Showing posts with label डॉक्टर. Show all posts
Showing posts with label डॉक्टर. Show all posts

Thursday, 17 October 2019

बायकांत पुरुष लांबोडा


बायकांत पुरुष लांबोडा
डॉ. शंतनू अभ्यंकर

मी आहे ऑब्स्टेट्रीशियन अँड गायनॅकॉलॉजिस्ट, प्रसूती आणि स्त्रीआरोग्यतज्ञ, म्हणजे बायकांचा डॉक्टर.  प्रेमानी अशा डॉक्टरला ओबीजीवायएन्  म्हणतात. मराठीत ‘गायनॅक’,  ‘लेडीजचे डॉक्टर’, नुसतंच ‘लेडीज’ किंवा काही महाभाग ‘आमच्या बायकोचे लेडीज’ असं सुद्धा म्हणतात हो! पुरुष आणि   बायकांचा डॉक्टर म्हटल्यावर बायका, आणि पुरुषही, जरा वेगळ्याच नजरेनी बघतात. मग मला ‘घरात घरकोंबडा, बायकात पुरुष लांबोडा’, हा चिडवाचीडवीचा मंत्र आठवतो. मी विचार करतो का बरे गायनॅक निवडले मी? नवीनच लग्न झालं होतं, पोस्ट ग्रज्युएशन कशात मिळणार ते अजून ठरायचं होतं, आम्ही गेलो महाबळेश्वरला. तिथे शिरस्त्याप्रमाणे ज्योतिषी भेटले आणि माझ्या बायकोला सांगू लागले, ‘तुम्ही जपा, यांना आयुष्यात बऱ्याच बायकांपासून  बराच  त्रास आहे.’ पुढे मी गायनेकॉलॉजीस्ट झाल्यामुळे त्या ज्योतिष्याची  बत्तिशी शब्दश: खरी ठरली. बऱ्याच बायकांचा बराच त्रास मला सोसावा लागला.
आमच्या   विभागाची बातच न्यारी. बाकी विभागात काम तसं शांततेत चालते. आरडाओरडा करणारे पेशंट, इंजेक्शनच्या एका शॉटमध्ये गपगार होतात. हृदयविकाराच्या तीव्र वेदनेने तळमळणारे मॉर्फीनच्या डोससरशी शांत पहुडतात. पॉयजन पिवून आलेले ‘पाम’ आणि ‘अॅट्रोपीन’ दिलं की गप होतात. वेडाचे झटकेवाले तर सिनेमात दाखवतात तसे इकडून इंजेक्शन दिलं की लगेच तिकडून झोपी जातात. अतिरक्तस्रावाने अत्यवस्थ आणि अस्वस्थ पेशंट चार सलाईन गेले की टकामका बघायला लागतात. पण प्रसूतीविभागाची बातच न्यारी. इतरत्र डॉक्टर ‘थांबलं का दुखायचे?’ असं विचारतात इथे, ‘लागलं का दुखायला?’ असे विचारतात!
एकेकाळी वैद्यकीत मेडिसिन आणि सर्जरी अशी उभी फूट होती. आज हा फरक फुटकळ म्हणावा असा शिल्लक आहे. मेडिसिनवाले म्हणजे निव्वळ औषध देणारे, फिजीशियन. ऑपरेशन करणारे ते सर्जन. निव्वळ औषध देऊन पेशंट बरा करणे हे बुद्धीवैभव आणि सर्जरी म्हणजे हस्तलाघव. प्रत्यक्ष पोट फाडून काय कोणीही पोटदुखी थांबवेल, पण निव्वळ दवा देऊन दुवा घेऊन जातो तो खरा. त्यामुळे फिजिशियन मंडळी, सर्जन लोकांना दुर्जन समजायची. अजूनही समजतात. शिवाय औषधवाले या भूतलावर आधी अवतरलेले, सर्जन नंतर. त्यामुळे औषधवाले सिनिअर.  एके काळी सर्जरी म्हणजे भेसूर आणि भयंकर प्रकार होता. इतका, की तेंव्हाचे पूर्वग्रह आजही ठसा ठेऊन आहेत. आजही सिस्टर लोकांना शिकवतात, समजा फिजिशियन आणि सर्जन एकाच वेळी वॉर्डात आले तर सिनिअर सिस्टरनी फिजिशियन बरोबर जायचं आणि ज्युनिअर सिस्टरनी सर्जन बरोबर! गायनॅक शिकायचं तर तुम्ही फिजीशीयनही होता आणि सर्जनही होता. बुद्धीवैभव आणि हस्तलाघव दोन्ही हवं इथे. शिवाय इथे एकाच वेळेला दोन जीवांची काळजी वहायची असते. हे ही  वैद्यक शास्त्रात अनन्य असं. असं काय काय वाटत होते, म्हणून मी गायनकॉलॉजी निवडलं.
पास झालो आणि प्रॅक्टीसमध्ये पडलो. थोड्याच दिवसात जोरात चालायला लागली की प्रॅक्टीस. दिसामासांनी वाढायला लागली म्हणा ना. नवीन प्रॅक्टिस सुरु करणाऱ्या गायनॅकॉलॉजीस्टला उदार आश्रय देण्याचे काम सहसा भानगडीतली जोडपी करत असतात. दिवस राहिले की गुपचूप गर्भपात करण्याचा प्रश्न येतो. नव्या दवाखान्यात तसा शुकशुकाट असतो, त्यामुळे आपले काम बिनबोभाटपणे उरकणे त्यांना सोयीचे जाते. शिवाय पैसेही माफक घेतले जातात. मग पुढे कोणी ओळखीतले लोक येतात, मग त्यांच्या ओळखीपाळखीनी कोणी येतात...पण जसजसं डॉक्टरचं वय वाढतं तसं पेशंटचं सरासरी वयसुद्धा वाढतं. तरण्याताठया  डॉक्टरकडे थेट पिशवी काढायला सहसा कोणी येत नाही. आधी डिलिव्हरीला आलेल्या बायका, मूल बंद करायच्या ऑपरेशनसाठी येतात. पुढे त्यांचं वय वाढलं की पाळी संबंधी तक्रारी घेऊन येतात, मेनोपॉजच्या तक्रारी घेऊन येतात, पिशवी काढायला येतात. मग लेकी-सुनांना घेऊन येतात,   जावा-भावजयांना घेऊन येतात. पेशंटचे आणि डॉक्टरांचे  केस एकत्रच पांढरे होतात. दोघांचे असे भावबंध जुळलेले असतात. गर्भभाराने मुसमुसलेल्या  कोणा  नवयौवनेची आई सांगते, ‘अहो, हिची डिलिव्हरी तुमच्याच हातची!’ तेंव्हा मोहरून जायला  होतं.
 बायका आपल्या अत्यंत खाजगी प्रश्नांसाठी एका परपुरुषाकडे मोठ्या विश्वासाने येतात, याचं अप्रूप वाटते अनेकांना. मलाही वाटायचं. मग लक्षात आले की पुरुष प्रधानतेमुळे एकूणच प्रसूती, ऑपरेशन अशा जोखमीच्या कामात पुरुषांवर अधिक विश्वास ठेवला जातो. पुरुषप्रधान संस्कृतीचा म्हणा किंवा पूर्वसुरीच्या विश्वासार्हतेचा म्हणा, फायदा होतो मला. शिवाय महाराष्ट्राला डॉ.बी.एन.पुरंदरे, डॉ.व्ही.एन.शिरोडकर, डॉ.ए.व्ही.उमराणीकर अशा पुरुष स्त्रीआरोग्यतज्ञांची एक लोकप्रिय, प्रसिद्ध आणि आदरणीय परंपरा आहे. त्या परंपरेचा मी पाईक. पण या परंपरेचा प्रभाव बराचसा पश्चिम महाराष्ट्रापुरताच सीमित आहे. विदर्भ मराठवाड्यात सारे स्त्रीराज्य. एखादा पुरुष सापडणार, तोंडी लावण्यापुरता. काही ठिकाणी तर पुरुष डॉक्टर बायकोच्या किंवा इतर बायकांच्या दवाखानो-दवाखानी जाऊन ऑपरेशन करून देतात. स्वतःचा दवाखाना काढतच नाहीत.
पुरुष स्त्रीआरोग्यतज्ञ म्हणून भलतेच जबाबदारीने वागावे लागते. वागण्याबोलण्यावर बऱ्याच मर्यादा येतात. बाई डॉक्टरांचे बरे असते, ‘अय्या, साडी काय छान आहे!’ किंवा ‘ड्रेसवरचं तूच भरलंस का?’ असे विचारून थेट पेशंटच्या काळजाला हात घालता येतो. पण हेच आम्ही म्हटलं तर? साडी खरंचच छान असते, एम्ब्रॉयडरी सुबक असते पण बोलण्याची चोरी! चार लोकांत कमरेखालचे विनोद सांगणे तर सोडाच, जोरजोरात हसून दाद देणेही मुश्कील. सारखी मनात भीती, की लोकांना काय वाटेल? अरेच्च्या, हा आपल्या बायको-मुलीबद्दल असाच विचार तर नसेल करत? त्यामुळे अत्यंत घट्ट मित्रांच्या मैफलीतही मोजून मापून बोलावं लागतं. अपवाद फक्त डॉक्टर मित्रांच्या टोळक्यांचा. अर्थात कमी अधिक प्रमाणात सर्वच डॉक्टरना हे पथ्य पाळावं लागतं. त्यामुळेच डॉक्टर लोक निव्वळ डॉक्टर लोकांच्या पार्टीत अधिक खुलतात.
एकदा एका मित्राच्या दुकानात जायचा प्रसंग आला. दुकान कसलं तर स्त्रियांच्या अंतर्वस्त्रांचं. कसली कसली कापडं होती त्याच्या दुकानात. अगदी लांडीलुटकी, तलम, पारदर्शक. नाईटसूट्स होते, स्विमसूट्स होते आणि काय काय होतं...! कामाला बऱ्याचशा  सेल्सगर्ल्स आणि एकच सेल्समन. पण हा जो मॅन होता तो सगळ्यात जास्त कमिशन मिळवायचा. सगळ्यात जास्त माल खपवायचा. पण त्या कपड्यांइतकच ह्याच बोलणेही तलम, मुलायम; चेहरा आणि वृत्ती पारदर्शी. चेहऱ्यावरची रेषही ढळू न देता हा एक एक कपडा दाखवायचा. ती झुळझुळीत वस्त्र आपल्या अंगावर कशी दिसतील ह्या कल्पनेत गिऱ्हाईक मश्गुल असायचं, मग तो त्यांच्या कल्पनाशक्तीला खतपाणी घालायचा. ‘हा गाऊन शोभून दिसेल तुम्हाला’, असं बिनधास्तपणे सुचवायचा. पण त्याच्या बोलण्यात नाजाकतच अशी होती की समोरच्या बाईला  आणि असलाच तर तिच्या नवऱ्याला काहीही वावगं वाटायचं नाही. स्त्रीआरोग्यतज्ञ पुरुषांना ही कला अंगी बाणवावी लागते.
क्वचित कोणी पेशंट येते आणि सगळ्या तक्रारी वगैरे सांगून झाल्यावर तपासणीला बिचकते, ‘लेडीज डॉक्टर नाहीत का?’ असा प्रश्न येतो. किंवा ‘तपासणी नको, तुम्ही तशीच ट्रिटमेंट द्या’, अशी मागणी होते. शक्य असेल तेंव्हा कोणी असिस्टंट बाई पेशंट तपासतात आणि हे शक्य नसेल तर मी ठामपणे आणि नम्रपणे नकार देतो. ‘लेडीज’ डॉक्टरसाठी अन्यत्र जायला सांगतो पण आवश्यक ती तपासणी न करता कधीच, कोणालाच, कोणतेच औषध देत नाही.
हळू हळू ऋणानुबंध जुळत जातात. बोलण्यात वागण्यात मोकळेपणा येतो. कधी कळवळून कोणी, ‘नवऱ्याला चार दिवस ‘लांब रहायला’ सांगा हो, मला आताशा खूप त्रास होतो’, असं विनवते. कधी ‘पुढच्यावेळी मी ह्यांना घेऊन येते. तेवढं दारूचं सांगा हो त्यांना. सारखे पीत बसतात. तुम्ही सांगितलं की ऐकतील’, अशी भाबडी अपेक्षा येते. वर, ‘मी सांगितलंय असं सांगू नका हं.’ अशी अट तर असतेच असते. शिवाय कमरेवरचा प्रत्येक काळानिळा डाग खुर्चीची कड लागल्याने उमटत नाही, प्रत्येक चटका काही तव्यामुळे बसलेला नसतो, मनगटावरचा प्रत्येक ओरखडा बांगडी फुटल्याने उठत नसतो आणि प्रत्येक वेळी बांगडी काही काम करतानाच फुटते असं नाही; हे आता मला सवयीनी लक्षात येऊ लागलं आहे. नुसतं ‘काय होतंय?’ ह्या प्रश्नानी पेशंटचे डोळे भरून येतात. मी ओळखतो ज्यांनी करायला हवी, त्यांनी अशी साधी चौकशीही केलेली नसते. एक हतबलता ग्रासून टाकते मला.
काही मजेदार संवादही झडतात...
‘डॉक्टर हा पहा, ओळखलत का याला?’ शेजारच्या शेंबड्या, नखं खाणाऱ्या, चुळबुळ्या, बावळट्ट   कार्ट्याकडे बोट दाखवत कोणी विचारतं. अर्थातच मी त्याला कसा ओळखणार? मी आपला मान डोलावतो. ‘अहो तुमच्यामुळेच झालाय हा!! ह्याच्याकडे बघीतलं ना की रोज मला तुमची आठवण येते. थँक्यू हां डॉक्टर’ माझा हा कृतज्ञतापूर्वक उल्लेख ऐकून मी भांबावतो.
कोणी बाई रंगात येऊन आपल्या तक्रारींचा पाढा वाचत असते, अचानक खाजगी सूर लागतो आणि ‘अहो ते आपल्याला पांढरं नाही का जाsssत, तस्सं होतय मला!’ ती बाई खुसफुसते. ‘आपल्याला’ म्हटल्यावर मी दचकतो पण तिला जाणवू न देता. चेहरा कोरा ठेऊन माझं काम चालू रहातं.
  एकीला बरं वाटलं की ती दुसरीला घेऊन येते. तिचा आजार माझ्याशी, म्हणजे माझ्या स्पेश्यालिटीशी संबंधित असतोच असं नाही. पण अपेक्षा मात्र मी तपासावी अशी असते. मग मी म्हणतो, ‘हे बघा, गुडघ्याच्यावर आणि बेंबीच्या खाली  एवढ्याच भागातलं कळतं मला. बाकी टाच दुखते, छातीत धडधड होते वगैरे मी तपासत नाही.’ किंवा सांगतो, ‘अहो आमचं साडीचं दुकान आहे आणि तुम्ही मटणाचा भाव विचारताय!’ हसत हसत मग पेशंट माझा निरोप घेतात.
अशीच एक नवयौवना, नवपरिणीता, माझ्याकडे दाखवायला म्हणून सासू हौसेनी घेऊन आली. सासूबाईंनी लगालगा पुढे येऊन तीचं नावबीव सांगून पेपरबिपर काढला. सिस्टरना सगळ्या तक्रारी सविस्तर सांगितल्या आणि नंबर येताच दाराशी आपल्या सुनेसह त्या उभ्या  दिसल्या मला. सासूबाई  माझ्याच पेशंट, अगदी उत्तम परिचयाच्या. त्यांच्या इतर लेकी, सुना, बहिणी, विहिणी ह्याही माझ्या पेशंट. किरकोळ तक्रार असेलही पण मुख्य हेतू डॉक्टरना नवीन सून दाखवणे हाच असणार हेही मी लगेचच ओळखलं. पण गुबगुबीत,  झुलत्या खुर्चीवर मला पाहताच सून बावचळली. तिथल्या तिथेच खिळून राहिली. ती काही जागची हलेचना. त्यांनी टोकताच ती पुटपुटली, ‘मैने नैच्च तपास्नेका! डागदर तो मरद है!’   यावर त्या सासुबाईंनी रीतसर समजूत घालताना काय म्हणावं? खणखणीत आवाजात दारातूनच सासूबाई गरजल्या, ‘अरीsss येsss? ये कहां मरद है भलाsss;’ क्षणात बाहेर सन्नाटा पसरला आणि मग बाहेरच्या बाकांवर दाबलेलं हसू फसफसू लागलं. मी अस्वस्थ झालो. सावकाशपणे सासूबाईंनी वाक्य पुरं केलं, ‘अरीsss, ये कहां मरद है भलाsss? ये तो डागदर है, इन्कू क्या शर्माना?’
इतक्या वर्षानंतर काही विपरीत अनुभवही गाठीशी आहेत. एकदा एक बाई स्तनातल्या नसलेल्या गाठीबद्दल तक्रार घेऊन वारंवार यायला लागल्या. शेजारच्या बाईला ब्रेस्ट कँसर झालाय म्हणून ह्यांना संशयपिशाच्चाने पछाडलेले. निदान तसं त्या सांगत तरी होत्या. तपासून सारं काही नॉर्मल आहे हे सांगूनही त्या तिसऱ्यांदा हजर! मग मी काय समजायचे ते समजलो. त्यांची ही तपासणीची हौस मला महागात पडली असती. सिस्टरकरवी त्यांची तपासणी करून, जरा दरडावून,  त्यांना कटा म्हणून सांगितलं, तर त्यांनी भलताच सूर लावला. आरोप सुरू केले, डंबाजी सुरू केली. शेवटी सीसीटीव्हीच्या हजेरीची जाणीव करून देताच त्या ज्या गेल्या त्या पुन्हा फिरकल्या नाहीत. असं काही वाट्याला आलं की एक पुरुष स्त्रीआरोग्य तज्ञ म्हणून तुम्ही किती हतबल आहात, असुक्षित आहात, हे लक्षात येतं. पण त्याच वेळी स्त्रियांना  अशा प्रसंगांना वेळोवेळी सामोरं जावं असणार अशी विषण्ण जाणीवही होते. एखाद्या छोट्याश्या खोट्या  आरोपानेही तुमचं कसं क्षणात वाट्टोळ होऊ शकतं, हे लक्षात येतं. बदनामीची टांगती तलवार सर्वच डॉक्टरवर सतत असतेच पण अशा प्रसंगात त्या तलवारीची लखलख डोळे दिपवते. त्यामुळे शेजारी सिस्टर हजर असल्याशिवाय पेशंट तपासतच नाही आम्ही.   
स्त्री आरोग्य तज्ञ जरी असलो तरी पुरुषांची संबंध येतोच. मुख्यत्वे नवरे मंडळींशी. बायकोसाठी रक्तदान करा म्हटलं की अंतर्धान पावणारे, मुलगी झाली म्हणून दवाखान्याकडे अजिबात न फिरकणारे, संभोग हा शक्तीचा आणि सक्तीचा प्रयोग मानणारे नवरे माहीत आहेतच आपल्याला. पण बायकोचा  कवितासंग्रह वणवण करत खपवणारे, तिच्यापेक्षा उत्साहानी साडीखरेदीसाठी दिवस दिवस न्यौच्छावर करणारे, रोज साडीच्या निऱ्या   काढून वर मॅचिंग पिना  शोधून देणारे, मालकीणबाईंची नियमित बोलणी खाणारेही मालक असतात.  काही  काळजी घेणारे असतात तसे  काही काळजी  करणारे  असतात. बायकोला काहीही जरी झालं तरी हे प्रचंड चिंतेत पडतात. असाच एका काळजीवाहू नवरा,  ‘हिची डाव्या पायाची करंगळी हुळहुळल्यासारखी होतेय की काय, असं वाटतंय’, अशी तक्रार घेऊन आला होता. ‘मलाही औषध दिल्यासारखं करावं की काय, असं वाटतंय’, असं म्हणत मी त्याला उलट टपाली परत पाठवला होता.

स्त्री आरोग्यतज्ञ आणि पुरुष असल्याचा काही  फायदाही होतो. मूल न होणाऱ्या जोडप्यातील पुरुषाची तपासणी सहज करता येते. कोणीही बाई कितीही शिकलेली असली आणि कोणीही पुरुष कितीही समजूतदार असला, तरी बाईकडून पुरुष आपली शारीरिक तपासणी करून घेणे अशक्य. आम्हाला मात्र हे सहज शक्य होतं. एवढंच काय पुरुष आमच्याशी मनमोकळेपणानी बोलतात. बायकोबद्दलच्या तक्रारी सांगतात.
अर्थात बायकाही काही कमी नसतात. डॉक्टरपुढे सुतासारख्या सरळ असणाऱ्या बायकांना घरी जाताच काय काय व्हायला लागतं. यात ‘कसंसच होणं’ हा सर्वात कॉमन आजार. अजूनही भल्या भल्या धन्वंतरींना याचे निदान झालेले नाही. मग पुढच्या वेळी नवरा माझ्या समोरच बायकोला म्हणतो, ‘तुला काय होतंय ते आत्ताच सांग. मग पुन्हा  घरी गेल्यावर तुझी...’ वाक्य पुरे होण्याच्या आत ती फणकाऱ्यानी निघून जाते. हा पुटपुटतो, ‘साला बायको आहे का सायको काही कळतच नाहीये.’ गगनभेदी हसत जोरदार टाळी द्यायची उर्मी, मी महत्प्रयासानी गाडून  टाकतो. अशा बायकोग्रस्त पुरुषांची उदाहरणेही कमी नाहीत. एकानी मला बायको सुधारण्याच्या गोळ्या मागितल्या. मी हसत हसत म्हटलं, ‘माझ्याकडे नाहीत पण, तुम्हाला कुठे मिळाल्या तर माझ्यासाठी सुद्धा चार पाकीटं घेऊन या!!’ ह्या गृहस्थाला काडी इतकाही पाचपोच नाही, त्यांनी हा विनोद स्वतःच्या बायकोला सांगितला आणि तिथून तो आस्मादिकांच्या बायकोच्या कानावर आला. बायको जाम बिघडली, परिणामी मला माझ्यात बरीच सुधारणा करावी लागली.
बाई डॉक्टरला विचारता येत नाहीत असे अनेक प्रश्न ही पुरुष मंडळी आम्हाला विचारत असतात. व्हर्जिन, हायमेन आणि हायमेन पुन्हा निर्माण करून देणारी हायमेनोप्लास्टी ही शस्त्रक्रीया, हे तर उत्सुकतेचे शिखरबिंदू. अशी शस्त्रक्रिया मला करता येते म्हटल्यावर एका मित्राने, ‘तू नुसताच सर्जनशील नसून सील-सर्जनही आहेस अशी’ कोटी केली होती. काही विचारतात, ‘एवढे कसे हो तुम्ही बिझी?’ मी सांगतो अहो, मला बिझी ठेवण्यासाठी भारतीय पुरुष अहोरात्र झटत आहेत!’ ह्यातली खोच लक्षात येताच लोकं मनमुराद हसतात. मग पुढचा सवाल येतो, ‘पण तुम्हाला रात्री अपरात्री उठावं लागतं...?’ मी म्हणतो ‘हो ना, ज्या गोष्टीची सुरवात रात्री होते तिचा शेवटही रात्रीच होतो!!’
खरंतर डॉक्टरकीत कसला आला आहे स्त्रीपुरुष भेदभाव? पण आपला सामाजिक शहाणपणा असा की तुम्ही त्या वंशाचे नसलात तर तुम्ही त्यांचे प्रश्न समजावून घ्यायला नालायक ठरता. कोणी राजकीय नेता हा शेतकऱ्याचा मुलगा नाही म्हणजे त्याला शेतीचे प्रश्न कळतच नाहीत, असली आपली समज. गरीबीतून वर आलेला सामाजिक न्याय मंत्री आम्हाला अधिक न्याय्य वाटतो, जणू गर्भश्रीमंत माणूस दैन्य अभ्यासून उपाय योजूच  शकत नाही. कित्येकदा महिलाच महिलांवर अन्याय करतात पण महिला आयोगाच्या अध्यक्षपदी फक्त महिलाच नेमली जाते. या न्यायानी फक्त चार-आठ बाळंतपण आणि आठ-दहा विविध आजारातून तावून सुलाखून निघालेलीच कोणी स्त्रीआरोग्य व प्रसूतीशास्त्र तज्ञ व्हायला लायक ठरेल.  
हमाम में सब नंगे है तसंच हॉस्पिटलमें भी सब नंगे है. पहिल्या वर्षी डिसेक्शन हॉलमध्ये नग्न मनुष्यदेहाचे दर्शन होताच मन चरकते. पुढे ह्या नवद्वारी देहाची नश्वरता पदोपदी दिसत रहाते. पुढ्यातल्या पेशंटला भवताप मुक्त कसं करता येईल एवढीच भावना उरते. बाई-बुवा, लहान-थोर, काळा-गोरा  हे भेद औषधापुरते; म्हणजे जिथे आजार आणि उपचार या भेदांवर अवलंबून आहेत; एवढ्यापुरतेच उरतात. पुरुषही उत्तम स्त्रीआरोग्य आणि प्रसूतीशास्त्रतज्ञ होऊ शकतात ते यामुळेच.




Saturday, 15 June 2019

आता यश फक्त दोन बोटे उरलंय...!


आता यश फक्त दोन बोटे उरलंय...!
भाषांतर डॉ. शंतनू अभ्यंकर
मूळ लेखक डॉ. प्रणव कोडीयाल.
प्रिय पेशंटचे हिंसक नातेवाईकहो,
मनःपूर्वक अभिनंदन. डॉ पारिबाह मुखोपाध्याय यांचावर यशस्वी हल्ला करून, देशातल्या सर्वात अकार्यक्षम जमातीविरुद्ध, डॉक्टरांविरुद्ध, पुकारलेल्या लढाईत,  तुम्ही आता यशाच्या अगदी जवळ पोहोचला आहात. बस् एक पाउल आणि तुम्ही यशशिखरावर असाल.
छान! आज प्रथमच डॉक्टरांना जवळजवळ  देहांत प्रायश्चित्त देऊन, तुम्ही अगदी  कर्तृत्वाचा कळस गाठला आहे. मरणासन्न पेशंटला न वाचवल्याबद्दल ही शिक्षा रास्तच म्हणायची.
गेली काही दशके तुमच्या ह्या अव्याहत लढाईचा मीही एक साक्षीदार आहे.
सुरवातीला तुमच्या हाती फारसं काही लागलं नाही. शिवीगाळ, कोर्टबाजी इतकंच काय ते साधलं. पण तुम्ही चिकाटी सोडली नाही. हॉस्पिटल जाळ, खळ्ळखटॅक घडव, हे ही मग सहज जमायला लागलं. पण...पण हॉस्पिटलमधला स्टाफ मात्र बचावत होता.
पण तुम्ही मागे हटला नाहीत, धक्काबुक्की, कानशिलात लगावणे आणि पुढे पुढे तर बेदम मारहाणही जमू लागली की तुम्हाला. पण ह्यातही पुरतं समाधान नव्हतं. ते जखमी डॉक्टर लेकाचे बरेबिरे व्हायचे आणि पुन्हा मुकाट रुग्णसेवेला लागायचे.
पण गेल्या सोमवारी शेवटी तो सोनियाचा क्षण आला. एका नराधम डॉक्टरला तुम्ही शेवटी यमसदनाचे दर्शन घडवलेच.
नुकताच डॉ. झालेल्या परीबाहाची कवटी चांगलीच चेचलीत की तुम्ही. चांगला बशीभर पोचा आला कवटीला. मेंदूचाही चेंदामेंदा झाला असता, पण थोडक्यात बचावला. मेंदूही आणि परीबाहही. तो वाचला. तुमचेच नशिब फुटके, दुसरे काय. आचके देत देत मरणारा डॉक्टर बघायचं भाग्य थोडक्यात हुकलं.
असो. पुन्हा संधी येईलच की. पुढचा गनीम नक्कीच थेट यमसदनी.
...आणि हो चिंता नसावी. या आगळीकीबद्दल डॉक्टर वगळता कोsssणी तुम्हाला काsssही म्हणणार नाही. सारा देश तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. दशकानुदशके हे नालायक डॉक्टर सगळेच्या सगळे जीव वाचवण्यात घोर अपयशी ठरत आहेत आणि तुम्ही चरफडत बसलाय.
वर त्यांच्या ह्या निरुपयोगी उपचाराची फी भरताय तुम्ही. अहो पैसे मोजले की पाणीपुरीवालासुद्धा तुमच्या पसंतीची पाणी पुरी पुढ्यात ठेवतो. पण डॉक्टरांची शिरजोरी किती. कोणात प्राण फुंका म्हटले तर तेवढे सुद्धा करायला नको. माथी भडकतील नाही तर काय? पण आता थोडाच धीर धरा. आता विजय टप्प्यात आला आहे. एखाद्या डॉक्टरचा सर्वांसमक्ष जाहीर खून करूनही तुम्ही सहीसलामत सुटणार. दानव करो आणि असं होवो.
इथून पुढे सारं सोपंच तर आहे. गंभीर आजाऱ्याला दवाखान्यात नेतानाच बरोबर चार सशस्त्र गुंड घेऊनच जा. नाही वाचला पेशंट तर डॉक्टरचा तिथल्या तिथे शिरच्छेद केल्याचे तरी समाधान मिळेल. शिवाय आधी थोडे हालहाल करण्याचा पर्यायही आहेच.
काहीही कायदेशीर कारवाई होणार नाही. कायदा कागदारच आहे की आपल्याकडे. आजवर ह्या कारणे कोणाला शिक्षा झाली आहे; की ती तुम्हाला होईल? तेंव्हा चालू दे. आतासुद्धा पहालच तुम्ही डॉ. मुखोपाध्याय यांच्या हत्येच्या प्रयत्नाबद्दल कोणाही दोषीला जबर शिक्षा होणार नाही.
डॉक्टर मारल्याबद्दल मिडीयाही मूग गिळून बसेल. डॉक्टर कसे केसेस बिघडवतात, कसे पेशंट मारतात, त्यांना कसं नागवतात ह्याबद्दल लोकशिक्षण करण्यातच तर त्यांचा सगळा वेळ जातो.
आणि राजकरण्याची तर चिंताच सोडा. डॉक्टर म्हणजे गठ्ठा मते नाहीत, तुम्ही म्हणजे गठ्ठा मते. मिडियासमोर आणि डॉक्टरांच्या संघटनांसाठी चार सहानुभूतीचे शब्द ते पुटपुटतील आणि पुन्हा सारं कसं शांत शांत होईल.
समाजाचे काय घेऊन बसलाय राव? आजवर इतके हल्ले झाले; पण जनसामान्यांचा एक तरी मोर्चा? मोर्चा जाऊ दे, मान्यवरांकडून एक तरी दणदणीत निषेध? नाही.
उलट सोशल मिडियावर डॉक्टरांचे दुर्दैव साजरे करणारे मेसेज फिरायला लागतात. लुटारुंना बरी अद्दल घडली म्हणत फिदीफिदी हसतात.
पण मग डॉक्टरांचे काय? हॅ! त्यांना तर मुळीच भिक घालू नका. तारुण्याची सारी वर्ष आणि नंतरही बिच्चारे अभ्यासात घालवतात. ते बिचारे किरकोळ सेवाभावी जीव, तुमच्यासारखे बलवान आणि शूरवीर थोडेच आहेत ते? अरे ला कारे म्हणताना सुद्धा जीभ रेटत नाही त्यांची, ते हात कुठला उगारणार? तेंव्हा रान मोकळंच आहे.
शिवाय बेमुदत बंद ठेऊन डॉक्टर तुम्हाला वेठीस धरू शकत नाहीत. लगेच हृदयशून्य डॉक्टरांच्या संपामुळे अत्यवस्थ पेशंटचे व्हिडीओ फिरायला सुरवात. लगेच आपमतलबी डॉक्टर कसे आरोग्य व्यवस्था संपवू पहात आहे, म्हणत प्रशासन कण्हून दाखवणार.
आपल्या देशात रुग्णसेवेची गरज आहेच आहे पण डॉक्टर नसले तरी बिघडत नाही.
तेंव्हा चालू दे. संपूर्ण स्वातंत्र्य आहे तुम्हाला. स्कोअरबोर्ड सतत हलता ठेवा. पहिला बळी आता होऊनच जाऊ दे. शिवाय हा नरमेध अखंड चालू रहाणार आहे. कारण कोणी ना कोणी, कधी ना कधी, मरणारच; आणि नवीन बळीचा डॉक्टर मिळणारच; आणि डॉक्टरला बलीवेदीवर चढवायला सारे उत्सुक आहेतच.


Wednesday, 26 September 2018

चक्रधर


चक्रधर
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.
जिल्हा सातारा. पिन ४१२८०३.
मो.क्र. ९८२२०१०३४९


‘सर, साष्टांग नमस्कार!’ गाडीचे दार अदबीनं उघडून तो जरा वाकून उभा होता. तो माझ्या मित्राचा ड्रायव्हर. मित्रानी मला व्याख्यानाला बोलावलं होतं आणि माझ्या गाडीची काही गोची झाल्याने स्वतःची गाडी ड्रायव्हरही पाठवला होता. तो हा. सर्वप्रथम नजरेत भरली ती त्याची नसलेली उंची. अत्यंत ठेंगणा ठुसका होता तो. हात लांडे, पाय लांडे, मानही लांडी. डोकं जणू डायरेक्ट खांद्यालाच जोडलं होतं.  माझ्याकडेच काय सगळ्या जगाकडेच वर मान करून बघत होता. होता तरतरीत. छान शर्ट, पँण्ट, बूट, स्वेटर आणि हो त्यांनी चक्क टाय घातला होता. माझ्यापेक्षा तोच स्मार्ट दिसत होता. इतके सगळं नीटनेटकं असल्यामुळे की काय शाळेला बाहेर पडणाऱ्या मुलासारखा दिसत होता तो. दिसायलाही पोरगेलासाच होता. उत्साहही तेवढाच होता. त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स तरी होतं की नाही कुणास ठाऊक. पण आता मित्रानी पाठवलाय म्हटल्यावर मी काही विचारलं नाही.
‘सर, साष्टांग नमस्कार!’
‘आं!’
‘सर, साष्टांग नमस्कार. दंडवत सर.’
‘नमस्कार.’ माझा अस्फुट नमस्कार.
‘सर, साष्टांग नमस्कार!’ पुन्हा एकदा त्याचं शाब्दिक लोटांगण.
‘सर, आय अॅम ड्रायव्हर ऑफ युवर फ्रेंड.’ आता इंग्रजीत शिरला गडी. माझा लॅपटॉप चपळाईने मागच्या सीटवर ठेवत तो पुन्हा दाराशी आला, झुकला आणि म्हणाला,
‘माय नेम इज चक्रधर. प्लीज सिट इन कार, सर.’ मला जरा गंमत वाटली. मी गाडीत बसताच हा तुरुतुरु चालत टूणकन उडी मारून गाडीत बसला. गाडीत बसताक्षणी त्यानी गाडी अगदी सुसाट सोडली. आणि गाडीबरोबरच स्वतःही सुटला.
‘सर एक प्रश्न विचारू?’
‘हो, विचार की.’ मी आपला बेसावध. पुढे काय वाढून ठेवले आहे याची मला सुतराम कल्पना नव्हती.
‘सर, तुम्ही सुखी आहात?’
‘आं?’ अगदीच अनपेक्षित प्रश्न. मला आपलं ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे?’ आठवलं; ‘सुखी माणसाचा सदरा’ आठवला. मी काही उघडा नव्हतो, चांगला ‘आदिदास’चा टी शर्ट घालून होतो आणि  वर ब्लेझरही; म्हणजे नाहीच की मी सुखी. मला काय उत्तर द्यावे कळेना. पण अनोळखी  ड्रायव्हर माणसाला, ‘मी सुखी नाही’ हे मी कोणत्या तोंडाने सांगणार? शेवटी उलट प्रश्न विचारून मी कशीबशी सुरवात केली.
‘मी सुखी आहे का? आहे, बऱ्यापैकी आहे.’ ‘बऱ्यापैकी’ वर बऱ्यापैकी जोर देत मी म्हणालो.
हो, उगाच संपूर्ण सुखी आहे वगैरे सांगायला नको. एखादा असला माथेफिरू तर वाटेत निर्मनुष्य ठिकाणी गाडी थांबवून माझा खून-बीन करायचा. कुणाच्या मनात कोणता सैतान थैमान घालत असेल ते सांगता येत नाही.
‘सैतानाची हाकारे तुमच्या कर्णी न पडोत सर, तुम्ही संपन्न होवा.’
बापरे ह्याच्याही वाक्यात हा सैतान आला की. ह्याला कसं कळलं माझ्या मनातलं? मनकवडा दिसतोय.
‘सर, तुमच्या गाढवीस फुटू दे पान्हा!! जसा फुटला यहोबाच्या गाढवीस.’
क्काय? माझ्या गाढवीस फुटू दे पान्हा? पण माझ्याकडे गाढवी नाहीये आणि हा यहोबा कोण?  जाउ दे, असेल कोणी ह्याच्या रानातला देव. जास्त विचारलं तर हा अजूनच अंगात आल्यासारखं करेल म्हणून मी गप्प बसलो. पण एकुणात माणूस इंटरेस्टिंग वाटला. मूर्ती बटू, पण बोलण्याचा  उत्साह म्हणजे उंच उसळते कारंजेच जणू. गाडी चालवण्यासाठी सीटवर  उशी ठेऊन  तो उच्चासनावर बसला होता. शिवाय पाठीलाही एक टेकू होताच. त्याशिवाय त्याचे पायच नीट पोहोचले नसते. मी काही बोलत नाही म्हटल्यावर गाडीच्याच वेगाने त्यांनी बोलायला सुरवात केली.
‘सर, बऱ्यापैकी दुःखी असाल तर, करुणायुक्‍त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा; एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्‍हाणे असल्यास आपसात क्षमा करा. म्हणजे तुम्ही व्हाल संपूर्ण सुखी. देव देखील हेवा करेल तुमचा. प्रभूचे कृपाछत्र नित्य तुमच्यावर राहो.’ पहिल्या दमात त्यांनी मला बऱ्यापैकी दु:खी ठरवून वर आशीर्वादही दिला होता. कावळ्याच्या शापानी गाय मरत नाही, पण ह्या बैलोबाच्या आशीर्वादानी गाढवी तरी पान्हावते का हा प्रश्न मला छळत होता. पण ह्याचं बोलणं संपता संपेना. अखंडपणे तो बोलत होता. बरेचसे कुठले कुठले पाठ केलेले छापील पॅराग्राफ होते बहुतेक. त्यात व्याकरण, विशेषणे वगैरेबाबत आनंदच होता.
‘सर एखाद्या व्यक्तीच्या चेतनेवर शब्दांचा खूप मोठा प्रभाव असतो. विशेषतः जेंव्हा भगवंताकडे वळणे येते, तेंव्हा बऱ्याचदा म्हटले जाते की प्रार्थना नशीब आणि जीवन बदलू शकते. हे खरेच खरे आहे. हे ही खरे आहे की विश्वास ठेवणारा प्रार्थना मागतो. त्याला पहिजे असते एक अगदी मजबूत प्रार्थना. बरोबर ना सर?’
मी इतका मजबूत चक्रावलो होतो की अस्फुट आवाजात ‘बरोबर’ एवढं पुटपुटण्याशिवाय मी काहीही करू शकलो नाही. पण त्याची बडबड अखंडपणे चालू होती. मी पेंगत असल्यासारख केलं, चुळबुळ केली, गाडीतलं एक शिळं वर्तमानपत्र चाळलं, पण हा पठ्ठ्या थांबायचं नाव घेईना.
‘सर, बरेचदा भौतिक वस्तूंच्या विनंत्यांची चौकशी केली जाते. अखेरीस विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीसाठी त्याची आंतरिक, भौतिकपेक्षा जास्त महत्वाची असते.’
‘क्काय?’
‘सर समृद्धी, आंतरिक समृद्धी.’
‘हां, हो, बरोबर.’
‘सर लक्षात ठेवा, सर्वसाधारण सर्व काही सत्य आहे आणि अध्यात्मिक विकास पृथ्वीवरील उत्थित सुविधांवर स्थित आहे! माणसाला सुखासाठी काय हवं सर? एक, निरोगी अन्न; दोन, निरोगी झोप आणि तीन, निरोगी उबदार घर! या जटील उपक्रमात देवाला प्रार्थित करायचे विसरू नका सर; प्रार्थित करायचे विसरू नका; प्रार्थित करायचे कधीही विसरू नका.’ बऱ्याच वेळाने अखेर तो समेवर आला. शापबीप देऊन एक्झिट घेणाऱ्या पात्रासारखा तो तीनतीनदा एकच वाक्य म्हणत होता. मला वाटलं संपलं आता पण कसचं काय, अजून त्याचा मुद्दा संपला नव्हताच.
‘स्वतःच्या समृद्धीसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना सामान्य आहे. परंतु सर्वच आत्म्यांची मोक्ष मिळण्याची विनंती प्राधान्य असावी. असे प्राधान्य देऊन तुम्ही लोकांवर प्रीती धारण करा सर, तुम्ही लोकांवर प्रीती धारण करा, प्रीती धारण करा.’ पुन्हा तिहाई.
हा इतका उपदेश एका दमात मी पहिल्यांदाच ऐकला. ऐकून ऐकून दमलो मी. पण ह्याची टकळी काही थांबायला तयार नाही.  मी त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत मोबाईलमध्ये तोंड घातलं.
‘सर, एक सांगू?’
‘हं’ 
‘आयुष्य नावाची स्क्रीन जेंव्हा लो बॅटरी दाखवते आणि नातेवाईक नावाचा चार्जर मिळत नाही तेंव्हा पॉवरबँक  बनून जे तुम्हाला वाचवतात ते म्हणजे मित्र.’ अचानक ध्यानीमनी नसता, त्यानी हे सुभाषित फेकलं. मी दचकलो.
‘क्काय?’
पुढे त्याने मैत्री या विषयावर मला अर्धा तास सुनावलं. मुक्कामी पोहोचेपर्यंत त्याने माझी पार हालत करून ठेवली. शेवटी मित्राकडे पोहोचलो तेंव्हाच हा गप्प झाला. तरीही गाडी पार्क करता करता त्याने एक सुभाषित डागलेच; ‘मातीचे मडके आणि मैत्री यांची किंमत फक्त बनवणाऱ्यांनाच माहिती असते सर, इतरांना नाही!’
पोचल्या पोचल्या मित्राचा प्रश्न,
काय आमच्या ड्रायव्हर सायबांनी त्रास नाही दिला?’
त्याच्या ड्रायव्हरनी मला कसा आणि किती छळला असणार याची त्याला पूर्ण कल्पना होती हे प्रश्नाच्या टोन वरूनच मी ताडले होते.
‘उपद्रव नाही पण उपदेश खूप दिला. जाऊ दे, ड्रायव्हरने मालकाला उपदेश करायची परंपरा महाभारतापासून चालत आली आहे! शेवटी ‘तो’ही चक्रधर आणि हाही चक्रधर.’ मी.
आम्ही दोघेही दिलखुलास हसलो. ‘चक्रधर’ही जरा ओशाळला पण हसला. हा मित्राचा ड्रायव्हर, वॉर्डबॉय, ब्रदर ई. ई. नवीनच लागला होता. चुणचुणीत होता.  दोनच आठवड्यात तो माझ्याकडे आला. अचानक. कामाला ठेऊन घ्या म्हणून. त्याला त्या मूळच्या गावात रहायचं नव्हतं. काही तरी भांडण झालं होतं. मित्राकडून एकदा खात्री केली आणि बडबड न करण्याच्या अटीवर मी त्याला ठेऊन घेतला. आला तो हरकाम्या म्हणून. पडेल ते काम करीन म्हणाला आणि दहा वर्ष अक्षरशः त्यांनी पडेल ते काम केलं. शिक्षण म्हणाल तर दहावी नापास, पण दवाखान्यातली बहुतेक सगळी कामं त्यानी हुशारीनं आत्मसात केली होती.
दुसऱ्याच दिवशी सक्काळी सक्काळी फोनवरूनच त्यानी राउंड सांगितला.
‘सर, ती मांगाची बाई आहे न तिला रात्री उलटी झाली आणि ती कोल्हाट्याची  बाई, सलाईन लावलवतं ती, ती घरी जायला मागतेय.’
‘कोण कोल्हाट्याची बाई?’ नावापेक्षा किंवा आजारापेक्षा याला जात महत्वाची वाटत होती. ‘कोणाला डिस्चार्ज हवाय? ती लक्ष्मीबाई?’
‘ती नाय, ती तर कासाराची आहे...! ती कुडाळकर म्हणतोय मी, तिला डिस्चार्ज हवाय. आज शनीच्या पारावर तिला उपासना आहे.’
ही जातीनिहाय राउंड मी पहिल्यांदाच ऐकत होतो. पहिल्याच रात्री, पहिल्या फटक्यात त्याला पेशंटचा जाच आणि जात दोन्ही माहित झालं होतं.
‘बरं, ते मी आल्यावर बघून सांगतो. अरे पण  ते पंचपोर पेशंटचं बाळ कसं आहे? त्याला काल डीहायड्रेशन होतं.’
‘ते एकदम टकाटक आहे की. त्याची हगवण थांबलीय जणू. रातभर त्या लेकराला दिलं की साखर मीठ पाणी. त्याच्या आईनी त्याचा चांगला प्रतिपाळ केला.’
तरीच, या माणसाच्या बोलण्यात काही तरी वेगळं आहे, काही तरी वेगळं आहे, असं मला सारखं वाटायचं; पण काय ते आजवर लक्षात आलं नव्हतं. आत्ता अचानक माझ्या डोक्यात प्रकाश पडला. त्याच्या भाषेत काही खास शब्द होते. लेकरू, उपासना, प्रतिपाळ. पण हे त्याने कुठून उचलले होते ते ह्याचा खुलासा पुढच्याच वाक्यात झाला.
‘त्यांचा सण आहे ना उद्या; त्याला डिस्चार्ज देऊ या सर. त्ये आमच्यातलेच ना?’
‘तुमच्यातले म्हणजे?’
‘म्हणजे किरीस्तांव!’
‘उद्या रविवार तर आहे’
‘म्हणूनच ना सर!’
‘म्हणजे?’
‘उद्या ‘झावळ्यांचा रविवार’ आहे सर. प्रभू येशूने जेरुसलेममध्ये प्रवेश केला, तेव्हा तेथील जनसमुदायाने हातात खजुराच्या झावळ्या घेऊन होसान्ना, होसान्ना अशा घोषणा दिल्या. ते म्हणाले प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो! विजयी राजा घोड्यावर असे पण प्रभू गाढवाच्या शिंगरावर बसून आला. हे त्याच्या लीनतेचे प्रतिक आहे. या दिवसापासून आमचा पवित्र सप्ताह सुरु होतो. या आठवड्यात शुभ शुक्रवार, मौदी गुरुवार, इस्टर रविवार  आणि अंजीराचा सोमवार असे दिवस साजरे होतात. होसान्ना, होसान्ना, सर!’
‘काय?’
होसान्ना, होसान्ना.’
‘ते कळलं, पण म्हणजे काय?’
‘म्हणजे प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो.’ एवढं बोलून तो प्रवचनात शिरला

‘येशू आणि त्याचे शिष्य जेरूसलेमजवळच्या बेथांनी या गावी होते. त्यांनी बेथफागे गावातून याहोबाकडच्या पान्हावलेल्या  गाढवीचे शिंगरू आणले.’

‘अच्छा म्हणजे ‘तो’ यहोबा म्हणजे ‘हा’ याहोबा होय?’ अचानक मला पान्हा फुटलेल्या गाढवीचा  मालक याहोबा आठवला.
‘काय सर?’
‘काही नाही. मी राउंड घेतला की देईन डिस्चार्ज.’
त्याचं हे असलं बोलणं ऐकलं की मला हसूच यायचं. तो बोलायचा ती मायबोली नसून बाय(बल)बोली होती. देवाचा शब्द शब्दशः भाषांतरल्यामुळे गचाळ शब्दरचना सगळी. ‘आपण शिकलेला नाही पण वाचलेला आहे’, असं नेहमी  म्हणायचा तो. पण ते निव्वळ वाचन होतं व्यासंग नव्हता. एकांगी, ख्रिस्तमार्गी, उथळ वाचन. वाचन, पारायण आणि पाठांतर.
पण बुद्धिमान तर तो होताच त्याला संधी मिळाली नव्हती एवढंच. माझ्याकडे संधी मिळताच त्यांनी जे जे शक्य होतं ते कौशल्य आत्मसात केलं. आला ड्रायव्हर म्हणून, मग एक्सरे शिकला आणि एक्सरे काढायला लागला, लॅबमधलं काम शिकला आणि तिथे मदत करू लागला, ऑपरेशनला अॅसिस्ट करू लागला, एंडोस्कोप घेतला मी तर हा त्यातले  बारकावे शिकला. काम अगदी मनापासून करायचा तो. अगदी बिनचूक आणि  महत्वाचे म्हणजे झालीच जर चूक तर ती कबूल करायचा. एका वहीत आपली चूक लिहून ठेवायचा. हा बहुतेक खिश्चन संस्काराचा परिणाम. मला दर दोन तीन महिन्यांनी वही दाखवायचा, क्षमा मागायचा. आणखी शंका विचारून आणखी शिकवा म्हणायचा. कोणी पेशंटनी डॉ. चक्रधर अशी हाक मारली की मोहरून जायचा. स्वतःच्या पैशांनी हौसेनी त्यांनी स्थेथोस्कोप आणि थर्मामीटर घेतला होता. वेळीच शिकला असता तर खूप चांगला डॉक्टर झाला असता तो असं मला मनापासून वाटायचं.
लवकरच डॉक्टर जे करतात ते त्यानी केलं. आपलं हुनर वापरून एक नर्स पटवून लग्न केलं. कुटुंब नियोजन आणि गर्भपात याला याचा कडाडून विरोध. मुले म्हणजे देवाघरची देन वगैरे...! मग काय होणार? लग्न होताच चार वर्षात चार मुली झाल्या त्याला. पाठोपाठ. मुलीच्या बापाचा म्हणून जो काही परंपरागत चेहरा असतो, तो मुखवटा ह्याने कायम धारण केलेला. होणाऱ्या प्रत्येक मुलीगणिक मुखवटा घट्ट घट्ट बसत गेला.  सतत चेहेऱ्यावर चिंता, अजीजी, लाचारी, गुळचट बोलणे आणि काही हवं असेल तर  अगदी राग येईल इतका विनय. सतत आपल्याला काही फुकट मिळतय का याचा विचार. जुने कपडे, कागद, कप, जे मिळेल ते. जरा एखादी वस्तू बिनवापराची आहे असं लक्षात यायचा अवकाश, याची भुभूक्षित नजर पडलीच तिच्यावर. सुताच्या चटया, वेताच्या तट्या, प्लास्टिक पट्या काहीही चालायचं त्याला. वर विचारणार...
‘सर, लागणार नसेल ना?’
म्हणजे आपण ओळखायचं, की ‘घेऊन जाऊ का?’ असा प्रश्न आहे हा.
आपण, ‘हो, लागणार आहे’, असं म्हटलं की ‘जेंव्हा लागणार नसेल तेंव्हा सांगा. मी नेईन. मुलींना होईल.’ हे याचं ठरलेलं उत्तर. जे ते याला मुलींसाठी हवे असणार. कुठे बाहेर गेलो तर आपण काही खरेदी करणे म्हणजे चोरीच जणू. ह्याची आशाळभूत नजर सतत आपल्या पाठीवर वळवळत असल्यासारखी आपल्या मागेमागे फिरणार. सदैव असमाधानी अशी याची वृत्ती.
देवाच्या पुत्राला क्रुसावर चढताना झालं नसेल एवढं याचं पुत्रहीनतेचं दु:ख. त्यामुळे की काय, त्याच्या  गाईला गोऱ्हा झाला तर कोण कौतुक सांगायला लागला. एखाद्याने आपल्या पोराचे करावे तसे त्याच्या गोर्ह्याचं कौतुक चालायचं. त्याच्या डोक्यावर चंद्र आहे. तो चलाख आणि चंचल आहे. सुलक्षणी आहे. आज असा पळाला. आज एवढे खाल्ले. आज असा हिसडा दिला. आज गूळ खाल्ला. आज पायातल्या काट्याचा नायटा झाला. बेंदराला बेस्ट दिसत होता. आज फोटो काढला. ह्याच्या पाकिटात फोटो; पोरींचा नाही ह्याचा आणि त्या खोंडाचा. फोटोतल्या त्या तरण्याबांड वांड खोंडापुढे हा पार थोटूक दिसत होता. खरंतर याच्या मुली मोठ्या गुणाच्या होत्या. शाळेत चमकत होत्या. पण ह्याला शल्य स्वतःला मुलगा नसल्याचं...आणि मला तो असल्याचं! एकदा मला फोनवर बोलताना ऐकलन त्याने. काही निमित्तानं कोल्हापूरला जाण्याचं बोलणं चाललं होतं. ह्याचे लगेच सुरु झाले,
‘चला सर जाऊ या की.’
मला वाटलं मोठी आता मोठी झाली होती, तिला काही साज वगैरे घ्यायचा असेल.  पण कसचा साज आणि कसचं काय, त्याला कोल्हापूरला जायचं होतं ते तिथे बैलाला झुली उत्तम मिळतात म्हणून.
तसं पाहिलं तर त्याच्या येशूने त्याला काही कमी दिलं नव्हतं. एकुलता एक होता. घरची शेतीवाडी होती. ती आईबापच करत असत. हा आपला असाच गोळा करून जगायला बाहेर पडल्यासारखा. आला दिवस ढकलायचा. उद्याचे नियोजन नाही. ना पैशाचे, ना मुलाबाळांचे, ना कसले.  ख्रिसमस उद्यावर आला की आज पीठ, मीठ शोधायला लागणार. सतत कर्जबाजरी. माझ्याकडून, स्टाफकडून, पेशंटकडून, माझ्या मित्रांकडून कायम उचल घेतलेली. मला मागताना तोरा असा की जणू त्याचे हक्काचे पैसे मी देत नाहीये. त्याच्या  सतत कुठल्या कुठल्या बँकांचे, पतसंस्थांचे लोक याचा माग काढत माझ्या दारात. याचे पैसे कापून आम्हाला द्या हा त्यांचा तगादा. सगळीकडे माझं नाव सांगितलेलं. लोकांनी, आहे यांच्याकडे कामाला तेंव्हा देईल पैसे, या भावनेने पैसे दिलेले. मला विचारणे नाही की सांगणे नाही. कुणी दारात विचारायला आलं म्हणून वरमणे नाही की शरमणे नाही. लोकं याला बोलबोल म्हणता पैसे द्यायचे. एवढे कर्ज असून हा माणूस एके दिवशी गाडी घेऊन आला. सेकंड हँड. केवळ मिठ्ठास बोलीवर त्याने ही कमाई केली होती.
त्याची ती बायबल छाप भाषा दिवसेंदिवस अधिकाधिक बायबल छाप व्हायला लागली होती आणि हा अधिकाधिक ख्रिस्तमय. रविवार तर त्याच्या हक्काचा सुट्टीचा दिवस ठरूनच गेला होता. बाकीचा स्टाफ रविवारी आळीपाळीने ड्युट्या करत असे पण हा रविवारी माझी उपासना असते असं सांगून कधीही फिरकायचा नाही. क्रुसावर टांगलेला येशू आधी त्याच्या खोलीतल्या खिळ्यावर होता फक्त. आता तो दवाखान्यातल्या प्रत्येक खिळ्यावर टांगलेला दिसायला लागला. प्रार्थनेला तर सुमारच राहिला नाही. तोंडात सतत जप, खिशात सतत जपमाळ, त्याच्या शब्दात सांगायचं तर रोझरी. जरा हाताला काम नसेल की जपमाळ ओढणे सुरु. शिवाय कुणाशीही बोलताना  तोंडात सतत आशीर्वाद. तो ही पुटपुटणे वगैरे भानगड नाही, अगदी खणखणीत आवाजात. सतत ‘देव तुझे भले करो!’, ‘देव तुझे कल्याण करो’; देव यांव्व करो आणि त्यांव्व करो. देव ह्याचा आज्ञेत असल्यासारखा याचा अविर्भाव. चेहऱ्यावरही भाव असा की आता यांनी सांगीतलंय ना, म्हणजे करणारच देव भलं. त्याची काय टाप आहे, चक्रधराची आज्ञा मोडण्याची. तुम्ही मागा अथवा नका मागू हा आपला ज्याला त्याला आशीर्वाद देत सुटायचा. साक्षात देव जरी याच्या पुढे उभा राहिला असता, तरी याने त्यालाही, ‘देव तुझे भले करो’ असा आशीर्वाद दिला असता.
बाळाला इंजेक्शन दिले की चोळता चोळता हा म्हणणार, ‘देव ह्याची वेदना लगेच कमी करेल बघ. बघ माई, तुझ्या लेकराला झटक्यात बरं वाटेल, तो पुन्हा पूर्वीसारखा हसू खेळू लागेल.’
एकदा एका बाळाला आयसीयुत शिफ्ट केलं. मी आणि माझा आयसीयुतला मित्र लढत होतो, त्याला सलाईन लाव, ओटू लाव, कसली कसली इंजक्शने दे, निरनिराळी मशीन्स जोड, तऱ्हेतऱ्हेच्या  टेस्ट कर, रिपोर्टच्या मागे लाग, रिपोर्ट आल्यावर त्यानुसार डोसेस बदल. बाळाच्या काळजाची धडधड कमी होत होती आणि आमच्या काळजाची वाढत होती. त्याची जगण्याची आणि आमची त्याला जगवण्याची अथक धडपड चालू होती. बाहेर नातेवाइकांचा गलबला वाढतच चालला होता आणि हा पठ्ठ्या; सुरवातीला मदत केलीन त्यानी आणि मग अचानक नाहीसाच झाला. हे आजकाल त्याचं नेहमीचच झालं होतं. ऐन वक्ताला हा गायब. सगळे सिनिअर झाले की असेच वागतात. त्याला पुन्हा बोलवायला जायलाही आम्हाला उसंत नव्हती. त्याच्यावर चरफडत आम्ही आमचं काम सुरु ठेवलं.
ते मूल वाचलं. मी आणि माझ्या मित्रांनी बऱ्याच हिकमतीनं त्याला स्टेबल केलं. हे सांगायला आम्ही बाहेर आलो तो काय;  चक्रधर बाहेर झाडाखाली नातेवाईकांच्या  घोळक्यापुढे  बसून चक्क देवाची करुणा भाकत होता. गुडघे टेकून, डोळे मिटून, आत्यंतिक श्रध्देनं आणि खड्या आवाजात ह्याचं सुरु होतं,
‘हे परमेश्वरा तुझी दया आकाशाहून उंच आहे, तुझे सत्य ढगांपर्यंत पोचते.’ पहाता पहाता तो गायला लागला,
‘चित्ती प्रभूला धरणे; प्रभूला आवडते ते आचरणे,
आपुले हित विस्मरणे, परहित केवळ आपुले गणणे,
ही खरी प्रभूसेवा, ही जनसेवा, मान्य ठरो ही देवा.’
                  बाळ आता सुखरूप असल्याचे शुभवर्तमान कळताच त्या नातेवाईकांनी पाय धरले, पण आमचे नाही; चक्रधरचे. सुरवातीला मी चक्रावून गेलो. पण मग लक्षात आलं की हतबल, निराधार, निराश, परिस्थितीशरण नातेवाईकांना त्यानी अचानक एक आधार पुरवला होता. खरंतर हे सुद्धा आम्हां डॉक्टरांचं काम, पण हे करायला आम्हाला फुरसद होती कुठे? नुसतंच डोक्याला हात लावून चिंता करत बसण्यापेक्षा भजन करण्यानी बाळाच्या उपचारात सहभागी असल्याचा फील दिला होता त्यानी, नातेवाईकांना. ओक्साबोक्शी रडणारी बाळाची माता,  पिऊन आलेला पिता आणि अत्यवस्थ चिमुरड्याच्या पंधरा वीस अस्वस्थ नातेवाईकांना  त्यानी प्रार्थनेत गुंगवून टाकले होते.
हळू हळू हे प्रकार वाढतच गेले. दर रविवारी ह्याच्या  बिऱ्हाडी येशूचा दरबारही भरू लागला. थोड्याच दिवसात साऱ्या गावात गवगवा झाला. याच्यापाशी का कुणास पण ठाऊक लोकं मन मोकळं करायची. अगदी खुलेपणानं बोलायची. मग हाही समस्यापूर्तीसाठी काहीबाही तोडगे सांगायचा. लोकांची अडलीनडली कामं मार्गी लावायचा. त्याच्या ओळखी जबरदस्त. कुठल्या सरकारी हापिसातून दस्त काढायचा असो की कुणाला कुठल्या परक्या गावात अचानक पै पैशाची गरज पडो. हा सगळी जुळवाजुळव करून देणार. सरकारी दवाखान्यात पोस्ट मोर्टेम करणारा मुजावर ह्याचा मित्र, माझाही प्रत्येक मित्र ह्याच्या खास ओळखीचा आणि राज्यपाल आले उन्हाळ्यात महाबळेश्वरला; तर याला थेट राज्यपाल भेट घडली! ह्यांनी काढलेले कुठलसं येशूचं चित्र त्यांनी ठेऊनही घेतलं. ह्याच्या बायकोचा कोणी लांबचा भाऊ महाबळेश्वरला राजभवनवर खानसामा आहे. त्या भावाची बायको आणि राज्यपालांच्या पत्नी गाववाल्या निघाल्या. मग काय हा गेला की चित्र घेऊन. आता जोरूच्या, गाववालीच्या, नवऱ्याचा, भाऊ म्हटल्यावर,  राज्यपालही भेटले म्हणे त्याला आणि ते चित्रही ठेऊनही घेतलं. का? तर तेही सिरीअन ख्रिश्चन अन् हाही सिरीयन ख्रिश्चन!!  तेंव्हा ही तो येशूची इच्छा.
एका वर्षी मला ख्रिसमस इव्हला बोलावलन. एकूण त्याच्या बोलावण्याच्या पद्धतीतून हे निमंत्रण मनापासून नाही हे कळतच होतं पण मी अगदी मनापासून गेलो. हा रहातो त्या खबदाडीत एक चर्च आहे हे मला त्या दिवशीच कळलं. एकूणच त्या गिरीजाघराला नव्याने उर्जितावस्था आल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. ही देवाच्या ह्या चक्रधर नामे मेंढराचीच करामत असावी. बऱ्याच वेळ प्रार्थना झाली. खच्चून गर्दी होती. मला आश्चर्य वाटलं. दानपेटीही फिरवण्यात आली. मी खिशात हात घातला तर पाकीट नाही! नेमका बिन पाकिटाचा मी बाहेर पडलेलो. आता काय करायचं या विवंचनेत असतानाच त्यानी ती पेटी माझ्यापर्यंत येऊच दिली नाही. त्यानी माझी गोची ओळखण्याचा प्रश्नच नव्हता. पण तरीही त्यांनी पेटी माझ्यापर्यंत पोहोचायच्या आत माघारी वळवली होती. का? माझा पैसा त्याला नको होता का? मन चिंती ते वैरी न चिंती, पण असंच काही तरी होतं. गेले वर्ष दोन वर्ष, काहीतरी खदखदत होतं त्याच्या मनात. माझ्या विषयीच्या  प्रेमादराची जागा आता आकस आणि असूयेनी घेतली होती. ही मोठी विचित्र अवस्था होती. आपण ज्याला लहानाचा मोठा केला, शिकवला, तो मुलगा असा एकदम घुमा, आपल्यापासून एकदम फटकून, वागायला लागला की कसंतरीच होतं नाही का. स्वतःचा मुलगा असं वागला, तर त्याला खडसावून विचारता तरी येतं. हा तर कोण कुठचा परका. पण त्याचं वागणं दिवसेंदिवस बदलत चाललं होतं, बिघडत चाललं होतं.
त्याला कामाबाबत काही सांगायचं नाही, काही बोलायचं नाही. कोणी स्टाफनी त्याच्या विरुद्ध ब्र काढायचा नाही, सगळ्यांनी ह्याला दबून रहायचं, अशी ह्याची सत्ता. सत्ता कसली मत्ताच ही. याचा मला राग येत होता. पण रागावलं वगैरे तर तो आता खुशाल दुरुत्तरे करत होता. इतरांना असं करायला चिथावणी देत होता. त्याच काय कुठे बिनसलं होतं, त्याला काय कुठे कमी पडत होतं हे त्याचं त्यालाच ठाऊक. पण तो असमाधानी होता, अस्वस्थ होता हे नक्की. गुरुस्थानी असणारा मी आता त्याचा नंबर एकचा शत्रू असल्यासारखं झालं होतं. देव देव करणं तर प्रचंड वाढलं होतं. त्याला दुसरं काही सुचेना दुसरं काही दिसेना. दहावी पास असलो तर कुठल्याशा चर्चमध्ये काम मिळेल असं त्याला कळलं. मग त्यांनी हाच ध्यास घेतला. कसाबसा नववी झाला होता तो. दहावीला बाहेरून बसायचं असं त्याच्या मनानी घेतलं आणि त्यांनी जे पुस्तक हातात धरलं ते पाठ होईपर्यंत ठेवलंच नाही. सगळी पुस्तके पाठ करणे ही त्याची अभ्यासाची स्टाईल. मराठी पाठ, इंग्रजी पाठ, इतिहास, भूगोल इतकंच काय गणितेही पाठ केली होती त्यानी. मग काय दहावी सहज पास झाला तो. पास झाला आणि एके दिवशी, ‘उद्या पासून मी कामावर येणार नाही!’ एवढे एकच वाक्य बोलून निघून गेला. दहा वर्ष काम करून कुणी असं, ना सत्कार ना नमस्कार गेलं, की विचित्र वाटणारच. मलाही वाटलं. पण क्षणभरच. तो गेला आणि मला एकदम सुटल्यासारखे वाटले. सिंदबादच्या मानगुटीवर बसलेल्या म्हाताऱ्यासारखा तो माझ्या मानगुटीवर बसला होता. जाम सोडत नव्हता. दहा वर्ष तो होता हे बरोबर, पण त्यातली गेली काही वर्ष तो असून नसल्यासारखाच होता. त्याच लक्ष कामात नव्हतंच. काहीतरी जगावेगळं  करायचा त्याचा प्रयत्न होता असं जाणवायचं, पण काय ते मला कधीच ओळखता आलं नाही.
तो गेला तो गेलाच.
आता तो गेल्यालाच मुळी दहा बारा वर्ष झाली असतील. एके दिवशी  टीव्ही सुरु केला, अगदी सहज, तर चक्क कोणतातरी धार्मिक चॅनेल लागलेला. मी पहातच राहिलो. तोच होता तो, चक्रधर. स्वारी अगदी नटली होती; सूट, बूट, टाय. आता कोणी भलताच बडा ख्रिस्ती बुवा झाला होता. येशूच्या कृपेने आपण दहावी, बारावी, पुढे चर्चच्या कॉलेजमधून धर्मशास्त्रात एम.ए., पी.एच.डी. झाल्याचं तो सांगत होता. डॉक्टरकी पर्यंतची  आपली यशोगाथा मांडत होता. देवाने अनुग्रह केल्याचे सांगत होता. त्यामुळेच दुखःमुक्तीची शक्ती प्राप्त झाल्याचं सांगत होता.
आता मुख्य कार्यक्रम सुरु झाला. आजाऱ्याना रोगमुक्त करण्याचा. वेगवेगळे आजारी लोक स्टेजवर आणले जात होते. हा हातवारे करत प्रार्थना ओरडत होता. त्यांच्या हातापायावर, छातीपोटावर, हात फिरवत होता. त्यांना म्हणे तपासत होता. डोळे मिटून म्हणे त्यांच्या शरीरात डोकावत होता. हवेत हात हलवून प्रार्थना म्हणून त्यांच्यावर इलाज  करत होता. त्यांना तुम्ही आता रोगमुक्त झाल्याचं सांगत होता. तेही तात्काळ आपण रोगमुक्तीची प्रचीती आल्याचं जाहीर करत होते. तत्क्षणी जमाव जल्लोष करत होता. चक्रधर अगदी अखंड, भडाभडा बोलत होता. त्याला ते सगळं पाठच असावं. जोरजोरात हातवारे करत तो माईकमध्ये ओरडत होता. भलताच त्वेषाने आणि आवेशाने. तो बरळत होता. कॅमेरा आता गर्दीत शिरला. खच्चून गर्दी होती. सगळी गर्दी भारावून ह्याची बडबड ऐकत होती. तो त्याची भंकस, भकत होता. भक्तगण, गणंग होऊन त्याच्या आरड्याओरड्यात तल्लीन होत होते. त्याच्या इशाऱ्यासरशी हात काय हलवत होते, बेभान नाचत काय होते, भेसूर ओरडत काय होते, बेसूर गात काय होते; अर्थात हे दृश्य तर नेहेमीचंच होतं. कोणत्याही जमावाला असं एकच मन असतं,  असं एकच शरीर असतं. असा एकच मेंदू असतो. इथेही सगळ्यांना जणू एकच मन आणि एकच शरीर होतं आणि त्यांचा मेंदू होता डॉ. चक्रधर.