Showing posts with label डार्विन. Show all posts
Showing posts with label डार्विन. Show all posts

Thursday, 18 April 2019

डार्विनने काय सांगितले?


डार्विनने काय सांगितले?
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

डार्विनिझम
कोणत्याही विचार धारेचा इझम होणे हे वाईटच. ग्रंथप्रामाण्य, शब्दप्रामाण्य, व्यक्तीपूजा आणि आंधळी पंथभक्ती ही काही चांगली लक्षणे नव्हेत. त्यामुळे शब्दाशब्दाला प्रश्न विचारणाऱ्या विज्ञान नामे विचारधारेला तर इझम म्हणजे अब्रम्हण्यम. त्यामुळेच की काय ‘न्यूटन, आईनस्टाईन ते आले गेले त्यांविन जग का ओसची पडले?’ अशी विज्ञानाची वृत्ती असते. पण इतके असूनही डार्विनिझम, ‘डार्विनवाद’, असा शब्दप्रयोग मधून मधून वापरण्यात येतो. आंधळ्या डार्विन भक्तीपोटी नाही तर डार्विन विचाराची महत्ता लक्षात यावी म्हणून. डार्विनविचार, ‘झाकळुनी जळ गोड काळिमा पसरून लाटांवर’, जणू विचारडोहाच्या काठावर औदुंबर होऊन, पाय सोडूनी जळात बसला आहे. डार्विननी जीवशास्त्राचं विचारविश्व तर उलथेपालथे केलेच पण मानवी प्रज्ञेच्या हरएक अविष्कारावर आपली मुद्रा उमटवली. आज जैविक उत्क्रांती, वर्तनशास्त्र, लैंगिक वर्तन, सामाजिक वर्तन, सृष्टीनिर्मिती ते अगदी आकाशगंगांच्या नवनिर्मितीपर्यंत कोणताही विचार डार्विनचे बोट धरूनच पुढे जातो.  अर्थात  लेखणीच्या एका फटकाऱ्यात डार्विनने सारे बदल घडवले असे नाही. डार्विनलाही विरोधक होते, त्याच्या इतकेच विचारी आणि तगडा युक्तिवाद असणारे होते. काही विज्ञान-व्यूह आणि विचार-व्यूह होते. ते भेदून, कडव्या लढाईनंतरच डार्विनला त्याचे स्थान प्राप्त झाले. कोणत्या वैचारिक वातावरणात हे घडले आणि पुढे त्यामुळे काय बदल झाले याचा हा धावता आढावा. डार्विनच्या मूळ सिद्धांतातही आज बदल झाले आहेत; मूलभूत नाही पण तपशीलात आहेत. गेल्या शतकात, जनुकशास्त्र आणि सजीवांचे एकमेकांशी असलेल्या जनुकीय नातेसंबंधानुसार वर्गीकरण, असा समसमा संयोग जुळून येताच डार्विन विचाराने निर्विवाद बाजी मारली आहे. तेंव्हा मी डार्विनने केले/सांगितले, असे म्हणतो तेंव्हा आजचा उत्क्रांतीविचारही अभिप्रेत आहे हे लक्षात असो द्यावे.

डार्विनने नेमके काय सांगितले?
डार्विन म्हटले की माकडापासून माणूस झाला असं सांगणारा एक दाढीवाला आजोबा एवढेच चित्र आपल्या डोळ्यासमोर येते. मुळात माणूस हा माकडापासून निर्माण झाला असे डार्विनने कुठेच म्हटलेले नाही. त्यांनी असे दाखवून दिले की मानव आणि मर्कट हे एकाच पूर्वजांचे वंशज आहेत. म्हणजे आपल्या चुलत भावापासून आपण जन्माला आलो असे आपल्याला म्हणता येईल का? नाही. पण आपले आजोबा एकच होते, हे सत्य आहे. तसेच हे. हा धक्का पुढारलेल्या पाश्चात्यांच्याही पचनी पडलेला नाही. डार्विनच्या हयातीतही यावर अत्यंत हीन वाद झडले होते.
उत्क्रांतीवाद्यांचा दावा असा की संपूर्ण जीवसृष्टी ही प्राथमिक अवस्थेतल्या सजीवांपासून सावकाशपणे उत्क्रांत  होत आली आहे. आजची सजीवांची विविधता हा उत्क्रांतीचाच एक भाग आहे आणि माणूस हा देखील एक प्राणीच असून या उत्क्रांतीचंच फलित आहे. तर विरोधी पक्षाचं म्हणणं असं की अगदी प्रथमावस्थेतील प्राण्यात देखील अत्यंत गुंतागुंतीची जैवरासायनिक रचना असते. केवळ चार रसायने अपघाताने एकत्र आली म्हणून ते रेणू ‘जीव’ धरू शकत नाहीत. तेव्हा सजीवांची उपज ही कोण्या बुद्धिवान निर्मिकानं केलेली करामत आहे. ही मंडळी यासाठी मोठा मासलेवाईक दाखला देतात. समजा चालता चालता तुम्हाला एक दगड दिसला तर तो तिथे निसर्गतः आहे हे मान्य करता येईल, पण एखादं घड्याळ आढळलं तर ते काही निसर्गतः घडलेलं नाही हे उघड आहे. घड्याळ्याच्या निर्मितीमागे कोणीतरी कसबी कारागीर आहे हे निश्चित. तद्वतच सजीवांची गुंतागुंतीची रचना निव्वळ निसर्ग-अपघातांनी, आपोआप घडून येणे, अशक्य आहे. हा तर कुणा कुशल निर्मिकाचा खेळ.
उत्क्रांतीवाद असे दाखवून देतो की, अशा कोण्या घड्याळजीची गरजच नाही. स्वतःच्या नकला काढू शकणारे रेणू (म्हणजे आपली गुणसूत्रे), ह्या नकला काढताना होणारे किंचित किंचित बदल आणि नैसर्गिक निवडीची न-नैतिक, दिशारहित, शक्ती हीच जीवोत्पत्तीचे कारण आहे. ही शक्ती अशी आंधळी आहे(Blind watchmaker). तिला काया, वाचा, मन, काही काही नाही.
आणखीही काही युक्तीवाद आहेत. समजा एखाद्या जंबोजेटचे सारे भाग सुटे करून एखाद्या आवारात ठेवले आणि चक्रीवादळासरशी ते एकत्र येऊन जम्बोजेट बनलं, असं कुणी सांगितलं, तर ते विश्वसनीय वाटेल का? जम्बोजेट सारखी गुंतागुंतीची रचना केवळ वाऱ्यानं घडू शकेल का? निर्मितीवाद्यांचं म्हणणं असं, की वादळानं जम्बोजेट बनणं जसं असंभवनीय आहे, तद्वतच उत्क्रांतीनं सजीवांची निर्मितीही असंभवनीय आहे.
मात्र उत्क्रांतीवाद्यांच्या मते हा सारा उत्क्रांतिवादाचा शुद्ध विपर्यास आहे. आलं वारं आणि झालं जम्बोजेट तयार, असा मुळी युक्तीवादच नाहीये. पृथ्वीचं काही कोटी वर्षं असलेलं वय, त्या काळातले भूकवचातले आणि वातावरणातले बदल, प्रयोगशाळेत निर्माण करता आलेली अमिनोआम्ल, ठिकठिकाणी सापडलेले जीवाश्म आणि अव्याहतपणे तयार होणाऱ्या, आणि बदलाशी जुळवून न घेता आल्यामुळे, नष्ट होणाऱ्या प्रजाती, हा सारा उत्क्रांतीच्या बाजुने भक्कम पुरावा आहे.

अन्य मतमतांतरे आणि डार्विन
उत्क्रांती कशी घडते यावर डार्विनकाळी बरीच मतमतांतरे होती. खुद्द डार्विनच्या आजोबांनी उत्क्रांतीसम काही कल्पना मांडली होती. ‘ट्रान्सम्यूटेशन’वाल्यांच्या मते पृथ्वीतलावर कोणी अवतार उतरावा तशी नवी प्रजाती अचानक उद्भवते किंवा  एखाद्या जीवात एकाएकी इतका टोकाचा बदल होतो की नवीनच प्रजाती निर्माण होते. तेंव्हा जोमात असलेल्या ‘टायपॉलॉजी’च्या साच्यात हा विचार फिट्ट बसतो. एका ‘टाईप’कडून दुसऱ्या ‘टाईप’कडे थेट उडी! ‘ओर्थोजेनेसिस’वाले सांगत की सजीवांना सतत एका पूर्वनिश्चित उत्कर्षावस्थेची अंगभूत आस असते आणि परिणामी सजीव, पिढी दर पिढी, विकसित होत जातात. उन्नतीकडे होणारा हा प्रवास म्हणजेच सजीवांचे उत्क्रांतीरहस्य. लामार्कच्या तत्वानुसार जगताना झालेले शारीरिक बदल हे पुढील पिढीत संक्रमित होतात आणि हळूहळू नवीन प्रजाती उत्पन्न होतात. ह्याचे गाजलेले उदाहरण म्हणजे जिराफाची लांब मान. लामार्कची मांडणी अशी, की उंचावरचा पाला खाता खाता आखूड मानेच्या जीराफांच्या माना लांबल्या, मग त्यांच्या मुला-बाळांच्याही लांबल्या आणि परिणामी काही पिढ्यात लांब मानेचे जिराफ तयार झाले. अर्थात एके काळी ह्या मांडणीला बरीच मान्यता असली तरी नवीन संशोधनानंतर हा सिद्धांत मागे पडला. कोणाचा हात तुटला म्हणून त्याला थोटी मुले होत नाहीत आणि जन्मतः सुंता केल्याने कुणाला सुंता झालेली मुले होत नाहीत! उत्क्रांतिवाद सांगतो, निसर्गतः काही जिराफ ऊंच मानेचे निपजतात (Variation); त्यांना जगण्याच्या, तगण्याच्या आणि म्हणून जुगण्याच्या, अधिक संधी प्राप्त होतात (Natural Selection); परिणामी पिढ्यांपिढ्या माना ऊंच ऊंच होत जातात, अखेरीस ऊंच मानेचा जिराफ ही नवीनच प्रजाती उत्पन्न होते (Speciation). थोडक्यात नव्या नव्या प्रकारचे जीव निर्माण होण्यात कर्ताकरविता हात हा नैसर्गिक निवडीचा आहे, त्यासाठी कोणत्याही शक्तीची कल्पना अनावश्यक आहे.
कोण्या निर्मिकाने ही सृष्टी निर्माण केली, आज आपल्याला दिसते त्याच स्वरुपात निर्माण केली आणि तेंव्हापासून सृष्टी आणि जीवसृष्टी अव्याहतपणे चालू आहे. ‘स्काला नाट्युर’ अशी ही कल्पना होती. जीवनाची साखळी किंवा पायऱ्यांसारखी रचना...सगळ्यात वर देव, मग देवदूत, मग शापित देवदूत, तारे, चंद्र, राजे, राजपुत्र, सरदार, सामान्य मनुष्ये, जंगली प्राणी, पाळीव प्राणी, वृक्ष, अन्य वनस्पती, हिरे, सोने, चांदी, इतर खनिजे...! मानवाचे पूर्वज मानवच होते आणि मुंग्यांचे मुंगीच होते;  वडापासून वड नीपजले आणि पिंपळापासून पिंपळ. कालही निपजले, आजही निपजतात आणि उद्याही निपजतील. ही धारणा, हे आसपास दिसणारे ‘उघडउघड’ सत्य, डार्विननी नाकारले. कालौघात, जीवात, किंचित किंचित बदल होत जातात आणि परिणामी बऱ्याच काळानंतर मूळ जीव आणि ताजा जीव हे एकाच जीवमाळेचे मणी आहेत हे सांगूनही खरे वाटत नाही; असे त्याचे सांगणे. सजीवांचे आजचे स्वरूप हे तर त्यांचे संस्करीत रूप आणि हे ही स्वरूप अंतिम नाही, ही जाण त्यानी दिली.
जीवसृष्टीचा विकास हा साखळीसारखा नसून अनेक फांद्या फुटलेल्या झाडासारखा आहे. खरेतर फांद्या फांद्या फुटलेले झाड एवढे एकच चित्र त्याच्या मूळ हस्तलिखितात आहे. हा विनम्र विद्वान समासात लिहितो, ‘असं वाटतंय.’ म्हणजेच पिढ्यापिढ्यांची, कड्याकड्यांची साखळी असावी अशी दिसणारी जीवसृष्टी डार्विननी फांद्याफांद्यांची कल्पिली. जीवसृष्टी म्हणजे विविध जीवांच्या अनंतापर्यंत एकमेकींना न छेदणाऱ्या समांतर साखळ्या, अशी प्रचलित कल्पना होती. डार्विननी जीवांच्या वंशाचा वृक्ष कल्पिला आणि तोही प्रत्येक फांदीवर वेगळ्याच प्रजातीने डवरलेला वृक्ष.  वृक्ष म्हटला म्हणजे एकमेकींना मिळणाऱ्या रेषा आल्या. वृक्ष म्हटला की समान पूर्वज आले.  कोणत्याही टोकापासून सुरवात केली तरी अंतिमतः खाली, खाली, खाली, त्याच्या बुंध्याशीच पोहोचणे आले. एका आदिजीवापासून आजचा वृक्ष फुटलेला आहे हे ही ओघाने आले. बऱ्याच फांद्यावाले डेरेदार झाड आणि त्याच्या टोका-टोकाला एकेक सजीव असे चित्र जीवशास्त्राच्या पुस्तकात हमखास दिसते. या झाडाच्या सर्वात ऊंच फांदीवर असतो माणूस. माणूस हा सगळ्यात अधिक उत्क्रांत प्राणी, असे सुचवणारे हे चित्र साफ चुकीचे आहे. लक्षात घ्या, गांडूळ चिखलात राहू शकते, तुम्ही आम्ही नाही. म्हणजेच चिखलात रहाण्यासाठी गांडूळ हा सर्वात उत्क्रांत जीव आहे. आपण गांडूळाची जागा घेऊ शकत नाही आणि गांडूळ आपली जागा घेऊ शकत नाही. त्या त्या ठिकाणी तो तो जीव सर्वात उत्क्रांत जीव आहे, म्हणुनच तर तो आहे. अन्यथा तो केंव्हाच नष्ट झाला असता. थोडक्यात सर्वच जीव त्यांच्या त्यांच्या परिस्थितीत, परिसंस्थेत सर्वात उत्क्रांत आहेत. म्हणूनच ते ते आहेत, नाही तर केंव्हाच खल्लास झाले असते.

नैसर्गिक निवडीचे बळ
सजीवसृष्टीच्या वैविध्यात कर्ताकरविता हात कोण्या अदृष्य, सर्वशक्तिमान निर्मिकाचा नसून ‘नैसर्गिक निवडीचा’ आहे, हे सूत्र विज्ञानातीलच नव्हे तर तत्वज्ञानातील एक कळीचे सूत्र ठरले आहे. ‘वरी घालतो धपाटा आत आकाराचा हात’, असे म्हटले आहे; पण धपाटा घालणारा हात आणि आकार देणारा हात, असे दोन्ही हात नैसर्गिक निवडीचे  आहेत असे डार्विन दाखवून देतो. न भूतो अशीच ही कल्पना होती. नैसर्गिक निवडीचं बळ (Selection pressure) हे भौतिकीच्या राज्यातल्या गुरुत्वाकर्षण बळ, विद्युतचुंबकीय बळ अशा मापनसिद्ध बळांपेक्षा अगदी भिन्न स्वरूपाचे आहे. ह्या बळामुळे जे तगू शकत नाहीत ते जगण्यास, जुगण्यास आणि प्रसवण्यास मुळी शिल्लकच उरत नाहीत. ह्या शर्यतीतून ते आधीच बाद होतात. इतका साधासा सिद्धांत डार्विन सांगतो. ‘सक्षम तेवढेच जगतात’ (Survival of the fittest) हे त्याचं प्रसिद्ध लौकिक रूप. मुळात डार्विननी हा शब्दप्रयोग वापरला नव्हता, हर्बर्ट स्पेन्सरचे हे शब्द.
पण उत्क्रांतीच्या स्पर्धेत सबल तेवढे टिकतात हा एक लोकमान्य गैरसमज आहे. मुळात हत्यारे आणि संस्कृती काढून घेतली तर माणूस दुर्बलाहूनही दुर्बल आहे. तेंव्हा बळ हे अनेक प्रकारचे असते हे लक्षात घेतले पाहिजे. बाहू-बळ आहे तसेच बुद्धिबळही आहे. मानवापेक्षाही महाकाय असे प्राणी काळाच्या ओघात नष्ट झाले आहेत आणि इवली लव्हाळी टिकली आहेत. लढायाही अनेक प्रकारच्या असतात. दुष्काळात तगण्यासाठी शुष्कतेशी सामना जमायला हवा, थंडीत तगून रहाण्यासाठी शीत-युद्ध जिंकता यायला हवे आणि तुमच्या सवयीच्या आहारातल्या ऐवजी एखाद्या वेगळ्याच वनस्पतीने सर्व परिसर व्यापला, तर आता ती पचवण्याची तुमची ‘ताकद’ हवी. अशा अनेक ताकदी, अनेक लढाया, अनेक कुरुक्षेत्रे, जीवांची क्षमता जोखत असतात. प्रश्न निव्वळ शारीरिक ताकदीचा नाही. बदलता परिसर, बदलती परिसंस्था, बदलते वातावरण या साऱ्याचा सजीवांच्या, जगण्या-तगण्या-जुगण्या-प्रसवण्यावर अनेकांगांनी दबाव येत असतो (Selection Pressure). उत्क्रांती म्हणजे या नित्यनूतन, दबावात जे उरतात ते पुढे पुढे जातात. जे मोडतात ते संपतात. उद्याच्या ‘दाब-दबावाचा’ अंदाज उत्क्रांतीला कुठून यावा? बंदुकीच्या शोधाचा अंदाज वाघांना होता काय?

डार्विन जनुकीय अनिश्चितता आणि विशाल कालपट
एकाच प्रजातीची अनन्य आणि उदंड संख्या असेल तर त्यातील कमअस्सल उत्क्रांतीच्या चाळणीतून गळून नामशेष होतील. जगण्यास अधिक लायक तेवढे प्रजननासाठी उपलब्ध असतील. ‘अनन्य’ आणि ‘उदंड’ हे दोन्ही शब्द इथे महत्वाचे आहेत. दोन टप्यामध्ये चालणारी ही प्रक्रिया आहे. अनन्य लोकसंख्या ही पुनरुत्पादनाच्या सारीपाटावर जनुकांचे काय दान पडते यावर अवलंबून. सगळी माणसे, माणसेच असतात पण तरीही एकासारखा दुसरा असतच नाही. ही जनुकांची किमया. जनुकांच्या जुगारात प्रत्येकाला वेगवेगळे दान पडते. पण ही अनिश्चितता हीच उत्क्रांती विचारात कळीची आहे. आजूबाजूला ‘निश्चित विज्ञानाचा’ यळकोट चालू असताना अनिश्चिततेच्या पायावर आपला डोलारा उभा करण्यात डार्विनचे महात्म्य आहे. निश्चित उत्तराचे सूत्र शोधायच्या नादाला लागला असता तर डार्विन इथवर पोहोचता ना. त्यातल्या त्यात माणसे अनन्य असतात हे उघड जाणवणारे सत्य आहे पण सारेच जीव असे अनन्य असतात हे ओळखण्यात डार्विनची महत्ता आहे. सगळे शंख आणि सगळे शिंपले, सगळे कावळे आणि सगळी शेवाळे, सगळ्या बोरी आणि सगळ्या बाभळी अनन्य असतात. हे अनन्यत्व; हे किंचित, किंचित बदल, हाच उत्क्रांतीचा पाया आहे. अनन्यत्व यादृच्छिक (Random) तर निवडीची चाळणी ही परिस्थितीबद्ध. त्या त्या परिस्थितीतल्या सगळ्यांना सारखीच. नैसर्गिक परिस्थिती बदलली की या चाळणीच्या जाळ्या बदलणार. काय गळणार आणि काय नाही हे ठरणार.  सजीवातील बदल हे जनुके आणि परिस्थिती या दोन्हीची फलश्रुती आहे.
डार्विन काळी विज्ञान म्हणजे सूत्र, आकडेमोड, पुढे काय घडेल याचे नेमके भाकीत अशी कल्पना होती. न्यूटनचे गतीचे नियम, ग्रह-गतीची नेमकी गणिते हे म्हणजे  भरभक्कम विज्ञान. त्यामुळे जीववैज्ञानिक फिजिक्सवर जळत असतात (Physics envy) असाही गंमतीशीर आरोप आहे. त्यामानानी उत्क्रांतीशास्त्रात असतात त्या संकल्पना. स्पर्धा, निवड, वारसा, मादीकडून होणारी जोडीदार नराची निवड (स्वयंवर!), अशा संकल्पना भौतिकी किंवा रासायनिक नियमात घट्ट बसवता येत नाहीत. उत्क्रांतीशास्त्राची तऱ्हा इतर विज्ञानशाखांपेक्षा थोडी आगळी आहे. इथे प्रयोगाला वाव कमी. निरीक्षण, तुलना, वर्गीकरण आणि भूतकालीन घडामोडींबद्दलच्या विविध अंदाजांची तपासणी; हा इथला रिवाज आहे. ‘प्रदीर्घ कालपट’ (Geological timespan) हीच संकल्पना बघा ना. प्रत्येक पिढीत होणारे किंचित बदल हे साठत साठत एक वेगळीच प्रजाती निर्माण होते, पण हे घडायचे तर भलताच दीर्घ कालावधी लागेल. देवाने पृथ्वी जेमतेम काही हजार वर्षापूर्वी निर्माण केली आहे असे मानणाऱ्या बायबलनिष्ठ समाजाला, हा विशाल कालपट आकळणे अवघडच गेले. अक्षर ओळख नसताना निव्वळ काहीतरी आकार काढता काढता आपले नाव आपल्याकडून बिनचूक लिहिले जाण्याची शक्यता खूप कमी आहे. तसे व्हायचेच झाले तर कितीतरी काळ प्रयत्न करत रहावे लागेल. उत्क्रांतीला असाच प्रचंड काळ लागतो. हा कालपट समजावून घेणे हा उत्क्रांतीचा अभ्यास करण्यातला महत्वाचा टप्पा आहे. पृथ्वीचे कोट्यवधी वर्षांचे वय आणि जीवांच्या उत्पतीचा कालावधी पहाता, आपली आयुष्ये निमिषमात्रही नाहीत. त्यामुळे आपल्याला दोन-तीन पिढया, किंवा काही हजार वर्षे, एवढी कल्पना सहज जमते. पण उत्क्रांतीसाठी जी अति दीर्घकाळाची कल्पना करावी लागते तिथे आपले घोडे अडते. उत्क्रांती आपल्याला अशक्य कोटीतली वाटायला लागते.

डार्विनकालीन वैज्ञानिक माहौल आणि त्याचे खंडन
डार्विनकालीन वैज्ञानिक माहौल काही और होता. ‘ओरिजिन ऑफ स्पेसीज’ प्रसिद्ध झाले तेंव्हा (१८५९) शास्त्रज्ञ आणि विचारवंत हे बहुतेक सारे ख्रिश्चन होते आणि पुरुष होते. त्यांचे जग हे देवानी निर्मिलेले, ‘त्याच्या’च नियमांनी चालणारे होते. गुरुत्वाकर्षणाचे, उष्णतेचे आणि कसले कसले नियम ‘त्याने’च  आखले होते. काही जीव आपल्या मतीने निर्माण केले होते. ‘त्याच्या’च मतीने निर्माण झालेले हे सृष्टीचक्र, ‘त्याने’च नेमलेल्या गतीने चालू होते. ‘त्याच्या’च इच्छेनी त्याची सारी लेकरे परस्परांशी आणि निसर्गाशी एकोपा ठेवून नांदत होती. विज्ञानात डिटर्मिनिझमचा आणि टेलिओलॉजीचा दबदबा होता.
डिटर्मिनिझम म्हणजे स्वतंत्र इच्छेचा अभाव. प्राण्यांना, म्हणजे अर्थात त्यावेळच्या विचारधारेप्रमाणे मुख्यत्वे मनुष्यप्राण्याला, स्वतंत्र इच्छेने (Free will) काही करता येत नाही असा दावा. सर्व काही पूर्वनिश्चित आहे. ईश्वरेच्छा बलीयसी. लाप्लास तर म्हणाला होता की आज जर जगाचे सारे ज्ञान मला प्राप्त झाले तर उद्या काय घडणार हे मी निश्चितपणे सांगू शकतो! ‘द ओरिजिन ऑफ स्पेसीज’ प्रसिद्ध झाले आणि हे संगतवार विचारविश्व उध्वस्त झाले. डार्विन समंजसपणे सांगतो की सजीवातील जनुकीय बदल हे यादृच्छिक (Random) असतात. देवाघरचे नेमानेम, विचित्र नसून मुळात अस्तित्वातच नाहीत, हे डार्विनला ज्ञात झाले. ईश्वरेच्छाही बलीयसी नाही आणि स्वेच्छाही बलीयसी नाही. पहिल्या पायरीत जनुकांच्या सारीपाटावर काय दान पडेल हे सांगता येत नाही आणि दुसऱ्या पायरीवरची निवड ही यमनियमबद्ध.  जैविक क्रियांचा हा जनुकीय जुगार अनेकांना धक्का देऊन गेला.
टेलिओलॉजी म्हणजे हेतुवाद. उदाः कोयीचा ‘नैसर्गिक हेतू’, आंब्याचे झाड होणे हा आहे. पण एवढेच नाही तर एकूणच ह्या जगरहाटीमागे कोणीतरी, काहीतरी हेतू बाळगून आहे, सारे काही घडते ते योजनापूर्वक आणि सहेतुक घडते अशी कल्पना. डार्विनकाळी धर्मशास्त्र, तत्वज्ञान आणि विज्ञान ह्या ज्ञानशाखांची गच्च जाळी एकमेकांत गुंतलेली होती. ढणढणत्या धर्म दिव्याचा उजेड कमी आणि धूरच फार होत होता. या धुरातून गुदमरत  विज्ञान वाट शोधत होते. तेंव्हा हेतू-कल्पनाही वैचारिक वातावरणात भरून राहिली होती.  डार्विनप्रेरित नव्या जीवशास्त्रात निसर्गाला असा कोणताही हेतू आवश्यक ठरत नाही. ही सृष्टी कशी निर्माण झाली? या सृष्टीत, जीवसृष्टी कशी निर्माण झाली? आपण कसे निर्माण झालो? आणि या साऱ्याचा हेतू काय? हे मानवी मनाला पडलेले चिरंतन प्रश्न. प्रत्येक धर्मानी आणि धर्ममार्तंडांनी, कित्येक पंथांनी आणि पंडितांनी, यांची उत्तरे दिली आहेत. अर्थात वेगळीवेगळी. कितीतरी तर परस्परविरोधी. डार्विननी या साऱ्या प्रयत्नांना एक वेगळीच कलाटणी दिली. अर्थशून्य भासणारा कलह जीवनाचा,  मुळात हेतूशून्य आहे हे त्याने सप्रमाण सिद्ध केले.
अंतिम कारण (Final cause) अशीही एक संकल्पना होती. समस्येचे जिथे भौतिक समाधान नसायचे अशा प्रश्नांना डार्विनपूर्व शास्त्रज्ञ अंतिम कारणाचा टिळा लावून मोकळे व्हायचे. ‘विज्ञान जिथे संपते तिथे अंतिम कारण सुरु होते’ असे काही तरी ते होते. त्यातही भौतिक क्रियांच्या मागची करणे स्पष्ट होत होती. दगड पडतो तो गुरुत्वाकर्षणामुळे आणि पाणी थंड होते ते त्यातील उष्णता आसपास पसरते म्हणून. पण जैविक क्रियांचा अन्वय लावणे अवघड झाले होते. मोराला पिसारा असतो आणि लांडोरीला नसतो कारण त्यांची संप्रेरके भिन्न भिन्न आहेत. हे झाले तात्कालिक कारण पण ती तशी का आहेत हे कुणालाच ठाऊक नव्हते. हा प्रश्न मती गुंग करणारा होता.  अशा प्रश्नात अंतिम कारण उपयोगी ठरे.  कित्येक जैविक क्रिया तर हेतुतः होतात असे दिसतच होते. हृदयाचे कामच मुळी रक्त पंपणे आणि किडनीचे मूत्र तयार करणे, नाही का? हाच तर त्यांच्या अस्तित्वाचा अंतिम हेतू. पण हे अवयव ही मुळी उत्क्रांतीची देन, असे डार्विननी दाखवून दिले. हृदय विचारपूर्वक, हेतुतः रक्त पंपत नाही! आणि लघवी बनवण्यात किडनीच्या आयुष्याची इतिःकर्तव्यता नाही.
अगदी प्लेटो, पायथॅगोरस पासून टायपोलॉजी/इसेन्शीयालिझमची कल्पना घट्ट रुतून बसली होती. जगात सर्व जड वस्तू ह्या विविध ‘प्रकारात’ (Types/Essences) मोडतात आणि हे प्रकार अपरिवर्तनीय आणि स्थिर आहेत अशी ती कल्पना. जग म्हणजे ह्या काही मर्यादित प्रकारांचीच विविध रूपे आहेत आणि हे प्रकार एकमेकांशी संपूर्ण फारकत बाळगून असतात. त्रिकोणाचेच बघा ना. त्याचा आकार लहान मोठा असेल पण काहीही असला तरी त्रिकोण तो त्रिकोण. तो चौकोन होऊ शकत नाही. शिवाय त्रिकोण आणि चौकोन यात मधलीअधली स्थिती नसते. अशाच काहीशा विचारातून मानवी वंशरचनेची मांडणी होत होती. कॉकेशिअन, आफ्रिकी, मंगोल हे वंश; त्यांची काही उतरंड आणि हे सारे कायमस्वरूपी आणि दैवदत्त असल्याची ठाम जाणीव प्रचलित होती. मानवी वंशांचीच सरमिसळ जिथे अशक्य मानली होती, तिथे नर आणि वानराचा पूर्वज एकच होता ही कल्पना कशी बरे पचावी? प्रत्येक प्रजाती ही स्वतंत्र आणि अन्यांशी कसलेही ऐतिहासिक नाते नसलेली मानली गेली होती.  डार्विन विचारांनी ही रचना मोडून पडली. मधल्याअधल्यांना काही स्थान मिळाले. सजीव  अपरिवर्तनीय ‘टाइप्स’ नाहीत आणि उच्चनीचही नाहीत हे समजले.
पण डार्विनचा सिद्धांत हाती पडताच टायपॉलॉजीवाले हरखून गेले. वंशवादाचे खणखणीत आणि शास्त्रीय समर्थन सापडल्याचा दावा केला जाऊ लागला. शिवाय जगण्याची जर स्पर्धा आहे तर त्यात काही मागे पडणारच, तेंव्हा असे जगायला नालायक लोक हीन आहेत असे समजणे चुकीचे कसे? ‘सोशल डार्विनझम’नावे खपवला जाणारा हा युक्तिवाद, मुळातच डार्विनच्या सिद्धांताचा विपर्यास आहे. उलट डार्विनने टायपॉलॉजीला टांग मारून समूहकेंद्री दृष्टीकोन मांडला (पॉप्युलेशन थिंकिंग) असे अर्न्स्ट मायरने दाखवून दिले आहे. साऱ्या प्रजाती ह्या एकमेवाद्वितीय अशा जीवांचे समूह आहेत. इथे धरतीच्या पाठीवर नांदणारे कोटी कोटी मानव आहेत पण प्रत्येकजण ‘सर्वाहुनी निराळा’ आहे. फरक आहेत ते तपशीलात मुळात सारे एक आहेत. वंशवादाचे समर्थन टायपॉलॉजीत सापडेल कदाचित पण डार्विनीझममध्ये नाही.
जगण्याची जर ‘स्पर्धा’ असेल तर प्रत्येक स्पर्धकाचं अ-हित हेच आपलं हित नाही का? आपल्याच भाईबंधांप्रती प्रेम, जिव्हाळा, त्यांचं लालन, पालन, पोषण म्हणजे स्वतःला वैरी निर्माण करणे नाही का? यावर बराच उहापोह झाला आहे. या अशा सहकार्यामुळे तो समूहच्या समूह/कुटुंब/प्रजाती तगायला मदत होते. इतकंच काय कुणाला किती सहाय्य करायचं याचंही गणित मनातल्या मनात मांडलेलं असत. आधी सगे, मग सोयरे, मग जातभाई, मग अन्य काही, अशा क्रमानी उपकार केले जातात. पुढे कधीतरी परत फेडीच्या अपेक्षेनेही उपकार केले जातात. सबब स्पर्धेसारखाच सहकार हाही उत्क्रांतीला उपकारक असू शकतो. समाज म्हणून जगू पहाणाऱ्या जीवांत; यात माणूस आहे, मुंग्या आहेत आणि इतरही बरेच कोणकोण आहेत; सहकाराला तरणोपाय नाही. म्हणजेच परोपकाराला उत्क्रांतीतत्वात स्थान आहे. सोशल डार्विनिझम  आणि त्यातील टोकाच्या  स्वार्थलोलूप वृत्तीचे, वंशवादाचे, उच्च नीचतेचे समर्थन हे डार्विन विचाराचे अपुरे आकलन आहे तर.
सृष्टीचा प्रवास ‘त्याच्या’ देखरेखीखाली सतत कोणत्यातरी आदर्शवत अवस्थेकडे चालू आहे अशी ग्रीक कल्पना होती. जीवाश्मांचा शोध लागत होता. ‘साध्याश्या’ जीवांपासून ‘गुंतागुंतीचे’ जीव अशी चढती भाजणी उत्क्रांत झालेली दिसत होती. पण डार्विन सांगत होता, उत्क्रांतीची वाटचाल कोण्या आदर्शाच्या दिशेने नसून; चुकतमाकत, अडखळत होणारा, निव्वळ जगण्याला, तगण्याला, अनुकूल बदल सामावून घेत जाणारा, तो एक संथ प्रवास आहे. सतत उत्कर्ष, सतत उत्तमाकडे वाटचाल असा तो मुळीच नाही. प्रजातींत होणाऱ्या बदलाची दिशा कोणी जगन्नियंता ठरवत नसून ती नैसर्गिक निवडीच्या दाबदबावांमुळे आपोआप घडणारी क्रिया आहे. साधे जीव,  अप्रगत  आणि गुंतागुंतीची रचना असणारे, प्रगत; अशी कल्पना चुकीची आहे. जो जो, ज्या ज्या परिसंस्थेत जगतो आहे; तो तो, त्या त्या परिसंस्थेत जगायला सर्वात उत्क्रांत आहे म्हणूनच जगतो आहे.
कोण्या सर्वात्मक सर्वेश्वराने, करुणार्णव करुणाकराने, सृष्टी निर्मिती केली म्हणावे तर ह्या सृष्टीतील हीन पदोपदी अडचणीचे ठरत होते. जिवंतपणी दुसऱ्या जीवाचा घास करणारे परोपजीवी इथे होते. मग तो कर्ता प्रेमळ कसा? काळाच्या ओघात नष्ट झालेल्या कितीतरी बलदंड प्रजातींचे जीवाश्म सापडत होते. हा संहार त्या करवत्याच्या शांतीसंदेशाशी विसंगत नाही का?  अपेंडिक्ससारखे आता अडगळ ठरलेले अवयव होते. मग त्याची निर्मिती परिपूर्ण कशी म्हणावी? वातावरणातील आणि परिसरातील बदलांना जुळवून घेत प्रजाती जगल्या होत्या, जगत होत्या. यात अपयश आले तर होत्याच्या नव्हत्या होत होत्या, अनुकूल बदल टिकणार, नाहीतर ती प्रजाती संपणार, हे चक्र तर अव्याहत होते. मग अंतिम हेतू नेमका कोणता? याउपरही विश्व काही हेतूने चालवले जात आहे असा दावा होता, आजही आहे. पण विज्ञान अशी कल्पना उराशी बाळगून नाही.
सजीवांच्या सौंदर्याचे आश्चर्य मिश्रित कौतुक असते आपल्याला. त्यांच्या बिनतोड रचनेचे केवढे गारुड असते आपल्या मनावर. जगदीशाच्या ऐशा लीला; त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का?; गंध का हासतो, पाकळी सारुनी...खुण घे जाणुनी, रूप हे ईश्वरी; अशी गाणी रचतो आपण. जगभरातल्या संस्कृतींनी आणि धर्मांनी, जीवांची गुंतागुंतीची रचना, हा तर ईश्वराच्या अस्तित्वाचा पुरावाच मानलाय. पण योगायोगानी घडणारे बदल, नैसर्गिक निवड आणि प्रचंड कालपट या योगे हे ईश्वराविनाही शक्य आहे हे सिद्धच केले डार्विनने. पण निसर्गात सौंदर्य असते तसे क्रौर्यहि असते. जेवढे सुस्वरूप आहे तेवढे कुरुपही आहे. निसर्गातील सौदर्याची  आणि क्रौर्याची डार्विननी एकाच फटक्यात मीमांसा मांडली. जे जे मंगल घडते ते सात्विक, सत् शक्तीमुळे आणि अमंगळ ते ते नाठाळ सैतानामुळे ही समज डार्विनच्या माऱ्यापुढे फारच बाळबोध ठरली.
डार्विनने सर्व अतिनैसर्गिक शक्ती  आणि कार्यकारणभाव प्रथमच मोठ्या ताकदीने नाकारले. या आधीही नास्तिकांनी हे सारे नाकारून झाले होतेच. पण या नाही रे वाल्यांना, ना विश्वोत्पत्तीचा थांग होता ना जीवोत्पत्तीचा पत्ता. तेंव्हा आहे विरुद्ध नाही ही फक्त शब्दबंबाळ लढाई होती. शिवाय आहे रे वाल्यांकडे अनेकानेक अनुत्तरीत, अनाकलनीय अशा निसर्गलीलांची जंत्री होती. डार्विनने जैववैविध्य, सजीव अन् परिसराचे तादात्म्य आणि त्यांची उत्पत्ती-स्थिती-लय असा मोठाच कूटप्रश्न अत्यंत जडवादी, भौतिक दृष्टीकोनातून सोडवून दाखवला. देशोदेशीच्या विविध जीवोत्पत्ती कथा ह्या प्रत्यक्षातल्या निसर्गवाचनाशी मुळीच सुसंगत नाहीत हे त्यानी दाखवून दिले. अचानक देवाची गरजच संपली. एकुणातच डार्विनने निदान विज्ञानातून तरी देवाला आणि सैतानालाही हद्दपार करून टाकले. बुद्धीप्रामाण्यवादाला आता वादातीत महत्व आले.

डार्विन आणि माणूस
पण डार्विनची सगळ्यात मोठे काम कोणते असेल तर त्याने माणसाला सिंहासनभ्रष्ट केले. अर्थात हे सिंहासन माणसानीच स्वतःसाठी घडवले होते आणि मोठ्या ऐटीत तो त्यावर विराजमान होता. देवाच्या ह्या लाडक्या लेकराला खाली खेचून इतर जीवांच्या पंक्तीला बसवले ते डार्विनने. आधुनिक जीवशास्त्र कोणत्याही जीवाला कमी लेखत नाही. उलट चार शुल्लक प्राण्यांपेक्षा आपण कोणी खास आहोत, सारी सृष्टी ही देवाने आपल्या करमणुकीसाठी आणि खाण्यापिण्याची सोय म्हणून उत्पन्न केली; सबब माणूस सोडता अन्य जीव नीच आणि माणूस, देवदूत, देव अशी पुढे चढती भाजणी अशी बऱ्याच धर्मांची मांडणी आहे. ती किती कोती आहे हे उत्क्रांतिवाद दाखवून देतो. माणूस म्हणून आपण फार माज टाकायची काही गरज नाही. ‘मानवाचे अंती गोत्र एक’ ही भावना उदात्त आहेच पण उत्क्रांतीची, ‘सजीवांचे अंती गोत्र एक’, ही भावना तर त्याहीपेक्षा उदात्त आहे.
 अर्थात माणूस हा प्राणीच असला तरी इतर अनेक अर्थानी प्राणीसृष्टीत आगळा वेगळा आहेच. बुद्धिमत्ता अनेकांकडे आहे पण माणसाचे बुद्धीवैभव अन्योन्य. भाषा तर साळुंक्याही बोलतात, पण व्याकरण आणि अन्वयार्थ असणारी माणसाची बोली अन्योन्यच. इतकेच काय नीती आणि रीतीभाती असणारी समृद्ध संस्कृती हा देखील मानवी करिश्मा. ह्या साऱ्यामुळे माणसाचे स्थान अन्य सजीवांपेक्षा वेगळे आहे खास पण ते अन्यांपेक्षा उच्च खासच नाही.

उपोद्घात
आज जग भलतेच बदलले आहे आणि ह्या बदलाला विज्ञान आणि तंत्रज्ञान कारणीभूत आहे. पण यातही डार्विनविचाराचा हिस्सा ललामभूत आहे हे आपल्या लक्षातही येत नाही. आजच्या जीवशास्त्रातल्या गाभ्याच्या कल्पना देणारा आणि हे कसे घडत असावे याचा अचूक अंदाज देणारा डार्विन होता. कितीतरी प्रचलित समजुतींना त्यांनी धक्का दिला, कित्येक नेस्तनाबूत झाल्या, कित्येक नव्या कल्पना त्याने पेरल्या; त्या रुजल्या, वाढल्या, फोफावल्या. जीवशास्त्रात तर डार्विनची प्रभा डोळे दिपवून टाकते. आज तत्वज्ञानापासून ते मनोव्यापारापर्यंत आणि समाजशास्त्रापासून ते खगोलशास्त्रापर्यंत त्याच्या विचाराशलाका मार्ग दाखवत आहेत. डार्विननी माणसाचा स्वतःकडे आणि सृष्टीकडे पहाण्याचा दृष्टीकोनच बदलून टाकला. या विश्वाकडे पहाण्याचा भव्योत्कट, विनम्र, विस्मय ही डार्विन विचाराची खरी देन आहे.


Saturday, 27 January 2018

सत्य, सत्यपालसिंह आणि डार्विन

सत्य, सत्यपालसिंह आणि डार्विन.
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई (जि. सातारा) पिन ४१२ ८०३
मो. क्र. ९८२२० १०३४९

“माकडा पासून माणूस निर्माण झालेला नाही कारण आमच्या पूर्वजांनी तसे काही नोंदलेले नाही”, इतिः सत्यपालसिंह. खरेतर त्यांनी असे काही बोलल्यावर, प्रचलित पद्धतीनुसार, ‘आमच्या ‘नाजूक वैज्ञानिक भावना’ दुखावल्याबद्दल त्यांचा शिरच्छेद करायला हवा’, अशीच मागणी मी करायला हवी. अर्थात मी तसे म्हणणार नाही. त्यांना शिरच्छेदाची नाही तर माहितीची गरज आहे. सर्वसामान्यपणे उत्क्रांतीबद्दल समाजात जे गैरसमज असतात तेच त्यांच्या बोलण्यातून दिसतात.
मुळात माणूस हा माकडापासून निर्माण झाला असे डार्विनने कुठेच म्हटलेले नाही. त्यांनी असे दाखवून दिले की मानव आणि मर्कट हे एकाच पूर्वजांचे वंशज आहेत. म्हणजे आपल्या चुलत भावापासून आपण जन्माला आलो असे आपल्याला म्हणता येईल का? नाही, पण आपले आजोबा एकच होते, हे सत्य आहे. तसेच हे. हा धक्का पुढारलेल्या पाश्चात्यांच्याही पचनी पडलेला नाही. डार्विनच्या हयातीतही यावर अत्यंत हीन वाद झडले होते.
आजही तिकडे उत्क्रांतीवादाला विरोध करणारे आणि बायबलमधील विश्वनिर्मिती हेच अंतिम सत्य मानणारे अनेक धर्मांध लोक आहेत. तिथेही सत्यपालसिंह आहेत. बरेच आहेत. तिथल्या राजकारणात, समाजकारणात याचं मोठं प्रस्थ आहे.
उत्क्रांतीवाद्यांचा दावा असा की संपूर्ण जीवसृष्टी ही प्राथमिक अवस्थेतल्या सजीवांपासून सावकाशपणे उत्क्रांत  होत आली आहे. आजची सजीवांची विविधता हा उत्क्रांतीचाच एक भाग आहे आणि माणूस हा देखील एक प्राणीच असून या उत्क्रांतीचंच फलित आहे. तर विरोधी पक्षाचं म्हणणं असं की अगदी प्रथमावस्थेतील प्राण्यात देखील अत्यंत गुंतागुंतीची जैवरासायनिक रचना असते. केवळ चार रसायने अपघाताने एकत्र आली म्हणून ते रेणू ‘जीव’ धरू शकत नाहीत. तेव्हा सजीवांची उपज ही कोण्या बुद्धिवान निर्मिकानं केलेली करामत आहे. ही मंडळी यासाठी मोठा मासलेवाईक दाखला देतात. समजा चालता चालता तुम्हाला एक दगड दिसला तर तो तिथे निसर्गतः आहे हे मान्य करता येईल, पण एखादं घड्याळ आढळलं तर ते काही निसर्गतः घडलेलं नाही हे उघड आहे. घड्याळ्याच्या निर्मितीमागे कोणीतरी कसबी कारागीर आहे हे निश्चित. तद्वतच सजीवांची गुंतागुंतीची रचना निव्वळ निसर्ग-अपघातांनी, आपोआप घडून येणे, अशक्य आहे. हा तर कुणा कुशल निर्मिकाचा खेळ.
उत्क्रांतीवाद असे दाखवून देतो की, अशा कोण्या घड्याळजीची गरजच नाही. स्वतःच्या नकला काढू शकणारे रेणू (म्हणजे आपली गुणसूत्रे), ह्या नकला काढताना होणारे किंचित किंचित बदल आणि नैसर्गिक निवडीची न-नैतिक, दिशारहित, शक्ती हीच जीवोत्पत्तीचे कारण आहे. ही शक्ती अशी आंधळी आहे(Blind watchmaker). तिला काया, वाचा, मन, काही काही नाही.
आणखीही काही युक्तीवाद आहेत. समजा एखाद्या जंबोजेटचे सारे भाग सुटे करून एखाद्या आवारात ठेवले आणि चक्रीवादळासरशी ते एकत्र येऊन जम्बोजेट बनलं, असं कुणी सांगितलं, तर ते विश्वसनीय वाटेल का? जम्बोजेट सारखी गुंतागुंतीची रचना केवळ वाऱ्यानं घडू शकेल का? निर्मितीवाद्यांचं म्हणणं असं, की वादळानं जम्बोजेट बनणं जसं असंभवनीय आहे, तद्वतच उत्क्रांतीनं सजीवांची निर्मितीही असंभवनीय आहे.
मात्र उत्क्रांतीवाद्यांच्या मते हा सारा उत्क्रांतिवादाचा शुद्ध विपर्यास आहे. आलं वारं आणि झालं जम्बोजेट तयार, असा मुळी युक्तीवादच नाहीये. पृथ्वीचं काही कोटी वर्षं असलेलं वय, त्या काळातले भूकवचातले आणि वातावरणातले बदल, प्रयोगशाळेत निर्माण करता आलेली अमिनोआम्ल, ठिकठिकाणी सापडलेले जीवाश्म आणि अव्याहतपणे तयार होणाऱ्या, आणि बदलाशी जुळवून न घेता आल्यामुळे, नष्ट होणाऱ्या प्रजाती, हा सारा उत्क्रांतीच्या बाजुने भक्कम पुरावा आहे.
अशा साऱ्या चर्चेत पाश्चात्य धर्मवाद्यांनी केलेली अचाट आणि अफाट विधानं वाचून खूप बरं वाटतं. बरं अशासाठी की झापडबंद विचार करण्याचा मक्ता काही निव्वळ भारतीयांकडे नाही, त्यात थोडे पाश्च्यात्यही आहेत, ही ती सुखद जाणीव.
जीवोत्पत्तिच्या अनेक कल्पना अनेक शास्त्रज्ञ मांडत होते. डार्विन कोणी साक्षात्कारी पुरुष होता किंवा त्याच्या पंजोबाना काही ‘दिसलं’ होते म्हणून त्याचा सिद्धांत मान्य झाला असे काही नाही. त्याच्या पुढे मागे अनेक सिद्धांत आले आणि गेले. उदाहरणार्थ लामार्क यानेही उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला होता. पुढे तो मागे पडला. जगताना झालेले शारीरिक बदल पुढील पिढीत संक्रमित होतात अशी त्याची मांडणी होती. ह्याचे गाजलेले उदाहरण म्हणजे जिराफाची लांब मान. लामार्कची मांडणी अशी, की उंचावरचा पाला खाता खाता आखूड मानेच्या जीराफांच्या माना लांबल्या, मग त्यांच्या मुला-बाळांच्याही लांबल्या आणि परिणामी काहे पिढ्यात लांब मानेचे जिराफ तयार झाले. अर्थात एके काळी ह्या मांडणीला बरीच मान्यता असली तरी नवीन संशोधनानंतर हा सिद्धांत मागे पडला. कोणाचा हात तुटला म्हणून त्याला थोटी मुले होत नाहीत आणि जन्मतः सुंता केल्याने कुणाला सुंता झालेली मुले होत नाहीत.
उत्क्रांतिवाद सांगतो, निसर्गतः काही जिराफ ऊंच मानेचे निपजतात (Variation); त्यांना जगण्याच्या, तगण्याच्या आणि म्हणून जुगण्याच्या, अधिक संधी प्राप्त होतात (Natural Selection); परिणामी पिढ्यांपिढ्या माना ऊंच ऊंच होत जातात, अखेरीस ऊंच मानेचा जिराफ ही नवीनच प्रजाती उत्पन्न होते (Speciation). थोडक्यात नव्या नव्या प्रकारचे जीव निर्माण होण्यात कर्ताकरविता हात हा नैसर्गिक निवडीचा आहे, त्यासाठी कोणत्याही शक्तीची कल्पना अनावश्यक आहे.
उत्क्रांतीचा प्रवास हा चुकतमाकत, खाचखळग्यातून, वेडावाकडा, कित्येक बंद गल्ल्यांशी घुटमळणारा प्रवास आहे. हा प्रवास ‘उन्नती’च्या दिशेने नाही तर ‘परिस्थितीशी अनुकूल बदल’ होण्याचा दिशेने आहे. हे बदल यादृच्छेने (Random), निसर्गतः होत असल्याने, त्यांना निश्चित दिशा नाही, अनिश्चित कालावधी मात्र आहे. अक्षर ओळख नसताना निव्वळ काहीतरी आकार काढता काढता आपले नाव आपल्याकडून बिनचूक लिहिले जाण्याची शक्यता खूप कमी आहे. तसे व्हायचेच झाले तर कितीतरी काळ प्रयत्न करत रहावे लागेल. उत्क्रांतीला असाच प्रचंड काळ लागतो. हा कालपट समजावून घेणे हा उत्क्रांतीचा अभ्यास करण्यातला महत्वाचा टप्पा आहे. पृथ्वीचे कोट्यवधी वर्षांचे वय आणि जीवांच्या उत्पतीचा कालावधी पहाता, आपली आयुष्ये निमिषमात्रही नाहीत. त्यामुळे आपल्याला दोन-तीन पिढया, किंवा काही हजार वर्षे, एवढी कल्पना सहज जमते. पण उत्क्रांतीसाठी जी अति दीर्घकाळाची कल्पना करावी लागते तिथे आपले घोडे अडते. उत्क्रांती आपल्याला अशक्य कोटीतली वाटायला लागते.
उत्क्रांती म्हणजे सतत उर्जीतावस्थेकडे प्रवास असाही काहींचा गोड गैरसमज असतो. बऱ्याच फांद्यावाले डेरेदार झाड आणि त्याच्या टोका-टोकाला एकेक सजीव असे चित्र जीवशास्त्राच्या पुस्तकात हमखास दिसते. या झाडाच्या सर्वात ऊंच फांदीवर असतो माणूस. माणूस हा सगळ्यात अधिक उत्क्रांत प्राणी, असे सुचवणारे हे चित्र साफ चुकीचे आहे. लक्षात घ्या, गांडूळ चिखलात राहू शकते, तुम्ही आम्ही नाही. म्हणजेच चिखलात रहाण्यासाठी गांडूळ हा सर्वात उत्क्रांत जीव आहे. आपण गांडूळाची जागा घेऊ शकत नाही आणि गांडूळ आपली जागा घेऊ शकत नाही. त्या त्या ठिकाणी तो तो जीव सर्वात उत्क्रांत जीव आहे, म्हणुनच तर तो आहे. अन्यथा तो केंव्हाच नष्ट झाला असता. थोडक्यात सर्वच जीव त्यांच्या त्यांच्या परिस्थितीत, परिसंस्थेत सर्वात उत्क्रांत आहेत. माणूस म्हणून आपण फार माज टाकायची काही गरज नाही. आधुनिक जीवशास्त्र कोणत्याही जीवाला कमी लेखत नाही. उलट सारी सृष्टी ही देवाने माणसाच्या करमणुकीसाठी आणि खाण्यापिण्याची सोय म्हणून उत्पन्न केली; सबब माणूस सोडता अन्य जीव नीच आणि माणूस, देवदूत, देव अशी पुढे चढती भाजणी अशी बऱ्याच धर्मांची मांडणी आहे. ती किती कोती आहे हे उत्क्रांतिवाद दाखवून देतो. ‘मानवाचे अंती गोत्र एक’ ही भावना उदात्त आहेच पण उत्क्रांतीची, ‘सजीवांचे अंती गोत्र एक’, ही भावना तर त्याहीपेक्षा उदात्त आहे.
उत्क्रांतीच्या स्पर्धेत सबल तेवढे टिकतात असाही एक लोकमान्य गैरसमज आहे. मुळात हत्यारे आणि संस्कृती काढून घेतली तर माणूस दुर्बलाहूनही दुर्बल आहे. तेंव्हा बळ हे अनेक प्रकारचे असते हे लक्षात घेतले पाहिजे. बाहू-बळ आहे तसेच बुद्धिबळही आहे. मानवापेक्षाही महाकाय असे प्राणी काळाच्या ओघात नष्ट झाले आहेत आणि इवली लव्हाळी टिकली आहेत. लढायाही अनेक प्रकारच्या असतात. दुष्काळात तगण्यासाठी शुष्कतेशी सामना जमायला हवा, थंडीत तगून रहाण्यासाठी शीत-युद्ध जिंकता यायला हवे आणि तुमच्या सवयीच्या आहारातल्या ऐवजी एखाद्या वेगळ्याच वनस्पतीने सर्व परिसर व्यापला, तर आता ती पचवण्याची तुमची ‘ताकद’ हवी. अशा अनेक ताकदी, अनेक लढाया, अनेक कुरुक्षेत्रे, जीवांची क्षमता जोखत असतात. प्रश्न निव्वळ शारीरिक ताकदीचा नाही. बदलता परिसर, बदलती परिसंस्था, बदलते वातावरण या साऱ्याचा सजीवांच्या, जगण्या-तगण्या-जुगण्या-प्रसवण्यावर अनेकांगांनी दबाव येत असतो (Selection Pressure). उत्क्रांती म्हणजे या नित्यनूतन, दबावात जे उरतात ते पुढे पुढे जातात. जे मोडतात ते संपतात. उद्याच्या दाब-दबावाचा ना  उत्क्रांतीला थांग असतो, ना सजीवांना पत्ता. बंदुकीच्या शोधाचा अंदाज वाघांना होता काय?
जगण्याची जर ‘स्पर्धा’ असेल तर प्रत्येक स्पर्धकाचं अ-हित हेच आपलं हित नाही का? आपल्याच भाईबंधांप्रती प्रेम, जिव्हाळा, त्यांचं लालन, पालन, पोषण म्हणजे स्वतःला वैरी निर्माण करणे नाही का? यावर बराच उहापोह झाला आहे. या अशा सहकार्यामुळे तो समूहच्या समूह/कुटुंब/प्रजाती तगायला मदत होते. इतकंच काय कुणाला किती सहाय्य करायचं याचंही गणित मनातल्यामनात मांडलेलं असत. आधी सगे, मग सोयरे, मग जातभाई, मग अन्य काही, अशा क्रमानी उपकार केले जातात. पुढे कधीतरी परत फेडीच्या अपेक्षेनेही उपकार केले जातात. सबब स्पर्धेसारखाच सहकार हाही उत्क्रांतीला उपकारच असतो.
डार्विनकडे जीवमात्रांच्या शरीर रचनेतील साम्य एवढाच पुरावा होता. आता जीवाश्मातील, शरीरक्रीयातील, जैव-रासायनिक आणि जनुकीय साम्य असा सज्जड पुरावा आहे. हा नाकारून नव्या सिद्धांतासाठी तीतकाच भरभक्कम पुरावा समोर आला तर डार्विनचा सिद्धांतही नापास ठरेल. डार्विन नाकारणारी नवी समज, ही तपासता येतील अशा तत्वांवर बेतलेली असावी. ‘आमचे पूर्वज काही वेडे होते का?’ वगैरे अभिनिवेशी भाषा त्यात नसावी, अशी किमान अपेक्षा आहे. ‘आमच्या आजा-पणज्यांनी काही म्हटलेले नाही, सबब डार्विन अमान्य’, हे सत्यपालसिंहांचे विधान म्हणुनच मान्य करणे शक्य नाही.


 प्रथम प्रसिद्धी महाराष्ट्र टाईम्स, २८ जाणे २०१८

Sunday, 1 May 2016

कुलिओ आठवतो आजही

कुलिओ आठवतो आजही.

डॉ.शंतनू अभ्यंकर,वाई. जि. सातारा. पिन. क्र. ४१२ ८०३.


कुलिओ आठवतो आजही. काही अवघड प्रश्नांची सोपी उत्तरं त्यानी पुन्हा अवघड केली माझ्यासाठी. म्हणून कायमच लक्षात राहील तो.

वाई-मुंबई-पॅरीस-लिमा असा तीस तासांचा प्रवास करून आलो, तर आल्याआल्याच ह्या गचाळ माणसाशी गाठ पडली. उंचीला बुटका, रंगाला पिवळट विटका, बारीक  बारीक डोळे, बोकड दाढी आणि खडूसारखी पांढरी बत्तीशी. विमानतळाबाहेर पार्किंग लॉटमधे त्यानी आमचं स्वागत केलं. ढगळ जीन्स, भडक टी शर्ट, चित्र विचित्र चित्राचं जॅकेट, कमरेला पाउच, पाठीवर सॅक, आणि भलामोठा सप्तरंगी बिल्ला लावलेली वेताची हॅट. हॅट उचलून त्यानी आमचं स्वागत केलं, तर नजरेत भरला त्याच्या डोक्यावरचा, टाळूपासून मानेपर्यंतचा निव्वळ मधोमध उभा असलेला, केसांचा लाल भडक रंगवलेला पुंजका. हे ध्यान पुढे तीन आठवडे आमचं गाईड असणार होतं. खिशातून कसलीशी पानं काढत त्यानी ती आमच्या हातात दिली. म्हणाला “इत ठिस लीफ, इत ठिस लीफ. इस कोकेन. इन पेरू, कोकेन लीगल. इत.” मढ्याच्या तोंडात तुळशीपत्र असावं तशी आम्ही ती पानं त्याच्या आग्रहाखातर तोंडात धरली. पण पुढे काहीच केलं नाही. त्यानीच मग मुठभर पानं घेऊन, हातात चुरून, त्याचा तोबरा भरून, आम्हाला डेमो दाखवला. अर्ध्या पृथ्वीला प्रदक्षिणा घातल्यावर आम्हाला चहाची तहान लागली होती. ती कोकेनवर भागणार नव्हती. आम्ही चहाची टपरी शोधू लागलो. शेवटी कॉफीची दिसली. “ओन्ली कॉफी, नो कोकेन” असं त्याला बजावत आम्ही तिकडे वळलो.

आम्ही कॉफी घेईपर्यंत, आम्हा पंधरा जणांचं सामान ट्रॉलीवरून बसमध्ये चढवता चढवता कडवटपणे तो पुटपुटला, ‘आमचं सोनं, चांदी नेताना ओझं नाही झालं तुम्हाला?’ मी अवाक झालो. मी किंवा माझे बापजादे याआधी कधी इकडे फिरकलो नव्हतो. सोनं चांदी लुटणं दूरच. ते लुटलं स्पॅनिशांनी, हा बोल लावत होता आम्हाला. सगळेच परदेशी लोक याला चोर लुटारू वाटत होते.

दस्तुरखुद्द पोप महाशयही नेमके ह्याच दिवशी, ह्याच वेळी, पेरूच्या दौऱ्यावर आलेले. त्यांच्या गाड्यांचा ताफा बाहेर पडत होता.  पोप-दर्शना आसुसलेल्या माणसांचा सागर तिथे उसळला होता. त्याच्या लाटा थांबवण्याचा पोलिसी प्रयत्न चालू होता. पोपसाहेबांची मिरवणूक आता पार्किंगलॉटच्या पलीकडच्या रस्त्यांनी जात होती. आम्ही भारतीय मात्र, पोप आणि माती आम्हा समान हे चित्ती, अशा भावनेनी शांतपणे कॉफी घुटकत उभे होतो. लांबवरच्या त्या जनसागराकडे, आणि पोपच्या पांढऱ्या तांबूस आकृतीकडे पहात कुलिओनी तोंडातला कोकेनचा तोबरा काढला, कचऱ्यात भिरकावला, बोटाचा आकडा करून लाळ पुसली आणि पोपच्या दिशेला एक जबरदस्त हिणकस शिवी हासडली. त्याचे बोली आम्हाला अपरिचित असली, तरी देहबोली परिचयाचीच होती. त्यामुळे तो जे काही बोलला, त्याला माफ करणं साक्षात पोपना सुद्धा जड जाईल एवढं आम्हाला समजलं.  पण एका कॅथॉलिक देशात हा जहरी पोपद्वेष का हे उमगलं नाही.

वर आमच्याकडे वळून प्रसन्नपणे हसून म्हणतो कसा, “क्मोन, वेलकम, गेट इन ड बस. यु ऑल लुक शाहरुख खान!! ऑल लेडीज करीना कपूर!!!” बॉलीवूडची ही पहुंच पाहून आमची कळी खुलली, मिजास वाढली.

म्हटलं तर कुलिओ एक गाईड. आमच्या बरोवर अॅमॅझॉनच्या जंगलातून, कुस्कोच्या बाजारातून, लिमाच्या झगमगाटातून, अॅण्डीजच्या शिखरांवरून, माचू पिचुच्या अवशेषांवरून फिरलेला. ओलाय्ताम्बो, उरीबाम्बो असली गोलमटोल नावं, सहज घेणारा. इंकांच्या वस्तीत जंगलातच लहानाचा मोठा झालेला. पुढे आपल्या काकाचं बोट धरून ह्या व्यवसायात उतरलेला, इतिहास आणि जीवशास्त्रात डिग्री होती त्याची. पुढे प्रयत्नपूर्वक इंग्रजी शिकला, आमच्याकडून अजून इंग्रजी शिकण्यासाठी आसुसलेला होता तो. पण टूरीस्ट सर्कीटचे वेढे घालता घालता याचाही प्रवास चालू होता, वेगळ्याच दिशेनी. त्याला कट्टर इंका व्हायचं होतं.

त्याच्या  हॅटवरच्या त्या रंगीबेरंगी बिल्याबद्दल मला उत्सुकता फार. शेवटी काही इमारतींवरही तसलाच झेंडा पाहून मला राहवेना. मी त्याला छेडलंच. रंगीबेरंगी पट्ट्यापट्ट्यांचा झेंडा हा ‘गे प्राईड परेड’मध्ये बघितला होता मी. आम्ही समलिंगी, विरुद्धलिंगी, उभयलिंगी, स्त्रैण, हिजडे... आमचे लैंगिक आचारही नैसर्गिकच आहेत. मानव जमात म्हणजे या विविधांगी लैंगिक व्यवहारांनी साकारलेलं सप्तरंगी इंद्रधनुष्य आहे. ह्यासाठी हा सप्तरंगी झेंडा.  कुलिओकडे तसाच बिल्ला पाहून मला वेगळीच शंका आली. मी छेडताच कुलिओ खवळलाच. म्हणाला, ‘हा इंकांचा झेंडा आहे आणि याचा अपमान सहन केला जाणार नाही!’ मी सॉरी सॉरी म्हणत माझा प्रश्न निव्वळ उत्सुकतेपोटी होता हे त्याला पटवून दिलं. त्याची कळी खुलली. त्यानी पुढे खुलासा केला, ‘इंद्रधनुष्य ही इंकांची एक देवता आहे आणि त्याचेच रंग ह्या झेंड्यावर आहेत. हा झेंडा निवडल्यावर गे चळवळीचा झेंडा इंकांनी निवडला म्हणून भरपूर चेष्टा झाली, कुचेष्टा झाली. पण शेवटी श्रेष्ठतम अशा इंकानी असं दाखवून दिलं की, इंद्रधनुष्य अनादी कालापासून आहे आणि ‘गे’ चळवळ नवीन! तेव्हा ह्या रंगांवर ‘गें’पेक्षा इंकांचा जास्त हक्क आहे. त्या मुळे हाच झेंडा मुक्रर झाला.’ कुलिओ शुद्ध इंका वंशाचा होता (म्हणे) आणि त्याचा त्याला दुर्दम्य दुराभिमान होता. ही त्याची फक्त झलक होती.

पुढे त्याच्याशी घसट वाढली आणि त्याचे वेगवेगळे पैलू समोर येऊ लागले. त्याला सगळंच येत होतं. जंगलातच लहानाचा मोठा झाल्यामुळे झाडे, वेली, पशू, पाखरे यांच्याशी दोस्ती होतीच. शिकार साधत होती. एका झाडाचा काटा घ्यायचा, त्याला दुसऱ्या एका झाडाचा विषारी रस लावायचा आणि बांबूच्या नळीतून तो काटा जोरात फुंकून उडवायचा. समोरच्या प्राण्याला तो काटा लागला की काही वेळात तो प्राणी निश्चेष्ट पडलाच म्हणून समजा. हे सगळं त्यानी करून दाखवलं. पुढे टाळ्यांच्या आणि  काजोनच्या तालावर बेभान क्रिओल नृत्य करून झालं; चारांगोच्या तारांवर धीरगंभीर सूर छेडून झाले आणि उडत्या चालीची गाणीही तारसप्तकात म्हणून झाली. कुलीओचे हुन्नर किती म्हणून सांगावेत...फोटोग्राफी, पत्याच्या जादू, तट्ट्याच्या टोप्या, डायव्हिंग, ड्रायव्हिंग, स्वयपाक, हमाली....!

एके ठिकाणी बोटीत सामान चढवायचं होतं. चार दिवसापूर्वी आम्ही आलो तेव्हा नदी दुथडी भरून वहात होती. तुफान पाऊस होता. पण आता पाऊस थांबला होता आणि नदी पार रोडावली होती. त्यामुळे बोटीपर्यंत समान वाहून नेणं हे एक दिव्यच होतं. कुलिओनी शर्ट काढला, कमरेला बांधला. एक जाडजूड चादर खांद्याभोवती घेऊन त्याच्या झोळीत त्यानी दोन महाकाय बॅगा घातल्या. विमान प्रवासाच्या त्या बॅगा, चांगल्या मोठ्या होत्या. त्या बॅगांपुढे कुलिओ आता इवलासा दिसू लागला. पण बोटीकडे कूच करण्याआधी त्यानी बोटानी मला खुणावलं आणि आणखी एक बॅग डोक्यावर द्यायला लावली. हे ओझं घेऊन काट्याकुट्यातून नदी किनारी, आणि तिथून पुढे चिखल आणि दगडगोटे तुडवत अर्धा एक किलोमीटरची चाल होती. झपझप पावलं टाकत त्यानी ते अंतर तोडलं. बॅगा बोटीत ठेऊन तो परतही आला. पुन्हा एकदा आमच्या बॅगांचा द्रोणागिरी उचलत तो तितक्याच तडफेनी निघून गेला. एव्हाना जमेल तेवढं सामान हातात घेऊन आम्हीही वाळवंट तुडवत होतो. विषुववृत्ताजवळचं रणरणतं उन आणि जंगलातला कुबटपणा ह्यांनी घामाघुम होऊन, धापा टाकत आम्ही बोटीशी पोचलो. कुलिओ आता नव्यानी सामान आणायला परत फिरला. स्वयपाकाचं सामान घ्यायचं होतं. उरलेले बटाटे , पीठ-मीठ, भांडी-कुंडी गोळा करून, पोत्यात भरून तो फिरून बोटीशी आला. बोट आता निघाली. अॅमॅझॉनचं पाणी मधेच संथ तर मधेच खळाळून वहात होतं. पार दमल्या मुळे आम्ही बोटीत अवघडत आडवे होऊन पेंगत होतो. इतक्यात झाम्फोनच्या (बासरी) अलौकिक सुरांनी वातावरण भरून गेलं, भारून गेलं. चमकून पाहिलं तर  बोटीच्या टोकाशी कुलिओ रापलेल्या अंगानी बसला होता. पाय पाण्यात सोडून तो मजेत वाजवत होता. पायपीट, वैताग, गैरसोय, दमणूक, उष्मा, घाम अशा अनेक कटकटींवर त्याच्या सुरांचं मोरपीस गारूड करत होतं. आमच्यापेक्षा कितीतरीपट अधिक थकलेल्या, अधिक श्रमलेल्या कुलीओने  चक्क झाम्फोन ओठी लावला होता. त्यात जणू तो स्वतःचे प्राण फुंकत होता. हातांच्या नाजूक हालचालींनी त्याच्या थकलेल्या श्वासांचे तो निरागस सूर विणत होता.

आजचा दिवस खास होता. कुलीओसाठी. त्याच्या बायकोशी तो आज आमची ओळख करून देणार होता. पण बायको बद्दल त्याच्या आणि आमच्या कल्पना वेगवेगळ्या होत्या. स्त्री, सखी, सचिव आणि भार्या अशा वेगवेगळ्या पोस्ट वर त्याच्याकडे वेगवेगळ्या बायका होत्या. आज भेटली ती जंगल खात्यातच नोकरीला होती. खूप खोलवर जंगलात एक ऑक्स बो लेक होता. तिथे हिची नेमणूक होती. मग बरच अंतर जंगल तुडवल्यावर ते ठिकाण आलं. मग बायको भेटली. मग आमच्याशी ओळख वगैरे झाली. मग कुलिओ तिला रीतसर भेटला. (नेमकी रीत काय ते विचारू नका!) हिला स्पॅनिश आणि केचुआ एवढ्याच भाषा येत होत्या. एका बॅचला बोटीत घालून कुलिओ पक्षी निरीक्षणासाठी घेऊन गेला आणि तळ्याकाठी, तरूतळी तिचा आणि आमचा शब्देविण संवादू सुरु झाला. एकमेकांची भाषा अजिबात येत नसताना आम्ही एकमेकांबद्दल इतक्या गोष्टी जाणून घेतल्या की माझं मलाच आश्चर्य वाटलं. वास्को द गामा आला, पण लेकाचा त्या मल्याळी माणसांशी बोलला काय आणि कसा? हा प्रश्न मला पाचवी पासून सतावतो आहे. पण खाणाखुणा आणि हावभाव हे इतके माहितीबंबाळ होऊ शकतात याचं डेमोच झालं माझ्यासाठी.

ती जंगलातच आत कुठेतरी रहाते...सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तिची ड्युटी असते...तिला तीन मुलं आणी कुलिओ धरून दोन नवरे वजा जोडीदार आहेत...दोघंही दारू पितात पण कुलिओ जरा कमी पितो, ही सगळ्यात कमी पिते...तिच्या धाकटीला सतत सर्दीचा त्रास असून मी औषध दिलं तर तिला ते आवडेल...दिवसभरात ६०- ७० लोकं येतात पण भारतातून आलेले आम्ही पहिलेच पर्यटक...या आधी भारतीय माणसं तिनी फक्त बॉलीवूडपटातच बघितली आहेत...ती घरनं डबा आणते...शिवाय वाटेत फळं, कंदमूळं मिळतातच...शेजारच्या खोपट्यात तीनी काही गिनी डुक्करही पाळले होते...कुलीओच्या आगमनाप्रीत्यर्थ आज भाजलेल्या गिनीडुकराचा चमचमीत बेत होता!!

थोड्याच वेळात कुलिओ आला. त्यानीही भराभरा रांधायवाढायला मदत केली. आमचं जेवण पुढ्यात आलं. उकडलेली बटाट्याची पावडर, उकडलेला बटाट्यांचा कीस आणि उकडलेला बटाटा असा सज्जड मेनू होता. तो अतिशय बेचव होता. बटाटा, साबुदाणा आणि मिरची ही मूळ इथलीच. पोर्तुगीजांनी हे पदार्थ भारतात आणले. हे शोध लावणाऱ्या ह्या महान संस्कृतीला बटाटेवड्याचा आणि साबुदाणावडयाचा मात्र शोध लावता आला नाही याच मला खूप खूप वाईट वाटलं. नाईलाजान समोरच्या बेचव बटाट्यात बरोबर आणलेलं बचाकभर लोणचं घालून आम्ही तो मेनू तिखट मानून घेतला.

एवढ्यात कुलीओचं ताट आलं. एका लाकडी ताटात ते गिनी पीगचं कलेवर उपडं पडलं होतं. हात पाय आळस दिल्यासारखे ताणलेले होते. शेपूट, नख्या आणी दात दाखवत ते निपचित पसरलं होत. त्याची छाती आणि पोट फाडून ठेवलं होत. आणि त्यातून आतल्या अवयवांचा चिखल बाहेर डोकावत होता.

मांस अशा पद्धतीनी खाणारा तो आम्हाला जंगली वाटत होता आणि इतकं जहाल तिखट खाणारे आम्ही त्याला रानटी वाटत होतो. पूर्वीही असंच काहीसं झालं होतं. गोरे उन्नत बाकी अवनत असं स्पॅनिशांना वाटत होतं. आज कुलीओला ह्याच्या बरोब्बर उलट वाटतंय.

शिरा ताणून ताणून तो बोलत होता. एका प्रचंड पाषाणशिल्पापुढे उभा राहून तो युगायुगाची कैफियत मांडत होता जणू. स्पॅनिश लोकांनी कसं कसं आक्रमण केलं, स्थानिकांना कसं कसं नेस्तनाबूत केलं याचं इथ्यंभूत वर्णन केलं त्यानी. पुढे प्रत्येक ठिकाणी ही लढाई चालू झाली. माहितीपत्रकात, भित्तीफलकावर वेगळीच माहिती लिहिलेली आणि हा सांगायचा वेगळंच काही.

आम्ही वाचलं होत, स्पॅनिशांकडे या साउथ अमेरिकनांनी कधीही न पाहिलेलं एक वाहन होतं, घोडा! स्थानिकांना वाटायचं, घोडा आणि त्यावर बसलेला माणूस हा एकच प्राणी आहे. ते त्याला घाबरायचे. असा प्राणी त्यांनी कधी बघीतला नव्हता.

‘ह्या सगळ्या भाकड कथा आहेत’, म्हणाला तो. ‘इंकाना बदनाम करण्यासाठी रचलेल्या. घोडा आणि माणूस हे वायले वायले प्राणी आहेत हे समजायला सामान्य बुद्धिमत्ता पुरेशी आहे की. तेवढीही इंकांकडे नव्हती काय?’ क्षणात सात्विक संतापानी थरथरू लागला तो.

नरबळी देण्यासाठीची वेदी होती एके ठिकाणी, याच्या मते इंका नरभक्षक नव्हतेच. परक्या स्पॅनिशांनी उगीचंच त्यांच्या सोयीचे गैरसमज पसरवलेत.

स्पॅनीशांच्याकडे लोखंड वापरायचं तंत्रज्ञान होतं. इंकांना लोखंडाचा शोधच लागला नव्हता. ते आपले सोन्या चांदीत भागवत होते. लहानपणापासून शब्दशः चांदीच्या पाटावर, सोन्याच्या ताटामध्ये, मक्याचा घास एकमेकाला भरवत होते. खरोखरच एकमेकाला भरवत होते. कारण जे होतं ते सगळ्या टोळीचं होतं.

कुलिओच्या म्हणे, ‘एका संपन्न संस्कृतीचाच घास घेतला त्यांनी. मालकीची कल्पना स्पॅनिशांची. खाजगी मालमत्तेची कल्पनाच नसल्यामुळे आहे ते सगळं सगळ्यांचं होतं. मग ही भावना चांगली, का माझं, माझं, माझं करत हावरटपणा चांगला? अन्न टोळीतल्या सगळ्यांचं होतं. त्यामुळे शिकार करू न शकणाऱ्यांचंही भागत होतं. जो माणूस खुडूक झाला तो आयुष्यातून कायमचा उठला ही भानगड नाही. किती उदात्त रचना ही. सोशल सिक्युरिटी म्हणतात ते ह्यालाच.’ पण ही पद्धत सध्याच्या काळी नीरुपयोगी आहे याचा त्याला पत्ता नव्हता.

 सगळं सगळ्यांचं असल्यामुळे कशाचीच फारशी नोंदबींद ठेवायची भानगड नव्हती आणि या भानगडीतून उद्भवणाऱ्या इतर भानगडीही नव्हत्या. लिपीचा शोधच मुळी या इंकांनी लावला नव्हता; किंवा त्यांना लागला नव्हता. दोरीला ठिकठीकाणी गाठी मारून काही सांकेतिक माहिती ठेवली जायची म्हणे, पण सद्यस्थितीत त्या गाठी खरोखरच संकेतच आहेत. त्या गाठींचे अर्थ आज उकलणारा कुणीच नाही.

चाकाचाही शोध इंकांना गरजेचा नव्हता. कुंभाराचं चाक होतं, पण चाकाची गाडी नव्हती. गाडी ओढायला घोडंच नव्हतं तर गाडी बनवून उपयोग काय? त्यातल्या त्यात मोठा प्राणी म्हणजे लामा. हा जेमतेम पन्नास किलो ओझं वाहू शकतो, म्हणजे एखादा  मोठा माणूसही याला पाठीवर बसून जाणं शक्य नाही.

स्पॅनिश आले, त्यांनी पाहिलं आणि ते जिंकले. स्पॅनिश तंत्रप्रगत होते, म्हणुनच जिंकले. गलबतं आणि बंदुका, चाकं आणि प्रगत तंत्र या साऱ्याच्या जोरावर दक्षिण अमेरीका काबीज करते झाले. तिथल्या रानटी जमातींना त्यानी माणसात आणलं. आपली भाषा दिली, एक भाषा. आपली लिपी दिली. एक लिपी. मूळ भाषा संपल्या. इंकांची, कुलिओची, केचुआ ही भाषा जेमतेम धुगधुगी धरून आहे.

स्पॅनिशांनी आपला धर्म दिला, एक धर्म.  पण कुलिओ सांगतो, ‘कॅथोलिक श्रेष्ठ म्हणताना इतर सारे कनिष्ठ हे ओघानीच आलं. पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाशाची पूजा करणारे रानटी ठरले आणि त्याच आकाशातल्या तथाकथित बापाची लेकरं प्रगत! साम, दाम, दंड, भेद वापरून धर्मांतरं झाली. जगातल्या सगळ्याच्या सगळ्या काळ्या, पिवळ्या माणसांना सुधारायचं अवघड आणि किचकट काम  देवानीच गोऱ्यांच्या बलदंड खांद्यावर दिलंय, असा तोरा होता स्पॅनिशांचा.’ कुलीओला हा तोरा टोचत होता. हा माज जाचत होता. कुलीओच्या बोलण्यात तथ्य होतंच होतं. पोपच्या दिशेनी तो थुंकला ते काही उगीच नाही. पण पोपचा ख्रिस्त आणि पेरूचा ख्रिस्तही वेगळे वेगळे आहेत. लिमाच्या चर्चमधील ‘लास्ट सपर’च्या चित्रात, पेरूच्या ख्रिस्तापुढे गिनिपिगच्या मासाचा प्रसाद आहे; पार्श्वभूमीवर मेंढयांचा नाही, तर लामांचा कळप आहे.

स्पॅनिशांनी व्यापार वाढवला, दवाखाने काढले, शाळा काढल्या, संस्कृती रुजवली, राष्ट्र ही संकल्पना दिली. वर्णसंकर तर झालाच झाला. शतकं लोटली. आता मुळचा कोण आणि बाटगा कोण हे ओळखणंही कठीण झालं. मूळ संस्कृतीची थडगी झाली. त्या थडग्यांवर नवे प्रासाद, नवी मंदिरं, नवे राजवाडे दिमाखात उभे राहिले. तेच आम्ही फिरून पाहिले. तेच आम्हाला कुलिओनी फिरून दाखवले. कुलिओच्या काळजातल्या कट्यारीच ह्या साऱ्या.

मूळ संस्कृतीचं समूळ उच्चाटन झालं. इंका काय होते हे सांगायला इंकाच फारसे उरले नाहीत. लिपी वगैरे तर नव्हतीच. अर्थात स्पॅनिशांनी केलेल्या नोंदी आहेत. जेत्यांनी केलेल्या, जीतांच्या बाबतीतल्या नोंदी त्या. त्या एकजात पूर्वग्रह बाळगून लिहिलेल्या. कारण फक्त जेत्यांचाच असतो इतिहास, फक्त जेत्यांचीच असते संस्कृती, हौतात्म्यावरही असते फक्त जेत्यांचीच मालकी. आज आता भांडी-कुंडी, पुतळे, ममी, थडगी, आणि ती उकरून निघालेल्या सोन्याचांदीच्या वस्तू, ह्यातूनच काय ओळख पटेल ती. शिवाय शोधायला येणारे सगळेच थोडे साव होते? खरतर थोडेच साव होते. कल्पनेतल्या सोन्याच्या लंकेचा, एल डोराडोचा, शोध घेत  हौसे आणि गवसेच जास्त. सोन्याचा सोस तर सगळ्यानाच. मढ्याच्या टाळूवरचं सोनं वर्ज्य नव्हतच. सोनंच ते, ते वर्ज्य कशाला असेल?

या इंकांच्या खालसा राज्यात खूप फिरलो आम्ही. कुलीओचे तळतळाटही खूप ऐकले. काळाबरोबर जुळवून घेता आलं नाही म्हणून एका नांदत्या गाजत्या संस्कृतीचा ऱ्हास घडला होता. काळाच्या उदरात त्या संस्कृतीचे निव्वळ फॉसिल उरले होते.

पुढ्यात प्रचंड शिळांची प्रचंड भिंत उभी असायची. निव्वळ दगडावर दगड रचून उभी केलेली प्रचंड भिंत. कशासाठी? माहित नाही! कुणी? माहित नाही. कशी? माहित नाही.

माचुपिचुच्या शिखरावरती घरांची जोतीच जोती. थोड्याशा दगडी त्रिकोणी चौकोनी भिंती. ओसाडगावचं हे राज्य होतं तरी कोणाचं? माहित नाही. ते ओस तरी का पडलं? माहित नाही.

नाझ्काच्या पठारावर प्रचंड चित्र कोरलेली. माणूस, माकड, गिधाड, पक्षी, आकारच आकार. काही नुसतेच उकार. मैलोंमैल सरळसोट  रेघोट्या आखलेल्या. कशासाठी? माहित नाही. कोणी म्हणतात परग्रहावरच्या यानांसाठीच्या धावपट्ट्या या. कुणी म्हणतात हे तर पंचांग त्याचं. कुणी म्हणतात पाणवठ्याच्या वाटा या. कुणी म्हणतात स्वर्गारोह्णाच्या दिशा या. कुणी काही तर कुणी काही.

या साऱ्याचा अर्थ लावायचा जो तो आपापल्या परींनी प्रयत्न करतोय. कोणी आयुष्य खर्ची घालतोय. पण ह्या विश्वाचा आकार केवढा? ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा. तसंच हे. सगळ्या ठिकाणी सतत हा नन्नाचा पाढा. कुतूहल चाळवणारे सगळं काही. कुतूहल शमवणारं काहीच नाही.

अशा बिन लोहाच्या आणि बिन लिपीच्या; बिन घोड्याच्या आणि बिन चाकाच्या, इंका  संस्कृतीचं काळाच्या उदरात रुतलेलं रथचक्र, कुलिओ प्राणपणानी बाहेर ओढू पहात होता. जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर ते ते स्पॅनिशच; अशी धारणा झालेल्या समाजात, जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर ते ते इंकांच; अशी खुणगाठ बांधून तो वागत होता. त्याच्या वंशाच्या अधःपतनासाठी त्याला एक रेडीमेड शत्रू मिळाला होता. स्पॅनिश वसाहतीचा काळाकुट्ट इतिहास! त्यांची भाषा, संस्कृती, धर्म...सगळंच. हे सगळं त्याला उखडून टाकायचं होतं. मूळ संस्कृती पुन्हा आणायची होती. इकडे पोर्तुगीजांनी गोवा घेतला त्याच सुमारास तिकडे पेरूत स्पॅनिशांनी पाय रोवले. इकडे मराठेशाही बुडाली त्या सुमारास तिकडे स्पॅनिशांनी पेरू सोडला देखील. आज पेरू एक स्वतंत्र लोकशाही देश आहे. पण  ८०% नागरिक कॅथोलिक आहेत, ८०% स्पॅनिश बोलतात, ८०% मिश्र वंशाचे आहेत. तरी देखील कुलिओ ठाम आहे. शेवटच्या इंका राजानी, शेवटच्या पराभवाआधी उच्चारलेले, शेवटचे शब्द होते, ‘तुम्ही वाट पहा. मी परत येईन.’ ते कुलिओला खरे करायचे होते. पण कसं ते त्याला उमगत नव्हत. सध्यातरी स्पॅनिश वारशाचा तिरस्कार हा त्याचा एकमेव कार्यक्रम होता. भेटतील त्या पर्यटकांना तो आपली ही कैफियत ऐकवतो.   इंकांचा उदोउदो करता करता तो इतरांबद्दल जे बोलत होता ते भयावह होतं. तो अन्यायग्रस्त होता, पीडित होता, भाषाही न्यायाची बोलत होता. पण वृत्ती मात्र एकांगी, द्वेषभारित, कुत्सित, मत्सरानी ग्रासलेली होती. पिढ्यानपिढ्याच्या अन्यायाचा त्याला आत्ता, इथे, या क्षणी बदला घ्यायचा होता. स्पॅनिश वारशाच्या सर्व खाणाखुणा पुसून टाकाव्यात असा त्याचा अर्वाच्य सूर आहे. पेरू मूळ पेरू निवासियांचाच असा बोचरा नूर आहे. कसं शक्य आहे हे? आजची पेरूची भाषा, धर्म, संस्कृती, सगळं काही हजारो वर्षांची साठलेली ‘समृद्ध अडगळ’ आहे. स्पॅनिशांमुळे जगाला इंका माहीत झाले पण इंकांनाही जगाची ओळख स्पॅनिशांमुळेच झालं की. आज कुलिओचं क्रिओल नृत्यही शुद्ध पेरुचं नाही, ना की त्याचा लाडका झाम्फोन. त्याचं स्वतःचं नाव सुद्धा ज्युलिअस...ज्युलिओ...कुलिओ...असं अपभ्रष्ट आहे. असं गाळून गाळून फक्त इंकांचं तेवढंच ठेवायचं म्हटलं तर...काहीच उरणार नाही!  

पुढे कुलिओ बरोबरची गालाप्गोसच्या बेटांची सफर अविस्मरणीय झाली. चार्ल्स डार्विन बीगल जहाजावरून इथे आला होता. ह्या द्वीपसमूहावरचं चित्तचक्षुचमत्कारीक जैववैविद्ध्य बघून त्याच्या मनात उत्क्रांतीचा सिद्धांत सिद्ध झाला. डार्विन आणि त्याच्या सिद्धांताप्रमाणेच ही बेटंही आता प्रसिद्ध आहेत. जगभरच्या वैज्ञानिकांना तीर्थस्थानी आहेत.

कुलिओनी अगदी मोजक्याच शब्दात अख्खा उत्क्रांतीचा सिद्धांत समजावून सांगितला. ‘संपूर्ण जीवसृष्टी ही प्राथमिक अवस्थेतल्या सजीवांपासून सावकाशपणे उत्क्रांत  होत आली आहे. या उत्क्रांतीसाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. आजची सजीवांची विविधता हा उत्क्रांतीचाच एक भाग आहे आणि माणूस हा देखील एक प्राणीच असून या उत्क्रांतीचंच फलित आहे. पृथ्वीचं काही कोटी वर्षं असलेलं वय, त्या काळातले भूकवचातले आणि वातावरणातले बदल, आज प्रयोगशाळेत निर्माण करता आलेली अमिनोआम्ल, ठिकठिकाणी सापडलेले जीवाश्म आणि अव्याहतपणे तयार होणाऱ्या आणि बदलाशी जुळवून न घेता आल्यामुळे नष्ट होणाऱ्या प्रजाती हा सारा उत्क्रांतीच्या बाजुने सज्जड पुरावा आहे.’ पण पुढे जाऊन त्यानी हे ही स्पष्ट केलं की माणूस, किंवा अमुकच एक वंश, या उत्क्रांतीच्या शीर्षस्थानी आहे अशा भ्रमात कोणी राहू नये. गांडूळाच्या ठिकाणी रहाण्यासाठी गांडूळ हा सर्वात उत्क्रांत प्राणी आहे आणि खोल पाण्यात रहाण्यासाठी देवमासा. त्यांची जागा माणूस घेऊ शकत नाही आणि माणसाची जागा ते.’

कुलीओची जीवशाशास्त्राची समज थक्क करणारी होती,

‘डार्विनच्या या सिद्धांतांनी देवाला सिंहासनभ्रष्ट केलं...’

‘मानवाचे अंती गोत्र एक, असं दाखवून दिलं...’

‘मानवाचेच नाही तर जीवितांचे अंती गोत्र एक हे दाखवून दिलं...’

‘सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट ही समज खुजी आहे...’

‘स्पर्धेइतकंच सहकार हे ही तत्व जगण्यासाठी, तगण्यासाठी उपयोगी आहे....’

‘उत्कांतीच्या वाटेला निश्चित असा हेतू नाही...’

‘उत्क्रांतीच्या वाटेवर तीच वाट पुन्हा उलटी चालता येत नाही....’

‘पुन्हा मूळ ठिकाणीच ती पोहोचेल याचा काहीच भरवसा नाही...’

‘माकडाचा माणूस झाला पण म्हणून माणसाचे माकड करता येत नाही...’

हे सगळं सगळं कुलीओला कळतं, पण हेच सगळं इतिहासालाही लागू पडतं, हे मात्र त्याला वळत नाही. इतिहास उत्क्रांत होत असतो. इतिहासाचं चाकही उलटं फिरवता येत नाही. इतिहासात संभाव्य असल्या तरी, वर्तमानात शुद्ध गोत्र, वंश, रक्त वगैरे कल्पना हास्यास्पद आहेत. इतिहासातल्या पूर्वजांच्या पापांना, वर्तमान वंशजांना जबाबदार धरून भविष्य कसं घडणार? इंकांसाठी एल्गार पुकारताना प्राप्त परिस्थितीशी सहकार करणं कुलीओला जमत नव्हतं. इंकांचा वारसा हृदयी धरायचा का गालाप्गोसचा हे त्याला समजत नव्हतं!

म्हणूनच आजूबाजूला अशी वर्तमान आणि भविष्यकाळ सोडून इतिहास बदलायला निघालेली माणसं दिसली, की कुलिओ आठवतो आजही. काही अवघड प्रश्नांची सोपी उत्तरं त्यानी पुन्हा अवघड केली माझ्यासाठी. म्हणून कायमच लक्षात राहील तो.

----------------------------------------------------------------------------------------------------------
या आणि अशाच अन्य लिखाणासाठी माझा ब्लॉग जरूर वाचा

shantanuabhyankar.blogspot.in