डॉ. शंतनु अभ्यंकर
स्त्री आरोग्य तज्ञ, वाई
पेशंट, कुटुंबियांच्या ग्रुपमधल्या तरण्याताठ्या मुलींच्या आया आणि काही परिचित स्त्रिया यांना, आज सकाळी, अचानकच माझ्याबद्दल ममत्व वाटायला लागलं.
फोन, व्हॉट्सॲप, मेसेज वगैरे मार्फत संपर्क सुरू झाला. सगळ्यांचा प्रश्न एकच; व्हाट्सअप वर आलेली ' ती ' पोस्ट खरी का खोटी? थोड्याच वेळात या पोस्टची आणि प्रश्नांची मला इतकी सवय झाली की कोणी प्रश्न विचारायच्या आतच, ' तुम्ही वाचलेली पोस्ट तद्दन मूर्खपणाची आहे ', असं मी बेलाशक सांगू लागलो.
लवकरच अठरा वर्षाच्या पुढील व्यक्तींना लसीकरण सुरू होत आहे. पाळीच्या आधी आणि नंतर चार-पाच दिवस प्रतिकारशक्ती कमी असते. तेंव्हा अशा सर्व मुलींनी ती लस घेणे टाळावं, अशा आशयाचा अतिशय खोटा, अशास्त्रीय, सामान्यजनांना संभ्रमात टाकणारा आणि खोडसाळ मजकूर त्या पोस्टमध्ये लिहिलेला आहे. वर सर्व तरुण मुलींना हा मेसेज पाठवा अशी प्रेमळ विनंतीही आहे.
मासिक पाळीच्या चक्रामध्ये शरीरात अनेक बदल होतात हे शंभर टक्के सत्य असलं तरी या चक्रानुसार प्रतिकारशक्ती हेलकावे खाते हे शंभर टक्के असत्य आहे. तेव्हा लस बेलाशक घ्यावी. जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा घ्यावी. पाळीचा आणि लस टाळण्याचा काही संबंध नाही.
पण चीड आणणारी गोष्ट तर पुढेच आहे. अशा पद्धतीच्या पोस्टमधून स्त्रियांकडे आणि त्यांच्या शरीरधर्माकडे बघण्याचा एक चुकीचा, नकारात्मक, विकृत दृष्टिकोन वारंवार ठळक केला जातो.
स्त्रियांच्या बाबतीत मुळातच असलेल्या नकारात्मक समाजभावनेवर स्वार होऊन कसं स्वैरपणे हुंदडायचं हे आपण या अफवेकडून शिकावं. सत्यअसत्याचा विलक्षण मिलाफ या अफवेत दिसून येतो. पाळीनुसार शरीरात बदल होतात हे सत्य, पण त्या चक्रानुसार प्रतिकारशक्ती कमी जास्त होते हे असत्य. पण सत्याची फोडणी दिल्याने अफवा अधिक झणझणीत झाली आहे. लिहिताना आव असा की, बघा मला तुमची कित्ती कित्ती काळजी, मी तुम्हाला वेळेत सावध करत आहे, सांभाळा!!! असा जन्मदात्या मायबापासारखा काळजीचा वत्सल सूर. यामुळेही विश्वास वाढतो. त्यातून ती इंग्रजीत आलेली पोस्ट. तेव्हा ती बरोबरच असणार असा अनेकांचा गैरसमज. असो.
शिवाय तुम्हाला काही फार जगावेगळी कृती करायची नाहीये. फक्त लस घेण्याचा दिवस काही दिवस पुढेमागे करायचा आहे. इतका साधा, सोपा, निरुपद्रवी, निरागस आणि वरवर पाहता, तुमच्या हिताचाच सल्ला आहे हा. हा निर्मळ साधेपणा देखील अशा गोष्टी पटकन पटायला कारणीभूत ठरतो. पाळीच्या वेळेला लस घ्यायची झाली तर 27 सूर्यनमस्कार काढून मग घ्या; असं कोणी सांगितलं असतं तर विश्वास बसला नसता पण, ' प्रतिकारशक्ती कमी होते, तेव्हा सावध! ' हे कसं मनाला स्पर्शून जातं.
अफवांचसुद्धा एक शास्त्र आहे आणि ते आपण लक्षात घेतलं पाहिजे.
त्यामुळेच इतकं सगळं सांगूनही, ' चार दिवस इंजेक्शन पुढे मागे घेतल्याने असा काय फरक पडतो? तोटा तर काही नाही ना? उगाच विषाची परीक्षा कशाला? ', असा विचार करणारी मंडळी असणारच. पण माझ्या मते तोटा होतो. सारासार विवेकबुद्धी गहाण टाकून, उपलब्ध माहितीचा विवेकाने विचार न करता, कुठल्या तरी अज्ञात भीतीपोटी स्वतःची वागणूक बदलणे हा फारच मोठा तोटा आहे. मग आपल्या मेंदुला असाच विचार करायची सवय लागते. मग आपल्या लहान मुलीच्या मेंदूलाही ती लागते आणि अशा पद्धतीने बुद्धीभेद झालेली, अविचारी पिढी, पिढ्यानपिढ्या निर्माण होत राहते. अविवेकी अवैज्ञानिक विचारांचा सगळ्यात मोठा तोटा होतो तो हा. हे विष नाही, हे तर हलाहल आहे!!!
पण करोना आणि त्यामुळे झालेल्या अफवांच्या बुजबुजाटाचा एक फायदा झाला. अनेकांनी थेट विश्वास ठेवण्याऐवजी या पोस्टची विश्वासार्हता तपासून पाहिली. ही खूप समाधानाची गोष्ट आहे. वाईटातही चांगलं पहावं ते म्हणतात ते असं.
No comments:
Post a Comment