Showing posts with label प्रेग्नन्सी. Show all posts
Showing posts with label प्रेग्नन्सी. Show all posts

Wednesday, 13 May 2020

ज्युलिअस आणि सीझर

ज्युलिअस आणि सीझर

डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई

ज्युलिअसही सीझर आणि ते जगप्रसिद्ध ऑपरेशनही सीझर; मग त्यांचा एकमेकांची संबंध असावा काय? दंतकथा फक्त उपलब्ध आहेत. या ज्युलिअस सीझरच्या कोण्या बापजाद्याचा जन्म ‘सीझर’ने झाला होता. म्हणून याला त्या आज्याचं नाव ठेवलं म्हणे. आणि म्हणूनच ऑपरेशनचे नावही सीझर.  काही असंही सांगतात की याचा स्वतःचाच जन्म मुळी यौनमार्गे न होता,  उदरमार्गे झाला होता. पण कोणीच यावर विश्वास ठेवत नाही. कारण असं की याची आई पुढे बरीच वर्ष हयात असल्याचा पुरावा आहे!! ज्या बाईचे पोट फाडून बाळ जन्माला आलंय, अशी जननी तात्काळ जन्मभूमीत  चिरनिद्रा घेत असे.  असा तो काळ होता. पोट फाडून बाळ काढलं तर आई मरायलाच हवी! ...आणि ज्युलिअस सीझरची आई तर पुढे बराच काळ होती, म्हणजे ज्युलिअसचा जन्म सीझरद्वारे झालेला नाही!!

इतक्या टोकाच्या परिस्थितीत हे ऑपरेशन केलं जायचं. अर्थात निर्जंतुकीकरण, भूल, प्रतिजैविके, रक्त वगैरे काही काही नसताना दुसरं काय होणार? सगळं काही राम भरोसे. किंवा जो कोणी तारणहार देव किंवा संत  असेल त्याच्या भरोसे. आपल्याकडे जशा धनाची, धान्याची, शक्तीची, युक्तीची अशा वेगवेगळ्या देवता आहेत तसे ख्रिश्चन धर्मात विविध संत आहेत. फक्त आकाशातल्या एकट्यादुकट्या  बापावर त्यांचेही भागत नाहीच.  संत सीझेरीअस  नामे निव्वळ सिझरवेळी आळवायचा खास संत आहे. याला नमोनमः केल्याने सीझर सुखरूप पार पडते म्हणतात. 

उदरी बाळ तसेच असताना दोघांना एकदम माती देऊ नये असा संकेत होता जुन्यापुराण्या काळात. त्यातून पोट फाडून बाळ काढायला सुरवात झाली. पुढे आई मरायला टेकली आहे किंवा मेलीच आहे  आणि बाळ मात्र तग धरून आहे अशा वेळी हा प्रकार केला जायचा. एक अखेरचा प्रयत्न फक्त.  हे नेमकं कसं करावं याचं तंत्रही सर्वज्ञात नव्हते. कसे असेल? मेडिकल कॉलेज वगैरे काही नव्हते त्यावेळी. काही  धाडसी, उत्साही महाभाग काळजावर दगड ठेउनच हे काम उरकायचे. पोट फाडा, बाळ काढा आणि पोट शिवा अशा तीनच पायऱ्यांचे हे ऑपरेशन. पोट उघडण्याची शास्त्रशुद्ध पद्धत; थराखाली थर उघडत जाणे, कमीतकमी रक्तवाहिन्या आडव्या येतील अशा मार्गाने आत शिरणे; वगैरे प्रकार नंतर आले. पोट शिवायचे तेही दाभणाने! भूलबील नव्हतीच. ती बाई इतकी अर्धमेली झालेली असायची की मुळात तीच अर्धवट बेशुद्धावस्थेत असायची. मग वेगळी भूल कशाला? टाके घालून फक्त पोटाची त्वचा शिवली जायची. याहून अधिक काही शिवायला वेळही नसायचा आणि काळ तर शेजारीच आ वासून उभा असायचा. टाकेही केवळ बाहेर घातले जात. कारण आत टाके घातले तर काढायचे कसे हा प्रश्न होता. आज आम्ही सीझर करताना आठ थर उघडतो आणि तितकेच पुन्हा शिवून टाकतो! आमच्या हाताशी पोटातल्या पोटात विरघळणारे धागेदोरे आहेत. आमचे पूर्वसुरी सुताचे किंवा तागाचे धागे वापरत. सगळे टाके कुजत. पण गर्भपिशवी टाके न घालता तशीच सोडून दिली तर आतल्या आत प्रचंड रक्तस्राव व्हायचा. हे  टाळण्यासाठी एद्युअर्दो पोरोनी  तर थेट पिशवीच छाटून टाकायचा प्रयोगही करून पहिला. पण व्यर्थ.  यातून ती निभावून गेलीच तर जखमांत पू व्हायचा.  आधीच अर्धमेली झालेली ती यात बहुतेकदा पूर्ण मरायची. पुढे केहरर आणि सँगर प्रभृतींनी पिशवीला टाके घालायचे तंत्र विकसित केले आणि जरा जास्त बायका जगायला लागल्या.

ही शस्त्रक्रिया काही फक्त युरोपमधले हुशार लोकंच करत होते असं नाही. पण युरोपमधल्या हुशार लोकांचा तसा गैरसमज मात्र होता. अगदी आफ्रिकेतील आदिम जमातींनीसुद्धा असे प्रयत्न केल्याचे पुरावे आहेत. अर्थात अपयशाची रड सगळीकडे सारखीच. सीझरविषयक भारतीय दंतकथाही आहे. ‘प्लॅस्टिक सर्जरी’चा शोध आपल्याला लागल्याचा पुरावा आहेच; त्यापुढे सीझरची काय कथा?  चंद्रगुप्ताचा मुलगा, बिंदुसाराचा जन्म म्हणे उदरभेद पद्धतीने झाला होता आणि हे कर्म उरकलं होतं, भेदनीतीचा जनक आर्य चाणक्याने; असं म्हणतात. बिंदुसाराच्या आईने, दुर्धरेने एकदा पतीच्या पानातील अन्न खाल्ले. चंद्रगुप्ताला कोणतीही विषबाधा होऊ नये म्हणून चाणक्य म्हणे त्याच्या अन्नात रोज थोडं थोडं विष कालवायचा. हळू हळू चंद्रगुप्त जास्त जास्त विष विनासायास पचवू लागला. दुर्धरेला याचा पत्ताच नव्हता. त्यामुळे तिला बिचारीला ते विष बाधलं आणि पार मरणपंथाला लागली ती. नेमकं चाणक्याने हे पाहिलं आणि काय होतंय ते त्या चाणाक्षाच्या लगेचच लक्षात आलं. तात्काळ त्याने पोट फाडून बिंदुसाराला आईवेगळे केले. दुर्धरा गेली पण बिंदुसार वाचला! अशीच काहीशी कथा इराणचा पुराणपुरुष रुस्तम याच्याही बद्दल आहे. आयर्लंडच्या उलस्टर पुराणात फारबीद फरबेंड बद्दलही आहे. ज्यूंच्या ‘ताल्मूद’ या प्राचीन ग्रंथातही आहे. इतकंच कशाला, ‘एलिअन व्हर्सेस प्रीडेटर’ या आधुनिक पुराणात तर ‘एलिअन’ बीज आईच्या तोंडातून पोटात जातं, काही क्षणात वाढतं आणि आणि पोट फाडून जन्म घेतं!! बघावा तो महापुरुष आपला आईचे पोट फाडूनच अवनीवर अवतार घेता झालेला दिसतो. पूर्वीपेक्षा आता सीझरचं प्रमाण कितीतरी वाढलं आहे पण महापुरुषांचे प्रमाण काही तितकेसे वाढलेले दिसत नाही.

स्विझरलँण्डमधील जेकब न्युफरची बायको यातून बचावल्याची नोंद आहे. जगलेली आणि आपल्याला ज्ञात असलेली ही पहिली. हिच्या पतीनीच ऐनवेळी सीझर करून हिला सोडवली. तो होता डुक्कर-कसाई. त्यामुळे त्याला शरीररचनेचं थोडंबहुत ज्ञान होतं, म्हणून त्याच्या हातून जरा सबुरीनी, निटसपणे  आणि नेकीनी  ते ऑपरेशन झालं असावं आणि म्हणून सौ. न्युफर वाचली; असा आपला एक तर्क. नाहीतर जेकबवर ‘विधुरव्या’ची कुऱ्हाड कोसळलीच असती. वराह विच्छेदनात तरबेज असल्यामुळे त्याला बाईचे अंतरंग कळले असं मी सुचवलंय खरं, पण कुणी राग मानू नये. सर्व सस्तन प्राण्यांची शरीररचना साधारण एकसारखीच असते, एवढंच सुचवायचंय मला. नाहीतर ती बाई वाचलीच कशी हा प्रश्न निरुत्तर करणारा! पण ही बाई नुसती वाचलीच नाही तर पुढे पाच पोरांना जन्म दिला तिनी. धन्य ती बाई आणि धन्य तिची ती कूस!!

पुढे शरीररचनेच्या अभ्यासासाठी  शवविच्छेदन युरोपमान्य झालं आणि स्वतःच्या शरीराची ओळख झाली माणसाला. भुलीच्या शोधानी तर क्रांतीच केली. त्यामुळे उदरभेद, गर्भाशय छेद, प्रसूती आणि सर्व थरांना टाके घालत घालत ऑपरेशनची सांगता हे सारं शक्य झालं. हातपाय झाडत किंचाळणाऱ्या बाईचे सीझर करणे किती  कठीण असेल याची कल्पनाच केलेली बरी.

पण कल्पना कशाला, त्या काळच्या सर्जरीची  दारूण परिस्थिती अनेकांनी लिहून ठेवली आहे. पायाला गॅस-गँग्रीन झालं म्हणून एका माणसाचा पाय तोडायचा होता. नाहीतर तो शंभर टक्के मरणार. चौकात हीsss गर्दी जमली. चिक्क्क्कार दारू पाजून त्या माणसाला ‘आउट’ करण्यात आलं. आपली कुऱ्हाड परजत मग सर्जन आले. सिंहाच्या काळजाच्या  चार माणसांनी त्या माणसाला, आपल्या पोलादी पंजांनी जखडून ठेवलं आणि पहाणाऱ्या गर्दीच्या डोळ्याचे पाते लवते न लवते, तोच एका घावात त्याच्या पायाचे दोन तुकडे केले गेले. पण त्या माणसाला धोधो रक्तस्राव झाला आणि तो तिथल्यातिथे गेला! हे पाहून गर्दीतला एकजण भोवळ येऊन पडला आणि तत्काळ गतप्राण झाला आणि ह्या कुऱ्हाडीचे पाते कुणा असिस्टंटास चाटून गेल्याने पुढे गॅस-गँग्रीन होऊन तोही मेला!! एकाच ऑपरेशनचा ३००% मृत्यूदर झाला की हा!!!  थोडक्यात रम्य भूतकाळाच्या नावाने, ‘गेले ते दिन गेले’ असे उसासे टाकणाऱ्यांनी स्वतःच्या भूमिकेचा पुनर्विचार करावा. असो.

अगदी १८७० पर्यंत ही शस्त्रक्रिया अंदाजानी केली जायची, तंत्रशुद्ध अशी तत्वे अजून ठरायची होती. बेंबीपासून खाली पोट उभे उघडून, गर्भपिशवीही उभीच छेदली जायची. आता दोन्ही छेद आडवे असतात. हे जरा करायला किचकट आहे पण उभे चिरण्यापेक्षा य पटींनी सुरक्षित आहे. जोसेफ लिस्टरनी ऑपरेशन निर्जंतुकपणे करण्याचा तंत्र आणि मंत्र दिला (१८८०). सीझरनंतर, एकूणच ऑपरेशननंतर, जगण्यावाचण्याची शक्यता एकदम वाढली. पुढे ऑक्सिटोसीन उपलब्ध झाले (१९५१) आणि रक्तस्रावाचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागला. ऑक्सिटोसीन हे एक संप्रेरक (होर्मोन) आहे. याच्या उपस्थितीत गर्भपिशवी आकुंचन पावते. पिशवी घट्ट आवळली जाणे रक्तस्राव थांबण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. नुसते टाके घालून रक्तस्राव थांबत नाही. हे इंजेक्शन आता सीझरवेळी आणि नॉर्मल डिलिव्हरीवेळी सुद्धा सर्रास वापरले जाते. हे इंजेक्शन नसते तर तिन्ही जगाचे कित्येक स्वामी आईविना भिकारीच निपजले असते. रक्तस्राव कमी करण्यात भुलीच्या तंत्राचा मोठा वाटा आहे.  सुरवातीला भूलीसाठी क्लोरोफोर्म वापरत. ही काही आदर्श भूलौषधी नाही. पण तेंव्हा तेवढीच उपलब्ध होती. अगदी महाराणी व्हिक्टोरियानेसुद्धा, राजपुत्र लिओपोल्डच्या जन्मावेळी (१८५३), वेदनाशामक म्हणून मोठ्या धीरोदात्तपणे  क्लोरोफोर्म हुंगून आपल्या प्रजाजनांसमोर आदर्श घालून दिला. तिच्या ह्या कृत्यानंतर इंग्लंडात भुलीचा वापर झटक्यात वाढला.  पण क्लोरोफोर्मने गर्भपिशवी नीट आकुंचन पावत नाही. उलट प्रसरण पावते. आता स्पायनल किंवा एपीड्युरल पद्धतीनी भूल दिली जाते. यात पेशंट जागी असते पण कमरेखालचा भाग बधीर होतो. संपूर्ण भूल देण्यापेक्षा आईसाठी आणि बाळासाठी ही पद्धत खूप खूप सुरक्षित आहे. अँन्टीबायोटिक्सच्या शोधानंतर, रक्त संक्रमण उपलब्ध झाल्यानंतर आणि काही तांत्रिक बदल झाल्याने; आता हे ऑपरेशन इतके सुरक्षित झाले आहे की नॉर्मल डिलिव्हरी शक्य असतानाही ठरवून सीझर करवून घेणारी कुटुंबे आहेत.

बाळ पोटात जर उपाशी, अशक्त, आजारी, गुदमरलेले, अॅनिमिक वगैरे असेल तर हा शोध आता सोनोग्राफी आणि अन्य तंत्रांनी खूप लवकर लागतो आणि वेळीच सीझर करून बाळावर पुढील उपचार सुरु करता येतात. तीस एक  वर्षांपूर्वी हे असलं काही नव्हतं. बाईच्या पोटावरून हाताने चाचपून काय शोध लागेल तेवढाच. पोटात गर्भपिशवी, पिशवीत पाणी आणि पाण्यात तरंगणारे  बाळ; तेंव्हा ढेरी   कुरवाळण्याने काय आणि किती माहिती मिळत  असेल,  तुम्हीच कल्पना करा.   म्हणूनच सुरवात जरी आईचा जीव वाचवण्यासाठी म्हणून झाली असली तरी हल्ली हे ऑपरेशन बाळाच्या काळजीपोटी अधिक वेळा केलं जातं. वेळेत निदान आणि सुरक्षित जन्म झाल्याने अनेक बाळांचं मोठेपणही आरोग्यानंदात जातं. इहलोकीची यात्रा ही, प्रस्थान नीट ठेवले, की निदान सुरवात तरी छान होते.

एकाच कृतीमागील हेतू किती बदलतात बघा. उदरी बाळ तसेच असताना दोघांना एकदम माती देऊ नये असा संकेत होता, जुन्या काळात. त्यातून पोट फाडून बाळ काढायला सुरवात झाली. म्हणजे परलोकीचे व्यवहार सुरळीत व्हावेत म्हणून हा आटापिटा. पण आता मात्र याच आट्यापिट्याने इहलोकीचे आयुष्य सुकर होते आहे.

 

 

 

 

 


Saturday, 14 October 2017

प्रेग्नन्सी आणि सेक्स

प्रेग्नन्सी आणि सेक्स
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.
मो. क्र. ९८२२० १०३४९

दिवस राहिले की नेहेमीच विचारायला हवा आणि क्वचितच विचारला  जाणारा प्रश्न म्हणजे; ‘आता शरीर संबंध आले तर चालतील का?’ हा प्रश्न मनात असतो, ओठापर्यंत येतो पण बाहेर मात्र क्वचितच पडतो; मात्र खचितच पडायला हवा.
पण एखादयाने विचारला जरी प्रश्न, तरी त्याच ‘हो’ किंवा ‘नाही’ एवढं त्रोटक उत्तर देता येत नाही. ह्याचं उत्तर चांगलं लांबलचक आहे. संभोग, सेक्स वगैरेबाबतीत मूलभूत दृष्टीकोन समजावून सांगणे आहे. शिवाय शरीर संबंध हे जोडप्यात घडत असल्याने उत्तर दोघांच्या कानी पडणे आवश्यक आहे. बरेचदा नवरोजी सोबत नसतात, तेंव्हा निव्वळ बायकोला काही सांगणं फारसं परिणामकारक ठरत नाही. किंवा बायकोला बाहेर बसायला सांगून नवरोजी हा प्रश्न डॉक्टरांच्या कानात कुजबुजतात. डॉक्टर जे सांगतात ते ‘जसंच्या तसं’ जोडीदाराच्या कानावर घालणं अवघडच.  मग डॉक्टर आपलं काही तरी उत्तर देऊन वेळ मारून नेतात.
तेंव्हा सादर आहे दोघांनाही माहिती हवं असं संपूर्ण उत्तर.
सुरवातीच्या काही महिन्यात तर सेक्स म्हणजे त्या स्त्रीच्या दृष्टीनी संकटच असतं. प्रचंड मळमळत असतं. पोटात नुसतं ढवळून येत असतं. साध्या प्रवासानी काही काळ मळमळलं तरी आपण कोण वैतागतो. काही म्हणजे काही करावसं वाटत नाही. मग दिवस-दिवस हा त्रास काढणाऱ्या बाईला तर काय होत असेल? अशा वेळी तिनी रतिसुखाला होकार देणं अपेक्षित तरी आहे का? पण ही गोष्ट पुरुष समजावून घेत नाहीत. बायका सहसा इतक्या मोकळेपणाने बोलत नाहीत. मग बेबनाव सुरु होतो.
सुरवातीला खूप थकवाही जाणवतो. एरवीची सवयीची कामही आता जाचक वाटायला लागतात. खूप झोप येते. रात्र झाली की झोपायचं, रात्री झोपून झोपून कंटाळा आला म्हणून दिवसा झोपायचं, पुन्हा रात्र झाली, की रात्र झाली म्हणून झोपायचं; अशी स्थिती होते. त्यातून उलटीसाठी गोळ्या दिल्या असतात, त्यानीही झोप येते. या झोपेचा निराळा अर्थ काढला जातो. आता त्या स्त्रीला कामेच्छाच उरली नाही अशी समजूत करून घेतली जाते.
गरोदरपणात स्त्रीचं रूप खूप खूप बदलतं. इतकं की तिचाच तिच्या बदललेल्या रूपावर विश्वास बसत नाही.
लावण्य जातेस उतू। वायाच चालला ऋतू
अशाच वेळी गेलीस कां तू। करून जिवाची दैना
समुद्र बिलोरी ऐना। सृष्टीला पाचवा महिना।।’
अशी कवींनी सृष्टीसौंदर्याची तारीफ केली असली तरीही या कालावधीतले अनेक बदल मुळीच सुसह्य नसतात.
बरेचदा गालावर, नाकावर एक मोठा काळा डाग येतो (Malesma), दिसायला भारी वाईट दिसतो. पोटावर बेंबीपासून खाली जणू कोळश्यानी ओढावी अशी एक काळी रेघ उमटते (Linea Nigra). ही देखील विद्रूप दिसते. एकूणच त्वचा काळवंडते. निपलभोवती, मायांगाभोवती काळेपणा वाढतो. शरीरातल्या वाढत्या मेलानिन ह्या द्रव्याच्या ह्या खुणा. प्रसूतीनंतर  या मावळतात. पण किंचित मागमूस राहु शकतो, राहतोच. पुढे पुढे पोटावर, मांड्यांवर, स्तनावर, पांढऱ्या रेघा उमटतात (Strie Gravisarum). हे चट्टेपट्टे अगदी विचित्र दिसतात. ह्या रेघा उठतात त्या पोटाची त्वचा अति ताणल्यामुळे. त्वचेचा आतला पापुद्रा चक्क विरतो. कधी खाज सुटते, कधी लाली येते. किरकोळ औषधांनी हा त्रास थांबतो. पण खुणा येऊ नयेत किंवा आलेल्या पूर्ण जाव्यात असं औषध नाहीये. असूच शकत नाही. कारण पोट तर वाढणारच आणि त्यामुळे त्वचा तर विरणारच. म्हणूनच अशा हेतूने विकल्या जाणाऱ्या औषधांची कामगिरी यथातथाच  आहे. त्वचेच्या बदलत्या रंगरूपाबरोबरच पायावर, हातावर, चेहऱ्यावर सूज येते, केसही गळायला लागतात. या पाठोपाठ शरीराची ढब बदलते. सरळ ताठ उभं रहाताच येत नाही. पुढे पोक काढून उभं रहावं लागतं. स्तनांचा आकार वाढतो, ते खाली ओघळतात आणि अगदी काखेपर्यंत या गाठी वाढतात. यामुळे बेडौलपणा येतो. स्तनांना हुळहुळेपणा येतो. एरवी हवेहवेसे स्वर्गीय वाटणारे स्पर्श, आता नकोसेच नाही तर तापदायक वाटायला लागतात. स्तनातून अगदी सुरुवातीपासून चीक बाहेर पडतो. हे लक्षात येताच काहींना उगीचच ओशाळल्यासारखं होतं. योनी स्त्रावातही बरेच बदल होतात. त्या स्त्रावाचं प्रमाण आणि गंध बदलतो. योनी मार्गाला आणि एकुणच स्त्रीअवयवांना वाढलेला रक्तपुरवठा  हे ह्याचं प्रमुख कारण. रक्त पुरवठा इतका वाढतो की कधी कधी अलगद स्पर्शानेही रक्तस्त्राव सुरु होतो. मग कोण धावपळ, हा रक्तस्त्राव गर्भाशी थेट संबंधित नाही अशी खात्री होईपर्यंत कोण काळजी.


ह्या साऱ्याचा स्त्रीच्या मानसिकतेवर होणारा परिणाम अधिक गहिरा असतो. अनेकींना स्वतःबद्दल विलक्षण न्यूनगंड वाटायला लागतो. ‘आता आपण पूर्वीसारख्या आकर्षक, सुंदर दिसत नाही; निस्तेज, काळवंडलेली कांती, बांधाही बेढब, आता हे सारं पूर्वीसारखं होणं जाम अवघड. आता आपण आपल्या नवऱ्याला पूर्वी इतक्याच आवडू का?’, अशी चिंता भेडसावायला लागते. म्हणतात ना, मन चिंती ते वैरी न चिंती. अशा वेळी नवऱ्यानी दिलेला विश्वास हा लाखमोलाचा ठरतो. पुरुषांनी हा मुद्दा लक्षात ठेवायला हवा, आचरणात आणायला हवा.
ह्या बरोबर इतरही अनेक प्रकारच्या ‘भीत्या’ अशा जोडप्याला छळत असतात. गर्भपात होईल, कमी दिवसाची प्रसूती होईल, अशी भीती वाटत असते. इतर काही बाधा नसेल तर संबंधामुळे ना गर्भपात होतो ना कमी दिवसाची प्रसूती.  बाळाला इजा होईल अशीही भीती सतावत असते. शरीरसंबंधामुळे बाळाला थेट इजा होऊ शकत नाही. बाळाला इन्फेक्शन होईल अशीही भीती वाटत असते. पण शरीरसंबंधामुळे बाळाला थेट इन्फेक्शनही होत नाही. नवऱ्याच्या शरीरातील जंतू थेट बाळाला टोचले जात नाहीत. समजा नवऱ्याला काही इन्फेक्शन असेल, उदाः एचआयव्ही, तर ते आधी आईला होते आणि आईच्या रक्तातून ते बाळापर्यंत पोहोचते. पण बहुतेकदा नाहीच पोहोचत. ‘नउ मास नउ दिवस रक्तामासाचा घास करून मी तुला लहानाचा मोठा केला’; असं सिनेमातल्या आया जरी म्हणत असल्या, तरी प्रत्यक्षात आईचं रक्त आणि बाळाचं रक्त हे दोन वेगवेगळ्या पाईपलाईन मधून फिरत  असतं. आईचं रक्त, बाळाच्या  शरीरात खेळतबिळत नसतं. आई आणि बाळाच्या रक्ताचा थेट संपर्क येत नाही. अतिपातळ, अतिसूक्ष्म पडद्याद्वारे आवश्यक व अनावश्यक पदार्थांची देवाणघेवाण तेवढी होत रहाते. आईच्या शरीरातील जंतुंना बाळापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अडथळे पार करावे लागतात. हा पडदाही भेदावा लागतो. काहीच जंतुंना, काहीच वेळी हे साधतं. बहुतेकदा नाहीच साधत.
काही जणांना तर होणाऱ्या बाळाचं भवितव्य काय असेल अशी विचित्र चिंता लागून रहाते. मोठेपणी आपले बाळ कोण होईल? ते जगात आपलं नाव काढेल ना? असे विचार मनात घोंगावू लागतात. अर्थातच इतक्या दूरची चिंता वहाणाऱ्यांच्या कामरंगाचा बेरंग व्हायला वेळ लागत नाही. आपला हा जो काही उद्योग चालला आहे तो बाळ आतून बघतंय असं चित्र काही जणांना सतावतं. असा काही विचार आला की मंडळी ऐक वक्ताला अगदी वरमून आणि शरमून जातात. अश्या लाजऱ्या लोकांसाठी हे नमूद केलंच पाहिजे की बाळाला आतून काहीही दिसत नाही, तेंव्हा, ‘चालू दे तुमचं!’
पोकळ शंकांच्या बरोबरीने स्त्रीचे मूडही गरोदरपणात एरवीपेक्षा(ही) पटापट बदलतात. घटकेत रडू तर घटकेत हसू असा खेळ सुरु होतो. नवऱ्याची खूपच गोची होते. स्त्रीची कामेच्छा गरोदरपणात जरा कमी होते. होर्मोनमधील होणारे बदल मेंदूतही आपली करामत दाखवतात. मातृभावना उफाळून येतात. पिल्लांना इजा करू धजल्यास प्राणीही किती चवताळून अंगावर येतात. अशाच भावना निसर्गाने मानवी मेंदूतही पेरल्या आहेत. अर्थातच कामेच्छा कमी झाली तरी संपतबींपत नाही. ही बाब पुरुषांनी समजावून घेणं खूप खूप महत्वाचं आहे. अशा अवस्थतेत त्या स्त्रीला मानसिक आधाराची, विश्वासाची गरज असते. ह्या कालावधीत एकमेकांबरोबर वेळ घालवणं, बाळासाठी तयारी करणं, यात बाबांचाही सहभाग असेल तर पतीपत्नीचं नातं अधिक गहिरं होत जाईल. नात्यात एक नवा भरजरी धागा गुंफायची संधी म्हणून याकडे पहायला हवे.
निव्वळ दिवस रहाण्याने, एक मुद्दा निर्विवादपणे सिद्ध झालेला असतो. ‘आपल्याला दिवस राहू शकतात!’. लग्नानंतर पहिल्या वर्षात दिवस राहिले नाहीत तर लोक त्या बाईकडे विचित्र नजरेने बघतात, दोन वर्षात राहीले नाहीत तर त्या पुरुषालाही, ‘नको ग बाई हा मेला पुरुषाचा जन्म!’ असं होऊन जातं आणि तीन वर्षात राहिले नाहीत तर त्यांच्या डॉक्टरलासुद्धा अशा नजरांचा सामना करावा लागतो. बायकोला दिवस ‘रहाववू’ शकणे हे पुरुषाच्या दृष्टीनं खूपच महत्वाचं असतं. वांझोट्या स्त्रीची वेदना कथा कादंबऱ्यातून आणि नाटका सिनेमातून सतत कुरवाळली जाते, पण अशा पुरुषांनाही काळजात प्रचंड ओझं घेऊन जगावं लागतं. मोकळेपणी रडणं पुरुषांना  नॉट अलाउड; तेंव्हा फक्त कुढणं चालू असतं. दिवस राहिल्यामुळे, ज्या एका आउटकमवर अख्खी लग्नसंस्था उभी आहे, ज्या बातमीची दोन्ही घरचे आतुरतेने वाट पहात असतात, ती शक्यता आता नजरेच्या टप्यात येते. त्या जोडप्यावरचा ताण हलका होतो. हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे वंशवृद्धी हा तात्कालिक हेतू साध्य झाल्यामुळे सेक्सकडे आता निर्हेतुकपणे बघणं शक्य होतं. हा अनुभव खूप वेगळा आणि सुंदर असतो. निव्वळ आनंदासाठी संभोग, काहीही मिळवण्यासाठी नाही. हा तर निष्काम शृंगारयोग.
बदलत्या भूमीकेचंही दोघांना अप्रूप असतं. मित्र-मैत्रीण, पती-पत्नी हे नातं आता आई-बाबा, बालक-पालक  असं बदलणार असतं. पण कित्येक पुरुषांना बायकोबद्दल आता सुप्त असूया वाटते. आपल्या पुरुषप्रधान व्यवस्थेत घरातील कर्ता पुरुष हाच घराचा केंद्रबिंदू असतो. रोजची भाजी कोणची करायची हे ही त्याच्याच कलानी ठरवलं जातं. पण दिवस राहीले की पुरुषाच्या पुढारकीत वाटेकरी निर्माण होतो. ‘चहाच्या वासानीसुद्धा मळमळत तिला, तेंव्हा आजपासून सकाळी सगळ्यांसाठी कॉफी!’ अशा घोषणा नित्याच्याच होतात. नवेपणाचे किती सोहळे!  ते डोहाळजेवण... झोपाळ्यापासून ते थेट चंद्रापर्यंतचं. ते फोटो. ते कौतुक. घराचा सगळा फोकस त्या बाईवर रहातो आता. असूया म्हणून असो वा सोय म्हणून असो, या साऱ्यातून  बाजूला रहाण्यापेक्षा या साऱ्यात सहभागी होणं हे चांगला बाप होण्यासाठी उपयोगी आहे. भावी पालकांसाठी आजकाल मार्गदर्शन वर्ग असतात. यातही बाबांची हजेरी बाबांना खूप काही शिकवून जाते. पती-पत्नीचं नातं निवळ शरीरभोगावर आधारलेलं नाही, नसावं. हे सिद्ध करण्यासाठी एक संधी म्हणून ह्या साऱ्याकडे पहावं.
शेवटी मूळ प्रश्न आणि त्याच्या स्पष्ट, नेमक्या उत्तराकडे. ‘गरोदरपणी संबंध कधी टाळावेत?’
  • पहिले तीन महिने आणि शेवटचे दोनएक महिने संबंध टाळावेत असा सल्ला बहुसंख्य प्रसूतीतज्ञ देतात पण यालाही फारसा शास्त्रीय आधार नाही.
  • काही निवडक आजारातच संभोगावर बंदी आहे. रक्तस्त्राव होत असेल/ झाला असेल, वार खाली असेल, बीपी वाढल्याने वा अन्य कारणानी संपूर्ण विश्रांतीची गरज असेल, पाणमोट फुटली असेल, पिशवीचे तोंड उघडले असेल, तर संभोग वर्ज्य आहे; एरवी नाही.
  • पोटावरती दाब येणार नाही असे संभोगाचे आसन असावे. सेक्स म्हणजे निव्वळ लिंगाचा योनी मार्गात प्रवेश ही फारच मर्यादित, खुजी, संकुचित व्याख्या झाली. प्रेमंभरानी दिलेले आलिंगन, चुंबन, मर्दन, परस्परांचे हसतमैथुन, मुखमैथुन वगैरेही सेक्सचेच प्रकार आहेत. प्रयोगशील जोडपी या कालावधीत हे प्रयोग करू शकतात. पत्नीला आनंद वाटेल, सुसह्य होईल इतपतच धाव घ्यावी.
  • प्रसूतीनंतर सर्व शरीर पूर्वपदावर यायला किमान दीड महिना लागतो. तेंव्हा प्रसूतीनंतर दिड महिना शरीरसंबंध टाळावेत. त्यातून पोटावर सीझरचे किंवा मायांगावर नॉर्मलवेळी सुद्धा कधी कधी घातलेले टाके दुखत असतील तर संबंध टाळणं योग्य. त्यानंतर एकमेकांच्या संमतीने आणि गर्भ निरोधक साधनांबद्दल सल्ला घेऊन कामक्रीडा सुरु करायला हरकत नाही. बाळाला अंगावर पाजायच्या काळात योनीमार्गाला कोरडेपणा येतो. यामुळे संभोगाच्या वेळी घर्षणाचा त्रास होतो, दोघांनाही होतो. यासाठी डॉक्टरी सल्ल्यांनी वंगणयुक्त मलमे वापरायला हवीत.
  • कधी कधी शरीर आणि मेंदू यांचा ताळमेळ चुकतो; बाळाला पाजतापाजताच कामतृप्तीचा आनंद प्राप्त होतो. हे आईसाठी अनपेक्षित असतं. पण यात अॅबनॉर्मल काही नाही.

‘समागम’ हा खूप सुंदर आणि अर्थपूर्ण शब्द आहे. समागम ह्या शब्दाचा एक अर्थ असा सांगतात की, समान पातळीवर येऊन एकमेकांच्या शरीराचा आनंद घेणं आणि देणं. हा किती सुंदर अर्थ आहे. हे साधायला हवं. ह्यासाठी उभयपक्षी सहकार आणि पुढाकार हवा.

प्रथम प्रसिद्धी पुरुष उवाच दिवाळी २०१७
या आणि अशा लिखाणासाठी माझा ब्लॉग जरूर वाचा

<shantanuabhyakar.blogspot.in>

Tuesday, 25 July 2017

व्यंगोबानाथाची कहाणी

व्यंगोबानाथाची कहाणी.
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई


ऐका व्यंगोबानाथा तुमची कहाणी.
आटपाट नगर होतं. तिथे दोन शेजारणी रहात होत्या. एकीचं नाव सुलाबाई तर दुसरीचं भुलाबाई. दोघीही सख्ख्या मैतरिणी. एके वर्षी काय झालं, दोघी गरत्या राहिल्या. नवमासानी दोघीही प्रसवल्या. दोघींच्याही घरी आनंदी आनंद झाला. साऱ्यांनी पेढे वाटले. पण हाय रे दैवा! काय हे दुर्दैव!! थोड्याच वेळात साऱ्या आनंदावर विरजण पडले. दोघींच्याही मुलांना पाठीवर आवाळू होते. आवळ्याएवढे लिबलिबीत आवाळू. मणके मुळी जुळलेलेच नव्हते. बाळाचे पाय अशक्तसे हलत होते. लघवीची धार जेमतेम उडत होती. ही सारी मणके उघडे असण्याची किमया होती. दोघीही हताश झाल्या.
सुलाबाई कर्माला दोष देऊन गप्प बसली. घरची होती तालेवार. पण सासूचं त्वांड कोण धरणार. सासू म्हणाली, ‘तुझंच पाप भोवले पोराला. व्यंगोबाचा कोप झाला. गिराण आलं गिराण गेलं. तू काहीच नाही पाळलं. उलट तेंव्हा उलटून बोललीस. आता भोग आपल्या कर्माची फळं.’
काही दिवस असे गेले. सुलाबाईने मनाचा हिय्या केला. नवऱ्याला पटवले. शेजारच्या गावात कोणी बैरागी आला होता. त्याची पूजा झाली. काही गुण नाही. पलीकडच्या गावात पीर होता. त्याचा नवस झाला पण फेडायची वेळ आली नाही. करता, करता लांब लांब प्रवास घडू लागला. वैद्य झाले हकीम झाले. साधू, संत, फकीर झाले. आशा-निराशेचे झोके झाले. गंडे, दोरे, ताईत झाले. अंगारे, धुपारे, उतारे झाले. उतार काही पडेना आजार काही हटेना. मूल मुळी चालेना, मुळी बाळसं धरेना. त्याच्या पायात ताकद नव्हती. रांगतंय कसलं? फरफट तेवढी होती. पुढे ते वारंवार आजारी पडू लागलं. बाकी घर त्याचा दुस्वास करू लागलं. माय तेवढी माया धरून होती. कोण म्हणे मुळावर आलंय, कोण म्हणे घराला खायला आलंय. सुलाबाई नुसती रडत राही, खंगत राही, मनाने भंगत राही. पुढे ते मूल गेले. डोक्याला हात लावून, नशिबाला बोल लावून, सारे काही उरकले.
यातच पुन्हा दिवस गेले. आता डोळेच पांढरे झाले. पुन्हा असे झाले तर? हीच चिंता दिवसभर. पुन्हा सारे सारे केले. तंत्र, मंत्र, उपासतापास, जपतप, व्रतवैकल्ये सगळे सगळे झाले. गिराण आले गिराण गेले. सुलाबाईनी सगळे केले. रात्रभर टक्क जागी. नाही अन्न नाही पाणी. पण पुन्हा तसेच घडले. तसलंच मूल देवानी धाडले. बाळापाठी आवाळू वाढले. गिराण पाळूनही व्यंगोबा नडला. व्यंगोबाचा फेरा पडला.
भुलाबाईची कथाच न्यारी. तिची सारीच तऱ्हा न्यारी. भुलाबाईनी काय केलं? दळणाच्या डब्यामागे चार पैसे साठले होते. कनवटीला लावून तिनी इस्पितळ गाठले होते. बाळाचा एक्सरे झाला. डॉक्टर म्हणे सीटीस्कॅन करा. बाळाचा सीटीस्कॅन झाला. डॉक्टर म्हणे एम.आर.आय. करा. बाळाचा एम.आर.आय. झाला. बाळांचं ऑपरेशन झालं. बाळ बरंच सुधारलं. वर्षाच्या अखेरीस धरू धरू चालू लागलं. डॉक्टर म्हणे, भुलाबाय, पुढच्या वेळी सावध ऱ्हाय. नवऱ्याचं रक्त तपासू. तुमचंही रक्त तपासू. भुलाबाय समजे, डॉक्टर हाय रक्तपिपासू. पै-पैसा वहात होता. नवा तपास सामने होता. शेवटी सारे रिपोर्ट आले. तेंव्हा कळले, भुलाबाईला मधुमेह होता. बाळातील व्यंग हा त्याचाच प्रताप होता. गोड दुखण्याचा दुखरा खेळ. असा सगळा लागला मेळ. पुढच्यावेळी ती शहाणी झाली. आधीच डॉक्टरकडे गेली. डॉक्टर म्हणाले साखर सांभाळा. तो पर्यंत दिवस टाळा. इंन्शुलीनची सुई दिली. साखर आटोक्यात आली. फोलिक अॅसिडची मात्रा दिली. मगच भुलाबाय गरती राहिली. यथाकाल प्रसूत झाली. नक्षत्रावाणी लेक झाली. दुनिया आनंदानी भरली.
इतक्यामधे काय झाले? शेजारीण दारी आली. ही होती पिचलेली. व्यंगोबाच्या फेऱ्यानी खचलेली. शेजीबाई म्हणे, ‘अगं अगं भुले, काय वसा घेतलास ते सांग तरी मले. माझी कूसही आहे रिती. दोन झाली पण दोन्ही गेली. मागच्यासाली सुलाबायला भेटले. तिच्या सांगण्यासारके केले सारे. पण फळ काही नाही हाती. मी रिती, ती आहे रिती.’
भुलाबाईनी धीर दिला. दवाखान्याचा पत्ता दिला. व्यंगोबाचा वसा तिनी शेजीबाईला सांगितला. ‘डॉक्टर गाठ, तपास कर. शेवटपर्यंत धीर धर. उतू नको मातु नको घेतला वसा टाकू नको.’
‘उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही.’
शेजीबाई लगबग बाहेर पडली. दवाखान्याची पायरी चढली. डॉक्टर म्हणे, ‘सांगू काय? आधीच्याचा रिपोर्ट कुठाय?’
‘कसला रिपोर्ट आणि कसलं काय. तपास मुळी केलाच न्हाय. व्यंगोबानाथाचा प्रताप सारा. नाही उपाय तर तपास कशाला? जायचं ते नशीबानी गेलं. जे व्हायचं तेच झालं. हाती काहीच नाही आलं. पहिलं झालं ते गेलं. दुसरं झालं तेही गेलं. नेमकं व्यंग ठाऊक नाही, फोटो नाही. एक्सरे नाही. सोनोग्राफी, सिटी, एमआरआय काही नाही. बाळाचं रक्त तपासलं नाही. गेलं, नेलं, नदी काठी पुरलं. त्याचं काहीच नाही उरलं.’
डॉक्टर म्हणे, ‘असं कसं? शवविच्छेदनही हवं होतं.’ शेजीबाई शहारली. कल्पनेनीच घाबरली.
डॉक्टर म्हणे, ‘तसं नव्हे. निसर्गाचे हे उखाणे. सुटतील तेवढे सोडवायला हवे. तपास केला तर कारण सापडेल कदाचित. सापडले कारण, तर उपाय असेल कदाचित.’
शेजीबाई बुचकळ्यात पडली. डॉक्टरला विचारती झाली, ‘शोधूनही काही सापडलं नाही, तर कायरे सांगणार तु ही?’
डॉक्टर म्हणे, ‘सापडलं नाही तर सांगीन तसं. पण खोटंनाटं सांगणार नाही. नसलेलं कारण जोडणार नाही. माहित नाही तर माहित नाही म्हणू. अज्ञान आधी मान्य करू. दोघं मिळून पुन्हा शोधू. अज्ञान मान्य करण्यामध्ये विज्ञानाचा उगम आहे.’
शेजीबाईला थोडंच कळलं. बरचसं नाहीच वळलं. तपासण्यांची फैर झडली. दोष काही आढळला नाही. आशीर्वाद आणि शुभेच्छांशिवाय डॉक्टरकडे शब्द नाही. शेजीबाई हिरमुसली. पदरात तोंड खुपसून मुसमुसली.
 डॉक्टर म्हणे, ‘उगी रहाणे जे जे होईल ते ते पहाणे. मोठा काही दोष नाही, हा दिलासा कमी नाही. पेला अर्धा सरला आहे असंही म्हणता येतं पेला अर्धा  भरला आहे असंही म्हणता येतं.  पुढे सारं होईल छान, ही शक्यता मनी जाण. आता तू एवढं कर. खा, पी, पुष्ट हो. मिश्री, दारू शिवू नको. कुठलंही औषध सावधपणे घे. रुबेलाची लस घे. आयोडीनवालं मीठ माग. फोलिक अॅसिड घेऊ लाग. तीन महिने नवरा लांब. व्यंगोबानाथाचा हाच वसा सगळ्यांना सांग.’
शेजीबाई गोंधळली. ‘डॉक्टर, डॉक्टर सांगा आता, सुलाबायचा इस्कोट झाला. भुलाबायचं झालं भलं. पण भुलाबायच्या मार्गानी माला अजून नाही फळं! कोणाची चूक आणि कोण बरोबर? कोण आहे लबाड आणि कोण आहे खरं?’
डॉक्टर म्हणे, ‘कान देवून ऐक. सुलाबायचा वसा साधासा. वड्याचं तेल वांग्याला लावती. काहीही बिनसलं तरी दैवाले बोलती. गिराण, नजर असली कारणं जोडती. भुलाबायचा वसा न्यारा. तोच व्हावा सर्वाना प्यारा.’
 ‘डॉक्टर तुम्ही सांगताय खरं, पण मनात माझ्या भलतंच येतं. मी केला की तपास सारा. कारण नाहीच की सापडलं तुम्हा.’
डॉक्टर म्हणे, ‘तरीबी त्येच. कळलं नाही हे मान्य करणं केंव्हाही ब्येस! चुकीचं कारण जोडलं की थांबतो शोध. मग चुकीच्याच कारणातून चुकीचा बोध. शेजीबाई तुला राहील पुन्हा. तपासून तपासून लावता येईल छडा. कहाणीचा ह्या, हाच आहे धडा. निसर्गानं व्यंगाचा घातला जर उखाणा, तर सोडून देऊ नका, सोडवून बघा.’
पुढे शेजीबाईनं काय केलं? भुलाबाईचा वसा घेतला. दिवस राहिले, तपास योजला. व्यंगोबाचा छडा लागला. त्याच्यावरती उपाय योजला. शेजीबाई प्रसवली. नाकी डोळी नीटस बाळ. दाट जावळ, रुंद कपाळ. अवघा आनंद झाला. व्यंगोबाचा फेरा टळला.
तर अशी ही व्यंगोबानाथाची कहाणी. वसा वसला मनोभावे. भाग्य धावत घरा आले. भुलाबाई आणि शेजीप्रमाणे तुमच्याही घरी भाग्य येओ. अशा रीतीने ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण.