Saturday 30 July 2016

ती सुटली पण हीचं काय?

ती सुटली पण हीचं काय?
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई. मो.क्र. ९८२२० १०३४९

ती मुंबईतली होती. तिच्यावर बलात्कार झाला होता, तिच्या गर्भातल्या बाळाला डोकं नव्हतं आणि पोट होतं सगळं उघडं, इतकं की आतले अवयव बाहेर सांडत होते. हे निदान होईपर्यंत २० आठवडे उलटून गेलेले. डॉक्टर म्हणाले, ‘गर्भपात, नॉट अलाउड!’
ती गेली कोर्टात अगदी सुप्रीम कोर्टात. कोर्टाला फुटला पाझर. कोर्टानी हातोडा आपटला, डॉक्टरांना म्हणाले, ‘अहवाल द्या अहवाल. ताबडतोब.’
डॉक्टर म्हणाले, ‘हा घ्या अहवाल, ताबडतोब. हे असं, असं, असं, असं आहे.’
कोर्ट झालं चकित. मोठा कठीण प्रसंग हा.
बलात्कारानी पिडीत बाई, त्यातून मूल सव्यंग. जगूच शकणार नाही असं. पण कायदा सांगतो, अं हं, गर्भपात फक्त २० आठवड्यापर्यंतच वैध. त्यापुढे अवैध. त्यापुढे तो चक्क खून. बिनडोक्याच्या, नक्की नं जगणाऱ्या बाळाचा झाला, म्हणून काय झालं, खून तो खून.
कोर्टाच्या बुद्धीला हे पटेना, कायद्यात काही बसेना. मग कोर्टानी लढवली शक्कल. तिला सांगितलं, ‘कर गं गर्भपात, पण अपवाद म्हणून हं. देव, घटना वगैरे वगैरे तुझं कल्याण करोत.’
हे झालं तीचं; पण हीचं काय?
ही आहे खेड्यात. बलात्कार  बिलात्कार काsssही झालेला नाही. चांगलं देवाब्राम्हणाच्या साक्षीनं ज्या पुरुषबरोबर लग्न लागलं त्याच्या पासूनच दिवस गेलेत हीला. पण बाळात आहे व्यंग, निदान झालं एकविसाव्या आठवडयात. बाळाला आहे विकार, त्यामुळे  ते नक्कीच नाही जगणार. हीनी काय करायचं?
ही आणखी एक. बाळा भोवतीचं पाणी काढून तपासल्याशिवाय, बाळाला व्यंग आहे किंवा नाही हे ठरवता येणार नाहीये. पण हे सगळं करून रिपोर्ट यायला लागला वेळ. लागणारच. अहो ही इथे वाईत, तपासणीसाठी नमुना जाणार दिल्लीला! २० आठवड्याच्या आत व्हावं कसं सगळं? पंचवीसावा आठवडा उलटला. हीनी काय करायचं?
आणखीही एक भेटली मला. बाळाला हृदयविकार, बाहेरच्या जगात हे हृदय बाळाला साथ देणार नव्हतं. पण आईच्या पोटात असेपर्यंत सगळं ठीकच चालणार होतं. आई(जी)च्या जीवावर बाळ(जी) उदार! हृदयानी साथ द्यायला हवी असेल तर ऑपरेशन लागणार. मोठ्ठ ऑपरेशन. ते काही हीला परवडण्यासारखं नाही. आता आहेत स्किमा, पण स्किमा काय कामाच्या? दरिद्री माणसाचं नाव कधी रेषेखाली रहातं का?  पण कायदा सांगतो, गर्भपात बेकायदेशीर. मग काय, चला, वाढवा गर्भ. नऊ महिने नऊ दिवस पोसा त्याला. जन्मल्यानंतर मरणारच आहे. पण हळूहळू. जन्मानंतरचा कणाकणानी होणारा गर्भपातच की हा. फक्त डोळ्यादेखत होणारा. कुटुंबाच्या सहनशीलतेचा अंत पहाणारा. पण कायदेशीर हां, कायदेशीर.
वरील पैकी एकीनी मुकाट आहे ती परिस्थिती स्वीकारली.
एकीचा नवरा मोठा ज़हांबाज. त्यानी डॉक्टरना खळ्ळ-खट्याकची भीती दाखवली.
तिसरीनी सरळ डोंगरावरची कदेवाडी गाठली. गर्भपातासाठी प्रसिद्ध अशा तिथल्या म्हातारीकडून काडी घालून घेतली. आणि भारतात बाळंतपणात बायका मरतात ना, त्यांच्या पंक्तीत जाऊन बसली. गावठी गर्भपातात त्यातल्या १३% जीव गमावतात, त्यात ही एक. आधुनिक सतीच म्हणा ना ही. तेव्हा नवऱ्याबरोबर जाळलं आता बाळाबरोबर जाळलं, एवढाच फरक.
       नवे नवे शोध लागतात ही कटकटच आहे शिंची. पूर्वी बरं होतं, बाळ बाहेर आलं की मगच त्याचं बरंवाईट काय ते समजायचं. त्याकाळी केलेला (१९७२) हा गर्भपाताचा कायदा. ज्ञान बदललं तंत्रज्ञान बदललं, सोनोग्राफीनं आईच्या पोटात डोकावता येऊ लागलं, पण कायदा तोच, अगदी तसाच. महिलांना आणि त्यांच्या कुटुंबियांना या कायद्याचा फायदा सोडाच, उलटा जाचच होतो अशा वेळी.
कित्येक व्यंग अशी आहेत की ज्याचं वीस आठवड्याच्या आत निदान शक्य नाही. कित्येक स्त्रिया अशा आहेत, अशा ठिकाणी आहेत, की त्याचं वेळेत निदान होऊ शकत नाही. काही तपासण्यांचे निकालच खूप उशिरा येतात... अशांनी काय करायचं? प्रत्येकीनी काय सर्वोच्च न्यायालयाची पायरी चढायची?
       जर २४ आठवड्यापर्यंत गर्भपाताला परवानगी दिली, तर त्याचा स्त्रीभ्रूणह्त्येसाठी गैरवापर होईल हा एक बागुलबुवा उभा केला जातो. अगदी सरकारी वकिलांनी देखील न्यायालयात हे बोलून दाखवलं. पण अनेक डॉक्टरकडून सोनोग्राफी तपासणी, त्यांच्या निदानाचं पद्धतशीर दस्तावैजीकरण, मोजक्याच केंद्रांना अशा गर्भपाताची परवानगी, अशा काही उपाययोजना करता येतील.
       न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी, त्यामुळेच ही गोची झाली आहे. गाऱ्हाणी ऐकण्यासाठी कान एवढा एकच अवयव न्यायदेवतेनी उपलब्ध ठेवला आहे. हे काही ठीक नाही. ती वकील मंडळी सांगणार आणि ही ऐकणार. ह्या बायकांची वेदना ते काय शब्दात मांडू शकणार आहेत? ह्या बायकांची वेदना काय कानांना दिसणार आहे? ह्या बायकांचे अश्रू काय कानांनी ऐकू जाणारेत? ह्या बायका आहेत, त्यातून भारतीय बायका. अगा न्यायदेवते, त्यांचे हुंदके सुद्धा अस्फुट असतात. आता तरी आपल्या डोळ्यावरील पट्टी काढ. हिच्या आणि हिच्या सारख्यांच्या वेदना बघ आणि गर्भपाताची कालमर्यादा तत्काळ वाढव.

ह्या आणि अशात अन्य लेखांसाठी माझा ब्लॉग जरूर वाचा
shantanuabhyankar.blogspot.in


No comments:

Post a Comment