Saturday, 21 November 2015

जेम्स थर्बरची भन्नाट व्यंगचित्रे; या विषयावरील सातारा आकाशवाणीवर प्रसारित माझे भाषण.

जेम्स थर्बरची भन्नाट व्यंगचित्रे


व्यंगचित्र हा सगळ्यांनाच भावणारा प्रकार. वसंत सरवटे, ज्ञानेश सोनार, खलील खान, आर.के. लक्ष्मण वगैरेंची व्यंगचित्रे प्रसिद्ध आहेतच. पण व्यंगचित्र दरवेळी काही न्यूनच अधोरेखित करतं असं नाही.  कित्येकदा मानवी स्वभावाचे अर्क दोन चार फटकाऱ्यात आपल्यापुढे सहज उभे ठाकतात. आपल्याला अशी चित्र हसवतात पण अंतर्मुखही करतात. अशी अंतर्मुख करणारी चित्र रेखाटणारा, मानवी मनाचे खेळ चित्रात नेमके पकडणारा, जेम्स थर्बर हा अमेरिकी व्यंगचित्रकार प्रख्यात आहे. पण हा निव्वळ चित्रकार नव्हता, निव्वळ व्यंगचित्रकार तर नव्हताच नव्हता. तो उत्तम लेखक होता, पत्रकार होता, कथाकार होता. तुम्हाला ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ ही सीरिअल आठवते? ज्या मूळ गोष्टीवर ती बेतलेली होती ती जेम्स थर्बरची, ‘द सीक्रेट लाईफ ऑफ वॉल्टर मिटी’, ही. बायकोच्या आणि जगाच्या अपेक्षांनी कावलेला वॉल्टर मिटी हा या कथेचा नायक. जागेपणीच हा स्वप्नरंजनात मश्गुल होतो आणि थर्बर वाचकांनाही स्वप्न आणि आभासाच्या सीमारेषेवरून हिंडवून आणतो. बारीक सारीक प्रसंग, घटना, व्यक्तींवरील त्याच्या इरसाल टिपण्ण्या आजही दाद घेऊन जातात. आता हेच पहा नं, तो म्हणतो ‘मला स्त्री जातीचा राग आहे, कारण प्रत्येक गोष्ट नेमकी कुठे ठेवली आहे हे त्यांना नेहमीच माहीत असतं.’

‘कार्टून्स बाय जेम्स थर्बर इमेजेस’ असं नुसतं गुगललं की त्याची भन्नाट कार्टून्स आणि त्यांच्या लिंक्स समोर हाजीर होतील. ‘होम’, हे त्याचं असंच एक गाजलेलं चित्र आहे. चित्राची चौकट भरून राहिलेलं एक बंगलेवजा घर  आपल्याला दिसतं. त्या घरावर छत्रछाया धरणारं प्रचंड झाड आहे, समोर व्हरांडा आहे, पण त्या घराच्या मागच्या बाजूनं ते घर एका प्रचंड मोठया स्त्रीनं आपल्या कवेत घेतलं आहे. ती बाई वाकून समोर अंगणात पहाते आहे. तिच्या चेहऱ्यावरचा त्रास, राग, वैताग, त्रागा वगैरे भावना जेमतेम दोनचार रेषात जिवंत झाल्या आहेत ...आणि अंगणातल्या कोपऱ्यात नीट पाहिल्यावर आपल्याला दिसतोय तो इवलासा, दबकत पावलं टाकत येणारा, जरा वेंधळा, घाबरलेला एक माणूस. कोण असतील हे दोघं? आपल्या रागीट स्वभावामुळे उभ्या घरादाराला आपलाच स्वभाव बहाल केलेली ही घरमालकीण तर नाही? ...आणि नको ते घरी परत जाणं आणि पुन्हा तिच्या तावडीत सापडणं, असा विचार करणारा हा मालक दिसतोय. त्या प्रचंड घरापुढे आणि घर व्यापून दशांगुळे उरलेल्या त्या बाईपुढे हा माणूस फारच थोटका दिसतो. पण त्याच्या खुज्या रेखाटनातच त्याच्या मनीच्या भावनांचा अर्क उतरला आहे हे नक्की.

थर्बरचं असंच एक गाजलेलं चित्र. इथे पती-पत्नी अपरात्री अंथरुणात उठून बसलेले दिसतात. पतिराज झोपेत असावेत कारण त्यांचे डोळे मिटलेले आहेत आणि चेहऱ्यावर विलक्षण शांत आणि प्रसन्न भाव आहेत. स्वप्नातच त्यांनी आपल्या हाताचं पिस्तूल करून बायकोवर रोखून धरलंय. बायको मात्र या हल्यानं घाबरलेली आहे , दचकलेली आहे. विस्फारित नेत्रांनी ती नवऱ्याचं हे रूप पहाते आहे. कोणता नवरा खरा? स्वप्नात पत्नीवर पिस्तूल रोखून आनंदी दिसणारा खरा, का जागेपणी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करणारा खरा? मानवी मनाचं खरं रूप ओळखायचं कसं? जागेपणी माणूस कसा मर्यादा सांभाळून रहातो. मग झोपेत संयमाच्या सगळ्या शृंखला गळून पडल्यावर दिसणारं नवऱ्याचं रूप हेच सत्य समजायचं का? चित्रातल्या बायको पेक्षा चित्राच्या प्रेक्षकांच्या मनात थर्बर जास्त प्रश्न निर्माण करतो.

आणखी एक चित्र तर भन्नाटच आहे. एक पार्टी ऐन रंगात आलेली दाखवली आहे. माणसांचे घोळके आहेत, प्रत्येक जण काहीतरी बोलतो आहे. पण एकूणच संभाषणाचं स्वरूप पार्टीत असतं तसंच आहे. मुख्यत्वे गॉसिप चालू आहे. अनुपस्थित व्यक्तींच्या उखाळ्यापाखाळ्या, भानगडींचं चर्वितचर्वण वगैरे वगैरे. अशा गर्दीत एकच सुटाबुटातले विद्वान दिसणारे गृहस्थ एका कोचात नुसतेच कोपऱ्यात बघत बसले आहेत. शेजारच्या कोचावरच्या  दोन उच्चभ्रु स्त्रिया एकमेकींच्या कानात कुजबुजताहेत, ‘ह्यांना खरं तेवढंच माहित असतं बाई!’ (He doesn’t know anything except facts.) म्हणजे उणीदुणी काढण्यात, कुचाळक्या करण्यात रस नसणं, गप्पातही वस्तुनिष्ठ मतं आणि माहिती मांडणं वगैरे त्या गृहस्थाचे अवगुण ठरतात. तो भरल्या पार्टीत एकटा पडतो आणि वाचाळ मंडळी मात्र एकमेकांच्या सहवासाचा आणि गप्पांचा मुक्त आनंद लुटताना  दिसतात. म्हणजे गावगप्पा टाळणं योग्य, की एखाद्या रंगीत संध्याकाळी, गावगप्पांच्या  साथीनं, गाव आणि गप्पा दोन्हीही एन्जॉय करणं चांगलं? थर्बरनं हा निर्णय आपल्यावरंच सोडलेला आहे.


श्रेष्ठ साहित्य आणि श्रेष्ठ चित्रसुद्धा दरवेळी नवा आणि वेगळा अनुभव देतं. प्रश्नांची तयार उत्तर देण्यापेक्षा उकल करण्याची वेगळी दृष्टी देऊन जातं. हे थर्बरच्या अर्कचित्रांना तंतोतंत लागू आहे. खरंतर व्यंगचित्रांबद्दल मी शब्दात काय वर्णन करणार कप्पाळ. तुमची उत्सुकता चाळवणं एवढाच माझा हेतू. ही चित्रं तुम्हाला तुमच्या सुप्त भावभावनांचं दर्शन घडवतील. जेम्स थर्बरच्याच शब्दात सांगायचं तर, ‘टवाळी उपरोध वगैरे प्रकार इतरांची, जगाची चेष्टा करतात. पण खरा विनोदवीर मात्र स्वतःकडे पाहून हसतो, लोकांना हसवतो आणि या भानगडीत लोकांच्या चेहऱ्यावरचे मुखवटे आपोआप गळून पडतात. हे आत्मदर्शन विलक्षण असतं हेच खरं.’

No comments:

Post a Comment