Tuesday, 1 September 2015

नाना

                                                               नाना
डॉ.शंतनू अभ्यंकर
तब्बल साडेतीन तासांच्या, धुळीने माखलेल्या, खाचखळग्यानी भरलेल्या, डायव्हर्जननी नाडलेल्या, जागोजागी खणलेल्या, रणरणत्या उन्हातल्या रस्त्यानी वाईहून निघालेली आमची गाडी कात्रजचा घाट उतरायची आणि मी आणि माझा लहान भाऊ शशांक, भिरभिरत्या नजरेने रिक्षा आणि डुक्कर दिसतेय का ते शोधायचो. रिक्षा ही पुणे आल्याची खुण होती आणि डुक्कर... डुकराबद्दल मी नंतर सांगीन.
रिक्षा दिसली की ‘पुण आलं, पुणं आलं’ म्हणत आम्ही सीटवर उडया मारायला जी सुरवात करायचो ते गाडी बाजीराव रोड पार करून, महाबँकेला वळसा घालून, तुळशीबागेत वाड्यासमोर थांबेपर्यंत! तिथे पोचल्यावर उत्साहाची एक नवी शिरशिरी अंगात भिनायची. आपापल्या ब्यागा सांभाळत, लाकडी जिन्यावर दाणदाण उडया टाकत आम्ही आजोळी डेरेदाखल व्हायचो. आजी आमच्या स्वागताच्या लगबगीत असायची आणि नाना, आमचे आजोबा, दवाखान्यात, पेशंटच्या गराडयात. तळमजल्यावर दवाखाना. पण दवाखान्यात आहेत का व्हिजीटला गेलेत हे घरातून काही विशिष्ठ कोनातून दिसायचं. घराची खिडकी ते दवाखान्याची झडप ते नानांची खुर्ची असा कोन साधून आम्ही नानांचा वेध घ्यायचो; आणि नानांची चिरपरिचित हाक यायची; “पssssपी, पssssपी ”! ह्या हाकेसरशी समजावं की आता सुट्टीभर आम्ही नानांचा आणि नानांनी आमचा ताबा घेतला आहे.
दिवस सूरु व्हायचा तो व्हिजीटनी. नानांच्या अजस्त्र लँडमास्टर गाडीत बसून पुणेभर नाना पेशंट तपासत फिरायचे, आणि आम्ही नाना गाडीत परत येईपर्यंत ‘नाना, नाना लवकर या ’ म्हणत उडया मारत असायचो. या भ्रमंतीत नानांची टकळी सतत चालू असायची.
‘...हा कुठला रस्ताSSS?”
‘...हा बाजीराव रोड.’ आमचा कोरस.
‘...आता आलाSSS?’
‘... टिळक रोड...”
आम्हाला येतीलं ती उत्तरं आम्ही देत असू; न येतील तिथे  नानाच गाईडची जागा घेत.
जाता येता लागणारे रस्ते, पुतळे इमारती वगैरेंची इथ्यंभूत माहिती नाना सांगत रहात...बाबुराव सणस, सेनापती बापट, सावरकर यांच्यापासून ते अलका चौकातली घागरवाली, के.ई.एम. समोरची मासेवाली, न्यायालायाशेजारचा कामगार पुतळा यांचे व्यक्ती विशेष आणि पुतळा विशेष ऐकवत आम्हाला. SSPMS समोरचा शिवाजी पुतळा, ससून समोरचा हुतात्मा स्तंभ वगैरे ठिकाणी तर खाली उतरवून चौथ‌‌‍रयावरची माहितीही वाचायला लावली त्यांनी आम्हाला. त्याची सवयच लागली मग.
गायकवाड वाडा, न्यू इंग्लिश स्कूल, फर्ग्युसन कॉलेज वगैरे इतिहासाच्या पुस्तकात आले ते नंतर. चिं.वि.जोशी, ना.सी.फडके वगैरेंची घरं आधी बघितली आणि मग पुस्तकं.
पेशवे पार्कात गेलं तरी Acasia arabica, Mangifera indica. करत फिरायचो आम्ही. नाना अस नकळत  शिकवत जायचे. संभाजी पार्कात मत्स्यालय पहायला घेऊन गेले; मासे तर पहिलेच पण बाहेर पाटीवर “मत्स्यालय” या शब्दात तीन अक्षरं कशी जोडावी लागतात हेही दाखवलं .... आणि घरी येऊन दहा वेळा लिहूनही घेतलं!
हे शिक्षण कुठल्या थराला जाईल याला काही नेम नव्हता. एकदा मंडईतून जोरदार आंबे खरेदी करून येत येत मर्तिकाच्या सामानाच्या  दुकानांची सैर घडवून आणली त्यांनी! सगळ माहिती असलं पाहिजे ही त्यांची भूमिका. वर म्हणाले, ‘मी गेल्यावर इथूनच खरेदी करावी लागेल रे!’
नानांचा विनोद असा धारदार होता. तिरकस बोलण्यात तर त्यांचा हात कोणीच धरणार नाही. नवीन माणसाला तर ते त्याची चेष्टा करताहेत हेच मुळी समजायचं नाही. कॉलेजला असताना एकदा वाऱ्याच्या वेगाने स्कूटर दौडवत मी वाईहून पुण्यात पोचलो. माझी सगळी फुशारकी ऐकून नाना म्हणाले, ‘त्या मानाने बराच उशिरा पोचलास की तू!’
एखाद खेळणं आम्ही जरा उलटं पालटं करून बघू लागलो की नाना म्हणायचे; ‘अरे तसं नाही मोडत ते, इकडे दे, नीट दोन तुकडे कसे करायचे ते मी दाखवतो.’ आम्ही आपले वरमून खेळण जागेवर ठेवायचो.
या त्यांच्या शिस्तीमुळे खेळणी टिकायची भरपूर. किल्लीचं अस्वल, उडया मारणारी चिमणी, ताजमहाल, शिकारा, केरळचे हत्ती, लाकडी अंबारी आणि हत्ती, याकची घंटा, चंदनाचा पँगोडा, पाणी पिणारी बाहुली, आगगाडी, बुद्धिबळ, लगोरी, दोरीवरच्या उडया वगैरे सगळं काही आमच्या आई, मामा मावशीच्या वेळेचे होते. कदाचित नानांच्या लहानपणचही असेल. काचेआडची ही कुलुपबंद नवलनगरी आम्हाला खुली होती, पण ‘अटी लागू’ ह्या तळटिपेसह.
जवळ कोणीतरी मोठं हवं, एका वेळेला एकच खेळणं काढायचं, त्याला एकदाच आणि जपून किल्ली द्यायची. पहिलं आत ठेवल्यावर दुसरं काढायचं, दुसरं ठेवल्यावर तिसरं... अशी सगळी नानांची शिस्त.
सर्वव्यापी होती ती. उठल्यावर पांघरुणाच्या घडया  घालणे , पानातील सर्व पदार्थ संपवण, सगळे पदार्थ खाणे, जिन्यावर पाय न वाजवणे, खिडकीतून कचरा न टाकणे, दुपारी नाना झोपले असता दंगा  न करणे...!
यातला शेवटचा भाग जमणे जरा कठीण होत पण यावर त्यांनीच एक अक्सीर इलाज शोधून काढला होता.
दुपारी झोपण्यापूर्वी आम्हाला दोघांना मांडीवर घेऊन ते आरडा ओरडीचा खेळ खेळायचे. हा नानांचा खास शोध. त्यांच्या मांडीवर आम्ही स्थानापन्न झालो की नाना त्यांच्या घणाघाती आवाजात पुकाराचे,
‘आज संध्याकाळी आम्ही सारसबागेत जाणार आहोत हो sss’
पाठोपाठ आम्ही दोघ बेंबीच्या देठापासून ओरडायचो, ‘हो sssss’
‘तिथे आम्ही भेळ खाणार आहे हो sssss’ नाना
‘हो sss’ आम्ही.
तिथे आम्ही कारंज पहाणार आहे हो sss’ नाना.
‘हो sss’ आम्ही.
तिथे आम्ही गवतावर लोळणार आहे हो sss’ नाना.
‘हो sss’ आम्ही.
हा आरडा ओरडीचा खेळ चांगला अर्धातास चालायचा. मग नाना म्हणायचे, ‘आता खूप आरडाओरडा केलात ना? आता मी महाबळेश्वरला जाणार आहे. दंगा  करायचा नाही.’ आम्ही चिडीचूप.
महाबळेश्वरला जाणार आहे हा खास नानांचा वाक्प्रचार. घराच्या एका कोपरयातल्या खोलीत भर उन्हाळ्यातल्या दुपारी देखील भणाणा वारं येई. हेच नानाचं महाबळेश्वर. नानांची ही आवडीची झोपायची जागा. असे इतरही अनेक वाक्प्रचार आणि परवलीचे शब्द होते.
‘अहो, वर तुम्हाला भेटायला अन्नछत्रे आलेत’; असा पुकारा होताच  नाना हातातला पेशंट संपवून जेवायला माडीवर  येत.
‘आज संध्याकाळी ओळखिच्यांकडे जायचंय’ म्हणजे रास्ता पेठेतल्या उडुपी गृहामध्ये मनसोक्त इडली डोश्याचा बेत आहे.
शिवाय डो.जे.(डोहाळेजेवण), बिडली (बिघडलेली इडली), किस्कीट (धड न केक आणि धड ना बिस्कीट अशा रुपात ओव्हनमधून बाहेर पडलेला पदार्थ), ब.व.(बटाटेवडा), ब चा ची (बटाट्याचा चिवडा) असे शॉर्टफॉर्मही होते. 
चिवडयावरून आठवलं, लक्ष्मी-नारायण चिवडयावरून स्फूर्ती घेऊन आजीनेही एकदा भरपूर काजू, बदाम, बेदाणे वगैरे घालून अगदी उच्चभ्रू चिवडा केला. अर्थात आजीच्या दृष्टीने भरपूर असलेला सुकामेवा नानांच्या दृष्टीने किस झाड की पत्ती होता. तेंव्हा ‘कसा झालाय लक्ष्मी-नारायण चिवडा?’ या लाडिक प्रश्नाला नानांचं उत्तर होत, “छानच, लक्ष्मी-नारायण जरी नाही तरी विठ्ठ्ल- रखुमाई म्हणून खपायला हरकत नाही!”
ही अशी चिडवाचिडवी सतत चालायची. पण नानाचं चिडवण सुद्धा एकसुरी नव्हतं. त्यात विविधता होती, प्रतिभा होती; चिडवण्याची एक हातोटीच होती त्यांना. नानांच्या अंतरीच्या नाना कळांच वर्णन करावं तेवढ थोडच.

‘बघू तुझ आईस्क्रीम गोड आहे का?’ म्हणून साळसूदपणे आईस्क्रीम घ्यायचे आणि बरचसे खायचे. आम्ही गार.
‘चॉकलेट माझ्याकडे दे, कुण्णाला मिळणार नाही अशा जागी ठेवतो’, याचा अर्थ नाना चॉकलेट मटकावणार हे लक्षात यायला एक अनुभव घ्यावाच लागतो. एका चॉकलेटची आहुती द्यावीच लागते.
हॉलमध्ये गप्पा मारता मारता पाणी हवं असेल तर अचानक म्हणायचे, ‘काय म्हणालास? पाणी हवंय का? दे, हो दे. अगदी मनकवडा आहेस रे!’
‘नाना, मी काहीच म्हणालेलो नाही.’ मी.
‘नाही कसं,मी स्पष्ट ऐकलं आत्ता...जा जा पाणी आण.’ आम्ही निघाले पाण्याला.

‘अळूला मीठ जास्त झालय का हो?’ आजी.
‘छे,छे मीठ बरोबर आहे, अळू कमी पडलाय!’ नाना.

मोठ्ठा, पिवळाधमक, दळदार हापूस चिरायचे आणि ती रसाळ फोड तोंडात घोळवत असं काही वाईट तोंड करायचे की विचारू नका. वर आम्हाला सांगणार, ‘...आंबा अजीबात खाऊ नका, अगदी आंबट आहे. तुम्हाला अजीबात आवडणार नाही, सोसणार नाही, पोट बिघडेल...’ समझनेवालोंको इशारा काफी है, या न्यायाने आम्ही आंबे फस्त करायचो. नाना खुष.
पेरू चिरून देताना प्रत्येकाला दोन दोन फोडी द्यायचे आणि छोट्या शशांकला विचारायचे, ‘तुला किती हव्यात?’
तो म्हणायचा, ‘दहा’.
मग नाना शांतपणे त्याच्याच दोन फोडीचे दहा तुकडे करून त्याच्या पुढयात ठेवायचे. शशांक खूष.

मी आणि शशांक आलो की “डूगावकर आले, डूगावकर आले” अस ओरडायचे. डूगावकर म्हणजे डुक्करगावकर. कारण आम्ही खेडयातले. वाईचे. गावात डुकरं फिरतात अशा गावचे म्हणून डूगावकर! आम्हाला डूगावकर म्हटलेलं  ऐकताच आम्ही त्यांच्या अंगावर धावून जायचो. तुंबळ हाणामारी सुरु व्हायची...नानांना हेच हवं असायचं.
आम्ही पुण्यात शिरताच डुक्कर शोधायचो ते याच साठी. एकदा पुण्यात डुक्कर  दिसलं की नानासुध्दा डूगावकर ठरणार होते. एकदा आम्हाला येता येता कात्रजला डुकरांची चांगली भलीमोठी फौज  दिसली. हे शुभवर्तमान आम्ही नानांच्या कानावर घातल्यावर म्हणतात कसे, ‘अरे तुमचीच चौकशी करायला वाईहून आली होती ती टोळी. मला भेटून गेले नं. मी सांगितलं, आत्ता येतील, आले की लगेच परत पाठवतो. मग गेली परत. आत्ता अर्धा तास झाला. बरोबर तुम्हाला कात्रजला दिसले.’ हा पलटवार अगदीच अनपेक्षित होता. एवढ्या वर थांबतील तर ते नाना कसले? लगेच पद्मासन घालून डोळे मिटून प्रार्थनेला सुरवात. प्रार्थना काय तर ‘शंतनू-शशांकला वाईला परत जाउ दे...शंतनू-शशांकला वाईला परत जाउ दे’; हे आम्हाला ऐकू येईल असं पुटपुटायचं. तुम्हीच सांगा कोणती स्वाभिमानी नातवंडे आपल्या आजोबांचं हे वागणं सहन करतील? मग आम्हीही पद्मासन घालून, डोळे मिटून  भक्त प्रल्हादाच्या काकूळतेनी ‘आम्हाला नानांकडेच राहू दे...आम्हाला नानांकडेच राहू दे ’ अशी प्रार्थना करायचो. ईश्वरी कृपेमुळे आमचीच प्रार्थना दरवेळी फळास यायची हे काय सांगायला हवं?
एकदा आमची गाडी कुठे धडकली आणि तिचा एक दिवा फुटला आणि बॉनेट वाकड झालं. झाssलं. नानांना निमित्तच मिळालं. आम्ही दिसलो की एक डोळा बंद आणि जीभ बाहेर अस मुद्दाम तोंड करायचे. हे आपल्या प्रीय गाडीला वेडावून दाखवताहेत हे का आम्हाला कळायचं नाही? आम्ही लगेच नानांवर चाल करून जायचो. शेवटी जमिनीवर लोळून चीत चीत असं म्हणत नाना स्वतःची सुटका करून घ्यायचे. आम्हाला वाटायचं आम्ही नानांची भली खोड मोडली. आता पुन्हा काही नाना आमच्या वाटेला जायचे नाहीत. पण खरं तर ही पुढच्या चिडवाचिडवीची नांदी असायची. इतिहासात शिकवतात की पहिलं महायुध्द हेच दुसऱ्या महायुध्दाचं महत्वाचं कारण होतं. तसंच हे. ही लढाई संपताच भेटायला येणाऱ्या पहिल्या तिऱ्हाईतासमोर  नाना गंभीर चेहऱ्याने बसायचे. नाटकीपणाने स्वतःचे हात पाय चेपायचे. त्या माणसाने ‘काय डॉक्टर, पाय दुखतोय का ?’ असं विचारेपर्यंत हे नाटक चालायचं. एकदा का अपेक्षित प्रश्न आला की नानांची रसवंती सुरु. गंभीर चेहऱ्यांनी आणि हलक्या आवाजात नाना सांगणार, ‘अहो काय सांगू, दोन नातू आलेत...सकाळ संध्याकाळ अगदी बुकलून काढतात हो मला...अजीबात दया माया दाखवत नाहीत...हे बघा इथे वळ आहे, इथे काळंनीळं झालंय...पण आता काय करणार आपलीच नातवंडं सहन करावच लागतं... ’ हे सगळं दाराआडून आम्ही ऐकत असू. अर्थात आम्ही ऐकतोय हे बघूनच हे नाटक चालायचं. दाराआडून आम्ही दटावलं की नानांना आणखी चेव चढायचा. वर म्हणायचे कसे, ‘...अहो तुमचा विश्वास बसणार नाही. पण ते बघा दोघ दाराआड कसे शांत उभे आहेत. पण हे सगळ तुम्ही आहात तंवर. एकदा तुम्ही गेलात न की माझं काही खरं नाही...!!’ आता पाहुणाही ही रंगात आलेली गंमत बघून खो खो हसायला लागायचा. आमच्या रागाचा पारा असा चढायचा म्हणताय. त्या गृहस्थांनी हसत हसत निरोप घेतला की आम्ही नानांवर हल्ला केलाच म्हणून समजा. पुन्हा एकदा नातवंडांशी मस्ती करण्याची खुमखुमी नानांनी भागवून घेतलेली असायची.

नानांची ही लढायची खुमखुमी नातवंडांसाठी होती तशी सार्वजनिकही होती. जनसंघातर्फे ते पुणे मनपाची निवडणूक लढवत होते. प्रचाराला आम्ही दोघं पाहिजेच. गळ्यात पिशव्या, छातीला बिल्ले आणि हातात हँडबिले अशा अवतारात आम्ही घरोघर जायचो. ‘नानांना मते दया आणि आम्हाला खाऊ दया’ ही आमची घोषणा.’ लोकांनी दोन्ही दिले. आम्ही गुटगुटीत झालो आणि नाना नगरसेवक. कोणीतरी म्हणालं, ‘नाना आता गाडी रंगवून घ्या’. त्या काळी गाडी रंगवून घेणं सुद्धा प्रतिष्ठेचं होतं. नाना उत्तरले, ‘नगरसेवक झाल्यामुळे मी गाडी घेतलेली नाही आणि गाडीमुळे मी नगरसेवक झालो असंही नाही. तेव्हा आहे तोच रंग बरा.’
आम्ही इंग्रजी मध्यामच्या शाळेत शिकू लागलो याचं नानांना कोण कौतुक... पण त्याचवेळी आम्ही मराठीत शिकत नाही याचं कोण वैषम्य! मग संवाद सुरु व्हायचे...
‘कढी वाढू का?’ आजी.
‘नको’ आम्ही.
‘अग तसं नाही, कढी काय म्हणतेस? बटरमिल्क सूप वाढू का, असं विचार. म्हणजे घेतील.’ इतिः नाना.
मग नाटकीपणे आम्हाला बटर मिल्क सूपचा आग्रह व्हायचा.

“आभाळ वाजलं धडाड धुम्म; वारा सुटला सो सो सुम्म.
पाऊस आला धो धो धो; पाणी व्हायले सो सो सो”
हे बालगीत नाना चक्क
“स्काय वाजलं धडाड धुम्म; विंड सुटला सो सो सुम्म
रेन आला धो धो धो; वॉटर व्हायले सो सो सो”
असं म्हणायचे. एवढी चिथावणी आम्हाला पुरेशी असायची.
एकदा नानाच सुट्टीत वाईला आले. पहातात तो काय आम्ही दोघांनी सुट्टीत घरी दोन गृहोद्योग सुरु केलेले. आमच्याकडच्या पुस्तकांच्या संग्रहाचं आम्ही ‘सरस्वती वाचनालय’ उघडलं होतं आणि एका रिकाम्या खोलीत उखळ, मुसळ, जातं, काठी, वरवंटा, दोरीवरच्या उडया वगैरेंच्या सहाय्यानं व्यायामशाळा काढली होती. ‘हनुमान व्यायाम मंदिर’ अशी पाटीही झळकत होती. येणाऱ्या मित्रांकडून  दोन दोन पैसे वर्गणीही गोळा केली होती. आमचा हा उत्साह बघून नाना अचंबित झाले. पुढे कित्येक दिवस येणाऱ्या जाणाऱ्याकडे आमच्या उद्योगाची तोंडभरून वर्णनं चालंत. गोम फक्त एकच होती. नाना नेहमी चुकून; चुकून हं, चुकून; ‘हनुमान वाचनालय’ आणि ‘सरस्वती व्यायामशाळा’ असाच उल्लेख करायचे!! आम्ही एवढया कल्पकतेने केलेल्या नाम योजनेचा असा बोजवारा उडालेला पाहून आमचं पित्तं खवळायचं. आम्ही परोपरीनं त्यांना समजावून सांगितलं, पुन्हा पुन्हा त्यांच्याकडून घोटून घेतलं पण व्यर्थ. ही चूक सुधारण नानांना कधीही जमलं नाही.
अर्थात नाना कधी चिडवताहेत याची आम्ही आणि आम्ही कधी अंगावर येतोय याची नाना, मनोमन वाटच बघत असायचो. एकदा एका भेटीत नाना का कुणास ठाऊक, खुललेच नाहीत. आम्ही दोघे इतके हिरमुसलो की शेवटी, ‘नाना आम्हाला चिडवत नाहीsssत ’ असा भोकाड काढला.
नानांचा हा नॉनस्टोप नॉनसेन्स, खरं तर नानासेन्स, अखंड चालू असायचा. त्यामुळे कंटाळ्याचा प्रश्नच नाही. चुकून जरी कंटाळा आला असं म्हटलं की नाना म्हणायचे, ‘माझ्याकडे औषध आहे नं!’ आणि कोपऱयातल्या खिळयाकडे बोट दाखवायचे. तिथे का कुणास ठाऊक पण एक हंटर टांगलेला होता.
घरात नाना जसे उदंड उत्साहाने सळसळत असायचे तसेच प्रवासातही असायचे. टनेव्हर अ डल मुमेंटट हे नानांच्या बाबतीत अगदी खरं होतं. त्या काळी लहानमुलांसह प्रवास म्हणजे मोठयांची परीक्षाच असायची. पण प्रवासातही  निरनिराळे खेळ शोधून काढून नाना आम्हाला गुंगवून टाकायचे. कधी  गाडयांच्या नंबर प्लेटवरच्या आकडयांची झटपट बेरीज कर तर कधी पुढून कोणते वहान येणार यावर पैजा लाव. एक ना अनेक. त्यामुळे नानांबरोबर प्रवासाला आम्ही सदैव तयार.
चांगले धिप्पाड आणि ऊंच होते नाना. कोणताही पोशाख  त्यांना शोभून दिसे. संघशाखेवर संघाच्या गणवेशात. एरवी शर्ट-पँट आणि रविवारी खास भारतीय पोशाख; लफ्फेदार तलम पांढरं धोतर, कुडता, जाकीट वगैरे. आवाजही देहसंभाराला साजेसाच होता. खरेदीही अशीच. फळांची आवड. त्यामुळे फळांची खरेदी नगावर नाही, डझनात नाही, तर करंडीच्या हिशेबात व्हायची. सर्व प्रकारची उत्तमोत्तम फळं नानांकडे हारीनं हजर. खाणंही ऐसपैस. अगदी चवीनं. निःसंकोचपणे. बाळंतीणी एवढेच डिंकाचे लाडू स्वतःसाठी. आमरसासाठी वाटी नाही वाडगाच हवा.   रविवार संध्याकाळ ही खास कौटुंबिक सहलीसाठी राखून ठेवलेली. कोणत्यातरी बागेत जाऊन खेळणे आणि खाणे हा कार्यक्रम. चटई, पाणी, भेळेची तयारी, ताटल्या, भांडी वगैरे सत्रा हेलपाटे घालून आम्ही गाडीत भरत असू. दोन-तीन तास हुंदडून, भरपेट हादडून आम्ही पेंगतच घरी परतत असू.
संगीत नाटकाची नानांना विलक्षण आवड. दवाखाना आटोपून रात्रीचा प्रयोग धावत पळत गाठायचा आणि इंटरव्हलमध्ये गाडीत डबा जेवायचा, असा शिरस्ता. ‘सौभद्र’ तर तोंडपाठ. नानांना जे जे प्रीय ते ते नातवंडाना प्राणप्रिय झालं पाहिजे असा त्यांचा आग्रह. मग यातून मला सौभद्र दाखवणं झालं. नाटक नुसतं बघून भागणार नव्हतं, ते मला आवडायला हवं होतं; आणि नुसतं आवडूनही भागणार नव्हतं, त्याचा मला अभिमान वाटणं आवश्यक होतं. सौभद्रची कथा कळण्याचीही माझी  इयत्ता नव्हती; तेव्हा त्याची सांस्कृतिक महत्ता काय कळणार? पण नानांच्या हे गावीही नव्हतं. त्यांनी माझ्याकडे सौभद्राची भरपूर भलामण केली. सगळी स्टोरी सांगितली, डायलॉग म्हणून दाखवले, गाणी समजावली. आपण काहीतरी भव्य दिव्य, अलौकिक अनुभव घेणार आहोत हे माझ्या मनावर पक्क बिंबवलं. नानांच्या बरोबरीन मी ते नाटक बघितलं, पण कळलं काही नाही. थेटरात पेंगता पेंगता कानात गुणगुणणारे डास आणि इंटरव्हलमधला ब.व.चा वास, एवढया दोनंच आठवणी आज ताज्या आहेत. पण नानांना याचं काही नव्हतं. त्यांनी नातवाला सौभद्र दाखवलं आणि त्यांच्या नातवानी ते न झोपता पाहिलं हीच त्यांच्या दृष्टीनी मोठी अचीव्ह्मेंट होती. वर घरी आल्यावर मला म्हणतात, ‘हे जे तू बघितलंस नं, ते काहीच नाही. खरं नाटक गंधर्वाचं. मी सुद्धा हे बघतो म्हणजे काय आहे, एक युक्ती आहे ती. ‘हे’ बघायचं आणि ‘ते’ आठवायचं!!’
सौभद्रातली आणखी एक गोष्ट माझ्या लक्षात आहे. पात्रांच्या  हालचाली बरोबर रंगमंचावर प्रकाश झोतही येत जात होते. पात्रांपुरता उजेड इतरत्र अंधार अशी योजना होती. नानांच्या घरी फिरताना अगदी हाच अनुभव येई. ज्या खोलीत माणसं नाहीत त्या खोलीत दिवे जाळायचे नाहीत अशी शिस्त होती. त्यामुळे हॉल मधून आतल्या खोलीत गेलं की हॉलचे दिवे घालवायचे आणि खोलीतले लावायचे. पुन्हा बाहेर येताना  उलट. शिवाय खोलीत दिसण्याची गरज असेल तेव्हाच दिवे लावायचे असाही नियम होता. म्हणजे नुसतेच पाढे परवचा म्हणताना दिवे बंद, पत्ते खेळताना पुन्हा चालू. खिडकीतून रस्त्यातली गंमत बघत उभं राहिले की दिवे बंद. आपल्या बरोबर फिरणाऱ्या ह्या उजेडाची किमया मला अतिशय नाटयमय वाटायची. आपण स्टेजवरच प्रवेश करतोय असा फील यायचा!
मला आपल असं वाटत की नाना मला जितके लाभले तितके ते कुणालाच नाही मिळाले. मी पहिला नातू, त्यातून लेकीचा लेक; आणि त्यांचं हे पहिलंच आजोबापण. त्यामुळे परस्परांचे पहिलेपणाचे सारे चोचले आम्ही पुरवले. त्यांनी त्यांची आजोबागिरी आणि मी माझी नातुगिरी मनसोक्त एन्जॉय केली. त्यांच्या बोलीतून आणि देहबोलीतून त्याचं पाहिलं आजोबापण झिरपत रहायचं. मांडीवर घेऊन इतक्या जोरात कवटाळायचे की श्वासही घेणं मुश्कील.
पुढे आम्ही मोठे झालो, नानाही मोठे झाले. थोडे हेकट झाले. भ्रमिष्टही झाले. एके दिवशी अचानक त्यांची शुद्ध हरपली आणि काही दिवसात सारा खेळ आटोपला. नानाचं जाणं अनपेक्षित नसलं तरी वाईट वाटलंच. पण नानांनी सूखंच इतकं भरभरून दिलं की नाना म्हटलं की आनंदाच्या अनेक आठवणींच्या लाटाच फुटायला लागतात. त्याचं बोलणं, आवाज, मस्ती, खेळ, विनोद या सारया आठवणींचे तुषार हळूहळू मन चिंब भिजवून टाकतात. अजूनही मी लहान होतो, पाठीवरती सामानाची बँग घेऊन, लाकडी जिन्यावर दाणदाण पावलं वाजवत, पायरी पायरी पार करत चढत जातो आणि नानांची चिरपरिचित हाक कानावर येते, ‘पsssपी, पsssपी’





3 comments:

  1. मस्त लिहिलेय. :)
    तुमचा ब्लॉग छान आहे. शुभेच्छा.

    ReplyDelete
  2. खूपच छान लिहिलयेस.

    ReplyDelete
  3. फारच छान, लवकरच तुझ्या पुस्तकाच्या प्रकाशनाची वाट बघतोय

    ReplyDelete