Showing posts with label बाळंतपण. Show all posts
Showing posts with label बाळंतपण. Show all posts

Wednesday, 13 May 2020

ज्युलिअस आणि सीझर

ज्युलिअस आणि सीझर

डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई

ज्युलिअसही सीझर आणि ते जगप्रसिद्ध ऑपरेशनही सीझर; मग त्यांचा एकमेकांची संबंध असावा काय? दंतकथा फक्त उपलब्ध आहेत. या ज्युलिअस सीझरच्या कोण्या बापजाद्याचा जन्म ‘सीझर’ने झाला होता. म्हणून याला त्या आज्याचं नाव ठेवलं म्हणे. आणि म्हणूनच ऑपरेशनचे नावही सीझर.  काही असंही सांगतात की याचा स्वतःचाच जन्म मुळी यौनमार्गे न होता,  उदरमार्गे झाला होता. पण कोणीच यावर विश्वास ठेवत नाही. कारण असं की याची आई पुढे बरीच वर्ष हयात असल्याचा पुरावा आहे!! ज्या बाईचे पोट फाडून बाळ जन्माला आणलंय, अशी जननी तात्काळ जन्मभूमीतच   चिरनिद्रा घेत असे.  असा तो काळ होता. पोट फाडून बाळ काढलं तर आई मरायलाच हवी! ...आणि ज्युलिअस सीझरची आई तर पुढे बराच काळ होती, म्हणजे ज्युलिअसचा जन्म सीझरद्वारे झालेला नाही!!

इतक्या टोकाच्या परिस्थितीत हे ऑपरेशन केलं जायचं. अर्थात निर्जंतुकीकरण, भूल, प्रतिजैविके, रक्त वगैरे काही काही नसताना दुसरं काय होणार? सगळं काही राम भरोसे. किंवा जो कोणी तारणहार देव किंवा संत  असेल त्याच्या भरोसे. आपल्याकडे जशा धनाची, धान्याची, शक्तीची, युक्तीची अशा वेगवेगळ्या देवता आहेत तसे ख्रिश्चन धर्मात विविध संत आहेत. फक्त आकाशातल्या एकट्यादुकट्या  बापावर त्यांचेही भागत नाहीच.  संत सीझेरीअस  नामे निव्वळ सिझरवेळी आळवायचा खास संत आहे. याला नमोनमः केल्याने सीझर सुखरूप पार पडते म्हणतात. 

उदरी बाळ तसेच असताना दोघांना एकदम माती देऊ नये असा संकेत होता जुन्यापुराण्या काळात. त्यातून पोट फाडून बाळ काढायला सुरवात झाली. पुढे आई मरायला टेकली आहे किंवा मेलीच आहे  आणि बाळ मात्र तग धरून आहे अशा वेळी हा प्रकार केला जायचा. एक अखेरचा प्रयत्न फक्त.  हे नेमकं कसं करावं याचं तंत्रही सर्वज्ञात नव्हते. कसे असेल? मेडिकल कॉलेज वगैरे काही नव्हते त्यावेळी. काही  धाडसी, उत्साही महाभाग काळजावर दगड ठेउनच हे काम उरकायचे. पोट फाडा, बाळ काढा आणि पोट शिवा अशा तीनच पायऱ्यांचे हे ऑपरेशन. पोट उघडण्याची शास्त्रशुद्ध पद्धत; थराखाली थर उघडत जाणे, कमीतकमी रक्तवाहिन्या आडव्या येतील अशा मार्गाने आत शिरणे; वगैरे प्रकार नंतर आले. पोट शिवायचे तेही दाभणाने! भूलबील नव्हतीच. ती बाई इतकी अर्धमेली झालेली असायची की मुळात तीच अर्धवट बेशुद्धावस्थेत असायची. मग वेगळी भूल कशाला? टाके घालून फक्त पोटाची त्वचा शिवली जायची. याहून अधिक काही शिवायला वेळही नसायचा आणि काळ तर शेजारीच आ वासून उभा असायचा. टाकेही केवळ बाहेर घातले जात. कारण आत टाके घातले तर काढायचे कसे हा प्रश्न होता. आज आम्ही सीझर करताना आठ थर उघडतो आणि तितकेच पुन्हा शिवून टाकतो! आमच्या हाताशी पोटातल्या पोटात विरघळणारे धागेदोरे आहेत. आमचे पूर्वसुरी सुताचे किंवा तागाचे धागे वापरत. सगळे टाके कुजत. पण गर्भपिशवी टाके न घालता तशीच सोडून दिली तर आतल्या आत प्रचंड रक्तस्राव व्हायचा. हे  टाळण्यासाठी एद्युअर्दो पोरोनी  तर थेट पिशवीच छाटून टाकायचा प्रयोगही करून पहिला. पण व्यर्थ.  यातून ती निभावून गेलीच तर जखमांत पू व्हायचा.  आधीच अर्धमेली झालेली ती यात बहुतेकदा पूर्ण मरायची. पुढे केहरर आणि सँगर प्रभृतींनी पिशवीला टाके घालायचे तंत्र विकसित केले आणि जरा जास्त बायका जगायला लागल्या.

ही शस्त्रक्रिया काही फक्त युरोपमधले हुशार लोकंच करत होते असं नाही. पण युरोपमधल्या हुशार लोकांचा तसा गैरसमज मात्र होता. अगदी आफ्रिकेतील आदिम जमातींनीसुद्धा असे प्रयत्न केल्याचे पुरावे आहेत. अर्थात अपयशाची रड सगळीकडे सारखीच. सीझरविषयक भारतीय दंतकथाही आहे. ‘प्लॅस्टिक सर्जरी’चा शोध आपल्याला लागल्याचा पुरावा आहेच; त्यापुढे सीझरची काय कथा?  चंद्रगुप्ताचा मुलगा, बिंदुसाराचा जन्म म्हणे उदरभेद पद्धतीने झाला होता आणि हे कर्म उरकलं होतं, भेदनीतीचा जनक आर्य चाणाक्याने; असं म्हणतात. बिंदुसाराच्या आईने, दुर्धरेने एकदा पतीच्या पानातील अन्न खाल्ले. चंद्रगुप्ताला कोणतीही विषबाधा होऊ नये म्हणून चाणक्य म्हणे त्याच्या अन्नात रोज थोडं थोडं विष कालवायचा. हळू हळू चंद्रगुप्त जास्त जास्त विष विनासायास पचवू लागला. दुर्धरेला याचा पत्ताच नव्हता. त्यामुळे तिला बिचारीला ते विष बाधलं आणि पार मरणपंथाला लागली ती. नेमकं चाणाक्याने हे पाहिलं आणि काय होतंय ते त्या चाणाक्षाच्या लगेचच लक्षात आलं. तात्काळ त्याने पोट फाडून बिंदुसाराला आईवेगळे केले. दुर्धरा गेली पण बिंदुसार वाचला! अशीच काहीशी कथा इराणचा पुराणपुरुष रुस्तम याच्याही बद्दल आहे. आयर्लंडच्या उलस्टर पुराणात फारबीद फरबेंड बद्दलही आहे. ज्यूंच्या ‘ताल्मूद’ या प्राचीन ग्रंथातही आहे. इतकंच कशाला, ‘एलिअन व्हर्सेस प्रीडेटर’ या आधुनिक पुराणात तर ‘एलिअन’ बीज आईच्या तोंडातून पोटात जातं, काही क्षणात वाढतं आणि आणि पोट फाडून जन्म घेतं!! बघावा तो महापुरुष आपला आईचे पोट फाडूनच अवनीवर अवतार घेता झालेला दिसतो. पूर्वीपेक्षा आता सीझरचं प्रमाण कितीतरी वाढलं आहे पण महापुरुषांचे प्रमाण काही तितकेसे वाढलेले दिसत नाही.

स्विझरलँण्डमधील जेकब न्युफरची बायको यातून बचावल्याची नोंद आहे. जगलेली आणि आपल्याला ज्ञात असलेली ही पहिली. हिच्या पतीनीच ऐनवेळी सीझर करून हिला सोडवली. तो होता डुक्कर-कसाई. त्यामुळे त्याला शरीररचनेचं थोडंबहुत ज्ञान होतं, म्हणून त्याच्या हातून जरा सबुरीनी, निटसपणे  आणि नेकीनी  ते ऑपरेशन झालं असावं आणि म्हणून सौ. न्युफर वाचली; असा आपला एक तर्क. नाहीतर जेकबवर ‘विधुरव्या’ची कुऱ्हाड कोसळलीच असती. वराह विच्छेदनात तरबेज असल्यामुळे त्याला बाईचे अंतरंग कळले असं मी सुचवलंय खरं, पण कुणी राग मानू नये. सर्व सस्तन प्राण्यांची शरीररचना साधारण एकसारखीच असते, एवढंच सुचवायचंय मला. नाहीतर ती बाई वाचलीच कशी हा प्रश्न निरुत्तर करणारा! पण ही बाई नुसती वाचलीच नाही तर पुढे पाच पोरांना जन्म दिला तिनी. धन्य ती बाई आणि धन्य तिची ती कूस!!

पुढे शरीररचनेच्या अभ्यासासाठी  शवविच्छेदन युरोपमान्य झालं आणि स्वतःच्या शरीराची ओळख झाली माणसाला. भुलीच्या शोधानी तर क्रांतीच केली. त्यामुळे उदरभेद, गर्भाशय छेद, प्रसूती आणि सर्व थरांना टाके घालत घालत ऑपरेशनची सांगता हे सारं शक्य झालं. हातपाय झाडत किंचाळणाऱ्या बाईचे सीझर करणे किती  कठीण असेल याची कल्पनाच केलेली बरी.

पण कल्पना कशाला, त्या काळच्या सर्जरीची  दारूण परिस्थिती अनेकांनी लिहून ठेवली आहे. पायाला गॅस-गँग्रीन झालं म्हणून एका माणसाचा पाय तोडायचा होता. नाहीतर तो शंभर टक्के मरणार. चौकात हीsss गर्दी जमली. चिक्क्क्कार दारू पाजून त्या माणसाला ‘आउट’ करण्यात आलं. आपली कुऱ्हाड परजत मग सर्जन आले. सिंहाच्या काळजाच्या  चार माणसांनी त्या माणसाला, आपल्या पोलादी पंजांनी जखडून ठेवलं आणि पहाणाऱ्या गर्दीच्या डोळ्याचे पाते लवते न लवते, तोच एका घावात त्याच्या पायाचे दोन तुकडे केले गेले. पण त्या माणसाला धोधो रक्तस्राव झाला आणि तो तिथल्यातिथे गेला! हे पाहून गर्दीतला एकजण भोवळ येऊन पडला आणि तत्काळ गतप्राण झाला आणि ह्या कुऱ्हाडीचे पाते कुणा असिस्टंटास चाटून गेल्याने पुढे गॅस-गँग्रीन होऊन तोही मेला!! एकाच ऑपरेशनचा ३००% मृत्यूदर झाला की हा!!!  थोडक्यात रम्य भूतकाळाच्या नावाने, ‘गेले ते दिन गेले’ असे उसासे टाकणाऱ्यांनी स्वतःच्या भूमिकेचा पुनर्विचार करावा. असो.

अगदी १८७० पर्यंत ही शस्त्रक्रिया अंदाजानी केली जायची, तंत्रशुद्ध अशी तत्वे अजून ठरायची होती. बेंबीपासून खाली पोट उभे उघडून, गर्भपिशवीही उभीच छेदली जायची. आता दोन्ही छेद आडवे असतात. हे जरा करायला किचकट आहे पण उभे चिरण्यापेक्षा य पटींनी सुरक्षित आहे. जोसेफ लिस्टरनी ऑपरेशन निर्जंतुकपणे करण्याचा तंत्र आणि मंत्र दिला (१८८०). सीझरनंतर, एकूणच ऑपरेशननंतर, जगण्यावाचण्याची शक्यता एकदम वाढली. पुढे ऑक्सिटोसीन उपलब्ध झाले (१९५१) आणि रक्तस्रावाचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागला. ऑक्सिटोसीन हे एक संप्रेरक (होर्मोन) आहे. याच्या उपस्थितीत गर्भपिशवी आकुंचन पावते. पिशवी घट्ट आवळली जाणे रक्तस्राव थांबण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. नुसते टाके घालून रक्तस्राव थांबत नाही. हे इंजेक्शन आता सीझरवेळी आणि नॉर्मल डिलिव्हरीवेळी सुद्धा सर्रास वापरले जाते. हे इंजेक्शन नसते तर तिन्ही जगाचे कित्येक स्वामी आईविना भिकारीच निपजले असते. रक्तस्राव कमी करण्यात भुलीच्या तंत्राचा मोठा वाटा आहे.  सुरवातीला भूलीसाठी क्लोरोफोर्म वापरत. ही काही आदर्श भूलौषधी नाही. पण तेंव्हा तेवढीच उपलब्ध होती. अगदी महाराणी व्हिक्टोरियानेसुद्धा, राजपुत्र लिओपोल्डच्या जन्मावेळी (१८५३), वेदनाशामक म्हणून मोठ्या धीरोदात्तपणे  क्लोरोफोर्म हुंगून आपल्या प्रजाजनांसमोर आदर्श घालून दिला. तिच्या ह्या कृत्यानंतर इंग्लंडात भुलीचा वापर झटक्यात वाढला.  पण क्लोरोफोर्मने गर्भपिशवी नीट आकुंचन पावत नाही. उलट प्रसरण पावते. आता स्पायनल किंवा एपीड्युरल पद्धतीनी भूल दिली जाते. यात पेशंट जागी असते पण कमरेखालचा भाग बधीर होतो. संपूर्ण भूल देण्यापेक्षा आईसाठी आणि बाळासाठी ही पद्धत खूप खूप सुरक्षित आहे. अँन्टीबायोटिक्सच्या शोधानंतर, रक्त संक्रमण उपलब्ध झाल्यानंतर आणि काही तांत्रिक बदल झाल्याने; आता हे ऑपरेशन इतके सुरक्षित झाले आहे की नॉर्मल डिलिव्हरी शक्य असतानाही ठरवून सीझर करवून घेणारी कुटुंबे आहेत.

बाळ पोटात जर उपाशी, अशक्त, आजारी, गुदमरलेले, अॅनिमिक वगैरे असेल तर हा शोध आता सोनोग्राफी आणि अन्य तंत्रांनी खूप लवकर लागतो आणि वेळीच सीझर करून बाळावर पुढील उपचार सुरु करता येतात. तीस एक  वर्षांपूर्वी हे असलं काही नव्हतं. बाईच्या पोटावरून हाताने चाचपून काय शोध लागेल तेवढाच. पोटात गर्भपिशवी, पिशवीत पाणी आणि पाण्यात तरंगणारे  बाळ; तेंव्हा ढेरी   कुरवाळण्याने काय आणि किती माहिती मिळत  असेल,  तुम्हीच कल्पना करा.   म्हणूनच सुरवात जरी आईचा जीव वाचवण्यासाठी म्हणून झाली असली तरी हल्ली हे ऑपरेशन बाळाच्या काळजीपोटी अधिक वेळा केलं जातं. वेळेत निदान आणि सुरक्षित जन्म झाल्याने अनेक बाळांचं मोठेपणही आरोग्यानंदात जातं. इहलोकीची यात्रा ही, प्रस्थान नीट ठेवले, की निदान सुरवात तरी छान होते.

एकाच कृतीमागील हेतू किती बदलतात बघा. उदरी बाळ तसेच असताना दोघांना एकदम माती देऊ नये असा संकेत होता, जुन्या काळात. त्यातून पोट फाडून बाळ काढायला सुरवात झाली. म्हणजे परलोकीचे व्यवहार सुरळीत व्हावेत म्हणून हा आटापिटा. पण आता मात्र याच आट्यापिट्याने इहलोकीचे आयुष्य सुकर होते आहे.

 

 

 

 

 


Monday, 21 August 2017

सीझर माझं कराल तर...!!!

सिझर माझं कराल तर...!!!!
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई
मो.क्र. ९८२२०१०३४९

बाकी सोशल मिडीयात लोक सीझरच्या वाढत्या प्रमाणाबद्दल काहीही बोलू देत, लिहू देत, पण डॉक्टर नको म्हणत असतानाही, ‘डॉक्टर, माझं सीझरच करा’ अश्याही मिनत्या वाढत चालल्या आहेत हे खरं.
शिक्षण संपता संपता, उद्योग-नोकरीत स्थिरावता स्थिरावता, लग्नालाच उशीर झालेला असतो. पुढे हनीमून आणि नव्याची नवलाई एन्जॉय करायला म्हणून काही दिवस प्लॅनिंग झालेलं असतं. झालंच मूल, तर सांभाळणार कोण? दोघंही नोकरी करणारे. दोन्ही सासवाही रिकाम्या नाहीत. सासरे रिकामे असले तरी अशा कामाचे नाहीत. अशी सगळी परिस्थिती असते. त्यात दिवस राहायला उशीर झालेला असतो, कधी कधी तर मोठ्या मुश्कीलीनी प्रेग्नन्सी साध्य होते. मग हे नवसाचं बाळंतपण सुरळीत होणं हे अगदी गरजेचं. सगळ्यांच्या रजा, सुट्ट्या, वेळा, सोयी हे बघून बाळानी जन्म घेणं अवघड. एवढं ते थोडंच समजूतदार असतं? तेंव्हा आपणच वेळ निवडलेली बरी. लोकांना आता अनिश्चिता सोसत नाही. तहान लागण्याआधी विहीरच काय, पण नळ जोडून वॉटर फिल्टरही तयार असतो आता. मग अशा मिनत्या सुरु होतात.
डिलिव्हरीच्या वेदना ही एक मोठी भीती असते. दुखतं खरच खूप. प्रचंड दुखतं. आयुष्यातला सगळ्यात वेदनादायी अनुभव. याची तुलना असह्य दातदुखी किंवा शरीरभर पसरलेल्या कॅन्सरची वेदना अशाशीच होऊ शकते. हे दुखणं कुणालाही नको असतं आता. सीझरचं प्रमाण वाढण्यामागे समाजाची ही कमी झालेली सहनशक्ती हे ही एक कारण आहे. कित्येक बायका तर नवऱ्याला आधीच पटवून ठेवतात, ‘मला दुखायला लागलं, की तू लगेचच सीझरचा आग्रह धर. कारण आई, सासूबाई कुण्णी कुण्णी माझं ऐकणार नाहीत.’ मग अशा मिनत्या सुरु होतात.
खरंतर वेदनारहित प्रसूती शक्य आहे. पण कोणी सहसा या भानगडीत पडत नाही. हे तंत्र जाणणारे डॉक्टर मुळात कमी आहेत. याचा खर्चही बराच आहे. शिवाय इतकं करूनही ऐन वेळी सीझर लागू शकतं ते शकतंच. त्याबद्दल कुणी काही सांगू शकत नाही. वेदना शमन तंत्रात त्या स्त्रीची बाळ बाहेर ढकलण्याची क्षमता मार खाते. त्यामुळे प्रसूती चिमटा लावून अथवा वाटी लावून करावी लागते. याचेही काही प्रॉब्लेम्स असतात.  थोडक्यात, धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी या तंत्राची अवस्था आहे. शिवाय समाजाची मानसिकता अशी आहे की; ‘काहीही बिन कष्टानी मिळालं की त्याची किंमत रहात नाही. तेंव्हा बाळसुद्धा जरा दुखून-खुपून झालं की आईला त्याची किंमत कळते. मगच ती नीट काळजी घेते!’, असा प्रवाद आहे.
कुठल्याही प्रकारची जोखीम कुणालाही नको असते. दिवस वर गेलेले असताना, पाणी जेमतेम असताना, आधीचं सीझर असताना, जुळी असताना, बाळाचं वजन किंवा वय किंवा दोन्हीही भरत नसताना, नैसर्गिक प्रसूती होऊ देणे हे जोखमीचं असतंच असतं. कित्येकदा डॉक्टरांसाठी हे असलं बाळंतपण, सीझरपेक्षा जास्त कौशल्याचं असतं. असा प्रयत्न करणं म्हणजे दोरीवरून चालण्यासारखं आहे. कधी तोल जाईल ते सांगता येत नाही. सीझर करा म्हणावं तर अनावश्यक सीझरचा आरोप होतो. काही प्रॉब्लेम झाल्यावर, ऐन वेळी करा म्हणावं तर, ‘आधीच का नाही केलं?’ असा शहाजोग प्रश्न येतो. वास्तविक डॉक्टरचं काम केवळ सल्ला देण्याचं आहे. निर्णय घेण्याची जबाबदारी त्या त्या पेशंटची आहे. हे वैद्यकीचं एक महत्वाचं तत्व आहे. व्यवहारात असं होत नाही. ‘आता तुमच्याकडे आणून टाकलंय डॉक्टर, आता तुम्हीच काय ते बघा’, असा सोयीचा आग्रह असतो. निर्णय घेण्याची आणि त्याच्या भल्याबुऱ्या परिणामांची जबाबदारी स्वतः स्वीकारण्याची मानसिकता अजिबात असत नाही. बरेचदा  यातल्या जोखमीची कल्पना नातेवाईक करू शकत  नाहीत. तो त्यांचा प्रांत नसतो. अशा अति-जोखमीच्या बाळंतपणात इतका वेळ आणि इतक्या काळजीपूर्वक आईकडे आणि बाळाकडे लक्ष द्यावं लागतं, की ते छोटया दवाखान्याच्या ताकदी बाहेरचं असतं. डिलिव्हरीला कधी चार तास लागतील तर कधी चोवीस. इतका वेळ पेशंटच्या उशा पायथ्याशी थांबायला तिथे कुणाला शक्य नसतं आणि तेवढं मनुष्यबळही नसतं. इतकं करूनही शेवटी आउटकम् महत्वाचा. आई किंवा बाळाला कोणत्याही कारणानी काहीही त्रास झाला तर कोणी समजावून घेण्याच्या मनःस्थितीत नसतं. प्रामाणिक प्रयत्नांचं कौतुक विसराच, थेट खळ्ळख्टॅक!! जोखीम स्वीकारण्यात निव्वळ मोठ्या बक्षिसाची आशा धरून कसं चालेल? नुकसानीचीही शक्यता असते. हे मान्यच नसतं कुणाला. प्रत्येकाला १००% ग्यारंटीशीर रिझल्ट हवा असतो. टिकल्या, पिना, क्लिपा विकणाऱ्या दुकानात पाटी असते, ‘फैशनकी इस दुनिया में ग्यारंटीकी अपेक्षा न करें’. इथे तर कितीतरी अज्ञात घटक. तेंव्हा अपेशाची थोडीफार शक्यता गृहित धरायला हवी. नॉर्मलचा प्रयत्न करताना त्यातले धोकेच फक्त वजा करा, असं नाही करता येत. इथे समाज वाल्याच्या बायकोच्या भूमिकेत असतो. वाल्याच्या उद्योगातला सुखाचा वाटा सर्वांना हवा असतो त्यातली जोखीम आणि वाईटाचा धनी तो एकटा. मग अशा वेळी तारेवरून चालण्यापेक्षा थेट सीझरचा सल्ला दिला जातो.
सीझरमधेही धोके असतात की. भूल देण्यात, ऑपरेशन करण्यात, ती जखम... नंतरची विश्रांती... पण आज वैद्यकीच्या प्रचंड प्रगतीमुळे हे धोके खूप खूप कमी झाले आहेत. पूर्वी अगदी आईचे प्राण कंठाशी आले की मगच सीझरचा निर्णय घेतला जायचा. कारण सीझर करण्यामुळेही प्राण कंठाशीच यायचे. आता तसं नाही. भुलीची पद्धत पूर्वीपेक्षा खूप सुधारली आहे. ऑपरेशनचं तंत्रही बदललं आहे.
आणखी एक घटक आहे. कमी वजनाच्या, कमी दिवसाच्या बाळाची काळजी घेण्याचं शास्त्र आता आरपार बदललं आहे. अगदी ६००-७०० ग्रॅम वजनाची बाळंही जगवता येतात. जगवली जातात. अशी कामगिरी ही आता वैद्यकविश्वात तरी ‘बातमी’ राहिलेली नाही. पूर्वी असं नव्हतं. १५००-१८०० ग्रॅमचं बाळही जगणं मुश्कील अशी स्थिती होती. मग असल्या बाळांच्या, आयांची सीझरही होत नव्हती. त्यांची बाळंतपणं ‘नॉर्मल’च व्हायची. बाळ जगलं तर आपलं, नाही तर देवाचं. बाळं नॉर्मल होत होती, गुदमरत होती, तडफडत होती, मरत होती किंवा अर्धमेली जगत होती. तक्रारीचा प्रश्नच नव्हता. ‘जाउ दे, नव्हतं आपल्या नशिबी’, असं म्हणून लोकं पुढच्या बाळंतपणाच्या तयारीला लागत होती. आता असं कोणी करत नाही.
बाळ झालं की पाचव्या दिवशी पूजा करायची प्रथा निर्माण झाली. हा फार महत्वाचा दिवस. पाचव्या दिवशी सटवाई येते आणि बाळाच्या भाळावर भविष्य लिहून जाते. ही प्रथा आपल्या समाजात कशी बरं रुजली असेल? जर सटवाई पाचव्या दिवशी भविष्य लिहीते, तर पहिले पाच दिवस काय होतं? उघडच आहे, पहिले पाच दिवस बाळाला  मुळी भविष्यच नसतं! थोडक्यात ही प्रथा अशा एका समाजात निर्माण झाली आहे जिथे पहिले पाच दिवस त्या बाळाचं भविष्य त्या समाजाच्या देवदेवतांना सुद्धा सांगता यायचं नाही. या समाजात नवजात अर्भकं पटापट मरत असणार. या समाजानं मुळी मान्यच केलं होतं की पाचच्या पुढे जगलं, तगलं, तरच ते मूल आपलं, अन्यथा नाही.

बाळ अशक्त (SGA), आजारी (Sick), उपाशी (Hypoglycemic), कुपोषित (IUGR), सव्यंग (Anomalous), गुदमरलेलं (Hypoxic-Acidotic) असं असेल तर आता बऱ्याच वेळा आधीच समजतं. ही सारी रंगीत सोनोग्राफीची किमया. पूर्वी ह्या साऱ्यांच निदान बाळ जन्मल्यानंतर व्हायचं. ह्या भानगडीत बरीचशी तान्ही योग्य निदान-उपचारपूर्वी मरायची.
मुळातच तोळा मासा प्रकृती असलेल्या अशा बाळाला बाळंतपण सोसत नाही, सबब सीझर करावं लागतं. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल पण आईला जशा बाळंतपणाच्या वेणा सहन कराव्या लागतात तशा त्या बाळालाही सहन कराव्या लागतात. प्रत्येक कळेवेळी, गर्भपिशवीचा रक्तपुरवठा काही काळ कमी होतो. जे मिळेल तेवढ्यात बाळाला भागवावं लागतं. धडधाकट बाळांना हे जमतं. आजारी बाळांना हे खूप धोक्याचं ठरतं. याचाही विचार करावा लागतो. यामुळेही सीझरचं प्रमाण वाढलं आहे.
उत्तम भूल, उत्तम शल्यतंत्र आणि उत्तम नवजात आरोग्य सेवा यांच्या परिणामी सीझरचं प्रमाण वाढलं आहे.
याचा अर्थ प्रत्येक पेशंटचं सिझरच करावं लागेल असा नाही किंवा केलेलं प्रत्येक सीझर हे आवश्यकच होतं असाही नाही. एखाद्या तातडीनं केल्या जाणाऱ्या जीवरक्षक ऑपरेशनची निकड होती का नाही, हे आपण लांबून काय सांगणार? हे तज्ञांचंच काम. कोणत्याही मोठया दवाखान्यात सीझरचं ‘ऑडीट’ होत असतं. म्हणजे वेळोवेळी झालेले निर्णय हे योग्य निकष वापरून, पूर्वनिश्चित प्रॉटोकॉल वापरून झालेत की नाहीत हे तपासलं जातं. यानुसार निर्णय असेल तर तो योग्य मानला जातो. अशी व्यवस्था अधिक व्यापक प्रमाणात अंमलात आणली तर यावर काही तरी अंकुश राहील. अन्यथा पेशंट आणि डॉक्टर एकमेकाला दोष तेवढे देत बसतील. केलं, तर ‘का केलं?’ आणि नाही केलं तर, ‘का नाही केलं?’ अशी सरबत्ती चालू राहील;  आणि वातावरण बिघडण्याशिवाय काहीही निष्पन्न होणार नाही.
शेवटी सीझरच्या एका जगावेगळ्या फायद्याबद्दल सांगतो आणि थांबतो. मानवी मेंदू हा मानवाच्या उत्क्रांतीचा वाहक ठरला आहे. अंगी शक्ती नसताना जगण्याच्या स्पर्धेत इतर प्राण्यांच्या मागे टाकत मनुष्यप्राण्याने जग पादाक्रांत केलं ते युक्तीच्या बळावर, मेंदूच्या बळावर. मेंदूचा आकार हा डोक्याच्या आकारावर अवलंबून आहे... आणि डोक्याचा आकार हा आईच्या कटीच्या आकारावर अवलंबून आहे. आपोआप, निसर्गतः प्रसूत व्हायचं तर बाळाचं डोकं मोठं असून भागणार नाही. प्रसूती होणार नाही. ती बाई अडेल आणि मरेल आणि तिचा वंशच्छेद होईल. हा निसर्ग नियम. त्यामुळे ठराविक मापापेक्षा जास्त मोठ्या डोक्याची संतती निपजू शकत नाही. मानवी डोक्याच्या (आणि मेंदूच्याही) आकाराला ही नैसर्गिक मर्यादा आहे. आईचा कटीभागही फार विस्तारू शकत नाही. शेवटी दोन पायावर तोल सांभाळायचा तर कंबर अति रुंद असून चालणार नाही.
आता सीझरचा शोध लागला आहे. आता सीझरच सीझर होताहेत. मोठया मोठया डोक्याची बाळं आणि त्यांच्या आया जगताहेत. निसर्गनियमा विरुद्ध जगताहेत. अशांची संततीही अधिकाधिक मोठया डोक्याची असणार आहे. परिणामी मेंदूला कवटीत अधिकाधिक जागा मिळणार आहे, परिणामी माणूस अधिकाधिक बुद्धिमान होणार आहे...!!!??? सीझरची भलावण करणारा किंवा त्याचे दूरगामी परिणाम असेही असतील असं सांगणारा हा ही एक युक्तीवाद आहे.
डॉ. शंतनू अभ्यंकर
मो.क्र. 9822010349
या आणि अशाच अन्य लिखाणासाठी माझा ब्लॉग जरूर वाचा

<shantanuabhyankar.blogspot.in>