Showing posts with label पेशंट. Show all posts
Showing posts with label पेशंट. Show all posts

Saturday, 15 June 2019

आता यश फक्त दोन बोटे उरलंय...!


आता यश फक्त दोन बोटे उरलंय...!
भाषांतर डॉ. शंतनू अभ्यंकर
मूळ लेखक डॉ. प्रणव कोडीयाल.
प्रिय पेशंटचे हिंसक नातेवाईकहो,
मनःपूर्वक अभिनंदन. डॉ पारिबाह मुखोपाध्याय यांचावर यशस्वी हल्ला करून, देशातल्या सर्वात अकार्यक्षम जमातीविरुद्ध, डॉक्टरांविरुद्ध, पुकारलेल्या लढाईत,  तुम्ही आता यशाच्या अगदी जवळ पोहोचला आहात. बस् एक पाउल आणि तुम्ही यशशिखरावर असाल.
छान! आज प्रथमच डॉक्टरांना जवळजवळ  देहांत प्रायश्चित्त देऊन, तुम्ही अगदी  कर्तृत्वाचा कळस गाठला आहे. मरणासन्न पेशंटला न वाचवल्याबद्दल ही शिक्षा रास्तच म्हणायची.
गेली काही दशके तुमच्या ह्या अव्याहत लढाईचा मीही एक साक्षीदार आहे.
सुरवातीला तुमच्या हाती फारसं काही लागलं नाही. शिवीगाळ, कोर्टबाजी इतकंच काय ते साधलं. पण तुम्ही चिकाटी सोडली नाही. हॉस्पिटल जाळ, खळ्ळखटॅक घडव, हे ही मग सहज जमायला लागलं. पण...पण हॉस्पिटलमधला स्टाफ मात्र बचावत होता.
पण तुम्ही मागे हटला नाहीत, धक्काबुक्की, कानशिलात लगावणे आणि पुढे पुढे तर बेदम मारहाणही जमू लागली की तुम्हाला. पण ह्यातही पुरतं समाधान नव्हतं. ते जखमी डॉक्टर लेकाचे बरेबिरे व्हायचे आणि पुन्हा मुकाट रुग्णसेवेला लागायचे.
पण गेल्या सोमवारी शेवटी तो सोनियाचा क्षण आला. एका नराधम डॉक्टरला तुम्ही शेवटी यमसदनाचे दर्शन घडवलेच.
नुकताच डॉ. झालेल्या परीबाहाची कवटी चांगलीच चेचलीत की तुम्ही. चांगला बशीभर पोचा आला कवटीला. मेंदूचाही चेंदामेंदा झाला असता, पण थोडक्यात बचावला. मेंदूही आणि परीबाहही. तो वाचला. तुमचेच नशिब फुटके, दुसरे काय. आचके देत देत मरणारा डॉक्टर बघायचं भाग्य थोडक्यात हुकलं.
असो. पुन्हा संधी येईलच की. पुढचा गनीम नक्कीच थेट यमसदनी.
...आणि हो चिंता नसावी. या आगळीकीबद्दल डॉक्टर वगळता कोsssणी तुम्हाला काsssही म्हणणार नाही. सारा देश तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. दशकानुदशके हे नालायक डॉक्टर सगळेच्या सगळे जीव वाचवण्यात घोर अपयशी ठरत आहेत आणि तुम्ही चरफडत बसलाय.
वर त्यांच्या ह्या निरुपयोगी उपचाराची फी भरताय तुम्ही. अहो पैसे मोजले की पाणीपुरीवालासुद्धा तुमच्या पसंतीची पाणी पुरी पुढ्यात ठेवतो. पण डॉक्टरांची शिरजोरी किती. कोणात प्राण फुंका म्हटले तर तेवढे सुद्धा करायला नको. माथी भडकतील नाही तर काय? पण आता थोडाच धीर धरा. आता विजय टप्प्यात आला आहे. एखाद्या डॉक्टरचा सर्वांसमक्ष जाहीर खून करूनही तुम्ही सहीसलामत सुटणार. दानव करो आणि असं होवो.
इथून पुढे सारं सोपंच तर आहे. गंभीर आजाऱ्याला दवाखान्यात नेतानाच बरोबर चार सशस्त्र गुंड घेऊनच जा. नाही वाचला पेशंट तर डॉक्टरचा तिथल्या तिथे शिरच्छेद केल्याचे तरी समाधान मिळेल. शिवाय आधी थोडे हालहाल करण्याचा पर्यायही आहेच.
काहीही कायदेशीर कारवाई होणार नाही. कायदा कागदारच आहे की आपल्याकडे. आजवर ह्या कारणे कोणाला शिक्षा झाली आहे; की ती तुम्हाला होईल? तेंव्हा चालू दे. आतासुद्धा पहालच तुम्ही डॉ. मुखोपाध्याय यांच्या हत्येच्या प्रयत्नाबद्दल कोणाही दोषीला जबर शिक्षा होणार नाही.
डॉक्टर मारल्याबद्दल मिडीयाही मूग गिळून बसेल. डॉक्टर कसे केसेस बिघडवतात, कसे पेशंट मारतात, त्यांना कसं नागवतात ह्याबद्दल लोकशिक्षण करण्यातच तर त्यांचा सगळा वेळ जातो.
आणि राजकरण्याची तर चिंताच सोडा. डॉक्टर म्हणजे गठ्ठा मते नाहीत, तुम्ही म्हणजे गठ्ठा मते. मिडियासमोर आणि डॉक्टरांच्या संघटनांसाठी चार सहानुभूतीचे शब्द ते पुटपुटतील आणि पुन्हा सारं कसं शांत शांत होईल.
समाजाचे काय घेऊन बसलाय राव? आजवर इतके हल्ले झाले; पण जनसामान्यांचा एक तरी मोर्चा? मोर्चा जाऊ दे, मान्यवरांकडून एक तरी दणदणीत निषेध? नाही.
उलट सोशल मिडियावर डॉक्टरांचे दुर्दैव साजरे करणारे मेसेज फिरायला लागतात. लुटारुंना बरी अद्दल घडली म्हणत फिदीफिदी हसतात.
पण मग डॉक्टरांचे काय? हॅ! त्यांना तर मुळीच भिक घालू नका. तारुण्याची सारी वर्ष आणि नंतरही बिच्चारे अभ्यासात घालवतात. ते बिचारे किरकोळ सेवाभावी जीव, तुमच्यासारखे बलवान आणि शूरवीर थोडेच आहेत ते? अरे ला कारे म्हणताना सुद्धा जीभ रेटत नाही त्यांची, ते हात कुठला उगारणार? तेंव्हा रान मोकळंच आहे.
शिवाय बेमुदत बंद ठेऊन डॉक्टर तुम्हाला वेठीस धरू शकत नाहीत. लगेच हृदयशून्य डॉक्टरांच्या संपामुळे अत्यवस्थ पेशंटचे व्हिडीओ फिरायला सुरवात. लगेच आपमतलबी डॉक्टर कसे आरोग्य व्यवस्था संपवू पहात आहे, म्हणत प्रशासन कण्हून दाखवणार.
आपल्या देशात रुग्णसेवेची गरज आहेच आहे पण डॉक्टर नसले तरी बिघडत नाही.
तेंव्हा चालू दे. संपूर्ण स्वातंत्र्य आहे तुम्हाला. स्कोअरबोर्ड सतत हलता ठेवा. पहिला बळी आता होऊनच जाऊ दे. शिवाय हा नरमेध अखंड चालू रहाणार आहे. कारण कोणी ना कोणी, कधी ना कधी, मरणारच; आणि नवीन बळीचा डॉक्टर मिळणारच; आणि डॉक्टरला बलीवेदीवर चढवायला सारे उत्सुक आहेतच.


Wednesday, 26 September 2018

चाफेकर बंधू


चाफेकर बंधू
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

ते ही चाफेकर बंधु आणि हे ही चाफेकर बंधू. ते दामोदर हरी, बाळकृष्ण हरी, शिवराम हरी; आणि हे; दाउद रहीम, बशीर रहीम आणि सलीम रहीम चाफेकर. चाफेकर आडनावाच्या माणसाचे नाव दाउद किंवा बशीर किंवा सलीम असू शकते आणि कुणा चाफेकराच्या बापाचे नाव रहीम असू शकते; हे पहिल्यांदा कळले तेंव्हा  हा कल्चरल शॉक होता मला.  हे बंधू महाडचे. हे आणि ह्यांच्यामुळे त्या भागातले अनेक माझे पेशंट झालेले. बोटीवर मजूर म्हणून चाकरी हा बहुतेकांचा व्यवसाय.
पण चाफेकर बंधू खास पेशंट. कारण ते माझे वडिलोपार्जित पेशंट. बाबा जनरल प्रॅक्टीस करायचे. तेंव्हाच्या शिरस्त्याप्रमाणे डोळ्यातल्या मोतीबिंदुपासून  ते टाचेतल्या काट्यापर्यंत सगळी ऑपरेशनं एकहाती करायचे. त्या जमान्यातले रहीम चाफेकर हे बाबांचे अगदी घट्ट पेशंट. पुढे हे चाफेकर बंधू माझे पेशंट.
‘तुझ्या बाबान् आमच्या घरातल्या सात माणसाचा पोट फाडलेला हाय.’ अशी माझ्या वडीलांची कीर्ती मलाच अभिमानाने सांगणारे. मी ‘पेशालिस्ट’ झाल्यामुळे बाबांसारखी ‘सर्वां आप्रेशने’ करत नाही हे ऐकून हळहळणारे पण तरीही ‘कायबी लागला तर तुला आधी दावू, मंग तू सांगशीला थितं न्हंतर जाउ’ असं बजावणारे.
सह्याद्री ओलांडून महाडची ही फ्यामिली मजल दरमजल करत माझ्या दवाखान्यात डेरेदाखल झाली की मोठा गहजब उडतो.
आल्या आल्या सिस्टरना ‘बऱ्या हांव ना?’ अशी साद घालणार.
‘बऱ्याव! बऱ्याव!!’ पण एवढ्यावर चाफेकरांचे समाधान होत नाही.
‘न्हवरा बेष हाय ना?’
‘हो.’
‘आणि मुलां?’
‘छान आहेत.’
‘सासू बेस असां नां?’
‘हो हो.’
असां अजून? असां कसां?’ चाफेकर ठरलेला जोक मारणार. असं करत करत सगळ्या खानदानाची विचारपूस झाली की,
‘डागदर हाय आत का जेवूक गेलां?’
‘नाही, आहेत की.’
‘अजून नाय गेला? अडीच झालें’
मग ‘काय डागदर, बाबा कसे हायेत?’ अशी सलामी देत देत थेट माझ्या केबिनमधे घुसणार. घुसणार म्हणजे घुसणार. आत दुसरे कोणी पेशंट आहेत नाहीत ह्याची पर्वा कशाला? चाफेकर तर घरच्या दवाखान्यात आलेले. ‘हे पहा, तू शिस्टरशीक आमास रूम दावायला सांग. आमी एवढ्या लांबचा परवास करून आलंय. आमी ज्येवतय आणि मग तुला दाखवतंय. तू जेउक ये पाहू, आमी बी उरकून घेतांय’
थोड्याच वेळात दवाखान्याबाहेरच्या शेडमध्ये, पीठ, मीठ, शिधा बाहेर येणार. पाटा-वरवंटा वाजू लागणार, नाचणीच्या भाकरीचा आणि तिखट सुकट बोंबील शिजल्याचा घमघमाट हॉस्पिटल भरून रहाणार. लांबूनच कोणीही ओळखावं. महाडचे पेशंट आले बरं का.
येणार ते सगळा गोतावळा बरोबर घेऊन. सगळ्या भावांच्या बायका, पोरंबाळं, सासू-सासरे, मेव्हणे, पावणे, सगळे. तीन भावांपैकी आता दोघंच आहेत. दोघं भाऊ अचानक गेले. मला आठवतंय, एके दिवशी दाउद चाफेकर आला आणि ओक्साबोक्शी रडायलाच लागला. मला काही कळेना, बऱ्याच वेळानी नीट  बोलता येण्याइतका तो सावरला. म्हणाला, तिघेही भाऊ एकत्रच बोटीवर होते. काँगोच्या बंदरात बोट असताना दोघा भावांना ताप यायला लागला. तिथल्या डॉक्टरनी त्यांना ‘क्वारान’ केला होता. ‘क्वारंनटाईन’ म्हणायचं होतं त्याला. ताप प्लेगचा होता, त्यामुळे कुणालाही भेटायला बंदी. प्रवास चालू, तापही चालू. पुढे बोटीवर असा पेशंट आहे म्हटल्यावर तर, बोट मादागास्करच्या बंदरातही येऊ देईनात. ह्यांना काही मदत मिळायच्या आत, दोघांचाही  खेळ खल्लास. बोटीवरच. बायको आणि पाच-पाच मुलांचे पोशिंदे पहाता पहाता गतप्राण झाले होते. हा हादरला. दोन्ही भावांचे मृतदेहही याच्या ताब्यात मिळाले नाहीत. त्यांची रोगीष्ट शरीरे इतरांना घातक ठरू शकत होती. नियमानुसार सीलबंद पेटीत घालून ती तिथल्यातिथे समुद्रार्पण करण्यात आली. ह्यांनी घरी तार केली. तार पोहोचायच्या आत कंपनीचा नुकसान भरपाईची चेक घरी पोहोचला होता आणि हे पैसे म्हणजे काही तरी बक्षिस आहे असं समजून घरी आनंदोत्सव सुरु होता.
झाल्या प्रकारानं हा खचला पण घरी नाही बसला. स्वतःचा आणि दोन्ही भावांचा संसार निगुतीनं आणि टुकीनं सावरत राहिला. एक बरं होतं. पोरं भरमसाठ होती. त्यामुळे पाठोपाठ ती हाताशी आली, बोटीवर लागली आणि पै-पैसा घरी पाठवू लागली. दिसामासांनी चाफेकराची परिस्थिती कूस पालटू लागली. कोणी पोरगा घरी आला की खिशात पैसा खुळखुळू लागायचा. मग हौसेची आजारपणं घेऊन हा सारा काफिला वाई पिकनिक आणि औषधोपचार अशा संयुक्त सफरीवर कूच करायचा.
आले की लगेच चौकशा. इतक्या चौकश्या की विचारायची सोय नाही. आपपरभाव असा काही मामलाच नाही तेंव्हा सारे प्रश्न खुलेआम. कोणी नवीन सिस्टर दिसली की चाफेकर सुरु,
‘लगीन कधी झालां?’
‘तीन वर्ष.’
‘मुलां किती?’
‘दोन.’
‘मुलगे?’
‘दोन.’
‘दोन्ही मुलगेच?’
‘हो.’
‘मुलगी नाय?’
‘नाही.’
‘नाय!! असा कसा? भावाला भन नको? आप्रेशन केल्यांव?’
अशी उलटतपासणी घ्यायला चाफेकरला सिस्टरच पाहिजे असं नाही. माझ्या पत्नीलाही त्यांनी पहिल्या भेटीत अगदी हेच प्रश्न विचारले होते. जाताना निरोप समारंभही असाच आपुलकीने पार पडणार. मी, सिस्टर, मावश्या, स्वीपर सगळ्यांना ‘येत्यांव हां आमी येत्यांव, याद ठेवा.’ असं सांगून जाणार. वर मला सांगणार, आता म्होरच्या बाऱ्याला बायकोला तुमच्या म्होरं हानतो! एकदा तुमच्या म्होरं हानला की ती बेष  होणार. गेल्या बारीला मुलीला हानला, ती आता बेष हाय, मंगशी म्हेवणीला हानला, ती बी बेष हाये; आता बायकोला हानला की झाला! येत्यांव हां, बायकोला हानला की नीट तपासा तिला.’ हानला म्हणजे  आणला हे आता मला माहित झालं आहे.
माझा दवाखाना त्यांच्यासाठी दवाखाना नव्हता, लॉजिंग बोर्डिंग होतं. एका पेशंटला दाखल केला की तेवढ्या  पुण्याईवर दहा पंधराजणांची फुल फॅमिली मुक्कामी रहाणार. इकडे मी पेशंटचं लागेल ते करणार आणि तिकडे ते पिक्चर बघणार, चार-चार, पाच-पाच पिशव्या गच्च भरून भाजी घेणार, हरतऱ्हेचा  बाजार करणार, अगदी केरसुणी सुद्धा घेणार. सुरवातीला आलेले नातेवाईक मौजमजा करून झाली की परतणार. मग लगेच दुसऱ्या दिवशी दुसरी बॅच येणार. त्यांनाही विविध खऱ्याखोट्या आजारांनी, तक्रारींनी ग्रासलेलं असणार. कुणाच्या ‘काळजात धकाकी होतंय’, तर कुणाचा ‘माथा मोप उकलतांय’ तर कुणाला ‘अंगावरून पांढराव्हाईट्ट बिलडींग होतांय’!  तो पाढा माझ्यासमोर वाचून झाला की हौसेहौसेनं सगळे औषधं लिहून घेणार. चढाओढीनं तपासण्या सांगा म्हणणार. एखाद्याला एखादी तपासणी नको म्हटलं की मनोमन दुःखीकष्टी होणार. आघाडीवर लढाईला निघाल्याच्या तोऱ्यात शी शू तपासायला जाणार. थुंकी तपासायला सांगितलं तर बाकीचे थुंकी झेलायलाही तयार. जत्रेत फोटो काढावा तशा लगबगीनी एक्सरे काढून घेणार, सोनोग्राफी करणार. यात कशात काहीही  निघालं, की त्या माणसाचं कोण कौतुक. एखादं मेडल, ढाल किंवा गदा मिरवावी तसा तो रिपोर्ट मिरवणार. त्या माणसाची जीवापाड काळजी घेणार. मायेनं ओथंबलेल्या शब्दात त्याची विचारपूस करणार. किरकोळ आजाऱ्याला मरणासन्न असल्याची वागणूक. त्याची प्रत्येक इच्छा जणू अखेरची इच्छा. त्याचा प्रत्येक शब्द झेलणार. सारं अत्यंत आपुलकीने प्रेमाने करणार. चाफेकराची आणि त्याच्या बायकोची गडबड बघत रहावी.
आपला अवजड देह सांभाळत, बुरखा सावरत ही बाई सगळ्यांची उठबस करणार. आकारात हा हिच्या बरोब्बर उलट. अंगयष्टी म्हणजे अक्षरश: यष्टी. उंच, शेलाटी अंगकाठी. बुरख्यात गुंडाळलेल्या गलेलठ्ठ बायकोसमोर चाफेकर म्हणजे डोलकाठीच दिसायचा. बुजगावण्याला कपडे घातल्यासारखा अवतार त्याचा. लांबच लांब सदरा, पायघोळ पायजमा किंवा लुंगी, जाकीट, गोल टोपी, खांद्यावर चौकड्याचा रुमाल, आणि भरघोस दाढी विथ नो मिशी; असा कोणाही खानास शोभेल असा पेहराव. पण रूप मात्र अगदी चाफेकरी, गोरा, घारा, उंच, नाकेला. आवाज अत्यंत मृदू, मुलायम, आर्जवी, मिठ्ठास गोड. अशा मधाळ आवाजात तो डॉक्टरची स्तुती सांगू लागला की काय वर्णावे.
‘लंडनशी व्हतं तवा पोटात दुखला, बोटीवरचा डागदर म्हणाला, आप्रेशन लागणार, अपेंड्याचा किडा हाय. मया काय त्याच्याकडून काढून घेतला नाय. तिथून बोट दरबानला थांबली तिथे दाकीवला, तिथ्ये बी तेच! मी म्हणला हिथे नाय ओप्रेशन करूसा, मला सोडा मी आपला वाईस जाईन, अबिंकरास दावीन. त्यानि संगीत्ला तर तां खरा. मंगशी म्हमईला बोट आली का, की कंपनीच्या इस्पितळास बी गेला न्हायी. लागलीच हिकडे आला. आता तुमीच काय ते बगा आन तो अपेंन्ड्या काडा.’
एवढं बोलून, रुंद हसून, पिशवीतून हा फॉरेनहून आणलेली भेटवस्तू काढून देणार. जुना जमाना तो, इम्पोर्टेड कापडाचंही कौतुक असण्याचा. एकदा त्यांनी लुंगी दिली! सुळसुळीत टेरिलीनच्या कापडाची लुंगी. इम्पोर्टेड! तिच्यावर एक  नेत्रदीपक मोर प्रिंटलेला होता. लालभडक, पिवळाजर्द, जांभळागर्द, हिरवागार, निळाशार, अशा गडद सप्तरंगात प्रिंटलेल्या त्या मोरानी, रंगांची उधळण असह्य होऊन, ‘नो मोर’ असं म्हणत, स्वतःच डोळे मिटले होते.
सप्तसागर ओलांडून चाफेकर बंधू आले की मला आपले कुसुमाग्रज आठवतात.
‘मार्ग आमचा रोखू न शकती, धन अथवा दारा, घराची वा वितभर कारा...
नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभाखाली, निर्मितो नवक्षितिजे पुढती.’
पण मग विषण्ण भाव दाटून येतो.  यांचा मार्ग रोखायला धन होतेच कुठे. असलीच तर भातखाचराची शेती, तीही सामायीकीत आणि थोड्या  कोंबड्या. एवढीच दौलत. दौलत येणार ती समुद्रात, बोटीवर राबराब राबुनच. घराची काराही वीतभर म्हणजे खरोखरच वीतभर. त्यात भर पडलीच तर बोटीवर काम करणाऱ्याच्या घरी पडणार. दारासुद्धा असून नसल्यासारखी. सहा-सहा महिने नवरा समुद्रावर मग दोनेक महिने घरी की पुन्हा बोटीवर. बहुतेकांना मुलंबाळं होण्यात प्रॉब्लेम. आजारामुळे नाही, अ-सहवासामुळे. सात नभाखाली फिरूनही क्षितीज बितीज निर्मिण्याचं भाग्य यांच्या भाळी नाही. हे कोलंबस नाहीत. हे आपले मजूर. अनाम मजूर. कोलंबसच्या बोटीवरही असतीलच की चाफेकर, आपल्याला कुठे त्यांची नावं माहित आहेत.
पण दाउद चाफेकर कोलंबस नसला तरी त्याच्या घरी मात्र कोलंबस आहे बरं. स्वतःच्या बायकोला, त्याच्या शब्दात ‘मागारीणीला’ हा कोलंबस म्हणायचा. कारण काय, तर तिचं सारखं काहीतरी हरवलेलं असायचं आणि ही कायम शोध मोहिमेवर असायची. नुकतीच हातात ठेवलेली औषधाची चिठ्ठीसुद्धा तिला लगेच सापडायची नाही. तिच्या बुरख्याच्या तंबूत तीही हरवून जाईल असं मला वाटायचं. त्या पट्टीतून दिसणारी तिची ‘या डोळ्यांची दोन पाखरे’सुद्धा सतत हरवलेले भाव घेऊन असायची. पण कोलंबसपेक्षा गलबताचीच उपमा तिला शोभून दिसली असती. बुरख्यात गुंडाळलेलं शरीराचं धूड सांभाळत ती, एकदा एका पायावर आणि एकदा पायावर सारा भार सावरत सावरत यायची, तेंव्हा दुरून ती गलबतासारखीच भासायची.
या बायको नावाच्या गलबताचं, चाफेकर म्हणजे बंदर होता. एकदा ही जोडी, आणि आश्चर्य म्हणजे फक्त जोडीच आली आणि चाफेकरीण तावातावानं बोलायला लागली. चाफेकरचे कोणतेतरी  ऑपरेशन महाडला झालं होतं आणि हे तिला मुळीच पसंत नव्हतं एवढंच मला कळलं. माझ्या सल्याशिवाय झालेले ऑपरेशन म्हणजे काहीतरी बिघडलेलंच असणार अशी तिची पक्की खात्री होती. म्हणून ती आज तो प्रॉब्लेम सोडवायला चाफेकरला खास घेऊन आली होती.
‘कसलं ऑपरेशन झालं चाफेकर?’
‘आप्रेशन ना? पिस्तुलाचा झाल्यांव!’ ओशाळत चाफेकर म्हणाला.
‘कसलं?’ मी जरा चमकलोच.
‘पिस्तुलाचा.’ चाफेकर शांत. वेगवेगळी लोकं येतात, त्यांची भाषा वेगवेगळी असते, आणि शब्दही काहींचे अगदी खास आणि वेगळे असतात. पण कितीही कल्पना ताणली तरी हा चिपाडासारखा माणूस आपल्या अवयवाला पिस्तुल म्हणेल हे काही मला पटेना. म्हणजे, त्यानी तसं म्हणायला माझी काही हरकत नव्हती. काही का म्हणेना, पिस्तुलंच काय रायफल किंवा तोफ म्हणले असते तरी चाललं असतं. पण मला हसू येत होतं. ते जाम दाबता येत नव्हतं.  कितीही हसू आलं तरी हसायचं नाही हा तर अंगी मुरवलेला व्यावसायिक बाणा. त्यामुळे मी चेहरा कोरा ठेवण्याच्या आटोकाट प्रयत्नात. पण फिसकन् हसू फुटेल अशी धास्ती वाटत होती. कुकरच्या शिट्टीसारखी आतून फुस्स फुस्स वर येत होती.
शेवटी मी हसू दाबण्यासाठी पुढचा प्रश्न विचारला, ‘कुठे झालंय ऑपरेशन?’
‘आपला महारशीच झाल्यांव. त्ये द्येशमुखाचा पोरगा आल्यांव न डागदर होऊन, त्यो म्हनला ब्येस करून द्येत्यांव. मी हिकडशीच निगलावता, पर काय करणार, पाउस मोप आमच्या हिकडे, गाड्या बंद, घाटात दरडी पडलेल्या आन तरास मला मोप झालेला, मंग दावला त्याला. पिस्तुलाचा तरास लई ताप देणारा हो, शत्रूला बी होऊ नाय!’ एवढं बोलून तो गर्रकन् वळला आणि स्वतःच्या पार्श्वभागाकडे बोट दाखवत म्हणतो कसा,
‘एके दिशी पिस्तुलातून भळांभळां पानी यायला लागलांशी.’
मला काही कळेना याचं पिस्तुल या दिशेला कुठे गेलं?  बरं त्याच्यात काही दिशादोष म्हणावा तर हा चार मुलांचा आणि तेवढ्याच मुलींचा बाप!
‘निट सांग चाफेकर, कुठून पाणी गेलं? कसलं ऑपरेशन?’
‘सांगितल्यांव ना, पिस्तुलातून पाणी गेल्यांव, तवा  पिस्तुलाचा ऑपरेशन केल्यांव!’
‘पिस्तुलाचा?’
‘आपला पिस्तुला अस्त्यांव ना त्येचा.’ अचानक माझी ट्यूब पेटली. ‘पिस्तुला’ म्हणजे 'फिस्च्युला’ म्हणायचं होतं त्याला!! मला हुश्श झालं. त्याला तपासून ऑपरेशन व्यवस्थित झाल्याचं सांगितल्यावर तो माझ्या पायाच पडायला लागला. निव्वळ दुसऱ्याने केलेलं ऑपरेशन व्यवस्थित आहे ह्या सर्टीफीकेटसाठी पाया पडणे, म्हणजे जरा जास्तच होत होतं. पण चाफेकर ऐकायला तयार नव्हता. माझ्या सल्याशिवाय ऑपरेशन केल्याचं पाप त्याच्या भावूक मनाला डाचत होतं.
भावूक तर तो होताच पण भाविकही होता. भाविक तर इतका की काही विचारू नका. पाच वेळा नमाज, कुराण पठण, सतत तसबीनी जप हे तर चालायचंच. टोपी, दाढी हे तर मस्टच. पण एकट्या अल्लावर भार नको म्हणून की काय, तो सगळीकडचे देव करायचा. वाईला आला की ढोल्या गणपतीला जाऊन येणार, कृष्णाबाईचा उत्सव चालू असेल तर तिलाही एकदा दर्शन देऊन येणार. वाडीतला पीर, सुलतानपुरातली मशीद, निमजग्यावरचा दर्गा असं सगळीकडे फिरून एक मिनी तीर्थयात्रा उरकून येणार. कोणी काही प्रसाद म्हणून दिलं, की आत्यंतिक भक्तिभावाने, डोळे मिटून, प्रार्थना पुटपुटत भक्षण करणार. सगळीकडे त्याला देवच देव दिसत होते. वाटेतल्या उंबराच्या झाडाला, शेंदूर माखल्या दगडाला, वडाखालच्या मारुतीला ह्याचा नमस्कार ठरलेला. शप्पथ घेणार ती ‘दर्याशप्पथ!’ अशी. अल्ला, प्लस हे सगळे जमेस धरता, त्याच्या देवांची संख्या तेहतीस कोटी प्लस होती.
एकदा ह्याचा सीटी स्कॅन करायचा होता. मला म्हणाला, ‘डागदर, तू माज्या बरुबर आत पत्तूर यांव हां, मला भय वाटतांय.’ मी गेलो. हा बाहेर थांबला होता. आधी मी त्याला ओळखलंच नाही. दवाखान्याच्या चट्टेरीपट्टेरी कपड्यात, टोपी नाही, एका हातात लघवीची पिशवी आणि एका हातात केस पेपरची फाईल. चपला घासत, गाऊन सावरत कसाबसा चाफेकर मशीनपाशी पोहोचला. त्या टेबलवर कसं झोपायचं हे सांगण्यासाठी  मी त्याला म्हणालो, ‘हं, चाफेकर, इकडे डोकं ठेवायचं.’ शांतपणे त्यानी चपला काढल्या, फाईल अन् लघवीची पिशवी मला धरायला दिली, गाऊन सावरला आणि डोळे मिटून, हात जोडून, अत्यंत भक्तिभावाने, मशीनवर  डोकं ठेवलं. 
‘चाफेकर, इथे डोकं ठेव म्हणजे नमस्कार नाही करायचाय, इथे डोकं ठेऊन झोपायचं.’ मी खुलासा केला.
ह्याच सीटी स्कॅन वेळच्या आजारातून चाफेकर बरा झाला आणि काही महिन्यातच पुतणीच्या लग्नाचं बोलावणं करायला आला. ‘आमी गरीब हाय हां डागदर, पण शादीला यांव हां.’ उर्दू मिश्रित हिंदी मजकुरातली, ‘जश्ने-शादी’ असं छापलेली, काबा, चांदतारा, ७८६ आणि उंटाचं चित्र असलेली एक पत्रिका, माझ्या हाती ठेऊन गेला. मी आवर्जून गेलो. गेल्यागेल्या मला बाजूला घेऊन गंगाजलाची एक सीलबंद बाटली त्याने मला दिली. नुकताच तो गावातल्या कुण्या शेटजीबरोबर, ड्रायव्हर म्हणून काशीपर्यंत जाऊन आला होता. तिथे त्या शेटजीबरोबर यानेही आपल्या दोन्ही भावांचं श्राद्ध घातलं होतं म्हणे! माझ्या चेहऱ्यावरचे भाव पाहताच, त्यानी लगेच एक्सप्लेनेशन दिलं, ‘दर्यात बॉड्या टाकल्या ना, मंगशी दिवस कसा करायचा त्ये काय हितल्या मुल्लाला नीट ठांव नव्हतां. तेनी तवा कायतरी आरदीवट केलांन. माजा मन काय भरलां नाय. काशीस कसा, त्यांशी समदा ठांव होतां. तवा मी बोल्लो हितं पुन्ना दिवस घालू. घातले! गुर्जी बोलला आता मुक्ती झाली. त्या गुर्जीनीच ही बोटल दिलीन. ठ्येवा.’ मुक्त झालेले हे चाफेकर बंधूचे आत्मे, आता  नेमके जन्नतमध्ये जाणार का काशीतील गुस्ताखीबद्दल जहान्नममध्ये, असा प्रश्न मला पडला. इतक्यात लग्नाचा मुहूर्त झाला. लग्न म्हणजे एक प्रकारच होता. तिथे स्वागताला दाराशी केळीचे खुंट होते, नवरा बायकोची हळद लावून झाली होती, मंगळसूत्र होतं, बूट पळवण्याचा कार्यक्रम होता, ‘कबूल, कबूल, कबूल’ होतं आणि भावभिनी बिदाई तर होतीच होती.
चाफेकरच्या कोणत्यातरी बापजाद्यानी, परिस्थितीच्या कोणत्यातरी रेट्यात धर्मांतर करून इस्लाम आपलासा केला होता हे उघड होतं. मला वाटायचं की एकदा विचारावं त्याला की, ‘तुझं आडनाव तर स्पष्ट सांगतंय की तुम्ही मूळचे हिंदू म्हणून, मग आता ‘दामोदर हरी’, ‘बाळकृष्ण हरी’ किंवा ‘शिवराम हरी’ वगैरे  ऐवजी, ‘दाउद रहीम’, ‘बशीर रहीम’ किंवा ‘सलीम रहीम’ असं नाव लावताना कसंसंच नाही का वाटत?’ पण अर्थातच मी हा प्रश्न विचारला नाही. झाडाफुलात, दगडधोंड्यात, समुद्रात आणि सीटी स्कॅन मशीनमध्ये देव पहाणारा, गंगेच्या किनारी मुक्ती शोधणारा हा माणूस; मला उगीच त्याला ओरखडा काढायचा नव्हता. तो जो होता त्यात तो सुखी होता. ‘दामोदर हरी’ काय किंवा ‘दाउद रहीम’ काय, त्याच्या आयुष्यात काडीचाही फरक पडणार नव्हता. माझ्याही आयुष्यात पडणार नव्हता. तो सह्याद्री लंघून अबीनकरांस दावायला येतच रहाणार होता आणि मीही सह्याद्री लंघून त्याच्याकडे जातच रहाणार होतो.


Monday, 21 August 2017

सीझर माझं कराल तर...!!!

सिझर माझं कराल तर...!!!!
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई
मो.क्र. ९८२२०१०३४९

बाकी सोशल मिडीयात लोक सीझरच्या वाढत्या प्रमाणाबद्दल काहीही बोलू देत, लिहू देत, पण डॉक्टर नको म्हणत असतानाही, ‘डॉक्टर, माझं सीझरच करा’ अश्याही मिनत्या वाढत चालल्या आहेत हे खरं.
शिक्षण संपता संपता, उद्योग-नोकरीत स्थिरावता स्थिरावता, लग्नालाच उशीर झालेला असतो. पुढे हनीमून आणि नव्याची नवलाई एन्जॉय करायला म्हणून काही दिवस प्लॅनिंग झालेलं असतं. झालंच मूल, तर सांभाळणार कोण? दोघंही नोकरी करणारे. दोन्ही सासवाही रिकाम्या नाहीत. सासरे रिकामे असले तरी अशा कामाचे नाहीत. अशी सगळी परिस्थिती असते. त्यात दिवस राहायला उशीर झालेला असतो, कधी कधी तर मोठ्या मुश्कीलीनी प्रेग्नन्सी साध्य होते. मग हे नवसाचं बाळंतपण सुरळीत होणं हे अगदी गरजेचं. सगळ्यांच्या रजा, सुट्ट्या, वेळा, सोयी हे बघून बाळानी जन्म घेणं अवघड. एवढं ते थोडंच समजूतदार असतं? तेंव्हा आपणच वेळ निवडलेली बरी. लोकांना आता अनिश्चिता सोसत नाही. तहान लागण्याआधी विहीरच काय, पण नळ जोडून वॉटर फिल्टरही तयार असतो आता. मग अशा मिनत्या सुरु होतात.
डिलिव्हरीच्या वेदना ही एक मोठी भीती असते. दुखतं खरच खूप. प्रचंड दुखतं. आयुष्यातला सगळ्यात वेदनादायी अनुभव. याची तुलना असह्य दातदुखी किंवा शरीरभर पसरलेल्या कॅन्सरची वेदना अशाशीच होऊ शकते. हे दुखणं कुणालाही नको असतं आता. सीझरचं प्रमाण वाढण्यामागे समाजाची ही कमी झालेली सहनशक्ती हे ही एक कारण आहे. कित्येक बायका तर नवऱ्याला आधीच पटवून ठेवतात, ‘मला दुखायला लागलं, की तू लगेचच सीझरचा आग्रह धर. कारण आई, सासूबाई कुण्णी कुण्णी माझं ऐकणार नाहीत.’ मग अशा मिनत्या सुरु होतात.
खरंतर वेदनारहित प्रसूती शक्य आहे. पण कोणी सहसा या भानगडीत पडत नाही. हे तंत्र जाणणारे डॉक्टर मुळात कमी आहेत. याचा खर्चही बराच आहे. शिवाय इतकं करूनही ऐन वेळी सीझर लागू शकतं ते शकतंच. त्याबद्दल कुणी काही सांगू शकत नाही. वेदना शमन तंत्रात त्या स्त्रीची बाळ बाहेर ढकलण्याची क्षमता मार खाते. त्यामुळे प्रसूती चिमटा लावून अथवा वाटी लावून करावी लागते. याचेही काही प्रॉब्लेम्स असतात.  थोडक्यात, धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी या तंत्राची अवस्था आहे. शिवाय समाजाची मानसिकता अशी आहे की; ‘काहीही बिन कष्टानी मिळालं की त्याची किंमत रहात नाही. तेंव्हा बाळसुद्धा जरा दुखून-खुपून झालं की आईला त्याची किंमत कळते. मगच ती नीट काळजी घेते!’, असा प्रवाद आहे.
कुठल्याही प्रकारची जोखीम कुणालाही नको असते. दिवस वर गेलेले असताना, पाणी जेमतेम असताना, आधीचं सीझर असताना, जुळी असताना, बाळाचं वजन किंवा वय किंवा दोन्हीही भरत नसताना, नैसर्गिक प्रसूती होऊ देणे हे जोखमीचं असतंच असतं. कित्येकदा डॉक्टरांसाठी हे असलं बाळंतपण, सीझरपेक्षा जास्त कौशल्याचं असतं. असा प्रयत्न करणं म्हणजे दोरीवरून चालण्यासारखं आहे. कधी तोल जाईल ते सांगता येत नाही. सीझर करा म्हणावं तर अनावश्यक सीझरचा आरोप होतो. काही प्रॉब्लेम झाल्यावर, ऐन वेळी करा म्हणावं तर, ‘आधीच का नाही केलं?’ असा शहाजोग प्रश्न येतो. वास्तविक डॉक्टरचं काम केवळ सल्ला देण्याचं आहे. निर्णय घेण्याची जबाबदारी त्या त्या पेशंटची आहे. हे वैद्यकीचं एक महत्वाचं तत्व आहे. व्यवहारात असं होत नाही. ‘आता तुमच्याकडे आणून टाकलंय डॉक्टर, आता तुम्हीच काय ते बघा’, असा सोयीचा आग्रह असतो. निर्णय घेण्याची आणि त्याच्या भल्याबुऱ्या परिणामांची जबाबदारी स्वतः स्वीकारण्याची मानसिकता अजिबात असत नाही. बरेचदा  यातल्या जोखमीची कल्पना नातेवाईक करू शकत  नाहीत. तो त्यांचा प्रांत नसतो. अशा अति-जोखमीच्या बाळंतपणात इतका वेळ आणि इतक्या काळजीपूर्वक आईकडे आणि बाळाकडे लक्ष द्यावं लागतं, की ते छोटया दवाखान्याच्या ताकदी बाहेरचं असतं. डिलिव्हरीला कधी चार तास लागतील तर कधी चोवीस. इतका वेळ पेशंटच्या उशा पायथ्याशी थांबायला तिथे कुणाला शक्य नसतं आणि तेवढं मनुष्यबळही नसतं. इतकं करूनही शेवटी आउटकम् महत्वाचा. आई किंवा बाळाला कोणत्याही कारणानी काहीही त्रास झाला तर कोणी समजावून घेण्याच्या मनःस्थितीत नसतं. प्रामाणिक प्रयत्नांचं कौतुक विसराच, थेट खळ्ळख्टॅक!! जोखीम स्वीकारण्यात निव्वळ मोठ्या बक्षिसाची आशा धरून कसं चालेल? नुकसानीचीही शक्यता असते. हे मान्यच नसतं कुणाला. प्रत्येकाला १००% ग्यारंटीशीर रिझल्ट हवा असतो. टिकल्या, पिना, क्लिपा विकणाऱ्या दुकानात पाटी असते, ‘फैशनकी इस दुनिया में ग्यारंटीकी अपेक्षा न करें’. इथे तर कितीतरी अज्ञात घटक. तेंव्हा अपेशाची थोडीफार शक्यता गृहित धरायला हवी. नॉर्मलचा प्रयत्न करताना त्यातले धोकेच फक्त वजा करा, असं नाही करता येत. इथे समाज वाल्याच्या बायकोच्या भूमिकेत असतो. वाल्याच्या उद्योगातला सुखाचा वाटा सर्वांना हवा असतो त्यातली जोखीम आणि वाईटाचा धनी तो एकटा. मग अशा वेळी तारेवरून चालण्यापेक्षा थेट सीझरचा सल्ला दिला जातो.
सीझरमधेही धोके असतात की. भूल देण्यात, ऑपरेशन करण्यात, ती जखम... नंतरची विश्रांती... पण आज वैद्यकीच्या प्रचंड प्रगतीमुळे हे धोके खूप खूप कमी झाले आहेत. पूर्वी अगदी आईचे प्राण कंठाशी आले की मगच सीझरचा निर्णय घेतला जायचा. कारण सीझर करण्यामुळेही प्राण कंठाशीच यायचे. आता तसं नाही. भुलीची पद्धत पूर्वीपेक्षा खूप सुधारली आहे. ऑपरेशनचं तंत्रही बदललं आहे.
आणखी एक घटक आहे. कमी वजनाच्या, कमी दिवसाच्या बाळाची काळजी घेण्याचं शास्त्र आता आरपार बदललं आहे. अगदी ६००-७०० ग्रॅम वजनाची बाळंही जगवता येतात. जगवली जातात. अशी कामगिरी ही आता वैद्यकविश्वात तरी ‘बातमी’ राहिलेली नाही. पूर्वी असं नव्हतं. १५००-१८०० ग्रॅमचं बाळही जगणं मुश्कील अशी स्थिती होती. मग असल्या बाळांच्या, आयांची सीझरही होत नव्हती. त्यांची बाळंतपणं ‘नॉर्मल’च व्हायची. बाळ जगलं तर आपलं, नाही तर देवाचं. बाळं नॉर्मल होत होती, गुदमरत होती, तडफडत होती, मरत होती किंवा अर्धमेली जगत होती. तक्रारीचा प्रश्नच नव्हता. ‘जाउ दे, नव्हतं आपल्या नशिबी’, असं म्हणून लोकं पुढच्या बाळंतपणाच्या तयारीला लागत होती. आता असं कोणी करत नाही.
बाळ झालं की पाचव्या दिवशी पूजा करायची प्रथा निर्माण झाली. हा फार महत्वाचा दिवस. पाचव्या दिवशी सटवाई येते आणि बाळाच्या भाळावर भविष्य लिहून जाते. ही प्रथा आपल्या समाजात कशी बरं रुजली असेल? जर सटवाई पाचव्या दिवशी भविष्य लिहीते, तर पहिले पाच दिवस काय होतं? उघडच आहे, पहिले पाच दिवस बाळाला  मुळी भविष्यच नसतं! थोडक्यात ही प्रथा अशा एका समाजात निर्माण झाली आहे जिथे पहिले पाच दिवस त्या बाळाचं भविष्य त्या समाजाच्या देवदेवतांना सुद्धा सांगता यायचं नाही. या समाजात नवजात अर्भकं पटापट मरत असणार. या समाजानं मुळी मान्यच केलं होतं की पाचच्या पुढे जगलं, तगलं, तरच ते मूल आपलं, अन्यथा नाही.

बाळ अशक्त (SGA), आजारी (Sick), उपाशी (Hypoglycemic), कुपोषित (IUGR), सव्यंग (Anomalous), गुदमरलेलं (Hypoxic-Acidotic) असं असेल तर आता बऱ्याच वेळा आधीच समजतं. ही सारी रंगीत सोनोग्राफीची किमया. पूर्वी ह्या साऱ्यांच निदान बाळ जन्मल्यानंतर व्हायचं. ह्या भानगडीत बरीचशी तान्ही योग्य निदान-उपचारपूर्वी मरायची.
मुळातच तोळा मासा प्रकृती असलेल्या अशा बाळाला बाळंतपण सोसत नाही, सबब सीझर करावं लागतं. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल पण आईला जशा बाळंतपणाच्या वेणा सहन कराव्या लागतात तशा त्या बाळालाही सहन कराव्या लागतात. प्रत्येक कळेवेळी, गर्भपिशवीचा रक्तपुरवठा काही काळ कमी होतो. जे मिळेल तेवढ्यात बाळाला भागवावं लागतं. धडधाकट बाळांना हे जमतं. आजारी बाळांना हे खूप धोक्याचं ठरतं. याचाही विचार करावा लागतो. यामुळेही सीझरचं प्रमाण वाढलं आहे.
उत्तम भूल, उत्तम शल्यतंत्र आणि उत्तम नवजात आरोग्य सेवा यांच्या परिणामी सीझरचं प्रमाण वाढलं आहे.
याचा अर्थ प्रत्येक पेशंटचं सिझरच करावं लागेल असा नाही किंवा केलेलं प्रत्येक सीझर हे आवश्यकच होतं असाही नाही. एखाद्या तातडीनं केल्या जाणाऱ्या जीवरक्षक ऑपरेशनची निकड होती का नाही, हे आपण लांबून काय सांगणार? हे तज्ञांचंच काम. कोणत्याही मोठया दवाखान्यात सीझरचं ‘ऑडीट’ होत असतं. म्हणजे वेळोवेळी झालेले निर्णय हे योग्य निकष वापरून, पूर्वनिश्चित प्रॉटोकॉल वापरून झालेत की नाहीत हे तपासलं जातं. यानुसार निर्णय असेल तर तो योग्य मानला जातो. अशी व्यवस्था अधिक व्यापक प्रमाणात अंमलात आणली तर यावर काही तरी अंकुश राहील. अन्यथा पेशंट आणि डॉक्टर एकमेकाला दोष तेवढे देत बसतील. केलं, तर ‘का केलं?’ आणि नाही केलं तर, ‘का नाही केलं?’ अशी सरबत्ती चालू राहील;  आणि वातावरण बिघडण्याशिवाय काहीही निष्पन्न होणार नाही.
शेवटी सीझरच्या एका जगावेगळ्या फायद्याबद्दल सांगतो आणि थांबतो. मानवी मेंदू हा मानवाच्या उत्क्रांतीचा वाहक ठरला आहे. अंगी शक्ती नसताना जगण्याच्या स्पर्धेत इतर प्राण्यांच्या मागे टाकत मनुष्यप्राण्याने जग पादाक्रांत केलं ते युक्तीच्या बळावर, मेंदूच्या बळावर. मेंदूचा आकार हा डोक्याच्या आकारावर अवलंबून आहे... आणि डोक्याचा आकार हा आईच्या कटीच्या आकारावर अवलंबून आहे. आपोआप, निसर्गतः प्रसूत व्हायचं तर बाळाचं डोकं मोठं असून भागणार नाही. प्रसूती होणार नाही. ती बाई अडेल आणि मरेल आणि तिचा वंशच्छेद होईल. हा निसर्ग नियम. त्यामुळे ठराविक मापापेक्षा जास्त मोठ्या डोक्याची संतती निपजू शकत नाही. मानवी डोक्याच्या (आणि मेंदूच्याही) आकाराला ही नैसर्गिक मर्यादा आहे. आईचा कटीभागही फार विस्तारू शकत नाही. शेवटी दोन पायावर तोल सांभाळायचा तर कंबर अति रुंद असून चालणार नाही.
आता सीझरचा शोध लागला आहे. आता सीझरच सीझर होताहेत. मोठया मोठया डोक्याची बाळं आणि त्यांच्या आया जगताहेत. निसर्गनियमा विरुद्ध जगताहेत. अशांची संततीही अधिकाधिक मोठया डोक्याची असणार आहे. परिणामी मेंदूला कवटीत अधिकाधिक जागा मिळणार आहे, परिणामी माणूस अधिकाधिक बुद्धिमान होणार आहे...!!!??? सीझरची भलावण करणारा किंवा त्याचे दूरगामी परिणाम असेही असतील असं सांगणारा हा ही एक युक्तीवाद आहे.
डॉ. शंतनू अभ्यंकर
मो.क्र. 9822010349
या आणि अशाच अन्य लिखाणासाठी माझा ब्लॉग जरूर वाचा

<shantanuabhyankar.blogspot.in>

Monday, 15 May 2017

दोन पत्रं

दोन पत्र


विख्यात अभिनेते, डॉ. गिरीश ओक माझे मित्र. एका कार्यक्रमासाठी त्यांनी दोन पत्रं लिहून मागितली, एक पेशंटनी डॉक्टरना लिहीलेलं आणि दुसरं त्याचं डॉक्टरनी दिलेलं उत्तर. सद्यस्थितीत दोन्ही बाजूनी विचार करून समतोल पण तरीही अर्थपूर्ण असं काही तरी मी खरडलंय असं आपलं मला वाटतं. सोबतची पत्र वाचा आणि तुमचं काय मत ते जरून नोंदवा???

महोदय,
बरेच दिवस लिहायचं मनात होतं. आज हिय्या करून पेन सरसावलं आहे. मनात आहे ते थेट सांगतो, रागावू नका, गोड मानून घ्या. शेवटी तुकारामांनी म्हटलेलंच आहे, ‘निंदकाचे घर असावे शेजारी’.
तसं माझं तुमचं काही वैर नाही. पण दरवेळी तुमच्याकडे आलो की पोटात गोळा ठरलेला. आता हा गोळा मोठा मोठा व्हायला लागला आहे. भीती अशी की आता हा कसाई आपल्याला कसा कसा कापतोय? कसा कसा नागवतोय? आपण तर आजारी, संपूर्ण परावलंबी, डॉक्टरशिवाय चालणार तर नाही पण जावं डॉक्टरकडे तर विश्वसनीय ठिकाण नाही. आपलं भलंच होईल या खात्रीऐवजी आपलं भलतंच होईल ही शंका आता कुरतडू लागते.
काय काय ऐकतो आम्ही, कट प्रॅक्टिस करणं प्रत्येकालाच भाग आहे म्हणे आता, खोट्या खोट्या तपासण्या, अनावश्यक ऑपरेशन, अनावश्यक औषधे, त्यातला कट, तपासणीच्या अव्वाच्या सवा फिया, पैसे देऊन विकत घेतलेले डॉक्टरकीचं शिक्षण, मृतालाही व्हेंटिलेंटर लावून मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे प्रकार सर्रास सुरु असल्याचं ऐकतो... आणि माझा माझ्याच कानावर विश्वास बसत नाही.
पूर्वी आमचे फॅमिली डॉक्टर होते त्यांनी सांगितलेले आम्ही मुकाट ऐकायचो आणी आमचे कधीही वाईट झाले नाही.
फसवणूक तर पदोपदी वाट्याला येते, प्रत्येक क्षेत्रात येते, पण कधी बिल्डरच्या ऑफिसच्या काचा फुटल्याचं ऐकलं नाही. असं कसं? स्वस्त औषधे लिहून द्यायला डॉक्टर टाळाटाळ का करतात? अत्यवस्थ पेशंटला उपचारापूर्वी पैसे का भरावे लागतात? लाखोंची बिलं भरून सुद्धा पेशंट दगावला तर जबाबदार कोण? किरकोळ तक्रारींसाठी तपासण्यांचं मारूतीचं शेपूट का लावलं जातं? दोन डॉक्टरची मतं अजिबात जुळत नाहीत, उलट नेमकी विरुद्ध पडतात, असं कसं? एखाद्या हॉस्पिटलमधे केलेली तपासणी ही दुसऱ्या ठिकाणी नापास का होते? पुन्हा पहिल्यापासून तपासण्या का करायला लावतात? सर्वच डॉक्टर इतके बिझी कसे असतात? कोणालाच ऐकायला, बोलायला, समजावून सांगायला वेळ नसतो, प्रश्न विचारले की नाखूष, असं कसं? इतका सगळा गदारोळ होऊनही डॉक्टरच्या संघटना या गैरप्रकारांबद्दल अगदी क्षीण आवाजात का बोलतात?
मी काही कुणावर वैयक्तिक आरोप करत नाही, पण आम्हाला स्वस्त, खात्रीपूर्वक आरोग्यसेवा मिळण्यासाठी काय करायला पाहिजे? डोनेशनोत्पन्न डॉक्टरांच्या ह्या भाऊगर्दीत चांगला डॉक्टर ओळखायचा कसा?
शेवटी एकच प्रश्न, डॉक्टर तुम्ही आजारी पडलात तर हीच व्यवस्था तुमच्याही वाट्याला येणार आहे याची भीती नाही का वाटत तुम्हाला?
तुमचा
एक पेशंट






आ. पेशंटसाहेब,
स. न.
तुम्ही मोकळेपणानी लिहिलंत हे बरं झालं. तुमचा युक्तीवाद थोडा विस्कळीत आहे, पण असो. एकूणच पेशंटनी वैतागून एकामागून एक तक्रारी सांगत जाव्यात आणि डॉक्टरनी त्या ऐकता ऐकताच त्यांची मनातल्या मनातल्या संगती लावावी तसं काहीसं वाटलं मला हे.
प्रथमच सांगतो की तुमच्या तक्रारी, आरोप हे काही प्रमाणात मान्यच आहेत. हे सत्यच आहे. तुम्ही लिहिलंय त्यात अतिशयोक्ती आहे, गैरसमज आहेत पण हा तुमचा दोष आहे असं मी म्हणणार नाही. उलट तुम्ही तक्रारींचा पाढा वाचला आहे आता योग्य निदान आणि उपचाराची योजना मी सुचवायची आहे.
लक्षात घ्या, मी ‘सुचवायची आहे’ असं म्हणतोय. करायची आहे असं नाही. मी सुचवलेले उपाय स्वीकारायचे किंवा नाही, हा पूर्णपणे तुमचा अधिकार आहे; आणि इथे सर्व सिस्टीमच पेशंट आहे. याला उत्तर राजकीय, सामाजिक, आर्थिक, नियोजन, इंस्युरंन्स असं अनेक कलमी आहे.
सगळ्यात महत्वाचं, आणि हे तुम्हालाही मान्य असेल, की डॉक्टरवर हल्ले करून, दवाखाने जाळून प्रश्न नक्की सुटणार नाही. तुमचा राग थोडा शमेल पण यांनी वातावरण आणखी बिघडेल. ज्या कुणा पेशंटची जी काही तक्रार आहे, ती सांगायची, सोडवायची, त्याचा न्याय करायची यंत्रणा आपल्याकडे खूप जुजबी आहे, वेळकाढू आहे आणि त्यामुळे अशा यंत्रणांना सध्यातरी अजिबात विश्वासार्हता नाही. कायदा हा प्रश्न नीट हाताळत नाही म्हणुनच तर लोक कायदा हातात घेतात. खरी मेख इथे आहे. तक्रारीची योग्य दखल घेतली जात असती तर तुम्ही तरी ‘मला’ कशाला पत्र लिहीलं असतंत; थेट संबंधित अधिकाऱ्यालाच लिहीलं असतंत ना!
एकेकट्या डॉक्टरनी चालवायच्या लहान दवाखान्यांचे दिवस आता भरले आहेत. सतत खळ्ळ-खटॅकच्या छायेत रहाणं अवघड अवघड होत चाललं आहे. बिलात लवचिकता आणि घराजवळ, तुलनेने स्वस्त सेवा  हे या दवाखान्यांचे गुण; पण उपचार आणि बिलातील अपारदर्शकता आणि मोजक्याच प्रकारच्या सेवा हे यांचे तोटे. अशा छोटया दवाखान्यात तुम्ही अमक्या अमक्या डॉक्टरसाठी म्हणून जाता. पण हे बदलत चाललं आहे. अनेक डॉक्टरनी आणि व्यवस्थापनतज्ञांनी  एकत्र येऊन मोठे मोठे दवाखाने व्यावसायिक पद्धतीनी चालवणं ही आता काळाची गरज आहे. इथे हॉस्पिटलला नाव आहे चेहरा आहे, डॉक्टरला अजिबात नाही.
तपासण्यांचे, उपचारांचे, स्टॅण्डर्डायझेशन होणे महत्वाचे आहे. लॅबोरेटरी क्षेत्रात हे आजही काही ठिकाणी झालं आहे. उपचाराच्या क्षेत्रात खूप मोठया प्रमाणावर व्हायला पाहिजे. उपचार हे पूर्वनिश्चित प्रोटोकॉलवर आधारित हवेत. तरच त्यातल्या त्रुटींचा उहापोह होऊ शकतो. हे काम सरकार आणि तज्ञांच्या संघटना असं दोघांनी मिळून करायचं आहे.
तपासण्या आणि उपचारांच्या रास्त किमतीचेही प्रमाणीकरण व्हायला हवे. ह्या साऱ्यातील तफावतीबद्दलच्या तुमच्या तक्रारींचं उत्तर हे आहे.
डॉक्टरनी प्रत्येकाचा आणि प्रत्येकाच्या प्रत्येक नातेवाईकाचा, प्रत्येक प्रश्न, हा तात्काळ झेलला पाहिजे ही अपेक्षा चुकीची आहे. अशा प्रश्नांच्या सरबत्तीला तोंड द्यायला, खरंतर प्रत्येक डॉक्टरला अनेक उप-डॉक्टरांची गरज असते. परदेशात त्या त्या क्षेत्रातल्या तज्ञ नर्सेस हे काम सांभाळतात. आपल्याकडे परिस्थिती अशी आहे की इथे डॉक्टर जास्त आणि नर्सेस कमी आहेत. संवादाचा अभाव उद्भवतो तो यामुळे. पुढे त्याचा विसंवाद आणि वाद व्हायला मग कितीसा वेळ? खूप मोठ्या प्रमाणावर समुपदेशकांची फौज लागणार आहे आपल्याला. डॉक्टरनी सुचवलेले उपचार आणि व्यवहार यांची सांगड घालायला हे आवश्यक आहे.
सार्वजनिक आरोग्यसेवा ही खूप खूप सुधारायला हवी. खाजगी हॉस्पिटलना चॅलेन्ज अशी तोलामोलाची असायला हवी. सरकारी दवाखाने हे सर्वदूर आहेत, फुकट आहेत पण अनास्थेनी त्यांचा कणाच मोडला आहे. तिथे अजून भरपूर पैसा ओतायला हवा, भरपूर स्टाफ हवा, साधन सामुग्री हवी, त्याशिवाय हे सत्र थांबणार नाही. वजनदार राजकीय नेत्यांनाही माझं सांगणं आहे की उगाच अमक्याचं बील कमी करा, तमक्याचं ऑपरेशन फुकट करा असली समाजसेवा कुचकामी आहे. वैयक्तिक संबंधांपोटी एखाद्या पेशंटवर खूष होऊन तुम्ही त्याला मदत करता, याला सरंजामशाहीचा, दौलतजादा केल्याचा वास येतो. तुमचं काम सार्वजनिक आरोग्यव्यवस्था सक्षम कशी होईल हे पहाणं आहे, याकडे लक्ष पुरवलं तर आणखी अनेकांचं भलं होईल.
तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरचा उल्लेख केला आहे. फॅमिली डॉक्टर ही किती उपयुक्त आणि चांगली संस्था होती असं स्मरणरंजन सगळ्यानाच भावतं. लोक मग आपापल्या फॅमिली डॉक्टरच्या नावे कढ काढतात. एका संथ, स्वस्त आणि वैद्यकविश्वावर विश्वास असणाऱ्या जीवनशैलीचा परिणाम म्हणून ती संस्था उत्क्रांत झाली होती. अशी रचना डॉक्टरांनी किंवा समाजानी जाणीवपूर्वक तयार केली नव्हती. जीवनशैली बदलली, विद्युतगती, अवास्तव अपेक्षा आणि फट् म्हणता निष्काळजीपणाचा आरोप होण्याची शक्यता अशा वातावरणात फॅमिली डॉक्टर ही संस्था लयास गेली यात नवल ते कसलं? हा मुक्काम सोडून आता बराच काळ लोटला आहे पेशंट साहेब; आता तर तुम्ही स्वतःला ग्राहक आणि आम्हाला विक्रेते ठरवूनही बरीच वर्ष झाली. ह्या मुक्कामी आता पुन्हा जाता येणार नाही.
तुम्ही स्वस्त औषधांचा उल्लेख केलात ते बरं झालं. औषधांच्या किमती आणि दर्जा ह्या दोन्हीची जबाबदारी सरकारची आहे, या बाबत निव्वळ तोंडदेखले उपाय करून डॉक्टरच्याकडे बोट दाखवणं हा अप्रमाणिकपणा आहे, हा झटपट लोकप्रियतेचा मार्ग आहे. यांनी तेवढंच होईल, लोकप्रियता मिळेल, पण समाजमन आणखी गढूळलं जाईल, औषधं स्वस्त होणार नाहीत; याच काय? उलट, किंमत आणि दर्जा सांभाळणारी यंत्रणा सक्षम  केली तर सर्वदूर तत्काळ आणि दीर्घकालीन परिणाम दिसेल.
जीवनशैली बदलली असं आपण सारेच मान्य करतो पण त्याबरोबर मरणशैलीही बदलली आहे त्याचं काय? आज माणसं तेराव्याच्या खर्चाची काळजी करत नाहीत, आयसीयुच्या खर्चाची करतात. ‘अरे जगणं मरणं एका श्वासाच अंतर’, असं बहिणाबाईंनी म्हटलय; पण आता तसं राहिलेलं नाही, मधे व्हेन्टीलेटर आहे, अॅन्जिओग्राफी आहे, अॅन्जिओप्लास्टी आहे, पेसमेकर आहे, डायेलीसीस आहे... अगदी अवयव-दानही आहे. अशा परिस्थितीत शेवटच्या आजारपणाचा खर्च हा फुगत जाणार हे उघड आहे. त्याचं नियोजन करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मृत्यू ही कितीही हृदयद्रावक घटना असली तरी तो येण्यापूर्वी केलेल्या धडपडीचं काही तरी मोल असणारच की, ते कोणी तरी भरावं लागणारच की.
चांगला डॉक्टर कसा ओळखायचा हे मलाही सांगता येणं अवघड आहे. पण मी म्हणीन की स्वतःचे ज्ञान जो अद्यावत ठेवतो, उपचारांच्या यशाबरोबर जो अपयशाचीही चर्चा करतो, यशापयशाची आकडेवारी सांगतो, अन्य कुणाचाही सल्ला घ्यायला मदतच करतो... असा कदाचित चांगला असू शकेल. चांगला रिक्षावाला किंवा चांगला बिल्डर किंवा वकील कसा ओळखावा असं मी तुम्हाला विचारलं तर?
तुमचा शेवटचा प्रश्न मात्र मलाही बुचकळ्यात टाकणारा आहे. ह्याच सिस्टीममधून मलाही जावं लागेल ही भीतीही आहेच की. त्यावर अर्थात ताबडतोब उपाय नाही. सिस्टीम बदलण्याचा प्रयत्न करणं आणि आजही जे उत्तम काम करत आहेत त्याचं कौतुक करणं, त्यांना प्रोत्साहन देणं, आजच्या ह्या सोहळ्यासारखे देखणे समारंभ घडवून आणणं एवढं तर आपण नक्कीच करू शकतो.
तुमचा
एक प्रामाणिक डॉक्टर