Wednesday, 2 September 2015

पाळी मिळी गुपचिळी

पाळी मिळी गुपचिळी
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई. जि. सातारा. पिन ४१२ ८०३ मो.क्र.९८२२०१०३४९

नेहमीच्या शिरस्त्या प्रमाणे पेशंटची रांग ओसरल्यावर सिस्टरांनी एकामागून एक एम.आर. (औषध कंपनीचे प्रतिनिधी) आत सोडायला सुरवात केली. दुपार टळायला आली होती आणि जांभया दाबत, मोबाईलवर, फेसबुकवर, अपडेट्स टाकत आणि त्याचवेळी नेटवर कोणतातरी संदर्भ शोधत मी त्यांचे बोलणे या कानानी ऐकत होतो आणि त्या कानानी सोडून देत होतो. फार गांभीर्याने ऐकावं असं त्या पोपटपंचीत नसतंच काही. पण इतक्यात एका वाक्याने माझे लक्ष वेधले गेले. तो म्हणाला, “आता सणाचे दिवस जवळ आले डॉक्टर, आता खूप बायका पाळी पुढे जाण्यासाठी गोळ्या घ्यायला येतील. तेव्हा लक्षात असू दया आमच्याच कंपनीच्या गोळ्या दया. प्लीज सर!! सणासुदीच्या दिवसांमुळे कंपनीने टार्गेट वाढवून दिले आहे; आणि तुम्ही मनावर घेतल्या शिवाय ते मला गाठता येणार नाही.” एवढं बोलून गोळ्यांचं एक नमुना पाकीट माझ्या टेबलावर ठेवत तो निघाला सुद्धा. माझा अहं कुरवाळून आपला काम सफाईदारपणे करून तो निघून गेला. मी मात्र अचंबित झालो.
एका लहानश्या गावातल्या एका लहानश्या डॉक्टरपर्यंत आवर्जून आर्जवं करणे कंपनीला सहजपणे परवडत होतं, म्हणजे हे पाळी पुढे ढकलण्याचे मार्केट किती प्रचंड लाभदायी आहे बघा! औषध कंपन्या आपला माल खपवण्यासाठी कोणत्याही थराला जातात हे माहीत होतं, पण त्या हे ही टोक गाठतील असं माझ्या ध्यानीमनीही आलं नव्हतं. पाळी या प्रकाराबद्दल भारतीय समाजमनाची नस बरोब्बर हेरून योग्य वेळी त्यांनी आपला माल पुढे केला होता. मला कौतुकच वाटलं त्या कंपनीचं.
खरं तर ही मागणी नेहेमिचीच, पूजा, सत्यनारायण, तीर्थयात्रा, उत्सव, सण वगैरे निमित्ताने केली जाणारी. क्वचित प्रवास, परीक्षा वगैरे कारणेही असतात, पण ती अपवादानेच. किती साधी सोपी रुटीन गोष्ट होती ही. बायकांनी यायचं, पाळी पुढे जायच्या गोळ्या मागायच्या आणि चार जुजबी प्रश्न विचारून आम्ही त्या द्यायच्या. माझी चिठ्ठीही नेहेमीचीच. मुकाटपणे दिली जाणारी. पण मनातल्या मनात मी वैतागतो, चरफडतो. म्हणतो, ‘काय मूर्ख बायका आहेत या! शुद्धाशुद्धतेच्या कुठल्या मध्ययुगीन कल्पना उराशी बाळगून आहेत.’
वेळ असला की माझ्यातला कर्ता सुधारक बोलता होतो. एरवी मागताक्षणी चिठ्ठी लिहून देणारा मी, समोरच्या स्त्रीला प्रश्न विचारतो, ‘काय शिक्षण झाले आहे तुमचे?’
‘क्ष’
क्ष ची  किंमत अशिक्षित पासून डॉक्टरेट पर्यंत काहीही असू शकते.
‘आलीच जर पाळी,  तर तुम्ही समारंभात सहभागी होऊ नये हे तुम्हाला पटतंय का?’
‘...आता घरचंच कार्य म्हटल्यावर...’,‘...आमच्या घरी नाही चालत...’,‘...आमचं काही नाही पण सासुबाईंचं फार असते...’, ‘आमच्या घरी सगळंच पाळलं जाते...’; असं काहीतरी उत्तर येते. क्ष ची किंमत काहीही असो.
‘नाही, मला हे पटत नाही, हे मला मनाविरुद्ध करावे लागतंय!’, असं उत्तर वीस वर्षात एकदाही ऐकलं नाही.
पाळी आलेल्या स्त्रीला अस्वच्छ अपवित्र समजणे याची पाळेमुळे पार खोलवर रुजलेली आहेत. स्त्रियांच्या बाबतीत घडणाऱ्या, निसर्गनेमाने घडणाऱ्या, एका अत्यंत शारीर कार्याला धर्मिक, वैयक्तिक, कौटुंबिक आणि आर्थिक धुमारे फुटले आहेत. कुठून येतात या कल्पना? अगदी लहानपणापासून मनात कोरल्या जातात त्या. आई, मोठ्या बहिणी, शेजारी पाजारी सगळीकडे असतात त्या. आपण फक्त मनानं स्पंज सारख्या त्या टिपून घ्यायच्या.
शाळेत कधी कधी जायचा प्रसंग येतो. मुला-मुलींसमोर ‘वयात येताना’ या विषयावर बोलायला. सगळ्या मुली पाळीला सर्रास ‘प्रॉब्लेम’ असा शब्द वापरतात. प्रॉब्लेम आला/ गेला/ येणार वगैरे. मी गमतीने म्हणतो, ‘अहो पाळी ठरल्यावेळी न येणं, हा खरा प्रॉब्लेम! पाळी येणं हा प्रॉब्लेम कसा?’ मुलींना मी सांगतो, प्रॉब्लेम शब्द वापरू नका. पाळी आली असं म्हणा. मराठीत बोलणे फारच गावठी वाटत असेल तर एम.सी. म्हणा, मेंन्सेस म्हणा; आणखी इंग्रजी फाडायचं असेल तर चम म्हणा; पण प्रॉब्लेम म्हणू नका. प्रॉब्लेम म्हटल्यावर एका अत्यावश्यक नैसर्गिक शरीरक्रीयेविषयी मनात नकारात्मक भावना नाही का निर्माण होतं? पण हा प्रश्न गैरलागूच म्हणायचा. प्रॉब्लेममुळे नकारात्मक भावना नसून; मुळातल्या नकारात्मक भावनेपोटी हा शब्द वापरला जातो. काहीही असो पण हा शब्द वापरू नये असं मला वाटतं. यामुळे मुळातली नकारात्मकता आणखी गडद होते. त्यावर लोकमान्यतेच्या पसंतीची मोहोर उमटते.
      ह्या मुळातल्या गैरसमजाचे पडसाद इतरही सर्वमान्य शब्दांमध्ये दिसतात. काही कारणाने पाळीचा त्रास झाला तर पिशवी धुतात/साफ करतात. याचा वैद्यकीय अर्थ पिशवीच्या आतलं अस्तर खरवडून काढून टाकतात. हेतू हा की रक्तस्त्राव थांबावा, तपासणीसाठी अस्तराचा तुकडा मिळावा आणि नव्याने तयार होणारे अस्तर एकसाथ, एकसमान तयार व्हावे. पण हे सारे व्यक्त करणारा शब्दच नाहीये. क्युरेटींग हा इंग्रजी शब्द रूढ आहे पण त्यामागचा हा भाव कुणालाच कळत नाही. सर्रास पिशवी धुणे /साफ करणे वगैरे चालू असतं.
एकदा पाळी हा प्रॉब्लेम ठरला की पुढे सगळे ओघानेच येतं. पाळी म्हणजे शरीरात महीनाभर साठलेली घाण बाहेर टाकण्याची एक क्रिया, हे ही मग पटकन पटते. समाजानी पाळी आणि अपावित्र्याचा संबंध जोडला आहे, यात काही आश्चर्य नाही. मलमूत्राच्या वाटेशेजारीच पाळीची वाट आहे. मलमूत्रविसर्जन ही तर निश्चितच उत्सर्जक क्रिया आहे. चक्क शरीरातील घाण वेळोवेळी बाहेर टाकणारी क्रिया. अज्ञानापोटी समाजाने पाळीलाही तेच लेबल लावलं. खरंतर शरीरातील पेशी सातत्याने मरत असतात आणि नव्याने तयार होत असतात. आपली त्वचा झडते, पुन्हा येते, केस झडतात पुन्हा येतात, लाल पेशींचे आयुष्य १२० दिवसांचे असतं; तसंच काहीसं हे आहे. गर्भपिशवीचे अस्तर ठराविक काळ गर्भधारणेला आधार ठरू शकते. मग ते निरुपयोगी ठरतं. बाहेर टाकलं जातं, पाळी येते. पुन्हा नव्यानं अस्तर तयार होतं. (मासिक चक्रं). मुद्दा एव्हढाच की मासिक पाळी ही उत्सर्जक क्रिया नाही. पण कित्येक स्त्रियांना आणि पुरुषांना असं वाटतं की महिनाभराची सगळी घाण गर्भपिशवीत साठते आणि ती महिनाअखेरीस बाहेर टाकली जाते.
अशा बायकांसाठी वेगळी झोपडी, वेगळी जागा, वेगळं अन्न चार दिवस बाहेर बसणं, पूजाअर्चा, देवळात जाणं बंद, पाचव्या दिवशी  अंघोळ करणं, पाळीच्या वेळी धार्मिक कार्यात सहभागी न होणं या सगळ्या रूढी आणि परंपरा याचाच परीपाक आहेत. जात कोणतीही असो, धर्म कोणताही असो याबाबतीत सर्व धर्म भलतेच समान आहेत.  
पाळीच्या या चार दिवस विश्रांतीचं समर्थन करणारीही जनता आहे. ‘तेवढंच त्या बाईला जरा सूख, जराशी विश्रांती...’ वगैरे. म्हणजे एरवी श्वास घ्यायलाही फुरसत नाही एवढा कामाचा रामरगाडा! अपावित्र्यातून निपजलेली ही विश्रांती; आदरभावातून, ऋणभावनेने मिळालेली नाही ही. घराला विटाळ होऊ नये म्हणून ही बाकी घरानी केलेली तडजोड आहे. त्या बाईप्रती आदर, तिच्या कामाप्रती कृतज्ञता, तिच्या घरातील सहभागाचा सन्मान कुठे आहे इथे? नकोच असली विश्रांती. हे बक्षीस नाही, बक्षिसी आहे ही! उपकार केल्यासारखी दिलेली ही बक्षिसी बाईनी नाकारायला हवी.
का होतं, कसं होत वगैरे काहीही जीवशास्त्र माहीत नसताना पाळी हा प्रकार भलताच गोंधळात टाकणारा होता, आदिमानवाला आणि त्याच्या टोळीतल्या स्त्रियांना. महिन्याच्या महिन्याला रक्तस्त्राव होतो, चांद्रमासाप्रमाणेच की हे, निश्चितच दैवी अतिमानवी योजना ही. जखम-बिखम काही नाही, वयात आल्यावर स्त्राव होतो, म्हातारपणी थांबतो, गरोदरपणी थांबतो...! किती प्रश्न, किती गूढ, किती कोडी. पण म्हणून आजही आपण आदिमानवाचीच री ओढायची म्हणजे जरा जास्तच होतंय!
पाळी येण्यामागचं विज्ञान समजलं, पाळीवर परिणाम करणाऱ्या गोळ्याही निघाल्या. पण आपण याचा उपयोग सजगपणे करणार नाही. आपण या गोळ्या आपल्या शरीराबद्दलच्या, पाळीच्या अपावित्र्याच्या पारंपारिक कल्पना दृढ करण्यासाठी वापरणार! वा रे आपली प्रगती! वा रे आपली वैज्ञानिक दृष्टी!
पण समाजानं जरी अपावित्र्य चिकटंवलं असलं तरी ते तसंच चालू ठेवलं पाहिजे असं थोडंच आहे? निसर्गधर्मानुसार आलेली पाळी चालत नाही आणि औषध घेऊन पुढे गेलेली चालते, हे ठरवलं कोणी? ही बंधनं विचारपूर्वक नाकारायला नकोत? ‘देहीचा विटाळ देहीच जन्मला; सोवळा तो झाला कवण धर्म? विटाळा वाचून उत्पतीचे स्थान, कोण देह निर्माण, नाही जगी’ असं संत सोयराबाईनी विचारलं आहे.

      हे असलं काही बोललं की प्रतिपक्षाची दोन उत्तरं असतात. एक, पुरुषप्रधानतेमुळे बायकांचे मेंदू पुरुषांच्याच ताब्यात असतात; आणि दुसरं समजा घेतल्या गोळ्या आणि ढकलली पाळी पुढे तर बिघडलं कुठं?
पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं की ही समाजरचना अमान्य करण्याचे पहिलं पाऊल म्हणून या गोष्टीकडे बघा. गोष्ट साधीशीच आहे. ठामपणे सांगीतल तर पटणारी आहे. स्वतःला पटली असेल तर ठामपणे सांगता येतेच पण मुळात स्वतःचीच भूमिका गुळमुळीत असेल तर प्रश्नच मिटला.
‘घेतल्या गोळ्या तर बिघडतं काय?’ या प्रश्नाचं उत्तर असं की, म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो! आई करते म्हणून थोरली  करते आणि ताई करते म्हणून धाकटी! डोकं चालवायचंच नाही असं नकळत आणि आपोआप होत जातं
हे सारं कुठेतरी थांबायला हवं. स्वताःच्या आणि परस्परांच्या शरीराकडे निरामय दृष्टीने स्त्री-पुरुषांना पहाता यायला हवं. कुणीतरी कुठूनतरी सुरुवात करायला हवी.
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.
जि. सातारा.
पिन ४१२ ८०३
मो.क्र.९८२२०१०३४९

               



3 comments: