Tuesday 29 December 2015

राईट टू पी अर्थात शू करण्याचा अधिकार ; तो ही जन्मसिद्ध

राईट टू पी अर्थात शू करण्याचा अधिकार ; तो ही जन्मसिद्ध
डॉ शंतनू अभ्यंकर

पी म्हणजे शू करणे. राईट टू पी म्हणजे शू करण्याचा अधिकार! हा मागितला आहे महानगरातल्या बायकांनी. जाहीरपणे. लाज बीज सोडून, भीड भाड मोडून. करणार काय? प्रश्न अगदी जिव्हाळ्याचा. रोजच्या जगण्यातला.

घराबाहेर पडलं की बायकांना लघवीला जाणं मोठं जिकिरीचं असतं. महिलांसाठी कॉमन टॉयलेट नसणं ही एक मोठीच समस्या आहे आपल्याकडे. बारा-बारा तास, अठरा-अठरा तास घराबाहेर असणाऱ्या महिलांना ही समस्या खूपच भेडसावते. मुंबईत आणि इतर ठिकाणी या विषयी महिलांनी चक्क जाहीर निषेध नोंदवला आहे. घराबाहेर पडल्यावर स्वच्छ आणि सहज उपलब्ध टॉयलेट हवीत, नव्हे हा स्त्रियांचा अधिकारच आहे, असं याचं म्हणणं. किती योग्य आहे ही मागणी, आणि किती साधी. स्वच्छ भारतातचे डिंडिम पिटताना आपण याकडे गांभीर्यानं पहायला हवं.

बाहेर सोय नाही, उघड्यावर बसणं शक्य नाही, अशामुळे कित्येक बायका दिवस दिवस लघवी साठवून धरतात. तशी सवयच लावलेली असते त्यांनी स्वतःला, अगदी लहानपणा पासून. सक्काळी एकदा घराबाहेर पडताना लघवीला जायचं ते थेट घरी परत आल्यावरच पुन्हा जायचं!

या सवयीचे, कोंडमाऱ्याचे शारीरिक दुष्परिणाम या महिलांना भोगायला लागतात. लघवीची इन्फेक्शनस्, पोटदुखी, हसलं खोकलं की कपड्यात थोडीशी लघवी होणं, लघवीच्या तालचक्राबरोबर संडासचंही तालचक्र बिघडणं, एक ना अनेक. पैकी इन्फेक्शन सगळ्यात कॉमन.

आपल्या सगळ्यांच्या युरीनरी ट्रॅकमध्ये रोगजंतू असतातच. फक्त त्यांची लोकसंख्या सातत्यानं अतिशय मर्यादित राखली जाते. कशी?  वारंवार शू केल्यामुळे! म्हणजे होतं असं की ब्लॅडरमध्ये जंतू वाढायला लागतात. आत चांगला अंधार असतो, उबदार असतं; लघवीमधली काही द्रव्य हेच ह्यांचं अन्न, त्यामुळे खाऊही खूप उपलब्ध असतो. यावर जंतू पोसले जातात. वाढतात. अगदी झपाटयानं. पण आपण शू केली की ही सगळी प्रजा बाहेर पडते. शू बरोबर. त्यांचे वाढीचे प्रयत्न गेले पाण्यात! मग थोडे बहुत उरलेले जंतू पुनःश्च हरीओम म्हणून पुन्हा हात पाय पसरायला बघतात.
कल्पना करा तुम्हाला काही कारणानी शूच नाही करता आली...? हे जंतू वाढत रहातील. ब्लॅडर मध्ये चांगला जम बसवतील. त्यातून शू  साठून राहिली की ब्लॅडर फुगतं, त्याच्यातल्या प्रेशर मुळे ब्लॅडरवॉलचा रक्तपुरवठा क्षीण होतो आणि ह्यामुळे जंतुंना आता प्रतीकाराची भीती रहात नाही. रक्तपुरवठा क्षीण झाल्यामुळे या जंतुंविरुध्द प्रतिकारशक्ती नीट काम करू शकत नाही. अशा परिस्थितीत युरिनरी इन्फेक्शन न झालं तरच नवल. हे जंतू आता ब्लॅडर मध्ये घर करतात. लघवीला आग, जळजळ, वारंवार लघवीला लागणं असले सगळे प्रकार. कधी कधी तर इन्फेक्शन पार किडनी पर्यंत जातं. ताप, थंडी वगैरे सुरू. शिवाय अशक्तपणा, बराच काळ टिकणारा.

त्यामुळे दर दोन तासांनी बाथरूमला जाऊन येणं महत्वाचं. पण महिला हे टाळतात. बाहेरची स्वच्छतागृह इतकी अस्वच्छ असतात की नुसत्या वासानीच ओकारी येते... आणि पुरुषांसारखा महिलांना आपला कार्यभाग उघड्यावर थोडाच उरकता येतो? अस्वच्छ ठिकाणी जाणं नको म्हणून मग घर येईपर्यंत कळ काढणं सुरु रहातं. ब्लॅडर बसतं फुगून आणि वर समजावल्याप्रमाणे जंतू वाढीला सुरुवात होते. कधी कधी कळ अगदी असह्य होते. मग गडबडीनं असेल त्या स्वच्छतागृहाचा आसरा घेतला जातो. दुसऱ्या दिवशी जळजळ सुरु झाली की आदल्या दिवशीचं अस्वच्छ बाथरूम आठवतं. पण मुळात लघवी खूप वेळ तुंबवून ठेवल्यामुळे जंतुंची लागण झालेलीच असते. ह्यातली मेख अशी आहे की इन्फेक्शन हे अस्वच्छ ठिकाणी लघवी केल्यामुळे होत नाही. इन्फेक्शन हे तर बराच वेळ लघवी तुंबवून ठेवल्यामुळे होतं.

ठिकाण स्वच्छ असो किंवा अस्वच्छ, वेळोवेळी जंतू बाहेर जाणं महत्वाचं. लघवी न करण्यापेक्षा अस्वच्छ  ठिकाणी केलेली चांगली. यातच स्त्रीयांचे सूख सामावले आहे.

इतक्या प्राथमिक, इतक्या साध्या, इतक्या नेहमीच्या, गरजेच्या गोष्टीसाठी, जाहीर मागणी करावी लागावी ही खूप लाजिरवाणी आणि अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. जे बिनबोभाट व्हायचं ते गावभर बोभाटा झाल्यावर तरी होतंय का; ते आता पहायचं.

ह्या आणि अशा इतर लेखांसाठी माझा ब्लॉग जरूर वाचा
shantanuabhyankar.blogspot.in


No comments:

Post a Comment