Tuesday 26 November 2019

बैल, एक अंगावर येणारा अनुभव...


डॉ. शंतनू अभ्यंकर 

‘बैल अ-बोलबाला’ नावाचं नाटक नुकतंच पाहिलं मी. संवेदनशील अभिनेते सयाजी  शिंदे यांच्या प्रेरणेतून साकारलेला,    बैल नावाच्या माणसाच्या अबोल मित्राचा, हा बोलबाला. नाटक संपलं. पडदा पडला. एक सुन्न शांतता थिएटरमध्ये पसरली होती. पडदा पुन्हा  वर गेला. आता प्रेक्षकांना प्रतिक्रिया विचारणे सुरू झाले. मित्र म्हणला प्रतिक्रिया दे. शक्यच नव्हतं ते. नाटक संपताच झटकन प्रतिक्रिया द्यायला हे नाटक म्हणजे कोणतीही  किस्सेवजा कहाणी नाही आणि मीही कोणी चॅनेलपटू ‘चर्चिल’ नाही. विचारांना ढुश्या  देणारे हे नाटक आहे. बैलाच्याच भाषेत बोलायचं तर हे नाटक चक्क रवंथ करत बसावं असं आहे. 

राजीव मुळ्येंची ही संहिता, ‘नाटक’ तरी आहे का इथून प्रश्न सुरू होतात. बैल विषयक मराठीतील उत्तमोत्तम कविता इथे लयदार  भाषेत, गात, नाचत, वाजत-गाजत सादर होतात. एक शेतकऱ्याबरोबरच लहानाचा मोठा झालेला बैल, आता त्याने तो   कसायाला विकायला काढलाय. बैलाचा आणि त्याच्या मालकाचा हा आदल्या रात्रीतला संवाद; विविध कवींच्या भाषेत साधलेला. सगळ्या कविता एकत्र गुंफायला एक सूत्रमात्र  म्हणून हा प्रसंग.  
पार सिंधु संस्कृतीच्या शिक्कयावरील बैलापासून सुरू झालेला माणसाचा आणि बैलांचा प्रवास, दोघेही एकमेकांवर अप्पलपोटेपणाचे आरोप करतात, स्वतःची बाजू हिरीरीने मांडतात, भांडतात, रडतात, समजावतात; एकमेकाला समजावून घेतात. शेतकऱ्याचं आणि बैलाचं  सजीव, ओलं नातं पाहून/ऐकून आपलेही डोळे पाणावतात आणि अखेर  बैलाची ‘कत्तल’ ऐकून आपण हबकून जातो. इथे नाटक संपतं...पण आपल्या मनातलं नाटक सुरू होतं. नाटकाने आपल्याला विचार करायला भाग पाडलेलं असतं. 

आपल्या बापजाद्यांनी बैल पाळला तो गरज म्हणून. हा पशू माणसाळवल्यावर मग त्याच्याबद्दलच्या भावभावना आल्या, आपलेपणा आला, त्याच्या सोबतच्या साऱ्या ऐश्वर्याच्या, पतप्रतिष्ठेच्या कल्पना आल्या. कृषि आधारित  सांस्कृतिक, आर्थिक, कौटुंबिक, मूल्यव्यवस्था आल्या. नव्या जमान्यात ह्या साऱ्या लयास जात आहेत. असल्या नाटकाची  स्मरणरंजनपर  विलापिका होण्यास असा कितीसा वेळ लागणार? पण हा बैल तसा नाही. आपल्या प्राक्तनाला घट्टमुट्टपणे सामोरे  जाणारा, पण त्याच वेळी आपल्या ऐतिहासिक कामगिरीचा दस्तावेज, रोखठोकपणे,  थेटपणे  मांडणारा  हा बैल आहे. मुळात बैल आणि त्याचे शेतीतले महत्व लयास जात आहे तर त्याबद्दल उर  भरून बोलणेही लयास जाणारच. आपल्या संस्कृतीच्या एका मरणासन्न अंशाबद्दल हे नाटक आहे. ह्या मरणाचा किती शोक करायचा  हा ज्याचा  त्याचा प्रश्न. प्रेक्षागृहात  बैलाच्या सुखदुखाशी समरस होणारे, बाहेर येताच फुकट दिला तरी बैल  पाळणार नाहीत हे निश्चित. 

पण अर्थातच लोकांनी बैल पाळवा असला वृषभ/गो-पूजक संदेश देणारं हे नाटक नव्हे.  हे नाटक, कधी  आपल्यातला बैल तर कधी बैलातला माणूस, आपल्याला आलटून पालटून दाखवून देते. बैलही कधी मायाळू, कधी माजोर्डा, कधी मानी तर  कधी मुका बिचारा असा मानवी असतो.  आपणही कधी कधी बैलोबा असतो, कधी कधी शुद्ध  नंदीबैल असतो, घाण्याचे बैल असतो, गावावरून ओवाळून टाकलेले वळू असतो. कधी कधी आपलाही बैल रिकामा ठरतो, बडवलेल्या (वृषणे बाद केलेल्या)   बैलासारखे आपणही कधी कधी नपुंसक असतो.  आपणही कोणाकडून तरी  पाळले गेलेलो असतो आणि आता तेच आपले भागधेय  असंही आपण ठरवलेलं असतं.  आपल्याही झुलीखाली चाबकाचे वळ असतात. नाटक संपल्यावर असले विचार छळतात तुम्हाला आणि हीच या रंगमंचीय बैलाची  ताकद आहे, हेच त्याचे सामर्थ्य आहे. 

यातलं संगीत छान. कोणतीही ऐट न आणणारं. मोजकीच,  भारतीय वाद्ये आणि चालीही साध्या सोप्या, गुणगुणाव्यात अशा.  नेपथ्य, प्रकाश, ध्वनी, हे पूरक पण  जेवढयास तेवढं. सुधारणेला भरपूर वाव.  सगळे हौशी कलाकार, खरंतर कार्यकर्ते, त्यामुळे   सादरकर्त्यांना (लोकरंगमंच, सातारा) याहून अधिक काही परवडणार नाही हे निखळ सत्य. नाटकाची खाज असल्याशिवाय हे असलं काही उभं रहात नाही. सगळी सोंग आणता येतात पण...! प्रेक्षागृहाबाहेरचे कला-प्रदर्शनही (चित्रे विजय धुमाळ; शिल्प किशोर ठाकूर) मस्त.  तुम्हाला वेगळ्या मूडमध्ये घेऊन जाणारे

बहिणाबाई, वसंत सावंत, कवी यशवंत, विठ्ठल वाघ, नारायण कुलकर्णी-कवठेकर, जगदीश कदम, श्रीकांत ढेरंगे, लोकनाथ यशवंत, सुखदेव ढाणके, प्रकाश होळकर, भरत दौंडकर, सायमन मार्टिन, कल्पना दुधाळ, अजय कांडर, केशव देशमुख, थळेन्द्र लोखंडे, वसंत शिंदे, भालचंद्र नेमाडे अशा भारदस्त कवींच्या ह्या कविता. त्यामुळे जबरदस्त शब्द, हेच ह्या नाटकाचे सर्वात मोठे बलस्थान.  खरंतर शांतपणे, एकेककरून,  एकांतात आस्वादाव्यात अशा ह्या कविता. पण इथे एकमेकांच्या साथीने अगदी वाऱ्यावर  शिवार डोलावं, तितक्या देखण्या दिसतात. आपल्याला डोलायला लावतात.  कविता अर्थातच त्या त्या  बोलीत येतात. एकाग्रपणे ऐकाव्या लागतात. निवेदन जरा नागर बोलीत येतं. बोलींचं हे रूळ बदलणे जरा खडखड वाजतं, पण त्याला इलाज नाही. कित्येक शब्द म्या पामराला अपरिचित. खेड्यातले, थेट शेतीशी, बैलाशी संबंधित शब्द. ते समजायला मला शब्दकोशच लागेल. मी तरी बरा  म्हणायचा. खेड्यात लहानाचा मोठा झालो आणि शेतीत जरी नाही तरी वाडीत वाढलो आणि आज  माझी प्रॅक्टिस  खेड्यातच आहे.  पण पुण्यामुंबईच्या डॉट कॉम पिढीला हे फारच  परकं वाटणार हे निश्चित.
................................................................................................
..............

सॉरी हं. लिखाणात जरा खंड पडला. झालं असं की आत्ताच एक मुलगा आईला पायाला लागल्याचं सांगत आला आणि मी मधूनच उठून पेशंट तपासायला गेलो. काय झालं विचारल्यावर तो म्हणतो कसं, ‘आओ डॉगदर, आमी जत्रंला गेल्तो, पण अचानक अ  बुलक् केम ऑन आवर बॉडी!!!’ पाहीलंत, असा हा बैल, इट कम्स अचानक ऑन आवर बॉडी. अचानक तो जाणीव करून देतो, आपलं जिणं, आपलं रहाणं, आपलं खाणं, आपलं बोलणं सगळं सगळं बदलतंय. नीट बसत नाही म्हणून चार्जर  काढून दुसऱ्या प्लगला लावावा तशा सहजतेने  खेड्यापाड्यातल्या लोकांनी पोरांची नाळ इंग्रजीच्या प्लगला जोडली आहे. तेंव्हा बैलाचा बुलक् आणि शेणाचं बुलशिट झालेलंच आहे. बैल आता जाणारच  आहे, नंतर झोपा करून उपयोग नाहीच्चे, तेंव्हा तेवढे कष्ट तरी घ्यायचे का नाही एवढंच आता ठरवायचं आहे.