Saturday 14 November 2015

आल्या बहु , झाल्या बहु, परंतू...

आल्या बहु , झाल्या बहु, परंतू...
डॉ.शंतनू अभ्यंकर, वाई. सातारा. पिन ४१२ ८०३
मो.क्र. ९८२२० १०३४९


आल्या बहु , झाल्या बहु परंतू या सम हीच!
हजारो बायका आल्या, प्रसूत झाल्या, प्रसूत होऊन गेल्या पण प्रसूची प्रसूती अविस्मरणीय. तीचं नाव प्रसोन्नचित्ता. होती खरीच नावासारखी. दिसायला प्रसन्न, वाणीही प्रसन्न, काळीसावळी, कमलनयनी, आत्मविश्वासाने वावरणारी, उच्चशिक्षित, एका उच्चभ्रू स्वयंसेवी संस्थेत काम करणारी, खेड्यात, आपल्या डॅनिश नवऱ्यासोबत.
आली तीच मुळी अस्खलित इंग्लिश बोलत... आणि बोलता बोलता माझी बोलतीच बंद केली तिनी. तिच्या इतके प्रश्न मला माझ्या एम्.डी.च्या परिक्षकांनीही विचारले नव्हते. प्रत्येक वेळी एक हातभर यादीच असायची प्रश्नांची तिच्याकडे. एका हातात यादी आणि दुसऱ्या हातात नवरा, अशीच यायची ती. दुसरा हात नवऱ्याच्या हातात अशी नाही; दुसऱ्या हातात नवरा अश्शीच यायची ती. तिला स्वतःच्या स्त्रीत्वाचा भलताच अभिमान होता. असं माझं सुरवातीचं मत होतं. मग ते बदललं; तिला स्त्रीत्वाचा अभिमान होता असं म्हणण्यापेक्षा स्त्रीत्वाचं भान होतं असं म्हणेन मी.
सलामीलाच तिनी मला धोबीपछाड टाकला. तिची आणि  तिच्या गरोदरपणाची  माहिती घेऊन झाल्यावर ती म्हणते कशी, ‘मी पुन्हा तुमच्याचकडे दाखवीन असं नाही हां डॉक्टर; तुम्ही मला थरो आणि प्रोफेशनल वाटलात तरंच मी येईन!’
म्हणजे मी तिला तपासण्याआधी तीच मला तपासत होती. थोडा अचंबा, थोडा राग गिळत मी तिला तपासलं. तिच्या परीक्षेला मी उतरलो होतो असं वाटलं. ‘डॉक्टरांना माझ्या शरीराबद्दल आदर असावा असं मला वाटतं, तुमच्या वागण्यातून, बोलण्यातून तपासण्यातून ते मला जाणवलं. थँक यु डॉक्टर.’ मी जरा चक्रावलो. नेहमीपेक्षा वेगळं मी काहीच केलं नव्हतं. मी म्हणालो, ‘पण एका बाईनं, प्रसूतीसाठी एका पुरुष डॉक्टरची निवड करणं, जरा अवघडंच निर्णय असतो.’ एवढं बोलून मी माझा नेहमीचा विनोद केला, ‘बायकांची योग्य काळजी कशी घ्यायची हे पुरुषांनाच चांगलं कळणार, नाही का?’ ती हसली. पण वरवरचं. ‘तसं नाही हो डॉक्टर, बाई-पुरुष वगैरे काही नाही. पण मी आधी मुंबईला डॉ. रिबेका क्लर्कना दाखवायला गेले. त्यांनी पोट तपासायला म्हणून खर्रकन् माझा ड्रेस वर केला, मला विचारलं नाही, सांगितलं नाही!! मला खूप अपमानित वाटलं. खूप लाज वाटली. पुन्हा मी गेलेच नाही.’ हे जरा वेगळंच होतं. अशा प्रकारे कोणत्याही पेशंटनी आपल्या शरीरावरचा आपला हक्क इतक्या रोखठोक भाषेत सांगितला नव्हता.
मी पसंत पडल्यावर पुढच्याच भेटीत तिनी प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. बरेचसे प्रश्न नेहमीचेच होते. जगप्रसिध्द डॉक्टर, डॉ.गुगल यांच्याकडून,  तिनी परस्पर उत्तरंही मिळवली होती. मी फक्त त्यांना मान्यता द्यायची होती. वजन किती वाढावं, तपासण्या कधी आणि काय काय कराव्यात, व्यायाम कोणते, औषधं कोणती सगळ्याची कोष्टकं तिच्याकडे तयार होती. मला करायला फारच कमी काम शिल्लक ठेवलं होतं तिनी. कळा कशा जाणवतात, बाळाचं डोकं खाली सरकल्याचं कसं जाणावं, वेदना शामक औषधं कोणती, आसनं कोणती, प्रसूतीची प्रगती कशी बघतात, एक ना अनेक...
खरं तर तिला माझी गरजच नव्हती. आदिवासी बायांसारखं ती स्वतः सगळं उरकू शकेल इतकी जय्यत तयारी तिनी केली होती.
नवराही तिच्याइतकाच एन्थू होता. तो प्रसूतीच्या वेळी हजर रहाणार हे त्यानी आल्याआल्याच जाहीर केलं होतं. बेशुद्ध न पडण्याच्या अटीवर मी त्याची उपस्थिती मान्य केली. मग प्रसूतीच्या वेळी बायकोला कसा आधार द्यावा, म्हणजे मानसिकच नाही हं, शारीरिक देखिल, याचा दांडगा अभ्यास त्यानी सुरु केला. दरवेळी मला त्यातली प्रगती तो सांगायचा आणि मी दरवेळी दाद द्यावी अशी अपेक्षा बाळगून असायचा. प्रसूतीची पहिली, दुसरी आणि तिसरी अवस्था, त्यातले फरक, त्या त्या वेळी त्या बाईला होणारे त्रास, नवऱ्यानी करायची कामं, डॉक्टरनी करायची कामं, सगळं मला घडाघडा म्हणून दाखवायचा. मी तेवढ्यात मनातल्या मनात माझ्या कामांची उजळणी करायचो. न जाणो थोड्या वेळानं मलाच ‘पाठ म्हणून दाखवा’ म्हणाला तर? स्तनपानाबद्दल तर तो इतकं हिरीरीनं आणि पोटतीडकीनं बोलला की आणखी थोड्याच प्रयत्नात त्याला स्वतःलाही पान्हा फुटला असता! हा नवरा आमच्या स्टाफमध्येही चांगलाच फेमस झाला. मुळात तो गोरा, त्यातून फॉरेनर, म्हणजे आपोआपच उच्चकुलीन, त्यात त्याचं हे असं वागणं, त्यामुळे उत्सुकता कमालीची. बायकोला दिवस गेले की थेट बारशालाच उगवणारे (ते देखील मुलगा झाला असेल तरच) महाभाग सगळ्यांना माहीत होते. पुरूषाचं तेच रूप स्टाफमान्य होतं. त्यामुळे एक नवरा आपल्या बायकोच्या बाळंतपणात इतका रस घेतो ही विलक्षण घटना होती आणि ती विलक्षण नापसंतही होती. नशीब त्याला मराठी येत नव्हतं, नाही तर आमच्या स्टाफ मधल्या बायकांनी त्याला सुनावलं असतं, ‘कार्य सिद्धीस नेण्यास आमचे सर समर्थ आहेत, तेव्हा तुमची लुडबुड नकोय!’
एकदा आला तो एकदम आठ महीन्याचं पोट वागवत! कमरेवर हात, अवघडलेली चाल... हे आक्रीत पाहून माझ्यासकट सगळ्या स्टाफनी दाहीच्यादाही बोटं तोंडात घातली. मग त्यानी अलगद खुलासा केला. सतत असं सात आठ किलोचं ओझं बाळगून हिंडणं ही काही सहजसाध्य गोष्ट नाही. चालणं, वाकणं, तोल संभाळणं सगळंच अवघड. हा अनुभव स्वतः घ्यावा म्हणून त्यानी नेट वरून ही ‘अनुभवाची पिशवी’ मागवलेली होती. ती पोटावर बांधूनच तो गेले तीन दिवस वावरत होता. रबरी पिशवी त्यात पाणी आणि बॅटरीवर हालचाली करणारं एक बाळही होतं आत! प्रसूच्या कुंकवाच्या धन्याचं हे ‘सतीचं वाण’ पाहून आम्ही थक्क झालो. ‘हे वाण घेतल्यामुळे माझे कित्येक पूर्वग्रह नाहीसे झाले. आम्ही खूप जवळ आलो आहोत आता’, असं काहीतरी तो म्हणाला. (‘This bag has helped me off load a lot of baggage, I feel closer to Prasoo as never before.’)
प्रसूती प्रसंगी बायकोनी नवऱ्याच्या कसं गळ्यात पडावं, नवऱ्यानी पाठीला कुठे कसं चोळावं, बाळाच्या डोक्याला बाहेर येताना कसा आधार द्यावा, नाळ कशी कापावी हे सगळं त्याला पाठ होतं. मनातल्या मनात त्यानी त्याची कित्येकदा उजळणी केली होती. गुळगुळीत कागदावर छापलेली अनेक सचित्र विंग्रजी पुस्तकं तो बाळगून होता. त्यातल्या हसत खेळत प्रसूत होणाऱ्या बायका पाहून मलाच वरमल्यासारखं व्हायचं.
सरकारी इस्पितळी तावून सुलाखून डॉक्टर झालेले आम्ही,  हे असलं काही आमच्या गावीही नव्हतं. देवाची करणी आणि नारळात पाणी; आणि नारळात पाणी, तशा बायका होतात बाळंतीणी; हे आमचं ब्रीदवाक्य. तिथल्या आया, मावश्या, नर्सेस, डॉक्टर कुणाच्या जिभेला हाड म्ह्णून नव्हतं. कामाचा रेटा इतका प्रचंड होता की असून भागणारच नव्हतं. जिभेवर ‘हाड्’ एवढा एकच शब्द होता म्हणाना. पेशंटप्रती सन्मान, आदर हे फक्त परदेशी पुस्तकातले उल्लेख होते. एक दूरस्थ वास्तव होतं. आमच्या आसपास असलं काही नव्हतं. गरोदर स्त्रियांच्या तपासणी विभागात पाउल टाकलं की सिस्टरंच म्हणायच्या, ‘आले बाई, ढेऱ्या कुरवाळणारे...!’ स्त्रीरोग विभागातली चिमणामावशी वेटिंग हॉलमध्ये खणखणीत आवाजात गर्जायची, ‘एsss... पहिल्या पाचजनी उठा गं, आत मुतारीत जावा, चड्या काढून ठेवा आणि आतल्या टेबलावर झोपा!!’ ही असली अघोचर घोषणा ऐकून माझ्या अंगावर काटाच आला होता. मी हटकलं तर चिमणी म्हणाली, ‘मी मुद्दामच तशी बोलते, त्याबिगार त्या बायांबरोबरचे पुरुष बाहेर जातच नाहीत.’ हे मात्र खरंच होतं, तिच्या ह्या वाक्यासरशी सर्व पुरुष हतवीर्य होऊनच्या होऊन शिवाय गर्भगळीत होत्साते बाहेर निघून गेले होते. तिच्याकडे दुर्लक्ष करत मी थेट विभागप्रमुखांना गाठलं. ते मला पुढ्यात घेऊन बसले, माझं शांतपणे ऐकल्यावर मला चहा पाजते झाले आणि म्हणाले, ‘मी तुझ्या एवढा होतो, तेव्हापासून चिमणी इथे आहे, मी त्या वेळी डीनकडे लेखी तक्रार दिली तर तत्क्षणी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला!’
डॉक्टरही काही कमी नव्हते.
‘पहिलं काय आहे?’
‘मुलगा’
‘नंतर?’
‘मुलगी’
‘मग आत्ताचं हवंय का नकोय?’
‘हवंय’
‘कशाला?, एक मुलगा आणि एक मुलगी आहे ना? मग आता काय वेगळं होणार आहे? कुत्रं का मांजर?!!!’
अविश्वसनीय, अशोभनीय आणि लज्जास्पद असे संवाद ठायी ठायी चालू असायचे.
तिथल्या पेशंटच्यामानानी प्रसूच्या अपेक्षा आभाळाला पोहोचल्या होत्या. तिनी एकदा मला थेट प्रश्न केला, ‘प्रसूतीच्या वेळी मायांगावरचे केस काढण्याबद्दल (to shave & prepare the perineum) तुमच्या दवाखान्याचं धोरण काय आहे?’
बसल्या खुर्चीत मी आक्रसलो. दवाखान्याला असल्या प्रश्नात धोरण बिरण असतं? मुळात हा प्रश्न असू शकतो? कोणी बाई हे तोंडावर विचारू शकते? हे सगळंच मला धक्कादायक होतं. पण ती मात्र अत्यंत कम्फर्टेबल होती. हे सगळं डॉक्टरांना विचारणं आणि आधी माहीत असणं तिला आवश्यक वाटत होतं. तिला तो तीचा अधिकार वाटत होता. मला मात्र तो डॉक्टरांचा, दवाखान्याचा निसंदिग्ध अधिकार वाटत होता. एकदा आत पाउल टाकल्यावर, आमच्यावर विश्वास टाकल्यावर, आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा नाही का? आम्ही तुमच्या शरीराला भोकं पाडू, नैसर्गिक भोकात नळ्या घालू, तुम्हाला टोचू, फाडू, शिवू, चिकटवू... काय वाट्टेल ते करू; पण करू ते तुमच्या भल्यासाठीच नं? मग आक्षेप घ्यायचा प्रश्न येतोच कुठे?  गेली वीस पंचवीस वर्ष बायका येताहेत आणि मी shave & prepare अशी ऑर्डर खरडतो आहे. एवढं सुद्धा लिहित नाही मी. फक्त s & p. पुढचं सगळं सिस्टर करताहेत. याला कुणाचा आक्षेप असेल, असू शकतो, ही मी तरी कल्पना सुद्धा केली नव्हती. जागा खाजते, पुन्हा केस येताना ते टोचतात असं काहीबाही ती म्हणत होती. थोड्या वेळानं सावरून मी उत्तरलो, ‘टाके बीके घालायच्या वेळी केस मधे येतात...म्हणून काढलेले बरे...’
‘बरं आठवलं, टाके घालायचे म्हणताय, म्हणजे तुम्ही प्रसूतीच्या वेळी मायांगाला छेद घेता का?’ (विटपछेद, Episiotomy)
‘हो’
‘रुटीनली?’
‘पहिल्या खेपेला रूटीनली घेतो.’
‘अरेरे, तुमचं तसंच धोरण आहे का?’
पुन्हा धोरण!
मी तिला समजावून सांगितलं, ‘बाई गं, माझा एक छोटासा खाजगी दवाखाना आहे. प्रत्येक बाबतीत धोरण बिरण असं माझ्याकडे नाहीये. हां, आता इतक्या वर्षाच्या अनुभवानं मला आणि माझ्या स्टाफला कधी काय करायचं हे माहीत आहे. सहसा आम्ही चुकत नाही. पण धोरण म्हणशील तर असं काही मी कुठे लिहून ठेवलेलं नाही. मायांगाला छेद म्हणशील, तर बहुतेकदा तो घेतला जातो, कारण तोपर्यंत ती बाई इतकी कातावलेली असते की तिची झटपट सुटका महत्वाची असते आणि...’
नाही पण एका नैसर्गिक गोष्टीसाठी वैद्यकशास्त्रानं माझ्या शरीरावर घाला घातल्यासारखं वाटतं मला! हे मला नकोय!!’
माझं रूप मला आता वेगळंच दिसायला लागलं. मला आठ दहा हात फुटले असून; कात्र्या, सुऱ्या, नळ्या, सुया, दोरे, चिमटे घेऊन मी सैरावैरा पळतो आहे. वेळोवेळी बायका दिसल्या की मी त्यांच्या शरीरावर घाला घालून एक छेद घेतोय, लगेच तो शिवतोय, की पुन्हा सैरावैरा पळतो आहे, की पुन्हा दुसरी बाई! माझे इतर डॉक्टर स्नेही देखील या पळापळीत आहेत. कुणी मोतीबिंदूवर घाला घालतो आहे, तर कुणावर आतड्यावर घाला घालून जुलाब बरे केल्याचा आरोप आहे!!  
लवकर प्रसूती व्हावी, आजूबाजूच्या अवयवांना (गुदद्वार, मूत्रमार्ग वगैरे) इजा न व्हावी या उदात्त हेतूनी घेतलेल्या छेदाला ही बाई चक्क ‘हल्ला करणे’ म्हणत होती! शरीरावर घाला घातला म्हणे! जीचं करावं भलं ती म्हणते आपलंच खरं! हां, आता हे बरोबर आहे की ही शस्त्रक्रिया प्रसूतीशास्त्रात सतत वादात अडकलेली आहे. दोन्ही बाजू लावून धरणारे आहेत. पण तो आमचा प्रश्न आहे. त्यात ह्या बाईनं नाक खुपसायचं काय कारण? माझ्या डॉक्टरी इगोलाच आव्हान दिलं होतं तिनी.
प्रयत्नपूर्वक शांत रहात मी तिला समजावलं, ‘आधीच छेद घेतला नाही तर मग कधी वेडी वाकडी इजा होते, नंतर टाके घालणं खूप त्रासाचं होतं... आजूबाजूचे अवयव...अतिरक्तस्त्राव....’
‘पण इंटरनॅशनल रिक्मंडेशन तसं नाहीये.’ हातातला टॅब नाचवत ती म्हणाली. मग मीही माझ्या शेल्फातलं एक जाडजूड पुस्तक काढून, तिला संदर्भ सादर केले. टॅबपेक्षा शंभर पट जाड पुस्तक. वाच बाई वाच, उगीच टीव टीव नको. मला काहीच येत नाही असं समजू नकोस.
शेवटी पहिलीच खेप असली तरी हा छेद टाळायचा आणि टाके पडले तर नंतर, प्रसंगी भूल देऊन, टाके घालायचे अशी तहाची कलमं ठरली. होणाऱ्या (दुष्)परिणामांना आता ती जबाबदार होती. मी शांत झालो. अगदी बरंsss वाटायला लागलं मला. प्रथमच कुठल्यातरी पेशंटनी स्वतःच्या भल्याबुऱ्याची जबाबदारी जाणीवपूर्वक स्वतःच्या शिरावर घेतली होती. ‘बघा हं डाक्तर आता तुमच्याकडे आणून टाकलीय, आता तुम्ही काय ते बघा.’ ह्या असल्या बजावण्याची सवय मला; त्या मानानं ही शांतता वेगळीच होती. आता प्रामणिक प्रयत्नांचीच जबाबदारी माझी होती. मार्ग निवडण्याची  जबाबदारी प्रसूची. तीही शांत झाली. मनासारखा तह झाल्यामुळे तीही खुशीत होती. पुरंदरच्या तहानंतर मिर्झा राजे जयसिंग असेच समाधानी दिसत असतील, अशी एक मिश्कील कल्पना माझ्या मनात तरळून गेली.  तिच्या शरीरावरचा तिचा अधिकार तिनी शाबित केला होता, शाबूत ठेवला होता. मीही तो मान्य केला होता.
येणेप्रमाणे प्रत्येक गोष्टीत तिचं काहीतरी म्हणणं होतं, काहीतरी भूमिका होती. कळांचं इंजेक्शन देणं, पाणमोट आपोआप फुटणं / मुद्दाम फोडणं, नाळ कापायची नेमकी वेळ, सीझर, प्रथम स्तनपान, प्रोटीनच्या पावडरी, बाळाची शी पुसणे, तिनी वापरायची अंतर्वस्त्रे, पॅड... सगळ्यासाठी तिच्याकडे विचार होता, त्याला पूरक युक्तिवाद होता! बरीचशी मतं मला मान्य होती. काही किमान अमान्य नव्हती. पण काही अव्यवहार्य होती. छोटया गावातल्या छोटया दवाखान्याच्या म्हणून काही मर्यादा असतात. मी तिची मतं मान्य केली, तिनी माझ्या मर्यादा मान्य केल्या. आम्ही बरोबरीनं चालू लागलो. पण दिवस भरत आले तरी हिच्या शंका, प्रश्न, वाटाघाटी काही केल्या आटोपेनात.
प्रसूती वेळी पाठीवर उताणं झोपावं का उकिडवं बसावं का रांगत प्रसूत व्हावं हाही तिच्यासाठी कळीचा मुद्दा होता. टेबलावर पाठ टेकून झोपून प्रसूत होणं हा तिच्या मते वैद्यकशास्त्रानं नैसर्गिक प्रसूती विरुद्ध रचलेला बनाव आहे. दोन पायावर, चार पायावर (रांगल्यासारखं) अशी प्रसूती ही खरी नैसर्गिक प्रसूती. असं काहीतरी होतानाचा एका गोरीलीणीचा आणि एका चिन्पान्ज़िणीचा जंगलातला ‘नॅचरल’ व्हिडीओही तिनी मला दाखवू केला. त्या व्हिडिओतून मी काय धडा घ्यायचा ते खरं तर मला कळलं नाही. त्यात, त्याच सगळं उरकत होत्या! डॉक्टरंच नव्हता त्यात!! मात्र तिच्या म्हणण्यात अगदीच तथ्य नव्हतं असं नाही. खेड्यापाड्यात घरी प्रसूत होणाऱ्या बायका त्यांना आरामदायी अशाच अवस्थेत प्रसूत होतात. जमिनीवर उकिडवं बसून, छताला टांगलेल्या दोरीला, दाराच्या कडीला लोंबकळत जोर करतात.
‘टेबलावर झोपलं की तपासायला सोपं जातं, जमिनीवर किंवा उकीडवं बसलेल्या बाईला  कसं तपासणार?’
‘हेच ते मी म्हणते ते, सगळं काही डॉक्टरच्या सोयीनी करणार तुम्ही. त्या बाईची सोय...’
‘पेशंटसाठी सुद्धा हेच सोयीचं असतं... बाळाचे ठोके बघावे लागतात... शिवाय सलाईन लावलेलं असतं...’
‘सलाईन?’ ती किंचाळलीच. ‘सलाईन कशाला?’
पुन्हा एकदा धोरण, स्त्रियांच्या शरीरावर वैद्यकीय हल्ला वगैरे सुरु व्हायच्या आतच मी म्हणालो, ‘बाई गं , कधी झालाच रक्तस्त्राव तर गडबडीनं सलाईन द्यावं लागतं, मग ऐन वेळी शीर सापडत नाही, म्हणून आधीच लावून ठेवलेलं बरं. शीर सलामत तो सलाईन पचास!’ मी केविलवाणा विनोद केला. पण ह्या हल्ल्यालाही तिनी साफ नकार दिला. सलाईन तिच्या धोरणात बसत नव्हतं.   
दिसामासानी प्रसू तेजपुंज दिसायला लागली. तीचं हे नैसर्गिक बाळंतपण तीला छान मानवत होतं, पण मला मानवत नव्हतं. सगळं जर का नैसर्गिकच होणार आहे आणि होऊ द्यायचं आहे तर माझ्याकडे येण्याचे कष्ट तरी ही बाई का घेत होती? काही अनैसर्गिक घडलं तर निस्तरायला मी, आणि सगळं नैसर्गिक घडलं तर मिरवायला ही! पुढे पुढे तर ह्या प्रसूच्या प्रसूतीच्या मला चित्र विचित्र भीत्या वाटायला लागल्या. एकदा ही प्रसूतीनंतर मांजरीसारखी वार खाते आहे असं स्वप्न पडलं, तर  एकदा हीचं हीनीच सगळं सुखरूप पार पाडलं आहे आणि ही जाताना बील न देता मला नारळ, थोडे तांदूळ आणि ब्लाउजपीस देते आहे असं स्वप्न पडलं!
यथाकाल तिला प्रसववेदना सुरु झाल्या. तिनी ते ताडलं. बराच वेळ तिनी घरीच काढला, इकडे तिकडे फिरली, बसली, झोपली. अगदीच असह्य झालं तेव्हा नवऱ्याला घेऊन दवाखान्यात आली. आली आणि झाली! मी सुटलो!! नवरा शेजारी होताच, त्यानं फीत कापावी तशा अविर्भावात नाळ कापली आणि तो रीतसर बेशुद्ध पडला. नवरा बेशुद्ध पडला तर काय करायचं हे तिच्या वाचनात नव्हतं, तेव्हा त्याला शुद्धीवर आणायचं  तेवढं काम मी केलं. तिला टाके पडले, ते तिनी माझ्यावर हल्ल्याचे आरोप न करता घालून घेतले. पुढे चार दिवस सगळं सुरळीत होईपर्यंत ती दवाखान्यात थांबली आणि बिल देऊन गेली.
मला वेगळी दृष्टीही देऊन गेली. मी जे शिकलो होतो, करत होतो, ते म्हणजेच रुग्णांची काळजी घेणं असं मी समजत होतो, पण पर्यायी विचारही असतो हे दाखवून गेली. परदेशात उपचारांमध्ये पेशंटच्या सहभागाला खूप महत्व आहे. आपल्याकडे रुग्णांना किती गृहीत धरलं जातं. डॉक्टर म्हणून पेशंटच्या शरीरावर हुकूमत गाजवली जाते. पेशंटच्या वतीनं डोकं चालवायचं काम आपण डॉक्टरवर सोपवलं आहे. डॉक्टरांनीही ते बिनडोकपणे गळ्यात घेतलं आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या मानेवर टांगती तलवार आहे. अर्थात निर्णय प्रक्रियेत पेशंटचा सहभाग हवा असं सांगताना आणखी एक वास्तव लक्षात घ्यायला हवं. अशावेळी पेशंटही प्रसूसारखे हवेत, अभ्यासू, वास्तवाची चांगली जाण असणारे, स्वतःच्या निर्णयाची भली बुरी जबाबदारी स्वीकारणारे. प्रशिक्षित मनुष्यबळही हवं. पाळी चुकण्यापासून, पॅड बदलण्यापर्यंतची चर्चा एखद्या प्रसूसाठी ठीक आहे. एरवी डॉक्टरनी अशी चर्चा करायची म्हटलं तर १०% कामंही उरकणार नाहीत.
एका बाई डॉक्टरनी तपासणीच्या खोलीत तिला पूर्वकल्पना न देता, तिच्या पूर्वपरवानगीशिवाय ड्रेस वर केला म्हणून प्रसू वैतागली होती. मला हा वैताग रास्तच वाटतो. आता s & p असं लिहिताना दरवेळी मला प्रसूची प्रसूती आठवते. सरावल्या हातांनाही किंचित कंप सुटतो आणि मी सिस्टरना बोलावून सांगतो, ‘तुम्ही काय करणार आहे याची कल्पना दया, त्यांना विचारा आणि मगच पुढे काय ते करा.’ सिस्टर माझ्यादेखत तरी मान डोलावतात. इतपत प्रगती मी साधली आहे.

असे अन्य लेख, काही व्यक्तीचित्रं, कथा वगैरेसाठी माझा ब्लॉग जरूर वाचा: shantanuabhyankar.blogspot.in


No comments:

Post a Comment