Friday, 17 May 2019

सिम्स लेकाचा


सिम्स लेकाचा
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

‘तो सिम्स दे मला!’ दिवसातून दहा वेळा माझी मागणी असते. सिम्स व्हजायनल स्पेक्युलम हे एका हत्याराचे नाव. बोली भाषेत नुसतेच सिम्स. हत्यार हा सुद्धा शब्द चुकीचा आहे. ह्याला काही धारबीर नसते. उपकरण म्हटलेलंच बरं.  बायकांच्या तपासणीला हे अति उपयोगी. त्यामुळे सतत वापरात असलेले. अगदी सलामीलाच ह्याची ओळखदेख होते. सिम्स म्हणजे फार काही भारी चीज आहे असं समजू नका. अगदीच साधी गोष्ट आहे ही. आतून तपासायचे तर योनीमार्ग फाकवून धरायला हवा. मग डॉ. सिम्स यांनी, चक्क योग्य त्या आकाराचा डाव, हो हो आमटी वाढून घेतात तो डाव, त्याचे हँण्डल वाकवून वापरायला सुरवात केली. त्याचीच सुधारित आवृत्ती म्हणजे आजचा सिम्स. किती साधीशी गोष्ट. पण त्यानी केली आणि त्यांचे नाव चिकटलं त्याला. जर कोणा कुलकर्ण्यानी हा शोध लावला असता तर, ‘ए, हा नको.  तो मोठ्या साईजचा कुलकर्णी दे मला!’ असं काहीतरी म्हणालो असतोच की सगळे.
सिम्सशिवाय आम्हा गायनॅकॉलॉजीस्टचं पान हलत नाही. पंक्चरवाल्याचा जसा पाना, न्हाव्याची जशी कात्री, तसा आमचा सिम्स. तर ह्याचा कर्ता, जे मारीऑट सिम्स. स्मार्ट होता. उंचापुरा, गरुड नाक, अगदी देखणा. स्त्रीरोगशास्त्राचा पिता म्हणून गौरवलेला हा अमेरिकन डॉक्टर. तिथेच दक्षिणेत अलाबामात प्रॅक्टिस करायचा. अमेरिकेत आणि दक्षिणेत म्हणजे नेमकं काय हे लक्षात आलं का तुमच्या?   जगत्जेत्या अमेरिकेचा हा दक्षिण भाग यादवी युद्धापूर्वी कुख्यात होता तो तिथल्या वर्णभेदासाठी आणि गुलामीसाठी.
गायनॅकॉलॉजीच्या ह्या फादरने अनेक छोटे मोठे शोध लावले. बायांना पुरुष डॉक्टरांसमोर तंगड्या फाकवून झोपवले जायचे, अगदीच संकोचवाणं सगळं. सिम्सनी हे बदललं. कुशीवर वळलेल्या अवस्थेत पेशंट तपासायला सुरवात केली. ह्याला आता म्हणतातच मुळी ‘सिम्स पोझीशन’. पण तो विख्यात झाला तो त्याच्या नावे असणाऱ्या ऑपरेशनमुळे.
‘व्ह्सायको-व्हजायनल फिश्चुला’साठीचे ऑपरेशन त्यांनी पहिल्यांदा यशस्वीपणे केले. त्या काळी बऱ्याच बायकांची बाळंतपणे अडत. बाळाचे डोके आईच्या जननमार्गात इतके घट्ट आवळून बसे की बाहेर येणे महामुश्कील. तासंतास प्रयत्न करून शेवटी ते मूल बाहेर येई. तोपर्यंत ते बहुदा मेलेलेच असे. वेळेत न जन्मल्यास ती बाईही मरे. यातून जर जगलीवाचलीच तर एक भयंकर जिणे तिच्या वाट्याला येई. व्ह्सायको-व्हजायनल फिश्चुला नावाचा जीव न घेणारा, पण जिणे हराम करणारा आजार, तिच्या नशिबी येई. व्हायचे असे की, बऱ्याच वेळ बाळाचे डोके अडकून राहिल्यामुळे योनीमार्गाच्या  आणि मूत्रमार्गाच्या, चिमटलेल्या भागाचा रक्तपुरवठा बंद व्हायचा. मग हा भाग चक्क मरून, गळून जायचा. मग लघवीची पिशवी आणि योनीमार्ग असा बोगदा तयार व्हायचा. आता लघवीच्या जागेतून लघवी होण्याऐवजी, योनीमार्गातून लघवी सतत थेंब थेंब गळायला लागायची. सतत लघवी, सतत कपडे ओले, सतत घाण, उग्र दर्प, सतत ओल्या राहून राहून  मांड्या सोलपटलेल्या; सतत, सतत, सतत त्रास. जिवंतपणीचे मरणच की हे. ही स्त्री म्हणजे शब्दश: नरकाचे द्वार. हिला मग आयुष्यभर चार लोकापासून लांबच रहावं लागायचं. कारण जरा लोकांत गेली की लोकांचे हात नाकाला. कौटुंबिक, सामाजिक, लैंगिक आयुष्यातून उठणार ती बाई. अशी बाई गुलाम म्हणून सुद्धा नकोशी. बरं, हा आजार असा विचित्र की एवढेच होणार. ह्याहून जास्त नाही आणि कमी नाही. यापेक्षा बळावत जाणारा आजार बरा. त्यातून मरणाने का होईना, पण लवकरच सुटका होते. मरणासन्न आजाऱ्याला सहानुभूती मिळते. इथे, ह्या आजारानी मरणबिरण काही येत नाही. त्यामुळे इतर कोणत्यातरी कारणांनी मरण येईपर्यंत हे देहीचे भोग भोगायचे. अशा बायकांसाठी सिम्सनी ऑपरेशन शोधलं. डॉक्टर प्रकार प्रकार करत होते पण ह्यानी त्या सगळ्याला एक सुसूत्र स्वरूप दिलं. ह्यानी प्रथमच चांदीची तार वापरून टाके घातले. ही युक्ती बरीच फलदायी ठरली. त्याचं नाव सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवलं गेलं.
अडचणीच्या जागेतला हा आजार तपासायचा कसा इथून अडचणी होत्या. एकदा झालं असं की, एक गोरी बाई घोड्यावरून पडली आणि तिला अवघड जागी मार लागला. तिला इतकं दुखत  होतं की ती नीट झोपूच शकत नव्हती. रांगल्यासारख्या अवस्थेत तिला तपासता आलं फक्त. ह्या अवस्थेत वाकवलेला डाव त्यानी योनी मार्गात सरकवला. आत हवा गेल्यामुळे पूर्ण मार्ग आता स्पष्ट दिसू लागला.  फिश्चुलाला दुरुस्त करायला ही युक्ती उपयुक्त ठरेल हे त्याच्या लक्षात आलं. आता  फिश्चुलाला नीट दिसू लागला, त्याचा अभ्यास शक्य झाला, मोजमाप शक्य झाले.
मग त्यानी आसपासच्या गुलामांच्या मालकांना कल्पना दिली. ‘तुम्ही फिस्तच्युलावाल्या गुलाम बायकांना आणून सोडा, कपडे, पैसे, टॅक्सचं बघा (गुलामांवर रीतसर सरकारी कर होता); रहाणे खाणे आणि उपचार माझ्यातर्फे’, अशी ऑफर होती. अशा डझनभर बायका त्यानी भाड्याने घेतल्या, त्यांच्यावर डझनावारी ऑपरेशने केली (१८४९ ते १८४६) आणि शेवटी योग्य उपचार पद्धती सिद्ध केली. काळ्या, गुलाम बायकांवर असे प्रयोग करण्यात त्याला काही वावगं वाटलं नाही. चार शिकलीसवरली, कर्तीधर्ती माणसं हेच तर करत होती. त्या गुलाम बायकांना नावेही त्यांनीच दिली. आपण पाळीव प्राण्यांना नाही का नावे देत, तशी. चारचौघीसारखी नावं. ल्युसी, बेट्सी आणि अनार्का.
सिम्सला वाटत होतं की फार तर सहा महिन्याचा प्रश्न. एवढ्या वेळात आपल्याला नीट ऑपरेशन करायची पद्धत सापडेल पण प्रत्यक्षात यशापयशाचा खेळ तीन वर्ष चालू होता. त्याच्या मेहुण्याने, ‘भावजी आता पुरे जरा बायकामुलांकडेही बघा.’ असा सल्लाही दिला म्हणे. पण वेळोवेळी ऑपरेशन सुरूच राहिली. एक अपयशी झाले की दुसरे, त्यातून ती बाई उठते न उठते तोच त्यातल्या त्रुटी दूर करायला तिसरे. या, ओणव्या व्हा, पाय बांधून, मांड्या फाकवून, ऑपरेशन करून घ्या! भूलबील भानगड नाही. बेट्सी, ल्युसी, अनार्का आणि कित्येक अनामिका. अर्थात सगळ्या काळ्या, सगळ्या गुलाम. बेट्सी आणि ल्युसी बऱ्या झाल्याचा स्पष्ट उल्लेख त्याच्या लिखाणात आहे. त्याच्या यशाचा डंका आता अॅटलांटिक पार वाजू लागला. फ्रांन्सची सम्राज्ञी युजीनिया ही देखील याची पेशंट. तिलाही हाच प्रॉब्लेम. तिलाही रोगमुक्त केलं सिम्सनी. बघता बघता तो न्यूयॉर्क मधील बडा डॉक्टर ठरला.
पण तो तेंव्हा. इतिहास झाला आता त्याला. नव्या इतिहासानुसार आता सिम्स खलपुरूष ठरला आहे. गुलाम, हतबल स्त्रियांचा त्यानी गिनीपिग म्हणून  वापर केला. भूलीचं तंत्र हाताशी आलं होतं. पण ह्या सगळ्या बायकांवर त्यांनी भूल न देता अनेकवार शस्त्रक्रिया केल्या. त्यांची संमती वगैरे कशाचीही त्यांनी पर्वा केली नाही. सिम्सनी केलेल्या या भयंकर पापाचे माप त्याच्या पदरात टाकण्याचा काळ आता उगवला आहे. कोणे एके काळी गोऱ्यांचं वर्चस्व होतं. हे वर्णवर्चस्व सर्वव्यापी होतं. हे गोरेच तर इतिहास घडवणार आणि मग तो लिहिणार. यांनी ह्या सिम्सला लेकाच्याला फारच चढवून ठेवलाय. चला तर त्यांचा आणि सिम्सचा माज उतरवू या. ह्या शस्त्रक्रियेच्या शोधात  योगदान असेल, तर ते त्या मूकपणे सारं काही सहन करणाऱ्या, कृष्णवर्णीय, गुलाम, बायकांचं आहे. सिम्स लेकाचा नुसताच बांडगुळ!! 
सिम्सचे जे काही योगदान होते ते मातीमोल ठरवत, त्याला स्त्रीद्वेष्टा, वर्णभेदी वगैरे शिव्या घालत, वाजत गाजत एकेक निबंध, प्रबंध, प्रकाशित होऊ लागला आहे. न्यूयॉर्कला १८५५ साली त्यानी खास महिलांसाठी इस्पितळ उभारलं. न्यूयॉर्कला त्याचा पुतळा होता, सेन्ट्रल पार्कमधे, बरोब्बर न्यूयॅार्क अकॅडेमी ऑफ मेडिसीन समोर. आता तो तिथे नाही. तो  नुकताच अनमानपूर्वक हटवला गेला आहे!
 सिम्सनी जे केलं ते चूक की बरोबर? आजच्या मूल्यविवेकाचा गॉगल घालून इतिहास वाचणे योग्य की अयोग्य? सिम्स डॉक्टर होता, चार बायकांना बरं वाटावं म्हणून त्या काळी जे काही मान्य होतं ते त्यांनी केलं. ते चूक होतं, ही तर आजची समज. गुलामांचा असा वापर चूकच.  त्यांच्यावतीनी  मालकांनी संमती देणे, हेही चूक. पण त्याकाळी  गुलामांना  होकार-नकाराचा अधिकारच नव्हता. हा तर त्यांच्या मालकांचा अधिकार. मालकांनी संमती दिलीच होती. उलट मालकच अशा निरुपयोगी बायांना घेऊन येत. असले सतत आजारी गुलाम त्यांना परवडत नसत. गुलाम झाले तरी ते धडकेच हवेत की. तेंव्हा गुलाम स्त्रियांना अधिकाधिक त्रास व्हावा म्हणून काही त्यांचे मालक किंवा सिम्स निश्चितच प्रयत्न करत नव्हते. शिवाय गुलाम काळे, हे अधिक सहनशील असतात असाच समज होता. तसा तो सिम्सचाही होता.  पण मुळात गुलामगिरी हीही चूक. म्हणजे सिम्सनी लेकाच्यानी लढायचे तरी किती आणि कुठे कुठे?
त्यानी केवळ एवढीच चूक केली असं नाही. कालानुरूप उपचार करता करता सिम्सनी लाख चुका केल्या असतील. आज आपण ज्यांना चुका म्हणतो ते सिम्सकाळी बरोबरच समजलं जायचं. कित्येक हिस्टेरियाच्या बायकांच्या त्यानी स्त्रीबीजग्रंथी काढल्या होत्या. हा उपाय निरुपयोगी  तर आहेच पण उपद्रवीही आहे. हे त्या वेळी कोणालाच माहित नव्हते. सगळे हाच उपाय योजायचे. त्यानेही योजला. कित्येक गोऱ्या बायकांसाठीही योजला. आपण जे करतोय ते योग्यच आहे असं त्याला प्रमाणिकपणे वाटत होतं. त्यामुळे देवही नाही आणि दानवही नाही, त्याच्याकडे मानव म्हणून पहाता येईल का आपल्याला?
आज सिम्सचं वर्तन जोखणे जसं  अवघड तसे त्या आजारांनी माजवलेले तांडव मोजणेही अवघड. फिश्चुलालावाल्या बायकांचे हाल ज्यांना बघून तर सोडाच, ऐकूनही माहित नाहीत त्यांना सिम्सच्या ऑपरेशनचं महत्व ते काय कळणार? त्याचे त्या बायकांवर कसे अनंत उपकार आहेत हे काय आकळणार? आजही जगाच्या काही भागात फिश्चुला आहे. त्यावर ऑपरेशन हाच उपाय आहे. ती केलीही जातात आणि अशा स्त्रियांना फिश्चुलामुक्तीही मिळते. अशा बायकांच्या डोळ्यात काळा-गोरा डॉक्टर असा भेदाभेद नसतो. त्यांच्या डोळ्यात त्या डॉक्टरप्रति असते फक्त कृतज्ञता. प्रश्न निव्वळ एक अनाहूत भोक बुजवण्याचा नसतो, प्रश्न त्या स्त्रीला पुन्हा समाजात सन्मान मिळवून देण्याचा असतो. समाजातच  का? प्रश्न तर आत्मसन्मान बहाल करण्याचा असतो.
आजच्या तुलनेत त्या काळची सर्जरी म्हणजे कसाईकामच होतं. सर्जनला सिंहाची छाती हवी असं म्हटलं जायचं, म्हणजे सर्जरी किती हिंसक असेल कल्पना करा. अशा काळातला सिम्स हा उत्तम शल्यविशारद होता. धाडसी पण संयत. पण फिश्चुलाचे काय करायचे हे त्याला तरी कुठे माहित होते? मुळात ह्या आजारावर उपचारच नव्हता. त्यामुळे गोऱ्यांनी काळ्यांवर, गोऱ्यांवर, कुणीही कुणावरही केला तरी तो प्रयोगच होता. काही टोकाचे टीकाकार हेही मान्य करायला तयार नाहीत. त्यांच्या मते त्याच्या कौशल्याइतकेच श्रेय गुलामीच्या प्रथेलाही जाते. नसतीच जर गुलामी, तर असे प्रच्छन्न प्रयोग तो करूच शकला नसता. मग कसले ऑपरेशन, कसली फिश्चुलामुक्ती आणि कसली प्रसिद्धी? मग ह्याच न्यायानी अब्राहम लिंकनचे महात्म्यही गुलामगिरीमुळेच की. नसती जर गुलामगिरी, तर कसली वर्ण समानता, कसली यादवी आणि कसला लिंकन?
लोक म्हणतात अनार्कावर सोळा वेळा ऑपरेशन केलं त्यानी, सोळा वेळा! काय हे!! किती क्रूर!!! पण जे ऑपरेशन कसे करावे, कधी करावे, काहीच जर ज्ञात नव्हते, तर ऑपरेशन करणारा तरी दुसरे काय करणार?  पेशंटच्या जीवावर बेतणार नाही अशी काळजी घेत घेत, चाचपडत चाचपडत, तो ऑपरेशन करून बघत  होता. सोळा वेळा एखादी बाई ह्याला सामोरी जाते ते ती निव्वळ गुलाम होती म्हणून असे कसे समजावे बरे? तिचे रोजचे आयुष्य ऑपरेशनपेक्षाही कष्टप्रद होते, भयप्रद होते, अशा  संशयाला जागाच नाही का? अनार्कासकट  कित्येक पेशंट बायकाच त्याला अॅसिस्ट करायच्या. ‘पुढचे ऑपरेशन आता माझे करा हं सर’, म्हणून मागे लागायच्या. अॅसिस्ट केल्यामुळे कुठे काय बिनसतंय हे त्यांना नेमकं कळायचं. चक्क सूचनाही करत होत्या त्या. त्यामुळेच की काय त्या पुनःपुन्हा ऑपरेशन करायला तयार होत होत्या. ज्याअर्थी अनार्का सिम्स सोबत राहिली, त्याअर्थी तिला आगीतून फुफाट्यात तर लोटलं नव्हतं त्यानी. ज्याअर्थी ती मदतनीस म्हणून काम करत होती त्याअर्थी निदान इतरांना दर्प येऊ नये इतपत सुधारणा तर तिच्यात झाली होती. संशयाचा इतपत फायदा तरी सिम्सला द्यायला काय हरकत आहे?
व्हेल्प्यू ह्या फ्रेंच सर्जनने वारंवार फेल जाणारी ऑपरेशने, त्यामुळे वारंवार परतणाऱ्या त्रासलेल्या स्त्रिया आणि वैतागलेले हतबुद्ध डॉक्टर यांचे सुरेख वर्णन करून ठेवले आहे. यातना फक्त पेशंटच भोगत होत्या असं नाहीये. अपयशाचा वैताग डॉक्टरही भोगत होतेच की. त्रास बरा करणे तर सोडाच पण तो कमी करणेही डॉक्टरच्या आवाक्याबाहेरचे होते. प्रयोग, भूल आणि वर्णद्वेष लक्षात घेऊनही, सिम्सनी पहिल्यांदाच हा आजार बरा करून दाखवला, हे निखालस सत्य आहे.
सिम्सनी काही एवढेच केलं असं नाही. सिम्सनी घडवलेली इंस्ट्रुमेंट आज वैद्यकीय संग्रहालयात दिसतील; मात्र त्यांचे आधुनिक अवतार आजही वापरात आहेत. कृत्रिम रेतन, कँन्सर संसर्गजन्य नाही ही समज, पोटाला मार लागल्यावर करायचे पद्धतशीर ऑपरेशन, पित्ताशयाचे ऑपरेशन, अशा अनेक गोष्टी केल्या त्यांनी. अर्थात सगळ्यात उपयोगी आणि म्हणून सगळ्यात गाजलेले ऑपरेशन फिश्चुलाचे.  ह्या इतर प्रकारातही त्याने काही ना काही प्रयोग केलेच की. ती माणसेही गिनीपिगच होती. ती काळी होती, तशी गोरीही होती. पेशंटची संमती, मानवतावाद, मानवी हक्क वगैरे कल्पनाच त्या युगात नव्हत्या  तर त्या सिम्सच्या लेकाच्याच्या डोक्यात कुठून येणार?
भुलीचा पहिला जाहीर प्रयोग झाला, न्यूयॉर्कमध्ये, १६ ऑक्टोबर १८४६ रोजी. त्याआधीच वर्षभर सिम्सचे प्रयोग सुरु होते. मग तो भूल कुठून वापरणार? आज भूल म्हटल्यावर जी सुरक्षितता, जी सुलभता आणि जी सहजता आपल्या डोळ्यासमोर येते ती अर्थातच त्या काळी नव्हती. ऑपरेशनसारखाच भूल हा प्रकारही भयावह होता. भुलीचा भुलैय्या अजून उलगडायचा होता. त्यामुळे डॉक्टर बिचकत होते. भुलीचे तंत्र जरी अवतरले होते तरी ते सार्वत्रिक नव्हते. भुलीशिवाय ऑपरेशन उरकण्याकडे कल होता. अॅनेस्थेशियाचा शोध लावणाऱ्या सर जेम्स यंग सिम्सन यांनीच फिस्तच्युलासाठी अॅनेस्थेशियाची (क्लोरोफोर्म) गरज वाटत नाही, या ऑपरेशनमध्ये अॅनेस्थेशिया देण्याइतक्या वेदना होत नाहीत, असं नमूद करून ठेवले आहे. हे ही सिम्सनी आपले प्रयोग केले, त्यानंतर दहा वर्षांनी. म्हणजे इतक्या वर्षांच्या वापरानंतरही सर्रास वापर हा रिवाज नव्हताच. त्यामुळे जरी सिम्सनी लेकाच्यानी अॅनेस्थेशिया वापरला असता, तरी तोही एक प्रयोगच ठरला असता की. शिवाय न्यूयॉर्क ते अलाबामा हे अंतर १८४६ साली आजच्यापेक्षा कितीतरी जास्त होते! मग त्या बिच्चाऱ्या सिम्सला धरून धोपटण्यात काय हंशील?
पण हे झालं सिम्सच्या समर्थकांचे आणि विरोधकांचे मत. त्या बायकांना नेमकं काय वाटत होतं याचा मागमूसच नाहीये. गुलामांना मत असण्याचा प्रश्नच नव्हता. निरक्षर, गुलाम, काळ्या बाया त्या, त्यांनी काही लिहिलेले नाही. कोणाला काही सांगितलं असलं तर ते आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाही. कदाचित त्यांनी जात्यावरच्या ओव्यांतून, भोंडल्याच्या गाण्यांतून आपल्या व्यथावेदना किंवा कृतज्ञभावना मांडल्याही असतील. पण इतिहासाच्या गर्तेत खोल खोल कुठेतरी त्यांच्या दुःखाचे उसासे आणि सुटकेचे निश्वास कायमचे गाडले गेले आहेत. आता आपण इतिहासकारांचे आवाज तेवढे ऐकतोय. गुलामांच्या मूक कहाण्या इतिहासकारांची वाणी बोलत आहेत. काही सिम्सच्या बाजूनी तर काही सिम्सच्या विरोधी.
बऱ्याच गदारोळानंतर न्यूयॉर्क अडेमी ऑफ मेडिसीन समोरचा सिम्सचा पुतळा आता हटवण्यात आला आहे. यानेही सर्वांचे समाधान झालेले नाही. तो पुतळा आता सिम्सच्या थडग्यात गाडून टाका अशी नवी मागणी आहे.  काळ्यांचा कर्दनकाळ सिम्स, हा आमचा हिरो नाही. त्याच्या जागी डॉ. रिबेका ली क्रम्पलर (पहिली कृष्णवर्णीय महिला डॉक्टर) किंवा डॉ. हेलेन रोद्रीग्स त्रिअस (स्त्रीचळवळतील कार्यकर्ती, लॅटिन अमेरिकन डॉक्टर) यांचे पुतळे उभारावेत अशीही मागणी आहे. म्हणजे प्रश्न निव्वळ कृष्णवर्णीयांच्या सन्मानाचा नाहीये. सिम्सला हटवून, त्याच जागी नवे स्मारक उभारण्याचा आहे. अमुक एक गोष्टवहीं बनायेंगेम्हटलं की सगळी सुसंगती कशी हादरते बघा.
शोषित, वंचित, पिडीत जनता जेंव्हा आपला हक्क मागते, तेंव्हा उत्साहाच्या भरात; शोषक, वंचक आणि पीडकाना धडा शिकवण्याच्या नादात; स्वतःच तर तसे वागत नाहीत ना? निव्वळ बदल एवढ्यावर मागण्या थांबत नाहीत त्यात ‘बदला’ ही भावनाही असते का? ‘मानव सारा एक’, ही आजची शिकवण सिम्सच्या वागणुकीत नव्हती,  हा त्याचा दोष, की हा काळाचा महिमा? ज्या त्या इतिहास पुरुषाने आजच्या लढाया, आपापल्या काळी लढायलाच हव्या होत्या का? जित्ता असताना सोयीचा ठरलेला त्याचा गोरा रंग आता मेल्यावर इतक्या वर्षांनी गैरसोयीचा ठरतोय का? नव्या, ‘उलट्या वर्णद्वेषात’ सिम्स भरडला जातोय का? मानवी हक्क, लिंगसमानता, वर्णसमानता ह्याच्या कल्पनासुद्धा प्रवाही असतात. तेंव्हा सिम्सला पापाची शिक्षा देणारे आजचे, हे कदाचित उद्याचे पापी ठरतीलही...! त्याच्या काळी गुलामी, लिंगभेद आणि वर्णभेद हेच जर शिष्टसंमत होते तर सिम्सचं नेमकं पाप किती? आणि त्याची शिक्षा त्याच्या पुतळ्यानी किती आणि कशी भोगायची? पुतळे काय जगभर उभे केले जातात आणि पाडले जातात. त्या निर्जीव पुतळ्यांना काहीच फरक पडत नाही. पण ‘हटाव’ आणि ‘बचाव’ वाल्यांना पडतो.
कदाचित सिम्सला गायनॅकॉलॉजीचा पिता म्हणण्याऐवजी त्या तिघी आणि इतर अनेक  अनाम बायकांना गायनॅकॉलॉजीच्या माता म्हणायला हवं. ह्याचा पुतळा हटवला खरं, पण कदाचित तो न हटवता, त्याच्याशेजारी त्या तिघींचे आणि इतर अनामिकांचे उभे केले असते तर त्यांनी एकमेकांकडे बघून घेतलं असतं, नाही का?