतात. या लोकांना नास्तिकतेच्या दिशेने बोट धरून नेण्याचे काम हे पुस्तक आणि अर्थात यात सुचवलेली अन्य पुस्तके वाचून होईल असं दिसतंय.
बाकी पुस्तकाचे निर्मितीमूल्य राजहंसाच्या परंपरेला साजेशीच आहेत.
श्री. सुनील दांडेकर यांच्याकडून याच धर्तीचे आणखी सविस्तर लेखन घडो अशा शुभेच्छा.
डॉ शंतनु अभ्यंकर वाई
No comments:
Post a Comment