Tuesday 13 April 2021

कोणे एके काळी

 

कोणे एके काळी..

डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई

 

फार फार पूर्वीच्या गोष्टीची सुरवात, ‘कोणे एके काळी..’ ने होते. पण एचआयव्ही क्षेत्रातल्या विलक्षण प्रगतीने काही दशकापूर्वीची गोष्टही कोणे एके काळची वाटू लागली आहे.

ऐंशीच्या दशकात एचआयव्ही एखाद्या झंझावातासारखा भारतीय समाजव्यवस्थेवर कोसळला. आपण सोवळा समजत असलेला भारतीय समाज किती ओवळा आहे हे लख्ख दिसून आलं.  एचआयव्ही बाधीतांना वाळीत टाकण्यापासून सुरवात झाली. पदोपदी  भेदभावाची वागणूक, लागट  बोलणे, घृणा, निगरगट्ट आरोग्य व्यवस्थेकडून दुर्लक्ष, आरोग्याची हेळसांड अशा अनेक आघाड्यांवर रुग्णांना लढावं लागायचं. लैंगिक संबंधातून पसरणारा रोग म्हटल्यावर, त्यावर नीतीअनीतीची, पूर्व सुकृताची,  पापपुण्याची पुटे चढायला कितीसा वेळ? तशी ती चढलीच.

त्यातून अशा एखादीला  दिवस गेले तर वेगळीच प्रश्नचिन्हे  आ वासून उभी रहायची. बाळाला वारेतून, जनन-मार्गातून आणि दुधातूनही एचआयव्ही होण्याची शक्यता हा पहिला  प्रश्न. तसे झाले तर त्याच्या आजाराचे,  उपचाराचे प्रश्न आणि  पुढे ते जगले वाचले तर अल्पायुषी पालकांमुळे त्याच्या भविष्याचे प्रश्न! ह्या मुलांच्या अशा अवस्थेचे पापाचे माप कुणाच्या पदरात टाकणार?    जन्मतः एचआयव्हीची लागण झालेली तान्ही बाळं  म्हणजे एचआयव्हीचे सर्वात  निरागस बळी.

 आईकडून बाळाला लागण होते हे खरे, पण हे अर्धसत्य. आईला आजार असल्याशिवाय बाळाला तो होईलच कसा? प्रश्न रास्त आहे. पण तरी देखील ‘आईकडून बाळाला’ म्हणताना, आई विरुद्ध एक सूक्ष्म अढी दर्शवली जाते. आई गुन्हेगार आहे आणि बाप नाही,  असं काहीतरी वाटू शकतं.  मुळात आईला एचआयव्हीची लागण बहुदा बापकडूनच झालेली असते. पण  कुणाला ‘गुन्हेगार’ ठरवण्याचा अधिकार आरोग्य व्यवस्थेला  नाही.  हे सगळं लक्षात घेऊन ‘आईकडून बाळाला लागण’, हा शब्द समूह बदलला गेला. ‘पालकांकडून बालकाला लागण’ असा अधिक  निर्वीष, अधिक समन्यायी   शब्दप्रयोग आता वापरला जातो.

जागतिक आरोग्य संघटना सांगते की मुळात होऊ घातलेल्या पालकांनी  एचआयव्हीच  टाळला किंवा त्यांनी अवांच्छित  गर्भधारणा  टाळली, तरी बराच प्रश्न सुटायला मदत होते आणि नियमित औषधानी उरलेला प्रश्न मार्गी लागतो.

पण हे आता. काहीही  औषध नव्हतं तेंव्हा जवळजवळ ४०% बाळांना एचआयव्हीचा जन्मदत्त  वारसा मिळायचा, असे जगभरची आकडेवारी सांगते. आपल्याकडे हे प्रमाण २५% च्या आसपास होतं.  औषधच नव्हत. समाजात एचआयव्हीबद्दल प्रचंड  तिरस्कार होता.  अशी मुलं अत्यंत केविलवाण्या अवस्थेत जगायची. बरीचशी काही वर्षातच मरायची.  जी  जगायची त्यांचेही बरेचदा हाल व्हायचे. एक तर आई किंवा बाप किंवा दोघेही एचआयव्हीनी जर्जर असायचे किंवा  गेलेलेच  असायचे. घरचे दुरावलेले असायचे. मुले एचआयव्ही आणि तत्संबंधीत आजारानी ग्रासलेली असायची. त्यांच्याकडे बघणार कोण?  समाजाच्या दयाबुद्धीवर आयुष्य काढणं मुळातच  कितीतरी कठीण आणि अशा परिस्थितीत तर विलक्षण कठीण. मुळात अनाथपण वाईटच.  त्यात ‘एचआयव्ही अनाथपणा’ आणखी वाईट.  हा प्रश्न इतका जगड्व्याळ बनला की खास ‘एचआयव्ही अनाथाश्रम’ही निघाले होते आणि आनंदाची गोष्ट अशी की ते  आता जवळपास निमाले आहेत!  

पण हे आता. तीस पस्तीस वर्षापूर्वी, कोणी एचआयव्ही बाधित जोडपे आम्हाला मूल हवंय वगैरे चर्चा करू लागले की अंगावर काटा यायचा. शरीरसंबंध ठेवताना निरोध वापरा असा सज्जड सल्ला दिलेला असायचा. कारण कोणी एकजण  एचआयव्ही बाधित असेल तर जोडीदार बाधित होईल. अगदी दोघेही बाधित असले तरी एचआयव्हीचे नवे नवे स्ट्रेन्स दोघांतही निर्माण होत असतात आणि हे परस्परांना नवखे स्ट्रेन्स, परस्परांना बाधक ठरू शकतात. ‘नवे स्ट्रेन्स नवे गुणधर्म’, हे आता करोनामुळे सगळ्यांना माहीत आहे. 

आता ह्या ‘असल्या’ जोडप्याला मूल कसं व्हावं बरं? बिन-निरोध   संबंध ठेवले तर मूल होईलही पण एचआयव्ही इकडून तिकडे जाईल त्याचं काय? यावर उपाय म्हणून अनेक प्रकारच्या युक्त्या योजल्या जायच्या. फक्त फलनकाल बघून त्या काळांत बिन-निरोध संबंध ठेवणे. एरवी निरोध वापरणे.  वीर्यावर प्रक्रिया करुन ते थेट गर्भपिशवीत सोडणे (आययूआय). काही जोडपी तर  वीर्यदानाचा (बिन बाधित व्यक्तीचे वीर्य वापरणे) पर्यायही स्वीकारायची.   पण एचआयव्हीवर औषधे निघाली आणि हे सर्व प्रकार निकालात निघाले. आज औषधांमुळे एचआयव्ही-बाधित पण उपचाराधीन पेशंटना निरोध वापरायचीही  गरज नाही.  पण अजूनही डॉक्टर मंडळी, ‘निरोध वापरा’ असा सल्ला देतात. बहुतेक  लाजेकाजेस्तव असावा!   औषधे घ्या, विषाणूमुक्त व्हा, औषधे चालूच ठेवा आणि मग दिवस जाऊ देत, बाळ  होऊ देत, पण  पुढेही आयुष्यभर औषधे चालूच ठेवा;  अशी आधुनिक मसलत आहे.

पण हे आता. आता औषधे इतकी प्रभावी आहेत की ती झटक्यात पेशंटमधील एचआयव्ही विषाणूंची संख्याच कमी करतात. मग अर्थातच आडातच नसेल तर पोहऱ्यात कोठून येणार या न्यायाने, जोडीदाराला/बाळाला  लागण होण्याची शक्यता जवळपास मावळते. विषाणूंची संख्या तपासणीत सापडणार नाही इतकी रोडावते,  मग संसर्ग कुठून होणार?  “झाला विषाणूचा लोप; संपला संसर्गाचा कोप” (“Undetectable=Untransmissible”) हा  ह्या लढाईतील नवा एल्गार आहे.

पण हे आता. पूर्वी औषधे नव्हती.  बाळ पोटात असताना तर काहीच करता  येण्यासारखं नव्हतं. मग प्रसूती दरम्यान, जननमार्गात लागण होऊ नये म्हणून सावधगिरी बाळगली जायची. वारंवार तपासणी टाळणे, पाणमोट फुटल्यावर लवकरात लवकर डिलिव्हरी करणे, विटप छेद टाळणे. ‘विटप छेद’ म्हणजे बाळ लवकर बाहेर यावे म्हणून जननमार्गाला घेतलेला छेद. या प्रकारात प्रसूती लवकर होते मात्र आईचे रक्त बाळाच्या नाकातोंडात  जाते आणि संसर्गाची शक्यता कैक पटीनी  वाढते.  सरळ  सीझर करणे असाही एक पर्याय होता. हे सगळेच  प्रयत्न  अपुरे होते. हे समजत होतं.  पण करण्यासारखं दुसरं काही नव्हतंच. अशा पेशंटना शक्य तेवढा दिलासा अशी डॉक्टरी भूमिका होती.

पुढे औषधे आली पण  सुरवातीला औषधोपचार खूप गुंतागुंतीचे होते. तापदायक असे सहपरिणाम होते.  सरसकट औषधोपचार पुरवण्याइतका पुरवठाच नव्हता.  उपचार इतके महाग होते की  तेवढे पैसे कुणाकडेच  नव्हते, मायबापाकडेही  नाही आणि मायबाप सरकारकडेही नाही. मग गरोदरपणी त्यातल्यात्यात वाईट अवस्था असेल तर आणि ते ही  फक्त काही महीने औषधे द्यायची असं धोरण ठरलं.  हळू हळू औषधे सुधारली. अपवादात्मक परिस्थितीत, अत्यल्प काळ वापराऐवजी जागतिक आरोग्य संघटनेनी एचआयव्हीग्रस्त गरोदर स्त्रीला गरोदरपणी आणि पुढे  आयुष्यभर एचआयव्ही औषधे देण्यात यावीत असं सांगितलं. (ऑप्शन बी प्लस, सप्टेंबर २०१५).   कारण मूल उत्तम नागरिक म्हणून वाढायचं तर निव्वळ जन्म-निगडीत लागण थोपवून काय उपयोग?  त्याला आई मिळायला  हवीच की. आई मिळायची तर पुढेही औषधे चालू ठेवायला हवीत. २०१० साली जेमतेम निम्या एचआयव्हीबाधित महिलांना असे  उपचार मिळत होते आज ९०%वर स्त्रियांना अशी औषधे मिळत आहेत. आता तर  गरोदर नसलेल्या स्त्रिया आणि पुरुषही औषधांच्या छत्रछायेत आले आहेत.

एचआयव्हीग्रस्त आयांनी स्तनपान द्यावे का नाही हा प्रश्न मात्र थोडा चकवा देणारा  होता. आईच्या दुधातून एचआयव्हीचा धोका असतो. मग फक्त वरचे, म्हणजे पावडरचे  दूध देण्याचे प्रयोग झाले. हे दूध जनसामान्यांना परवडणे शक्य नाही. परिस्थितीच्या रेट्यामुळे पावडरचे दूध थोडेथोडेच देणे, पातळच देणे, त्याबरोबर  अंगावरचेही  देणे, असे भलेबुरे फाटे फुटले.  मग स्वयंसेवी संस्था मदतीला आल्या.  पावडरचे डबे फुकट देणाऱ्या योजना आल्या.  

पण पावडरच्या दुधाने एचआयव्हीची ईडा टळली तरी सगळी पीडा संपत नाही.  आईच्या दुधाने बाळाला इतर अनेकानेक आजारांपासून संरक्षण मिळत असते, ते पावडरच्या दुधातून मिळत नाही.  पावडरचे दूध देवून एचआयव्हीसारख्या गाजावाजा झालेल्या आजारापासून वाचवलेली बाळं; ‘मां  का दूध’ न मिळाल्याने  जुलाब, कुपोषण, न्यूमोनिया  अशा गरीबाघरच्या आजाराला चूपचाप  बळी पडण्याची शक्यता खूप.

पण यथावकाश  औषधे उपलब्ध झाली तसा हा ही प्रश्न मिटला. सरसकट वरचे दूध देण्याचा सल्ला अगदी अपवादात्मक परिस्थितीसाठी राखून ठेवण्यात आला. जिथे वरचे देणे संपूर्ण सुरक्षित आहे अशा वेळीच वरचे, एरवी अंगावरचेच, हा नियम. पुढे आईला योग्य उपचार सुरू असतील, तर सहा महीने तरी बाळाला निव्वळ अंगावरच पाजावं, अशी शिफारस आली (२०१६). सहा महिन्याच्या पुढे, वरचा आहार देत देत, अगदी दोन  वर्षापर्यंत अंगावर पाजलं तरी चालेल, असंही सांगण्यात आलं. हे म्हणजे इतर चार बायकांना जो सल्ला दिला  जातो तोच झाला. म्हणजे स्तनपानाच्या बाबतीतला  एचआयव्ही आणि बिगर-एचआयव्ही असा फरक औषधांमुळे संपुष्टातच आला. 

बाळाला संसर्ग झाला आहे वा नाही  हे झटपट आणि नेमकेपणानी सांगणाऱ्या तपासण्या नव्हत्या. आता महिन्या दीड महिन्याच्या बाळालाही  एचआयव्ही आहे का हे तपासता येतं;  तपासलं जातं.  सहा महिन्यांनी पुन्हा तपासलं जातं.  वर्ष दीड वर्षाचं झाल्यावर, दूध तोडल्यावरही तपासता येतं; तपासलं जातं. जर सर्व काळजी घेऊनही बाळाला लागण  झाल्याचं निदर्शनास आलं तर इतक्या तान्ह्या बाळाला औषधेही सुरू करता  येतात; केली जातात. दीड महिन्याला पॉसिटीव्ह येतात ती गर्भावस्थेतच  लागण झालेली बाळं. आधी निगेटिव्ह आणि दीड वर्षाच्या अखेरीस पॉसिटीव्ह येतात ती स्तनपानातून एचआयव्ही झालेली बाळं. ताबडतोब उपचार सुरू केले की बरंच भलं होतं त्यांचं.

एकुणात या जटिल प्रश्नांवर  प्रयत्नपूर्वक मात केली आहे आपण. ह्या आघाडीवर आपण मोठं मैदान मारलं आहे. पण अजूनही आव्हाने संपलेली नाहीत. गरोदरपणी आपोआपच बायका डॉक्टरांच्या निगराणीत रहातात. यामुळे  जन्मादरम्यान होणाऱ्या लागणीचे प्रमाण आटोक्यात आले आहे. मात्र अंगावर पाजणाऱ्या बायका काही वारंवार दवाखान्यात येत नाहीत. अशा महिला बरेचदा औषधे सोडतात आणि मग त्यांच्या बाळांना दूधातून लागण होते.  आयांना सतत औषधे घेत ठेवणं हे एक मोठंच चॅलेंज आहे. त्यामुळे तुलनेने दुधातून एचआयव्ही बाधा हा प्रकार आता  जास्त आढळतो. ज्या बाळांना एचआयव्ही होतो त्यांनाही औषधे घेत ठेवणे हे ही एक मोठ्ठे चॅलेंज आहे. यांच्या आई-बापांचे अनेक प्रश्न. एचआयव्ही, नोकरी, व्यसनं, आर्थिक ओढाताण असे अनेक. त्यात ह्या बाळाच्या औषधोपचारचा खर्च म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. जेमतेम अर्धी जनताच हे करू जाणे.

थोडक्यात एचआयव्ही विरुद्धची लढाई जारी असली तरी एक चकमक आपण जिंकलेली आहे. प्रतिबंधासाठीच्या सगळ्या अटी शर्ती पाळल्या तर लागण होण्याची शक्यता जवळपास शून्य होते. माझ्या स्वतःच्या छोट्याशा दवाखान्यात  २५ वर्षात अशी एकही केस घडलेली नाही! जागतिक आरोग्य संघटनेचे घोषवाक्यच मुळी  ‘झीरो व्हर्टीकल् ट्रान्समिशन’ (शून्य वारसा/ शून्य पिढीजात संसर्ग) असे आहे. अग्नीतून सहीसलामत पार जाण्याला अग्निदिव्य म्हणतात. हे एचआयव्हीदिव्य. औषधांच्या सहाय्यानी, गेल्या दहा वर्षात, सुमारे दीड ते दोन दशलक्ष मुलांनी, एचआयव्हीचा हा अनाहूत वारसा नाकारला आहे. हे एचआयव्हीदिव्य पार केले आहे.

आता तर हे सारं इतकं अंगवळणी पडलं आहे की उपचारांचे  हे सव्यापसव्य आता कुणाला दिव्यही वाटत नाही. कोणे एके काळी असं नव्हतं.


प्रथम प्रसिद्धी लोकमत, सखी पुरवणी, १३.०४.२०२१ 

 

No comments:

Post a Comment