Monday 11 January 2016

पपी लव्ह

पपी लव्ह

डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई, जि.सातारा ४१२ ८०३
मोबाईल क्र. ९८२२० १०३४९

पपी लव्ह म्हणजे कोवळ्या  वयातलं प्रेम. याला म्हणतात क्रश. अगदी पहिलंवाहीलं प्रेम. ‘परकर चोळी मधली पोर, झर्रकन् झाली फूल टपोर’, अशा वेळचं झर्रकन् झालेलं हे प्रेमाच्या गावा जाणं. एखादी कविता, सिनेमातला एखादा प्रसंग, एखादं गाणं हे कॅटॅलीस्ट म्हणून काम करतात; आणि मग घडतं, हे नखशिखांत प्रेमात पडणं. ह्याला काहीही बंधन नसतं, कसलीही   मर्यादा नसते. आकंठ प्रेमात बुडून, आकंठ तृप्ततेची वाट बघणं हे ह्या प्रेमाचं लक्षण. अगदी चौदाव्या सोळाव्या वर्षी हे प्रेम घडतं. सहसा आपल्यापेक्षा वयानं, कर्तृत्वानं खूप मोठया व्यक्तीबद्दल ही भावना असते. कधी ही व्यक्ती कोणी प्रसिद्ध नट, खेळाडू वगैरे असते किंवा कधी वरच्या वर्गातला एखादा देखणा मुलगा. कधी कधी वर्गातल्या शिक्षकांवरही प्रेम बसतं. मोठेपणी ह्यासगळ्या आठवणींनी अगदी गुदगुल्या होतात. मनसोक्त हसूही येतं, स्वतःच्या बावळटपणाचं, निरागसतेचं. बरेचदा ह्या पहिल्या वहिल्या प्रेमात काही दिवस गटांगळ्या खाल्यावर व्यवहाराची जाणीव होते; आणि ही प्रेमवीर व्यक्ती सावरते. काही मात्र....!
कधी कधी आपल्या बरोबरीच्या व्यक्तीवरही प्रेम बसतं. त्या व्यक्तीच्या एखाद्याच गुणावर भाळून हा क्रश सुरु होतो. कोणी मुलगा फुटबॉल खेळताना  काय सुरेख गोल करतो म्हणून मुली मागे लागतात तर एखादी मुलगी बटा काय दिलखेचक उडवते, हे बघून, एक ही अदा पे फिदा होऊन, मुलं तिच्या मागे पागल होतात. पण एखाद्या क्षेत्रातली ही चमक आयुष्यभरासाठी पुरणारी नसते. आयुष्य म्हणजे नुसतंच  फुटबॉल किंवा बटा मागे सारणं नव्हे. आयुष्यभरासाठीचा जोडीदार निवडायचा तर त्याचे इतरही गुण-अवगुण पारखायला हवेत. आयुष्यातल्या खाचखळग्यांवर प्रवास करताना साथही तशीच समर्थ आणि समंजस, सच्ची आणि सहजप्राप्य हवी.
 शिवाय प्रेमभावना ही एकतर्फी असून उपयोग नाही. असं प्रेम हे वेडगळपणाचं आहे हे आसपासच्या व्यक्तींना दिसत असतं पण प्रेमात असलेली व्यक्ती मात्र हे मान्य करायला तयार नसते. अशाच वेळी ‘क्रश’, ‘पपी लव्ह’ वगैरे नावाचा काही प्रकार असतो हे लक्षात आणून देणं गरजेचं असतं. तुला जे होतंय ते म्हणजे क्रश किंवा पपी लव्ह नाही ना?; असं तपासून बघायचा आग्रह जवळच्या मैत्रिणींनीच धरावा लागतो. अशी प्रेम भावना कितीही सच्ची असली तरी अव्यवहार्य असल्याची जाणीव मग हळूहळू होऊ लागते आणि यातून बाहेर पडलं जातं.
असं समजलं जातं की ही प्रेमभावना ही भावी नात्याची जणू रंगीत तालीम असते. खराखुरा, व्यवहार्य असा जोडीदार मिळाला की हा प्रेमज्वर उतरतो. भातुकलीचा खेळच जणू. बरेचदा हे अव्यक्त प्रेम मूकच रहातं. पण क्वचित असे बचपन के प्रेमी, उतार वयात अवचित भेटतात, परिस्थिती अनुकूल असेल तर लग्न वगैरेही करतात, बातमीचा विषय होतात.
प्रेमाचा थांग पत्ता अजून तरी वैद्यकविज्ञानाला लागलेला नाही. प्रेमात आपलेपणाची भावना ही वासोप्रेसीन आणि ओक्सिटोसीनची देन आहे तर कामभावना मुख्यत्वे टेस्टोस्तेरोनची. शिवाय धडधड, हुरहूर, झोप उडणे  ही सगळी डोपामीन , कॉर्टीसोल या रसायनांची किमया आहे. आपल्याला आजवर अशी अत्यंत जुजबी माहिती आहे. एखादा माणूस प्रेमात पडताना त्याच्या मनात, मेंदूत, नेमका काय केमिकल लोच्या होतो ते अजून माहीत नाही. हे कळलं तर मग प्रेमाचा थर्मामीटरही निघेल. क्रश/पपी लव्ह वगैरेचं प्रेशर टेस्ट करता येईल, अगदी शास्त्रशुद्ध वशीकरण औषधं बाजारात येतील!... पण तो पर्यंत आपापली जाणीव, मूल्य आणि विवेक हेच आपले साथीदार आहेत.

No comments:

Post a Comment