Thursday 24 September 2015

संपेल का कधीही, हा खेळ बावळ्यांचा?

संपेल का कधीही, हा खेळ बावळ्यांचा?
डॉ.शंतनू अभ्यंकर, मॉडर्न क्लिनिक, वाई, जि.सातारा. ४१२ ८०३. मो.क्र. ९८२२० १०३४९

आता सुरु होतील फोन वर फोन, आयांचे लेकींना, सास्वांचे सुनांना, जावांचे नणंदांना वगैरे, वगैरे.. फोन असतील मुख्यत्वे शुभेच्छांचे, आपलेपणानी, आठवणीनी, वेळात वेळ काढून केलेले. सगळ्यांचा मतीतार्थ एकच, ‘जप गं बाई, या दिवसात...त्या अमकीचं तमकं झालं...ऐकलस ना...; सगळं सुखरूप पार पडलं की मी सुटले...आणि तू ही!!...कारण रात्र वैऱ्याची आहे. पोर्णिमा/अमावस्या आलीच आहे आणि या वेळी ग्रहण आहे. ग्रहण पाळलं नाही तर काय होतं हे माहीतच आहे. तेव्हा, असशील जास्त शिकलेली तरी तुझा नेहमीचा आगाऊपणा जरा बाजूला ठेव. मोठी माणसं सांगतात ते उगीच नाही.’
‘विषाची परीक्षा कशाला? राहीलं एखाद दिवशी घरात तर काsssही बिघडत नाही. तोटा तर काही होत नाही, झाला तर फायदाच आहे!’
‘विषाची परीक्षा कशाला?’ हा खूपच डेंजरस युक्तिवाद आहे. मुळात ग्रहणकाळात पथ्य न पाळणं हे गर्भ-घातक आहे असा कोणताही पुरावा नाही. ओठ का फाटतात हे ही माहीत नाही आणि ग्रहणं का होतात हे ही माहीत नाही; अशा काळात जोडलेला हा बादरायण संबंध. गर्भारपणात कुणाला ना कुणाला, कधी ना कधीतरी, काही ना काहीतरी घोटाळा होणारच. ओठ फाटणे, बोट जुळणे, पाठीचा कणा दुभंगलेला असणे याची प्रत्येकाची कारणं अनेकविध आणि वेगवेगळी आहेत. होईल त्या प्रत्येक दोषाला ग्रहणाचं कारण चिकटवणं हास्यास्पद आहे. शिवाय एकदा कारण चिकटवलं की शोध थांबतो. कारणांचा शोध थांबला, भरकटला  की उपायांचा शोधही थांबला, भरकटलाच म्हणायचा. सव्यंग मूल हवंय कुणाला? सगळ्यांना चांगली धडधाकट, नाकी डोळी नीटस मूलंच हवीत की. पण मूल होणं ही एक जैविक प्रक्रीया आहे. त्यात डावं-उजवं होणारच. एखाद्या अत्याधुनिक कारखान्यातून माणूस एकापाठोपाठ एक, लाखो गाड्या बिनचुक निर्माण करू शकतो. पण निसर्गात असं नसतं. पेरलेलं सगळंच उगवत नाही. उगवलेलं सगळंच निर्मळ नसतं. जो नियम पाना-फुलांना, किड्या-मुंगीला तोच आपल्याला. ही दृष्टी जीवशास्त्र देतं आपल्याला. सुद्धृढ संतती हवी असेल तर वैद्यकशास्त्रानी अनेक यम-नियम सांगितले आहेत. गर्भधारणेपूर्वी रुबेलाची लस, फोलिक अॅसिडच्या गोळ्या, मधुमेह व त्या सदृश अन्य आजार नियंत्रणात असणं, पुढे गरोदरपणात तपासण्या वगैरे वगैरे. हे न करता कुठल्याश्या खगोलीय घटिताला विषाचं लेबल लावणं शहाणपणाचं नाही.
वर्षभरात ४ ग्रहणं होतातच होतात, कधी कधी सातही होतात. आपल्याकडे दिसणं न दिसणं वगैरे जमेस धरून, गर्भावस्थी ग्रहण ना पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे?, असंच विचारता येईल. पण एवढ्या ग्रहणछायाग्रस्तांच्या मानानी ग्रहणबाधा क्वचितच दिसते म्हणायचं. ज्या मुलुखात असलं काही पाळत नाहीत तिथे तर वेडीविद्री मुल अगदी लक्षणीय संख्येत आढळायला हवीत. तसंही दिसत नाही. मुलाची रचना तिसऱ्या महिन्याअखेर सिद्ध होते. रचनेतले दोष (ओठ फाटणे, बोटे जुळणे, मणका उघडा असणे) या वेळेपर्यंत गर्भात उतरलेले असतात. त्या मुळे तिसऱ्यानंतर ग्रहण पाळून, या बाबतीतला फायदा शून्य.   मुळात पूर्ण दिवसांची असतील तर ९६% बाळं चांगलीच निपजतात. सुमारे ४% बाळांमध्येच व्यंग असतात. त्यामुळे ग्रहण पाळणं वगैरेसारख्या कुठल्याही रीतीभातीला ९६% यश निश्चित आहे. म्हणूनच ह्या समजुती चालू रहातात, वाढतात.  
ग्रहण न पाळणे ही विषाची परीक्षा नसून ग्रहण पाळणं हीच विषाची परीक्षा आहे. ग्रहण पाळणाऱ्या त्या माउलीला काय काय सोसावं लागतं, जरा कल्पना करा. वेध लागल्यापासून ते ग्रहण पूर्ण सुटेपर्यंत त्या बाईनं म्हणे एका जागी बसायचं. झोपायचं नाही. टक्क जाग रहायचं. अन्न-पाणी वर्ज्य. किती भयंकर आहे हे. हिनी भाजी चिरली की मुलाचा ओठ फाटणार, हिनी बोट जुळवली की गर्भाची जुळणार. केवढं टेन्शन येत असेल त्या बाईला? जिची ह्या सगळ्यावर नितांत श्रद्धा आहे तिच्या काळजाची केवढी कालवाकालव होत असेल. आपल्या एखाद्या छोट्याशा चुकीमुळे जन्मभर आपल मूल पंगू होणार. दोष आपला , शिक्षा बाळाला. काळजाचा थरकाप उडवणारी कल्पना आहे ही . ही उराशी कुरवाळत त्या बाईनी ते आकाशस्थ ग्रहगोलांचे सावल्यांचे खेळ संपेपर्यंत जीव मुठीत धरून बसायचं. काहीही, कधीही, कोणत्याही कारणानी बिघडलं की सर्व मंडळी त्या बाईला बोल लावायला मोकळे.... ‘तूच नीट पाळलं नसशील.’ तद्दन फालतूपणा आहे हा. बाईनी भाजी चिरण्याचा आणि ओठ फाटण्याचा दुरान्वयानेही संबंध नाही.
ग्रहण पाळण्याचे थेट तोटेही अनेक आहेत. गर्भारशीला भूक मुळी सहनच होत नाही. गर्भाला तर त्याहून नाही. इतका इतका वेळ उपास केला की रक्तातली साखर उतरते. चक्कर येते. थकवा येतो. गर्भाच्या रक्तातली साखर ही थेट आईच्या शुगरलेव्हल वर अवलंबून असते. त्यालाही बिच्याऱ्याला उपास घडतो. भुकेनी कळवळतं पोर ते. खूप कमी साखर , पुन्हा पुरेपूर साखर असे शुगर लेव्हलचे हेलकावे तर अजिबात सोसत नाहीत गर्भाला. पण याची तमा न बाळगता त्या पोटूशीने तोंड बंद ठेवायचं. का?, तर बाळाचं भलं आहे त्यात म्हणून. एखाद्या कृतीचं समर्थन करायला निव्वळ त्या मागचा हेतू चांगला आणि उदात्त आहे एवढंच कारण पुरेसं नसतं.
एका जागी बसून बसून रक्तपुरवठा मंदावतो. रक्ताचा वेग मंदावला की त्याच्या गुठळ्या होतात. क्वचित कधीतरी हे फारच धोक्याचं ठरू शकतं.
पाणी वर्ज्य केलं की लघवी कमी होते. आपल्या मुत्राशयात जंतू असतातच. लघवी करताना, त्यांची सदोदित वाढणारी प्रजा, वेळोवेळी फ्लश केली जाते. लघवी कमी झाली की हे जंतू मूळ धरतात. मूत्रमार्गाचे इन्फेक्शन ही एक अत्यंत त्रासदायक बाब आहे. हे विकतचं दुखणं कशाला हवंय तुम्हाला?
शिवाय तुम्ही काय करताय हे पुढली पिढी बघत असते. बघून बघून शिकत असते.  ग्रहणाला असं-असं घाबरायचं हे संस्कार त्यांच्यावर नकळत घडत जातात. शाळेतलं शाळेत, विज्ञानाच्या पुस्तकातलं विज्ञानाच्या पुस्तकात. घरचं शास्त्र वेगळं, दारचं वेगळं. कितीही यडच्याप कल्पना असली, वाईट असली, त्याज्य असली, आपल्याला पटली नाही  तरी डोकं चालवायचं नाही. मेंदू बंद ठेवायचा. हे संस्कार संक्रमित होतात. हा तर मोठाच तोटा आहे. विष हे आहे. तुम्ही जेव्हा ग्रहण पाळता तेव्हा हे हलाहल पाजत असता पुढच्या पिढीला.
माणसाच्या टीचभर मेंदूने ग्रहणाबद्दल काय काय कल्पना लढवल्या आहेत हे पाहून आपण थक्क होतो. कोणी चंद्र-सूर्याला कुत्र्याच्या तोंडी दिलं तर कोणी अस्वलाच्या; कोणी त्यांच्यात भांडणं लावून चंद्र-सूर्याला आळीपाळीनं रुसायला लावलं, तर कोणी त्यांना आळीपाळीनं शापभ्रष्ट आणि शापमुक्त केलं. चंद्र-सूर्यावर ताव मारणारे राक्षस तर अनेक जमातीत आहेत. यातल्या प्रत्येक कल्पनेला त्या त्या टोळीच्या धर्मशास्त्राचा भरभक्कम पाठींबा आहे.  
कुठल्याश्या कोरिअन कथेमध्ये ते कुत्रं डायरेक्ट सूर्याचे लचके तोडायचं, आणि मग ह्यांनी इथे ओलेत्याने, सातत्याने  ढोल पिटले की तिकडे ते कुत्रं सूर्याला सोडून, शेपूट पायात घालून, मुकाट बाजूला व्हायचं. पुन्हा आपला सूर्य उगवायला आणि मावळायला मोकळा. आणखी एका अरबी कथेत तर ग्रहणकाळात काळ्या बुरख्यात वाळूत गडाबडा लोळतात म्हणे. अशाने पुण्य वाढते. शिवाय थोडी वाळू आकाशात भिरकावतात. रोज उगवल्या आणि मावळल्या बद्दल सूर्याला आणि चंद्राला ‘थ्यांक्यु’ , म्हणायची ही अनोखी पद्धत आहे. इटलीत मात्र ग्रहणकाळात खास फुलझाडं लावतात. अशा फुलांचे रंग अधिक खुलतात म्हणे!
कुठे सूर्य, कुठे चंद्र, कुठे ते त्यांचे अवकाशात चालणारे सावल्यांचे खेळ आणि कुठे माणूस! या कथा रचल्या सर्व संस्कृतींनी. प्रतिभेच्या, कल्पनांच्या उंचच ऊंच भराऱ्या या. अचंबित करणाऱ्या. पण या मागचं विज्ञान; ते तर याही पेक्षा कितीतरी सरस आहे, काव्यात्म आहे, रंजक आहे, नेमकं आहे. माणसाला या विश्वाच्या पसाऱ्यात कस्पटा एवढेही स्थान नाही हे लक्षात आणून देणारं आहे. मनुष्यमात्रांचा अहंभाव निखळून पाडणारं आहे. विश्वाच्या पसाऱ्याप्रती विस्मय वाढवणारं आहे. आधी हे ग्रहगोल अवकाशात आधाराविना तरंगत आहेत हे मान्य करायचं. शेष, कासव, अॅटलास वगैरेंना चक्क रिटायर करायचं! मग चांगला रोज डोळ्यादेखत इकडून तिकडे जाताना दिसणारा सूर्य स्थिर आहे असं समजावून घ्यायचं. मग पृथ्वीला-चंद्राला स्वतःभोवती आणि परस्परांभोवती फिरवायचं. मग त्यांची गती, मग कोन, मग  सावल्या... भन्नाटच आहे हे. पण ह्या दृष्टीत एक विशेष आहे. इथे ग्रहण पुन्हा कधी होणार हे सांगता येतं, पूर्वी कधी झालं होतं हे सांगता येतं, वेध, वेळ, खंडग्रास, खग्रास, कुठून दिसणार, कुठून नाही हे सगळं सगळं सांगता येतं. ढोल बडवायची गरज नाही. अस्वलाला नैवेद्याची गरज  नाही. सूर्याला थ्यांक्यू वगैरे भानगड नाही. ग्रहण सुटणार म्हणजे सुटणार. ढगाची सावली पडली मैदानावर तर ढग सरकला की पुन्हा सूर्यदर्शन होणारच की. त्या साठी ओलेत्यानी पूजा कशाला? इतकं साधं आहे हे. पृथ्वीची सावली चंद्रावर पडणार (चंद्रग्रहण) किंवा चंद्राची पृथ्वीवर (सूर्यग्रहण). शाळेतला मुलगाही सांगतो आता हे. वर दोन बॉल आणि टॉर्च घेऊन करूनही दाखवतो.
खूप ऊन आहे म्हणून छत्री घेऊन फिरता ना तुम्ही; किंवा  यस्टीच्या ष्टांडावर शेड खाली सरकून उभे रहाता नं तुम्ही, तेव्हा सुद्धा ग्रहणंच लागलेले असतं तुम्हाला.  त्या शेडची सावली पडतेच की अंगावर. घरात घराच्या छताची पडते, झाडाखाली झाडाची पडते. तशीच कधी कधी चंद्राची पृथ्वीवर म्हणजे पर्यायनं आपल्यावर पडते (सूर्यग्रहण). सावलीला काय घाबरायचं? जशी चंद्राची पृथ्वीवर पडते, तशी  बैलाची सावली बैलाशेजारच्या गाभण  शेळीवर पडू शकते, शेळीची कोंबडीच्या खुराड्यावर पडू शकते. शेळीला काय फाटक्या ओठाची करडं होतील म्हणून काळजी करत बसता काय तुम्ही? का कोंबडीचा ‘अंडपात’ होणार म्हणून वैतागता? प्रार्थना करता?  माणसाची सावली माणसावर पडणे हे अशुभ मानता का तुम्ही? नाही नं? मग चंद्र सूर्यांनी काय घोडं मारलंय?

आपल्याला दोन डोकी असतात. त्या जुन्या मुमताज वगैरेंच्या सिनेमात त्यांची हेअर स्टाईल कशी असते, डोक्याला डोकं चीकटवल्यासारखी, तशी. एक डोकं शाळा, कॉलेज, शिक्षण, संशोधन वगैरे साठी आणि दुसरं दैनंदिन व्यवहारांसाठी. एकाचा दुसऱ्याशी संबंध आला की आपली गोची होते, प्रचंड गोची. यातल्या एका डोक्याचा शिरच्छेद करून एकच डोकं ठेवावं लागेल. ज्ञान सूर्याला लागलेलं ग्रहण सुटावंच लागेल. ह्या ग्रहणाला दान मागायचं ते एवढंच. नाहीतर आ चंद्रसूर्य नांदो , हा खेळ बावळ्यांचा चालूच राहील, चालूच राहील.

Friday 18 September 2015

ह्यांनी सरकारचं काय घोडं मारलंय?

ह्यांनी सरकारचं काय घोडं मारलंय?
डॉ. शंतनु अभ्यंकर, मॉडर्न क्लिनिक,वाई. (जि. सातारा)
मोबाईल ९८२२० १०३४९
ग्रामीण भागात स्त्रीआरोग्य आणि प्रसूतीशास्त्र तज्ञ म्हणून काम करणारा मी एक डॉक्टर. माझी व्यथा मला मांडायची आहे. आज, ११ जुलै रोजी, जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने. आजच मांडायची आहे कारण लोकसंख्यावाढीच्या राक्षसाच्या तावडीतून भारतमातेला सोडवता सोडवता भारतमातेच्याच काही अभागी लेकरांचा सर्वांनाच पूर्ण विसर पडला आहे.
वांझोटे, निःसंतान वगैरे शेलक्या विशेषणांनी ही मंडळी ओळखली जातात. जर तुम्ही भारतमातेचे लेकरू असाल, आणि तुम्हाला लेकुरवाळे होण्यात अडचण असेल, आणि ती साध्याशा उपायांनी सुटली नाही तर तुमच्या सारखे अभागी  तुम्हीच. लोकसंख्या हा या देशाचा प्रश्न असल्यामुळे तुमच्याकडे कोणीही ढुंकूनसुद्धा बघणार नाही. तुमच्या दुखा:वर फुंकर घालायला कोणताही राष्ट्रीय कार्यक्रम नाही. तुम्हाला कोणतीही मदत मिळू शकत नाही. घरोघरी जाऊन सरकारी कर्मचारी ‘पात्र जोडप्यांच्या’ याद्या बनवतात. त्यात तुमचं नाव झळकत राहील. अगदी म्हातारे होई पर्यंत. कारण सरकारच्या मते तुम्ही कुटुंबकल्याण सेवासांठी ‘पात्र’ आहात. बस, एवढंच. वंध्यत्वाचे उपचार या सेवेत बसत नाहीत.
खरं तर पुस्तकात छापलेली कुटुंब नियोजनाची व्याख्या फार सुंदर आणि विशाल आहे. कुटुंब नियोजन म्हणजे जोडप्यांनी स्वयंस्फुर्तीने वापरलेल्या अशा पद्धती ज्याद्वारे...
1.            इच्छित संतती प्राप्त होते.
2.            हवी तेव्हाच होते.
3.            नको तेव्हा होत नाही.
4.            हवी तितकीच होते.
5.            आणि याद्वारे कौटुंबिक, सामाजिक आणि राष्ट्रीय उत्थान साधले जाते.
म्हणजे बघा, पहिलं कलमंच मुळी, इच्छित संतती  प्राप्त व्हावी असं आहे. मुलं होऊच न देणं, हे महत्वाचं, पण नंतरचं कलम आहे. पण याकडे साऱ्यांनीच आजवर सरासर दुर्लक्ष केलं आहे. मुलं होऊ न देणं हे सरकारचं आणि नागरीकांचं  प्राथमिक कर्तव्य ठरलं आणि संततीप्राप्तीचं इप्सित साध्य न होणारे मात्र उपेक्षित राहिले. आधी  ‘दोन किंवा तीन पुरेत’ अशी घोषणा झाली मग ‘हम दो हमारे दो’ झाली’. आता तर एकच मूलवाल्यांचा सत्कार आणि त्यातल्या त्यात एका  मुलीवर ऑपरेशनवाल्यांचा उससे भी ज्यादा सत्कार. आजही लोकसंख्यादिनाच्या निमित्ताने हे सगळे उपचार पार पडतीलच. ह्या सगळ्याला माझा विरोध नाही पण या सगळ्यामध्ये वंध्यत्ववाल्यांना त्यांचा न्याय्य हक्कही डावलला गेला त्याचं काय? निदान योग्य, स्वस्त, जवळ आणि आधुनिक उपचार देता येत नसतील तर भारतभूवर अधिक भार न टाकण्याचं पुण्यकर्म केल्याबद्दल सरकारने या जोडप्यांचा आजच्या लोकसंख्या दिनानिमित्त सत्कार तरी करावा!
हा प्रश्न तसा जटील आहे. सुमारे ऐंशी टक्के जोडप्यांना लग्नानंतर वर्षभरात दिवस रहातात. उरलेल्यांपैकी आणखी दहा टक्के पुढच्या वर्षात गरोदर रहातात. उरलेल्या दहा टक्क्यांना मात्र कोणते न कोणतेतरी उपचार लागतात. आणि यातल्या २ ते ३ टक्के लोकांना साधे सुधे उपचार पुरत नाहीत. पण जननक्षम वयातील दोन-तीन टक्के म्हणजे लहान आकडा नाही. त्यांना  गोळ्या-इंजक्शने, आय.यु.आय., टेस्ट ट्यूब बेबी, असे अत्यंत महागडे उपचार लागतात. या उपचारांपर्यंत पोहोचण्याआधी अनेक महागड्या तपासण्या कराव्या लागतात. अनेक कुटुंबांना मुख्य उपचार तर राहोच पण तपासण्यांचाही खर्च परवडत नाही. मग ते परवडतील ते उपचार करत रहातात. हे बरेचदा निरुपयोगी असतात. पैसा आणि वेळ जातो. उपचार चालू असल्याचं कृतक समाधान तेवढं मिळतं. अखेर योग्य उपचारांचा निर्णय होईपर्यंत कित्येकदा योग्य वय टळून गेलेलं असत. आधीच बेभरवशाच्या महागडया पद्धतींचा भरवसा आणखी उतरतो.
निव्वळ पैसे नाहीत, कोणतीही सरकारी सुविधा नाही म्हणून अशा जोडप्यांना खासगी दवाखान्यात जाण्याशिवाय पर्याय रहात नाही. इथेही वंचना संपत नाही. टेस्ट टयूब बेबी (किंवा तत्सम महागडया) उपचाराच्या यशाचे आकडे फुगवून सांगितले जातात. यश म्हणजे पदरात मुल पडणे. याची शक्यता उत्तमात उत्तम उपचारांनी देखील पंचवीसेक टक्के. सांगताना चाळीस टक्के, पन्नास टक्के वगैरे आकडे सुनावले जातात. हे आकडे निव्वळ रक्तात/लघवीत ‘दिवस आहेत’ असा रिपोर्ट येण्याचे आहेत. हे यश नव्हे. ही तर पहिली पायरी फक्त. माणसं आपलं आहे नाही ते किडूकमिडूक विकून हा जुगार खेळतात. करणार काय? मातृत्वाला, पितृत्वाला, बहुप्रसवेला देवत्व देणाऱ्या समाजात रहातो आपण. बोलणाऱ्यांची तोंड कशी धरणार? बघणाऱ्यांच्या नजरा कशा रोखणार? टेस्ट ट्यूब बेबी असंच नाही पण एकुणात उपचारासाठी कधी शेती गहाण, बरेचदा दागिने गहाण, कधी माहेरकडून मदत! ह्याला मदत म्हणावं का खंडणी?
ज्यांच्या कडे विकायला किडूकमिडूकही नाही तेही कृतक उपचार चालू ठेवतात. होलिस्टिक उपचार काय, संयुक्त उपचार काय, वाजीकरण काय, ‘अक्सीर इलाज’ काय, पूर्वायुष्यातल्या चुकांसाठी कुठल्याश्या लॉजच्या खोलीत मिलीये काय, देणार काय तर ‘शर्तीली दवा’ म्हणे...शब्द बापुडे केवळ वारा. सगळ्यांच्याच पान पान जाहिराती, टी.व्ही.च्या पडद्याखाली पळती अक्षरे... आणि हे सगळं वैद्यक नीती विरुद्ध आहे म्हणे. पण चालूच आहे. काही अशास्त्रीय उपचार काही अर्धशास्त्रीय तर काही छद्म्मशास्त्रीय. गरीब बिचारे पेशंट पळताहेत पळताहेत.
हे सगळं बघून काळीज तीळतीळ तुटतं. मी नवीन दवाखाना टाकला आणि वर्षनुवर्ष उपचार घेऊन थकलेल्यांची रीघच लागली. सुरवातीला माझ्या या विलक्षण लोकप्रियतेचं अप्रूप आणि कौतुक वाटल माझं मला. पण लवकरच उमगलं; एक नवा डॉक्टर म्हणजे या लोकांच्या लेखी पुन्हा एक नवी आशा. एक नवी उमेद. परवडतील ते उपचार करून झालेली आणि जे आवश्यक आहेत ते उपचार न परवडणारी ही गिऱ्हाईकं माझ्याही हतबलतेची प्रचीती येताच लवकरच आटली.
कुटुंबकल्याण कार्यक्रमाची आणखी एक खासियत म्हणजे ‘काफेटेरिया अॅप्रोच’.  म्हणजेच साधनांची, पर्यायांची विपुलता. गर्भनिरोधकांमध्ये मध्ये पर्यायांची विपुलता देतानाच मुलं न होणाऱ्यांसाठी पर्याय द्यायला आपण विसरूनच गेलोय. अनेकदा अखेरचा आणि नाईलाजानं म्हणून स्वीकारला जात असला तरीही मूल दत्तक घेणं हा एक सुंदर पर्याय आहे. इतर उपचार करून करून भागलेले अनेक आहेत पण हा पर्याय स्वीकारून पस्तावलेले विरळा. पण हा निर्णय निव्वळ त्या जोडप्यांनी घ्यायचा नाहीये. यात कुटुंबाचा सहभाग हवा. दत्तक मुलाशी नुसते आई-बाबा , आईबाबांसारखे वागून चालत नाही; तर आजी-आजोबांनी, काका-काकुनी, मामा-मामीनी...त्यांच्या त्यांच्या भूमिका वठवायच्या आहेत. तरच एक सुजाण नागरिक घडवला जाईल. एक सुखी कुटुंब तयार होईल, निपजेल म्हणू या आपण. पण आपल्या कुटुंब कल्याण कार्यक्रमाला ह्या गोष्टीचा पत्ताच नाही. किंवा हा त्यांचा प्राधान्यक्रम नाही. वंध्यत्वासाठी ‘मूल दत्तक घेणे’ हा उपचार स्वीकारायला समाजमन घडवायला हवं. ही जबाबदारी ह्या कार्यक्रमाची नाही का? निव्वळ गर्भनिरोधकांबाबत चार पाट्या लावल्या की झालं? लोकशिक्षण ही जबाबदारी एकटया दुकटया अनाथाश्रमाची नाही. ती अंतिमतः सरकारचीच जबाबदारी आहे.
निरोध, गर्भनिरोधक गोळ्या, कॉपर टी हे सगळं घरपोच मिळू शकतं. नसबंदीसाठी/ प्रसूतीसाठी सरकारी  गाडी दारात येते. हे चांगलंच आहे. पण बिचाऱ्या मुलं न होणाऱ्या जोडप्यांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार सुद्धा होत नाहीत. ग्रामीण रुग्णालयातही नाही. कुटीर रुग्णालयात झाले तर झाले, नाही तर या लोकांनी थेट सिव्हील गाठायचं म्हणे. कसं शक्य आहे हे? या उपचारांसाठीची औषध, इंजेक्शने ‘आवश्यक औषधांच्या यादीत’ नाहीतच. साधी धातूची (वीर्य) तपासणीसुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्रात करून मिळत नाही.
भाषा ही अधिकाधिक भेदभावरहित करण्याचा सततचा प्रयत्न असतो आपला. Disabled साठी Differently abled, आंधळ्यासाठी Visually challanged असे शब्द वापरतो आपण. तसंच ही माणसं Fertility challanged (जननोत्सुक? जनन आव्हान त्रस्त?) समजली पाहिजेत. वांझोटे, निःसंतान वगैरे नकारात्मक शब्दसुद्धा बाद केले पाहिजेत.
जनन आव्हान त्रस्तता हा निव्वळ वैयक्तिक प्रश्न नाही. ‘Personal is political’ ही स्त्रीमुक्ती चळवळीतली घोषणा इथे चपखल बसते. वंध्यत्व हे दशांगुळे पसरलेलं आहे. त्याचे परिणामही तसेच. सहजी दिसत नाहीत ते. ह्याचा जीवनमानावर परिणाम होतो, रहाणीमानावर होतो. पदोपदी भेदभाव होतो. आयुष्यभर कुढणे नशिबी येतं. मरणातही लेकुरवाळीला वेगळा सन्मान असतो. पुरुषांनाही बरंच काही भोगावं लागतं. मुळात समाजमनात पितृत्वातंच पौरुषत्व सामावलं गेलं असल्यामुळे अशा पुरुषांना सुद्धा ‘नको रे बाबा हा मेला पुरुषाचा जन्म’ असं होऊन जातं. अनेक भंगलेल्या कुटुंबांमागे, कौटुंबिक हिंसाचाराच्या केसेस मधे, अगदी खून, जळीत प्रकरणामध्येही वंध्यत्व हा भाग असतो. ह्या प्रश्नाचं नातं वेश्यागमन, एच.आय.व्ही. एड्स अशा अनेक सामाजिक प्रश्नांशी जडलेलं आहे.
कुटुंब कल्याण कार्यक्रम म्हणजे नसबंदी, तीही स्त्रियांची, असा समज आता दुरुस्त करायला हवा. गेल्या साठ वर्षात कितीतरी बदल झाले. जननदर घसरला. लोकसंख्या स्थिर होऊ पहाते आहे. नागरीकरण, शिक्षण आणि इतर रेट्यामुळे कुटुंब मर्यादित राखणं ही सरकारची घोषणा आता लोकांची मागणी/गरज बनली. आता तरी आपल्या कुटुंबकल्याण कार्यक्रमानं जननाव्हानत्रस्तता (वंध्यत्व) उपचार आपली जबाबदारी मानली पाहिजे. सरकारला कागदोपत्री हे मान्य आहे की जननोत्सुकता (वंध्यत्व) सेवा उपलब्ध नसणं हे साफ चुकीचं आहे. भारताने स्वीकारलेल्या सहस्रक विकास उद्दिष्टांमध्ये (millennium development goals) याचा समावेश आहे.
जननोत्सुकतेचे प्राथमिक उपचार तुलनेने खूप स्वस्त असतात. हे सरकारने नाही उपलब्ध केले तरी विशेष बिघडत नाही.  पण ज्यांना टेस्ट ट्यूब बेबी सारखे महागडे उपचार लागतात ते तरी सरकारने मोफत अथवा किमान दरात उपलब्ध करायला हवेत. प्रत्येक जिल्हा रुग्णालयात जननोत्सुक्ता चिकित्सा केंद्र हवं. स्त्री-आरोग्यतज्ञ हवेत. श्री-आरोग्यरोग तज्ञही हवेत. तंत्रज्ञ हवेत. सोनोग्राफी हवी. लॅप्रोस्कोपी हवी. होर्मोन तपासणी हवी. टेस्ट ट्यूब बेबी सेंटर हवं. दत्तक मार्गदर्शनाचीही सोय हवी. हे उभं करायला सरकारकडे पैसा नसणारच. मग निदान खासगी क्षेत्राशी सहकार करून तरी ही सेवा सर्वदूर पोहोचायला हवी.
समाजातल्या एका फार मोठया वंचित घटकाचे आरोग्य आणि सौख्य याच्याशी निगडीत आहे.

अशाच लेख, कथा,व्यक्तीचित्रे वगैरेसाठी माझा ब्लॉग वाचा:
 shantanuabhyankar@blogspot.in

डॉ. शंतनु अभ्यंकर, मॉडर्न क्लिनिक,वाई. (जि. सातारा)
मोबाईल ९८२२० १०३४९     

Saturday 12 September 2015

स्केप्टीक डॉट कॉम

सातारा आकाशवाणीवरून प्रसारीत भाषणाचा तर्जुमा.


स्केप्टीक डॉट कॉम http://www.skeptic.com
डॉ.शंतनूअभ्यंकर


अज्ञाताचं,अद्भूताचं आणि भूताचं कुतूहल सगळ्यांनाच असतं. काटेकोरपणे अज्ञाताच्या शोधाला लागणाऱ्या, आणि अर्थात प्रसंगी आपली हार मान्य करण्याचं धैर्य असणारया  मंडळींना शास्त्रज्ञ म्हणतात. सर्व प्रश्नांची अंतिम उत्तरं आमच्याकडेच आहेत असा दावा करणारयांना भोंदू म्हणतात. आधुनिक युगात भोंदू मंडळी विज्ञानाची भाषा बोलतात!! पण विनम्र विज्ञानाची, वैज्ञानिकांची आणि वैज्ञानिक विचारसरणीची आरती गाणारी आणि भोंदू, फसव्या, खोट्या अशा छद्म्मविज्ञानाचा पर्दाफाश करणारी, भन्नाट वेबसाईट म्हणजे http://www.skeptic.com
अफलातून वल्गनांना लगाम, क्रांतिकारी कल्पनांना आणि विज्ञानाला सलाम अशी मूळ भूमिकाच आहे इथली. मुळात skeptic या शब्दाचा अर्थच मुळी शंकेखोर असा आहे. प्रश्न उप[स्थित करणं, शंका घेण, सर्वमान्य तत्वांची फेरमांडणी करून नवीन  काही गवसतंय का ते पहाणं, हा मुळी विज्ञानाचा पाया आहे. त्यामुळे skeptic हे नाव समर्पकच म्हटलं पाहिजे.
या साईटवरून आपल्याला ई-स्केप्टीक या नियतकालिकाचं सभासदत्व घेता येतं. सिडी मासिकं, पुस्तकं वगैरे खरेदी करता येतात. स्केप्टीकतर्फे होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहितीही मिळते. काही गाजलेल्या व्याख्यानांच्या/कार्यक्रमांच्या ध्वनीचित्रफीती ऑनलाईन ऐकायचीही सोय आहे. आपली मतेही अर्थातच आपण साईटकर्त्यांना कळवू शकतो.
मायकल शरमर हे उत्क्रांतीशास्त्राचे जगप्रसिध्द अभ्यासक, प्रचारक, प्रसारक, लेखक, व्याख्याते हेच साईटकर्ते आहेत. उत्क्रांतीशास्त्रासाठी प्रचारक आणि प्रसारक असावे लागतात हे वाचून तुम्हाला जरा आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. या साईटवरची बरीचशी पानं उत्क्रांतिवादाचं समर्थन करण्यात आणि मुख्यत्वे विरुद्ध मताचं खंडन करण्यात खर्ची पडली आहेत. युरोप अमेरिकेमध्ये उत्क्रांतीवादाला कडवा विरोध करणारे आणि बायबलमधील विश्वनिर्मिती हेच अंतिम सत्य मानणारे अनेक धर्मांध लोक आहेत. तिथल्या राजकारणात, समाजकारणात याचं मोठं प्रस्थ आहे आणि आपल्या दाव्याच्या पुष्टर्थ्य ही मंडळी वेळोवेळी (त्यांच्यामते शास्त्रीय असे) पुरावे सादर करत असतात. या अशा तथाकथित शास्त्रीय पुराव्यातील पोकळपणा दाखवणारे अनेक लेख या संकेतस्थळावर वाचता येतात. अमेरिकेत शाळांमध्ये उत्क्रांतिवाद शिकवावा की नाही असा एक वाद तिथे कायम खदखदत असतो. एकदा शाळांमध्ये हे असलं पाखंडी उत्क्रांतीशास्त्रं शिकवलं जाऊ नये असा फतवा तिथल्या शाळा बोर्डाने काढला. झालं, एकच खळबळ माजली. शास्त्रज्ञ मंडळी आणि चर्चची शास्त्री मंडळी यांची चांगलीच जुंपली. शेवटी प्रकरण कोर्टात गेलं. प्रसारमाध्यमांना चांगलंच खाद्य मिळालं. संपूर्ण जीवसृष्टी ही प्राथमिक अवस्थेतल्या सजीवांपासून सावकाश पणे उत्क्रांत  होत आली आहे. या उत्क्रांतीसाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. आजची सजीवांची विविधता हा उत्क्रांतीचाच एक भाग आहे आणि माणूस हा देखील एक प्राणीच असून या उत्क्रांतीचंच फलित आहे असा उत्क्रांतीवाद्यांचा दावा. तर अगदी प्रथमावस्थेतील प्राण्यात देखील अत्यंत गुंतागुंतीची जैवरासायनिक रचना असते. केवळ चार रसायनं अपघतानं एकत्र आली म्हणून ते रेणू जीव धरू शकत नाहीत. तेव्हा सजीवांची उपज ही कोण्या बुद्धिवान निर्मिकानं केलेली करामत आहे असं विरोधी पक्षाचं म्हणणं. ही मंडळी यासाठी मोठा मासलेवाईक दाखला देतात. समजा एखाद्या जंबोजेटचे सारे भाग सुटे करून एखाद्या आवारात ठेवले आणि चक्रीवादळासरशी ते एकत्र येऊन जम्बोजेट बनलं असं कुणी सांगितलं तर ते विश्वसनीय वाटेल का? जम्बोजेट सारखी गुंतागुंतीची रचना केवळ वाऱ्यानं घडू शकेल का? निर्मितीवाद्यांचं म्हणणं असं, की वादळानं जम्बोजेट बनणं जसं असंभवनीय आहे, तद्वतच उत्क्रांतीनं सजीवांची निर्मितीही असंभवनीय आहे.

मात्र उत्क्रांतीवाद्यांच्या मते हा सारा त्यांच्या म्हणण्याचा शुद्ध विपर्यास आहे. आलं वारं आणि झालं जम्बोजेट तयार, असा मुळी युक्तीवादच नाहीये. पृथ्वीचं काही कोटी वर्षं असलेलं वय, त्या काळातले भूकवचातले आणि वातावरणातले बदल, प्रयोगशाळेत निर्माण करता आलेली अमिनोआम्ल, ठिकठिकाणी सापडलेले जीवाश्म आणि अव्याहतपणे तयार होणाऱ्या आणि बदलाशी जुळवून न घेता आल्यामुळे नष्ट होणाऱ्या प्रजाती हा सारा उत्क्रांतीच्या बाजुनेचा सज्जड पुरावा आहे. बरीच भवतीनभवती झाल्यावर कोर्टाने अखेर उत्क्रांतीवाद्यांच्या बाजूने निकाल दिला. या साऱ्या प्रकरणाची सविस्तर चर्चा या साईटवर आहे. मोठी रंजक आहे ही चर्चा. धर्मवाद्यांनी केलेली अचाट आणि अफाट विधानं वाचून खूप बरं वाटतं. बरं अशासाठी की झापडबंद विचार करण्याचा मक्ता काही निव्वळ भारतीयांकडे नाही, त्यात थोडे अमेरिकनही आहेत, ही ती सुखद जाणीव.

Monday 7 September 2015

मराठी वर्ल्ड डॉट कॉम

आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारीत झालेल्या भाषणाचा तर्जुमा
डॉ.शंतनू अभ्यंकर
वाई
मो.क्र. ९८२२० १०३४९

मराठी वर्ल्ड डॉट कॉम
http://www.marathiworld.com
रात्री, नाही, बहुधा अपरात्री, मी दवाखान्यातून काहीतरी इमज॑न्सी आटोपून घरी परतलेला असतो. रात्र किर्र पडलेली असते. झोपेचा बट्याबोळ झालेलाअसतो; मग मूल मांडीवर घ्यावं तसा लॅपटॉप मी अलगद मांडीवर घेतो. एका बटणाचा तेवढा आवाज होतो आणि संगणकाचा पडदा लखकन् उजळतो. बोटाच्या हलक्याश्या हालचालीसरशी संगणकाचा बाण पडद्यावरच्या योग्य त्या आयकॉनचा वेध घेतो आणि परवलीचा ‘तीळा दार उघड’ झाल्यावर दोन संगणकांची जोडी पडद्याच्या उजव्या तळाशी लुकलुकू लागते. पडद्यावर निरनिराळ्या संकेतस्थळांची पाने उघडत मिटत जातात आणि अलिबाबाची गुहाच आपल्यापुढे उघडली जाते. काय नाही या गुहेमध्ये?
मानवी आहार, विहार, आचार, विचार, संस्कृती, पोशाख यातला प्रत्येक बारकावा आहे. कला विज्ञानाचे गहिरे रंग आहेत, आणि तत्वज्ञानातील वितंडवाद आहेत. निरनिराळे कोश आहेत, देशी आणी परदेशी गंड आणि अहंगंड आहेत, खाजगी आणि सार्वजनिक रोष आहेत.
या संगणकीय मुशाफिरीत अचानक गवसलेलं एक संकेतस्थळ म्हणजे मराठी वर्ल्ड डॉट कॉम.
मराठीपणा जगवण्यासाठी आणि जागवण्यासाठी असलेली ही वेबसाईट मराठी संस्कृतीबद्दल इथ्यंभूत माहिती देते. महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीबद्दल एक दालन आहे इथे. पारंपारिक मराठी जेवणावळीचा थाट कसा असतो याचं वर्णन आहे. शिवाय पान कसं वाढायचं, म्हणजे माणसं पानावर म्हणजे खरोखरच केळीच्या पानावर जेवत, त्या वेळची पान वाढण्याची पद्धत चित्रमय रुपात दाखवली आहे. काटा-चमचा डिशमध्ये कसा ठेवला की जेवण संपलं हे ओळखावं याच्याबद्दल दक्ष असणाऱ्या पिढीला, मीठ, लिंबू, चटणी, पुरण वगैरेचीही पानात ठरलेली जागा असते हे पाहून आश्चर्य वाटेल.
नऊवारी साडी आणि पैठणीची माहितीही आहे इथे. पण ‘ई’ खरेदीची मात्र सोय नाही. ‘ती’ खरेदी ‘ही’ला बरोबर घेऊनच करावी लागणार. नऊवारी नेसायची कशी याच वर्णन मात्र अत्यंत विनोदी आहे. या कृतीबरहुकुम अंगाभोवती कापड गुंडाळलं जाईल पण त्याला नेसणं म्हणणं अवघड आहे. नऊवारी नेसण्याची पद्धत कमीकमी होत असली तरी ती दिसते मात्र देखणी. ‘घोळ निऱ्याचा पदी अडखळे, चालणेही भरभर जरा; दिसे ही साताऱ्याची तऱ्हा’, असं माडगूळकरांनी म्हणूनच ठेवलं आहे. प्रख्यात चित्रकर्ता राजा रविवर्मा यांनी देवदेवतांच्या चित्रांसाठी अनेकविध प्रांतातील पेहरावांचा अभ्यास केला. लक्ष्मी, सरस्वती वगैरे देवतांसाठी शेवटी शालीन, सुसंस्कृत, लयदार आणि घरंदाज लुक देण्याऱ्या, मराठी पद्धतीने नेसलेल्या, लुगडयाचीच त्यांनी निवड केली. राजा रविवर्म्याच्या बहुतेक नायिका या दाक्षिणात्य चेहऱ्याच्या आणि मराठी पेहरावाच्या आहेत ते यामुळेच.

रांगोळी हा देखील असाच एक देखणा प्रकार. यालाही किती आयाम आहेत पहा. रांगोळी हे निव्वळ सजवणं नाही, त्यात पाहुण्यांचं स्वागत आहे, दृष्य तसंच अदृष्य पाहुण्याचं सुद्धा. म्हणजे लक्ष्मी वगैरे देवतांचं. त्याला धर्मिक अंग आहे, अध्यात्मिक अंग आहे. निसर्गचक्र आणि रांगोळीचंही अतूट नातं आहे. रांगोळ्यांचे अनेक प्रकार या संकेतस्थळी आहेत. चैत्रामध्ये रेखाटायचं चैत्रांगण आहे. त्यातल्या प्रत्येक घटकाची, म्हणजे शंख, चक्र, गदा, पद्म्म, तुळशीवृंदावन वगैरेची माहिती आहे. संस्कारभारतीने लोकप्रिय केलेल्या आणि रांगोळीचा गालीचा/पायघडया म्हणून गाजलेल्या रेखाटन पद्धतीचीही माहिती आहे. मराठी गाण्यांचं स्वतंत्र पान आहे. यात ‘ए’ पासून ‘झेड’ पर्यंत, म्हणजे ‘अ’ पासून ‘ज्ञ’ पर्यंत नाही तर खरोखर ‘ए’ पासून ‘झेड’ पर्यंत अक्षरांवर क्लिक करून गाणी बघता येतात. कवी, संगीतकार, गायक आणि गाण्याचे संपूर्ण शब्द आपल्याला इथे सापडतात. बरेचदा आपल्याला गाण्याचं धृवपद आठवत असतं पण संपूर्ण गाणं जाणून घ्यायला आपण उत्सुक असतो. ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, एवढं आपल्याला आठवत असतं, पण ‘चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती, हिरवे हिरवे प्राण तशी ही  रुजून आली पाती, फुले लाजरी बघून कुणाचे हळवे ओंठ स्मरावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’; हे आपल्याला आठवत नसतं. त्यामुळे ‘त्या तरूतळी विसरले गीत’ अशी आपली अवस्था झाली तरी त्या तरूतळी वायफाय असेल तर ह्या संकेतस्थळी गवसले गीत अशी अवस्था होईल यात शंकाच नाही.

डॉ.शंतनू अभ्यंकर
वाई
मो.क्र. ९८२२० १०३४९

Wednesday 2 September 2015

पाळी मिळी गुपचिळी

पाळी मिळी गुपचिळी
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई. जि. सातारा. पिन ४१२ ८०३ मो.क्र.९८२२०१०३४९

नेहमीच्या शिरस्त्या प्रमाणे पेशंटची रांग ओसरल्यावर सिस्टरांनी एकामागून एक एम.आर. (औषध कंपनीचे प्रतिनिधी) आत सोडायला सुरवात केली. दुपार टळायला आली होती आणि जांभया दाबत, मोबाईलवर, फेसबुकवर, अपडेट्स टाकत आणि त्याचवेळी नेटवर कोणतातरी संदर्भ शोधत मी त्यांचे बोलणे या कानानी ऐकत होतो आणि त्या कानानी सोडून देत होतो. फार गांभीर्याने ऐकावं असं त्या पोपटपंचीत नसतंच काही. पण इतक्यात एका वाक्याने माझे लक्ष वेधले गेले. तो म्हणाला, “आता सणाचे दिवस जवळ आले डॉक्टर, आता खूप बायका पाळी पुढे जाण्यासाठी गोळ्या घ्यायला येतील. तेव्हा लक्षात असू दया आमच्याच कंपनीच्या गोळ्या दया. प्लीज सर!! सणासुदीच्या दिवसांमुळे कंपनीने टार्गेट वाढवून दिले आहे; आणि तुम्ही मनावर घेतल्या शिवाय ते मला गाठता येणार नाही.” एवढं बोलून गोळ्यांचं एक नमुना पाकीट माझ्या टेबलावर ठेवत तो निघाला सुद्धा. माझा अहं कुरवाळून आपला काम सफाईदारपणे करून तो निघून गेला. मी मात्र अचंबित झालो.
एका लहानश्या गावातल्या एका लहानश्या डॉक्टरपर्यंत आवर्जून आर्जवं करणे कंपनीला सहजपणे परवडत होतं, म्हणजे हे पाळी पुढे ढकलण्याचे मार्केट किती प्रचंड लाभदायी आहे बघा! औषध कंपन्या आपला माल खपवण्यासाठी कोणत्याही थराला जातात हे माहीत होतं, पण त्या हे ही टोक गाठतील असं माझ्या ध्यानीमनीही आलं नव्हतं. पाळी या प्रकाराबद्दल भारतीय समाजमनाची नस बरोब्बर हेरून योग्य वेळी त्यांनी आपला माल पुढे केला होता. मला कौतुकच वाटलं त्या कंपनीचं.
खरं तर ही मागणी नेहेमिचीच, पूजा, सत्यनारायण, तीर्थयात्रा, उत्सव, सण वगैरे निमित्ताने केली जाणारी. क्वचित प्रवास, परीक्षा वगैरे कारणेही असतात, पण ती अपवादानेच. किती साधी सोपी रुटीन गोष्ट होती ही. बायकांनी यायचं, पाळी पुढे जायच्या गोळ्या मागायच्या आणि चार जुजबी प्रश्न विचारून आम्ही त्या द्यायच्या. माझी चिठ्ठीही नेहेमीचीच. मुकाटपणे दिली जाणारी. पण मनातल्या मनात मी वैतागतो, चरफडतो. म्हणतो, ‘काय मूर्ख बायका आहेत या! शुद्धाशुद्धतेच्या कुठल्या मध्ययुगीन कल्पना उराशी बाळगून आहेत.’
वेळ असला की माझ्यातला कर्ता सुधारक बोलता होतो. एरवी मागताक्षणी चिठ्ठी लिहून देणारा मी, समोरच्या स्त्रीला प्रश्न विचारतो, ‘काय शिक्षण झाले आहे तुमचे?’
‘क्ष’
क्ष ची  किंमत अशिक्षित पासून डॉक्टरेट पर्यंत काहीही असू शकते.
‘आलीच जर पाळी,  तर तुम्ही समारंभात सहभागी होऊ नये हे तुम्हाला पटतंय का?’
‘...आता घरचंच कार्य म्हटल्यावर...’,‘...आमच्या घरी नाही चालत...’,‘...आमचं काही नाही पण सासुबाईंचं फार असते...’, ‘आमच्या घरी सगळंच पाळलं जाते...’; असं काहीतरी उत्तर येते. क्ष ची किंमत काहीही असो.
‘नाही, मला हे पटत नाही, हे मला मनाविरुद्ध करावे लागतंय!’, असं उत्तर वीस वर्षात एकदाही ऐकलं नाही.
पाळी आलेल्या स्त्रीला अस्वच्छ अपवित्र समजणे याची पाळेमुळे पार खोलवर रुजलेली आहेत. स्त्रियांच्या बाबतीत घडणाऱ्या, निसर्गनेमाने घडणाऱ्या, एका अत्यंत शारीर कार्याला धर्मिक, वैयक्तिक, कौटुंबिक आणि आर्थिक धुमारे फुटले आहेत. कुठून येतात या कल्पना? अगदी लहानपणापासून मनात कोरल्या जातात त्या. आई, मोठ्या बहिणी, शेजारी पाजारी सगळीकडे असतात त्या. आपण फक्त मनानं स्पंज सारख्या त्या टिपून घ्यायच्या.
शाळेत कधी कधी जायचा प्रसंग येतो. मुला-मुलींसमोर ‘वयात येताना’ या विषयावर बोलायला. सगळ्या मुली पाळीला सर्रास ‘प्रॉब्लेम’ असा शब्द वापरतात. प्रॉब्लेम आला/ गेला/ येणार वगैरे. मी गमतीने म्हणतो, ‘अहो पाळी ठरल्यावेळी न येणं, हा खरा प्रॉब्लेम! पाळी येणं हा प्रॉब्लेम कसा?’ मुलींना मी सांगतो, प्रॉब्लेम शब्द वापरू नका. पाळी आली असं म्हणा. मराठीत बोलणे फारच गावठी वाटत असेल तर एम.सी. म्हणा, मेंन्सेस म्हणा; आणखी इंग्रजी फाडायचं असेल तर चम म्हणा; पण प्रॉब्लेम म्हणू नका. प्रॉब्लेम म्हटल्यावर एका अत्यावश्यक नैसर्गिक शरीरक्रीयेविषयी मनात नकारात्मक भावना नाही का निर्माण होतं? पण हा प्रश्न गैरलागूच म्हणायचा. प्रॉब्लेममुळे नकारात्मक भावना नसून; मुळातल्या नकारात्मक भावनेपोटी हा शब्द वापरला जातो. काहीही असो पण हा शब्द वापरू नये असं मला वाटतं. यामुळे मुळातली नकारात्मकता आणखी गडद होते. त्यावर लोकमान्यतेच्या पसंतीची मोहोर उमटते.
      ह्या मुळातल्या गैरसमजाचे पडसाद इतरही सर्वमान्य शब्दांमध्ये दिसतात. काही कारणाने पाळीचा त्रास झाला तर पिशवी धुतात/साफ करतात. याचा वैद्यकीय अर्थ पिशवीच्या आतलं अस्तर खरवडून काढून टाकतात. हेतू हा की रक्तस्त्राव थांबावा, तपासणीसाठी अस्तराचा तुकडा मिळावा आणि नव्याने तयार होणारे अस्तर एकसाथ, एकसमान तयार व्हावे. पण हे सारे व्यक्त करणारा शब्दच नाहीये. क्युरेटींग हा इंग्रजी शब्द रूढ आहे पण त्यामागचा हा भाव कुणालाच कळत नाही. सर्रास पिशवी धुणे /साफ करणे वगैरे चालू असतं.
एकदा पाळी हा प्रॉब्लेम ठरला की पुढे सगळे ओघानेच येतं. पाळी म्हणजे शरीरात महीनाभर साठलेली घाण बाहेर टाकण्याची एक क्रिया, हे ही मग पटकन पटते. समाजानी पाळी आणि अपावित्र्याचा संबंध जोडला आहे, यात काही आश्चर्य नाही. मलमूत्राच्या वाटेशेजारीच पाळीची वाट आहे. मलमूत्रविसर्जन ही तर निश्चितच उत्सर्जक क्रिया आहे. चक्क शरीरातील घाण वेळोवेळी बाहेर टाकणारी क्रिया. अज्ञानापोटी समाजाने पाळीलाही तेच लेबल लावलं. खरंतर शरीरातील पेशी सातत्याने मरत असतात आणि नव्याने तयार होत असतात. आपली त्वचा झडते, पुन्हा येते, केस झडतात पुन्हा येतात, लाल पेशींचे आयुष्य १२० दिवसांचे असतं; तसंच काहीसं हे आहे. गर्भपिशवीचे अस्तर ठराविक काळ गर्भधारणेला आधार ठरू शकते. मग ते निरुपयोगी ठरतं. बाहेर टाकलं जातं, पाळी येते. पुन्हा नव्यानं अस्तर तयार होतं. (मासिक चक्रं). मुद्दा एव्हढाच की मासिक पाळी ही उत्सर्जक क्रिया नाही. पण कित्येक स्त्रियांना आणि पुरुषांना असं वाटतं की महिनाभराची सगळी घाण गर्भपिशवीत साठते आणि ती महिनाअखेरीस बाहेर टाकली जाते.
अशा बायकांसाठी वेगळी झोपडी, वेगळी जागा, वेगळं अन्न चार दिवस बाहेर बसणं, पूजाअर्चा, देवळात जाणं बंद, पाचव्या दिवशी  अंघोळ करणं, पाळीच्या वेळी धार्मिक कार्यात सहभागी न होणं या सगळ्या रूढी आणि परंपरा याचाच परीपाक आहेत. जात कोणतीही असो, धर्म कोणताही असो याबाबतीत सर्व धर्म भलतेच समान आहेत.  
पाळीच्या या चार दिवस विश्रांतीचं समर्थन करणारीही जनता आहे. ‘तेवढंच त्या बाईला जरा सूख, जराशी विश्रांती...’ वगैरे. म्हणजे एरवी श्वास घ्यायलाही फुरसत नाही एवढा कामाचा रामरगाडा! अपावित्र्यातून निपजलेली ही विश्रांती; आदरभावातून, ऋणभावनेने मिळालेली नाही ही. घराला विटाळ होऊ नये म्हणून ही बाकी घरानी केलेली तडजोड आहे. त्या बाईप्रती आदर, तिच्या कामाप्रती कृतज्ञता, तिच्या घरातील सहभागाचा सन्मान कुठे आहे इथे? नकोच असली विश्रांती. हे बक्षीस नाही, बक्षिसी आहे ही! उपकार केल्यासारखी दिलेली ही बक्षिसी बाईनी नाकारायला हवी.
का होतं, कसं होत वगैरे काहीही जीवशास्त्र माहीत नसताना पाळी हा प्रकार भलताच गोंधळात टाकणारा होता, आदिमानवाला आणि त्याच्या टोळीतल्या स्त्रियांना. महिन्याच्या महिन्याला रक्तस्त्राव होतो, चांद्रमासाप्रमाणेच की हे, निश्चितच दैवी अतिमानवी योजना ही. जखम-बिखम काही नाही, वयात आल्यावर स्त्राव होतो, म्हातारपणी थांबतो, गरोदरपणी थांबतो...! किती प्रश्न, किती गूढ, किती कोडी. पण म्हणून आजही आपण आदिमानवाचीच री ओढायची म्हणजे जरा जास्तच होतंय!
पाळी येण्यामागचं विज्ञान समजलं, पाळीवर परिणाम करणाऱ्या गोळ्याही निघाल्या. पण आपण याचा उपयोग सजगपणे करणार नाही. आपण या गोळ्या आपल्या शरीराबद्दलच्या, पाळीच्या अपावित्र्याच्या पारंपारिक कल्पना दृढ करण्यासाठी वापरणार! वा रे आपली प्रगती! वा रे आपली वैज्ञानिक दृष्टी!
पण समाजानं जरी अपावित्र्य चिकटंवलं असलं तरी ते तसंच चालू ठेवलं पाहिजे असं थोडंच आहे? निसर्गधर्मानुसार आलेली पाळी चालत नाही आणि औषध घेऊन पुढे गेलेली चालते, हे ठरवलं कोणी? ही बंधनं विचारपूर्वक नाकारायला नकोत? ‘देहीचा विटाळ देहीच जन्मला; सोवळा तो झाला कवण धर्म? विटाळा वाचून उत्पतीचे स्थान, कोण देह निर्माण, नाही जगी’ असं संत सोयराबाईनी विचारलं आहे.

      हे असलं काही बोललं की प्रतिपक्षाची दोन उत्तरं असतात. एक, पुरुषप्रधानतेमुळे बायकांचे मेंदू पुरुषांच्याच ताब्यात असतात; आणि दुसरं समजा घेतल्या गोळ्या आणि ढकलली पाळी पुढे तर बिघडलं कुठं?
पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं की ही समाजरचना अमान्य करण्याचे पहिलं पाऊल म्हणून या गोष्टीकडे बघा. गोष्ट साधीशीच आहे. ठामपणे सांगीतल तर पटणारी आहे. स्वतःला पटली असेल तर ठामपणे सांगता येतेच पण मुळात स्वतःचीच भूमिका गुळमुळीत असेल तर प्रश्नच मिटला.
‘घेतल्या गोळ्या तर बिघडतं काय?’ या प्रश्नाचं उत्तर असं की, म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो! आई करते म्हणून थोरली  करते आणि ताई करते म्हणून धाकटी! डोकं चालवायचंच नाही असं नकळत आणि आपोआप होत जातं
हे सारं कुठेतरी थांबायला हवं. स्वताःच्या आणि परस्परांच्या शरीराकडे निरामय दृष्टीने स्त्री-पुरुषांना पहाता यायला हवं. कुणीतरी कुठूनतरी सुरुवात करायला हवी.
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.
जि. सातारा.
पिन ४१२ ८०३
मो.क्र.९८२२०१०३४९

               



Tuesday 1 September 2015

करायला गेलो एक

करायला गेलो एक.
डॉ. शंतनू अभ्यंकर
मोबाईल ९८२२० १०३४९


लिंगगुणोत्तर ढळढळीतपणे ढळत असताना सरकारने निव्वळ बघ्याची भूमिका घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने कानपिचक्या दिल्या आणि कायद्याच्या अंमलाला गती आली. पण आता प्रशासनाला आणि स्त्रीवाद्यांना कायद्याचा अंमल चढला असं म्हणायची पाळी आली. या कायद्याच्या अतिरेकी आणि चुकीच्या अंमलबजावणीमुळे स्त्रियांना मूलतः असलेल्या गर्भपाताच्या हक्कावरच गदा येते आहे. स्त्रियांविषयक अनेक अभ्यासातून हे आता दिसून आलं आहे.
उठसूट प्रत्येक गर्भपात म्हणजे स्त्रीभृणहत्याच आहे असं गृहीत धरून कायदा राबवला जातो. याचा जाच डॉक्टरांना होतो. या मुळे कित्येकांनी गर्भपात करणंच बंद केलं आहे. तिसऱ्या महिन्यानंतर लिंगनिदान शक्य आहे आणि पाचव्यापर्यंतचा  गर्भपात कायद्याला मान्य आहे. त्या मुळे चौथ्या-पाचव्या महिन्यात गर्भपात करायला डॉक्टर कांकू करतात. अशा बाईला, तिने लिंगचाचणी केलेली असू शकेल, या वहीमावर चार हात दूर ठेवलं जातं. पहिली मुलगी असेल तर चक्क नकार देतात. पहिल्या दोन असतील तर अगदी ठाम नकार देतात आणि तीन मुली असतील तर विचारायलाच नको. कायद्यानं काचलेल्या अशा महिलांना मग भोंदू डॉक्टर शिवाय पर्याय रहात नाही. भारतातील ८% मातामृत्यू असुरक्षित गर्भपातामुळे होतात. त्यात ही आणखी थोडी भर!
त्यामुळे लिंगाधारित गर्भपातांना आळ घालतानाच, वैध गर्भपातांना कायद्याच संरक्षण आहे आणि हे ही स्त्रियांच्या हिताचंच आहे हे विसरता कामा नये.
‘स्त्रीभृणहत्या’, ‘कळ्या खुडणे’ वगैरे शब्दांनी या साऱ्याच्या मुळाशी लिंगभेदभाव आहे हे अधोरेखित होत नाही आणि हाच तर कळीचा मुद्दा आहे. खरं तर ‘स्त्रीभृणहत्या’ हा शब्द वापरणंच चुकीचं आहे. समजा मुलगा आहे हे जाणून एखाद्या कुटुंबाने मूलं ठेवलं, आणि मुलगी आहे हे जाणून एखाद्या कुटुंबानी मूल पाडलं; तर निव्वळ पोर पाडणारी मंडळीच गुन्हेगार आहेत का? लिंग निदान आणि लिंग निवड ही दोन्हीकडच्या मंडळींनी/डॉक्टरांनी  केली आहे! दोन्ही तेवढीच गुन्हेगार आहेत. स्त्रीभ्रूणहत्येइतकेच पुरुषभ्रूण-जीवदानही चुकीचंच आहे. गर्भपाताच्या कायद्याचा वरवंटा फिरवून हत्या करणारे  पकडता येतील कदाचित पण जीवदान देणाऱ्यांचं काय? जाणूनबुजून, लिंगनिदान करून, पुरुषभ्रूण जन्माला घालणारी, लिंगनिवड करणारी ही  मंडळी कायद्यात सापडूच शकत नाहीत!
थोडक्यात लिंगनिवड  करणारे निम्मे लोक कायद्याच्या कचाट्यात सापडणं, निव्वळ अशक्य आहे. पुन्हा एकदां हा प्रश्न कडक कायद्यानं नाही तर लिंगभेदविरहीत दृष्टीकोनाने सुटणार आहे. असा दृष्टीकोन समाजात रुजवणं हा अर्थातच दूरगामी पण खात्रीचा उपाय आहे.
आज या विषयी जनजागृती करताना ही बाब विसरली जाते. स्त्री-पुरुष हे भेदाभेद अमंगळ आहेत हे सांगण्याऐवजी भलत्याच गोष्टींना महत्व दिलं जातं. म्हणूनंच माध्यमांतून, जनमाध्यमांतून वापरले जाणारे शब्द, दाखवली जाणारी चित्रं हे सारं खूप जबाबदारीनं आणि काळजीपूर्वक निवडलं पाहिजे. शासन स्तरावर देखील या प्रश्नाची दखल घेतली गेली आहे आणि या संदर्भातली शासनाने नुकतीच प्रसृत केलेली मार्गदर्शिका खूप उपयुक्त आहे.

आकडेवारी असं दर्शवते की मुलीचा गर्भ पाडून टाकल्यामुळे, मुलींचा जन्मदर हा   सुमारे ४.६% ने घटला आहे. २००१-०८ या दरम्यानचा हा अभ्यास आहे. (Trends in sex ratio at birth and estimates of girls missing at birth in India (2001-2008), UN FPA 2011.) यानुसार ५.७ लाख मुलींना जन्म नाकारण्यात आला हे खरं पण त्याच दरम्यान ६४ लाख गर्भपात करण्यात आले. म्हणजे एकूण गर्भपातांपैकी निव्वळ ९% गर्भपात हे लिंग निवडीसाठी होते तर! थोडक्यात सरसकट गर्भपातावर बंदी घालून, गर्भपाताला बदनाम करून हा प्रश्न सुटणार नाही.
पोटुशीच्या पोटातून आरपार गेलेले सुरे, ठिबकणारं रक्त वगैरे चित्रांमुळे गर्भपात बदनाम होतोय. ‘जीव घेणे’, ‘मुली मारणे’ वगैरे शब्दांमुळे गर्भपाताला हत्येचं पातक चिकटतंय. गर्भपात हे पाप आहे वगैरे गैर अर्थ ध्वनित होताहेत. या अशा प्रचारामुळे डॉक्टर आणि पेशंट वैध गर्भपाताला देखील टरकतात. कायद्याने निव्वळ लिंगाधारित गर्भपात (आणि हो, लिंगाधारित गर्भावस्था चालूच ठेवणे देखील) मोडीत काढले आहेत. वास्तविक गर्भपात हा प्रत्येक स्त्रीचा, कायद्यानं काही मर्यादेत मान्य असलेला, हक्क आहे.
 ‘आई मला मारू नकोस, ती बघ, ती बघ डॉक्टरांची कात्री माझे पोट फाडते आहे...’ वगैरे हृद्यद्रावक नाट्यछटांमुळे काळजाला घरं पडतात, आतड्यालाही पीळही पडतो पण वैध  गर्भपाताबद्दलही अत्यंत नकारात्मक संदेश  जातो त्याचं काय?  हे टाळलं पाहिजे. गर्भ आईला विनवतोय असं दाखवल्यामुळे गर्भाला स्वतंत्र जाणीव, विचार, संवेदना आहेत असं भासमान होतं. अशा सादरीकरणामुळे ‘प्रत्येक जीवाला जन्माला येण्याचा अधिकार आहे’, अशा चालीवर प्रचार होतो आहे. भारतीय कायद्यात गर्भाला स्वतंत्र व्यक्ती म्हणून अधिकार अर्थातच अभिप्रेत नाही. असा अधिकार मान्य केला तर  या अधिकारात कायदेशीर गर्भपाताची संकल्पनाच रद्द ठरेल! हे भारतातल्या कुठल्याच कायद्याला  आणि या क्षेत्रातल्या तज्ञांना अभिप्रेत नाही.
आज मुली मारल्यात तर उद्या लग्नाला बायका मिळणार नाहीत, घरात सुना येणार नाहीत असाही सूर स्त्रियांची निव्वळ लग्नाच्या संदर्भातली उपयुक्तता ठळक करतो. वरमाला घेऊन उभ्या पुरुषांची रांग आणि अंतरपाटापलीकडे रिकामे पाट वगैरे चित्रं ही भलत्याच गोष्टींना महत्व देतात. बाईला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे, हा संदेश अभिप्रेत आहे हे कुठे तरी विसरलं जातं.
स्त्रीभ्रूण हत्या ही स्त्रियांना मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीचं निव्वळ एक टोक आहे. कुपोषण, दुर्लक्ष, अनारोग्य, अ-शिक्षण, नको असलेलं गर्भारपण हे सारे म्हणजे घरोघरी रोजच्या रोज होणारी  थोडी थोडी स्त्रीह्त्याच आहे. या कायद्याच्या बाजूनं रान उठवताना हा मुद्दा ठळक होणं जरुरीचं आहे.
गर्भपात नको असं नाही तर लिंग निवड नको हे महत्वाचं, स्त्री-पुरुष समानता हवी हे महत्वाचं, कायदेशीर गर्भपात हा स्त्रीचा हक्क आहे हे महत्वाचं. हे जर लक्षात घेतल नाही तर करायला गेलो एक आणि झालं भलतंच असाच अनुभव यायचा.
डॉ. शंतनू अभ्यंकर
अध्यक्ष,
सातारा स्त्री आरोग्य आणि प्रसूतिशास्त्रतज्ञ संघटना
मॉडर्न क्लिनिक
वाई
जि. सातारा
पिन ४१२ ८०३
मोबाईल ९८२२० १०३४९


आरक्षण आंदोलनाचा अन्वयार्थ

आरक्षण आंदोलनाचा अन्वयार्थ
डॉ. शंतनू अभ्यंकर

उच्च जातींना आरक्षण मनातून नको आहे पण त्यांच्याकडे ना राजकीय वजन आहे ना संख्याबळ. मागासांना तर राखीव जागा हव्यातच, ही भीक नव्हे हा हक्कच आहे, असं म्हणायला त्यांना अनेकानेक कारण आहेत. मधल्या जातींनाही (जाट, गुज्जर, मराठा आणि आता पटेल) आरक्षणाची अडचणच होते आहे. पण तसं उघडपणे म्हणायची त्यांची प्राज्ञा नाही. तसं केल तर त्यांचं आर्थिक/सामाजिक/राजकीय वर्चस्व बाधित होईल. विरोध शक्य नाही मग निदान फायदे तरी आपल्या जातभाईंकडे वळवावेत हा या आंदोलनामागचा सरळ सरळ हिशोब आहे. संख्या आणि राजकीय वजन असल्यावर, करिता थोडेसेच सायास, यात अशक्य ते काय?
आता, 'आम्हालाही आरक्षण दया’ असं म्हटल की आरक्षणाच्या फायद्याच्या न्याय्य फेरवाटपाची चर्चा होईल. आजवर  आरक्षणाचे न्याय्य निकष आणि नियम करण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांनी नाही, जातीअंताची लढाई लढणारयांनी नाही, तर न्यायालयांनी पार पडली आहे. ५०% पेक्षा जास्त आरक्षण नको, धर्माधारीत नको, क्रिमी लेअर’ला नको  वगैरे न्यायालयीन लढाईचा परिपाक आहेत. अशा प्रकारचे नियम राजकीयदृष्टया हाराकीरीचे असल्याने कोणत्याही  राजकीय पक्षांनी असे नियम कदापि केले नसते. सामाजिक न्यायाच्या गप्पा मारणारया आरक्षणवाद्यांनीही अशी मागणी कधी केली नाही आणि केली नसती.
 ‘ते’ सुस्थित आहेत पण त्यांना निव्वळ जातीमुळे मिळतंय. आमच्यातले ‘हे’ गरजू आहेत पण त्यांना निव्वळ जातीमुळे मिळत नाहीये; असा हा युक्तीवाद आहे. मधल्या जातींच्या आंदोलनाचा अर्थ एवढाच की मागासलेपण जोखण्यासाठी जात हा एकमेव मापदंड अतिशय कुचकामी ठरू लागला आहे. आरक्षण धोरणाचा हा हेतूही आहे आणि अपेक्षित, आश्वासक परिणामही आहे. हे चांगलेच आहे. जन्माधारित जात आणि जातीवर आधारित जातनिहाय सामूहक मागासलेपण जोखण्यापेक्षा,  जात+अन्य आर्थिक+सामाजिक घटक लक्षात घेऊन वैयक्तिक मागासलेपण जोखणे हा उत्तम उपाय आहे. अनेक मापदंड वापरून हा निर्देशांक काढता येईल. या अन्य मापदंडांमध्ये शहरी/ग्रामीण निवास, पक्के/कच्चे घर, आई/वडीलांचे शिक्षण, सरकारी/खाजगी शाळा, आई/वडीलांनी भूषवलेली राजकीय पदे (उदा: सरपंच),  आर्थिक परिस्थिती वगैरे अनेक निकष असतील. या निर्देशांकात जात हा ही एक निकष (निदान सुरवातीला) असेल. नंतर हळूहळू पण निश्चितपणे तो बिनमहत्वाचा ठरत जाईल. याला आरक्षणवाद्यांचाही आक्षेप असायचं कारण नाही. जातीवर काहीच ठरू नये, हाच तर या सर्व सव्यापसव्याचा हेतू आहे. या निर्देशांकात नेमके निकष कोणते आणि कशाला किती टक्के महत्व हे समाज/अर्थशास्त्रज्ञ सांगू शकतील.  असं केलं की सर्व जातीतल्या ‘क्रीमी लेअरा’ आपोआप वगळल्या जातील, सर्व जातीतल्या  विविध कारणांनी रंजल्या-गांजल्या नाडलेल्या, ‘गरजू लेअरा’ आपोआप सामावल्या जातील. जात कमी-कमी आणि सरते शेवटी बिन महत्वाची ठरेल.
मध्यम जातीतले वरचे, आपल्या जातीच्या संख्याबळावर आरक्षण मिळवतील आणि जातभाई  खालच्यांची निव्वळ पायरी करून वरचेच सगळे आरक्षणाचे फायदे लाटतील, अशीही साधार भीती आहेच. सध्याच्या व्यवस्थेतही गरजूंना फायदा कमी आणि जातीतील न-गरजूंना फायदाच फायदा असं दिसतंच आहे. नव्या धोरणाने हे ही  कमी होईल. जात्याधारित फायदे/तोटे न राहिल्यास जात ओळखही पुसट होत जाईल. जाती जातीतील तेढही लयाला जाईल.
या आंदोलनातून  जातीअंताच्या दिशेने प्रवास व्हावा ही अपेक्षा.
डॉ. शंतनू अभ्यंकर
वाई जि. सातारा

मो. क्र. ९८२२० १०३४९