हायमेनोप्लास्टी
गेलेले हायमेन आणि कौमार्य
परत मिळवा!
डॉ.शंतनू अभ्यंकर. फोन ९८२२० १०३४९
हायमेन हा योनीवर पातळ
पापुद्र्यासारखा पडदा. हा कौमार्याचं प्रतीक मानला गेलाय. मानला गेलाय असं
म्हणायचं कारण म्हणजे प्रत्यक्षात हायमेनवरून कौमार्यपरीक्षा ही अगदीच बेभरवशाची
असते. मैदानी खेळ, मर्दानी खेळ (उदाः घोडेस्वारी) वगैरेंमुळेही हायमेन फाटलेलं असू
शकतं आणि काही वेळा शरीर संबंध येऊनही ते फाटत नाही. पण पारंपारिक समजूत अगदी उलट
आहे.
पुरुषांसाठी नाही का एखादी
कौमार्य परीक्षा? आहे की! म्हणजे असू शकते. पुरुषांच्या लिंगावरील एक बारीक
त्वचेची तार ही प्रथम संभोगावेळी तुटते. पण हे तर हायमेन पेक्षा कितीतरी बेभरवशाचं, त्या मुळे ह्याची जास्त चर्चाच होत
नाही. शिवाय पुरुषप्रधान संस्कृतीला योनीशुचिता मानवते, शिस्न सुचिता बाधते, असा
खाक्या.
थोडक्यात एखादी व्यक्ती
संभोग-शून्य आहे वा नाही हे खात्रीने सांगता येत नाही! तिचा शब्द आणि तुमचा
विश्वास हाच पुरावा.
लग्नानंतर पहिल्या रात्री
संभोग केल्यावर योनीमार्गातून रक्तस्त्राव झाला तर ती स्त्री कुमारिका होती असं
समजलं जातं. कित्येक समाजात रक्त लागलेलं बेडशीट, कपडे कुटुंबाला सादर करावे लागतात.
ह्यात स्त्री कुमारिका होती हे जसं बघायचं असतं तसंच तो पुरुषही नपुंसक नाही, ही
ही खात्री करून घ्यायची असते. ना विज्ञान, ना डॉक्टर, ना समुपदेशन; न कळत्या वयात
झालेलं लग्न, या सगळ्या परिस्थितीवर उपाय म्हणून समाजानं हे असले मापदंड योजलेले.
मुलगा मुलगी दोघंही टीनअेजर असायचे त्या काळी कुटुंबियांचा हा भोचकपणा चाल्लोन
जायचा. पण आता दोघही चांगले पंचविशीचे वगैरे असताना ह्या प्रथेला अर्थ उरत नाही.
पण त्या प्रथेचं ओझं आपण अजून वागवत आहोत.
शिक्षणामुळे परिस्थिती पालटली. लग्न उशिरा उशिरा व्हायला लागली.
शारीरिक वाढ झालेली, लैंगिक भूक लागलेली. ही भागवायची समाजमान्य सोय मात्र नाही.
लहान वयात लग्न व्हायची तेंव्हा मुलगा/मुलगे वयात येताच लैंगिक शमनाची सोय घरातच
उपलब्ध होती. आता तसं नाही. त्यातून मुलामुलींना एकत्र येण्याच्या, रहाण्याच्या
अनेक संधी. मैत्रीचं रुपांतर शारीरिक जवळकीत कधी होतं हे कळत सुद्धा नाही. पण हे
नातं काही कारणानं लग्नात रुपांतरीत होऊ शकत नाही. मग पहिल्या रात्रीच्या
कौमार्यतपासणीचं टेन्शन येतं. तपासलंच उद्या नवऱ्यानी, तर उगीच घोळ नको. म्हणून मग
हायमेनोप्लास्टीची मागणी केली जाते.
पण हे असलं काही मेडिकल
कॉलेजात शिकवत नाहीत. सीझर, नसबंद्या, क्युरेटींग वगैरे शिकवतात. ज्येष्ठांचा
सल्ला घेऊन आणि थोडी कल्पना शक्ती आणि कौशल्य वापरूनच ही शस्त्रक्रिया शिकली जाते आणि केली जाते.
नुकताच जर कौमार्यभंग झाला
असेल तर ही शस्त्रक्रिया सोपी जाते. हायमेनचे उरलेले तुकडे एकमेकाशी पुन्हा शिवले
जातात. अगदी बारीsssक कशिदा काम करावं लागतं. जर ही मुलगी शरीर संबंधांना सरावलेली
असेल तर योनीमार्गाच्या तोंडाची अंतःत्वचा वापरून जरा कष्टपूर्वक हा पडदा विणला
जातो.
एका वैद्यकीय परिषदेमध्ये
यावर घमासान चर्चा झडली. “आपण कुमारी नसताना तसं भासवणं हा खोटेपणा आहे.” एक अगदी
तरूण फॅशनेबल फिरंगी पेहरावातली मुलगी हे बोलत होती, “ह्याला डॉक्टरनी मदत करायची म्हणजे एखाद्या गुन्हयाला
खतपाणी घातल्या सारखंच आहे. हे अनैतिक आहे. समाजातल्या अनैतिकतेला आपण मदत
केल्यासारखं आहे. जे नाही ते आहे असं दाखवण्यासाठी आपण आपलं शल्यकौशल्य का खर्च
करावं? केवळ पैसे उकळता येतात म्हणून?”
यावर काहीजण म्हणाले, ‘विवाहपूर्व
संबंध ठेवणं, ते लपवणं हा सर्व त्या स्त्रीचा खासगी मामला आहे, तिच्या नीतिमत्तेचा
प्रश्न आहे, तो तिनी सोडवायचा आहे. आमची भूमिका नीती निरपेक्ष आहे. तीचं वागणं मला
पटतं का नाही, नीतीनुसार आहे का नाही, हा मुद्दा नसून तिच्या अडचणीतून तिला सोडवण्यासाठी
मी माझं वैद्यकीय ज्ञान वापरतो आहे. हे तर आपण रोजच करतो. यात काही चूक नाही.
उद्या एखाद्या मुलीचा लग्नाआधीच गर्भपात करायचा असेल तर तुम्ही तो बिनबोभाट करताच
नं? मग हायमेनोप्लास्टीलाच हरकत का?’
“अहो पण ह्यात फसवणूक आहे, त्या
सासरच्या कुटुंबाची. ती कुमारी नाहीये. निव्वळ आपल्या शस्त्रक्रियेमुळे ती कुमारी
आहे असं भासवलं जाईल. जे नाही ते आहे असं दाखवायला आपण का मदत करायची?” पुन्हा
तरुणी. आता आणखी चढ्या सुरात.
यावर वक्त्यांनी दिलेलं
उत्तर बेफाट होतं, “ऑपरेशनने तिरळेपणा घालवता येतो, चष्म्याचा नंबर घालवता येतो,
मॅमोप्लास्टी मुळे स्तन उभार होतात; याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? ह्या सगळ्या
सर्जरीज, जे नाही ते आहे असं भासवणाऱ्याच आहेत.” थोडा पॉज घेऊन ते म्हणाले, “इतकंच
काय, पावडर, लिपस्टिक, ऊंच टाचेच्या चपला हे सुद्धा सगळं जे नाही ते आहे असं दाखवण्याच्या
प्रयत्नाचाच भाग आहे?” यावर मस्कारा, आयशॅडो, रूज आणि पावडर भिजवत, थरथरत्या लिपस्टिकनी, टॉकटॉक बूट वाजवत ती बाहेर पडली.
No comments:
Post a Comment