Sunday, 28 February 2021

विज्ञान म्हणजे काय? लेखांक ३

 

विज्ञान म्हणजे काय?

कोणीही चुकू शकतो

डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.

 

लेखांक ३  

विज्ञानाचा प्रवास असा चुका ओळखून, त्या दुरुस्त करत, सुधारत सुधारत होतो. जगाची रीती समजावून सांगणाऱ्या  कथा, परिकथा, पुराणकथा; या पद्धतींत अशी सोय नाही.

सांगणारा कुणीही असो. आई, वडील, मित्र, शिक्षक, गुरु, मोठ्ठा जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, प्राचीन ज्ञानवंत, कोणीही असो. कोणी सांगितलंय याला अजिबात  महत्व देऊ नये; फक्त  काय सांगितलंय याचाच विचार करायला हवा. विज्ञान नावाची युक्ति आपल्याला असं बजावत असते. आपल्या गुरूंनी सांगितलेलं सर्वच्या सर्व, सदासर्वदा बरोबरच धरून चाललं पाहिजे, असं विज्ञान मानत नाही.

पण असं जर तुम्ही मित्रांना सांगितलंत तर काही मित्र भडकतील. म्हणतील, ‘जर कोणीही चुकू शकते, असं ही युक्ति सांगते, तर त्याचा अर्थ इतके सगळे महान शास्त्रज्ञ मूर्ख म्हणायचे का? न्यूटन  वेडा होता का?’

 मध्येच कोणीतरी मैत्रीण पचकेल, ‘...आणि या सगळ्यांना मूर्ख आणि वेडे ठरवणारा  तू स्वतःला फार शहाणा समजतोस  असं दिसतंय!’   

पण तुम्ही अजिबात वैतागू नका. त्यांना तुम्ही शांतपणे अणूच्या अंतरंगाच्या शोधाची गोष्ट सांगा. आपण पाहिलंय  की जे.जे.थॉमसन यांच्या सांगण्यात त्यांच्या शिष्याने म्हणजे अर्नेस्ट रदरफर्ड यांनी सुधारणा केली. त्यांच्या सांगण्यात त्यांच्याच शिष्याने म्हणजे निल्स भोर यांनी नेमकेपणा आणला. अणूच्या अंतरंगाची बित्तंबातमी आपल्याला मिळाली आणि त्यावर आजचे इलेक्ट्रॉनिकचे, इंटरनेटचे महितीयुग उभे आहे.

कल्पना करा की आपल्या गुरुचा शब्द तो अंतिम शब्द, असं  समजून  जर पुढे काही सुधारणा किंवा बदल नाकारले गेले असते तर? पण विज्ञान नावाच्या युक्तीला हे मान्य नाही.  चुका शोधून त्या मान्य करणं, त्या  दुरुस्त करणं आणि हे सतत करत रहाणं; म्हणजे विज्ञान.

‘कोणीही चुकू शकतं’, याचा अर्थ आपण एकटेच शहाणे आणि बाकी सगळे मूर्ख असा नाहीच्चे मुळी. ‘कोणीही चुकू शकतं’, याचा अर्थ पालक, शिक्षक, शास्त्रज्ञ, ज्ञानवंत यापैकी कुणालाही आदरानी वागवू नका; सतत दुरुत्तरे करा असाही नाही. ‘कोणीही चुकू शकतं’, याचा अर्थ एवढाच की उद्या ज्येष्ठांनी सांगितल्या विरुद्ध काही दिसून आले तर ज्येष्ठांनी सांगितलेली माहिती तपासून घ्यायला हवी. केवळ ती कोण मोठ्या व्यक्तीने सांगितली आहे, हा माहिती बरोबर असल्याचा पुरावा असू शकत नाही.

पृथ्वी गोल आहे, सूर्य स्थिर असून पृथ्वी त्याभोवती फिरते आहे, देवी नावाचा रोग विषाणूमुळे होतो; ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पूर्वी माहीत नव्हत्या.  मग त्या काळातले गुरु, आपल्या शिष्यांना काय बरं शिकवत होते? पृथ्वी सपाट आहे, सूर्य पृथ्वी भोवती फिरतो, देवी कोपल्यामुळे देवीच्या रोगाची साथ येते... असंच तर शिकवत असणार. नव्हे, नव्हे, अस्संच तर शिकवत होते. जसे हे  शोध लागत गेले तसे शिकवणारे बदलत गेले. याचा अर्थ पूर्वीचे गुरुजी मूर्ख किंवा वेडे होते असा होतो का? नाही. त्यांना जे ठाऊक होते तेच ते  शिकवत होते. एवढाच त्याचा अर्थ.

आता तर देवीचा रोग विषाणूमुळे होतो हे आपण शोधून काढले आहे.  त्या विरुद्ध लस तयार केली आहे. ती लस जगभर सगळ्या माणसांना दिली आहे. यामुळे आता देवी नावाचा रोग अस्तित्वातच नाहीये. देवीचा समूळ नायनाट झाल्यामुळे आता देवीची लस देणं बंद झालं आहे.  असं असताना, आज जर कोणी  देवीचा रोग देवीच्या कोपाने होतो असं सांगू लागला, तर तुम्ही काय म्हणाल? समजा तो म्हणाला की माझ्या पणजोबांनी तसं लिहून ठेवलं आहे.  माझा माझ्या पणजोबांवर गाढा विश्वास आहे.  तर तुम्ही काय म्हणाल? किंवा तो म्हणाला की कुठल्यातरी जुन्या पुस्तकात त्यांनी ते   वाचलं आहे. हे पुस्तक खूप जुनं आहे, म्हणून ते खरं आहे.  तर तुम्ही काय म्हणाल? कदाचित तो तुम्हाला विचारेल, माझे पणजोबा काही वेडे होते का? पुस्तक लिहिणारा काय मूर्ख होता का? तू कोण आइनस्टाईन लागून गेला का? तर तुम्ही काय म्हणाल?

तुम्ही अजिबात गडबडून जावू नका. पणजोबांना जे माहीत होतं ते त्यांनी सांगितलं.  ग्रंथकारांना जे माहीत होतं ते त्यांनी लिहिलं. त्यांच्या कल्पना चुकीच्या होत्या हे आपण आज म्हणू  शकतो.  ते चूक असतील; पण ते  मूर्खही नव्हते आणि वेडेही नव्हते. त्यांच्या काळी  त्यांना तितपतच माहिती होती. 

पण आजही आपण त्यांच्याच माहितीला चिकटून बसलो तर?  देवीच्या कोपाने देवीची साथ येते असं म्हणत बसलो तर?  पणजोबांवर गाढा विश्वास असल्यामुळे ते बरोबरच होते  किंवा पुस्तक जुनं असल्यामुळे ते  बरोबरच  आहे असं म्हणत बसलो तर? तर आपण मात्र मूर्ख आणि वेडे ठरू!

चूक कोणीही करू शकतं. जुनी जाणती माणसं चुकू शकतात, जुने पुराणे ग्रंथ चुकू शकतात.  चूक शोधा, चूक  मान्य करा, चूक दुरुस्त करा आणि प्रगती साधा असं विज्ञान नावाची युक्ति आपल्याला सांगते.

 

 

प्रथम प्रसिद्धी ‘किशोर’ मार्च २०२१

 

 

Tuesday, 2 February 2021

विज्ञान म्हणजे काय? लेखांक २

 

विज्ञान म्हणजे काय?

सतत चुका सुधारत जाते ते विज्ञान

डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.

 

लेखांक २ 

नीट आणि नीटस उत्तरे शोधायची युक्ति म्हणजे विज्ञान. त्या युक्तीबद्दल आपण शिकणार आहोत.      

ह्या युक्तीचा शोध अमुक एक माणसाला अमुक एके  दिवशी लागला असं नाही हं. अनेक लोकं, अनेक वर्षं, ही युक्ति वापरुन काय काय विचार करत होते. आसपासचा शोध घेत होते. हळूहळू अशा पद्धतीने विचार केल्यास लवकर उत्तर मिळतं हे कळलं.  उत्तराचा पडताळा पहाता येतो हे लक्षात आलं. अशा पद्धतीने  विचार केल्यास  बिनचूक उत्तर मिळतं हे कळलं.  आणि यदाकदाचित उत्तर चुकलं तर ते दुरुस्त करायची एक भन्नाट सोय या पद्धतीत होती.

आता हेच बघा ना, अणूची  रचना तुम्हाला आता शाळेत शिकवतात. पण हा अणू कसा  बनलेला आहे याबद्दलचे शास्त्रज्ञांचे अंदाज, आडाखे आणि गणिते हळूहळू बदलत गेलेली दिसतात. हळूहळू सुधारत गेलेली दिसतात.  एकोणिसाव्या शतकाअखेरीस जे. जे. थॉमसन् या ब्रिटीश शास्त्रज्ञानी सुचवलेलं अणूचं मॉडेल हे योग्य समजलं जात होतं. आता हे बाद ठरलं आहे. थॉमसन् यांचाच विद्यार्थी, अर्नेस्ट रदरफर्ड यांनी, गुरुजींचं मॉडेल बाद ठरवत, नवंच मॉडेल मांडलं. थॉमसन् यांच्या मॉडेलमधील बऱ्याच त्रुटी त्यांच्या या शिष्योत्तमानी दूर केल्या. रदरफर्डनी अणुची रचना ही मधोमध केंद्र आणि त्याभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन, अशी कल्पिली. आपल्या सूर्यमालेसारखंच हे. प्रचंड मोठ्ठा सूर्य आणि त्याच्या भोवती आपापल्या कक्षेत फिरणारे, सूर्याच्या मानानी कस्पटासमान, असे ग्रह. पण ‘कक्षा’ म्हणजे चित्रात दाखवतात तशी काहीतरी गोल रेघ आहे आणि त्यानुसार हे इलेक्ट्रॉन फिरत असतात असा तुमचा समज असेल, तर तो मात्र गैर आहे. इलेक्ट्रॉन म्हणजे पृथ्वी, मंगळ वगैरे ग्रहांसारखी एखादी वजनदार वस्तू नाही. हे लक्षात घेऊन, रदरफर्ड यांचा शिष्य, नील्स भोर यांनी गुरुवर्य रदरफर्ड यांच्या मॉडेलमध्ये आणखी सुधारणा केल्या. सध्याची आपली अणुकल्पना ही अशी रदरफर्ड-भोर यांनी मांडलेली कल्पना आहे.

असे बदल विज्ञानात नेहमीचेच. गॅलिलिओचा तो प्रसिद्ध प्रयोग तुम्हाला माहीत आहेच. उंचावरून सोडलेली जड अथवा हलकी वस्तू एकाच वेळी जमिनीवर पडते हे त्यानी दाखवून दिलं. पुढे न्यूटननी, वस्तूंच्या हालचाली आणि ग्रहांच्या हालचाली एकाच नियमानी चालतात, हे दाखवून दिलं. आइनस्टाईननी, न्यूटनचे हे नियम काही परिस्थितीत लागू पडत नाहीत, असं दाखवून दिलं. उदाहरणार्थ अणूच्या अंतरंगातील सूक्ष्म कण न्यूटनच्या गणितानुसार चालत नाहीत.  

पूर्वी बरीच वर्ष माणसाला दोन बाजूला दोन मूत्रपिंड (Kidney) असतात आणि त्यामुळे आपला तोल सांभाळला जातो असं समजलं जात होतं. मग तोल सांभाळण्याचा मूत्रपिंडाशी काही संबंध नाही हे लक्षात आलं.  मूत्रपिंडं लघवी तयार करतात हे लक्षात आलं. आता तर ती ‘हीमोपॉएटिन’ हे रक्त तयार करण्यास आवश्यक संप्रेरक तयार करतात हेही लक्षात आलं आहे.  

विज्ञान नावाची युक्ति अशी चुका सुधारत सुधारत पुढे जाते. यामुळे खूपच फायदा होतो. जंगलात भटकताना समजा  आपण वाट चुकलो तर ती चूक सुधारण्याची संधी हवीच की. समजा आपली दिशा चुकली असेल, तर ती बदलायला हवी.  समजा आपण नकाशा चुकीचा वाचला असेल, तर तो नीट वाचायला हवा. समजा  नेलेला नकाशाच  चुकीचा असेल तर तो भिरकावून देत आपली आपण वाट शोधायला हवी. विज्ञानाचा प्रवास असा चुका ओळखून, त्या दुरुस्त करत, सुधारत, सुधारत होतो.

जगाची रीती समजावून सांगणाऱ्या  कथा, परिकथा, पुराणकथा या पद्धतीत अशी सोय नाही.

 

प्रथम प्रसिद्धी किशोर फेब्रुवारी २०२१