Showing posts with label गर्भपात. Show all posts
Showing posts with label गर्भपात. Show all posts

Monday, 4 September 2017

गर्भपातावर बोलू काही

गर्भपातावर बोलू काही
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

शंभरपैकी ऐंशी गर्भपात पहिल्या तीन महिन्यात होतात. तेंव्हा अशा गर्भपातांवर बोलू काही.
मूल हवंहवंस असताना गर्भपात झाला की सगळे अगदी नाराज होतात. नाराज होण्यासारखंच आहे हे. मूल म्हणजे एक नवं स्वप्न. उद्याची आशा. वंश सातत्याची शक्यता. म्हातारपणाची काठी. पालकत्वाचा अद्वितीय आनंद. निव्वळ कल्पनेनीच आनंदाची कारंजी उडायला लागतात. शिवाय मूल म्हणजे मातृ-पितृऋणातून, कुटुंबऋणातून, समाजऋणातून मुक्ती. एक कौटुंबिक उत्सव. भरपूर कौतुक, भारंभार प्रेम, अपरंपार वात्सल्य. या उलट गर्भपात म्हणजे या सगळ्यावर पाणी, आनंदावर विरजण, चिडचिड, हताशा.
का होतो गर्भपात? सहसा कारण कळत नाही. मग कोणी तरी काही तरी सांगतं, मग मनात तेच घेऊन बसायचं.
‘गाडीवरून प्रवास केला म्हणून झालं...’
‘एसटीतून माहेरी गेली म्हणून झालं...’
‘बादली उचलल्यामुळे झालं...’
‘लहान मुलाची (आणि सहसा हे नेमकं नणंदेचंच असतं) लाथ लागली...’
‘तरी मी सांगत होते पपई खाऊ नको, केळं खाऊ नको... पण नव्या मुली आता ऐकतात का कुणाचं? त्यातून मी सासू. म्हणजे हे नातं किती अवघड...’
‘वर्षभर गोळ्या खात होती ना प्लॅनिंगच्या, त्या मुळेच. देव चांगलं देत होता तेंव्हा नको म्हणायचं, मग आता हवं म्हणालं की मिळत नाही, बसा आता.’
‘त्या दिवशी डॉक्टरकडे जाण्यापूर्वीच मी ओळखलं होतं. आता जपा, लांब रहा, असं सांगितलं होतं. पण ऐकणार कोण? आदल्या रात्री संबंध आला असणार. दुसऱ्या दिवशी सकाळी झालंच ब्लीडींग सुरु.’
वरीलपैकी कशानेही गर्भपात होत नाही! प्रवास, जड काम (म्हणजे बायकांच्या भाषेत बादली उचलणे), शरीर संबंध, गर्भनिरोधक गोळ्या कशाकशाने गर्भपात होत नाही. पपई, केळी ही देखील उगीचच बदनाम झालेली फळं आहेत. पोटातला गर्भ आईपेक्षा कितीतरी अधिक सुरक्षित वातावरणात वाढत असतो. बाळाची लाथ लागूनही आई ठणठणीत असेल तर गर्भही ठणठणीत आहे असं बेलाशक समजावं. हे लक्षात न घेता, गर्भपात झाला की त्या बाईला बोल लावले जातात. तिलाच जबाबदार धरलं जातं. वरची सारी चर्चा चालू रहाते. यात अनेक गफलती आहेत.
बहुतेकदा (७०%) असा गर्भपात होतो तो गर्भातच काही तरी मोठा दोष असल्याने. त्यामुळे असा गर्भपात हा निसर्गाचा फिल्टर आहे. जे हीन आहे ते आधीच पडून जातं. चांगलं तेवढं टिकतं. इतकी सगळी मुलं धडधाकट निपजतात या मागचं इंगित हे आहे. असे गर्भपात झाले नसते तर अनेकांना वेडीविद्री मुलं झाली असती. इतरही काही कारणं असतात, गर्भपिशवीतले काही दोष, काही आजार, पण क्वचित.
श्रमानी गर्भपात होत नाही त्यामुळे अर्थातच तो विश्रांतीनी टळत नाही. आपण खरंतर जंगलात रहाणारे प्राणी. बिनशेपटीची माकडंच आपण. आज आपण भाषा बोलतो, आणि एवढी प्रगती केली आहे म्हणून मी हे लिहीतो आहे आणि तुम्ही हे वाचता आहात. नाहीतर या वेळी तुम्ही आणि मी, दोघेही आता पुढच्या भुकेला रानडुक्कर वगैरे काही मिळतंय का, हे शोधत रानोमाळ हिंडत असतो. ह्या कष्टाच्यामानानी बादली उचलणे वगैरे घरगुती कामं म्हणजे कीस झाड की पत्ती. आपल्या जंगली पूर्वजांपेक्षा आज आपण काहीच कष्ट करत नाही. त्यामुळे विश्रांतीनी काही फरक पडत नाही. पायरीसुद्धा न उतरू देणं, पाणीही जागेवर देणं, असली थेरं करून काहीही साधत नाही.
राहिले दिवस की झालं‘च’ पाहिजे मूल, ही सर्वांचीच सदिच्छा असते. तसं होणारच असं आपण मनोमन गृहीत धरून चालतो. हे गृहीतकच चुकीचं आहे. अवैज्ञानिक आहे. माणूस हा निसर्गाचाच भाग आहे. निसर्गाचे कायदे-कानून माणसालाही लागू आहेत. नवी पिढी निर्माण करण्याची निसर्गाची पद्धत ही खूपच उधळ माधळ करणारी आणि इम्परफेक्ट आहे. माणसानी निर्माण केलेल्या कारखान्यात एका पाठोपाठ एक लाखो वस्तू बिनचूक तयार होऊ शकतात. इनफॅक्ट या आकडेवारीवर त्या त्या कारखान्याची कार्यक्षमता जोखतात. पण मानव निर्माण करणारा आपल्या शरीरातला कारखाना, या निकषावर कमअस्सल ठरतो. हा निसर्गनिर्मित कारखाना आहेच मुळी असा.
 आंब्याचं झाडच बघाना. त्याचा मोहोर आणि आंबे म्हणजे नवं झाड निर्माण करणाऱा कारखानाच. एकेका आंब्याला किती तरी मोहोर येतो. डहाळी डहाळीवर इवली इवली फुलं झुलत असतात. या प्रत्येक फुलातून अंतिमतः आंब्याचं  झाड तयार होतं का? (आणि जर झालं तर आपल्याला पृथ्वीवर जागा उरेल का?) कितीतरी मोहोर गळून पडतो. काही वाऱ्यानी, काही पावसानी, कितीतरी आपण खुडतो देवाला म्हणून, मग कैऱ्या लगडल्या की त्यातल्याही कित्येक आपोआप गळून पडणार, गारपीट होणार, काही आपण खाणार, अगदी लोणचं सुद्धा घालणार. पाडाला आलीच एखादी तर ती नक्कीच पाडणार, खाणार. कित्येक पिकलेले आंबे अशा जागी पडणार की तिथे त्या कोयी रुजुच शकणार नाहीत. ‘घुम्मटगोल आंब्यावरती पानोपानी मोहोर गरोदर’ जर  येईल  तर त्यातल्या एखाद्या कोयीतून एखादं झाड येणार. त्यालाही, खाणारे तोडणारे असे शत्रू आहेत. उन्हाळे पावसाळे असे शत्रू आहेत. थोडक्यात एका आंब्याला बाळ व्हायला बरेच सायास पडतात. माणसाची परिस्थिती इतकी वाईट नाही. तरीही दिवस राहिले की बाळ होण्याची शक्यता १००% कधीच नसते. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण दिवस आहेत हे कळायच्या आतच मुळी ५०% गर्भ नष्ट होतात! आपल्याला त्याचा पत्तासुद्धा लागत नाही. दिवस आहेत हे कळल्यावर सुमारे १५% गर्भ पडून जातात. उरलेल्या ८५% तही काही गर्भ पतन पावतातच. पण तीन महिन्यांनंतर हे कमी प्रमाणात घडतं. पहिले तीन महिने, दिवस आहेत हे घरात सुद्धा बोलायचं नाही, असा प्रघात होता आपल्याकडे. तो कदाचित या व्यावहारिक शहाणपणातूनच आला होता. पण आता फेसबुक आणि व्हॉत्सअॅपच्या जमान्यात युरीन टेस्ट पॉझीटिव्ह आली रे आली की जणू जन्मोत्सवच सुरू होतो. हे गैर आहे. सबुरी महत्वाची आहे. पुढे जर गर्भ नीट वाढलाच नाही, नीट रुजलाच नाही, तर मग मोठाच भ्रमनिरास होतो. जास्तच वाईट वाटतं. हे टाळायला हवं.
गर्भ ‘पडतो’ असा शब्दप्रयोग असल्यामुळे अनेकांना असं वाटतं, की गर्भ म्हणजे टेबलाच्या कडेला ठेवलेला बॉल आहे आणि जर्रा धक्का लागला की तो पडतो. असं काही नस्से. अशा पद्धतीनी गर्भपात होत नाही. जेंव्हा शरीराला तो गर्भ नकोसा असतो, त्या वेळी तो शरीरातून जाणीवपूर्वक, प्रयत्नपूर्वक बाहेर ढकलला जातो. थोड्या अप्रिय शब्दात सांगायचं तर, लाथ मारून बाहेर काढण्यात येतो. गर्भपात ही गुरुत्वाकर्षणामुळे घडणारी घटना नाही. इट इज अॅन अॅक्टीव्ह प्रोसेस. बाईला उलटी टांगली तरी जिचा गर्भ पडायचाय तिचा पडेलच. त्यामुळे काही विशिष्ठ आजार आणि त्यांचे उपचार वगळता, कम्प्लीट बेडरेस्ट, कसली कसली औषधं, इंजेक्शनं यात काही तरी केल्याचं समाधान हा भाग जास्त आहे. वैज्ञानिक पुरावा शून्य. एखाद्या डॉक्टरनी असे लटिके उपचार सुचवले नाहीत तर पेशंट सरळ उठून दुसरा डॉक्टर गाठतात आणि त्याच्या ज्ञान-कौशल्याची स्तोत्रे गातात. बहुतेकदा पेशंटना, ‘गर्भपात अटळ आहे, आपण विशेष काही करू शकत नाही’, हे कटू सत्य पचत नाही. काही तरी प्रयत्न चालू असल्याचं कृतक समाधान त्यांना हवं असतं. हे समाधान हिरावून घेणारा प्रामाणिक डॉक्टर तर मुळीच नको असतो. अशामुळे मग कृतक उपचारांचं फावतं.
त्यामुळेच झालाच एखाद्यावेळी गर्भपात, तर त्याकडे मोठया फिलोसॉफिकली बघायला हवं. कदाचित सदोष संततीपासून मुक्ती मिळाल्याबद्दल स्वतःच अभिनंदनही करायला हवं. ‘कभी किसी को मुकम्मल जहाँ नही मिलता, कभी ज़मीं तो कभी आसमाँ नही मिलता...’ असं एखादं गाणं गुणगुणायला हवं.
वारंवार गर्भपात ही मात्र अलग चीज आहे. त्याबद्दल पुन्हा केंव्हातरी.

प्रथम प्रसिद्धी दिव्य मराठी मधुरिमा पुरवणी ५/९/१७
या आणि अशाच लिखाणासाठी माझा ब्लॉग जरूर वाचा

<shantanuabhyankar.blogspot.in>

Saturday, 30 July 2016

ती सुटली पण हीचं काय?

ती सुटली पण हीचं काय?
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई. मो.क्र. ९८२२० १०३४९

ती मुंबईतली होती. तिच्यावर बलात्कार झाला होता, तिच्या गर्भातल्या बाळाला डोकं नव्हतं आणि पोट होतं सगळं उघडं, इतकं की आतले अवयव बाहेर सांडत होते. हे निदान होईपर्यंत २० आठवडे उलटून गेलेले. डॉक्टर म्हणाले, ‘गर्भपात, नॉट अलाउड!’
ती गेली कोर्टात अगदी सुप्रीम कोर्टात. कोर्टाला फुटला पाझर. कोर्टानी हातोडा आपटला, डॉक्टरांना म्हणाले, ‘अहवाल द्या अहवाल. ताबडतोब.’
डॉक्टर म्हणाले, ‘हा घ्या अहवाल, ताबडतोब. हे असं, असं, असं, असं आहे.’
कोर्ट झालं चकित. मोठा कठीण प्रसंग हा.
बलात्कारानी पिडीत बाई, त्यातून मूल सव्यंग. जगूच शकणार नाही असं. पण कायदा सांगतो, अं हं, गर्भपात फक्त २० आठवड्यापर्यंतच वैध. त्यापुढे अवैध. त्यापुढे तो चक्क खून. बिनडोक्याच्या, नक्की नं जगणाऱ्या बाळाचा झाला, म्हणून काय झालं, खून तो खून.
कोर्टाच्या बुद्धीला हे पटेना, कायद्यात काही बसेना. मग कोर्टानी लढवली शक्कल. तिला सांगितलं, ‘कर गं गर्भपात, पण अपवाद म्हणून हं. देव, घटना वगैरे वगैरे तुझं कल्याण करोत.’
हे झालं तीचं; पण हीचं काय?
ही आहे खेड्यात. बलात्कार  बिलात्कार काsssही झालेला नाही. चांगलं देवाब्राम्हणाच्या साक्षीनं ज्या पुरुषबरोबर लग्न लागलं त्याच्या पासूनच दिवस गेलेत हीला. पण बाळात आहे व्यंग, निदान झालं एकविसाव्या आठवडयात. बाळाला आहे विकार, त्यामुळे  ते नक्कीच नाही जगणार. हीनी काय करायचं?
ही आणखी एक. बाळा भोवतीचं पाणी काढून तपासल्याशिवाय, बाळाला व्यंग आहे किंवा नाही हे ठरवता येणार नाहीये. पण हे सगळं करून रिपोर्ट यायला लागला वेळ. लागणारच. अहो ही इथे वाईत, तपासणीसाठी नमुना जाणार दिल्लीला! २० आठवड्याच्या आत व्हावं कसं सगळं? पंचवीसावा आठवडा उलटला. हीनी काय करायचं?
आणखीही एक भेटली मला. बाळाला हृदयविकार, बाहेरच्या जगात हे हृदय बाळाला साथ देणार नव्हतं. पण आईच्या पोटात असेपर्यंत सगळं ठीकच चालणार होतं. आई(जी)च्या जीवावर बाळ(जी) उदार! हृदयानी साथ द्यायला हवी असेल तर ऑपरेशन लागणार. मोठ्ठ ऑपरेशन. ते काही हीला परवडण्यासारखं नाही. आता आहेत स्किमा, पण स्किमा काय कामाच्या? दरिद्री माणसाचं नाव कधी रेषेखाली रहातं का?  पण कायदा सांगतो, गर्भपात बेकायदेशीर. मग काय, चला, वाढवा गर्भ. नऊ महिने नऊ दिवस पोसा त्याला. जन्मल्यानंतर मरणारच आहे. पण हळूहळू. जन्मानंतरचा कणाकणानी होणारा गर्भपातच की हा. फक्त डोळ्यादेखत होणारा. कुटुंबाच्या सहनशीलतेचा अंत पहाणारा. पण कायदेशीर हां, कायदेशीर.
वरील पैकी एकीनी मुकाट आहे ती परिस्थिती स्वीकारली.
एकीचा नवरा मोठा ज़हांबाज. त्यानी डॉक्टरना खळ्ळ-खट्याकची भीती दाखवली.
तिसरीनी सरळ डोंगरावरची कदेवाडी गाठली. गर्भपातासाठी प्रसिद्ध अशा तिथल्या म्हातारीकडून काडी घालून घेतली. आणि भारतात बाळंतपणात बायका मरतात ना, त्यांच्या पंक्तीत जाऊन बसली. गावठी गर्भपातात त्यातल्या १३% जीव गमावतात, त्यात ही एक. आधुनिक सतीच म्हणा ना ही. तेव्हा नवऱ्याबरोबर जाळलं आता बाळाबरोबर जाळलं, एवढाच फरक.
       नवे नवे शोध लागतात ही कटकटच आहे शिंची. पूर्वी बरं होतं, बाळ बाहेर आलं की मगच त्याचं बरंवाईट काय ते समजायचं. त्याकाळी केलेला (१९७२) हा गर्भपाताचा कायदा. ज्ञान बदललं तंत्रज्ञान बदललं, सोनोग्राफीनं आईच्या पोटात डोकावता येऊ लागलं, पण कायदा तोच, अगदी तसाच. महिलांना आणि त्यांच्या कुटुंबियांना या कायद्याचा फायदा सोडाच, उलटा जाचच होतो अशा वेळी.
कित्येक व्यंग अशी आहेत की ज्याचं वीस आठवड्याच्या आत निदान शक्य नाही. कित्येक स्त्रिया अशा आहेत, अशा ठिकाणी आहेत, की त्याचं वेळेत निदान होऊ शकत नाही. काही तपासण्यांचे निकालच खूप उशिरा येतात... अशांनी काय करायचं? प्रत्येकीनी काय सर्वोच्च न्यायालयाची पायरी चढायची?
       जर २४ आठवड्यापर्यंत गर्भपाताला परवानगी दिली, तर त्याचा स्त्रीभ्रूणह्त्येसाठी गैरवापर होईल हा एक बागुलबुवा उभा केला जातो. अगदी सरकारी वकिलांनी देखील न्यायालयात हे बोलून दाखवलं. पण अनेक डॉक्टरकडून सोनोग्राफी तपासणी, त्यांच्या निदानाचं पद्धतशीर दस्तावैजीकरण, मोजक्याच केंद्रांना अशा गर्भपाताची परवानगी, अशा काही उपाययोजना करता येतील.
       न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी, त्यामुळेच ही गोची झाली आहे. गाऱ्हाणी ऐकण्यासाठी कान एवढा एकच अवयव न्यायदेवतेनी उपलब्ध ठेवला आहे. हे काही ठीक नाही. ती वकील मंडळी सांगणार आणि ही ऐकणार. ह्या बायकांची वेदना ते काय शब्दात मांडू शकणार आहेत? ह्या बायकांची वेदना काय कानांना दिसणार आहे? ह्या बायकांचे अश्रू काय कानांनी ऐकू जाणारेत? ह्या बायका आहेत, त्यातून भारतीय बायका. अगा न्यायदेवते, त्यांचे हुंदके सुद्धा अस्फुट असतात. आता तरी आपल्या डोळ्यावरील पट्टी काढ. हिच्या आणि हिच्या सारख्यांच्या वेदना बघ आणि गर्भपाताची कालमर्यादा तत्काळ वाढव.

ह्या आणि अशात अन्य लेखांसाठी माझा ब्लॉग जरूर वाचा
shantanuabhyankar.blogspot.in


Monday, 14 December 2015

गर्भ आणि त्याचा निःपात

गर्भ आणि त्याचा निःपात
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई. जि. सातारा. ४१२ ८०३
मोबाईल: ९८२२० १०३४९

नुकत्याच आलेल्या बातमी नुसार, रॉबर्ट डिअर नावाच्या एका अमेरिकन माणसानं, तिथल्या कॉलोरॅडो राज्यातल्या, ‘प्लॅण्ड  पेरेंटहुड’ संस्थेच्या गर्भपात केंद्रावर हल्ला केला. त्यात दोन माणसं आणि एक पोलीस ऑफीसर मारले गेले. इतर अनेक जखमी झाले. तासाभराच्या धुमश्चक्रीनंतर रॉबर्ट डिअरला अटक करण्यात आली. हल्यामागचं कारण असं आहे की कोणाही स्त्रीने गर्भपात करून घेणं ह्या डिअर सायबांना मान्य नव्हतं. हे धर्म संमत नाही म्हणून.
आपल्याकडे गर्भपात विधीसंमत आहे. पण अमेरिकेमध्ये मात्र सरसकट असं नाही. उलट गर्भपाताला पाठींबा आणि विरोध हा तिथे अत्यंत भावनिक आणि चक्क निवडणूकीचा मुद्दा आहे. जगातील अत्यंत प्रगत देशातही असे धर्ममार्तंड आहेत. त्यांचे कट्टर अनुयायीही आहेत. हा ही दहशतवादच आहे. अगदी अमेरिकन कायद्यातील व्याख्येनुसार सुद्धा! अमेरिकन माध्यमं त्याला तसं लेबल लावत नसली तरीही.
  यापूर्वी आयर्लंड या कट्टर कॅथॉलिक देशात वेळेवर गर्भपात न केल्यामुळे एका भारतीय डॉक्टरचा मृत्यू ओढवला. हे मूल तिला हवं होतं पण परिस्थितीच अशी उद्भवली की तिचाच जीव धोक्यात आला. गर्भपात न केल्यास ही मरणार हे दिसत असून सुध्दा, कायद्यावर बोट ठेऊन तिला गर्भपात नाकारण्यात आला. जिवंतपणी गर्भहत्येचं पातक करून, ख्रिस्तवासी झाल्यावरच्या  नरकयातना कोणाला नको होत्या. जित्या जागत्या बाईच्या जीवापुढे तिच्या पोटातला गोळा महत्वाचा ठरला.  शेवटी दोघंही देवाघरी गेले! बाईचा जीव धोक्यात असेल तेव्हातरी अॅबॉर्शनला  परवानगी दया अशी याचना तिथल्या स्त्रिया करत होत्या. शेवटी, ‘आमच्या शरीराची आणि आरोग्याची एवढी काळजी वाटते ना तुम्हाला, मग आम्ही आमच्या पाळीच्या तारखाही सरकारला कळवतो’, असं म्हणून तिथल्या स्त्रियांनी, ट्वीटर वरून, आपल्या पाळीच्या तारखा थेट पंतप्रधानांना कळवायला सुरुवात केली!  हा अगदी आंतरराष्ट्रीय मामला झाल्यावर तिथल्या सरकारनं नुकताच कायदा थोडासा(च) सैल केला आहे.
‘प्रो लाईफ’ हा पश्चिमी देशातला गर्भपात विरोधी कंपू. गर्भालाही जीव असतो, स्वतंत्र अस्तित्व असतं, त्याचा रक्तगट, जनुकीय रंगरूप आईपेक्षा वेगळं असतं. मग त्याला मारायचा अधिकार अन्य कुणाला कसा? हा यांचा प्रश्न.
‘प्रो चॉइस’ हा गर्भपाताचा पर्याय असावा असं सांगणारा  गट. यांचं म्हणणं असं की जन्म झाल्या शिवाय, किमान आईवेगळं अस्तित्व शक्य झाल्या शिवाय गर्भ हा स्वतंत्र व्यक्ती होऊच शकत नाही. सर्वस्वी परपोषित,परावलंबी अशा गर्भाला स्वतंत्र व्यक्ती मानणं हा पराकोटीचा ताणलेला युक्तीवाद आहे. ह्या न्यायानी, पुरुष/स्त्री बीज वगैरेचाही स्वतंत्र अस्तित्व म्हणून विचार करता येईल; कारण जैवशास्त्रीय दृष्टया यातील पेशी आपल्या पेक्षा ‘वेगळ्या’ असतात. एवढंच कशाला शरीरातील प्रत्येक पेशी ही ‘जिवंत’च असते. रक्ताचा नमुना घेऊनही त्यातल्या पेशी डॉक्टर मारतच असतात! जिवंत पेशींचा जगण्याचा हक्क मान्य करायचा तर, एखाद्याचं अपेंडिक्स काढणंही चुकीचंच म्हणायचं काय?
शिवाय नकोसं असताना राहिलेलं मूल, हे मूल म्हणून कितीही गोंडस असलं, तरी त्या कुटुंब साठी ती न पेलणारी जबाबदारीच असते. विवाहपूर्व संबंधातून, विवाहबाह्य संबंधातून, बलात्कारातून निपजलेली संतती असेल तर त्या आईला आयुष्यभर हे भोवतं. नव्यानं आयुष्य सुरु करताना ही मुलं मोठाच अडसर ठरतात. अशी मुलं पोसायची जबाबदारी शेवटी समाजावर येऊन पडते. या अनाथ पण अश्राप मुलांना सुजाण पालकत्व पुरवणं ही मोठी जोखीम असते. ही झेपली नाही तर बाल गुन्हेगारी, व्यसनीपणा असे प्रश्न निर्माण होतात.
लुळी, पांगळी, मरणासन्न आजारांनी ग्रस्त संतती, जन्माला येणार आहे हे जर आधी कळू शकतं, तर मग अशी संतती जन्माला न घालण्याचा अधिकार त्या त्या स्त्रीला/कुटुंबाला असलाच पाहिजे. अशी संतती जन्माला घालणं आणि पुढे लालन, पालन, पोषण करणं ही त्या आई-बापाला आणि कुटुंबाला विनाकारणच शिक्षा आहे. उलट हा जन्मानंतर रोज थोडा थोडा होणारा गर्भपातच आहे.  तेव्हा गर्भपाताचा पर्याय हा उपलब्ध असायला हवा. म्हणून हे प्रो चॉईस!
प्रो लाईफवाले म्हणतात; ‘कुठला जीव काय दैव घेऊन जन्माला येईल हे कुणी सांगावं? बेथोवेन, हा पाश्चात्य संगीताचा बेताज बादशहा, हा त्याच्या आई-बापाचा पाचवा मुलगा होता! घ्या!! म्हणजे जर गर्भपाताचा पर्याय बेथोवेनच्या मातापित्यास उपलब्ध असता तर आपण एका अभिजात संगीतकाराला मुकलो असतो!’
यावर प्रो चॉइसवाल्यांचं, तोडीसतोड उत्तर असं की ‘त्या’ रात्री ‘त्या’ माता पित्यांनी ‘ती’ क्रीया करण्याचा ‘तो’ निर्णय घेतला म्हणूनच बेथोवेन शक्य झाला. म्हणजे एखाद्या दिवशी संभोग न करणं म्हणजे देखील बेथोवेनला जनन नाकारणंच नव्हे काय? आता याला काय उत्तर आहे?  हिटलर हा देखील त्याच्या पितरांचा चौथा मुलगा होता. पाचवेपणाचा सांगीतिक कर्तृत्वाशी जसा काडीचाही संबंध नाही तसाच चौथेपणाचा अपत्याच्या क्रौर्याशी नाही.  थोडक्यात संभाव्य बेथोवेनला जीवानिशी  मारल्याचा आरोप पोकळ आणि बिनबुडाचा आहे.
गर्भपातबंदी ही दारूबंदी सारखी असते. ती अमलात आणणं महाकर्मकठीण. उलट अशा परिस्थितीत असा मामला चोरीचा बनतो आणि हळूहळू बोंबलत उरकावा लागतो. सगळ्याच बेकायदा सेवांप्रमाणे मग याचेही दर चढे रहातात. पिळवणूक, शोषण आणि असुरक्षित गर्भपात वाढत जातात. यातच काही बायका मरतात. आयर्लंड आणि अमेरिकेमध्ये असे परिणाम दिसतात.
गर्भपाताचा भारतीय कायदा त्यामानानं अतिशय सुटसुटीत आणि व्यवहार्य आहे. आपल्याकडे स्त्रियांच्या आरोग्यासाठी तो वरदान ठरला आहे.
यानुसार पाचव्या महिन्यापर्यंत गर्भपात करता येतो. आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे गर्भातील दोष ओळखता येतात आणि गर्भपाताचा निर्णय पाचव्यानंतरही घ्यायची वेळ येते. अशा परिस्थितीत कायद्यात गर्भपाताची मुभा नाही. तीही मिळावी अशी मागणी आहे. त्यावर विचारही चालू आहे. तंत्रज्ञानानुसार कायदाही बदलेल ही अपेक्षा.


Friday, 30 October 2015

गर्भस्य कथा रम्या

गर्भस्य कथा रम्या
डॉ. शंतनू अभ्यंकर, मोबाईल ९८२२० १०३४९
      “काय करा हे मी तुम्हांला सांगितलं, तसं आता काय करू नका हेही सांगतो” या वाक्याशी येईपर्यंत माझ्या आवाजाला एक विशिष्ठ धार चढलेली असते. थोडी दमदाटी, थोडी समजूत, थोडं आर्जव असा मिश्र खमाज लागतो. माझ्या उजव्या हाताची तर्जनी जोरजोरात नाचवत उपस्थित नजरांना नजर देत मी म्हणतो, ‘काय वाट्टेल ते झालं तरी गावठी, झाडपाल्याचं औषध करू नका. कोणी सांगेल काडी घालून खाली करून देते, कोणी पोट चोळून खाली करून देते म्हणतील; पण कृपा करून यातलं काही करू नका.” माझा आवाज आणखी चढतो, भेदक होतो. डोळे वटारले जातात आणि मी म्हणतो... “असं केलंत तर तुमच्या मुलीचे प्राण जातील! ती मरेल!”
      समोरचे पालक दचकतात, पण मनातल्या मनात. परिस्थितीनं त्यांना पार हतबल केलेले असतं. या वाक्यानंही न दचाकण्याइतके ते निबर झालेले असतात. करणार काय? लेकीला लग्नापूर्वीच चांगले पाचच्या वर महिने गेलेले असतात! पाचव्यानंतर गर्भपात करणं बेकायदेशीर आहे. सबब “तुम्ही मुलीला ती प्रसूत होईपर्यंत महिलाश्रमात ठेवा आणि प्रसुती झाल्यावर मूल अनाथाश्रमाला देऊन तुम्ही मुलीला घरी आणा.” मी पोटतिडकीने सांगत असतो. हा मार्ग सनदशीर आणि मुलीच्या दृष्टीने सर्वात सुरक्षित आहे हे मला पटत असतं, पण त्यांना जाम पटत नाही. मी तऱ्हेतऱ्हेने माझा मुद्दा मांडत असतो आणि ते मख्ख बसलेले असतात. “तुम्हीच कायतरी करा, मुलीला मोकळी करा!” एवढंच त्यांचं पालुपद. मीही माझा हेका सोडत नाही, कारण माझ्या डोळ्यासमोर सोनाली जाधव तरळत असते.
      सोनाली जाधव. तरणीताठी, उफाड्याची, देखणी, सतत विनाकारण हसणारी, जगात चिंता आहे हे गावीच नसणारी. दोन घट्ट वेण्या, छाती जरा जास्त पुढे काढून चालण्याची ढब, शाळेच्या युनिफॉर्ममध्येच मधल्या सुट्टीत, रणरणत्या उन्हात, धापा टाकत माझ्या केबिनमध्ये घुसली होती ती.  म्हणाली, “डॉक्टर मला दिवस गेलेत! खाली करायचंय, काय घ्याल?” तिचा बिनधास्तपणा पाहून मी आश्चर्यचकित झालो.
      “नाव काय तुझं?” चेहऱ्यावर काही न दाखवता मी विचारलं.
      “सोनाली जाधव.”
      “कितवीला आहेस?”
      “सहावीत. पण दोनदा फ्येल झाल्येय!” तिनं गडबडीनं खुलासा करत ती ‘मोठी’ असल्याचं स्पष्ट केलं.
      “आई-वडील?”
      “शेतात आहेत.”
      “बरोबर नाही आले ते?”
      “बरोबर कोणी नाही.”
      “किती महिने गेलेत?”
      “असतील दीड न्हाईतर दोन.. मागच्या आठवड्यात लय उलट्या झाल्या.”
      “तू आई-वडिलांना घेऊन येशील?”
      “दोघांना?”
      असं वाटावं, की कुणा एकाला ही आणू शकणार आहे.
      “कोणीही एक आलं तरी चालेल?”
      “पण घरी हे कसं सांगणार?”
      “सांगावंच लागेल. कायद्यानं तुम्ही सज्ञान नाही. १८ वर्षांखालील असल्याने अॅबॉर्शन करायला कायदेशीर पालकांची, म्हणजे आईवडीलांची सही लागते.”
      “लांबचा मामा चालेल?”
      म्हणजे हिचा मित्र हाच लांबचा मामा. मला मामा बनवायला बघते काय?
      “नाही, आई किंवा वडील पाहिजेत.”
      “बघा नं जमतंय का डॉक्टर...” आता आवाजात अजीजी.
      मी “नाही जमत” असं तुटक उत्तर देऊन टेबलावरची बेल खण् खण् वाजवतो. माझ्या बेलचा आणि देहबोलीचा तिच्यावर काहीच परिणाम होत नाही.
      “तुम्हीच हे करू शकता डॉक्टर... प्लीऽऽज..”
      “तुम्ही आईवडिलांना घेऊन या, मगच मी तुम्हाला तपासतो आणि सांगतो.”
      दार उघडतं, सिस्टर आत ओघळतात आणि उघड्या दारातून बाहेरच्या गर्दीचा कोलाहलही. मग मी अस्वस्थ होतो. बाहेरच्या नजरा डॉक्टरभेटीसाठी नंबर लागण्याची वाट बघत असतात, पण हिला मात्र त्या नजरा तिच्याकडेच संशयाने बघताहेत असं वाटतं. पण क्षणभरात ती लगेच सावरते, ताठ होते आणि निश्चयाने ताडताड निघून जाते.
      पेशंटची रीघ सुरु होते ती अगदी पाच वाजेपर्यंत. कुणाला असलेलं नकोय तर कुणाला हवं असताना राहात नाहीये; कुणाला पांढऱ्याचा त्रास तर कुणाला लालचा. पहिल्यापासून नवव्यापर्यंत महिने, तक्रारी, सोनोग्राफ्या, तपासण्या, पेशंटनी घेतलेल्या माझ्या उलटतपासण्या.. वेळ कसा गेला हे समजलंच नाही.. मध्येच एक डिलिव्हरी, एक क्युरेटींग... ५ वाजता मी राउंड घेऊन जिना उतरू लागलो तर जिन्याच्या अंधारातून सोनाली जाधव अचानक पुढ्यात उगवली....
      “डॉक्टर, प्लीज, बघा ना.” तिची आर्जवं. जिन्याच्या दुसऱ्या टोकाला दोन धट्टीकट्टी जवान पोरं उभी होती. त्यांची नजर भलतीकडे, पण लक्ष आमच्याकडे लागलं आहे हे मी क्षणात ताडलं. हेच ‘ते’ असावेत. “आई-वडिलांपैकी कोणालाही घेऊन ये; नाही तर तुझं वय १८ पेक्षा जास्त असल्याचा पुरावा तरी घेऊन ये.” मी निक्षून सांगितलं आणि तिच्या प्रतिक्रियेची वाट न बघता माझी वाट गडबडीने चालू लागलो.
      कामाच्या रामरगाड्यात मला ह्या घटनेचा विसरही पडला. अशा चौकश्या नित्याच्याच. विशेषतः नव्यानं प्रक्टिसमध्ये जम बसावणाऱ्याकडे. अशा डॉक्टरला प्रॅक्टीस हवी असते आणि अशा पेशंटला सस्त्यातली, झटपट, गुपचूप आणि लवचिक सेवा. ‘सटवाईला नाही नवरा आणि म्हसोबाला नाही बायको’ यातला प्रकार. मीही त्यावेळी म्हसोबा असल्याने अशा सटवाया नेहमीच्याच. अशा विवाहपूर्व गर्भार राहिलेल्या मुलींना ‘कुंती’ म्हणण्याचा प्रघात आम्ही कॉलेजमध्ये असल्यापासून आहे. थोडी गंमत, थोडी कुचेष्टा आणि आगंतुक कानसेनांपासून गुप्तता पाळण्याचा प्रयत्न, अशा साऱ्या छटा या कुंती नावामध्ये होत्या.
      एके दिवशी दुपारी मोबाईल ओळखीची धून गाऊ लागला. माझा मित्र डॉ. सागर याचा फोन होता.
      “बोल सागर.”
      “एक कुंती आहे, septic abortion आहे, gasping आहे. ये लगेच.”
      मी तडकाफडकी निघालो. कुंती आणि gasping म्हणजे भलताच गंभीर मामला होता. कायदेशीररीत्या गर्भपात करायचा तर तसा परवाना लागतो. डॉ. सागर हा गायनॉकॉलॉजिस्ट नव्हता; होता सर्जन. त्याच्याकडे असा परवाना नव्हता. गावाकडच्या प्रथेनुसार तो येईल त्या पेशंटवर (येतील ते) उपचार करायचा. अपेंडिक्स, हर्निया वगैरेची ऑपरेशन्स लीलया करायचा. तसाच गर्भपात, गर्भपिशवी काढणे वगैरेही करायचा. अति उत्साहाच्या भरात त्याच्या हातून काहीना काही गोच्या होत राहायच्या. मग समव्यावसायिक मित्रांना बोलावून सारं निस्तरणं ह्यात त्याचा हातखंडा होता. मुळात अशी कुंती त्यानं स्वीकारायला नको होती. (आमच्यासारखा तज्ज्ञ गायनॉकॉलॉजिस्टनी मग काय करायचं?) आता अॅबॉर्शन होऊन वर इन्फेक्शन झालंय, म्हणजे ह्याच्या हातूनच काहीतरी झालं असणार. निर्जंतुकीकरण करताना निष्काळजीपणा झाला असणार.
      ह्याच्या दवाखान्यात इतकी गर्दी, की निष्काळजीपणा स्वाभाविकच म्हणायचा. (आणि त्या गर्दीबद्दलची माझी असूयाही तितकीच स्वाभाविक.) आता पोलीसी खटलं मागे लागणार. बेकायदा गर्भपात आणि त्यातून मृत्यू म्हणजे पोलिसांची चंगळच. ह्या झेंगटातून सुटण्यासाठीच सागरने माझा धावा केला होता.
      इतका सगळा विचार होईपर्यंत मी सागरच्या दवाखान्यात पोहोचलो देखील. तिथे नेहमीचीच गर्दी, गडबड, गोंधळ वगैरे...! हा पठ्ठ्याही त्याच्या केबिनमध्येच पेशंट तपासत असल्याचं बाहेरच्या सिस्टरनी सांगितलं.
      मी त्याच्या केबिनमध्ये शिरताच तपासत्या पेशंटमधून डोकं वर काढून तो मला म्हणाला, “सुटुपॅक!”
      एखादा रुग्ण दगावला असं सांगणारा हा कॉलेजमधला सांकेतिक शब्द. ‘सुटुपॅक’ हे शस्त्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या एका धाग्याचे नाव आहे. ‘सुटला’ म्हणण्याची ही वैद्यकीय तऱ्हा.
      “काय?” स्वतःच्या दवाखान्यात स्वतःच्या पेशंटचा असा अपमृत्यू झाल्यानंतरही हा हिमनगासारखा शांत कसा?
      “अरे, आणली तेव्हा pulseless आणि gasping होती. तुला फोन केला आणि arrest मध्ये गेली ती गेलीच. Beyond salvageच होती रे ती!”
      पुढ्यातला पेशंट हे सारं माझ्या इतकंच कान देऊन ऐकतोय, हे लक्षात येताच तो सावरला. पेशंटला आणि नातेवाईकांना बाहेर जायला सांगून मला तो झाली घटना सांगू लागला.
      “झेड.पी.च्या शाळेतील मुलगी आहे. Thirty two weeksची तरी pregnancy असेल.”
      “अरे, पण मग तू कशाला abort करायला गेलास?”
      “मी कशाला काय करतोय? कुठेतरी quack कडे जाऊन vagina त काड्या घालून आलेत.”
      “काय?”
      “सगळा vagina puss नी भरलाय, जाम वास मारतोय. आतून तपासलं तर काड्या हाताला लागतायेत!”
      “बापरे! पोलिसांना inform केलंस?”
      “नाही रे, कशाला?”
      “वेडा का काय? Septic abortion आणि death is a serious matter.”
      “पाच महिन्यांपूर्वी गेली होती म्हणे तुझ्याकडे...?”
      “आं!! सोनाली जाधव का नाव तिचं?”
      “अंहं. वनिता चंदने!”
      “तीच ती असेल, तर नाव खोटं सांगितलं तिने मला. कसल्या तयारीच्या असतात या पोरी.”
      “तुझ्याकडे तू सांगितलंस आईवडिलांची सही पाहिजे.”
      “मग बरोबरच आहे, minor आहे ती, कायद्यानं सज्ञान नाही.”
      “तुझं बरोबरच आहे. पण ही घरी सांगायला घाबरली आणि मग अशा कुठेतरी जाऊन काड्या घालून घेतल्या!!”
      “तीच ती असणार. अशी एक केस आईवडिलांना घेऊन यायला सांगून परत पाठविली होती मी. तिच्याबरोबर २ बॉयफ्रेंड होते..”
      धाडकन् दार उघडून दोन पोरं आत आली.
      सागरला म्हणाली, “नेऊ का बॉडी?” आणि मला पाहताच जागच्या जागी थिजून उभी राहिली.
      तीच ती दोघं ‘सोनाली जाधव’बरोबर माझ्या दवाखान्यात आलेली. मुर्दाड चेहऱ्यांनी ती दोघं उभी होती.
      सागरनं त्यांना बाहेर थांबायला सांगून वर दटावलं. दार बंद होता होता तो मला म्हणाला.. “बाहेर कोपऱ्यात उभे होते ते तिचे आईवडील.”
      ती मुलं आता येता येता उघडमिट करणाऱ्या दारातून मला त्यांचं ओझरतं दर्शन झालं होतं, पण त्यांचे चेहरे माझ्या मनावर तप्तमुद्राच उमटवून गेले. निर्विकारपणाचे बुरखे पांघरलेले ते चेहरे. पण त्या बुरख्याच्या आरपार आतलं सगळंच दिसत होतं. साऱ्या दुनियेची विषण्णता, पराभव, शरम, राग, हतबलता यांचा उसळता डोंब दाटला होता त्यांच्या चेहऱ्यावर. एकेक भावनेची एकेक लाट बाकीच्यांना मागं सारत चेहऱ्यावर उमटण्यासाठी उसळत होती. त्यांच्या बाकी शरीरात जीवच नव्हता जणू. भिंतीवर ठोकलेल्या बिनदोऱ्याच्या कठपुतळी बाहुल्यासारखी ती दोघं जिन्याखालच्या कोपऱ्यात भिंतीला लोंबत टेकली होती. त्यांच्या दोऱ्या नियतीने कापल्या होत्या जणू. पोटच्या गोळ्याचा असा अंत त्यांनी स्वप्नातही कल्पिला नव्हता. एका उमलत्या जीवाचा करुण अंत पाहून माझ्या पोटात कालवाकालव होत होती. उगीचच नजर डॉ. सागरच्या बंद दरवाज्याकडे वळत होती. त्या दरवाज्यावरती चिकटवलेली शुभ्रवस्त्रांवृता नर्स माझ्याकडे डोळे वटारून पाहत, तोंडावर बोट ठेवून सांगत होती, ‘शांतता राखा’.
      पुन्हा एकदा दार उघडलं आणि दोन पोलीस आत आले. पुढे काय रामायण घडणार ह्याची कल्पना असल्याने मी तिथून निघालो. माझ्या दवाखान्यात माझी वाट बघणारी गर्दी मला दिसत होती.
      संध्याकाळी उशिरा दवाखान्यात सगळी झाकपाक झाल्यावर शिरस्त्याप्रमाणे आम्ही मित्र कॉफीच्या अड्ड्यावर जमलो. डॉ. सागरने मग ‘सोनाली जाधव’ च्या कथेतल्या रिकाम्या जागा भरल्या.
      दोन महिन्यांची गरोदर असताना ती माझ्याकडे आली होती पण ती वयाने लहान (कायद्याने अज्ञान) असल्यामुळे मी तिला आईवडिलांना घेऊन यायला सांगितलं. कायदाही मोठा विचित्र होता. कोणतीही स्त्री १६ वर्षानंतर शरीरसंबंधास अनुमती देऊ शकते. पण जर गर्भधारणा झाली, तर गर्भपात करून घेण्याचा कायदेशीर अधिकार तिला नाही. तो १८ वर्षांनंतर प्राप्त होतो. तत्पूर्वी गर्भपातासाठी तिचे कायदेशीर पालकच संमती देऊ शकतात.
      या साऱ्या कायदेबाजीत मला अजिबात अडकायचं नव्हतं. सबब कायद्यावर बोट ठेवून मी मोकळा झालो. पण या विधी-लिखीतात ‘सोनाली जाधव’ मात्र अडकत गेली.
      मी कटर मारल्यावर सोनाली आणि दोन जवान पोरांनी हरप्रयत्ने गर्भपात करायचा प्रयत्न केला. कुठे पपई खा, कुठल्या बिया चघळ, कसला काढा पी, अगदी पोटावर लाथा घालण्यापर्यंत सर्व प्रकार केले. पण ढिम्म फरक पडेना. दरम्यान वैद्यकीय उपचार, संमती आणि पैसा याचा काही मेळ बसेना. दिसामासांनी सोनालीच्या पोटातला गर्भ मात्र वाढत होता. मध्यंतरी घरदार सोडून ती तिघंही २-३ दिवस भिरीभिरी फिरत राहिली. आत्महत्येशिवाय त्यांना पर्याय दिसेना. हायवेवरच्या कुठल्याशा हॉटेलमध्ये तिघंही विष पिऊन जीव देणार होते. त्या हॉटेल मालकाला त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे त्यांनी त्यांना घरी पिटाळलं. इतकं सगळं होईपर्यंत घरच्यांना कुणकुण लागलीच होती. तिला कोंडून ठेवणं, मारझोड करणं वगैरे रीतसर झाल्यावर हिच्या आईनीच तिला त्या मुलांच्या मदतीने डोंगरावरच्या दरेवाडीतल्या बाईकडे नेऊन ‘औषध’ घेऊन दिलं. त्यातून उद्भवलेलं आजारपण अब्रूपायी आठवडाभर घरातच अंगावर काढलं. शेवटी जेव्हा ती मरणपंथाला लागली, तेव्हा आईवडिलांचा जीव राहीना. तिला दवाखान्यात आणली, तो ती गेलीच.
      पुढे पोलीस पंचनामा, पोस्टमॉर्टेम वगैरेंमुळे जी गोष्ट ह्या कानाची त्या कानाला कळू द्यायची नव्हती, ती जगजाहीर झाली. आईवडिलांनी, त्या दोन मुलांनी वगैरे सगळ्यांनीच या सगळ्या प्रकरणी कानावर हात ठेवले. तिला गर्भ राहिल्याचं, तो पाडल्याचं वगैरे त्यांना माहित नसल्याचं त्यांनी सांगितलं. आई-वडिलांनी बॉडी ताब्यात मिळताच तिला थंडपणे अग्नी दिला. कोरड्या मनाने आणि कोरड्या डोळ्यांनी. त्यांच्या लेखी लेकीचा अंत हे एक दुःस्वप्न होतं. घाटावरून घरी जाताच ते संपणार होतं.

      दोन दिवसांनी पेपरमध्ये त्या दोन मुलांनी स्मशानातच गळफास लावून आत्महत्या केल्याची सनसनाटी बातमी छापून आली. मृत व्यक्तींच्या खिशात अथवा घरी चिठ्ठीचपाटी न सापडल्यानं आत्महत्येचं कारण पोलिसांना कळू शकलं नव्हतं.

Tuesday, 1 September 2015

करायला गेलो एक

करायला गेलो एक.
डॉ. शंतनू अभ्यंकर
मोबाईल ९८२२० १०३४९


लिंगगुणोत्तर ढळढळीतपणे ढळत असताना सरकारने निव्वळ बघ्याची भूमिका घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने कानपिचक्या दिल्या आणि कायद्याच्या अंमलाला गती आली. पण आता प्रशासनाला आणि स्त्रीवाद्यांना कायद्याचा अंमल चढला असं म्हणायची पाळी आली. या कायद्याच्या अतिरेकी आणि चुकीच्या अंमलबजावणीमुळे स्त्रियांना मूलतः असलेल्या गर्भपाताच्या हक्कावरच गदा येते आहे. स्त्रियांविषयक अनेक अभ्यासातून हे आता दिसून आलं आहे.
उठसूट प्रत्येक गर्भपात म्हणजे स्त्रीभृणहत्याच आहे असं गृहीत धरून कायदा राबवला जातो. याचा जाच डॉक्टरांना होतो. या मुळे कित्येकांनी गर्भपात करणंच बंद केलं आहे. तिसऱ्या महिन्यानंतर लिंगनिदान शक्य आहे आणि पाचव्यापर्यंतचा  गर्भपात कायद्याला मान्य आहे. त्या मुळे चौथ्या-पाचव्या महिन्यात गर्भपात करायला डॉक्टर कांकू करतात. अशा बाईला, तिने लिंगचाचणी केलेली असू शकेल, या वहीमावर चार हात दूर ठेवलं जातं. पहिली मुलगी असेल तर चक्क नकार देतात. पहिल्या दोन असतील तर अगदी ठाम नकार देतात आणि तीन मुली असतील तर विचारायलाच नको. कायद्यानं काचलेल्या अशा महिलांना मग भोंदू डॉक्टर शिवाय पर्याय रहात नाही. भारतातील ८% मातामृत्यू असुरक्षित गर्भपातामुळे होतात. त्यात ही आणखी थोडी भर!
त्यामुळे लिंगाधारित गर्भपातांना आळ घालतानाच, वैध गर्भपातांना कायद्याच संरक्षण आहे आणि हे ही स्त्रियांच्या हिताचंच आहे हे विसरता कामा नये.
‘स्त्रीभृणहत्या’, ‘कळ्या खुडणे’ वगैरे शब्दांनी या साऱ्याच्या मुळाशी लिंगभेदभाव आहे हे अधोरेखित होत नाही आणि हाच तर कळीचा मुद्दा आहे. खरं तर ‘स्त्रीभृणहत्या’ हा शब्द वापरणंच चुकीचं आहे. समजा मुलगा आहे हे जाणून एखाद्या कुटुंबाने मूलं ठेवलं, आणि मुलगी आहे हे जाणून एखाद्या कुटुंबानी मूल पाडलं; तर निव्वळ पोर पाडणारी मंडळीच गुन्हेगार आहेत का? लिंग निदान आणि लिंग निवड ही दोन्हीकडच्या मंडळींनी/डॉक्टरांनी  केली आहे! दोन्ही तेवढीच गुन्हेगार आहेत. स्त्रीभ्रूणहत्येइतकेच पुरुषभ्रूण-जीवदानही चुकीचंच आहे. गर्भपाताच्या कायद्याचा वरवंटा फिरवून हत्या करणारे  पकडता येतील कदाचित पण जीवदान देणाऱ्यांचं काय? जाणूनबुजून, लिंगनिदान करून, पुरुषभ्रूण जन्माला घालणारी, लिंगनिवड करणारी ही  मंडळी कायद्यात सापडूच शकत नाहीत!
थोडक्यात लिंगनिवड  करणारे निम्मे लोक कायद्याच्या कचाट्यात सापडणं, निव्वळ अशक्य आहे. पुन्हा एकदां हा प्रश्न कडक कायद्यानं नाही तर लिंगभेदविरहीत दृष्टीकोनाने सुटणार आहे. असा दृष्टीकोन समाजात रुजवणं हा अर्थातच दूरगामी पण खात्रीचा उपाय आहे.
आज या विषयी जनजागृती करताना ही बाब विसरली जाते. स्त्री-पुरुष हे भेदाभेद अमंगळ आहेत हे सांगण्याऐवजी भलत्याच गोष्टींना महत्व दिलं जातं. म्हणूनंच माध्यमांतून, जनमाध्यमांतून वापरले जाणारे शब्द, दाखवली जाणारी चित्रं हे सारं खूप जबाबदारीनं आणि काळजीपूर्वक निवडलं पाहिजे. शासन स्तरावर देखील या प्रश्नाची दखल घेतली गेली आहे आणि या संदर्भातली शासनाने नुकतीच प्रसृत केलेली मार्गदर्शिका खूप उपयुक्त आहे.

आकडेवारी असं दर्शवते की मुलीचा गर्भ पाडून टाकल्यामुळे, मुलींचा जन्मदर हा   सुमारे ४.६% ने घटला आहे. २००१-०८ या दरम्यानचा हा अभ्यास आहे. (Trends in sex ratio at birth and estimates of girls missing at birth in India (2001-2008), UN FPA 2011.) यानुसार ५.७ लाख मुलींना जन्म नाकारण्यात आला हे खरं पण त्याच दरम्यान ६४ लाख गर्भपात करण्यात आले. म्हणजे एकूण गर्भपातांपैकी निव्वळ ९% गर्भपात हे लिंग निवडीसाठी होते तर! थोडक्यात सरसकट गर्भपातावर बंदी घालून, गर्भपाताला बदनाम करून हा प्रश्न सुटणार नाही.
पोटुशीच्या पोटातून आरपार गेलेले सुरे, ठिबकणारं रक्त वगैरे चित्रांमुळे गर्भपात बदनाम होतोय. ‘जीव घेणे’, ‘मुली मारणे’ वगैरे शब्दांमुळे गर्भपाताला हत्येचं पातक चिकटतंय. गर्भपात हे पाप आहे वगैरे गैर अर्थ ध्वनित होताहेत. या अशा प्रचारामुळे डॉक्टर आणि पेशंट वैध गर्भपाताला देखील टरकतात. कायद्याने निव्वळ लिंगाधारित गर्भपात (आणि हो, लिंगाधारित गर्भावस्था चालूच ठेवणे देखील) मोडीत काढले आहेत. वास्तविक गर्भपात हा प्रत्येक स्त्रीचा, कायद्यानं काही मर्यादेत मान्य असलेला, हक्क आहे.
 ‘आई मला मारू नकोस, ती बघ, ती बघ डॉक्टरांची कात्री माझे पोट फाडते आहे...’ वगैरे हृद्यद्रावक नाट्यछटांमुळे काळजाला घरं पडतात, आतड्यालाही पीळही पडतो पण वैध  गर्भपाताबद्दलही अत्यंत नकारात्मक संदेश  जातो त्याचं काय?  हे टाळलं पाहिजे. गर्भ आईला विनवतोय असं दाखवल्यामुळे गर्भाला स्वतंत्र जाणीव, विचार, संवेदना आहेत असं भासमान होतं. अशा सादरीकरणामुळे ‘प्रत्येक जीवाला जन्माला येण्याचा अधिकार आहे’, अशा चालीवर प्रचार होतो आहे. भारतीय कायद्यात गर्भाला स्वतंत्र व्यक्ती म्हणून अधिकार अर्थातच अभिप्रेत नाही. असा अधिकार मान्य केला तर  या अधिकारात कायदेशीर गर्भपाताची संकल्पनाच रद्द ठरेल! हे भारतातल्या कुठल्याच कायद्याला  आणि या क्षेत्रातल्या तज्ञांना अभिप्रेत नाही.
आज मुली मारल्यात तर उद्या लग्नाला बायका मिळणार नाहीत, घरात सुना येणार नाहीत असाही सूर स्त्रियांची निव्वळ लग्नाच्या संदर्भातली उपयुक्तता ठळक करतो. वरमाला घेऊन उभ्या पुरुषांची रांग आणि अंतरपाटापलीकडे रिकामे पाट वगैरे चित्रं ही भलत्याच गोष्टींना महत्व देतात. बाईला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे, हा संदेश अभिप्रेत आहे हे कुठे तरी विसरलं जातं.
स्त्रीभ्रूण हत्या ही स्त्रियांना मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीचं निव्वळ एक टोक आहे. कुपोषण, दुर्लक्ष, अनारोग्य, अ-शिक्षण, नको असलेलं गर्भारपण हे सारे म्हणजे घरोघरी रोजच्या रोज होणारी  थोडी थोडी स्त्रीह्त्याच आहे. या कायद्याच्या बाजूनं रान उठवताना हा मुद्दा ठळक होणं जरुरीचं आहे.
गर्भपात नको असं नाही तर लिंग निवड नको हे महत्वाचं, स्त्री-पुरुष समानता हवी हे महत्वाचं, कायदेशीर गर्भपात हा स्त्रीचा हक्क आहे हे महत्वाचं. हे जर लक्षात घेतल नाही तर करायला गेलो एक आणि झालं भलतंच असाच अनुभव यायचा.
डॉ. शंतनू अभ्यंकर
अध्यक्ष,
सातारा स्त्री आरोग्य आणि प्रसूतिशास्त्रतज्ञ संघटना
मॉडर्न क्लिनिक
वाई
जि. सातारा
पिन ४१२ ८०३
मोबाईल ९८२२० १०३४९