Monday 14 December 2015

गर्भ आणि त्याचा निःपात

गर्भ आणि त्याचा निःपात
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई. जि. सातारा. ४१२ ८०३
मोबाईल: ९८२२० १०३४९

नुकत्याच आलेल्या बातमी नुसार, रॉबर्ट डिअर नावाच्या एका अमेरिकन माणसानं, तिथल्या कॉलोरॅडो राज्यातल्या, ‘प्लॅण्ड  पेरेंटहुड’ संस्थेच्या गर्भपात केंद्रावर हल्ला केला. त्यात दोन माणसं आणि एक पोलीस ऑफीसर मारले गेले. इतर अनेक जखमी झाले. तासाभराच्या धुमश्चक्रीनंतर रॉबर्ट डिअरला अटक करण्यात आली. हल्यामागचं कारण असं आहे की कोणाही स्त्रीने गर्भपात करून घेणं ह्या डिअर सायबांना मान्य नव्हतं. हे धर्म संमत नाही म्हणून.
आपल्याकडे गर्भपात विधीसंमत आहे. पण अमेरिकेमध्ये मात्र सरसकट असं नाही. उलट गर्भपाताला पाठींबा आणि विरोध हा तिथे अत्यंत भावनिक आणि चक्क निवडणूकीचा मुद्दा आहे. जगातील अत्यंत प्रगत देशातही असे धर्ममार्तंड आहेत. त्यांचे कट्टर अनुयायीही आहेत. हा ही दहशतवादच आहे. अगदी अमेरिकन कायद्यातील व्याख्येनुसार सुद्धा! अमेरिकन माध्यमं त्याला तसं लेबल लावत नसली तरीही.
  यापूर्वी आयर्लंड या कट्टर कॅथॉलिक देशात वेळेवर गर्भपात न केल्यामुळे एका भारतीय डॉक्टरचा मृत्यू ओढवला. हे मूल तिला हवं होतं पण परिस्थितीच अशी उद्भवली की तिचाच जीव धोक्यात आला. गर्भपात न केल्यास ही मरणार हे दिसत असून सुध्दा, कायद्यावर बोट ठेऊन तिला गर्भपात नाकारण्यात आला. जिवंतपणी गर्भहत्येचं पातक करून, ख्रिस्तवासी झाल्यावरच्या  नरकयातना कोणाला नको होत्या. जित्या जागत्या बाईच्या जीवापुढे तिच्या पोटातला गोळा महत्वाचा ठरला.  शेवटी दोघंही देवाघरी गेले! बाईचा जीव धोक्यात असेल तेव्हातरी अॅबॉर्शनला  परवानगी दया अशी याचना तिथल्या स्त्रिया करत होत्या. शेवटी, ‘आमच्या शरीराची आणि आरोग्याची एवढी काळजी वाटते ना तुम्हाला, मग आम्ही आमच्या पाळीच्या तारखाही सरकारला कळवतो’, असं म्हणून तिथल्या स्त्रियांनी, ट्वीटर वरून, आपल्या पाळीच्या तारखा थेट पंतप्रधानांना कळवायला सुरुवात केली!  हा अगदी आंतरराष्ट्रीय मामला झाल्यावर तिथल्या सरकारनं नुकताच कायदा थोडासा(च) सैल केला आहे.
‘प्रो लाईफ’ हा पश्चिमी देशातला गर्भपात विरोधी कंपू. गर्भालाही जीव असतो, स्वतंत्र अस्तित्व असतं, त्याचा रक्तगट, जनुकीय रंगरूप आईपेक्षा वेगळं असतं. मग त्याला मारायचा अधिकार अन्य कुणाला कसा? हा यांचा प्रश्न.
‘प्रो चॉइस’ हा गर्भपाताचा पर्याय असावा असं सांगणारा  गट. यांचं म्हणणं असं की जन्म झाल्या शिवाय, किमान आईवेगळं अस्तित्व शक्य झाल्या शिवाय गर्भ हा स्वतंत्र व्यक्ती होऊच शकत नाही. सर्वस्वी परपोषित,परावलंबी अशा गर्भाला स्वतंत्र व्यक्ती मानणं हा पराकोटीचा ताणलेला युक्तीवाद आहे. ह्या न्यायानी, पुरुष/स्त्री बीज वगैरेचाही स्वतंत्र अस्तित्व म्हणून विचार करता येईल; कारण जैवशास्त्रीय दृष्टया यातील पेशी आपल्या पेक्षा ‘वेगळ्या’ असतात. एवढंच कशाला शरीरातील प्रत्येक पेशी ही ‘जिवंत’च असते. रक्ताचा नमुना घेऊनही त्यातल्या पेशी डॉक्टर मारतच असतात! जिवंत पेशींचा जगण्याचा हक्क मान्य करायचा तर, एखाद्याचं अपेंडिक्स काढणंही चुकीचंच म्हणायचं काय?
शिवाय नकोसं असताना राहिलेलं मूल, हे मूल म्हणून कितीही गोंडस असलं, तरी त्या कुटुंब साठी ती न पेलणारी जबाबदारीच असते. विवाहपूर्व संबंधातून, विवाहबाह्य संबंधातून, बलात्कारातून निपजलेली संतती असेल तर त्या आईला आयुष्यभर हे भोवतं. नव्यानं आयुष्य सुरु करताना ही मुलं मोठाच अडसर ठरतात. अशी मुलं पोसायची जबाबदारी शेवटी समाजावर येऊन पडते. या अनाथ पण अश्राप मुलांना सुजाण पालकत्व पुरवणं ही मोठी जोखीम असते. ही झेपली नाही तर बाल गुन्हेगारी, व्यसनीपणा असे प्रश्न निर्माण होतात.
लुळी, पांगळी, मरणासन्न आजारांनी ग्रस्त संतती, जन्माला येणार आहे हे जर आधी कळू शकतं, तर मग अशी संतती जन्माला न घालण्याचा अधिकार त्या त्या स्त्रीला/कुटुंबाला असलाच पाहिजे. अशी संतती जन्माला घालणं आणि पुढे लालन, पालन, पोषण करणं ही त्या आई-बापाला आणि कुटुंबाला विनाकारणच शिक्षा आहे. उलट हा जन्मानंतर रोज थोडा थोडा होणारा गर्भपातच आहे.  तेव्हा गर्भपाताचा पर्याय हा उपलब्ध असायला हवा. म्हणून हे प्रो चॉईस!
प्रो लाईफवाले म्हणतात; ‘कुठला जीव काय दैव घेऊन जन्माला येईल हे कुणी सांगावं? बेथोवेन, हा पाश्चात्य संगीताचा बेताज बादशहा, हा त्याच्या आई-बापाचा पाचवा मुलगा होता! घ्या!! म्हणजे जर गर्भपाताचा पर्याय बेथोवेनच्या मातापित्यास उपलब्ध असता तर आपण एका अभिजात संगीतकाराला मुकलो असतो!’
यावर प्रो चॉइसवाल्यांचं, तोडीसतोड उत्तर असं की ‘त्या’ रात्री ‘त्या’ माता पित्यांनी ‘ती’ क्रीया करण्याचा ‘तो’ निर्णय घेतला म्हणूनच बेथोवेन शक्य झाला. म्हणजे एखाद्या दिवशी संभोग न करणं म्हणजे देखील बेथोवेनला जनन नाकारणंच नव्हे काय? आता याला काय उत्तर आहे?  हिटलर हा देखील त्याच्या पितरांचा चौथा मुलगा होता. पाचवेपणाचा सांगीतिक कर्तृत्वाशी जसा काडीचाही संबंध नाही तसाच चौथेपणाचा अपत्याच्या क्रौर्याशी नाही.  थोडक्यात संभाव्य बेथोवेनला जीवानिशी  मारल्याचा आरोप पोकळ आणि बिनबुडाचा आहे.
गर्भपातबंदी ही दारूबंदी सारखी असते. ती अमलात आणणं महाकर्मकठीण. उलट अशा परिस्थितीत असा मामला चोरीचा बनतो आणि हळूहळू बोंबलत उरकावा लागतो. सगळ्याच बेकायदा सेवांप्रमाणे मग याचेही दर चढे रहातात. पिळवणूक, शोषण आणि असुरक्षित गर्भपात वाढत जातात. यातच काही बायका मरतात. आयर्लंड आणि अमेरिकेमध्ये असे परिणाम दिसतात.
गर्भपाताचा भारतीय कायदा त्यामानानं अतिशय सुटसुटीत आणि व्यवहार्य आहे. आपल्याकडे स्त्रियांच्या आरोग्यासाठी तो वरदान ठरला आहे.
यानुसार पाचव्या महिन्यापर्यंत गर्भपात करता येतो. आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे गर्भातील दोष ओळखता येतात आणि गर्भपाताचा निर्णय पाचव्यानंतरही घ्यायची वेळ येते. अशा परिस्थितीत कायद्यात गर्भपाताची मुभा नाही. तीही मिळावी अशी मागणी आहे. त्यावर विचारही चालू आहे. तंत्रज्ञानानुसार कायदाही बदलेल ही अपेक्षा.


No comments:

Post a Comment