Sunday 1 May 2016

कुलिओ आठवतो आजही

कुलिओ आठवतो आजही.

डॉ.शंतनू अभ्यंकर,वाई. जि. सातारा. पिन. क्र. ४१२ ८०३.


कुलिओ आठवतो आजही. काही अवघड प्रश्नांची सोपी उत्तरं त्यानी पुन्हा अवघड केली माझ्यासाठी. म्हणून कायमच लक्षात राहील तो.

वाई-मुंबई-पॅरीस-लिमा असा तीस तासांचा प्रवास करून आलो, तर आल्याआल्याच ह्या गचाळ माणसाशी गाठ पडली. उंचीला बुटका, रंगाला पिवळट विटका, बारीक  बारीक डोळे, बोकड दाढी आणि खडूसारखी पांढरी बत्तीशी. विमानतळाबाहेर पार्किंग लॉटमधे त्यानी आमचं स्वागत केलं. ढगळ जीन्स, भडक टी शर्ट, चित्र विचित्र चित्राचं जॅकेट, कमरेला पाउच, पाठीवर सॅक, आणि भलामोठा सप्तरंगी बिल्ला लावलेली वेताची हॅट. हॅट उचलून त्यानी आमचं स्वागत केलं, तर नजरेत भरला त्याच्या डोक्यावरचा, टाळूपासून मानेपर्यंतचा निव्वळ मधोमध उभा असलेला, केसांचा लाल भडक रंगवलेला पुंजका. हे ध्यान पुढे तीन आठवडे आमचं गाईड असणार होतं. खिशातून कसलीशी पानं काढत त्यानी ती आमच्या हातात दिली. म्हणाला “इत ठिस लीफ, इत ठिस लीफ. इस कोकेन. इन पेरू, कोकेन लीगल. इत.” मढ्याच्या तोंडात तुळशीपत्र असावं तशी आम्ही ती पानं त्याच्या आग्रहाखातर तोंडात धरली. पण पुढे काहीच केलं नाही. त्यानीच मग मुठभर पानं घेऊन, हातात चुरून, त्याचा तोबरा भरून, आम्हाला डेमो दाखवला. अर्ध्या पृथ्वीला प्रदक्षिणा घातल्यावर आम्हाला चहाची तहान लागली होती. ती कोकेनवर भागणार नव्हती. आम्ही चहाची टपरी शोधू लागलो. शेवटी कॉफीची दिसली. “ओन्ली कॉफी, नो कोकेन” असं त्याला बजावत आम्ही तिकडे वळलो.

आम्ही कॉफी घेईपर्यंत, आम्हा पंधरा जणांचं सामान ट्रॉलीवरून बसमध्ये चढवता चढवता कडवटपणे तो पुटपुटला, ‘आमचं सोनं, चांदी नेताना ओझं नाही झालं तुम्हाला?’ मी अवाक झालो. मी किंवा माझे बापजादे याआधी कधी इकडे फिरकलो नव्हतो. सोनं चांदी लुटणं दूरच. ते लुटलं स्पॅनिशांनी, हा बोल लावत होता आम्हाला. सगळेच परदेशी लोक याला चोर लुटारू वाटत होते.

दस्तुरखुद्द पोप महाशयही नेमके ह्याच दिवशी, ह्याच वेळी, पेरूच्या दौऱ्यावर आलेले. त्यांच्या गाड्यांचा ताफा बाहेर पडत होता.  पोप-दर्शना आसुसलेल्या माणसांचा सागर तिथे उसळला होता. त्याच्या लाटा थांबवण्याचा पोलिसी प्रयत्न चालू होता. पोपसाहेबांची मिरवणूक आता पार्किंगलॉटच्या पलीकडच्या रस्त्यांनी जात होती. आम्ही भारतीय मात्र, पोप आणि माती आम्हा समान हे चित्ती, अशा भावनेनी शांतपणे कॉफी घुटकत उभे होतो. लांबवरच्या त्या जनसागराकडे, आणि पोपच्या पांढऱ्या तांबूस आकृतीकडे पहात कुलिओनी तोंडातला कोकेनचा तोबरा काढला, कचऱ्यात भिरकावला, बोटाचा आकडा करून लाळ पुसली आणि पोपच्या दिशेला एक जबरदस्त हिणकस शिवी हासडली. त्याचे बोली आम्हाला अपरिचित असली, तरी देहबोली परिचयाचीच होती. त्यामुळे तो जे काही बोलला, त्याला माफ करणं साक्षात पोपना सुद्धा जड जाईल एवढं आम्हाला समजलं.  पण एका कॅथॉलिक देशात हा जहरी पोपद्वेष का हे उमगलं नाही.

वर आमच्याकडे वळून प्रसन्नपणे हसून म्हणतो कसा, “क्मोन, वेलकम, गेट इन ड बस. यु ऑल लुक शाहरुख खान!! ऑल लेडीज करीना कपूर!!!” बॉलीवूडची ही पहुंच पाहून आमची कळी खुलली, मिजास वाढली.

म्हटलं तर कुलिओ एक गाईड. आमच्या बरोवर अॅमॅझॉनच्या जंगलातून, कुस्कोच्या बाजारातून, लिमाच्या झगमगाटातून, अॅण्डीजच्या शिखरांवरून, माचू पिचुच्या अवशेषांवरून फिरलेला. ओलाय्ताम्बो, उरीबाम्बो असली गोलमटोल नावं, सहज घेणारा. इंकांच्या वस्तीत जंगलातच लहानाचा मोठा झालेला. पुढे आपल्या काकाचं बोट धरून ह्या व्यवसायात उतरलेला, इतिहास आणि जीवशास्त्रात डिग्री होती त्याची. पुढे प्रयत्नपूर्वक इंग्रजी शिकला, आमच्याकडून अजून इंग्रजी शिकण्यासाठी आसुसलेला होता तो. पण टूरीस्ट सर्कीटचे वेढे घालता घालता याचाही प्रवास चालू होता, वेगळ्याच दिशेनी. त्याला कट्टर इंका व्हायचं होतं.

त्याच्या  हॅटवरच्या त्या रंगीबेरंगी बिल्याबद्दल मला उत्सुकता फार. शेवटी काही इमारतींवरही तसलाच झेंडा पाहून मला राहवेना. मी त्याला छेडलंच. रंगीबेरंगी पट्ट्यापट्ट्यांचा झेंडा हा ‘गे प्राईड परेड’मध्ये बघितला होता मी. आम्ही समलिंगी, विरुद्धलिंगी, उभयलिंगी, स्त्रैण, हिजडे... आमचे लैंगिक आचारही नैसर्गिकच आहेत. मानव जमात म्हणजे या विविधांगी लैंगिक व्यवहारांनी साकारलेलं सप्तरंगी इंद्रधनुष्य आहे. ह्यासाठी हा सप्तरंगी झेंडा.  कुलिओकडे तसाच बिल्ला पाहून मला वेगळीच शंका आली. मी छेडताच कुलिओ खवळलाच. म्हणाला, ‘हा इंकांचा झेंडा आहे आणि याचा अपमान सहन केला जाणार नाही!’ मी सॉरी सॉरी म्हणत माझा प्रश्न निव्वळ उत्सुकतेपोटी होता हे त्याला पटवून दिलं. त्याची कळी खुलली. त्यानी पुढे खुलासा केला, ‘इंद्रधनुष्य ही इंकांची एक देवता आहे आणि त्याचेच रंग ह्या झेंड्यावर आहेत. हा झेंडा निवडल्यावर गे चळवळीचा झेंडा इंकांनी निवडला म्हणून भरपूर चेष्टा झाली, कुचेष्टा झाली. पण शेवटी श्रेष्ठतम अशा इंकानी असं दाखवून दिलं की, इंद्रधनुष्य अनादी कालापासून आहे आणि ‘गे’ चळवळ नवीन! तेव्हा ह्या रंगांवर ‘गें’पेक्षा इंकांचा जास्त हक्क आहे. त्या मुळे हाच झेंडा मुक्रर झाला.’ कुलिओ शुद्ध इंका वंशाचा होता (म्हणे) आणि त्याचा त्याला दुर्दम्य दुराभिमान होता. ही त्याची फक्त झलक होती.

पुढे त्याच्याशी घसट वाढली आणि त्याचे वेगवेगळे पैलू समोर येऊ लागले. त्याला सगळंच येत होतं. जंगलातच लहानाचा मोठा झाल्यामुळे झाडे, वेली, पशू, पाखरे यांच्याशी दोस्ती होतीच. शिकार साधत होती. एका झाडाचा काटा घ्यायचा, त्याला दुसऱ्या एका झाडाचा विषारी रस लावायचा आणि बांबूच्या नळीतून तो काटा जोरात फुंकून उडवायचा. समोरच्या प्राण्याला तो काटा लागला की काही वेळात तो प्राणी निश्चेष्ट पडलाच म्हणून समजा. हे सगळं त्यानी करून दाखवलं. पुढे टाळ्यांच्या आणि  काजोनच्या तालावर बेभान क्रिओल नृत्य करून झालं; चारांगोच्या तारांवर धीरगंभीर सूर छेडून झाले आणि उडत्या चालीची गाणीही तारसप्तकात म्हणून झाली. कुलीओचे हुन्नर किती म्हणून सांगावेत...फोटोग्राफी, पत्याच्या जादू, तट्ट्याच्या टोप्या, डायव्हिंग, ड्रायव्हिंग, स्वयपाक, हमाली....!

एके ठिकाणी बोटीत सामान चढवायचं होतं. चार दिवसापूर्वी आम्ही आलो तेव्हा नदी दुथडी भरून वहात होती. तुफान पाऊस होता. पण आता पाऊस थांबला होता आणि नदी पार रोडावली होती. त्यामुळे बोटीपर्यंत समान वाहून नेणं हे एक दिव्यच होतं. कुलिओनी शर्ट काढला, कमरेला बांधला. एक जाडजूड चादर खांद्याभोवती घेऊन त्याच्या झोळीत त्यानी दोन महाकाय बॅगा घातल्या. विमान प्रवासाच्या त्या बॅगा, चांगल्या मोठ्या होत्या. त्या बॅगांपुढे कुलिओ आता इवलासा दिसू लागला. पण बोटीकडे कूच करण्याआधी त्यानी बोटानी मला खुणावलं आणि आणखी एक बॅग डोक्यावर द्यायला लावली. हे ओझं घेऊन काट्याकुट्यातून नदी किनारी, आणि तिथून पुढे चिखल आणि दगडगोटे तुडवत अर्धा एक किलोमीटरची चाल होती. झपझप पावलं टाकत त्यानी ते अंतर तोडलं. बॅगा बोटीत ठेऊन तो परतही आला. पुन्हा एकदा आमच्या बॅगांचा द्रोणागिरी उचलत तो तितक्याच तडफेनी निघून गेला. एव्हाना जमेल तेवढं सामान हातात घेऊन आम्हीही वाळवंट तुडवत होतो. विषुववृत्ताजवळचं रणरणतं उन आणि जंगलातला कुबटपणा ह्यांनी घामाघुम होऊन, धापा टाकत आम्ही बोटीशी पोचलो. कुलिओ आता नव्यानी सामान आणायला परत फिरला. स्वयपाकाचं सामान घ्यायचं होतं. उरलेले बटाटे , पीठ-मीठ, भांडी-कुंडी गोळा करून, पोत्यात भरून तो फिरून बोटीशी आला. बोट आता निघाली. अॅमॅझॉनचं पाणी मधेच संथ तर मधेच खळाळून वहात होतं. पार दमल्या मुळे आम्ही बोटीत अवघडत आडवे होऊन पेंगत होतो. इतक्यात झाम्फोनच्या (बासरी) अलौकिक सुरांनी वातावरण भरून गेलं, भारून गेलं. चमकून पाहिलं तर  बोटीच्या टोकाशी कुलिओ रापलेल्या अंगानी बसला होता. पाय पाण्यात सोडून तो मजेत वाजवत होता. पायपीट, वैताग, गैरसोय, दमणूक, उष्मा, घाम अशा अनेक कटकटींवर त्याच्या सुरांचं मोरपीस गारूड करत होतं. आमच्यापेक्षा कितीतरीपट अधिक थकलेल्या, अधिक श्रमलेल्या कुलीओने  चक्क झाम्फोन ओठी लावला होता. त्यात जणू तो स्वतःचे प्राण फुंकत होता. हातांच्या नाजूक हालचालींनी त्याच्या थकलेल्या श्वासांचे तो निरागस सूर विणत होता.

आजचा दिवस खास होता. कुलीओसाठी. त्याच्या बायकोशी तो आज आमची ओळख करून देणार होता. पण बायको बद्दल त्याच्या आणि आमच्या कल्पना वेगवेगळ्या होत्या. स्त्री, सखी, सचिव आणि भार्या अशा वेगवेगळ्या पोस्ट वर त्याच्याकडे वेगवेगळ्या बायका होत्या. आज भेटली ती जंगल खात्यातच नोकरीला होती. खूप खोलवर जंगलात एक ऑक्स बो लेक होता. तिथे हिची नेमणूक होती. मग बरच अंतर जंगल तुडवल्यावर ते ठिकाण आलं. मग बायको भेटली. मग आमच्याशी ओळख वगैरे झाली. मग कुलिओ तिला रीतसर भेटला. (नेमकी रीत काय ते विचारू नका!) हिला स्पॅनिश आणि केचुआ एवढ्याच भाषा येत होत्या. एका बॅचला बोटीत घालून कुलिओ पक्षी निरीक्षणासाठी घेऊन गेला आणि तळ्याकाठी, तरूतळी तिचा आणि आमचा शब्देविण संवादू सुरु झाला. एकमेकांची भाषा अजिबात येत नसताना आम्ही एकमेकांबद्दल इतक्या गोष्टी जाणून घेतल्या की माझं मलाच आश्चर्य वाटलं. वास्को द गामा आला, पण लेकाचा त्या मल्याळी माणसांशी बोलला काय आणि कसा? हा प्रश्न मला पाचवी पासून सतावतो आहे. पण खाणाखुणा आणि हावभाव हे इतके माहितीबंबाळ होऊ शकतात याचं डेमोच झालं माझ्यासाठी.

ती जंगलातच आत कुठेतरी रहाते...सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तिची ड्युटी असते...तिला तीन मुलं आणी कुलिओ धरून दोन नवरे वजा जोडीदार आहेत...दोघंही दारू पितात पण कुलिओ जरा कमी पितो, ही सगळ्यात कमी पिते...तिच्या धाकटीला सतत सर्दीचा त्रास असून मी औषध दिलं तर तिला ते आवडेल...दिवसभरात ६०- ७० लोकं येतात पण भारतातून आलेले आम्ही पहिलेच पर्यटक...या आधी भारतीय माणसं तिनी फक्त बॉलीवूडपटातच बघितली आहेत...ती घरनं डबा आणते...शिवाय वाटेत फळं, कंदमूळं मिळतातच...शेजारच्या खोपट्यात तीनी काही गिनी डुक्करही पाळले होते...कुलीओच्या आगमनाप्रीत्यर्थ आज भाजलेल्या गिनीडुकराचा चमचमीत बेत होता!!

थोड्याच वेळात कुलिओ आला. त्यानीही भराभरा रांधायवाढायला मदत केली. आमचं जेवण पुढ्यात आलं. उकडलेली बटाट्याची पावडर, उकडलेला बटाट्यांचा कीस आणि उकडलेला बटाटा असा सज्जड मेनू होता. तो अतिशय बेचव होता. बटाटा, साबुदाणा आणि मिरची ही मूळ इथलीच. पोर्तुगीजांनी हे पदार्थ भारतात आणले. हे शोध लावणाऱ्या ह्या महान संस्कृतीला बटाटेवड्याचा आणि साबुदाणावडयाचा मात्र शोध लावता आला नाही याच मला खूप खूप वाईट वाटलं. नाईलाजान समोरच्या बेचव बटाट्यात बरोबर आणलेलं बचाकभर लोणचं घालून आम्ही तो मेनू तिखट मानून घेतला.

एवढ्यात कुलीओचं ताट आलं. एका लाकडी ताटात ते गिनी पीगचं कलेवर उपडं पडलं होतं. हात पाय आळस दिल्यासारखे ताणलेले होते. शेपूट, नख्या आणी दात दाखवत ते निपचित पसरलं होत. त्याची छाती आणि पोट फाडून ठेवलं होत. आणि त्यातून आतल्या अवयवांचा चिखल बाहेर डोकावत होता.

मांस अशा पद्धतीनी खाणारा तो आम्हाला जंगली वाटत होता आणि इतकं जहाल तिखट खाणारे आम्ही त्याला रानटी वाटत होतो. पूर्वीही असंच काहीसं झालं होतं. गोरे उन्नत बाकी अवनत असं स्पॅनिशांना वाटत होतं. आज कुलीओला ह्याच्या बरोब्बर उलट वाटतंय.

शिरा ताणून ताणून तो बोलत होता. एका प्रचंड पाषाणशिल्पापुढे उभा राहून तो युगायुगाची कैफियत मांडत होता जणू. स्पॅनिश लोकांनी कसं कसं आक्रमण केलं, स्थानिकांना कसं कसं नेस्तनाबूत केलं याचं इथ्यंभूत वर्णन केलं त्यानी. पुढे प्रत्येक ठिकाणी ही लढाई चालू झाली. माहितीपत्रकात, भित्तीफलकावर वेगळीच माहिती लिहिलेली आणि हा सांगायचा वेगळंच काही.

आम्ही वाचलं होत, स्पॅनिशांकडे या साउथ अमेरिकनांनी कधीही न पाहिलेलं एक वाहन होतं, घोडा! स्थानिकांना वाटायचं, घोडा आणि त्यावर बसलेला माणूस हा एकच प्राणी आहे. ते त्याला घाबरायचे. असा प्राणी त्यांनी कधी बघीतला नव्हता.

‘ह्या सगळ्या भाकड कथा आहेत’, म्हणाला तो. ‘इंकाना बदनाम करण्यासाठी रचलेल्या. घोडा आणि माणूस हे वायले वायले प्राणी आहेत हे समजायला सामान्य बुद्धिमत्ता पुरेशी आहे की. तेवढीही इंकांकडे नव्हती काय?’ क्षणात सात्विक संतापानी थरथरू लागला तो.

नरबळी देण्यासाठीची वेदी होती एके ठिकाणी, याच्या मते इंका नरभक्षक नव्हतेच. परक्या स्पॅनिशांनी उगीचंच त्यांच्या सोयीचे गैरसमज पसरवलेत.

स्पॅनीशांच्याकडे लोखंड वापरायचं तंत्रज्ञान होतं. इंकांना लोखंडाचा शोधच लागला नव्हता. ते आपले सोन्या चांदीत भागवत होते. लहानपणापासून शब्दशः चांदीच्या पाटावर, सोन्याच्या ताटामध्ये, मक्याचा घास एकमेकाला भरवत होते. खरोखरच एकमेकाला भरवत होते. कारण जे होतं ते सगळ्या टोळीचं होतं.

कुलिओच्या म्हणे, ‘एका संपन्न संस्कृतीचाच घास घेतला त्यांनी. मालकीची कल्पना स्पॅनिशांची. खाजगी मालमत्तेची कल्पनाच नसल्यामुळे आहे ते सगळं सगळ्यांचं होतं. मग ही भावना चांगली, का माझं, माझं, माझं करत हावरटपणा चांगला? अन्न टोळीतल्या सगळ्यांचं होतं. त्यामुळे शिकार करू न शकणाऱ्यांचंही भागत होतं. जो माणूस खुडूक झाला तो आयुष्यातून कायमचा उठला ही भानगड नाही. किती उदात्त रचना ही. सोशल सिक्युरिटी म्हणतात ते ह्यालाच.’ पण ही पद्धत सध्याच्या काळी नीरुपयोगी आहे याचा त्याला पत्ता नव्हता.

 सगळं सगळ्यांचं असल्यामुळे कशाचीच फारशी नोंदबींद ठेवायची भानगड नव्हती आणि या भानगडीतून उद्भवणाऱ्या इतर भानगडीही नव्हत्या. लिपीचा शोधच मुळी या इंकांनी लावला नव्हता; किंवा त्यांना लागला नव्हता. दोरीला ठिकठीकाणी गाठी मारून काही सांकेतिक माहिती ठेवली जायची म्हणे, पण सद्यस्थितीत त्या गाठी खरोखरच संकेतच आहेत. त्या गाठींचे अर्थ आज उकलणारा कुणीच नाही.

चाकाचाही शोध इंकांना गरजेचा नव्हता. कुंभाराचं चाक होतं, पण चाकाची गाडी नव्हती. गाडी ओढायला घोडंच नव्हतं तर गाडी बनवून उपयोग काय? त्यातल्या त्यात मोठा प्राणी म्हणजे लामा. हा जेमतेम पन्नास किलो ओझं वाहू शकतो, म्हणजे एखादा  मोठा माणूसही याला पाठीवर बसून जाणं शक्य नाही.

स्पॅनिश आले, त्यांनी पाहिलं आणि ते जिंकले. स्पॅनिश तंत्रप्रगत होते, म्हणुनच जिंकले. गलबतं आणि बंदुका, चाकं आणि प्रगत तंत्र या साऱ्याच्या जोरावर दक्षिण अमेरीका काबीज करते झाले. तिथल्या रानटी जमातींना त्यानी माणसात आणलं. आपली भाषा दिली, एक भाषा. आपली लिपी दिली. एक लिपी. मूळ भाषा संपल्या. इंकांची, कुलिओची, केचुआ ही भाषा जेमतेम धुगधुगी धरून आहे.

स्पॅनिशांनी आपला धर्म दिला, एक धर्म.  पण कुलिओ सांगतो, ‘कॅथोलिक श्रेष्ठ म्हणताना इतर सारे कनिष्ठ हे ओघानीच आलं. पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाशाची पूजा करणारे रानटी ठरले आणि त्याच आकाशातल्या तथाकथित बापाची लेकरं प्रगत! साम, दाम, दंड, भेद वापरून धर्मांतरं झाली. जगातल्या सगळ्याच्या सगळ्या काळ्या, पिवळ्या माणसांना सुधारायचं अवघड आणि किचकट काम  देवानीच गोऱ्यांच्या बलदंड खांद्यावर दिलंय, असा तोरा होता स्पॅनिशांचा.’ कुलीओला हा तोरा टोचत होता. हा माज जाचत होता. कुलीओच्या बोलण्यात तथ्य होतंच होतं. पोपच्या दिशेनी तो थुंकला ते काही उगीच नाही. पण पोपचा ख्रिस्त आणि पेरूचा ख्रिस्तही वेगळे वेगळे आहेत. लिमाच्या चर्चमधील ‘लास्ट सपर’च्या चित्रात, पेरूच्या ख्रिस्तापुढे गिनिपिगच्या मासाचा प्रसाद आहे; पार्श्वभूमीवर मेंढयांचा नाही, तर लामांचा कळप आहे.

स्पॅनिशांनी व्यापार वाढवला, दवाखाने काढले, शाळा काढल्या, संस्कृती रुजवली, राष्ट्र ही संकल्पना दिली. वर्णसंकर तर झालाच झाला. शतकं लोटली. आता मुळचा कोण आणि बाटगा कोण हे ओळखणंही कठीण झालं. मूळ संस्कृतीची थडगी झाली. त्या थडग्यांवर नवे प्रासाद, नवी मंदिरं, नवे राजवाडे दिमाखात उभे राहिले. तेच आम्ही फिरून पाहिले. तेच आम्हाला कुलिओनी फिरून दाखवले. कुलिओच्या काळजातल्या कट्यारीच ह्या साऱ्या.

मूळ संस्कृतीचं समूळ उच्चाटन झालं. इंका काय होते हे सांगायला इंकाच फारसे उरले नाहीत. लिपी वगैरे तर नव्हतीच. अर्थात स्पॅनिशांनी केलेल्या नोंदी आहेत. जेत्यांनी केलेल्या, जीतांच्या बाबतीतल्या नोंदी त्या. त्या एकजात पूर्वग्रह बाळगून लिहिलेल्या. कारण फक्त जेत्यांचाच असतो इतिहास, फक्त जेत्यांचीच असते संस्कृती, हौतात्म्यावरही असते फक्त जेत्यांचीच मालकी. आज आता भांडी-कुंडी, पुतळे, ममी, थडगी, आणि ती उकरून निघालेल्या सोन्याचांदीच्या वस्तू, ह्यातूनच काय ओळख पटेल ती. शिवाय शोधायला येणारे सगळेच थोडे साव होते? खरतर थोडेच साव होते. कल्पनेतल्या सोन्याच्या लंकेचा, एल डोराडोचा, शोध घेत  हौसे आणि गवसेच जास्त. सोन्याचा सोस तर सगळ्यानाच. मढ्याच्या टाळूवरचं सोनं वर्ज्य नव्हतच. सोनंच ते, ते वर्ज्य कशाला असेल?

या इंकांच्या खालसा राज्यात खूप फिरलो आम्ही. कुलीओचे तळतळाटही खूप ऐकले. काळाबरोबर जुळवून घेता आलं नाही म्हणून एका नांदत्या गाजत्या संस्कृतीचा ऱ्हास घडला होता. काळाच्या उदरात त्या संस्कृतीचे निव्वळ फॉसिल उरले होते.

पुढ्यात प्रचंड शिळांची प्रचंड भिंत उभी असायची. निव्वळ दगडावर दगड रचून उभी केलेली प्रचंड भिंत. कशासाठी? माहित नाही! कुणी? माहित नाही. कशी? माहित नाही.

माचुपिचुच्या शिखरावरती घरांची जोतीच जोती. थोड्याशा दगडी त्रिकोणी चौकोनी भिंती. ओसाडगावचं हे राज्य होतं तरी कोणाचं? माहित नाही. ते ओस तरी का पडलं? माहित नाही.

नाझ्काच्या पठारावर प्रचंड चित्र कोरलेली. माणूस, माकड, गिधाड, पक्षी, आकारच आकार. काही नुसतेच उकार. मैलोंमैल सरळसोट  रेघोट्या आखलेल्या. कशासाठी? माहित नाही. कोणी म्हणतात परग्रहावरच्या यानांसाठीच्या धावपट्ट्या या. कुणी म्हणतात हे तर पंचांग त्याचं. कुणी म्हणतात पाणवठ्याच्या वाटा या. कुणी म्हणतात स्वर्गारोह्णाच्या दिशा या. कुणी काही तर कुणी काही.

या साऱ्याचा अर्थ लावायचा जो तो आपापल्या परींनी प्रयत्न करतोय. कोणी आयुष्य खर्ची घालतोय. पण ह्या विश्वाचा आकार केवढा? ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा. तसंच हे. सगळ्या ठिकाणी सतत हा नन्नाचा पाढा. कुतूहल चाळवणारे सगळं काही. कुतूहल शमवणारं काहीच नाही.

अशा बिन लोहाच्या आणि बिन लिपीच्या; बिन घोड्याच्या आणि बिन चाकाच्या, इंका  संस्कृतीचं काळाच्या उदरात रुतलेलं रथचक्र, कुलिओ प्राणपणानी बाहेर ओढू पहात होता. जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर ते ते स्पॅनिशच; अशी धारणा झालेल्या समाजात, जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर ते ते इंकांच; अशी खुणगाठ बांधून तो वागत होता. त्याच्या वंशाच्या अधःपतनासाठी त्याला एक रेडीमेड शत्रू मिळाला होता. स्पॅनिश वसाहतीचा काळाकुट्ट इतिहास! त्यांची भाषा, संस्कृती, धर्म...सगळंच. हे सगळं त्याला उखडून टाकायचं होतं. मूळ संस्कृती पुन्हा आणायची होती. इकडे पोर्तुगीजांनी गोवा घेतला त्याच सुमारास तिकडे पेरूत स्पॅनिशांनी पाय रोवले. इकडे मराठेशाही बुडाली त्या सुमारास तिकडे स्पॅनिशांनी पेरू सोडला देखील. आज पेरू एक स्वतंत्र लोकशाही देश आहे. पण  ८०% नागरिक कॅथोलिक आहेत, ८०% स्पॅनिश बोलतात, ८०% मिश्र वंशाचे आहेत. तरी देखील कुलिओ ठाम आहे. शेवटच्या इंका राजानी, शेवटच्या पराभवाआधी उच्चारलेले, शेवटचे शब्द होते, ‘तुम्ही वाट पहा. मी परत येईन.’ ते कुलिओला खरे करायचे होते. पण कसं ते त्याला उमगत नव्हत. सध्यातरी स्पॅनिश वारशाचा तिरस्कार हा त्याचा एकमेव कार्यक्रम होता. भेटतील त्या पर्यटकांना तो आपली ही कैफियत ऐकवतो.   इंकांचा उदोउदो करता करता तो इतरांबद्दल जे बोलत होता ते भयावह होतं. तो अन्यायग्रस्त होता, पीडित होता, भाषाही न्यायाची बोलत होता. पण वृत्ती मात्र एकांगी, द्वेषभारित, कुत्सित, मत्सरानी ग्रासलेली होती. पिढ्यानपिढ्याच्या अन्यायाचा त्याला आत्ता, इथे, या क्षणी बदला घ्यायचा होता. स्पॅनिश वारशाच्या सर्व खाणाखुणा पुसून टाकाव्यात असा त्याचा अर्वाच्य सूर आहे. पेरू मूळ पेरू निवासियांचाच असा बोचरा नूर आहे. कसं शक्य आहे हे? आजची पेरूची भाषा, धर्म, संस्कृती, सगळं काही हजारो वर्षांची साठलेली ‘समृद्ध अडगळ’ आहे. स्पॅनिशांमुळे जगाला इंका माहीत झाले पण इंकांनाही जगाची ओळख स्पॅनिशांमुळेच झालं की. आज कुलिओचं क्रिओल नृत्यही शुद्ध पेरुचं नाही, ना की त्याचा लाडका झाम्फोन. त्याचं स्वतःचं नाव सुद्धा ज्युलिअस...ज्युलिओ...कुलिओ...असं अपभ्रष्ट आहे. असं गाळून गाळून फक्त इंकांचं तेवढंच ठेवायचं म्हटलं तर...काहीच उरणार नाही!  

पुढे कुलिओ बरोबरची गालाप्गोसच्या बेटांची सफर अविस्मरणीय झाली. चार्ल्स डार्विन बीगल जहाजावरून इथे आला होता. ह्या द्वीपसमूहावरचं चित्तचक्षुचमत्कारीक जैववैविद्ध्य बघून त्याच्या मनात उत्क्रांतीचा सिद्धांत सिद्ध झाला. डार्विन आणि त्याच्या सिद्धांताप्रमाणेच ही बेटंही आता प्रसिद्ध आहेत. जगभरच्या वैज्ञानिकांना तीर्थस्थानी आहेत.

कुलिओनी अगदी मोजक्याच शब्दात अख्खा उत्क्रांतीचा सिद्धांत समजावून सांगितला. ‘संपूर्ण जीवसृष्टी ही प्राथमिक अवस्थेतल्या सजीवांपासून सावकाशपणे उत्क्रांत  होत आली आहे. या उत्क्रांतीसाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. आजची सजीवांची विविधता हा उत्क्रांतीचाच एक भाग आहे आणि माणूस हा देखील एक प्राणीच असून या उत्क्रांतीचंच फलित आहे. पृथ्वीचं काही कोटी वर्षं असलेलं वय, त्या काळातले भूकवचातले आणि वातावरणातले बदल, आज प्रयोगशाळेत निर्माण करता आलेली अमिनोआम्ल, ठिकठिकाणी सापडलेले जीवाश्म आणि अव्याहतपणे तयार होणाऱ्या आणि बदलाशी जुळवून न घेता आल्यामुळे नष्ट होणाऱ्या प्रजाती हा सारा उत्क्रांतीच्या बाजुने सज्जड पुरावा आहे.’ पण पुढे जाऊन त्यानी हे ही स्पष्ट केलं की माणूस, किंवा अमुकच एक वंश, या उत्क्रांतीच्या शीर्षस्थानी आहे अशा भ्रमात कोणी राहू नये. गांडूळाच्या ठिकाणी रहाण्यासाठी गांडूळ हा सर्वात उत्क्रांत प्राणी आहे आणि खोल पाण्यात रहाण्यासाठी देवमासा. त्यांची जागा माणूस घेऊ शकत नाही आणि माणसाची जागा ते.’

कुलीओची जीवशाशास्त्राची समज थक्क करणारी होती,

‘डार्विनच्या या सिद्धांतांनी देवाला सिंहासनभ्रष्ट केलं...’

‘मानवाचे अंती गोत्र एक, असं दाखवून दिलं...’

‘मानवाचेच नाही तर जीवितांचे अंती गोत्र एक हे दाखवून दिलं...’

‘सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट ही समज खुजी आहे...’

‘स्पर्धेइतकंच सहकार हे ही तत्व जगण्यासाठी, तगण्यासाठी उपयोगी आहे....’

‘उत्कांतीच्या वाटेला निश्चित असा हेतू नाही...’

‘उत्क्रांतीच्या वाटेवर तीच वाट पुन्हा उलटी चालता येत नाही....’

‘पुन्हा मूळ ठिकाणीच ती पोहोचेल याचा काहीच भरवसा नाही...’

‘माकडाचा माणूस झाला पण म्हणून माणसाचे माकड करता येत नाही...’

हे सगळं सगळं कुलीओला कळतं, पण हेच सगळं इतिहासालाही लागू पडतं, हे मात्र त्याला वळत नाही. इतिहास उत्क्रांत होत असतो. इतिहासाचं चाकही उलटं फिरवता येत नाही. इतिहासात संभाव्य असल्या तरी, वर्तमानात शुद्ध गोत्र, वंश, रक्त वगैरे कल्पना हास्यास्पद आहेत. इतिहासातल्या पूर्वजांच्या पापांना, वर्तमान वंशजांना जबाबदार धरून भविष्य कसं घडणार? इंकांसाठी एल्गार पुकारताना प्राप्त परिस्थितीशी सहकार करणं कुलीओला जमत नव्हतं. इंकांचा वारसा हृदयी धरायचा का गालाप्गोसचा हे त्याला समजत नव्हतं!

म्हणूनच आजूबाजूला अशी वर्तमान आणि भविष्यकाळ सोडून इतिहास बदलायला निघालेली माणसं दिसली, की कुलिओ आठवतो आजही. काही अवघड प्रश्नांची सोपी उत्तरं त्यानी पुन्हा अवघड केली माझ्यासाठी. म्हणून कायमच लक्षात राहील तो.

----------------------------------------------------------------------------------------------------------
या आणि अशाच अन्य लिखाणासाठी माझा ब्लॉग जरूर वाचा

shantanuabhyankar.blogspot.in