Thursday 10 December 2015

बाई मी निगेटीव्ह गं निगेटीव्ह...!

बाई मी निगेटीव्ह गं निगेटीव्ह...!
डॉ.शंतनू अभ्यंकर.  मो.क्र. ९८२२० १०३४९
आजकाल बरेच पालक लग्नाआधीच डॉक्टरी सल्ला घ्यायला येतात. ह्यात एक प्रश्न हमखास असतो, ‘डॉक्टर, मुला-मुलीचा ब्लड ग्रुप एकच आहे, काही प्रॉब्लेम नाही ना?’
ब्लडग्रुपचा आणि वैवाहिक सौख्याचा; पुढे मुलं होण्याचा किंवा न होण्याचा काही एक संबंध नाही. आई बापाचा ब्लडग्रुप एक असला काय किंवा वेगळा वेगळा असला काय सगळं सारखंच. उलट त्यातल्या त्यात एक असलेला बरा; उद्या एकाला रक्ताची गरज लागली तर दुसऱ्याचं काढून भरता येईल! पण हा प्रश्न येतो खास. काही ज्योतिषीही ‘एक नाड आहे, तेव्हा आता ब्लडग्रुप बघा’, असा शहाजोगपणाचा सल्ला देतात. या नाड या प्रकरणाचा आणि ब्लडग्रुपचा अर्थाअर्थी संबंध आजवर तरी कोणी सिद्ध केल्याचं माझ्या माहितीत नाही. या सल्ल्या मुळे ज्योतिषी मॉडर्न आणि वैज्ञानिक  ठरतो, बस्स!
 त्यातून जर मुलीचा ब्लड ग्रुप निगेटिव्ह असेल तर मग विचारूच नका.
मुलीचा ब्लड ग्रुप निगेटीव्ह असणं हा अधुनिक पत्रिकेतला मंगळ आहे जणू. पण पारंपारिक पत्रिकेतल्या मंगळाइतकाच हाही निरुपद्रवी आहे. पुरेशी दक्षता घेतल्यास हा मंगळ आपण निष्प्रभ करू शकतो. मंगळाच्या मुलीचं लग्न जसं अवघड होऊन बसतं तसंच हे. निगेटीव्ह ब्लड ग्रुप म्हणजे काहीतरी वाईट असतं एवढीच माहिती सर्वसामान्यांना असते. खरं सांगायचं तर वाटतो तितका हा निगेटीव्ह पणा वाईट किंवा धोकादायक नाही. मंगळा इतक्याच ह्याही बाबतीतील श्रद्धा या  अंधश्रद्धाच आहेत.
मुळात निगेटीव्ह हा शब्द नकारात्मक नाहीये. काहीतरी वाईट आहे असा अर्थ अभिप्रेत नाही. निव्वळ एरवी दिसणारी काही प्रथिनं (antigens) ह्या लोकांच्या रेड ब्लड सेल्स वर नसतात एवढंच.
यातला मुख्य तोटा म्हणजे या व्यक्तींना कधी काळी रक्त भरायची गरज पडली तर ब्लडग्रुप रेअर असल्या मुळे रक्त सहजासहजी मिळत नाही. हा तोटा अर्थात स्त्री पुरुष अशा दोघांना लागू आहे. दुसरा तोटा असा की गर्भाचा ब्लडग्रुप जर पॉसिटीव्ह असेल तर आईच्या शरीरात त्या सेल्स विरुद्ध रासायनिक अस्त्र तयार होतात आणि ही त्या गर्भाच्या रेड सेल्स विरुद्ध लढा पुकारतात. त्यात गर्भाच्या रेड सेल्स मरतात, गर्भाला अॅनिमिया होतो , कावीळ होते...!
पण इतकं सगळं असूनही निगेटिव्ह रक्तगट हा लग्नात अडथळा ठरू नये असं मी म्हणतो कारण....
बाळाला होणारा हा आजार तिसऱ्या चौथ्या खेपेस होतो; आजकाल इतकी मुलं कुणी होऊ देत नाही. त्यामुळे ह्या आजाराचं प्रमाण बरंच घटलं आहे.
हा होऊ नये म्हणून प्रभावी लस, अँटी डी चे इंजेक्शन, उपलब्ध आहे. अँटी डी चे हे इंजेक्शन डिलिव्हरी नंतर ७२ तासात द्यायला हवं. हे सगळ्यांना माहीत असतं आणि हे इंजेक्शन आवर्जून दिलंही जातं पण त्या आधीही गरोदरपणातच, सातव्या महिन्यात,  हे घ्यायला हवं. पण बहुतेक वेळा हे विसरलं जातं, डॉक्टरांकडूनच! डिलिव्हरीच नाही तर प्रीटर्म डिलिव्हरी, गर्भपात होणे/करणे, एक्टॉपिक असं काहीही झालं तरी हे इंजेक्शन घेतलंच पाहिजे.
पोटातल्या बाळाच्या आजाराची तीव्रता किती? बाळाच्या अंगात रक्त किती कमी? कावीळ किती? ह्याचं निदान आता गर्भातच होऊ शकतं, अगदी गर्भाला रक्त भरण्यापर्यंत उपचार करता येतात. बाळ जन्माला यायच्या आधीच हे होऊन जातं.
इतकं सगळं करून जन्मतः झालाच बाळाला त्रास तर त्यावरही प्रभावी उपचार उपलब्ध आहेत.
थोडक्यात बाकी सगळं जुळत असेल तर निव्वळ निगेटिव्ह ब्लड ग्रुपला घाबरू नये.

लग्नाआधी ब्लडग्रुप बघू नये तर बघावं तरी काय? पारंपारिक पत्रिकेसारखी आधुनिक, वैज्ञानिक पत्रिका नाही का मांडता येणार? येईल... पण त्याबद्दल पुन्हा केव्हातरी.

No comments:

Post a Comment