Monday 7 September 2015

मराठी वर्ल्ड डॉट कॉम

आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारीत झालेल्या भाषणाचा तर्जुमा
डॉ.शंतनू अभ्यंकर
वाई
मो.क्र. ९८२२० १०३४९

मराठी वर्ल्ड डॉट कॉम
http://www.marathiworld.com
रात्री, नाही, बहुधा अपरात्री, मी दवाखान्यातून काहीतरी इमज॑न्सी आटोपून घरी परतलेला असतो. रात्र किर्र पडलेली असते. झोपेचा बट्याबोळ झालेलाअसतो; मग मूल मांडीवर घ्यावं तसा लॅपटॉप मी अलगद मांडीवर घेतो. एका बटणाचा तेवढा आवाज होतो आणि संगणकाचा पडदा लखकन् उजळतो. बोटाच्या हलक्याश्या हालचालीसरशी संगणकाचा बाण पडद्यावरच्या योग्य त्या आयकॉनचा वेध घेतो आणि परवलीचा ‘तीळा दार उघड’ झाल्यावर दोन संगणकांची जोडी पडद्याच्या उजव्या तळाशी लुकलुकू लागते. पडद्यावर निरनिराळ्या संकेतस्थळांची पाने उघडत मिटत जातात आणि अलिबाबाची गुहाच आपल्यापुढे उघडली जाते. काय नाही या गुहेमध्ये?
मानवी आहार, विहार, आचार, विचार, संस्कृती, पोशाख यातला प्रत्येक बारकावा आहे. कला विज्ञानाचे गहिरे रंग आहेत, आणि तत्वज्ञानातील वितंडवाद आहेत. निरनिराळे कोश आहेत, देशी आणी परदेशी गंड आणि अहंगंड आहेत, खाजगी आणि सार्वजनिक रोष आहेत.
या संगणकीय मुशाफिरीत अचानक गवसलेलं एक संकेतस्थळ म्हणजे मराठी वर्ल्ड डॉट कॉम.
मराठीपणा जगवण्यासाठी आणि जागवण्यासाठी असलेली ही वेबसाईट मराठी संस्कृतीबद्दल इथ्यंभूत माहिती देते. महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीबद्दल एक दालन आहे इथे. पारंपारिक मराठी जेवणावळीचा थाट कसा असतो याचं वर्णन आहे. शिवाय पान कसं वाढायचं, म्हणजे माणसं पानावर म्हणजे खरोखरच केळीच्या पानावर जेवत, त्या वेळची पान वाढण्याची पद्धत चित्रमय रुपात दाखवली आहे. काटा-चमचा डिशमध्ये कसा ठेवला की जेवण संपलं हे ओळखावं याच्याबद्दल दक्ष असणाऱ्या पिढीला, मीठ, लिंबू, चटणी, पुरण वगैरेचीही पानात ठरलेली जागा असते हे पाहून आश्चर्य वाटेल.
नऊवारी साडी आणि पैठणीची माहितीही आहे इथे. पण ‘ई’ खरेदीची मात्र सोय नाही. ‘ती’ खरेदी ‘ही’ला बरोबर घेऊनच करावी लागणार. नऊवारी नेसायची कशी याच वर्णन मात्र अत्यंत विनोदी आहे. या कृतीबरहुकुम अंगाभोवती कापड गुंडाळलं जाईल पण त्याला नेसणं म्हणणं अवघड आहे. नऊवारी नेसण्याची पद्धत कमीकमी होत असली तरी ती दिसते मात्र देखणी. ‘घोळ निऱ्याचा पदी अडखळे, चालणेही भरभर जरा; दिसे ही साताऱ्याची तऱ्हा’, असं माडगूळकरांनी म्हणूनच ठेवलं आहे. प्रख्यात चित्रकर्ता राजा रविवर्मा यांनी देवदेवतांच्या चित्रांसाठी अनेकविध प्रांतातील पेहरावांचा अभ्यास केला. लक्ष्मी, सरस्वती वगैरे देवतांसाठी शेवटी शालीन, सुसंस्कृत, लयदार आणि घरंदाज लुक देण्याऱ्या, मराठी पद्धतीने नेसलेल्या, लुगडयाचीच त्यांनी निवड केली. राजा रविवर्म्याच्या बहुतेक नायिका या दाक्षिणात्य चेहऱ्याच्या आणि मराठी पेहरावाच्या आहेत ते यामुळेच.

रांगोळी हा देखील असाच एक देखणा प्रकार. यालाही किती आयाम आहेत पहा. रांगोळी हे निव्वळ सजवणं नाही, त्यात पाहुण्यांचं स्वागत आहे, दृष्य तसंच अदृष्य पाहुण्याचं सुद्धा. म्हणजे लक्ष्मी वगैरे देवतांचं. त्याला धर्मिक अंग आहे, अध्यात्मिक अंग आहे. निसर्गचक्र आणि रांगोळीचंही अतूट नातं आहे. रांगोळ्यांचे अनेक प्रकार या संकेतस्थळी आहेत. चैत्रामध्ये रेखाटायचं चैत्रांगण आहे. त्यातल्या प्रत्येक घटकाची, म्हणजे शंख, चक्र, गदा, पद्म्म, तुळशीवृंदावन वगैरेची माहिती आहे. संस्कारभारतीने लोकप्रिय केलेल्या आणि रांगोळीचा गालीचा/पायघडया म्हणून गाजलेल्या रेखाटन पद्धतीचीही माहिती आहे. मराठी गाण्यांचं स्वतंत्र पान आहे. यात ‘ए’ पासून ‘झेड’ पर्यंत, म्हणजे ‘अ’ पासून ‘ज्ञ’ पर्यंत नाही तर खरोखर ‘ए’ पासून ‘झेड’ पर्यंत अक्षरांवर क्लिक करून गाणी बघता येतात. कवी, संगीतकार, गायक आणि गाण्याचे संपूर्ण शब्द आपल्याला इथे सापडतात. बरेचदा आपल्याला गाण्याचं धृवपद आठवत असतं पण संपूर्ण गाणं जाणून घ्यायला आपण उत्सुक असतो. ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, एवढं आपल्याला आठवत असतं, पण ‘चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती, हिरवे हिरवे प्राण तशी ही  रुजून आली पाती, फुले लाजरी बघून कुणाचे हळवे ओंठ स्मरावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’; हे आपल्याला आठवत नसतं. त्यामुळे ‘त्या तरूतळी विसरले गीत’ अशी आपली अवस्था झाली तरी त्या तरूतळी वायफाय असेल तर ह्या संकेतस्थळी गवसले गीत अशी अवस्था होईल यात शंकाच नाही.

डॉ.शंतनू अभ्यंकर
वाई
मो.क्र. ९८२२० १०३४९

2 comments: